स्वप्नस्पर्शी - 9 Madhavi Marathe द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

स्वप्नस्पर्शी - 9

                                                                                       स्वप्नस्पर्शी : ९ 

ट्रीप एन्जॉय करता करता कधी जायचे दिवस जवळ आले कळालेच नाही. आता सगळ्यांची मनं हळुहळू जड होऊ लागली. नीलचा उदास चेहेरा पाहून राघव म्हणाले “ नील, आपल्या इतक्या छान आनंदावर उदासीचं सावट येऊ द्यायचं नाही. इतकी मजा केली आपण. गप्पा मारल्या. तुझी आम्हाला अमेरिका दाखवायची इच्छा पुर्ण झाली. यात किती आनंद आहे. हे सगळं चार दिवसांचं असतं. तुला, जानकीला कर्तुत्व सिध्द करायचे आहे. मला, स्वरुपाला आमचं हिरवं स्वप्नं. आपली स्वप्नं पुर्ण करताना अधुन मधून ब्रेक घेऊन दुसऱ्यांनी पुर्ण केलेली स्वप्नं जरूर बघावी. म्हणजे आपल्यालाही स्वप्नपुर्तीचे बळ मिळते. दिशा मिळते. हे मोठेमोठे प्रेक्षणिय स्थळं म्हणजे कुणाचीतरी पुर्ण झालेली स्वप्नच आहेत ना. निसर्गात फिरल्यामुळे आपल्या कल्पनांना धुमारे फुटतात. म्हणून अधून मधुन निसर्गात जरूर काळ घालवावा, आणि फ्रेश होऊन परत कामाला लागावे. आपण तर फोनवर रोज बोलतोच आणि मुलं लहान आहेत तोपर्यंत तू भारतात येऊन जाऊन रहाशीलच.” हे ऐकून सगळेच सावरले. मग परत तिकडे घेऊन जायच्या खरेद्या सुरू झाल्या. मोठमोठ्या मॉलमधे फिरताना स्वरुपा जानकी अगदी नवतरुणी प्रमाणे एन्जॉय करत होत्या. जायच्या आधी नीलच्या आवडीचे कितीतरी खास पदार्थ स्वरूपाने करून ठेवले. रिकाम्या झालेल्या बॅगा परत वेगवेगळ्या शॉपिंगनी भरल्या गेल्या.

     रोज मधुर अस्मिताशी बोलणं तर चालायचच. मधुर आणि नीलच्या सोईने शनिवारी सकाळी सहाची फ्लाइट बुक केली. रविवारी सकाळी ते मुंबईला पोहोचणार होते. पुण्याला वापस येताना राघवांनी मधुरला घ्यायला येण्याची मनाई केली. ते एअरपोर्टवर टॅक्सी करून पुण्याला येणार होते. मधुर जरा नाराज झाला पण त्याला ती गोष्ट पटली होती. सगळ्यांनाच सोयीस्कर वाटली. आबांनाही आता गावाकडची ओढ लागलेली. परत तिकीट, व्हिसा, पासपोर्टची नीट मांडणी करून राघवांनी तयारी केली. मुलांच्या रडवेल्या चेहेऱ्यांना पाहून त्यांनाही गलबलून येत होतं. पण मग हसवत, गोष्टी सांगत स्वरुपा, आबा मुलांची समजूत काढत होते. जायचा दिवस उजाडला. तो दिवस कसं गेला कुणालाच कळाले नाही. सकाळी सहाची फ्लाइट असल्यामुळे त्यांना रात्री दोनला निघावे लागणार होते. बॅगा रात्रीच गाडीत ठेवून दिल्या. थोडी झोप काढल्यावर एक वाजता उठून भराभर आवरलं. मुलं झोपेतच होती.

     जानकी मुलांमुळे एअरपोर्टला येऊ शकणार नव्हती त्यामुळे तिचा तिथुनच निरोप घेऊन सगळे निघाले. नीरव शांततेतून गाडी जात होती. निरोपाचा क्षण आल्याने कुणी गप्पा मारायच्या मनःस्थितीत नव्हते. राघवांच्या मनात विचार चालू होते. ऑक्टोबर महिना कसं गेला कळालेच नाही. आता हा नोव्हेंबर. बाकी कामं संपवून डिसेंबरला राकेश आला की आपली तिकडची कामं सुरू होतील. त्याआधी वकिलाकडेही जायचे आहे. आपलं सगळं नीट असताना मृत्युपत्र तयार करायचं हे त्यांनी आधीच ठरवलं होतं. आबा जमिनीसाठी पैसे देणार होते, त्या संदर्भात त्यांच्या बरोबर बँकेची कामं करायला त्यांना गावाकडे जायचं होतं. आबांना गावाकडे सोडायला जातानाच ती कामं आटोपून घ्यायचा त्यांचा विचार होता. बँकेत रक्कम तयार ठेवली की ऑनलाईन ती कधीही ट्रान्सफर करता येईल. राघवांचे ठोकताळे चालू होते. विचारातच एयरपोर्ट कधी आले कळाले नाही. स्वरुपा, नील खुपच उदास झाले होते. सामान ट्रॉलीवर चढवून नीलची गळाभेट घेताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. आबांनी नीलने अमेरिका दाखवली म्हणुन आधीच त्याचे खुप कौतुक केले होते पण आता एक शब्दही त्यांच्या गलबललेल्या मनातून फुटेना. शेवटी स्वतःला सावरत तिघेही आत शिरले. काचेआडून काही वेळाने नीलने निरोप घेतला.

      परत सगळे सोपस्कार, विमान बदला बदली, मधला वेटिंग पिरीयड, फोनाफोनी, आलेला थकवा, या सगळ्यासकट रविवारी सकाळी नऊ वाजता ते मुंबईला उतरले. सामान मिळून बाहेर येईपर्यंत एक तास लागलाच. आबा, स्वरुपा खुप थकले होते. राघवांनी त्या दोघांना एका ठिकाणी बसवून ते टॅक्सी बुक करायला गेले. ‘ओला’ ही फारच छान सोय सुरू झाली होती. कुठेही वाजवी दरात जायचं आणि ते ही फसवल्याची भावना न येऊ देता. गाडी मिळायला जरा वेळ लागला, पण सोय झाली. सामान चढवून सगळे आत बसल्यावर त्या ड्राइव्हरला राघव म्हणाले “ साधारण एक तासानी मुंबईहून गाडी बाहेर पडली की चांगलं हॉटेल पाहून तिथे थांब म्हणजे नाष्टा करता येईल.”

    थकलेल्या त्या प्रौढांकडे पाहून ड्रायव्हर म्हणाला “ तुम्ही आता निवांत झोपा. तासाभरात हॉटेल आलं की तुम्हाला उठवतो. आज रविवार असल्याने ट्रॅफिकही कमी लागेल.” लवकरच तिघांनाही झोप लागली. रात्रभराचं जागरण आणि चेकिंगची धास्ती यातुन मुक्त झाल्यावर राघवांना खुपच हलकं वाटलं. अधुन मधून वहानांच्या आवाजाने जाग येत होती, पण परत डोळे मिटत होते. ड्रायव्हरच्या आवाजानी राघवांना जाग आली. त्याने एका गार्डन रेस्टॉरंट समोर गाडी थांबवलेली. तिघेही फ्रेश होऊन आले. आता थकवा जरा कमी वाटत होता. भारतात आल्याचा आणि आपली बोली सर्वत्र ऐकू येऊ लागल्याने एक प्रकारचा आनंद दाटून आल्यासारखे तिघांनाही वाटले. डोसा, इडली, साबूदाणा वडा असा मनपसंत बेत मागवून राघवांनी नील व मधुरला फोन लावून कुठपर्यंत पोहोचलो याची कल्पना दिली. तोपर्यंत खाद्यपदार्थ आलेलेच होते. भारतीय चवीचा आस्वाद घेऊन तिघेही तृप्त झाले. सोन्याच्या लंकेत नाना प्रकारच्या मिठाया खाल्ल्या तरी आपल्या घरचा वरणभात हा अमृततुल्य असतो. जायफळानी दरवळलेली कॉफी पिऊन तिघेही गाडीत बसले. ड्रायव्हर आपलं खाणं आटोपून आला तशी गाडी निघाली. बाहेरचा नजारा पहाता पहाता अमेरिका व भारतातल्या दृश्यांची तुलना होऊ लागली. थोडी झोप, थोड्या गप्पा असे करत पुणे आले. गाडी घरासमोर थांबली.

     गाडी दिसताच मधुर, अस्मिता, मुलं सगळेच उत्साहात बाहेर आले. मधुरने लहान मुलांच्या उत्साहाने आई बाबांना मिठी मारली. आबांना हात धरून आत नेले व सोफ्यावर बसवले. राघवांनी ड्रायव्हरला पैसे देऊन वर बक्षिसीही दिली. खुष झालेला ड्रायव्हर, गाडीतले सामान काढून घरात ठेवायला मदत करू लागला. अस्मिताने लगेच चहाची तयारी केली. त्यांचे हातपाय धुणे होईपर्यंत तिने बिस्किटं, चिवडा, लाडू, वेफर्स, चहाचा ट्रे टेबलावर ठेवला. गप्पांचा फड जोरात रंगायच्या बेतात असतानाच अस्मिताने त्यांना आवरलं “ थकून आलेले आहात. जेटलॅग आहे. आंघोळी करा आणि जेवायला बसा. झोप झाल्यावर आपण भरपुर गप्पा मारू. मधुरने उद्याचीही सुट्टी घेतली आहे.” हसतच दुजोरा देत राघव, आबा उठले. स्वरुपाही मग बॅगा उघडायच्या कामाला लागली. अस्मिताचा स्वैपाक तयारच होता. आंघोळी होईपर्यंत तिने गरमागरम साजुक तुपातला शिरा तयार केला. ताजेतवाने होऊन तिघेही टेबलावर आले, तेव्हा ताटं वाढलेली होती. गरम शिरा पाहून राघव, आबा खुष झाले. दोघांचा तो वीकपॉइंट होता. जेवण झाल्यावर तिघं जे झोपले ते दोन दिवस फक्त खाण्यापुरतं उठणं आणि झोपणं अशा तऱ्हेने घालवल्यावर तिसऱ्या दिवशी जरा काही गोष्टी सुचू लागल्या. मग बॅगा उघडल्या गेल्या. गाठीभेटीचे आनंद वाटले गेले. फोटो पहाणं, तिथली वर्णनं यांचे कौतुक करून झाल्यावर आपापल्या रुटीनला सगळे लागले.

      आता पहिल्यांदा आबांना गावी नेऊन सोडायचे होते, तेव्हा स्वरूपाही येते म्हणाली. आईंना भेटून बरेच दिवस झाले होते. शिवाय त्यांची तब्बेतही बरी नसायची. त्यामुळे स्वरुपा अधुन मधून जाऊन त्यांची जास्तीची कामंही करून यायची. फराळाचं करून ठेवायची. ठरल्या दिवशी दोघही गावाला जायला निघाले. स्वरूपानेही तिकडे सगळ्यांना द्यायला काही ना काही घेतलच होतं. चार तासांचा गाडी प्रवास आता नवीन झालेल्या रस्त्यामुळे सुखद झाला होता. नोव्हेंबर महिना असल्याने हवेत गारवा, बाहेर हळदुलं ऊन, पिकलेली शेतीभाती, हिरवाई, असे खुपच छान वातावरण होते, आणि मुख्य म्हणजे मनात एक प्रकारचा निवांतपणा आला होता. आपल्या आयुष्यात ज्या इतिकर्तव्यांचा भाग असतो तो यशस्वीरित्या पार पडल्यावर एक प्रकारचे समाधान लाभते. जीवनात किमान काही गोष्टी तरी योग्य वेळी होणं हे फार महत्वाचे असते. बाकी चढ उतार तर चालुच असतात. त्याला सामोरे जावेच लागते. ठरवल्याप्रमाणे तर आयुष्य पार पडत नसतं. पण मुलं चांगली निघणं, स्वतःचं घर, व म्हातारपणी पैसा या किमान गोष्टींवर समाधानी रहाता येतं. राघव, स्वरुपा, आबा, तिघेही खुपच सुदैवी होते. त्यांना खुप चांगल्या आयुष्याचं दान मिळालं होतं, आणि याबाबत ते देवाचे अत्यंत आभारी होते. आता उतारवयात त्यामुळे एकप्रकारचा निवांतपणा आला होता. जेवायच्या वेळेपर्यंत ते गावी पोहोचले सुद्धा होते.

     गाडी पहाताच गडी धावत आले. आपल्या लाडक्या धन्याला इतके दिवस न पहाण्याची त्यांना सवय नव्हती. मोती कुत्रा, पिंजऱ्यातला पोपट आपला आनंद व्यक्त करू लागले. अवती भोवती काम करणाऱ्या बायका, गल्लीतले मित्र सगळेच गोळा झाले. एक अकृत्रिम प्रेमाचा झरा तिथे वहात होता. अमेरिकेतले कितीही सुबत्तेचे, सौंदर्याचे क्षण या क्षणांपूढे फिके होते. आई दाराशी येऊन उभी राहिलेली पाहून राघव, स्वरुपा पुढे झाले तिच्या पाया पडून, तिला आधार देत एका खुर्चीवर बसवले. गडयानी एकेक बॅग आत ठेवली.

       आबा बाहेरच्यांचा तात्पुरता निरोप घेऊन आत आले आणि आपल्या बायकोच्या नजरभेटीतच एकमेकांचे कुशल विचारून झाले. रखमानी आणलेला दाट दुधाचा चहा पिल्यावर आबा तृप्त झाले. आपल्या चवीच्या सवयींवर आपण फार अवलंबून असतो. थोड्याफार गप्पा मारून परत सगळे कामाला लागताच आबांच्या व राघवांच्या बॅगा त्यांच्या रूममध्ये ठेऊन गडी निघून गेले. मग चौघांची कौटुंबिक देवाणघेवाण सुरू झाली. आईची तब्बेत आता पुर्ण बरी होऊ शकणार नव्हती. पण आपण आपलं सगळं करत घरात उत्साहपूर्ण वातावरण ठेवायचा तिचा उत्साह सगळ्यांना बांधून ठेवत होता. आईचे काम करायला लोकं सदैव तत्पर असायचे. कुटुंबाचा उत्साहाचा झरा होती ती. स्वरूपानेही आपल्या सासुचा आदर्श उचलला होता.

     “ राघव, आता वासू येईल जेवायला. तुझं आता प्लॅनिंग काय आहे ? त्याप्रमाणे त्याला त्याची कल्पना देऊया.”

     “ आबा, आजचा दिवस तर गेलाच आहे. उद्या तुमची बँकेची काय कामं असतील ती करून घेऊया. शिवाय वासुलाही आपल्या गुहागर प्रोजेक्टची कल्पना देऊ. त्याचा सल्ला घेऊ. बाकी इथली घराची, शेतीची कामं तर वासू बघतच आहे.”

     “ राघव, मला अजुन एक विचारायचं होतं, हे घर वासूच्या नावावर करून देऊ का ? तुझा तर पुण्याला बंगला आहे. दुसरं गुहागरला होईल. तू किंवा मुलं काही इथे येऊन रहायचे नाही. वासू, काकांनाही सांभाळतोय, शेतीत स्वतः राबून सगळ्यांना हिस्सा देतोय. तर आपणही त्याच्यासाठी काही करावं. मी काही मृत्युपत्र केलेलं नाही. पण तुच एकुलता एक मुलगा आहेस माझा आणि तुझ्या बहिणीही चांगल्या घरी सुबत्तेत नांदत आहेत. तर आपल्या मालमत्तेचा चांगला उपयोग करूया. आज रात्रीपर्यन्त सगळे कागदपत्र एकत्र जमा करून ठेवतो. आपण चौघजणं रात्री आराखडा तयार करू.”

     “ चालेल बाबा, मृत्यूपत्राचं तुम्ही आता काय घेऊन बसलात?” राघव म्हणाले. पण त्यांच्याही मनात मृत्यूपत्र तयार करून ठेवण्याचा विचार आला होता, हे त्यांना आठवले. वयोवृध्द आबांचा निर्णय योग्य होता.

     “ राघवा, द्यायचा आनंद फार मोठा असतो. तो घेऊ दे आम्हाला.” आई म्हणाली. तसे राघव हसले. कारण आईला नेहमीच सतत दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला आवडतं. हे त्यांना माहित होतं.

     जेवायची वेळ होत आली. तशी आई आणि स्वरुपा आत गेल्या. आईनी रखमाला आधीच बेत सांगुन ठेवला होता राघवांच्या आवडीचा. स्वरूपाने आणलेले पदार्थ आत नेऊन ठेवले. थोड्याच वेळात वासू आला. तो म्हणजे मुर्तीमंत उत्साहाचा, वातसल्याचा झरा होता. कुणाविषयी कधीही वाईट विचार त्याच्या मनात येऊ शकत नव्हते. अत्यंत कामसू, व्यवहाराला हुशार, नवनवीन तंत्रज्ञान वापरुन त्याने शेतीत खुप सुधार केला होता. पण अर्थात जुन्या चांगल्या पद्धतींना त्याने बाधा येऊ दिली नव्हती. त्यामुळे शेतीचा कस कमी न होता, योग्य उत्पन्न हाती येत होतं. इतक्या चांगल्या माणसानी लग्न का केलं नाही ? आणि घरचं इतकं चांगलं वातावरण असताना तो शिकला का नाही ? हे कोडं राघवांना कधीच उमगलं नाही. आबांना त्याने आनंदाने मिठी मारली, आणि आबांच्या डोळ्यात त्याच्या बद्दलचं प्रेम पाहून राघवांना वाटलं खरं तर हाच त्यांचा मुलगा. आपण तर लहानपणी काही वर्षच त्यांच्या जवळ राहिलो. अधून मधुन आलो गेलो. पण वासू तर प्रत्येक क्षण बाबांबरोबर जगला. याला बाबांनी आपलं घरच काय, सगळं दिलं तरी कमीच पडेल. खरं आई आबांना यानीच सांभाळलं. पण आबांना असे केलेले आवडणार नाही. कारण राघवांवर त्यांचा किती जीव होता, ते राघव जाणून होते. चुलत भावाने त्यांच्या पाठीवर मारलेल्या थापेने ते भानावर आले. भावना वेगाने त्यांनी वासुला मिठी मारली. वासूही आपल्या कर्तुत्ववान भावाच्या कुशीत शिरला. मग वहिनीच्या पाया पडून थट्टा करायला मोर्चा वळवला. त्याला तोंड देता देता स्वरूपाची धांदल उडाली. आईने जेवायला आवाज देईपर्यंत हसण्याच्या आणि गप्पांच्या नादाने घर गुंजत होतं. राघवांना आवडतं म्हणुन रखमाने केळीच्या पानावर जेवायला वाढलं. पुरणपोळीचा बेत होता. कुरड्या, पापड, यांचे राघव अगदी भोक्ते. मनपसंत बेत पाहून ते अगदी खुष झाले. जेवण झाल्यावर वासू कामाला निघून गेल्यावर मागची आवराआवरी करून सगळेच विश्रांती घ्यायला गेले. प्रवासाच्या थकव्याने झोपही पटकन लागली. राघव तर थेट वासूच्या आवाजानेच उठले. हॉलमधे चहा पिता पिता ते वासुला म्हणाले “ वासू, आता चार दिवस आम्ही रहाणार आहोत. मधे आम्ही गुहागरला जमीन बघायला गेलो होतो. आता तिथे माझं राहिलेलं हिरवं स्वप्नं पुर्ण करायचं ठरवलं आहे. मला मदत करशील ना ?”

    “ अरे वा दादा, ही तर खुपच चांगली बातमी आहे. आपल्या इथे जवळपास सगळी पिकं आहेत पण नारळी पोफळीचा प्रांत राहून गेला होता. माझे एक दोन मित्रही या व्यवहारात आहेत त्यांचीही तुला भेट घालुन देईन. जमिन क्लिअर आहे ना ?”

     “ हो. आबांचे मित्र प्रकाशकाका, तू तर त्यांना ओळखत असशील. त्यांच्या ओळखीच्यांची जमिन आहे. आधी माझा अंदाज घेऊन मग तुझ्याशी बोलायचं असं आबांनी ठरवलं होतं. कारण माझी इच्छा नसेल तर आधीच तुझ्याशी काय बोलणार ना ?”

    “ अरे दादा, प्रकाशकाका म्हणजे काहीच प्रश्नच नाही. चालता बोलता शेतीचा विश्वकोष आहेत ते. त्यांची तुला खुप मदत होईल.” मग गप्पाना रंग चढत गेला. वासुला खुप माहिती आहे हे राघवांच्या ध्यानात आले. नोकरीमुळे त्यांचे गावाकडे येणे जाणे, रहाणे हे निमित्तमात्र व्हायचे. त्यामुळे सगळ्यांमध्ये सामुहिक गप्पा चालायच्या. आता निवांतपणे गप्पा मारताना एकेक पैलू समोर येत होते. जेवण झाल्यावर वासू शेतावर झोपायला गेला. राघवांनाही त्याच्या बरोबर जायचा मोह होत होता, पण रात्री आबांनी जरा बोलायचे आहे हे सांगून ठेवले असल्याने उद्या वासू बरोबर शेतात झोपायला जायचे हे त्यांनी ठरवून ठेवले.

    सगळं निवांत झाल्यावर आबांच्या खोलीत चौघं एकत्र आले. त्यांनी कागदपत्रांची फाइल आणि दागिन्यांचा डबा मधे ठेवला. “ आबा, हे सगळं पहात बसलं तर खुप वेळ जाईल तुम्हीच सांगा ना तुमच्या मनात काय आहे ते.” राघव म्हणाले.

   “ राघवा, ही जी आपली वडीलोपार्जित जमिन आहे, ती आम्ही तिघं भावंडं मिळून पंचवीस करोडची आहे. पण कसणारा फक्त वासुच राहिला आहे. नाना आता काही मुंबईहून इकडे येत नाही. ना त्याची मुलं इकडे येऊ इच्छितात. मधे नाना आला होता तेव्हा आम्ही तिघांनी मिळून चर्चा केली आणि असे ठरवले की शेती वासुला करू द्यायची आणि त्यानी दरवर्षी तिघांना ठराविक रक्कम द्यायची. धान्य द्यायचं. अडीअडचण आली तर तुम्ही सगळ्यांनी त्याला मदत करायची.”

     “ खुपच चांगला विचार आहे. त्यामुळे जमिनीचे तुकडेही होणार नाही, आणि सगळ्यांमध्ये एकोपा राहिल. पण वासुला परवडेल का हे ?”

     “ वासुचे डोके शेतीत खुप चांगले चालते. रग्गड कमावतोय तो. तुम्हाला देऊनही त्याला भरपुर उरणार आहे. मुख्य म्हणजे तो खुप साफ मनाचा आहे. तुमच्याशी तो कधीच लाडीलबाडी करणार नाही. फक्त घर त्याच्या नावावर करून देतो म्हणजे नंतर भांडणं नको. हे झालं घराचं आणि जमिनीचं. माल विक्री आणि आयुष्यभराची कमाई रक्कम आता माझ्याकडे २०/२५ करोंड आहेत आणि २५ तोळे हिचे दागिने. आता आम्ही दोघेही थकलो याचे काय करायचे ते तू ठरव.”

     “ राघवा, माझ्या मनात दानधर्म करावा असेही आहे.” आई म्हणाली.

    “  तुझ्या गुहागरच्या जमिनीसाठी पैसे काढून ठेवले आहेत वेगळे. आमच्या आजारपणाला लागतील किंवा आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत खर्चाला, असे एक करोड गुंतवून ठेवले आहेत, त्याचं व्याजही चांगलं मिळतं. त्यामुळे उरलेल्या रकमेचा तू हिशोब लाव. माझ्या नातवंडांनाही आमच्या समोर काही पैसे दे. उरलेले योग्य ठिकाणी गुंतव.”

    “ आबा मी फक्त विचार मांडतो. तुम्हाला हवे तसे बदल तुम्ही करा. नील, मधुर, जानकी, अस्मिता त्यांची दोन, दोन मुलं यांना प्रत्येकी दहा लाख दया. हे झाले ८० लाख. उरलेले २० लाख आपल्या घरचे आणि शेतातले गडी यांच्यामध्ये वाटा. आयुष्यभर आपल्या इथे कामं केली त्यांनी. हे झाले सगळे मिळून एक करोड. सुरुची आणि चंदना यांना एक एक करोंड दया. दहा लाख इथल्या शाळेला, आणि दहा लाख हॉस्पिटलला, इथे चारा प्रश्न एनजीओ स्थापन झाले आहे. त्यांना १ लाख, आपले कुलदेवत दैवता, ग्रामदेवता यांचे किती द्यायचे ते आईला ठरवू द्या.”

     “ राघवा, मला तीर्थक्षेत्री दान करायची इच्छा आहे.” आई म्हणाली.

     “ जरूर आई. पण अट एकच. तू तिथे जाऊन दानधर्म करायचा.”

     “ अरे! पण ते कसे शक्य आहे ?”

     “ आई आता आपल्याकडे सगळ्या सोई झाल्या आहेत. तू कधीच कुठे बाहेर पडली नाहीस. आता थोडी हिम्मत कर. विमानाने सगळीकडे जाऊ. वैष्णवदेवी, केदारनाथ, अमरनाथ सगळीकडे हॅलिकॉप्टर जातात. इथेही त्रास सहन करतच आहेस, तर सहन करत सगळं बघून तरी घे.” राघव म्हणाले.

    “ खरं आहे राघवा तुझं. आता यातच संपायचं आहे तर मनासारखं जगुन संपवूया. तू ठरव मी येईन.” आईच्या बोलण्याने सगळ्यांनाच आनंद झाला.

     “ ठीक आहे मग. राकेश बरोबर जमिनीचा व्यवहार १५ डिसेंबरला आहे तर आपल्याकडे महिन्याच्यावर वेळ आहे. आणि हा सीझनही चांगलाय. आता आपण दक्षिणेकडचा भाग करून घेऊया, मे मधे उत्तरेकडचा भाग करू. तेव्हा तिथल्या यात्रा सुरू होतात.”

     “ आई, आपली पद्मा आहे ना, ती तुम्हाला छान मसाज करून देत जाईल. मी तिला सगळं शिकवून ठेवणार आहे. नंतर मिठाच्या पाण्याचा शेक घ्यायचा. काही व्यायाम तुम्हाला शिकवून ठेवते. तुम्ही हे सगळं करतच आहात पण काही वेगळ्या पद्धती वापरुन बघूया. एव्हढं जरी झालं तरी तुमचे आखडलेले स्नायू खुप मोकळे होतील.” स्वरुपा म्हणाली.

    “ बरं बाई तू म्हणशील तसं.” आईंना खुप उभारी आल्यासारखं वाटू लागलं.

    “ अरे वा, सगळ्याच योजना चांगल्या आहेत.” आबा एकदम खुष झाले. पण त्यांच्या एकदम लक्षात आले राघवांनी स्वतःसाठी काहीच घेतले नाही.

     “ राघवा, तू स्वतःसाठी काहीच घेतले नाहीस.”  

    “ आबा, तुम्ही मला जन्म दिला. इतकं छान घडवलं. सुंदर जग दाखवलं. अजुन तुमच्याकडून काय घेऊ ?” आई आबांच्या डोळ्यात पाणी आलं. कुठल्या जन्मीचं पुण्य म्हणुन असा मुलगा आपल्याला लाभला.

     “ ते काही नाही. या सगळ्या योजना पार पाडून जे काही पेसे उरतील ते आणि आमच्यासाठी इन्व्हेस्ट केलेले एक करोड हे सगळे पैसे तुझ्याकडे रहातील. वकिलाकडे मी तसं सगळं लिहून देणार आहे. बाकी तुझ्या सगळ्या योजना चांगल्या आहेत आणि आम्हा दोघांनाही मान्य आहेत. आता आमची सुनबाई राहिली. तू तर तिला आता एक सुतळीचा तोडाही दिला नाहीस. उभा जन्म तिनी या घरासाठी काढला, आता हा दागिन्यांचा हिशोब तिला लावू दे.”

     “ मी नाही आबा, आईंना ठरवू द्या. त्यांचे आहेत ते दागिने.” स्वरूपा गोंधळलेली बघून शेवटी आईनीच तो डबा उघडला. स्वरुपाला एक चादर पसरवून एक एक दागिना त्यावर मांडून ठेवायला सांगितला. आपली जन्मभराची ती ठेव त्यांना डोळेभरून पहायची पण होती. स्वरुपा दागिने मांडू लागली. पाच प्रकारचे वेगवेगळे कानातले, काही कानातले डिझाईनचे वेल, चार पाच मंगळसूत्र, त्यात भरीव, रोज घ्यायचे वेगळे, कलाकुसरीचे, साधे, असे प्रकार होते. बारा बांगड्या, पाच तोळयाचा चपलाहार, नथींचे प्रकार, बुगड्यांची माळ, तन्मणी, सोन्याचे आकडे, सोन्याच्या फुलांची वेणी, कंबरपट्टा, बाजूबंद, अंगठ्या, चार पाटल्या, वजनदार तोडे, चार नेकलेस सेट, नवरत्नांचा हार, चार लॉकेट, राघवांना हे सगळं पहाताना मजा वाटत होती. स्त्री राज्यात फारसे ते कधी शिरले नव्हते. असं निवांत बसुन एन्जॉय करताच आलं नव्हतं. स्वरुपाला राघवांनी भरपुर सोनं घेऊन दिलं होतं. त्यामुळे तिला त्याची हाव नव्हती. ती पण फक्त मजा अनुभवत होती. आईनी भरीव मंगळसुत्र, नवलखा हार, आणि सोन्याची फुलं असलेली वेणी स्वरुपाला दिली व म्हणाली “ हे तुझ्यासाठी. घरची सून आहेस तू. नवलखा हार आणि सोन्याची वेणी आपली पिढीजात आहे. नंतर तू तुझ्या सुनांकडे सुपूर्द कर. राघवा हा गोफ आणि अंगठी तू घालत जा.”

    “ अगं आई, मला कशाला ?”

    “ आमची आठवण म्हणून सणावाराला घालत जा.” दोन नेकलेस बॉक्स स्वरुपाला देत म्हणाली “ हे दोन नेकलेस तुझ्या सुनांना, आणि दोन लॉकेट व अंगठ्या मधुर नीलला. चपलाहार आणि कंबरपट्टा एकएक मंगळसूत्र माझ्या लेकींना देऊया. जावयांना अंगठ्या, वासुचं लग्न आमच्या डोळ्यासमोर झालं तर दोन पाटल्या, दोन बांगड्या, तन्मणी देईन. बाकी माझ्या लाडक्या भाचे, पुतणे मंडळींना देईन. बघू. सुवर्ण दानाचही महत्व असतं. आणि माझ्या अंगावरच सोनं रे ?” आईला सोन्याची खुप आवड होती. या वयातही तिच्या अंगावर मंगळसूत्र, पाटल्या, बांगड्या, कानातले, मोरणी, अंगठी, सोन्याची छोट्या मण्यांची माळ. एव्हढं सगळं होतं.

    “ आई आता बाकी सगळं राहुदे. महत्वाचे झाले ना ? गुहागरच्या घराची वास्तुशांती पुढच्या डिसेंबरमधे करायची ठरवतोय. नील येईल. तेव्हा सगळ्यांना तुझ्या हाताने दे. बाकीच्यानां प्रसंगानुरूप तुला वाटेल तेव्हा दे. आता दिवाळी येईल तेव्हा इनाम म्हणुन गड्यांमध्ये पेसे वाटून टाका. मी इथे आहे तोपर्यंत शाळा, हॉस्पिटल, व ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन देणगी देऊन येऊ. एनजीओचा माझा मित्र आहे त्याच्याशी बोलून मग ते पेसे देऊ.”

     “ राघवा, माझे एक ऐकशील ? यावेळेस दिवाळी इथेच करशील ? मधुरलाही इकडे बोलावून घेऊ. दहा दिवसांवर तर दिवाळी आली आहे.” थकल्या आईचा आर्जवी स्वर ऐकून राघव विरघळले. स्वरूपाकडे बघताच तिनेही इशारा केला. राघवांनीही होय आई जरूर. आम्ही इथेच दिवाळी करू. असं म्हणटल्यावर तिच्या चेहेऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यात फुललेले चांदणे पाहून त्यांना दोन ओळी आठवल्या ‘ काय मागतं म्हातारपण, दोन गोड शब्द, आणि आपुलकीचा सहवास.’ खरं आहे आता तर आपण हे कर्तव्य आनंदाने पार पाडायलाच हवे. आपल्या लहानपणच्या दिवाळ्या आठवून इथे आता खुप मजा करू. त्यांनी मनाशीच ठरवलं.

    “आई, मग आपण तीन चार दिवसांनी तुळजाभवानीला जाऊन येऊ. मग आल्यावर दिवाळीच्या तयारीला लागू.” राघव म्हणाले. आई आनंदली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिला जवळ घेत ते थोपटत राहिले. स्वरुपा लगबगीने बाहेर आली आणि मोबाईल आणून मायलेकाचा भावस्पर्शी फोटो काढला. मग चौघांचा काढला. तसे सगळेच हसू लागले.

    “ चला आता झोपूया, रात्र फार झाली.” तृप्त मनाने आबा म्हणाले. मग राघव, स्वरुपा आपल्या खोलीत गेले. झोपताना ते म्हणाले “ रिटायर्ड झाल्यावर तर मी अजुनच बिझी झालो.”

    “ आधी लोकांची चाकरी केली. आता मायेच्या माणसांसाठी जगा आणि आनंद घ्या.” राघवांना झोपेत माया आणि हिरवाई यांची वलयं आसपास फिरत आहे असे जाणवत होते.

                              ................................................................................................................................