लग्न ही अशी गोष्ट आहे, जी करणारा ही पस्तावतो आणि न करणाराही पस्तावतो.
लग्न केल्यावर बऱ्याच जणांना वाटते की आपण लग्नाची उगीच घाई केली,थोड थांबलो असतो तर बरं झालं असतं.
आणि ज्याच लग्न होत नाही तो लग्न झालेल्यांच्या उगीच हेवा करत बसतो.
लग्न म्हणजे जर एक मोठ्ठी बाग असं जर आपण समजलो तर त्या बागेत फुलं येतील, तसेच काटे पण येतील, खाचखळगे,दगडधोंडे,साप,विषारी, औषधी वनस्पती सुद्धा येतील, पण ह्या सगळ्यांचा अनुभव त्या बागेत आल्यावरच आपल्याला होईल.
लग्न न झालेले जे लोकं हे अशा खिडकीत उभे असतात ज्यातून त्यांना फक्त बागेचा फुलं असलेलाच भाग दिसतो त्यामुळे लग्न न केल्याचा त्यांना पश्चाताप होतो आणि एकदा त्यांचं लग्न झालं की ते बागेत येतात आणि संपूर्ण बागेचं त्यांना दर्शन घडते,मग अनेकांना फुलांबरोबर असलेले काटे, खाचखळगे, दगडधोंडे दिसायला लागतात, मग त्यांना पुन्हा एकदा पश्चाताप होतो.
लग्नाआधी पुरुष असो वा स्त्री स्वातंत्र्यात असतात,तेव्हा फारशा जबाबदाऱ्या नसतात त्यामुळे लग्नानंतर आलेल्या जबाबदाऱ्या,बंधनं डाचायला लागतात आणि मग पश्चाताप होतो. लग्न म्हंटल की जबाबदाऱ्या येणारच चांगले-वाईट अनुभव येणारच,आहे ती परिस्थिती स्वीकारून, आहे त्या वातावरणात समरसून जाण्याची ज्याची तयारी असते त्याला फारसा तीव्र पश्चाताप होताना दिसत नाही. लग्न (मग ते अरेंज मॅरेज असो वा लव्ह मॅरेज) म्हणजे अंधारात मारलेली उडी असं म्हंटल्या जाते,कोणाची उडी फुलांच्या ताटव्यात पडेल,कोणी काट्यांमध्ये पडेल,कोणी गवतात पडेल तर कोणी धोंड्यावर पडेल हा ज्याचा त्याचा अनुभव असतो. लग्नात एकाचा अनुभव दुसऱ्याला कामी येत नाही.
एकाला लग्नचा वाईट अनुभव आला म्हणजे तो दुसऱ्याला ही येईल अस नाही तसेच एकाला लग्नाचा छान अनुभव आला म्हणजे दुसऱ्याला ही तसच अनुभव येईल असे सांगता येत नाही.
अरेंज मॅरेज मध्ये लग्नाचा वाईट अनुभव आला तर मुला-मुलींना कमीतकमी माहेरून सपोर्ट मिळण्याची शक्यता असते पण जर लव्ह मॅरेज असेल तर बऱ्याच केसेस मध्ये तो ही मार्ग बंद झाला असतो.
बरेचदा लग्नाआधी चांगला वागणारा जोडीदार लग्नानंतर विचित्र वागताना आढळून येतो. काही जण पत्रिका बघून लग्न करतात. काही जण ज्योतिषाला मानतच नाही.
कोणाचे छत्तीस गुण जुळून ही घटस्फोट होतो तर कोणाच पत्रिका न पाहून केलेलं लग्न यशस्वी होताना दिसते.
कधी लग्नाआधी प्रेमात आकंठ बुडालेले जोडपे लग्नानंतर एकमेकांना खाता घास गोड लागू देत नाही. एकमेकांशी सतत वाद घालताना दिसतात.
कोणा कोणाला लग्नाचे फक्त चांगलेच अनुभव येतात त्यामुळे ते पश्र्चाताप करताना दिसत नाहीत.
कोणा कोणाला अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज, चांगल्या समजूतदार लोकांशी संबंध येतो त्यामुळे त्यांचं सांसारिक आयुष्य सुसह्य होते.
सगळं चांगलं असताना ही काहीजण कुरकुर करताना, तक्रार करताना दिसतात. आणि एक डायलॉग तर असतोच तो म्हणजे 'मी होती किंवा मी होतो म्हणून यांचा संसार चालला नाहीतर दुसरा किंवा दुसरी कोणी असती तर टिकली किंवा टिकला नसता.
लग्न पहावे करून असे ठरवून जर लग्न केलं तर संसार हा येणारच आणि संसार म्हणजे रथाचे दोन चाकं जर समजले तर संसारातल्या जबाबदाऱ्या मग त्या घरच्या असो किंवा बाहेरच्या,मुलांचे संगोपन असो वा घरच्या वरिष्ठ व्यक्तीची देखभाल सगळं नवरा बायको दोघांनी मिळून केलं पाहिजे.
सगळे कामं एकावरच ढकलून न देता समप्रमाणात विभागले तर संसार जड जाणार नाही व लग्न केल्याचा पश्र्चाताप ही होणार नाही.
तसंही मुलगा किंवा मुलगी स्वतंत्रपणे जगताना दिसले की नातेवाईकांना,घरच्यांना स्वस्थ बसवतच नाही. ते त्यांचे लग्न होईस्तोवर शांत बसत नाही व एकदा लग्न झाले की मूलबाळ होईपर्यंत शांत बसत नाही. आणि एकदा मूलबाळ झालं की सगळ्यांचा मोर्चा दुसऱ्या अविवाहित परिचयातील मुलीकडे किंवा मुलाकडे वळतो. मग त्यांचे लग्न,मूलबाळ असं झालं की सगळे स्नेही मंडळी निःश्वास सोडतात.
************