रिमझिम धून - ६ siddhi chavan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रिमझिम धून - ६

'तिला ओरडून ओरडून त्याला सांगावं असं वाटत होत. 
'लहानपणी एवढ्या आठवणी, एवढे क्षण एकत्र घालवून, आता कसा काय विसरु शकतोस तू मला? मला शोधण्याचा प्रयत्नही केला नाहीस? का? कधी आयुष्यात भेटावसं पण वाटलं नाही, का? मी मात्र तुला शोधत असायचे. वेळ मिळेल, आठवण येईल तेव्हा तुझी माहिती काढत राहायचे. हा माझे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. पण तू ... तू अधिकारी होतास ना? तू कसेही मला शोधून काढू शकला असतास. मुळात इच्छा असायला पाहिजे ना. तुला तर मी आठवत पण नसेन, तू शोधणार काय म्हणा. असो आपण असे अनोळखीच बरे आहोत.'  तो समोर झोपलेला होता, आणि जुई आपल्याच विचारांच्या धुंदीत बडबड करत होती. '

'बाहेरून मोठ्याने विजांचा गडगडाट ऐकू आला, आणि सोसाट्याच्या वाऱ्याने समोरच्या खिडकीची काच धाडकन उघडली होती. त्या आवाज बरोबर ती भानावर आली. त्या आवाजामुळे समोर झोपलेल्या अर्जुनने थोडी हालचाल केली होती. त्याचे डोळे अजूनही बंद होते, ते बघून तिच्या हातात असलेला अर्जुनचा हात विद्युन लहरी प्रमाणे तिने झटकन खाली सोडला. तो उठला तर आपले लाल झालेले डोळे, आणि उतरलेला चेहेरा बघून त्याला काय वाटेल? नको, त्यापेक्षा आपण बाहेर जाऊ या विचारात ती तशीच धावत बाल्कनीत येऊन उभी राहिली.  समोर पाऊस पडून ओलीचिंब झालेली हिरवी झाडे, पाण्याने भरलेले रस्ते आणि छत्री सावरत चालणारे लोक बघून तिला जरा हलकं वाटलं. जुईचा मूड आता चेंज झाला होता. बरसणाऱ्या जलधारांचे काही थेंब तिने आपली हाताच्या ओंजळीत साठवून घेतले. आणि ती आजूबाजूचा तृप्त निसर्ग आपल्या डोळ्यात साठवून घेऊ लागली. '

''असा अवकाळी पाऊस कंटाळवाणा वाटतो. पाऊस सुद्धा पाहिजे तेवढं आणि पाहिजे तेव्हा पडायला हवाय ना.'' अर्जुन येऊन जुईच्या मागे उभा होता. जुई पटकन मागे फिरली. तो हाताची घडी करून भिंतीला टेकून तिच्याकडे बघत होता. तिने पटकन मान खाली घातली.

''तो सुद्धा माणसांच्या अपेक्षेप्रमाणे पडायला लागला तर धरती आजन्म अतृत्प राहील. तिच्यासाठी त्याला असंच अवकाळी यावं लागत. आपल्याला कंटाळवाणा वाटणारा पाऊस खरतर कर्तव्यदक्ष असावा. जमिनीशी आणि तिला दिलेली वाचनाशी.'' ती सहज छपरावरून खाली पडणाऱ्या जलधारेकडे बघत होती.

''तुला, आय मिन तुम्हाला अजून आवडतो पाऊस?'' अर्जुन तिच्याकडे बघत म्हणाला.

''अजून म्हणजे? मला वाटत कि सगळ्यांना पाऊस आवडत असावा. तसेच मलाही आवडतो.'' जुई कुतूहलाने त्याला म्हणाली.

''अजून म्हणजे, मला लहानपणी पाऊस आवडायचा. नंतर पावसाशी असणार नातं आणि भेटीगाठी कमी झाल्या. सहज पावसात भिजण तर शक्यच नाही. आणि छत्री विसरल्याच्या बहाण्याने भिजायला आता बालपण राहिलेलं नाही. वयाबरोबर पावसाची असणारी ओढ कमी झाली.  सगळ्यांना लहानपणी पाऊस आवडतोच ना. म्हणून म्हणालो. तुम्हाला अजूनही आवडतो का? पाऊस.'' तो तिच्या फडफड करणाऱ्या पापण्यांची हालचाल अगदी बारकाईने टिपत म्हणाला. 'तुम्हाला अजून आवडतो का? पाऊस.'हे वाक्य तो ज्या टोनमध्ये म्हणाला ते ऐकून जुईने आपली नजर चोरून घेतली होती.

''बाय द वे, पावसाच्या आणि माझ्या अशा बऱ्याच गोडं आठवणी आहेत, मामाच्या गावी होतो तेव्हा. जास्त लहान वय नाही, पण अक्कल बऱ्यापैकी आली होती तेव्हा. आम्ही लहान मूल पावसाळी दिवसात लपाछपी खेळायचो. मस्त मजा यायची. मामाच्या घराशेजारी एक तळं होत, आम्ही सगळ्या मुलांना चुकवून लपण्याच्या बहाण्याने तिथे जायचो. आणि तळ्यात पाय घालून तासंतास गप्पा मारत बसायचो. बाकीच्या मुलांना आम्हाला शोधन शक्यच नव्हतं, कारण तळ्याकाठी यायला ते घाबरायचे.''
अर्जुन बोलत होता, बोलताना तो जुईची प्रत्येक कृती नोटीस करत होता. ती त्याच्या वाक्यावर अस्वस्थ होत चालली होती. आपला अस्वस्थ चेहेरा त्याला दिसू नये म्हणून शेवटी ती मागे वळून गॅलरीतून खाली बघू लागली.

''यामध्ये माझी एक जोडीदार होती. जोडीदार म्हणजे मामांची सगळ्यात लहान मुलगी. माझी तेव्हाची बेस्टी. ती आणि मी दोघेच सगळ्यांना फसवून तळ्याकाठी मस्ती करत राहायचो.'' तिचा चेहरा पाहण्यासाठी तो पुन्हा तिच्या बाजूला येऊन उभा राहिला होता. आणि त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली.

''गंमत माहित आहे तुम्हाला? त्या माझ्या बेस्टीच नाव सुद्धा जुई होत. मी एकटाच तिला लाडाने जु जु म्हणायचो. घरात सगळे मला तिच्या नावाने चिडवायचे सुद्धा. थोडी अक्कल कमी होती,पण मस्त होत ते आयुष्य, मोठंपण आल्यावर कामाच्या गडबडीत सगळं मागच्या मागे राहून गेलं. इथे जेवायला वेळ मिळत नाही, आमच्या सारख्या सरकारी माणसांना पर्सनल आयुष्य काय असणार म्हणा.''
तो बोलताना जुई त्याच्या एकेक शब्द कान देऊन ऐकत होती. त्याबरोबर तिच्या मनाची बेचैनी वाढत होती. अर्जुन जीच्याबद्दल बोलत आहे, ती दुसरी कोणी नसून आपण स्वतःच आहोत, हे त्याला कळू न देण्यासाठी तिने आटोकाट प्रयत्न केले. अंगावर असलेली तिची मोठी ओढणी दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवली होती. जणू तिने स्वतःला आणि स्वतःच्या भावनांना निसटून जाण्यापासून पकडून ठेवलं आहे. हाताची घट्ट घडी करून तिने तिच्या भावनांना आवर घातला. डोळ्याच्या अगदी कडेपर्यंत आलेले अश्रू आतल्या आत पिऊन ती स्तब्ध उभी राहिली. जणू काहीच ऐकलेच नसावे अशा अविर्भावात ती उभी होती.

''जुई तुमच्या सुद्धा काही आठवणी असतील ना, पावसाच्या किंवा असेच कोणी बेस्टी, वेस्ट फ्रेंड, अशी खास व्यक्ती तुमच्याही आयुष्यात असेल ना?'' अर्जुन मुद्दाम तिला विचारत होता.

''होय, आयुष्य आहे, आठवणींशिवाय दुसरं असतंच काय त्यात. तेव्हा लहानपणी माझ्या आयुष्यात असणाऱ्या खास व्यक्ती बरोबर माझं असणार नातं वेगळं होत, माझ्यादृष्टीने त्या खास नात्याला नावही खास होत, आणि आहे. भविष्यात काही सांगता येत नाही. मैत्रीच्या चार पावलं पुढे आणि बेस्ट फ्रेंडच्या पेक्षा फारच वेगळे असं.'' जुई वाऱ्यावर उडणारे तिचे केस सावरत म्हणाली.

''ओह, तुमच्या खास नात्याला नावही खास आहे, म्हणजे अजूनही बालपणीचे खास दोस्त तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत तर?'' अर्जुनने तिला प्रश्न विचारला.

''कॉन्टॅक्टमध्ये नाही, पण म्हणून काय झालं. एकदा निर्माण झालेलं नातं मिटून जायला ते काय सकाळचे दवबिंदू आहेत, माणसं सोडून जातात, आठवणी विसरतात, वस्तू हरवतात, पण नाती कायमस्वरूपी जिवंत असतात. आपल्या मनात, आपण जिवंत असे पर्यंत.'' जुई पुन्हा ओंजळणीत पावसाचे थेंब पकडू लागली.

''यू आर सिम्पली ग्रेट, बाय द वे, पावसाचे थेंब आहेत ते, मुठीत पकडून राहणार नाहीत.'' ती ओंजळीत वेचत असलेले पाणी बघत तो म्हणाला.

''सगळेच थेंब ओंजळीत साचून राहणार नाहीत, पण एखादा दुसरा राहील. आयुष्यातील सगळेच क्षण, सगळ्याच आठवणी आपल्याला कुठे लक्षात राहतात, पण जे आठवतात त्यावरच तर आपण आपलं आयुष्य जगत असतो. फुकट मिळालेलं हे पाणी एन्जॉय करायचं. मी थोड्याथोडक्यावर समाधानी राहते, जास्त अपेक्षा नाही करत.'' जुई हाताच्या ओंजळीत साचलेलं थोडं पाणी त्याला दाखवत होती.

पुढे येऊन त्याने तिची ओंजळ आपल्या ओंजळीत घेतली. पण खाली पडलेल्या पावसाच्या पाण्यावरून त्याचा पाय घसरला. आणि तो समोरच्या अर्ध्या भिंतीवर आदळला.
''अज्जू पडशील ना.'' जुई तिच्याही नकळत मोठ्याने ओरडली होती. आपल्या हाताचा आधार देत तिने त्याला उभं केलं. तो तिच्या आधाराने उठला होता.

''व्हॉट डिड यू सेड?'' तो क्षणाचाही विलंब न करता तिला विचारात होता. ती घाबरली, आपण याला लहानपणीच्या टोपण नावाने आवाज दिला. बापरे! आता काय करावं तिला सुचेना. काय बोलावं ती आठवू लागली.

''रिपीट अगेन, तू काय म्हणालीस?'' तो तिच्या हाताला घट्ट पकडत म्हणाला.

''सॉरी, माझा एक फ्रेंड आहे, सेम अर्जुन नावाचा, सो त्याला मी अज्जू म्हणते, चुकून तुम्हाला म्हणाले.'' ती बोलायच म्हणून काहीतरी बोलून गेली.

''जुई खरं बोल?'' तो अजूनही त्याच्या प्रश्नावर ठाम होता. आणि ती अगदी घाबरून गेली. काय करावं तिला सुचेना. एवढ्यात रूमच्या दाराची बेल वाजली होती. त्याकडे तिचे लक्ष गेले. तिने बोट करून अर्जुनला दाराची बेल वाजत असल्याचे सांगितले. आणि तिचा हात सोडून तो हळूहळू येऊन पुन्हा पलंगावर बसला.

 

******

क्रमश