अंकिलेश - एक प्रेमकथा - 2 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अंकिलेश - एक प्रेमकथा - 2

@ अंकिता

सो व्हेअर वाॅज आय? तर सांगत काय होते? लिंक गेली ना की मला परत विचार करावा लागतो. टू गेट बॅक टू द ट्रॅक्ट!

तर ते साँग आहे ना वो जवानी जवानी नहीं जिसकी कोई कहानी न हो.. तर जवानीची कहाणी जवाँदिल लोकांसाठी. दुसरं काय आहे ना, की रेकाॅर्ड रिवाइंड करताना सारं ओल्ड काही रिमाइंड व्हायला होतं. यू नो ते डेज आठवले ना की अजूनही वन फिल्स यंग. खरंतर यंगर म्हणायला हवं. म्हणजे आय ॲम एनी वे यंग इव्हन नाऊ. बट वाॅज यंगर दॅन दिस देन! हो की नाही? तर अखिलेश .. म्हणजे आय काॅल हिम अख्खा किंवा अख्खि.. मला भेटला तो काॅलेज वीक मध्ये. ते ही शत्रुपक्षाच्या म्हणजे त्याच्या होम ग्राउंडवर. बोलणे ही माझी स्पेशालिटी. मी काय गंमत केली ना.. मराथी इलोक्यूशन मध्ये पार्ट घेतला.. आय नो माय मराथी इज पुअर. पण मोनोलाॅगच तर बोलायचा होता! लकीली आय कुड सिलेक्ट वन विथ लाॅट आॅफ इंग्लिश इन इट! म्हणजे इट वाॅज अ काॅमेडी ॲक्ट.. इंग्रजीने केला मराथी भ्रतार! फ्रँकली आय डिडन्ट नो वाॅट भ्रतार मीन्स! आणि सी द फन.. माझा भ्रतार मला मिळाला तो तेव्हाच! आणि तिथेच. तो कायतरी काॅलेजचा सेक्रेटरी होता म्हणे. बट आय वाॅज इन्स्टंटली इंप्रेस्ड! ते वयच तसं असतं ना! बट ही इज अ डार्लिंग. म्हणजे आय डोन्ट लेट हिम नो धिस नाऊ. पण ही इज अ डार्लिंग. नाहीतर माझ्यासाठी त्याने इतके सारे केले असते? इन टुडेज टाइम्स असे कोण करते? नाही त्याबद्दल मी नंतर सांगेन. म्हटलं ना, कॅलिडोस्कोप सारखा व्ह्यू लगेच चेंज होत राहतो. सो अ बीट इन कोहेरेंट होतं सारं. तरीपण देअर इज अ मेथड इन मॅडनेस. किंवा अ थ्रेड इन कंटिन्युईटी म्हणा! मॅडनेस म्हणाले ना मी.. तो खराखुरा काॅलेज डेज मधला. म्हणजे नायर हाॅस्पिटलातली मी दुसऱ्याच काॅलेजातल्या कुणाच्या लव्ह ॲट फर्स्ट साईट पडते काय नि परत भेटण्याची पाॅसिबिलिटी नसतानाही अख्खिला पटवते काय! फेट.. दुसरे काही नाही. फेट ला जरा बरा शब्द आहे डेस्टिनी! पण अर्थ एकच! अख्खि त्याला फटे म्हणतो! आय मेट हिम.. बाय फेट! ही वाॅज सीन बाय मी .. आय साॅ हिम ॲंड ही काँकर्ड! इन ॲन इन्स्टंट.

ते गाणं आहे ना..

आय मेट हिम आॅन अ मंडे

अँड माय हार्ट स्टुड स्टिल..

समबडी टोल्ड मी दॅट हिज नेम वाॅज बिल..

डा..डू..राॅन.. राॅन..

 

तशी मी जिद्दी आहे. त्याला पाहिले नि मी ठरवले, ही इज माय प्रिन्स! म्हणजे त्याचे नाव गाव पत्ता नाही माहिती.. पण मी ठरवले म्हणजे ठरवले! तो मूव्हीचा डायलाॅग आहे ना, एकबार डिसाईड किया तो मैं खुदकी भी नहीं सुनता असा काहीतरी. तसेच हे. त्या फंक्शन नंतर परत आम्ही कुठे भेटणार होतो? बट वन थिंग वाॅज गुड.. वुई बोथ ॲट लिस्ट न्यू इच अदर्स नेम्स आणि टाॅक्ड टू इच अदर ॲट लिस्ट फ्यू वर्डस! नाहीतर मेनी अ लव्हस्टोरीज ह्या स्टेजलाच संपतात. म्हणजे नायदर द बाॅय नाॅर द गर्ल टाॅक टू इच अदर. अर्थात मी तशी डोसाइल कधीच नव्हते. अख्खि भेटण्याआधी मला वाटायचं, इफ आय सी माय प्रिन्स मी त्याला सरळ जाऊन सांगेन.. बट लव्ह मेक्स यू डू फनी थिंग्स. त्या जुजबी दोन वाक्यांपुढे मी काहीच बोलले नाही त्याच्याशी. पण घरी आले ते आज मैं उपर आसमां नीचे म्हणत! इनफॅच्युएशन की प्रेम? लव्ह ॲट फर्स्ट साईट? डिडन्ट नो देन. पण त्या पहिल्या प्राईझहूनही अखिलेश वाॅज सिमिंग लाइक माय प्राईझ कॅच! कॅच आणि मॅच ही! कॅचेस विन मॅचेस म्हणतात ते खरंच!

क्रिकेट म्हटलं की मला ती मॅच आठवते. म्हणजे त्या काॅलेज वीक शेड्यूल मध्ये क्रिकेटची मॅच होती. नेमकी फायनल. नि ती ही जीएस व्हर्सेस नायर हाॅस्पिटल. आणि अख्खि जीएस टीम मध्ये! तशी मी क्रिकेटची फॅन नाही. पण काही तासांपूर्वी मी ज्याची फॅन झाले तो खेळणार म्हटल्यावर मी जिमखाना ग्राउंडवर पोहोचलेच. खरं सांगते, माय हार्ट वाॅज विथ नायर टीम पण आय वाॅंटेड माय अख्खि टू डू वेल बट लूझ ॲट द एंड! माय अख्खि? होय! विदीन फ्यू अवर्स मी त्याची मनाने झाले होते. त्याला त्याची खबर नसताना! अख्खि चांगला खेळला तर त्याला काँग्रॅटस म्हणायला मिळेल इतका सेल्फिश विचार केला तरी मी नायरच्या टीमशी मेंटली गद्दारी केली नाही! देवाने माझे ऐकले.. अख्खि प्लेड रियली वेल. आणि आमची टीम फायनल जिंकली! अख्खि ग्राउंडमधून परत येताना त्याचे अभिनंदन करणारी मी पहिली होते! एका दिवसातला दुसरा शेकहँड! एकूण सिग्नल चांगला होता. तो थ्यांक्स म्हणाला, पण त्याची टीम हरल्यामुळे तो थोडा उदास वाटत होता. आय वेंट बिहाइंड हिम.. 'हारजीत आर पार्ट आॅफ अ गेम.. यू गेव्ह टफ फाइट.. तुम्ही लोक मॅच हरला असाल बट यू वन द हार्टस!' होय! आय हॅड सेड दॅट. हिअर अगेन.. मला म्हणायचं होतं, यू वन माय हार्ट पण बोलताना जनरल बोलले मी. काही असो, अखिलेशशी काही बोलले मी. मॅच संपली. दिवस संपला. हॅड टू रिटर्न बॅक होम. माझ्या फ्रेंडसना जमेल तितकी मी आतापर्यंत चुकवत होते. आता तसे करायला कारण नव्हते. तेव्हा काहीच झाले नाही असे दाखवत साळसूदपणे मी सर्वांबरोबर घरी निघाले. मी म्हटले ना, आज मैं उपर वाले गाणे ते त्यानंतरचे. बोलायले लागले मी की आॅर्डर अशी वर खाली होत राहाते. बट दॅट वाॅज द एंड आॅफ द डे.. रादर बिगिनिंग आॅफ अ न्यू स्टोरी! मी उगाच रात्रभर त्याची ड्रीम्स पहात झोपले. म्हणजे अशी मेड टू आॅर्डर ड्रीम्स पडू शकतात? मेडिकल करिक्युलम मध्ये असे काही शिकवले तर नव्हते. सो देअर रियली इज लाईफ बियाँड सायन्स?

*****

@ अखिलेश

नायर व्हर्सेस केईएम म्हणजे जीएस मेडिकल. क्रिकेट फायनल. दुपारी जिमखान्यात मॅच. आमची टीम इतक्या वर्षांत पहिल्यांदाच फायनल मध्ये. आम्ही ग्राउंडवर पोहोचलो. नायरची टीम म्हटले तर अंकिता कदाचित चियर करायला येईल असे वाटले होते नि सगळ्यात पहिल्या रांगेत ती दिसलीच. मॅच तर जिंकायची पण कदाचित तिला जिंकायचा मार्ग ही ह्या मॅच मधून जात असावा? नशिबाने साथ दिली. पहिल्याच ओव्हरमध्ये मी बाऊंड्री लाइनवर कॅच पकडला. तिथून अंकिता जवळच होती. मी तिच्याकडे पाहात होतो. बिचारी! तिच्या टीमची पहिलीच विकेट पडली होती. मी गोंधळलोच. म्हणजे मी चांगला खेळलो तर तिची टीम हरेल. ती उदास झाली तर..? पण मी खेळाचे स्पिरिट पाळायचे ठरवले. जिंकण्यासाठीच खेळायचे. ती इंप्रेस व्हायची तर तेच खरे! मॅच हरलो आम्ही. जाता जाता अंकिता मागे आली. वेल प्लेड म्हणत. म्हटले, प्यार की गाडी थोडीफार तरी प्रगतीपथावर दिसतेय.

रात्री घरी पडल्या पडल्या विचार करत होतो. दिवसभरात झालेले सारे.. मॅचचे हायलाइट्स दाखवतात तसे.. तिचे ते मोनोॲक्ट.. मी दिलेली ट्राॅफी.. माझे शाॅट्स.. तिची रिॲक्शन.. शेवटचा शेकहँड.. कॅडबरीच्या जाहिरातीसारखी ती 'क्या स्वाद है जिंदगीमें' म्हणत स्टेडियममध्ये येतेय.. हा शेवटचा कल्पना विलास!

पुढे काय? ती परत भेटणार तर नव्हतीच. इंटरकाॅलेजिएट इव्हेंटस संपल्या. तिला परत यायला कारण नव्हतेच. नि नायर हाॅस्पिटलात जायला मला तरी कुठे कारण होते? पण नाही! वाहते पाणी आपला मार्ग शोधतेच. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सरप्राईज तयार होते! तिला मिळालेल्या प्राईझच्या स्वरूपात. म्हणजे लबाड अंकिता तिची वक्तृत्व स्पर्धेची ट्राॅफी मुद्दाम विसरून गेलेली. मुद्दाम विसरलेली हे तिने नंतर मला सांगितलेले.. दुसऱ्या दिवशी सकाळी काॅलेजात पोहोचलो. लेक्चर हाॅल मध्ये एका टेबलावर ती ट्राॅफी माझीच जणू वाट पाहात असावी. तिच्यावरच्या नावा.. अंकिता गावस्कर.. सकट! कुणी येण्याच्या आत ती ट्राॅफी मी बॅगेत टाकली. बाहेर येऊन कट्ट्यावर पुढचा विचार करायला लागलो.

सकाळचे साडे आठ झालेले. खरेतर काॅलेजात इतक्या लवकर येण्याची गरज नव्हती. पण ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होण्यासाठी काही ही होऊ शकतेच. कट्ट्यावर मी एकटाच. बॅगेत अंकिताची ट्राॅफी. क्षणात विचार आला, नायर हाॅस्पिटलात जावे. तिला शोधून ती ट्राॅफी तिच्या हवाली करावी. मराठी वाङमय मंडळाचा सेक्रेटरी म्हणून माझे कर्तव्यच आहे ते!

त्यावेळी मला वाटले नि मी तडक १६६ नंबर बसच्या स्टाॅपवर पोहोचलो. नायर हाॅस्पिटलच्या कँपसमध्ये पोहोचलो, इकडे तिकडे चौकशी केली तर सेकंड इयरचे कोणी दिसेना. त्यात अंकिता कुठेय हे ही कोणाला माहिती दिसेना..

शेवटी एक महत्वाची माहिती हाती लागली.. मेडिसिन युनिट हेड डाॅक्टर सुरेंद्र गावस्करांची ही लेक. शेवटी ती माहिती देणारा म्हणाला ही, है हिंमत तर जा डाॅक्टर गावस्करांच्या केबिनमध्ये. ये मोजून वाघाचे दात!

मला अजून तरी सासरेबुवांत इंटरेस्ट नव्हता. नि हे मोठमोठे डाॅक्टर किती तिरशिंगरावासारखे वागू शकतात हे मी ऐकून होतो. म्हटले उगाच प्रथम ग्रासे मक्षिकापात: वगैरे नको. त्यापेक्षा राहिल ही ट्राॅफी माझ्याकडे! नाहीतरी ती मराठी वाङमय मंडळाची प्राॅपर्टी होती. नि आमची स्टोरी पुढे न सरकल्यास तिचा हात लागलेली एक वस्तू राहिल.. घेऊन रडत बसायला. मी परत निघालो नि गेटवर पोहोचलो तेव्हा अचानक हाक आली, अखिलेश!