Swpnsprshi - 3 books and stories free download online pdf in Marathi

स्वप्नस्पर्शी - 3

                                                                                                स्वप्नस्पर्शी - ३ 

      सवयीप्रमाणे पहाटवाऱ्याची झुळूक स्पर्शून गेली, आणि राघवांची साखरझोप चाळवली. पहाटेच्या थंडाव्यात उबदार पांघरूणात पडून राहायचं सुख अनुभवत दिवसाचं वेळापत्रक ठरवायचा त्यांचा रोजचा नियम होता. पण.. आता काय ठरवायचं ? खुप छान वाटत राहिलं त्यांना. आता कुठले नियम बांधून घेण्याची गरज नव्हती. पण मग हे ही लक्षात येत गेलं की जीवन आहे तोपर्यंत नियम येतातच. फक्त कामाचं, विचाराचं स्वरुप बदलतं. जगण्याच्या व्याख्या बदलतात. एव्हढच. आज मुलांसमोर आपलं हिरवं स्वप्न मांडायचं त्यांनी ठरवलं. वडीलही समोर आहेत, ही बाब फार छान होती. असच पडून रहाणं त्यांना कंटाळवाणं झालं. हाडाच्या कामाच्या माणसाला पडून रहाणं ही एक शिक्षाच असते. राघव पांघरुण दुर करून खिडकीशी आले. बाहेरची सुंदर फुललेली बाग बघत राहिले. शेतीच्या हिरव्या स्वप्नाची तहान त्यांनी या बंगल्यासमोरच्या चौकोनी तुकड्यावर भागवली होती. नाना तऱ्हेचे फुलं, फळझाडं, आणून लावली होती. फिरतीवर जावे लागायचे त्यामुळे कुठे काही नवीन दिसले की ते झाड घरी घेऊन यायचे. रविवारी सकाळी माळ्याबरोबर बागेत ते स्वतः काम करायचे. रंगीबिरंगी बागेतल्या झुल्यावर शांतपणे झुलायला त्यांना फार आवडायचे. अद्रक घातलेल्या चहाच्या वासाने ते एकदम भानावर आले. शेजारी स्वरुपा चहाचा कप हातात घेऊन उभी होती.

   “ सगळे अजुन झोपले आहेत. दोनचार दिवस खुपच दगदग झाली. झोपमोड होऊ नये म्हणुन इकडेच चहा घेऊन आले.” स्वरुपा म्हणाली.

  राघव हसुन तोंड धुवून आले. दोघं खिडकीशी उभं राहून चहा पिऊ लागले.

 “ स्वरुपा, आजपासून आपल्या आयुष्याचं नवं पर्व सुरू झालं. आपण तर आधीपासून या पर्वाची आखणी केली  आहे. पण सगळं आपण ठरवू तसं होईलच असं नाही. काही सुखद घटना आपल्या समोर उभ्या असतील, तर काही दुःखद.” राघव

  “ अहो, जे होईल ते बघू. आता आपण जास्ती आखणी आणि विचार दोन्ही करायचे नाही. मुक्त जगायचं. जे पाहिजे ते करायचं. आतापर्यंतच्या आयुष्यात आपण इतकं भरभरून जगलो आहोत की आता कुठलीही इच्छा शिल्लक नाही. निर्लिप्त, निष्काम जगु या. सेवा करूया. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करा, मला पाहिजे ते मी करेन. आपण फक्त एकमेकांबरोबर असलं म्हणजे झालं.” स्वरुपा म्हणाली.

 “ खरं आहे तुझं. आता नाष्टयाच्या वेळेस सगळे एकत्र जमतील ना, तेव्हा हा विषय मांडतो. आबा पण आहेत. तुझ्यासाथीने हिरव्या स्वप्नाचं पुर्णत्व पहायचय. बस आता एव्हढच स्वप्न उरलं आहे. ते किती काळ मिळेल याची तमा नाही. तुझं वाक्य आवडलं. खरच आपण खुप भरभरून जगलो. आता निर्मुक्त जगूया. एक कप चहा दे ना अजुन.” हसत हसत राघव म्हणाले.

  “ वा! तुमचं हे निर्मुक्त जीवन परवडणारं नाही.” असं म्हणत स्वरुपा स्वैपाकघराकडे वळाली.

        आता घराला जाग आली होती. आबा, काकाही उठले होते. बागेत त्यांच्या चकरा चालू होत्या. जानकी, अस्मिता चहाची तयारी करत गप्पा मारत होत्या. नील, मधुर, पोरं अजुन अंथरूणातच लोळत होते. स्वरूपाला पहाताच जानकी म्हणाली “ आई चहा घेता ? तयार आहे.”

  “ हो. अर्धा कप मलाही दे आणि एक कप यांचाही गाळ.”

      जानकीने कप भरून सासूजवळ दिले. ते घेऊन ती परत राघवांकडे गेली. दोघांनीही चहा पिता पिता कसं बोलायचं, काय बोलायच, यावर चर्चा केली. कारण मधुरला आई बाबा म्हणजे जीव की प्राण. ते घरात नसले की त्याला अजिबात चालायचे नाही. अस्मिताला त्याने लग्नाआधीच कल्पना दिली होती. अस्मिताही माणुसवेडी असल्याने तिलाही काही प्रॉब्लेम नव्हता. आई बाबा इथे रहाणार नाही हे कळाले की मधुर आकाशपाताळ एक करणार हे दोघांनाही महित होते. पण आजोबांनी काही सांगितले तर तो ऐकण्यातला असल्यामुळे राघवना आबांचा आधार वाटत होता.

  “ चला तुम्ही आवरून नाष्टयाला या. मी जरा स्वैपाकघरात डोकावते.” स्वरुपा रिकामे कप घेऊन गेली. राघव विचारतच बाथरूममध्ये शिरले. हॉलमधे आबा, काका, मधुर, नील सगळेच चहा घेत बसले होते. आईला पहाताच मधुर म्हणाला “ आई, बाबा अजुन उठले नाही ? बरं नाही वाटत का त्यांना ?”

  “ नाही रे. कधीचे उठलेत. आम्ही दोघं चहा घेत गप्पा मारत होतो.”

  “ वा, सेकंड इनिंगची तयारी सुरू झाली वाटतं.” नील म्हणाला. तसे सगळेच हसू लागले.

       स्वैपाकघरात नुसती गडबड उडाली होती. मुलांचे दुध पिणे. स्वैपाकीणकाकूंना आजचा जेवणाचा बेत सांगणे, सगळा रागरंग पाहून स्वरुपा एकेकाला कामाला लावू लागली. “जानकी मुलांच्या दुधाचं तू बघ. मावशी तुम्ही कणिक मळायला घ्या. अस्मिता ते इडलीपात्र आणि पिठाचं भांड माझ्याकडे दे, आणि तू फ्रीजमधुन नारळाचा खव काढून चटणी कर. मावशी कुकरमधे पाणी घालुन गॅसवर ठेवा. जानकी मुलांचं झालं की तू पुढच्या चहाची तयारी करून ठेव. मुलांनो, तुमचं दुध पिणं झालं की पटकन आंघोळ करून या. आज आपल्या हाताने तयार व्हायचं. मग आजोबा तुम्हाला गंमत सांगणार आहेत.”

   भराभर सगळे आपापल्या वाट्याची कामं करू लागले. भांड्यांचा आवाज, गप्पांचे आवाज, त्यात मधुनच हे कुठय, ते कुठय असा नुसता गोंधळ चालू होता. आपलं आटोपून राघवही हॉलमधे येऊन बसले. तिथुन पुरुषांचे गप्पा, हसण्याच्या आवाजाने पुर्ण घर निनादत होतं. स्वरुपाला पुढच्या विचारानी क्षणभर हरवून गेल्यासारखं झालं. पण लगेच सावरून तयार झालेल्या इडल्या मोठ्या भांड्यात काढू लागली. अस्मिताने चटणीचे मोठे बाऊल व आईंनी मुलांसाठी खास केलेले लाडू, खोबऱ्याच्या वड्या, शेव, यांचे बाऊल भरून बाहेर टेबलावर नेऊन ठेवले. जानकीने तिच्या हातचा खास सांबार केला होता. त्या दरवळाने सगळे पुरुष आत एकेक चक्कर मारून गेले. नीलने सगळे पदार्थ खाली ठेवले आणि त्याच्या भोवती गोल बसुन मधुर प्लेट भरून देवू लागला. आत मावशींना खायला देऊन चहा उकळत ठेवला व अस्मिता त्यांना सामिल झाली. छान झालय करत प्रत्येकजण त्या पदार्थांच्या चवीत बुडून गेले. मावशींनी तयार केलेले कप घेऊन मधुरने सर्वाना दिले. शेवटी भांडे प्लेटस आवरून चहा घेत निवांत गप्पा सुरू झाल्या.

     राघव म्हणाले “ मला तुम्हा सर्वांना काही सांगायचे आहे.” क्षणभर सर्वत्र शांतता पसरली. मग प्रत्येकाच्या वैशिष्ट्या प्रमाणे ते काय बोलतात यावर लक्ष केंद्रित करून बसले.

     “ मी आणि स्वरूपानी एक निर्णय घेतला आहे. पुढील आयुष्य शेती करण्यात घालवायचे असे ठरवले आहे.” यावर तर सन्नाटा पसरला. पण मग लगेच प्रत्येकानी आपापली मते मांडायला सुरवात केली. आबांच्या चेहेऱ्यावर समाधान पसरलं. एवढं सगळं आयुष्य नोकरीत गेलं तरी आपला पोरगा मातीला विसरला नाही. त्यांच्या तोंडून छान असे उद्गार आले. काकांच्या डोळ्यात पसंती उतरली. नील जानकी स्वतः आपले स्वप्न साकार करायला परदेशात गेले होते. त्यामुळे आपल्या स्वप्नात किती आनंद असतो हे जाणून होते. बाबांचे मातीवरचे प्रेम माहित होते. त्यांच्या स्वप्नाला आता पुर्णता येणार याचा त्या दोघांना आनंद झाला. महत्वाचा प्रश्न मधुर अस्मिताचा होता. आई बाबा आपल्यापासून दूर रहाणार हे त्याला कुठल्याही तऱ्हेने मान्य नव्हते. मधुरने ठामपणे ‘ अजिबात नाही ’ म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.

   “ अहो बाबा, आता जरा शांतपणे बसायचे दिवस तुमचे. त्यात शेतीसारख्या शारीरिक कामात कुठे अडकता ? दुसरं काहीतरी करा. मला माहित आहे तुम्हाला नुसतं बसवणार नाही. आईचही आता वय झालय. तिलाही कुठे खेडेगावात घेऊन जाणार ? तिथे धड डॉक्टरही असतील की नाही शंकाच आहे.”

   अस्मिता दोन्हीकडे अडकली होती. सासुसासरे त्यांचं राहिलेलं स्वप्न जगू पहात आहेत तर त्यांना अडवणं बरं नाही. पण त्यांनी शारीरिक कष्टाची कामं या वयात करायची हे ही तिला जरा पटत नव्हतं. एकमेकांचे सकारात्मक, नकारात्मक चर्चासत्र बराच वेळ चालू राहिल्यावर आबा म्हणाले “ पोरांनो, आपण यातुन तोडगा काढू. तुमचही बरोबर आहे आणि त्याचही. पण कमी मेहनतीमध्येही शेती होते बरं का राघव. माझ्या मनात कधीची नारळी पोफळीची आपली वाडी असावी असं वाटत होतं. त्यात मेहनत आहे. पण अगदी बाकी शेतीसारखी नाही. गडी लावून काम करून घेणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं, पाऊस आला नाहीतर नुकसान असं खुप काही सहन करावं लागत नाही. एकदा वाडी लावून झाली की बऱ्याच वर्षांपर्यन्त तिचं उत्पन्न चालू राहू शकतं. त्यासाठी ढोर मेहनतीची गरज नाही. दोनचार गडी आणि आपलं काम असं आटोक्यात रहातं. त्याच्या बरोबर तू कोकणातले आंबे, रातांबे, काजू, फणस, मसाल्याचे उत्पन्नही घेऊ शकतोस. यात पैसाही भरपूर आहे. वाढवायचं तर तू काम वाढवू शकतोस किंवा आपल्यापूरतंही ठेवू शकतोस.”

   “ पण आबा आपल्याकडे कुठे आहे अशी बागायती जमिन ? आपली तर रानातली पिकं. तिथेही पिकं घेणं शक्य नाही. राघव.

  “ हे बघ राघव, आपल्या रानात आता वासुचा जम चांगला बसला आहे. आम्हा दोघांची मदत अजुन त्याला होत आहे. त्यात तू तिथे आलास तर त्याला तुझी लुडबूड वाटू शकेल. कारण तुझे जग पाहिल्याचे विचार आणि त्याचे शेती संदर्भातले व्यावहारिक विचार यात तफावत येऊ शकते. त्यापेक्षा गुहागरला माझा एक मित्र रहातो. त्याला शेतीचा काही भाग विकायचा आहे. त्याने जेव्हा मला हे कळवले तेव्हाच माझ्या मनात आलं होतं की तुझ्याकरता घ्यावा म्हणुन. पण एकदा तुझा कल बघावा आणि मग त्याच्याशी बोलावं असं ठरलं. कुळागरं आहे ते. तिथे विहीरही आहे. कोकणात पाऊस तर भरपुरच पडतो. एका बाजूला घर बांधून बाकी जागेत वाडी तयार करता येईल. यामुळे माझं आणि तुझंही स्वप्न पुर्ण होईल. वासुलाही वेगळं वाटणार नाही. आपल्या शेतीविस्तार प्रकल्पात तो ही सामील होईल, आणि व्यवहारात त्याचीही तुला मदत होईल.”

    आबांचं बोलणं पुर्ण होताच मधुर म्हणाला “ अरे वा, बाबा फार्म हाऊस ही फार चांगली कल्पना आहे. नीलचा उत्साह तर उतू जात होता. ही कल्पना सगळ्यांना आवडली. तरी मधुर पुर्ण खुललेला वाटला नाही. 

  “ मधुर, आपल्या मायेपोटी कोणाच्या स्वप्नाआड येऊ नये. राघवची मातीची ओढ तो लहान असल्यापासून पहातो आहे. पण याची हुशारी केवळ मातीपुरती रहाण्यापेक्षा सर्वार्थाने असावी. यासाठी त्याला शिक्षणाला प्रोत्साहन दिले. त्यानेही ते पुर्णपणे पार पाडले. आता आपण त्याच्या मधे येऊ नये. त्याचं शांत, स्वतंत्र आयुष्य जगु दे. इथे राहून केवळ बाजारहाट, मुलांची ने आण, टीव्ही, चार पेन्शनर मित्र यात त्याचे आयुष्य बांधू नको. त्याच्यात अजुन ताकद आहे तोपर्यंत निसर्ग अनुभवू दे. अरे कामाने माणूस कधी आजारी पडत नाही. रिकाम्या मनात येणाऱ्या चिंता, काळजीने आजारी पडतो. गुहागर पुण्यापासून असे किती लांब आहे. मनात आलं की शनिवार रविवार तुम्ही तिथे जाऊ शकता. तुमच्या मित्रांच्या पार्ट्या करू शकता. आपण आपलं जग असं तयार करायचं की ते कधीही आपल्याला थांबवता आलं पाहिजे. हा सगळा पसारा त्याला नाही झेपला तर त्या घरासकट वाडीची जमिन विकायची म्हटलं तर करोडोत ती कसलेली जमिन जाईल. कधीही त्याला पुण्याला येता येईल. कशात अडकायचं नाही. राघवचा शेती प्रयोगही झाला आणि भविष्यकाळाची गुंतवणुकही झाली.”

   “ बापरे आबा किती ग्रेट आहात तुम्ही. वाडीसाठी लागणारा पेसा मी इन्व्हेस्ट करतो.” नील

  “ अरे, माझाही पैसा आहेच की. तो काय तुमचाच आहे. आता कुठे तुमचे संसार सुरू झाले आहेत. छान मजा करा. पण त्याच बरोबर योग्य तिथे दानही करा. आपल्याला ज्या गोष्टी मिळतात त्या दुसऱ्यांनाही द्याव्यात. त्यामुळे आयुष्य जगण्यातली मजा वाढते. सुंदर होते. संकुचित वृत्तींनी तुम्हाला मिळालेल्या गोष्टींची साठवण कराल तर ती व्दिगुणित होणार नाही. आपण जे दुसऱ्यांना देतो ते परत आपल्याकडे दुप्पट होऊन वापस येतं. मग ते प्रेम, पैसा, माणसं, विचार मानसन्मान, कुठलीही गोष्ट असू दे.” राघव.

  “ खरं आहे राघवा तुझं. याच विचारामुळे तू भरभरून आयुष्य जगलास. पण आता माझं शेवटचं ऐकायचं. ही जमिन मी तुला घेऊन देणार आहे. आयुष्यभर तू सगळ्यांसाठी केलस. बापाचं स्वप्न पुर्ण केलस. गावाकडच्या शेतीत आम्ही तीन भावंडं तीन हिस्से होतील. वासूच्या मनात अजुन तरी हिस्सा वगेरे प्रकार नाहीये. तो खपतोय आणि सगळ्यांना वाटा देतोय. पण पुढचं सांगता येत नाही. त्या पिढीजात रानाचे हिस्से करणं तुला पटणार नाही. ते तर तुझं आहेच. पण ही जमिन तू स्वतंत्रपणे कस. त्यातलं उत्पन्न कुणाला द्यायचं तर दे. पण तू कुणाला बांधील नाहीस.” आबा म्हणाले.

  “ आबा, पण मी घेऊ शकतो ना शेत.”

  “ अरे हो. मला माहित आहे. पण मलाही कुठे आता पैसा घेऊन वर जायचय. होईल तोपर्यंत तुम्हा दोघांना मदत करतो. माघारी सगळं तुमचच आहे. तू तुझा पैसा योग्य ठिकाणी गुंतव. दान कर. शेतात घर तुलाच बांधायचं आहे. ते किती छोटं मोठं तू ठरव. कच्चा माल, शेतीची अवजारं यालाही पैसा लागणार. याचाही विचार कर. मी फक्त जमिनीचा खर्च करणार आहे. बाकी सगळं तुलाच करायचं आहे.” आबा.

  “ बाबा मलाही हा प्रकल्प आवडला आहे. तुमच्या बरोबर माझ्याही डोक्यातल्या काही योजना मी ही तिथे राबवू शकतो. घर, वाडी, हे सगळं व्यवस्थित तयार झालं की त्याला जोडून काही उपधंदे आम्ही दोघं मिळून करू. विकेंडला पुण्या, मुंबईचे लोकं बाहेर जायला उत्सुक असतात. गुहागरला तर समुद्र असल्यामुळे पर्यटन स्थळ आहेच. खुप काही करता येईल.” मधुर हे बोलला आणि सगळ्यांचेच एकदम टेंशन उतरले. कारण त्याने एकदा का एखादी गोष्ट मनावर घेतली की तिचा एव्हढया बारकाईने अभ्यास करून ती गोष्ट मार्गी लावायचा की बस. त्याच्या या कसबावर राघवही एकदम खुष असायचे. सगळ्यांचेच चेहेरे आपापल्या स्वप्नपूर्तीने फुलून गेले. गोडीत सर्वांच्या मनासारखी चर्चा पार पडल्याने राघव, स्वरुपालाही हलकं वाटलं.

    “ अरे, आता जरा चहा आणा रे.” मावशी स्वैपाकघरातून ट्रे घेऊन बाहेर येतच होत्या. तुमच्या शेती प्रकल्पात मलाही घेऊन जायचं बर का . मावशींच्या बोलण्यावर सगळेच हसू लागले. प्रत्येकाच्या मनाला हिरव्या स्वप्नांचा स्पर्श झाला होता.

                                                                          .................................................                

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED