अंकिलेश - एक प्रेमकथा - 28 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

अंकिलेश - एक प्रेमकथा - 28

२८

@ डाॅ.सुरेन्द्र गावस्कर

आचार्य भास्कराचार्य पंडित. तेव्हा वय वर्षे ८५. माझे गुरू. म्हणजे मी तसा आध्यात्मिक नाही. देव नि देवळांमागे जाणारा नाही. समोर जित्याजागत्या पेशंटपुढे मला इतर काही दिसत नाही. अगदी तरूणपणी, म्हणजे माझ्या वडलांचे आचार्य पंडित हे गुरू होते. वडलांचा कल अशा स्पिरिच्युअल बाबींकडे फार होता. बिचारे यात मश्गुल राहिले नि देशोधडीला लागले असे मला वाटायचे तेव्हापासून. मग मी ते सारेच आयुष्यातून बाद करून टाकले. पण बाबांचे गुरू म्हणून पंडितांबद्दल मला नितांत आदर. कारण एकच, पंडित गुरूजी कधीच त्यांच्या ज्ञानाचा वापर चुकीचा करत नसत. नाहीतर भविष्य कथन म्हणजे एक मानसिक खेळ.. समोरच्याच्या मानसिकतेचा फायदा उठवण्याचा. तुला लोक समजून घेत नाहीत, किंवा हा इतका इतका काळ जाऊ देत.. किंवा हितशत्रूंमुळे हे दिवस वगैरे वगैरे. जनरल ज्योतिष्यांच्या कथनाचा हा लसावि असावा! पण पंडित गुरूजी अचूक नि नेमका सल्ला देत. अचूक मार्गदर्शन करत. मला म्हणत ही,"तू तुझे प्रश्न स्वत:च सोडवत असतोस, उगाच भविष्यात काय वाढून ठेवलेय वगैरे विचारत बसत नाहीस, नि खरोखरच मोठा प्रश्न उद्भवला तरच येतोस माझ्याकडे. माणसाने असेच असावे! उगाच ह्याच्या आहारी जाऊन आपली जबाबदारी झटकू नये!"

हे खरे होते. कित्येक प्रश्न मी स्वत:च सोडवलेत, गुरूजींना उगाच त्रास देणाऱ्यातला मी नाही. तसे गुरूजीही माझे पेशंट. वयोमानानुसार डायबिटीस नि ब्लडप्रेशर मागे लागलेले. क्लिनिकवर येत, शहाण्या मुलासारखा वैद्यकीय सल्ला मानत. पंच्याऐंशीतला असा आचार्य कसा धीर गंभीर असेल असे वाटेल कुणाला, पण गुरूजी याच्या एकदम उलट.. एखाद्या ज्योतिषाचार्याने बोलता बोलता विनोद करावेत, एखाद्याला टपल्या माराव्यात .. थोडेसे न पटण्यासारखे, पण गुरूजी होते तसेच. म्हणजे आज ते नाहीत. पण त्यावेळी गुरूजींच्या सल्ल्यानुसार झाले सारे. तुम्हाला म्हणून सांगतो, पण त्यामुळे अंकिताचा संसार सुखाचा आहे आज.. अखिलेश इज अ ग्रेट युरोसर्जन. नसतील त्यांच्याकडे गाड्या वगैरे.. पण दे आर हॅपी म्हणून आय ॲम हॅपी. पण हे मी कधी उघड बोलत नाही. थोडा इगो आड येतो.. नि थोडा माझ्या मिठूला म्हणजे माझ्या पोरीला माझ्यापासून दूर घेऊन गेलेल्यावरचा राग.. काही असो.. आहे ते असे आहे!

तर आचार्य भास्कराचार्य पंडित गुरूजींकडे गेलो त्या दिवशी.

"येऊ का गुरूजी?" म्हणत घरात आलो. गुरूजींचे घर म्हणजे जुन्या वाड्यासारखे. मुंबईत असली घरे क्वचितच दिसतात. आत गेलं की एक झोपाळा. बाजूला बैठकीवर गुरूजी बसलेले नि झोपाळ्यावर कोण असावे? तर तो अखिलेश साळवी!

"गुड इव्हिनिंग सर.." त्यानेच विश केले.

"इव्हिनिंग.."

पुढे होऊन मी गुरूजींच्या पाया पडलो. ज्या कामासाठी आलो त्याचा हीरो किंवा खरेतर व्हिलन म्हणू शकतो मी.. इतक्या जवळ येऊन बसला असावा? तो ही गुरूजींच्याच घरी?

"अरे सुरेंद्र.. बस. बरं का साळवी, हे मोठे डाॅक्टर आहेत.."

"ठाऊक आहे गुरूजी. गावस्कर सरांना कोण ओळखत नाही?" अखिलेश म्हणाला.. मला उगाच वाटले, ओळखतोस पण ओळखून राहिला असतास तर माझ्या पोरीच्या वाटेला गेला नसतास..

इतक्यात गुरूजींचा नातू आतून आला.

"आजोबा, आम्ही निघतोय.." म्हणत अखिलेश साळवी नि तो दोघे निघून गेले.

"हा कोण गुरूजी?"

"माझा नातू.. प्रणव.."

"प्रणव मला माहितीय गुरूजी. त्याचा मित्र.."

"तो साळवी म्हणून आहे. तुझ्या मेडिकलचा विद्यार्थी. हुशार आहे.."

गुरूजींना याच्याबद्दल कसे विचारावे पुढे? संकट असे एकाएकी समोर येऊन बसलेले नि ज्याला टाळायचे त्याचेच कौतुक गुरूजी करताहेत!

"बरं काय म्हणतोयस? इकडे वाट चुकली म्हणजे काहीतरी गंभीर आहे. नि तुझ्याकडे गंभीर काही म्हणजे तुझ्या अंकिताच्या लग्नाबद्दल काहीतरी असणार.. हा माझा तर्क निव्वळ. फेस रिडिंग वगैरे नाही."

"तुमच्यापासून काय लपवणार गुरूजी.. तसंच काहीतरी.."

"तू असाच! पोरगी म्हटली की कुठल्या देशाचा प्रत्यक्ष राजा आला तरी तुला त्याच्यावर विश्वास बसायचा नाही. राजकुमार असेल तर नाहीच नाही. आणि त्याखालील कुणी तुला चालणार नाही.. खरंय की नाही?"

"खरंय गुरूजी.."

"तुला सांगतो सुरेन्द्र, मी तुझ्याकडे त्या दिवशी येऊन गेलो. औषधे सुरू आहेत. बरं आहे आता. अंकिताची आठवण काढली त्या दिवशी, मग बसलो उघडून तिची पत्रिका.."

"मग पुढे काय गुरूजी.."

"त्या आधी मला तू कशासाठी आलास ते सांग. तुझ्याकडे आलो की तू तेच करतोस. हिस्टरी की काय घेतोस. आता तूच दे तुझी.. हिस्टरी!"

"गुरूजी, हेच अंकिता बद्दल.."

मग मी अखिलेश साळवी वगळता बाकी सगळा भाग ऐकवला.. कित्येक पेशंट्स अशी हिस्टरी लपवतात. कधी मुद्दाम, कधी चुकून. हिस्टरी टेकिंगमध्ये ती हिस्टरी कशी खोदून काढायची याचीही टेक्निक्स असतात. एकच प्रश्न दोनदा विचारणे, नाहीतर त्याची भाषा बदलून विचारणे किंवा पेशंटच्या बोलण्यातूनच क्ल्यू घेऊन त्यातून पुढे जाणे.. वगैरे. डाॅक्टर पेशंट ह्या ह्युमन इंटरॲक्शनची तीच एक गंमत आहे नि आव्हान ही. गुरूजी पण त्यात हुशार आहेत हे त्यांनी पुढच्याच प्रश्नात सिद्ध केलं.

"मला नाही वाटत तू एवढ्यासाठी आलायस. तुझ्या बोलण्याचा टोन बघता याहून अधिक नक्कीच काहीतरी आहे.."

"तुमच्यापासून काय लपणार आहे गुरूजी?"

"हे बघ, जसा इनपुट तसा आऊटपुट. तुला पेशंटने नीट सांगितलेच नाही तर तू उपाय काय करणार?"

"खरंय गुरूजी."

"मग सांग. तिच्या कुंडलीतले योग सांगताहेत काही. पण त्या आधी तू काय सांगतोयस ते पाहू."

नेमका आजच अखिलेश साळवी माझ्याच समोर गुरूजींकडे टपकायचा होता. जावई म्हणजे कुंडलीतला दशमग्रह असे काही म्हणतात ते खरंच असावं. अर्थात हा माझा जावई? हा प्रश्न कायमच होता. गुरूजींना सारे सांगावे खरे, पण हा समोर बसलेलाच मुलगा सगळ्याच्या मुळाशी आहे हे कसे सांगावे?

"काय आहे अंकिताला.."

"मला तुझे मन वाचता येते. कुंडलीशी संबंध नाही. पण मी माझा तर्क सांगतो. तो ही अंकिता, तू आणि मला माहिती असणारी तुझी आधीची सारी कहाणी यातून.. ऐक.. अंकिताला कुणी तरी मुलगा पसंत पडलाय. तुला तो फारसा पसंत नसावा. मुलगाच चांगला नसावा किंवा तुझ्या विचारानुसार तसा मोठ्या घरातला वगैरे नसावा. साधारण परिस्थितीतला.."

"होय गुरूजी.. असंच सारं आहे.."

"छान! म्हणजे आता इथून पुढे.. अंकिताला मी ओळखतो, म्हणजे मुलगा साधारण परिस्थितीतला आहे. आणि सुरेन्द्र साहेबांच्या हे पचनी पडत नाही! खरंय इथवर?"

"तुम्ही माझं काम सोपं केलं गुरूजी.."

"कसलं? पुढे काय करायचं ठरलं इतक्यात.. तर माझं काम संपलं.."

"ते नव्हे, गुरूजी. तुम्हाला सारं सांगण्याचं काम!"

"म्हणजे पेशंट ऐवजी डाॅक्टरच देतोय हिस्टरी! तर आता पुढे.. कोण आहे तो मुलगा?"

"मेडिकल स्टुडंटच आहे. तिच्याच बरोबरीचा."

"मग? हुशार तर असणारच.."

"असेल.."

"अंकिता तशी कोणालाही आवडवून घेणाऱ्यातली वाटते तुला? थिल्लर पोरं आवडावीत तिला.."

"नाही गुरूजी."

"मग राहिले सटर फटर प्रश्न.. मुलगा दिसायला यथातथाच आहे?"

"नाही गुरूजी. हँडसम अगदी.."

"परिस्थितीने यथा तथा आहे.."

"होय गुरूजी.. मुलाचे वडील मिल वर्कर.. चाळीतले घर. अंकिता कशी रूळावी?"

"तुझ्याकडे काय होतं जेव्हा अरूणाने तुझ्यासाठी घर सोडलं? समजून घे.. अंकिताच्या कुंडलीत दोन मोठ्या गोष्टी दिसतात.. पहिली बाब..

तिचे लग्न साध्या घरातच होणार आहे, नि त्यातच तिला सुख मिळेल"

ही चांगली गोष्ट? सुख मिळेल हे ठीक पण साधे घर? आफ्टर इयर्स आॅफ माय स्ट्रगल?

"आणि दुसरी वाईट गोष्ट, येत्या वर्षात तिच्या आरोग्याला धोका संभवतो. आजार जीवघेणा नसला तरी मोठा असेल, त्यातून ती सावरेल.."

"अंकिताला आजार?"

"जे दिसतंय ते सांगतोय. कदाचित आडाखे चुकू शकतात. पण जे होणार ते टळत नाही.."

माझ्या मनावर मोठा खडक कोणी ठेवल्यासारखे झाले. लग्नाचा मुद्दा राहू देत बाजूला.. पण माझ्या अंकिताला आजार?

"कसला आजार?"

"ते नक्की नाही सांगता येणार. पण जीवघेणा नसेल नि त्यातून ती सावरेल. म्हणजे सर्वांच्या मदतीने.."

अंकिता तशी पहिल्यापासून निरोगी. माझ्यातला डाॅक्टर आजार बरा करू शकतो, रिस्क फॅक्टर प्रमाणे आजाराची शक्यता वर्तवू शकतो.. पण निरोगी माणसाला उद्या काय होईल ते कसे सांगणार? गुरूजी म्हणताहेत ती सावरेल यात समाधान. त्या आजारापुढे मला दुसरे काही सुचेना तरीही मन घट्ट करत शेवटी विचारलेच..

"गुरूजी एक अति विचित्र योगायोग झालाय आज. अचानक."

"योगायोग? ते असेच अचानक होतात. म्हणून तर योगायोग म्हणायचे त्यांस.."

"गुरूजी, तो साळवी मुलगा कसा आहे?"

"कशासाठी? काय आहे डाॅक्टर म्हणून कसा? नुसता मुलगा म्हणून कसा.. नि एखादं स्थळ म्हणून कसा.. त्याला काय जावई करून घ्यायचेय काय? प्रश्नानुसार उत्तर बदलेल.. पण मी ओळखतो त्याला. अत्यंत मेहनती.. पण सामान्य परिस्थितीतला.."

"झालं तेच आहे गुरूजी. अंकिताने निवडलेला तो मुलगा हाच आहे..!"

"काय सांगतोस? नशिबवान आहेस. एक नंबरी मुलगा आहे. मी त्याच्या आईवडलांना ओळखतो. पोरगी सुखात राहिल.."

"आणि तिचा तो आजार?"

"ती सावरेल त्यातून.."

गुरूजींकडून निघालो. चित्र स्पष्ट होते.. हाच तो दशमग्रही जावई. गुरूजीपण म्हणताहेत, हे होणारच आहे. तर आता काय करावे? करण्यासारखे आहेच काय? आणि अंकिताचा आजार? काय आहे पुढ्यात कोणास ठाऊक..