''ये मॅडम हमारे साथ मैं ही हैं, उनका बॅग ले लो.'' त्या जखमी व्यक्तीने त्या मुलीकडे बोट दाखवत सांगितले. तेव्हा तिच्या लक्षात आले की, या सगळ्या गडबडीत तिची ट्रेन निघून गेली आहे. सुटलेली ट्रेन बघून ती मटकन तीथेच श खाली बसली होती. ट्रेन तर निघून गेली होती. मागे काही अंतरावर बेशुद्ध होवून पडलेले ते चार गुंड केव्हाही शुद्धीवर आले असते. या विचाराने तिला अजून धडकी भरली. तिला मागे बघण्याचेही धाडस होईना. ती उठून त्या जखमी तरुणाच्या मागे चालू लागली.
'हॉटेल कोकोनला आल्यावर ती मुलगी थोडी रिलॅक्स झाली. ते दोन सफेद कपड्यातील इसम त्या जखमी तरुणाला तिथे सोडून गेले. आणि पाच मिनिटात एका डॉक्टरला घेऊन तिथे आले.'
''डॉक्टर साहाब जो भी इलाज कारवाना हैं, वो इधर ही होना चाहिये. इस्पिताल मे नही जा सकते, जो जो चीज लगती हैं वो सब आपको ला के देंगे.'' त्यापैकी एक म्हणाला.
''फारुख सेठ, मॅडम को भी मलमपट्टी करावा दो. डॉक्टर साहब को बोलो.'' तो जखमी तरुण बेडवरून सांगत होता. त्यावरून त्या तरुणीच्या लक्षात आले कि त्या सफेद कपडे घातलेल्या व्यक्तीपैकी जो सावळा असा बुटका व्यक्ती आहे, त्याच नाव फारुख होत.
''जी सर.'' तो फारुख सेठ म्हणाला.
''मंग्या पाणी देतो का रे?'' त्या जखमी तरुणाने दुसऱ्या सफेद कपड्यातील गोऱ्याशा बुटक्या माणसाला मंग्या म्हणून आवाज दिला. तसे त्याने पाणी आणून त्याच्या साहेबाला दिले. त्यावरून त्या तरुणीला दुसऱ्या व्यक्तीचे नाव समजले आणि जखमी माणूस महाराष्ट्रीयन आहे हे देखील समजले. कारण तो मराठी मध्ये बोलत होता. डॉक्टरानी आपली बॅग आणि स्टेथोस्कोप काढून त्या जखमी तरुणाला चेक केले. जखमेवर तिथेच उपचार सूरू केले. छोटंसं ओपरेशन झालं, चार टाके मारले गेले होते. पण टाके घालताना त्यांना बेशुद्ध करावे लागले. तरीही वेदना असह्य झाल्याने त्याची आरडा ओरड सुरूच होती. शेवटी तो तरुण बेशुद्ध पडला आणि डॉक्टर काही सूचना देऊन आपले काम करून निघून गेले. जाता जाता त्यांनी त्या तरुणीची जखम पहिली आणि त्यावर मलमपट्टी केली. काही पथ्यपाणी सांगितले होते, औषधे आणि त्यांच्या खाण्यासाठी काही सरबत वेगैरे आणण्यासाठी फारुख सेठ नावाचा माणूस डॉक्टर सोबत बाहेर निघून गेला. मंग्या नाव असणारा व्यक्ती तिथेच थांबला होता.
''मॅडम आप थोडा नाश्ता करके, थोडा आराम करो.'' मंग्या त्या तरुण मुलीला म्हणाला.
''मी मराठी आहे, मराठीत बोलू शकता.'' ती तरुणी म्हणाली.
''अरे वाह, साहेब पण मराठी आहेत, आणि मी पण. तो फारुख इथला दिल्लीचा राहणार आहे.'' मंग्या म्हणाला.
''हे तुमचे साहेब आहेत का?'' ती तरुणी त्या जखमी माणसाकडे बोट दाखवत म्हणाली.
''होय, माझे साहेब. मी त्यांचा हाताशी असतो. तुम्ही त्यांना ओळखत नाही का?'' मंग्या तिला पाण्याचा ग्लास देत म्हणाला.
''नाही, ते ट्रेन हल्ल्यामध्ये आम्ही एकत्र सापडलो.'' ती तरुणी म्हणाली.
''होय, साहेबांचं कामाचं असं जोखमीचं, त्यांच्यावर हल्ला होत असतो. पण तुम्ही एवढ्या रात्री त्या स्टेशनवरून प्रवास का करत होता. फार जोखमीचं आहे.'' मंग्या म्हणाला.
''माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. पण ठीक आहे, आता ती ट्रेन कायमचीच चुकली वाटत.'' ती तरुणी खिन्न मनाने म्हणाली. आणि आपला बँडेज केलेला पाय ओढत ती बाथरुमकडे निघाली होती.
''मॅडम तुम्हाला त्रास होत असेल तर काही मागवू काय?'' मंग्या तिला विचारात होता.
''नाही, काही नको.'' ती म्हणाली.
''या रूममध्ये चालेले ना तुम्हाला. मला आता चौकीवर जावं लागेल. आजची रात्र तुम्ही या रूममध्ये साहेबांच्या सोबत थांबू शकता ना ?'' मंग्या आपले चप्पल पायात सरकवत म्हणाला.
''म्हणजे तुम्ही कुठे बाहेर जाताय का?'' ती तरुण जागीच थांबली.
''मी पोलीस चौकीवर कामाला जातोय, साहेबांचं काम आहे, तर मला जावं लागेल. आणि इथे एवढा पाऊस पडतोय कि या रेस्टॉरंट मधले बाकीचे सगळे रूम फुल्ल आहेत. साहेबांच्या सोबत सुद्धा कोणीतरी थांबण्याची गरज आहे, तुम्हाला इथे काहीही त्रास होणार नाही. आजची रात्र थांबा. काय लागलं तर हा माझा नंबर ठेवून घ्या.'' मंग्याने तिला त्याचे कार्ड दिले. 'मंगेश पारधे. त्यावर नाव होते. खाली त्याचा नंबर, त्यावर त्या तरुणीला समजले कि, तो एक पर्सनल बॉडीगार्ड होता. निश्चितच त्या झोपलेल्या साहेबांचा बॉडीगार्ड असणार, तिने ओळखले.
'' थँक्स.'' म्हणत तिने ते कार्ड आपल्या पर्समध्ये ठेवले.
''मॅडम तुम्ही? तुमचं नाव? म्हणजे फोन केल्यावर मी कस ओळखणार? म्हणून विचारल.'' मंग्या थोडा लाजून बोलला.
''मी जुई... जुई . काही गरज लागली तर कळवेन.'' तिने आपले नाव सांगितले पण मुद्दामहून तिने आडनाव सांगितले नाही. हे त्या दोघांनाही समजले.
''ओके, मॅडम, दार आतून लावून घ्या. आणि काही पाहिजे तर हॉटेलमध्ये १०२ नंबरला फोन करा. रात्रीपुरत आमच्या साहेबांवर लक्ष ठेवा.'' म्हणत तो मंगेश बाहेर निघून गेला. तसे तिने खाड्कन दार लावून घेतले. तिला ट्रेनमध्ये तिच्यासोबत घडलेला प्रसंग आठवला आणि तिच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. त्या झोपलेल्या तरुणाकडे तिने एकदा पहिले, तो अजूनही बेशुद्ध होता.
दुसऱ्या रूममध्ये जाण्याचा पर्याय नव्हता आणि तिच्याकडे तेवढे पैसे सुद्धा नव्हते, त्यामुळे तिने आजची रात्र इथेच थांबण्याचे ठरवले. दुसरा पर्याय नव्हता. अशा अनोळखी ठिकाळी, अनोळखी माणसासोबत एका रूममध्ये झोप येणे शक्य नव्हते, ती सोफ्यावरून उठली आणि बराचवेळ खिडकीतून बाहेर बघत ती उभी राहिली. काही केल्या तिच्या डोळ्यासमोरुन प्लॅटफॉर्म आणि ते गुंड जात नव्हते. लोकांच्या घाणेरड्या नजरांची तिला किळस वाटू लागली. एक संकट संपते तोच दुसरे संकट आ वासून समोर उभे राहत होते, उद्या काय करायचं ? परतण्याचे सगळेच दरवाजे जवळपास बंद झालेले होते. उद्या उजाडल्यावरच तिला काय तो निर्णय घ्यावा लागणार होता. खिडकीचे तावदान लावून ती पुन्हा सोफ्यावर आली. हाताला खरचटले होते, आणि त्याला सूज आलेली होती.
अचानक ओढवलेल्या प्रसंगाने तिच्या साडीवर उडालेले ते रक्ताचे डाग आता सुकून गेले होते. ती तशीच साडी अंगावर ठेवणे तिला पटले नाही. त्यात पासवाने ती भिजली होती. त्यामुळे तिला अंघोळ करण्याची खूप गरज वाटली. त्या झोपलेल्या तरुणाकडे तिने एकदा पहिले. त्याला कदाचित सकाळी शुद्ध येईल असे डॉक्टर म्हणाले होते, त्यामुळे त्याची तिला काही भीती नव्हती. आपली बॅग उघडून तिने आतले नवीन कपडे काढले. आणि टॉवेल घेऊन ती बाथरुमकडे गेली. शॉवर घेऊन तिला फ्रेश वाटले. कपडे बदलून तिने एक चुडीदार लांब ओढणीचा ड्रेस घातला आणि येऊन सोफ्यावर पडून ती शांत झोपली.
'सकाळी खूप उशिरा जुईला जाग आली. तिने पहिले की तो जखमी तरुण अजून झोपलेला आहे. तो उठण्याच्या आत ती लगेच उठून फ्रेश व्हायला निघून गेली. ती बाथरूममध्ये असताना त्या जखमी तरुणाला जाग आली होती. उठून त्याने कसेबसे धरून चालत चालत सगळ्या रूमची पाहणी केली. मंगेशलाला फोन करून त्या मुलीची चौकशी केली. त्याच्या जखमेवरील टाके बरे झालेले नव्हते, त्यामुळे त्याला खूप त्रास होत होता. पण तरीही त्याने या तरुणीच्या सामानाची पाहणी केली. तिची पर्स आणि बॅग चेक करून तो पुन्हा येऊन बेडवर आडवा झाला. पोटातून असह्य कळ त्याच्या मस्तकात जात होती. पण एक अनोळखी तरुणी, तरीही आपल्या सोबत एकाच रूममध्ये होती, त्यामुळे त्याला तिचा संशय आला होता. आपली कोणी शत्रू किंवा शत्रूने पाठवलेली गुप्तहेर नाही ना? असे वाटून त्याने तिच्या सामानाची बॅगची केली. पण संशयास्पद काही न आढळण्याला तो निश्चिन्त झाला. पण असे अचानक उठून घाई घाईमध्ये हालचाल केल्याने त्याच्या पोटात खूप दुखू लागले. आणि आता त्याला उठताही येईनासे झाले. पोटावर हात ठेवून तो उपडी पडून राहिला. एका हाताने त्याने नंबर फिरवला आणि मंगेशला फोन करून डॉक्टरला घेऊन यायला सांगितले. झालेल्या हालचालीमुळे कदाचित जखमेवरील टाके ऊसवले असावे. असे त्याला वाटले.'
फ्रेश होवून जुई बाहेर आली होती. आणि तिने त्या तरुणाला असे उपडी झोपून कन्हताना पहिले. तशी ती त्याच्या जवळ आली.
''तुम्हाला त्रास होतोय का? काही हवाय का?'' ती त्याच्याकडे बघत विचारत होती.
''पाणी देता.'' त्याने पलंगाच्या आधाराने उठत सांगितले.
''अजिबात हालचाल करू नका. डॉक्टरने उठायला मनाई केली आहे. मी देते पाणी.'' तिने पाण्याचा ग्लास त्याच्या तोंडाला लावला. एक उशी त्याच्या पाठीमागे ठेवून दिली. आणि आधाराने त्याला पुन्हा मागे झोपवले. थोडं पाणी पिऊन त्याने दीर्घ श्वास घेतला. जखम खूप दुखत होती, हे त्याच्या तोंडावरून समजले. पण ती तरी काय करणार? ती फक्त तशीच उभी राहून त्याच्याकडे बघत होती. त्याने आपले डोळे बंद करून घेतले. आणि आपला फोन पुढे करून तिला डॉक्टरला फोन लावायला सांगितले. ती फोन नंबर डायल करे पर्यंत रूमच्या दाराची बेल वाजली होती. ती चटकन दरवाज्याकडे वळली. पण कालचा रेल्वे स्टेशनचा प्रसंग आठवून जुईला दार उघडायला भीती वाटत होती. हे त्या तरुणाने ओळखले. आणि बाजूच्या ड्रॉवर मधली एक गन काढून त्याने ती हातात घेतली. ही गन कोणाची आणि हा माणूस करतोय तरी काय? तिला कळेना. ती जागच्या जागीच भीतीने थरथरू लागली.
''घाबरू नका, माझी स्वतःची गन आहे ही, सेफ्टीसाठी. लायस्न सुद्धा आहे माझ्याकडे. आधी बघा बाहेर कोण आहे, मगच दार उघड. आणि अनोळखी कोण असेल तर दार उघडण्याआधी मला सांगा.'' तो बेडवरुन उठून बसत म्हणाला. त्याला उठणे शक्य नाही हे तिला माहित होते, हळूहळू पुढे जाऊन तिने होलमधून बाहेर पहिले, बाहेर डॉक्टर आणि मंगेश हे दोघे एका नर्स सोबत उभे होते, मग तिने थरथरत्या हातांनी दरवाजा उघडला. आणि ते आत आल्यावर ती पुन्हा जाऊन सोफ्यावर बसली.
'हा जखमी तरुण नक्की आहे तरी कोण? आणि यांच्याकडे बंदूक कशी काय? आपण फसलो तर नाही ना?'ती विचार करत एक कोपऱ्यात अवघडून बसली होती.
डॉक्टरने तपासून त्याला मेडिसिन्स दिल्या, आणि आतमध्ये आलेल्या त्या नर्सच्या मदतीने खुर्चीवरून त्या जखमी तरुणाला बाथरूममध्ये नेऊन फ्रेश करून पुन्हा बाहेर आणले. डॉक्टर निघून गेले होते, ती नर्स सुद्धा निघून गेली. आणि मंगेशने मागवलेला नाश्टा उरकून त्याचा साहेब म्हणजे तो जखमी तरुण स्वस्थ पडून राहिला.
''जुई मॅडम तुम्ही काहीतरी खाऊन घ्या.'' तो जुई ला सांगत होता. पण तिची नजर अजूनही बेडच्या बाजूला असणाऱ्या गनवर होती. ती अजूनही घाबरलेली होती.
''जुई नाव का? ओके, माझ्या गनला एवढं घाबरण्याची काही गरज नाही. तुम्हाला काही त्रास होणार नाही.'' तो तरुण पुन्हा जुईला म्हणाला.
''साहेबाना परमिशन आहे गनची, त्याशिवाय त्यांचं काम होणार कस? गुन्हेविभागीय अधिकारी आहेत साहेब.'' मंगेश बोलून गेला आणि जुई त्या बेडवर आडवा झालेल्या तरुणाकडे बघत राहिली. आत्ता तिच्या लक्षात आले कि मंगेश ज्याला साहेब म्हणतो, पोलीस चौकी म्हणतो. तर हे त्याचे साहेब पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे तिला थोडं सेफ वाटू लागलं होत.
''जुई तुम्ही महाराष्ट्रीयन आहात ना? कोणत्या ट्रेनची बुकिंग पाहिजे सांगा? म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठे?'' तो तरुण बेडवरुन विचारत होता.
''मुंबई, वाडा... म्हणजे पालघर तालुका.'' जुई थोडं अस्पष्ट आणि घाबरत म्हणाली.
''ओके, सो आपण सोबत जाऊयात. तसेही ते ट्रेनचे बिहारी गुंड तुमच्या मागावर फिरत असणार. आणि माझ्या सुद्धा मागावर इथले काही लोकल गुंड आहेत. तुमच्या सेफ्टीसाठी आणि मला बरं वाटेपर्यंत इथेच थांबूया. आपण उद्याच्या ट्रेनने किंवा फ्लाईटने एकत्र मुंबईसाठी निघू.'' तो बोलला. आणि जुई शॉक झाली.
''माझ्याकडे माझा पासपोर्ट नाही. ट्रेनने जाऊया का?'' जुई म्हणाली.
''ओके, आज थांबू शकता ना?'' मंगेश जुईला विचारात होता.
''होय, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.'' जुई खाली मान घालून म्हणाली.
क्रमश