स्वप्नस्पर्शी - 5 Madhavi Marathe द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वप्नस्पर्शी - 5

                                                                                                   स्वप्नस्पर्शी : ५

        नेहमीच्या सवयी प्रमाणे पहाटवाऱ्याने राघवांना जाग आली. पण आजची हवा कशी वेगळीच जाणवत होती. स्वच्छ. शहराचा कोलाहल इथे जाणवत नव्हता. प्रदूषणाचा गंध नाही. स्वच्छ, आल्हाददायक हवेत एक असीम शांतता भरुन राहिली होती. निसर्ग अजुन अस्फुट जागृतावस्थेत होता. राघवांना पहाट अंगावर घेत, पडून रहायला फार आवडायचं. ते शांतता अनुभवत राहिले. हळुहळू वेळ जाऊ लागला, तसतसं पहाटेचं रुप बदलू लागलं. निसर्गाला शब्द फुटला. पक्षांच्या वेगवेगळ्या सादाने त्यांना रहावेना. ते उठून बाहेर आले तोच समोरच्या दारातून आबा, काका, आणि प्रकाशकाका आत येताना दिसले. तर जयाकाकू स्वैपाकघरातून चहा घेऊन येताना दिसल्या.

    उठलास राघवा, ये चहा घे म्हणत त्यांनी त्यांच्या हातात कप दिला.

   “ आबा, तुम्ही इतक्या पहाटे कुठे गेला होता ?” राघव

   “ अरे ! हाडाचा शेतकरी आणि निसर्ग ज्याला आवडतो, तो कधीच या वेळेला झोपून राहू शकत नाही. अंधारातून प्रकाशाकडे जाताना निसर्गाच कलावंताचं रुप पहायला मिळतं. ते सर्व अनुभवताना परमेश्वराची अनुभूती येते. अत्यंत उत्साहाची ही वेळ कामाला पण चांगली असते.” आबा

   राघव त्या म्हाताऱ्यांमधलं चिरतारुण्य पहात राहिले. “ लवकरच तुलाही यातली रहस्य कळायला लागतील. उठलात का रे सगळे ?” प्रकाशकाका आवाज देत म्हणाले.

   मोठे तर उठून आपलं आवरत होते. लहाने बिछान्यात लोळत पडलेले. काकांचा आवाज ऐकताच ते ही बाहेर आले. आपापल्या आजोबांच्या मांडीवर विराजमान होऊन त्यांच्या कुशीत मायेचं सुख अनुभवत राहिले. त्या मायेच्या स्पर्शसुखाची गरज लहानांप्रमाणे म्हाताऱ्यांनाही होती. थोडा वेळ त्यांना थोपटून मग काकांनी चला आटपा, समुद्रावर जायचय ना म्हंटलं की मुलं एकदम उल्हासाच्या मुड मधे आली. आई वडिलांच्या मागे धोशा लावून पटकन तयार होण्यासाठी त्यांना सतावू लागली. समुद्रावर जायचे असल्याने कुणीच आंघोळी करणार नव्हतं. सगळ्यांचं आवरून होत आलं, तसं बायकांनी हॉलमधे खाकऱ्याचे पुडे, लाडू, नारळबर्फी, खजुर, कापलेली फळं, आणून ठेवली. जयाकाकूनी स्वैपाकीणकाकुंना सगळं समजावून सांगून त्यांना खायला दिले. मग त्या हॉलमधे आल्या.

   प्रकाशकाकांनी व्हरांड्यात एकत्र करून ठेवलेले सामान, मोठ्या वॉटरबॅग बसमधे नीट मांडून ठेवल्या मग ते खायला बसले. मुलांचे खाणे झाले तसा त्यांचा आतबाहेर दंगा सुरू झाला. स्वैपाकीणकाकुंनी दिलेला चहा घेऊन एकेकजण बसमधे बसू लागले. शेवटी गड्यांना, बायकांना सुचना देऊन काका काकू बसमधे येऊन बसले. बस चालू झाली. सगळेजणं आपापले मित्रमंडळ पकडून बसले होते. आबांजवळ नील बसला होता. त्या दोघांची बरीच जवळीक होती.  तो लहान असताना आबांकडे दर सुट्टीत जायचा. मधुर मात्र या सुखाला वंचित राहिला. मधुरच्या जन्मानंतर राघव बदली, बढत्या, वाढती कामं यात खुपच बिझी झाल्यामुळे गावाकडे जाणे येणे कमी झाले. नीलही तोपर्यंत मोठा झाला होता. मग त्यांची शिक्षणाची महत्वाची वर्ष यामुळे स्वरूपाचेही गावाकडे जाणे कमी झाले होते. आता नीलचे अमेरिकेत जायचे दिवस जवळ येऊ लागले की तो तसा अस्वस्थ होत असे. आबांच्या जवळकीने त्याला बरे वाटायचे. ही अवस्था आबांनी ओळखली होती. त्यांनीही नीलशी आज दिवसभरात बोलायचे ठरवले. बसमधे तो विषय बोलण्यासारखा नव्हता. जयाकाकू, स्वरुपा भावी शेजारीण एकमेकात रमल्या. वसुधा, अस्मिताची जोडी जमली होती. राघव, प्रकाशकाका व काका बोलत होते ते ऐकत होते. मधुर, त्याचा मित्र व जानकी प्लॉटच्या कागदपत्रांविषयी बोलत होते. जानकी सी.ए. असल्याने या सगळ्याची तिला जाण होती. नरेशचा बालगोपाळांमध्ये धिंगाणा चालू होता. जेमतेम २० मिनिटांचा रस्ता. चुटकीसरशी पार पडला. एका मोठ्या जागेवर बस लावली. दोन वाड्यांमधुन चालत गेलं की समुद्र. प्रत्येकानी एकएक बॅग घेतली. ड्राइव्हर शेजारी बसलेल्या गड्याने पाण्याचे कॅन घेतले. समुद्राच्या ओढीने सगळे उत्साहात भराभर चालू लागले. राघवांचे निरीक्षण चालू होते. कौलारू घरं, त्याला लागून नारळा पोफळींची वाडी खुप ठिकाणी दिसत होती. 

    काही अंतर चालल्यावर समुद्राची गाज एकू येऊ लागली. हळुहळू तो आवाज मोठा होत गेला व एकदम उफाळलेला समुद्र सामोरा आला. एक आनंदाचा कल्लोळ आपल्या आतूनही उसळल्याचं राघवांना जाणवू लागलं. सुर्योदय होऊन गेला होता. निळ्याभोर अथांग आकाशाच्या पार्श्वभुमीवर लाटांनी खेळत असलेला समुद्र, एक हलतं चित्र असल्यासारखां भासत होता. मुलं पाण्याच्या दिशेने धावली. त्यांना आवरायला बाकीचे पुढे सरसावले. कपड्यांचा ढीग एका ठिकाणी रचुन सगळेच पाण्यात खेळू लागले. मागून आलेल्या गड्याने कपड्यांच्या जवळ खाण्यापिण्याच्या सामान आणले आणि तो तिथेच बसून राहिला.

    जेष्ठ मंडळी जिथे लाटा येत होत्या तिथे पाण्यात पाय पसरून बसले. त्या नैसर्गिक स्पर्शाने त्यांच्या चित्तवृती फुलून आल्या होत्या. वसुधा, अस्मिता, जानकी एकमेकींचे हात पकडून अंगावर फुटणाऱ्या लाटेसरशी ओरडत, आनंदाने डवरून जात होत्या. मुलांचा उत्साह तर त्या लाटांसारखा खळाळता होता. त्यांना आवरता आवरता नरेश, नील, मधुर स्वतःही डुंबून बायकांच्या अंगावर पाणी उडवत होते. हळुहळू त्याही सागराच्या मस्तीत ओढल्या गेल्या. खाऱ्या पाण्याच्या चवीने तोंड वेंगाडत अधुन मधुन मुलं किनाऱ्यावर जाऊन पाणी पिऊन येऊ लागली. प्रत्येक लाटेत पुर्ण भिजून गेलेल्या त्या कुटुंबाला सध्या जगाचं भान नव्हतं.

    तीन पिढ्यांचा कल्लोळ पहाताना निसर्गही आनंदला असावा. उन्ह वर चढू लागली, तसं काकांनी चला चला पाण्याबाहेर या अशी बोलवायला सुरवात केली. मुलं आणि बाकीचे बाहेर येईपर्यंत ते तिघं लांब फिरून आले. स्वरुपा आणि जयाकाकुनी मोठी सतरंजी वाळूवर पसरवून खाण्याचे डब्बे एका बाजूला काढून ठेवले. एकेक जण येईल तसे त्यांचे अंग पुसून देऊ लागल्या. मुलं वाळूत किल्ला, खोपे करत बसले. वाळूतून लांबवर फेरफटका मारुन बाकीच्यांनीही आपले कपडे कोरडे केले. कुठे आडोसा नसल्याने आणि बदललेल्या कपड्यांना परत वाळू लागणारच त्यामुळे कुणी कपडे बदलले नाही. वाळू आणि खार्या पाण्याने अंग चरचरत होती. चिवडा, लाडू, फळांच्या मोठया भरलेल्या प्लेट्स सगळ्यांच्या मधे ठेवल्या आणि मोकळ्या हवेने व इतका वेळ पाण्यात खेळल्यामुळे भुकेजलेले त्यावर तुटून पडले.

     “ थोडी भूक ठेवा. आपल्याला दहा मिनिटातच नाष्टा करायचा आहे.”

   पण त्यांचं म्हणणं कुणी ऐकायच्या मनःस्थितीत नव्हतं. क्षुधाशांती नंतर फोटो काढायचे राहिले हे मधुरच्या लक्षात आलं. मग नाना एंगल्सनी निसर्गाचे, नात्यांचे फोटो काढले गेले. हसणे, गप्पा यांना ऊत आला होता.

काकांचे चला चला वाढले तसे मग एकेक जण उठू लागले. ओल्या कपड्यांच्या बॅगा, खाण्यापिण्याचे सामान आवरले गेले. आजोबांच्या अवतीभवती धावत मुलं बसच्या दिशेने व मागून बाकीजणं समुद्राजवळ मन रेंगाळत ठेऊन येऊ लागले. बस सुरू झाल्यावर प्रकाशकाका ड्राइव्हरपाशी बसून त्याला गाडी कुठे घ्यायची तो रस्ता दाखवू लागले. दहा मिनिटातच बस एका रिसॉर्टपाशी थांबली. प्रकाशकाकांना पहाताच आतून दोन तरुण बाहेर आले. त्यांच्या चेहेऱ्यावरून आनंद ओसंडत होता. काकांनी सगळ्यांची ओळख करून दिली.

  “ मधुर, हे दोघ भाऊ विश्वास,आणि रुपेश. पुण्याहून इथे आले आहेत. हे रिसॉर्ट त्यांनी डेव्हलप केलं. रहायची, खायची सगळ्याची अगदी छान सोय केलीये. असच तुझ्याही मनात आहे ना ?”

     मधुर हे सगळं पाहून हरखुन गेला. पार्किंगची सोय, पुढे रंगीबिरंगी बगिचा. मुलांची खेळण्याची सोय, एका बाजूला स्विमिंग पूल, दुसऱ्या बाजूला कोकण दर्शन पुतळ्यांच्या रूपात उभं केलं होतं. रुपेश त्यांच्या नाष्टयाची सोय करायला आत गेला, आणि विश्वास रिसॉर्ट दाखवू लागला. मागच्या बाजूला एकीकडे आमराई होती आणि एकीकडे काजू, नारळ, फणस, केळी सुपाऱ्या लावल्या होत्या. पुर्ण कोकणात साधारण असेच चित्र पाहायला मिळते. विश्वासने तिथल्या रूम्स उघडून दाखवल्या.

     आधुनिकतेने सजलेल्या एसी, नॉन एसी रूम्स कलात्मक होत्या. विश्वास सांगत होता त्याच्या आजोबांची जमिन कितीतरी वर्ष पडून होती. हे दोघे भाऊ इंजिनीअर, नोकरीच्या संदर्भात जेव्हा ते इकडे आले तेव्हा इथल्या निसर्ग सौंदर्याच्या प्रेमातच पडले. मग दोघांनी काही वर्ष नोकरी करून पैसा जमवला. हळुहळू जमिन डेव्हलप केली. सीझनमध्ये एकही रूम रिकामी नसते. दोघा भावांपैकी एकेक जण आलटून पालटून इथे रहातात. त्यांचे तीन रूमचे कॉटेज व बाकी सिंगल रूम होत्या. दिवसाला भाडं हजार म्हणजे दर दिवसाचे दहा हजार शिवाय नाष्टा, जेवण, रात्रीच्या पार्ट्या करणारे, सेमिनार हॉलचे भाडे येते ते वेगळेच.

   असा सीझनमधे जवळपास पंचवीस हजाराचा दिवसाला बिझनेस होता. मधुरचे मनात कॅलक्युलेशन सुरू झाले. मेन्टनस व गड्यांचे पगार जावून नेट पन्नास हजार प्रॉफिट मिळत असेल. शिवाय वाडीचे उत्पन्न वेगळेच. राघव, मधुर एकमेकांच्या मनातले भाव ओळखून हसले. रुपेश नाष्टा तयार आहे हे सांगत आला तसे सगळे डाइनिंग हॉलमधे आले. गुळगुळीत फरशांवर लाल जाजम, वर झुंबरं, कोपऱ्यातून केलेल्या लाइट इफेक्टसनी तिथले पेंटिग उठावदार दिसत होते. मोठी पामची झाडं, मंद मधुर संगीताने वातावरण आल्हाददायक केलेलं.

    मोठ्या टेबलावर बसताच वेटर्सनी केळीच्या पानावर लोणचे, नारळाची चटणी वाढली. आतून एका भांड्यातून वाफाळलेले घावन आणि द्रोणामध्ये गोडसर मणगणे वाढले गेले.

    “ हा आमचा कोंकणी नाष्टा. मुलांनो याला काय म्हणतात माहित आहे का ?” रुपेश

   “ डोसा” या मुलांच्या उत्तरावर रुपेश म्हणाला “ याला घावन म्हणतात. डोसा मोठा आणि कुरकुरीत असतो. हा तर छोटा आणि मऊ आहे.”

   “ हे काय आहे ?” द्रोणाकडे बोट दाखवत जानकीने विचारले.

   “ हे मणगणं आहे. हरबऱ्याची डाळ, साबूदाणा, नारळाचं दुध, गुळ विलायची घालुन हे करतात.” जानकीला ते खुपच आवडलं. तिनी लगेच रेसिपी विचारून घेतली.

   “ तुम्ही चहा, कॉफी घेणार की कोकम सरबत, सोलकढी, पन्ह ?” रूपेशने विचारले.

   “ आता तर छान चहा हवा बुवा आपल्याला.” भिजल्यावर सगळ्यांनाच चहाची तल्लफ आली होती. गरमागरम घावन खाऊन होताच वाफाळलेला आलं घातलेला चहा समोर आला. सगळे तृप्त झाले. काकांनी काउंटरकडे होरा वळवलेला पहाताच नील पुढे गेला व त्यांना अडवत त्याने बील भरले. विश्वास, रुपेशचा निरोप घेऊन सगळे बसमधे बसले. “ वा काका, हे तर तुम्ही टु इन वन केले. मजाही झाली आणि बिझनेस टुरही.” मधुर.

  “ आवडलं ना ?” म्हणत काका हसले. दहा मिनिटांतच घर आले. कचकचलेल्या शरीराने खाली उतरल्यावर सगळ्यात आधी आंघोळीला कोण जाणार यावरून दंगा सुरू झाला. तेव्हा जयाकाकुनी चौघांना चार बाथरूम मधे पिटाळले. कपडे धुवायला टाकून आधी बायकांनी आंघोळीला नंबर लावला. पुरुषांचे आवरुन होईपर्यंत होईल तेव्हढी मदत करुन नंतर काकांबरोबर त्यांच्या शेतात जायला तयार झाल्या.

   परसदारपासून त्यांची वाडी तर सुरू होत होती. पण भातशेतीची जमिन होती तिथे जायला दहा मिनिटे लागली. वर्षातून दोनदा भातशेतीचं पीक घेता येतं. त्यांच्या शेताजवळून कालवा जात होता. लालसर काळ्या मातीतून ते हिरवे लवलवणारे, डुलणारे पाते पाहून मनं हरखुन गेली. शेताच्या एका बाजूला कौलारू शेड केलेली होती. त्यात गाई, म्हशी बांधलेल्या. एक छोटे कौलारू घर, तिथे शेतीची कामं, राखण, व गाई म्हशींची देखभाल करायला एक कुटुंब रहात होतं. घराच्या एका बाजुला मोठी खोली होती. तिथे बऱ्याच कच्च्या केळी, फणस,बटाटे पडलेले. चुलाण्यावर मोठी कढई, तेलाचे डब्बे, मोठे ट्रे, पेपर्स, पॉलिबॅगचे बंडल, रॅकमध्ये मीठ, काळी मिरी, तिखट चाट मसाल्याच्या बरण्या मांडून ठेवलेल्या होत्या. काकांनी सांगितले इथे वेफर्स तयार करण्याचे यूनिट चालू केले आहे. दुध घरी लागेल तेव्हढं ठेवून बाकी विक्रीला जातं. कधी तूप, पेढे करूनही विकतो. जमेल ते करत रहातो. प्रकाशकाकांचा कामाचा आवाका पाहून सगळेच भारावून गेले.

    “ काका, तुमचं गोदाम कुठे आहे ? ते दिसलं नाही.” नील.

    “ अरे ते आपल्या बंगल्यातल्या तळघरात केलं आहे. तिथेही एक खोली आहे त्यात सुपाऱ्या तयार करायचं काम चालतं.”

    “ काका, मला पहायचं आहे सुपारी कशी तयार करतात ते.” अस्मिता म्हणाली.

   सगळे त्या तळघरातल्या खोलीत गेले. तिथे पाडाला आलेली फळं जमा करून त्याच्या सुपाऱ्या कशा तयार करतात हे सांगायला सुरवात केली. “ सुपाऱ्या दोन प्रकारांनी करता येतात. एक पद्धत म्हणजे कच्च्या सुपारीचे टरफल काढून त्याचे तुकडे करतात किवा तशीच अखंड सहा सात आठवडे सुकवून ती बाजारात पाठवतात. दुसऱ्या प्रकारच्या प्रक्रियेत त्यातील टॅनिन व बुळबुळीतपणा बराच कमी होतो व ती नरम बनून चघळण्यास सोपी जाते. पोफळ्यांचे तुकडे करून ते काप आदल्या वर्षातील उकळून राहिलेल्या अर्काच्या मिश्रणात दीड ते तीन तास उकळत ठेवतात. ते तुकडे काहीसे खोलगट झाले की उकळणे बंद करून झाऱ्याने सुपारी बाहेर काढून सहा ते नऊ दिवस सुकवतात. पाण्यातला सुपारीचा अर्क परत साठवून पुढच्या वर्षीच्या प्रक्रियेसाठी वापरला जातो. सुगंधी सुपारी तयार करताना त्यात विशिष्ट मसाला घालतात. सुपारीला चमक येण्यासाठी त्यात थोडे तिळाचे तेल आणि गुळही टाकतात. इथे खोबऱ्याचं तेल काढणही चालतं. शेतकऱ्याच्या कामाला उसंत नसते. जेव्हढं वाढवाल तेव्हढं वाढतच जातं. फणसाच्या, आंब्याच्या पोळ्या, वड्या, कोकम सरबत, नारळाच्या वड्या, पोह्याचे पापड, सांडग्या मिरच्या ते तयार करायचं काम जया आणि वसुधाचं. त्यांच्या हाताखाली चारजणी आहेत. सध्या तर आम्हाला इथलीच बाजारपेठ पुरते. विश्वासच्या रिसॉर्टमधे आपला एक खाद्यपदार्थांचा कॉर्नर आहे. तिथेही खुप रिस्पॉन्स मिळतो. लोकांनाही रोजगार मिळतो, आपणही कामात रहातो. त्यामुळे तन मन दोन्ही फीट. नरेश स्टेट बँकेत आहे. त्याच्या तिथूनच थोडं लोन घेतलं आणि घरगुती उद्योग सुरू केले.”

   काकांचं बोलणं आणि उद्योग पाहून पुणेकर थक्क झाले. बाजूच्या खोलीत खतं, भातकापणीच यंत्र, कच्चा माल, शेतीउपयोगी सामान ठेवलं होतं. हे सगळं पाहून राघव, नील, मधुर यांच्या मनात बरेच आराखडे उभे राहिले. आबांना हे नवीन नव्हते. शेतीविषयक अस्मिताच्या मनातही काही कल्पना उभ्या राहिल्या. जानकीचं पैशाच क्षेत्र होतं ती त्या दृष्टीने विचार करू लागली. आपापल्या विचारात सगळे घरी परतले.

   शेतावरून ते आलेले पाहून बाईनी पटापट पानं मांडली. सगळ्यांना भूका लागल्या होत्या. वसुधाने वाढायला घेतले. उकडी मोदकाच्या गोडसर, खमंग वासानी घर भरून गेलं होतं. हातपाय धुवून मंडळी पानावर बसली. पुरी, बटाट्याची भाजी, लाल भोपळ्याचं रायतं, मसालेभात, कढीढोकळा नारळाची चटणी वाढून मोदकावर तुपाची धार धरत जयाकाकू म्हणाल्या “ गरम गरम मोदक खा रे आधी.” तृप्त मनाने वाखाणणी करत जेवणं चाललेली. सगळ्यांची जेवणं झाल्यावर चार वाजेपर्यंत निघालं की रात्री दहा अकरा पर्यन्त घरी पोहोचता येणार होतं. जयाकाकुनी रात्रीचा डब्बापण दिला. त्यांचा आग्रह मोडणं अवघडच झालं होतं. शेवटी कोंकणी मेवा देऊन काकूंनी बायकांची ओटी भरली. प्रकाशकाकांनी मोठी किटली साजुक तुप आणि खोबऱ्याच्या तेलाची बाटली व त्यांच्या प्रॉडक्टचे केळी, बटाटे वेफर्स दिले. काका, आबांची गळाभेट पहाण्यासारखी होती. आबा इथे रहायला येणार होते तेव्हा काय काय गंमती करायच्या ह्याचे प्लॅनिंग झाले होते त्यामुळे दोघेही खुष. राघव पुढील गोष्टींच्या आढाव्यासाठी सतत काकांच्या संपर्कात रहाणार आणि स्वरुपा अस्मिता जयाकाकू व वसुधाच्या संपर्कात रहाणार असे ठरले. जानकी पुर्ण आर्थिक नियोजन करून देणार होती. भरल्या मनाने आणि बॅगांनी सगळे बसमधे बसले. सर्वांनी एक अतुट ऋणानुबंध जोडला होता. राघवांची हिरव्या स्वप्नाकडे वाटचाल सुरू झाली होती.

                                                                                    .................................................