स्वप्नस्पर्शी - 4 Madhavi Marathe द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वप्नस्पर्शी - 4

                                                                                        स्वप्नस्पर्शी : ४

       पंधरा दिवसांसाठी आलेला नील, जायचा दिवस आलेला पाहून खंतावू लागला. किती घडामोडी झाल्या होत्या या पंधरा दिवसात. बाबांची पार्टी झाल्यावर, सर्वांनी केलेल्या विचारविनिमया प्रमाणे आबांनी त्यांच्या मित्राला फोन केला. ते तयारच होते. जमिन पहाण्यासाठी त्यांचं बोलवणं आल्यावर सगळ्यांनीच मी पण येणार अशी घोषणा केली. मग कौटुंबिक सहल गुहागरला न्यायची ठरली. घरी तीन कार होत्या. पण कुणालाच असं वेगळं वेगळं जाणे मंजुर नव्हते. मग मधुरनी एक सोळा सीटर मिनीबस बुक केली. जमिनीचे व्यवहार करणारा जाणकार मित्रही बरोबर घेतला. दुसऱ्या दिवशी निघायचं ठरवलं. आबांनी मित्राला फोन करुन येत असल्याचे सांगितले.

     सकाळी सहा वाजता भराभर आवरुन सगळे निघाले. बच्चे कंपनी जरा झोपेतच होती. बाकीच्यांचा हास्यकल्लोळ चालू होता. नील, मधुर खाण्याचे दर्दी. त्यांनी हे घेतले का ? ते घेतले का ? असा पाढा चालू केला. तसा समस्त स्त्री वर्ग त्या दोघांवर तुटून पडला तेव्हा कुठे दोघं शांत झाले. पावसाळा संपून गुलाबी थंडीची चाहुल लागली होती. सकाळच्या शिरशिरी आणणाऱ्या वाऱ्याने मनं अगदी प्रफुल्लित होऊन गेली. हळुहळू सुर्यबिंबाचं पुर्वेला दर्शन होऊ लागलं. केशरी रंगाचा तो तेजोगोल सगळ्या सृष्टीला चालना देत होता. जसजसा कोकण भाग जवळ येऊ लागला तसतसा दगडाळ भाग कमी होऊन लाल मुरमाड मातीतली हिरवाई रंगसंगती साधू लागली. नारळाच्या झाडांची लपाछपी सुरू झाली. डुलणाऱ्या माडांच्या आड कोकण कडेकपारी डोकावत, लाल मातीशी जवळीक साधत लाल पायवाटा आपल्या खुणा दर्शवू लागल्या. भातशेतीच्या हिरव्यागार तुकड्या तुकडयांनी सजलेली दृश्ये दृष्टीस पडू लागली. दाट जंगल, घाटाचे वळण घेत घेत बस जात होती. निसर्गाच्या सान्निध्याने आता सगळेच शांत झाले. निसर्ग त्यांच्यात अंतर्बाह्य उतरु लागला. थोड्या वेळाने  वाटेत थांबून चहा नाष्टा झाल्यावर आता आबांचा अधुनमधून कुठपर्यंत पोहोचलो अश्या खबरबातीचा फोन आपल्या मित्राला चालू झाला. सकाळीच निघाल्यामुळे जेवायच्या वेळेपर्यंत पोहोचायचे असे ठरले होते. आजचा दिवस प्रकाशकाकांकडेच मुक्काम करायचा असल्यामुळे निवांतपणा होता. शेतपहाणी, वाटाघाटी, समुद्रावर भटकंती अशी छान ट्रीप ठरली होती.

    थंडीचे दिवस असल्याने ऊन जाणवत नव्हते. तसेही कोकणात दमट हवामान असल्याने थंडी अशी फारशी नसतेच. जसजसे गुहागर जवळ येऊ लागलं, तसतसं दाट झाडीतून विशाल पर्वतांचे दर्शन अधुनमधून दर्शवत रस्ता वळणं घेऊ लागला. दाट झाडींवर विविध पक्ष्यांच्या दर्शनाने नील, मधुर, जानकी, अस्मिता यांच्यातला कलावंत, संशोधक जागा झाला. आपण बायनाक्युलर का नाही आणला, या भावनेने चौघेही स्वतःवर चिडले. मग आहे त्या कॅमेऱ्यानी, मोबाईलने फोटो काढू लागले. ते कधी बस थांबवायला लावत तर कधी तसेच फोटो काढत, जंगलाची शांतता आबा, काका, राघव आणि स्वरूपाला आतून शांत करत होती. वर वर मुला नातवंडांचा गलका पहात हसत होते. पण त्याचा एकही तरंग आत झिरपत नव्हता. वयाचा भाग होता तो.

    बसनी एक वळण घेतलं आणि गुहागर आल्याचे ड्राइव्हरनी सांगितलं. तसे आबांनी मित्राला फोन लावला. त्यांनी व्याडेश्वर मंदिराजवळ बस आणायला सांगितली. तिथून पुढे ते वाट दाखवणार होते. गावाची वर्दळ चालू झाली. तसे उत्सुकतेने भारलेले सगळ्यांचे चेहेरे गाव न्याहाळू लागले. राघव, स्वरूपा, आबा, काका या नवीन गावाशी आता आपली नाळ जुळणार या भावनेने बघत होते, तर नील, मधुर नवीन प्रोजेक्टच्या दृष्टीने बघत होते. मंदिर जसजसं जवळ येऊ लागलं तसतसा रस्ता छोटा होऊ लागला. देवळाच्या बरीच अलीकडे बस थांबवावी लागणार असे दिसू लागले. तेव्हढ्यात आबांच्या मित्राचा फोन आला. तुमची गाडी मला दिसतीये. डावीकडच्या पटांगणात गाडी घ्या. तिथे पार्क करता येईल. नील ड्राइव्हरपाशी जाऊन त्याला गाईड करू लागला. तेव्हढ्यात आबांना त्यांचा मित्र, बस शेजारून जात त्यांना हात करताना दिसला. तसा आबांनीही त्यांना इशारा केला. मग बस त्यांच्या मागून जावू लागली.

    एका बाजुला झाडाखाली बस पार्क केल्यावर अवघडलेल्या शरीराला ताण देत एकेक जण उतरू लागले. मुलांना अरे, अरे, करेपर्यंत ते उतरून इकडे तिकडे पहात उभे पण राहिले.

  “ अरे अण्णा, कसा आहेस ?” हसऱ्या चेहेऱ्याने त्यांचा मित्र सामोरा आला.

  “ प्रकाश, किती दिवसानी भेटतो आहेस.” दोघांनी अतिशय आनंदाने गळाभेट घेतली. त्या बालमित्रांचा आनंद तेव्हढाच निरागस वाटत होता. तुम्हाला कुठल्या काळातली व्यक्ती भेटते, त्या काळाप्रमाणे आनंदाचं स्वरूप ती व्यक्ती भेटल्यावर होते. म्हणजे बालपणातला निरागस भाव, तरुणपणातला कोमल भाव. प्रौढावस्थेत पक्व होऊन आलेली मिष्किलता, म्हातारपणातलं पुर्णत्व असे भाव त्या व्यक्तींच्या भेटीने उफाळून येतात. आबांनी मग सगळ्यांची ओळख करून दिली. तसे तर प्रकाशकाका सगळ्यांना ओळखत होते. पण काळाच्या ओघात प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या होत्या. आता फोनवरूनच त्यांच्या जास्ती गप्पा चालायच्या. तरुणपणात दोघांचे मार्ग बदलल्याने भेटीचे योग कमी झाले. पण आधी पत्राद्वारे नंतर फोनवरून त्यांनी आपली मैत्री अबाधित राखली होती. आपल्या हसऱ्या आणि पटकन आपलसं करून घेण्याच्या कलेमुळे प्रकाशकाका सगळ्यांनाच आवडून गेले.

  “ चला, हे व्याडेश्वर आपलं दैवत आहे. त्याच्या पाया पडून चांगल्या कामाला सुरवात करूया.” सगळेजणं मंदिराच्या दिशेने चालू लागले. दोन्ही बाजूंनी कोकणी मेवा असलेले दुकानं, तसेच हार, फुलं, पेढे, नारळाची दुकानं सजलेली, तिथली अंगानी काटक, तुडतुडीत गोरे कोकणी माणसं उठून दिसत होती. कष्टकरी बायकांचा चटपटीतपणा जाणवत होता. मंदिरात प्रवेश केला. दगडी बांधकामातलं, पंचायतन पद्धतीचं परशूरामांनी बांधलेलं मंदिर आहे. अशी माहिती प्रकाशकाका सर्वांना देत होते. मंदिरात समोर खोल गाभाऱ्यात महादेवाची पिंड बेलाफुलात लपेटून, मस्तकावर शीतल जलाभिषेक करुन घेत भक्तांच्या आर्त भावनाना शांतवत होती. बेलफुलं वाहून सगळ्यांनी मनोमन प्रार्थना करत हात जोडले. नवीन सुरू होणाऱ्या आयुष्याच्या फलदायी कामना केल्या. गुरुजींनी दिलेले तीर्थ प्रसाद घेऊन सगळे बाहेर पडले. मुलांना समोरची खाऊची दुकानं भुलवत होती. प्रकाशकाकांनी सर्वांना कोकम सरबत पाजलं. बायका लगेच तिथल्या दुकानात शिरल्या. नागली, पोह्याचे पापड, मिरगुंड, भरली मिरची, फणसाचे वाळलेले गरे, पाकातले गरे, काप, काजू, आंबावडी, फणसवडी, आंबा, फणसपोळी, कोकम अर्क किती प्रकार बायकांनी हौसेने घेतले. सालवाले काजू तर नील मधुरचे एकदम फेव्हरेट. नीलनी अमेरिकेत घेऊन जायला आणि मित्रांना द्यायला कितीतरी काजू पॅकेट्स घेतले. शेवटी आबा आणि प्रकाशकाकांनी चला, चला करून सगळ्यांना बाहेर काढले. बसमध्ये ते वाढीव सामान ठेऊन आपापल्या जागा धरल्यावर बस सुरू झाली, राघव मात्र प्रकाशकाकांच्या मागे स्कुटरवर बसले. त्यांना खुलेपणाने सगळं गाव न्याहाळायचं होतं. प्रकाशकाकांशी गप्पा मारायच्या होत्या.

      काकांनी ड्राइव्हरला गावाबाहेरच्या मोठ्या रस्त्यानी कसे यायचे ते समजावून सांगितले, व स्वतः गावातला शॉर्टकट घेऊन राघवांना गाव दाखवत नेऊ लागले. माडा पोफळींनी वेढलेल्या वाडीमधून लाल वाटा, कुठे डांबरी रस्ते, शहरीकरणाच्या खुणा दाखवत होते. हॉस्पिटल, भाजीमंडई, फुलमंडई, नगरपालिका, बँका, शाळा, कॉलेज, बाजारदर्शन करत काकांनी गावाच्या सगळ्या सुविधा दाखवल्या. मग एक लाल वाट पकडून ते गावाबाहेर आले. थोड्याच वेळात दुतर्फा दाट उंच झाडींनी वेढलेला रस्ता सुरु झाला. उंच डोंगरांची भव्यता जवळून अनुभवायला येऊ लागली. रस्त्यांची चढ उतार शृंखला पाहून राघवांना जरा भयच वाटलं. बसमध्ये चढउतार असे जाणवले नव्हते, पण आता स्कुटरवर बसून जाताना भितीही वाटत होती, आणि मजाही येत होती. प्रकाशकाकानी राघवांची  स्थिती ओळखली.

   “ भीती वाटते का रे राघवा ? कारमध्ये फिरणारा तू. आता खुल्या निसर्गात वावरण्यास सज्ज झाला आहेस, तर तुला प्रथम त्याच्या भव्यतेची भीती वाटू शकते. आपण शहरी लोकं, फार बंदिस्त जगतो. निसर्गाचे खुलेपण स्वीकारायला तेव्हढीच मनाची व शरीराची ताकद  लागते. डोंगराच्या माथ्यावर बसुन त्या निसर्ग दृश्याचा आनंद मिळतो, तो अनुभवायला आधी डोंगर चढण्याचे कष्ट घ्यावे लागतात. रात्रीच्या निःशब्द शांततेला जो नाद असतो, तो तर भल्या भल्यांना गर्भगळीत करतो. पावसाळ्यात घुमणारी वादळ वाऱ्याची साद, वीजेचा कडकडाट, लखलखाट हे तर सृष्टीचे आव्हान. ते उघड्या डोळयांनी पेलता आले आणि सरपटणाऱ्या जीवांचे थंडगार अस्तित्व कधी शरीराला, मनाला व डोळ्यांना पेलता आले तर निसर्ग तुम्ही जगु शकता. या सरावाने निसर्ग हळुहळू तुमच्या जवळ येतो. मग त्याला पेलण्याची ताकदही येते, आणि निसर्ग उलगडू लागतो. अत्यंत सुंदर निसर्ग रुप. दिवसागणिक, प्रहरागणिक वेगळं. प्रत्येक ऋतुत वेगळं. जीवनचक्र, सृष्टीचक्र, सृजन प्रक्रिया. सगळच कसं अद्भुत. राघवा, तुला तर आतून या सगळ्याचं वेड आहे. अण्णा लहानपणापासून तुझं हे रुप जाणून होता. पण तुझ्या हुषारीवर त्याचा जास्ती जीव जडला. आधी शिक्षण घ्यायचं, ते आयुष्य जगु द्यायचं. मग तुला इकडे वळवता येईल. हे त्याच्या मनाने आधी ठरवले होते. तुझ्या मधल्या प्रत्येक गुणाला त्याने वळण दिले.”

    राघवांना भरून आलं. आपल्या बापाने घारी सारखं लक्ष ठेवून जोपासना केली. “ होय काका, खरय तुमचं. असे वडील मिळणं भाग्याचच.” 

    “ असा मित्र मिळणंही भाग्याचच राघवा. माझ्या पडत्या काळात अण्णाने एव्हढी साथ दिली की मी त्याचे उपकार या जन्मात फेडू शकणार नाही.” दोघही आबांच्या विचाराने भारून गेले. काही काळ नुसतीच शांतता पसरली. प्रकाशकाका स्कुटर चालवत राहिले. आणि राघव निसर्ग न्याहाळत राहिले.

    काही वेळाने समोर आपली बस थांबली आहे हे त्यांना दिसलं. मग काकांनी बसला इशारा करून आपल्या मागून यायला सांगितले. बस ड्राइव्हरने त्यांच्या मागून गाडी घेतली. गावाबाहेरचा पुर्ण मोकळा भाग, दाट झाडी, शेती, डोंगरांच्या मधुन काही घरं दिसत राहिली. दोन घरांमध्ये बरच अंतर होतं. भरपुर पाऊस असल्यामुळे घरांचे लाल कौलारू छतं देखणे दिसत होते. प्रकाशकाकांनी स्कुटर वळवली व एका घरासमोर ते थांबले. “ ये राघवा.” म्हणत आत वळले, तोच दोन मोठे कुत्रे त्यांच्या अंगावर झेपावत भुंकून धुमाकूळ घालू लागले. “ अरे, हो, हो” करत त्यांनी जरा कुरवाळून आवरायला सुरवात केली. तोपर्यंत बसमधुन उतरत असलेली पब्लिक ते दृश्य पाहून बिथरली होती. राघव पण जरा मागे सरकले. शहरी कुत्र्यांचा दिखावूपणा या कुत्र्यांना नव्हता. जरब बसवतील असे ते उंच कुत्रे पाहून सगळेच बिचकत आत गेले. प्रकाशकाकांनी मागच्या अंगणात त्यांना बांधून टाकले. घरात गेल्यावर सगळ्या मंडळींना वाचा फुटली.

   “ काका सॉलिड आहे हं तुमचे कुत्रे. नाव काय त्यांचं ?” अश्या चौकश्या सुरू झाल्या. बायका आपापसात बोलू लागल्या. कुत्र्यांच्या नादात बाहेरचं स्वरूप कुणाला फारसं लक्षात आलं नाही. पण घरात शिरताच सगळे सुखावले. प्रकाशकाकांनी सगळ्या शहरी सुविधा करून खेडेगावात घर बांधले होते. प्रकाश योजना, खेळती हवा, यांचा अगदी योग्य वापर केला होता. शहरातल्या घरांना सरावलेले डोळे त्या मोठ्या दिवाणखाना, स्वैपाकघर, बेडरूम पाहून आश्चर्यचकित झाले. प्रत्येक खोलीतून निसर्गाचं सुंदर रूप डोळ्यात भरत होतं. मागच्या दारी तर अंगणात डोंगर असावा इतक्या जवळ तो दिसत होता. तिथे केलेल्या परसबागेत नाना प्रकारच्या भाज्यांचे वाफे आणि फळझाडे दिसत होते. त्याच्या पुढ्यात विस्तीर्ण पसरलेली वाडी. एकीकडे नारळी पोफळीची झाडं, तर दुसऱ्या बाजूला आंबा, काजू, फणस, रातांबे यांची झाडे दिसत होती. खेडेगाव आणि शहराचा संगम पाहून सगळ्यांची मनं तृप्त होऊन गेली. प्रकाशकाकांनी जयाकाकूंना आठवण करून दिली. “ अरे! ते गावाहून आले आहेत. आधी चहापाणी करा.”

      तेव्हढ्यात त्यांच्या सुनेने जाईच्या मांडवाखाली मोठी सतरंजी अंथरली व सगळे बसल्यावर पिवळयाधमक पोहयांवर हिरव्यागार कोथिंबीरीने व पांढऱ्या शुभ्र नारळाच्या खवाने सजवलेल्या प्लेट्स बाहेर आणल्या. एका मोठ्या डिशमधे नारळाच्या वड्याही होत्या. ते पाहून डोळे निवले. चवीने खात गप्पा चालू होत्या.

   “ अरे प्रकाश, आता हे खाऊन झाल्यावर जेवणार काय ? आम्हाला एव्हढ्यावरच बोळवतो काय रे ?” आबा खुशीत येऊन मित्राला चिडवत होते.

   “ तुला एव्हढ्यावरच सोडतो काय अण्णा. आता तासाभरात असा फिरवून आणतो की आल्यावर कधी एकदा जेवतो असं होईल बघ.” हसतच काका म्हणाले. आलं घातलेला गरमा गरम चहा पिऊन प्रवासाचा शीण गेल्यामुळे सगळेच ताजेतवाने झाले होते. 

   “  चला आता आपण जमिनीची जागा पाहून येऊ. फार लांब नाहीये.”

   तसे बच्चे कंपनी त्यांना मिळालेल्या सोबतीं बरोबर पुढे पळू लागले. रस्ता त्यांच्या वाडीतून जात होता. मुरमाड लाल मातीच्या वाटा आता फक्त निसर्गाशीच जवळीक साधत होत्या. बायका आपापसात बोलत आणि पुरुष मंडळी माहिती करून घेत दुतर्फा झाडीतल्या वाटेने पुढे जात होते. दुपारच्या उन्हातही झाडींमुळे गारवा जाणवत होता. पाचच मिनिटांच्या अंतरावर मोकळा भाग जाणवू लागला. प्रकाशकाका जरा पुढे जमिनीच्या मध्य भागेत जाऊन थांबले.

    “ अण्णा, हा एक एकरचा तुकडा माझ्या भावाचा आहे. तो आता या जगात नाही. त्याचा मुलगा अमेरिकेत असतो. त्याला शेतीत इंटरेस्ट नाही. त्यामुळे त्याने हा हिस्सा विकायचा ठरवला. जमिन अगदी सुपीक छान, व शेतात विहीरही आहे. राघवला शेतीची तशी माहिती आहे पण प्रत्यक्षात अनुभव नाही. त्याला मी मदत करेन. गडी मिळवून देणं माझ्याकडे लागलं.”

   आबांनी माती हातात घेतली. काळसर लाल ढेकळांच निरीक्षण केलं. शेतमातीचा पोत चांगला होता. जमिनीवर बरीच वर्ष मशागत झाली नव्हती. इतर झाडझाडोरा वाढलेला दिसत होता. विहिरीला पाणी होतं पण गाळ बराच साचलेला, शिवाय डागडुजीही करावी लागणार होती. जमिनीला खतपाणी बरच लागेल. आबांच्या डोक्यात चक्र फिरू लागली. जमिन पडीक असल्याने भाव जरा कमी करता येईल. गुहागर गावही तसं जवळ आहे. त्यामुळे मालाची ने आण, गडी, मजुर मिळायला सोपं जाईल. तसेच अडीअडचणीलाही गाव उपयोगी पडेल. पुढे मागे जमिनीची किंमत अजुन चांगली वाढू शकते. झाडाझाडोरा बराच आहे तो ही लाकडं म्हणुन विकता येईल. सगळा विचार करून आबा बोलले “ प्रकाश, किंमत किती सांगतोस जमिनीची ?”

   “ अण्णा, पैशाचा फार ताण नाही. एकतर मला शेजार येणार तो ओळखीचा हवा होता. कारण गावाबाहेर रहायचं तर चांगला शेजार फार महत्वाचा असतो. अडचणीला तोच मदतीला आधी येणार असतो. शिवाय माझ्या शेतजमीनीला लागुन हद्द येणार तर भांडणे, तक्रारी अश्या प्रकारात मला जायचे नव्हते. इथे मी लेकी सुनांसह रहातो. त्या दृष्टीनेही विचार केला म्हणुन तुला आधी विचारलं. तुला सगळं माहिती आहे. तू योग्य तो आकडा सांग. राकेशलाही फार पैशाचा हव्यास नाही. तो ही मला त्रास न होता जमिनीची काळजी घेणारा माणुस बघा म्हणाला. तर तू आकडा सांग मग आपण राकेशबरोबर बोलून कमी जास्त करू.” 

    राघव नुसतेच जमीन न्याहाळत होते. एक एकर म्हणजे तसा मोठा तुकडा होता. पैशाचा प्रश्न नव्हता. पण आपल्याला हे एव्हढे सगळे झेपेल का ? कल्पना वेगळी आणि वास्तव वेगळे. हे आता या वयाला येऊन चांगले माहित होते. जागा मात्र खरच निसर्गरम्य होती. हिरव्या स्वप्नाला योग्य अशी. शिवाय वीस मिनिटांवर गाव. मुख्य म्हणजे समुद्र होता जवळ. पुण्याला तर मॉर्निंग वॉकला जायचे तर अर्धा तास ग्राउंडवर जायला लागायचा. इथे तर रोज सकाळी दहा मिनिटात समुद्रावर फिरायला जाता येण्यासारखं होतं. आता आलो तर रस्ताही तसा चांगला वाटला. शिवाय गर्दीही फारशी नव्हती. जमलं तर वाडी नाहीतर बऱ्यापैकी घर बांधून इथे निवांत रहाता येईल. प्रकाशकाकांचा शेजार म्हणजे काही प्रश्न नाही. छान वाटलं ते कुटुंब. स्वरुपालाही चांगली कंपनी होईल त्यांची. पहिल्या भेटीतच जिवलग कुटुंब भेटावं तसे एकमेकांशी सगळे भेटले होते. करावीच मग हिंमत.

    बायकांची इकडे वेगळीच गणितं चालली होती. भजनी ग्रुप मिळाला तर आईंना जरा करमेल. इतक्या लांब कामाला बाई मिळेल का ? स्वरुपाचं मन शांत होतं. राघवांच्या निर्णयाला अनुमोदन देणं हे तिच्या जन्माचं ब्रीद होतं. तिला त्रास होईल असा कुठलाच निर्णय राघव घेत नसत. दोघांच एकमत अगदी जुळून येई. महिला मंडळ, बाई, बाजार या तिला समस्या वाटतच नव्हत्या. राघवांच्या नजरेने ती ही जमीन पहात होती. त्यांच्या हिरव्या स्वप्नाला अगदी योग्य अशी ती जमीन होती. शिवाय प्रकाशकाकांचं कुटूंबही तिला जिवाभावाचं वाटलं. जानकी, अस्मितालाही खरं तर त्यांच्या वयाला अनुसरून ही जागा फार आवडली होती. फक्त आई, बाबांचा विचार करून बाकी बाबी त्या पडताळून पहात होत्या. मधुर, नील, व त्यांचा मित्र व्यावहारिक पातळीवर विचार विनिमय करत होते. पण आतून तिघांना ही जागा खुप आवडली होती. सगळ्यांचे चेहेरे निरखत आबा म्हणाले

  “ राघवा, कशी वाटतीये जमीन ? आवडली असेल तर पुढचं बोलूया.”

  “ होय बाबा, जागा तर खुप छान आहे. अगदी माझ्या मनासारखी. पण मला एव्हढी जमीन कसणं जमेल का? हा विचार सतावतोय.”

  “ अरे राघव, तू एकदम पुर्ण स्वप्न पाहू नको. नेहमी टप्या टप्यानी आपलं स्वप्न पुर्ण करत जायचं. असा विचार कर. नाही तर तुला स्वप्नाचच दडपण येईल. मग तू त्यापासून दुर रहाण्याचा प्रयत्न करशील. या जागेवर आधी तू घर बांध. ते ही इथे राहून तुझ्या देखरेखीखाली बांध. म्हणजे तुझी या मातीशी नाळ जुळेल. ते पलिकडचे घर आहे ना ते रिकामे आहे. तिथे तू सहा आठ महिने राहून इथल्या घराचं काम पुर्ण करू शकतोस. इथे रहायला आलास, एकदा का नवीन घर बांधून झालं, की आपोआप पुढच्या गोष्टी उलगडत जातील. त्यानंतर एखाद दोन वर्षात तुझ्यापुढे हिरवं जग उभं राहिलेलं दिसेल. स्वप्न पहावं जरूर, पण ते टप्या टप्यानेच पुर्ण होतं.”

   “ खरं आहे प्रकाश तुझं. राघवा असा दडपून जाऊ नकोस. प्रकाश तुला आतापासूनच मदत करतोय. विचारांना योग्य दिशा दाखवल्याने कामं सुरळीत पार पडतात.” आबा

  “ ठीक आहे आबा. जमीन सगळ्यांना आवडली का ? राघवने विचारल्यावर मधुरने एक दोन शंका विचारून समाधान करून घेतले आणि मग समंती दिली. बाकीच्यांचा प्रश्नच नव्हता. राघवांच्या आनंदातच त्यांचा आनंद होता. सगळ्यांचा होकार दिसल्यावर आबा आणि काकांनी आपसात चर्चा केली व पंचवीस लाखाचा आकडा सांगितला.

  “ ठीक आहे अण्णा. मी राकेशशी बोलतो. इथे तसा ३०/३५ चा भाव चालू आहे. थोडं फार इकडे तिकडे होऊ शकेल.” यावर कुणाचीच हरकत नव्हती. मधुरच्या वकील मित्राने जमिनीचे कागदपत्र दाखवायची विनंती केली. तसे प्रकाशकाका म्हणाले “ हो. ते तर दाखवतोच. चला आता घरी जाऊ. भूक पण लागली असेल ना.”

   सगळेच आपापल्या विचारात घरी आले. परसबागेत असतानाच वेगवेगळ्या खादयपदार्थांचे दरवळ येऊ लागले. त्या वासाने भुक खवळली . डाइनिंग टेबलवर खाद्यपदार्थ आकर्षकपणे मांडून ठेवले होते. मीठ, कोशिंबीर, लोणचे एका ट्रे मधे ठेऊन बाजूला वांग्याचं भरीत, सोलकढी, पापड, मसालेभात होता. एका मोठ्या भांड्यात गरमा गरम बाट्या रचून ठेवलेल्या. उकळती डाळ घेऊन एक गडी आला. ते टेबलावर ठेऊन मग साजुक तुपाची किटली आणि गुळ व पिठीसाखर घेऊन आला. तोपर्यंत बाईने पाने मांडली. सर्व मंडळी हातपाय धुवून येईपर्यंत पानं वाढून तयार होती.

  “ अण्णा, खास तुझ्या आवडीची दालबाटी केली आहे. आठवतय कुणाच्याही घरी दालबाटी केली की आपण स्वतःहून त्यांच्याकडे जायचो आणि ते ही आपल्याला प्रेमाने खाऊ घालायचे.”

  “ हो रे. आता पुर्वीसारखं राहिलं नाही. प्रत्येक गोष्टीत हिशोब आला. खाणारा आणि खाऊ घालणारा दोघांमधे एक दरी निर्माण झाली आहे. जाऊ दे. पण जगात अजुनही चांगुलपणा टिकून आहे, आणि आपणही तो टिकवायचा प्रयत्न करू. बाकी तू बेत मात्र झकास केलास.” आबा खुषीत येऊन हसले.

  “ हे तर बेस्टच आहे. पण काका आम्हाला वाटलेलं की इथे येऊन कोंकणी पदार्थ खायला मिळतील.” मधुर गंमतीने म्हणाला. तशी अस्मिता त्याच्याकडे डोळे वटारून पाहू लागली. खो खो हसत प्रकाशकाका म्हणाले

  “ बघ अण्णा, असं निर्मळ नातं अजुनही टिकून आहे. हक्काचं नातं. मधुर आताचा बेत खास अण्णासाठी आहे. आम्ही दोघांनी दालबाटी खाण्यासाठी काय काय दिव्य केली हे जर तुम्ही ऐकाल तर हसतच रहाल. त्या आठवणी जागवल्या रे आमच्या भेटींनी. आणि तुम्ही काही लगेच निघणार नाहीये. तुला काही कोंकणी पदार्थ खाऊ घातल्याशिवाय थोडाच सोडेन. राघवा आवडलं ना रे. मला महित आहे तू खवैया आहेस म्हणुन.”

  “ काका, आबांनी काय आमचे सगळे पंचांग सांगितले की काय तुम्हाला ?” नील

 “ अरे, आम्ही जरी खुपदा भेटलो नाही तरी फोनवर बोलल्याशिवाय चैन पडत नाही आम्हाला. आमचं इथलं सगळं त्याला माहित आहे आणि मला तुमची सगळी माहिती आहे.” डोळे मिचकावत काका म्हणाले. जयाकाकूंचा आग्रह चालू होता. गप्पा विनोदामधे जेवणं आटोपले. घरच्यांची पानं वाढायला स्वरूपाने मदत केली. कामवाल्या बायका सगळी कामं आवरून जेवायला बसल्या. सकाळीच सगळे उठले असल्याने आता पेंग यायला लागली होती. आतल्या मोठ्या खोल्यांमध्ये जाजम टाकून एका खोलीत पुरुष सुस्तावले, आणि दुसऱ्यात बायका. जयाकाकू, स्वरुपाच्या बोलण्याला खंड पडत नव्हता. एवढ्या त्या दोघी एकजीव होऊन गेल्या होत्या. हळुहळू सगळे झोपले.

   राघवांना जाग आली तेव्हा हॉलमधे आबा, काका, आणि प्रकाशकाकांच्या गप्पा चालू असल्याचे त्यांना कळाले. किती हौशी, प्रेमळ, हसतमुख आहेत प्रकाशकाका. लहानपणी त्यांना एकदोनदा पाहिल्याचं आठवत होतं. पण ते ही अंधुकच. आता पुढे मागे पहायचे नाही. निर्णय घेऊन टाकायचा. जे जसं होईल तसं बघू. नाहीच जमलं तर गाजरची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.  फार्म हाऊस असलेल्या जमिनीची किंमत कधीही जास्तच येईल. आपलं स्वप्न पुर्ण करायचा प्रयत्न तर करूया. राघवयांच्या मनाने आता उभारी घेतली. आधीची मरगळ पुर्ण जाऊन ते ताजेतवानेपणाने उठून बाहेर आले. तसे आबा त्यांना म्हणाले “ राघवा, दमला का रे ?”

  “ नाही आबा. मस्त झोप झाली.”

  “ आता घ्या कडक चहा.” जयाकाकुनी लगेच त्यांच्या समोर चहाचा कप समोर केला.

  “ राघवा, प्रकाशने राकेशला फोन करून विचार विनिमय केला. २८ लाखापर्यन्त तो म्हणतो आहे. तुझं काय म्हणण आहे ?”

  “आबा, यातलं तुम्हाला जास्ती कळतं. तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य आहे.”

  “ ठीक आहे. जमीन चांगली आहे. माझं जरी वरचेवर येणं झालं नाही तरी प्रकाशच्या सल्ल्याप्रमाणे तुला इथे खुप काही करता येईल. तो खुप उलाढाली माणुस आहे. फोन तर आपले चालुच असतात. एकदा मुलांचा कल घे आणि मला सांग.”

  “ ठीक आहे आबा.” राघव

  “ सगळ्यांचा चहा तिकडच्या खोलीत पाठवून देते. तुम्हाला निवांत बोलताही येईल.” जयाकाकू तत्परतेने म्हणाल्या. वसुधा त्यांची सुन कप घेऊन जातच होती तेव्हढ्यात राघव म्हणाले मी नेतो. वसुधाने हसतच ट्रे त्यांच्याकडे दिला. बाबा चहाचा ट्रे घेऊन आलेले पहाताच नील पुढे झाला. सगळ्यांना कप देऊन आपणही त्यांच्यात सामील झाला.

  “ मंडळीनो, आता जरा तुमची मतं सांगा.” आबानी सांगितलेलं मुलांच्या कानावर घालुन राघव म्हणाले.

  “ बाबा, माझ्या मते तर काहीच हरकत नाहीये. निसर्गरम्य जागा आहे. कधीही तेजीतच राहिल.”

  “ बाबा, माझ्या मित्रानेही कागदपत्र बघितले. सगळं क्लिअर आहे. रिसॉर्ट करण्यायोग्य जागा आहे. यात पैसाही भरपुर मिळतो. अस्मिताही काही उद्योगधंदा करून बघायचा म्हणतीये तर तिलाही तुमच्या मदतीने काही करता येईल. मुख्य म्हणजे प्रकाशकाकांच कुटुंब पाहिलं आणि आम्ही सगळेच निर्धास्त झालो. खुप काही करू शकतो आपण इथे. मधुर.

  “ मला तर बाई अगदी मोकळं, निवांत वाटतय इथे.” स्वरूपाच्या या उद्गारानी राघवांना खुप बरं वाटलं. जानकी, अस्मिता तर काय काय बेत ऐकवू लागल्या. मग मात्र राघवांनी त्यांना थांबवलं.

  “तर मुलांनो, आता आपला निर्णय झाला. चला आपण सगळं फायनल करून टाकू.” हॉलमधे गेल्यावर राघवांनी आबा व प्रकाशकाकांना त्यांचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले.

  “ राघव, राकेश डिसेंबरमधे येणार आहे. तेव्हा आपल्याला खरेदीखत करता येईल. तोपर्यंत तू ही तिकडची कामं संपव. कारण एकदा इकडचं चक्र सुरू झालं की तू पुरता अडकशील. खरेदीखत झालं की लगेच घर बांधायला सुरवात कर. डिसेंबर ते मे एव्हढ्या वेळात तुझं घर आरामात तयार होईल. घरकामावर लक्ष ठेवता ठेवता दुसरीकडे जमिनीची प्रत सुधारायचे आणि विहीर दुरुस्तीचेही काम करून टाकता येईल.”

  “ प्रकाशकाका, पण इतक्या लवकर घर कसं बांधून होईल ?”

  “ मधुर, इथली घरं जांभ्या दगडातली असतात. सिमेंट विटांनी पण बांधतात, पण जांभ्या दगडातली घरं मजबुतीला फार चांगली असतात. दगडांमुळे घरात थंडावा रहातो. कोकण कायम दमट, घामट, गरम असतं. त्यात समुद्र जवळ असल्याने ते जास्त जाणवतं. त्यामुळे इथे दगड वापरतात. एखाद्या महिन्यात तुझं घर आकाराला येईल बघ. पावसाळ्याच्या आत तुझं तयार घर आणि मशागत करुन पिकं लावणीसाठी जमीन दोन्ही तयार होईल बघ.”

   “ ग्रेट काका. तुम्ही म्हणजे ना सगळं एकदम जुळवूनच आणलं. आम्हाला पुर्ण दिशा दिलीत. एकदा दिशा मिळाली की काम करणं सोपं जातं.” नील कौतुकाने म्हणाला.

   “ नील, दिशा ठरवून आपणच चालायचं असतं. पण कामं नेहमी सरळ होतील असं धरुन चालायचं नाही. माझ्या वरच्या बांधकामाच्या वेळेस बीम वगेरे सगळं तयार करून स्लॅब अर्धा घालुन झाला आणि पाऊस आला. अशा वेळेस स्लॅब वाहून जाण्याची किंवा कच्चा राहण्याची, भेगा होण्याची भीती असते. पण ते काम अर्धवट थांबवता येत नाही. मग सगळा पैसा वाया जाऊ शकतो. टेंशन रहातं ते वेगळच. पण तेव्हा पाऊस लवकर थांबला. स्लॅबवर प्लॅस्टिक टाकून त्यात पाणी जाऊ नये म्हणुन प्रयत्न केले. ते पुर्ण झालं, तर नंतर जांभ्या दगडाचा तुटवडा पडला. किती महिने वर नुसतं छत आणि खाली मोकळं अश्या स्थितीत घर राहिलं.”

  “ अरे बापरे.” नील, मधुर चिंतातूर झाले.

  “ अरे, आपली कामं कुठे अडतात का ? आणि राघवला रहायला ते समोरचं घर आहेच ना. शेतीचं काम तर सुरूच करता येईल. याच प्रकारच्या अडचणी येतील असं काही नाही . त्यांचं रूप दुसऱ्या प्रकारचही असू शकतं.”

  “ अगदी बरोबर आहे काका. यालाच म्हणतात अनुभव.”

  “ राघव, तुझ्या बाग लागवडीच्या वेळेस मी इकडे येईन. मग परत गावाकडे जाईन. पिकं वर येऊ लागतात तेव्हा वासूला मदत करेन. म्हणजे दोघांचेही काम होईल.” आबा.

  “ मी पण शनिवार, रविवार चक्कर मारू शकेन.” मधुर म्हणाला.

  “ चला तर मग, आता सगळं फायनल झालं. आता तोंड गोड करूया. नरेश पेढे घेऊन ये. आपल्या घरी तयार केलेले पेढे आहेत.”

  “ काय सांगता काका.” अस्मिता जरा सावरून बसली, कारण ही तिच्या प्रांतातील गोष्ट आली होती.

  “ अगं, शेती म्हंटलं की याबरोबर चार उद्योगधंदे येतात. तुम्ही अजुन आमचं घर पुर्ण पाहिलेलं नाही. बाहेरचा भागही पाहिलेला नाही. शेती बरोबर गुरंढोरं ही येतात. मग दुधदुभतं येतं. दुध उत्पन्नाचे प्रकार येतात. उद्या सगळं दाखवतो तुम्हाला.” प्रकाशकाका म्हणाले.

   आता सगळ्यांचाच इंटरेस्ट वाढत चालला होता. गावाकडे जरी शेती होती तरी राघव सोडून कुणाला काही त्याबद्दल फार काही माहित नव्हते. मुलांना खुल जा सीम सीम सारखं गुहा उघडून एक एक दालन उघडतय असं वाटत होतं. नरेश पेढे घेऊन आला. अप्रतिम चव. प्रत्येकाने अजुन एक उचललाच. लहान मुलांनी तर तावच मारला. मग बाकीच्यांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. बायकांनी मदतीला म्हणुन स्वैपाकघराकडे मोर्चा वळवला. मुलं ओसरीवर टांगलेल्या मोठ्या चौसोपी झोपाळ्यावर खेळायला गेले. संध्याकाळ कधीच सरून गेली होती. तासाभरात घरात खाद्यपदार्थांचे दरवळ सुटले व पानं घेतली आहेत, चला जेवायला. अशी हाक ऐकू आली. जयाकाकुनी मधुरला आवाज दिला. “ मधुर, ये . आता तुला जाईपर्यंत कोंकणी पदार्थ खाऊ घालणार आहे.”

   “ वा, काकू मजाच.” त्यानेही भरभरून दाद दिली. जेवणात भात, अळूच फदफदं, पोह्याचा पापड, आणि खांडवी होती. सकाळची जेवणं उशिरा झाल्यामुळे रात्रीचा बेत आटोपशीर पण रुचकर होता. तांदूळ, गुळ व नारळापासून केलेला खांडवी पदार्थ सगळ्यांना खुपच आवडला. लगेच जानकी, अस्मिताने त्याची रेसिपी विचारून घेतली.

       जेवताना प्रकाशकाका म्हणाले “ मुलांनो, सकाळी लवकर उठायचं बर का. आपण उद्या समुद्रावर जाणार आहोत.”

   लहान पोरांपासून मोठ्यांपर्यन्त सगळ्यांनी गलका केला. प्रकाशकाकांच्या पुर्ण कुटुंबानी आम्ही पण येणारचा नारा केला. मग त्यात अगदी जयाकाकुही मागे नव्हत्या. चहा घेऊन सकाळी लवकर बाहेर पडायचं आणि नाष्टा बाहेरच करायचा असं ठरलं. आल्यावर काका आपले शेती प्रकल्प दाखवे पर्यन्त जेवायची तयारी होऊ शकणार होती. काकू, काका, नरेश, वसुधा, मुलं हे वाढीव मेंबर बसमधेच येणार असे ठरले. इथून जेमतेम २० मिनिटाचे अंतर मग परत वेगळी गाडी कशाला, आणि मुलं तर एकमेकांना सोडतच नव्हते. बायकांचा वेगळा ग्रुप जमला होता. एकत्रच मजा येणार हे गृहीत होते.

    जानकी म्हणाली “ काकू सकाळी तुमची घाई होईल. आताच थोडी कोरडी स्वैपाकाची तयारी करून ठेवायची का ?”

  “ हो ग. बाई आहे स्वैपाकाला. पण सकाळी घाईच होईल.”

  “ आम्हालाही सांगा काही करायचं असेल तर. मिळून करू लवकर आवरेल.” अस्मिता.

  “ नाही गं.” जयाकाकू संकोचल्या.

    ते पाहून मग स्वरुपानेच पुढाकार घेतला. “ मुलांनो, तुमचा एक जास्तीचा ड्रेस, टॉवेल, समुद्रावर खेळायचे सेट, कॅप सगळं एका छोट्या बॅगेत भरून घ्या. वसुधा, आम्ही खाकरा आणि मुगाचे लाडू आणले आहेत. ते सकाळी आपल्याला चहा बरोबर खाता येतील. मुलांसाठी तिथेही थोडं खायला घ्यावं लागेल.”

   “ हो काकू. थोडा चिवडा करते. म्हणजे बस मधेही खाता येईल.”

   “ वसुधा, मी येते तुझ्या मदतीला. पोहे काढून दे. मी भाजते. तोपर्यंत तू बाकी सामान काढ.” अस्मिता.

     जयकाकूंचाही परकेपणा मग दुर झाला. “ जानकी मला गुळ चिरून देते ? नारळाचा खव करून ठेवला आहे. नील, मधुरला उकडीचे मोदक आवडतात ना, म्हणुन उद्या तेच करणार आहे. मोदकाचं सारण तयार करून ठेऊ. बाकी सगळं स्वैपाकीणकाकू तयार करून घेतील. पुऱ्या तळायच्या वेळेपर्यंत आपण येऊ.” असं म्हणत स्वरुपाला विलायची सोलायला देत त्यांनी खसखस काढून ठेवली. एकीकडे मोठी कढई गॅसवर ठेवून त्यात नारळाचा खव टाकला. साजुक तुपाच्या वासाने घर दरवळून निघाले. गुलाबीसर खव परतुन झाल्यावर त्यात भाजलेली खसखस टाकली. चिरलेला गुळ वाटीने मोजून कढईतल्या गरम सारणावर घालुन ते परतू लागल्या. तसे नील, मधुर स्वैपाकघरात डोकावून सगळ्या बायकांचे चिडवण्याचे हल्ले परतवत त्यांच्याशी गप्पा मारत तिथेच बसून राहिले. त्या वासाने दोघांना अरवळून गेल्यासारखे झाले होते. खाणं आणि अभ्यास त्या दोघांचा वीकपॉइंट. वसुधा, अस्मिताचा चिवडा झाल्यावर त्यांनी स्वैपाकघर आवरून घेतले. जानकीने उद्या लागणाऱ्या पाण्याच्या बाटल्या, वसुधाने दिलेले बिस्किटांचे पुडे, आंबावडी, फणसाचे तळलेले गरे, एका बॉक्समधे भरून ठेवले. बाहेर प्रकाशकाकांनी व नरेशनी गाद्या घालुन सगळ्यांची झोपायची तयारी करून ठेवली होती. अकरापर्यन्त सगळ्यांचं आवरून झालं. उद्या यायला उशिर झाला तरी आता टेंशन नव्हतं. थकलेलं घर लवकरच झोपी गेलं. स्वप्नात प्रत्येकजण समुद्राच्या लाटेवर  तरंगत होतं.

                              .................................................