स्वप्नस्पर्शी - 7 Madhavi Marathe द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वप्नस्पर्शी - 7

                                                                                          स्वप्नस्पर्शी : ७

           बुधवारी आबा आले. अमेरिकन दुतावासात शुक्रवारी साडेदहाची वेळ मिळाली. दोन दिवस नुसती धावपळ चालली होती. शुक्रवारी मधुर त्यांना एंबसीमधे सोडून ऑफिसला निघून गेला. आतली प्रोसिजर आटोपली की तिघं टॅक्सीने घरी येणार होते. हळुहळू करत सगळे सोपस्कार पार पडले. नीलनी टिकिट बुक करून ठेवलेच होते. आता महिना मोकळाच होता पण आनंदात आणि तयारीच्या गडबडीत तो कधी संपला कळालेच नाही. आबांचे कपडे खरेदी करुन, एक बॅग इथेच भरून ठेवली. दुसरी बॅग ते हातकणंगलेहून आणणार होते. आबांना सोडायला जातानाच राघव आईला भेटून आले. आईवेड्या राघवांना आईला अमेरिकेला घेऊन जाता येत नाही याची खंत वाटत होती. पण आईनी समजूत काढल्यावर तिची फजिती होण्यापेक्षा ती जिथे आहे तिथे आनंदात आहे यावरच त्यांनी समाधान मानले. आबांना अमेरिकेला निघायच्या तीन दिवस आधी पुण्याला यायचे सांगुन राघव परतले.

    इकडे स्वरूपाचे जोरदार शॉपिंग चालले होते. राघवांनीपण उत्साहाने वेगवेगळे कपडे घेतले. पासपोर्ट, पैसे, तिकीट ठेवायला नवीन आतले खिसे असलेले जॅकेट घेतले. शेवटी शेवटी तर नुसती घाई. हे ठेवले का ? ते घेतले का ? नीलनी आणायला सांगितलेले पदार्थ, औषधं, सगळं आठवणीने भरणं चाललं होतं. तरी नीलनी आधीच डॉलर देऊन ठेवले होते त्यामुळे करन्सी चेंजची गरज राहिली नाही. शेवटी राघवांनी सगळे कामं पुर्ण झाले याचा एकदा आढावा घेतला. पेन्शनचे काम पुर्ण मार्गी लागले होते. त्यांना हलकं वाटलं. कुठलीही जिम्मेदारी नाही. आता फक्त एन्जॉय करायचा. इंटरनॅशनल फ्लाइट अपरात्री असल्याने रात्रभराचं जागरण होणार होतं. लवकर जेवून मधुरने सगळ्यांना झोपायला लावलं. पुण्याहून मुंबईला जायचं होतं.

    सकाळी पटापट आवरून निघायची तयारी केली. एका कारमधे सामान व दुसऱ्या कारमधे हे तिघं बसले. मधुर एक कार चालवणार होता. दुसऱ्या दिवशी चारची फ्लाइट मुंबईहून होती. तिथुन दोहाला पाच वाजता पोहोचून, साडेसातला दुसरी फ्लाइट दीड वाजेपर्यंत लॉस एंजलीसला पोहोचणार होती. ट्रॅफिकचा भरोसा नसल्यामुळे सकाळीच पुण्याहून निघून मुंबईला राघवांच्या मित्राकडे दिवसभर थांबायचं ठरलं होतं. रात्री सगळ्यांना एअरपोर्ट वर सोडून मधुर तसाच पुण्याला निघून जाणार होता. रस्त्यात थोडं खायला हवं म्हणुन अस्मिताने काही पदार्थ बरोबर दिले. मधुर, राघवांनी मिळून एकदा आवश्यक त्या पेपर्सची खातरजमा केली. आठ वाजेपर्यंत नुसती धुम चालू होती. गडयांनी तयार बॅगा कारमधे नीट रचुन ठेवल्या. केबिन बॅग सीटवर ठेवली होती. शेवटपर्यन्त काही आठवलं तर लगेच त्यात भरता येणार होतं. चहा नाष्टा, फोनाफोनी आटोपून मुलांचा, अस्मिताचा निरोप घेतला. कितीही लांब किवा जवळ जायचं असेल तरी निरोप घेताना माणसाला हुरहूर लागतेच.

    गाडीने वळण घेतले आणि घर दिसेनासे झाले, तशी हुरहूर नाहीशी होऊन गप्पा मारायच्या मुडमधे सगळे आले. हवा एकदम छान होती. हिरव्या पार्श्वभुमीवर फुले उमलल्याने नयनरम्य दृश्य होते. घाटात काही ठिकाणी उन्मुक्तपणे वहाणारे झरे दिसत होते. सगळ्यांची मने उत्फुल्ल, आनंदी असल्यामुळे त्यांना सर्वत्र सुंदरता, आनंद जाणवत होता. माणसाच्या मनावर जीवनातली सुंदरता, असुंदरता अवलंबून असते. दुःखी मनाला सगळं दुःखी, नीरस दिसतं. जशी दृष्टी तशी सृष्टी. लोणावळ्याला थांबून हिरव्यागार निसर्गदृशाचा आस्वाद घेत हॉटेल मधे चहा घेतला. जरा विश्रांती झाल्यावर मग ते परत निघाले. मुंबई पुणे रस्ता गर्दीचाच. तरी राघवांच्या मित्राचे घर पनवेललाच असल्यामुळे गर्दीच्या वेळेस मुंबईत शिरायची भानगड वाचली.

     आठ वाजता पुण्याहून निघालेले हे मंडळ एक दीड पर्यन्त मित्राकडे पोहोचले. खुप दिवसांनी भेटल्यावर मित्रप्रेमाचा उमाळा बाकीचे कौतुकाने पहात राहिले. गप्पांच्या नादात जेवणं आटोपली. राघवनी त्यांना आधीच सांगून ठेवले होते, मोठा प्रवास आहे त्यामुळे कुणी फार खाणार नाही. मग वहिनींनी चारच प्रकार केले पण ते अतिशय रुचकर झालेले. सकाळचा प्रवास आणि रात्री परत जागरण करायचे असल्याने जेवण झाल्यावर सगळेच आडवे झाले. थकव्यामुळे चटकन डोळा लागला. राघवांना जाग आली तेव्हा जवळपास संध्याकाळ झाली होती. स्वरुपा व वहिनी स्वैपाकघरात गप्पा मारत होत्या. राघवांच्या मनात आलं, कसं काय स्वरूपाला असं चटकन सगळ्यांमधे मिसळता येतं ? कुठेच तिचं काहीच अडत नाही. अश्या गप्पा मारत आहेत की जश्या काही बालमैत्रिणी आहेच. राघव मनातच हसले. मधुर अजुन झोपेतच होता. आबा हॉलमधे टी व्ही पहात बसलेले. मधुरला तसच झोपू देत फ्रेश होऊन राघव बाहेर आले. वहिनी टेबलावर चहा मांडतच होत्या. गप्पांच्या आवाजाने मधुरही उठून बाहेर आला. परत गप्पांचा फड जमला. आबा तसे मितभाषी होते. त्यामुळे त्यांनी ऐकण्याची भुमिका घेतलेली. जसजशी रात्र चढू लागली तसे निघायचे वेध लागले. रात्री फक्त दहीभात खाऊन जेवणं आटोपली. आई बाबांना एअरपोर्टला सोडून मधुरला परत पुण्याला जायचे होते त्यामुळे साडेदहा वाजताच सगळे घराबाहेर पडले. चमचमणाऱ्या मुंबईचे दर्शन घेत दोन तासात ते एअरपोर्टला पोहोचले. सोडायला येणाऱ्यांना आत एंट्री नसल्यामुळे तिथे थांबायचा प्रश्न नव्हता. ट्रॉलीवर सर्व बॅग पाठवून मधुरने सर्वांचा निरोप घेतला. त्याचा भरला गळा आणि डोळे खुप काही बोलून गेले. पण एन्जॉय करा असे म्हणत तो बाय करत निघून गेला.

    राघवांनी पासपोर्ट दाखवत आत एंट्री घेतली. एअरपोर्टची भव्यता बघून स्वरुपा आबा दबून गेले. पण राघवांनी त्यांना गप्पा मारून हसवत मोकळं केलं. मग दोघांच्याही मनावरचं दडपण कमी झालं. चेक इन व्हायला अजुन बराच वेळ होता. मोठ्या हॉलमधल्या खुर्चीत बसवून तिघांसाठी कॉफी आणली, त्यामुळे एकदम तरतरीतपणा आला. थोडा वेळ गप्पा मारल्यावर स्वरुपा वाचत बसली. आबांचा डोळा लागला. राघव चक्कर मारायला गेले. दोन वाजता चेक इन सुरू झाल्यावर सगळे लाइनमधे उभे राहिले. आबांसाठी व्हील चेअर बुक केली होती त्यामुळे त्यांच्याबरोबर आपोआपच सोपस्कार पटापट पार पडले.

    विमानात चढायची वेळ आली तेव्हा आबांना जरा टेंशन आलं. पहिला कुठलाही अनुभव माणसाला जरा जडच असतो. स्वरुपा आधी विमानात बसलेली होती त्यामुळे यावेळेस तिची भीती जाऊन एन्जॉय करायच्या मुडमधे होती. आबांना मुद्दाम खिडकीशी बसवून बाहेरची मजा बघायला दोघं सांगू लागले. थोड्याच वेळात आबा नॉर्मलवर आले आणि मजा अनुभवू लागले.

    नवीन अनुभव हा, कुठलेही वय असो पण बालकभावानेच घेतला जातो. लवकरच थकले भागले प्रवासी झोपेच्या अधीन झाले. आधी प्रवास तयारीचा ताण, मग विमानात बसायचा ताण, या सगळ्यातून प्रवासी मुक्त झाले असल्यामुळे सैलावले होते. मुंबई ते दोहा, मग दोहा ते एल ए असं चक्र पार करेपर्यंत खाणे ,पिणे, झोपणे,वाचणे, पिक्चर पहाणे, गप्पा मारणे, आणि सोपस्कार पार पाडणे एव्ह्ढ्याच प्रक्रिया चालू होत्या.

    दुपारी दीड वाजता लॉस एंजलीसला विमान पोहोचले, तेव्हा सगळेच खुप थकून गेले होते. बॅगा ताब्यात घेऊन बाहेर पडेपर्यंत तासभर वेळ लागला. नीलचे बाहेरून फोन चालूच होते. राघव बॅगट्रॉली, स्वरुपा, आबा यांना सांभाळत बाहेर आले. आपण एका वेगळ्याच दुनियेत आल्याचा तिघांनाही भास होत होता. आलिशानता, स्वच्छता, सुंदरता, देखणेपणा यासर्वांनी युक्त असा तो परिसर, लोकं पाहून न भांबवता त्या सर्वांचा नजरेने आस्वाद घ्या असे नीलने आधीच बजावले होते. कारण अतिसुंदरता पाहून आपल्यातली कमतरता जाणवायला लागते. त्यामुळे मनावर एकप्रकारचे दडपण येऊन उदासिनता येते. अर्थात ही भावना मानवनिर्मित गोष्टींनीच येते. निसर्गात अशी भावना येत नाही. ते सगळं न्याहाळत तिघही बाहेर आले. एव्ह्ढ्या गर्दीत नीलला शोधायला लागेपर्यंत त्याचीच आनंदाने मारलेली हाक एकू आली. नील दिसला आणि मायेच्या ओढीने धावणाऱ्या मुलांनी पायाला वेढा घातला तेव्हा तिघांच्याही श्रमाचा परिहार झाल्यासारखे वाटले. एकमेकांच्या गळाभेटीने बाह्य झगमगाटाचा विसर पडून आपलं जग भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहेऱ्यावरून झळकू लागला. नील, जानकीने कारमधे सामान ठेवले आणि गाडी त्यांच्या विश्वाकडे निघाली. जे विश्व आपल्या मात्या पित्याच्या आशिर्वादासाठी आसुसलेलं होतं. मुलांची भरभराट पहायला जेव्हढे आई वडील असुसलेले असतात, तेव्हढेच मुलही आपली उन्नती आई वडीलांनी पहावी, कौतुक करावं या भावनेने घेरलेले असतात. आज सर्वांचं ते स्वप्न पुर्ण होणार होतं. राघव, आबा एकमेकांकडे पाहून हसले. आबा राघवांची भरभराट पहायला शहरात आले होते, तेव्हा हेच भाव त्या दोघांच्या मनात होते. याची आठवण होऊन दोघेही हसले. इथे फक्त देशाचा फरक होता. म्हणजेच तुम्ही धर्तीवर कुठेही असा, भाव भावना निसर्गदत्त आहेत. त्या सारख्याच असतात. मग ती पिढी कुठलीही असो. गाडी धावत होती. घरी पोहोचेपर्यंत अजुन एक तास लागणार होता. आनंद, गप्पा यांच्या कल्लोळात बुडालेल्यांना आता वेळेचे भान नव्हते.

                                                                         .................................................