आज त्याचा interview होता. आधीच बाईक लवकर सुरू न झाल्यामुळे त्याला उशीर झाला होता. त्यामुळे घाईघाईने त्याने नेहमीचा रस्ता न घेता एक शॉर्ट कट घेतला. सारखा घड्याळात लक्ष ठेवून तो गाडी चालवू लागला.
त्याच्या गाडीने वेग पकडला होता, रस्ता दिवसा ढवळ्या सुद्धा निर्मनुष्य होता. त्याला आश्चर्य वाटलं एवढा चांगला शॉर्टकट रस्ता उपलब्ध असूनही लोकं तो ट्राफिक जॅम झालेला लॉंग कट का घेतात?
आता 10 मिनिटात तो त्याच्या interview च्या ठिकाणी पोहोचू शकणार होता. चला आता वेळ होणार नाही आपल्याला. ह्या नोकरीची नितांत आवश्यकता आहे आपल्याला त्यामुळे काही करून हा interview क्रॅक झालाच पाहिजे. असा तो विचार करतच होता की त्याला जोरर्रेरात कोणीतरी बाईक मागून ढकलली अशी जाणीव झाली आणि दहा फूट तो बाईक वरून घासत घासतच गेला आणि बाईक वरून पडून गेला.
जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. बाजूला त्याचा मित्र बसला होता.
मित्राने त्याला जी हकीकत सांगितली ती ऐकून तो भीतीने शहारला.
"अरे तू तो रस्ता घेशील असं मला वाटलंच नाही! तुला माहीत नाही का ते शापित वळण आहे. कोणीही त्या रस्त्याने कितीही घाई असली तरी जात नाही. थोडक्यात मरता मरता वाचला बेट्या तू!" तिथून जाणाऱ्या एका लाकूडतोड्याला तो सापडला तुझ्या फोनवर पहिला माझाच नंबर होता त्यामुळे त्याने मला फोन केला आणि आम्ही तुला इथे आणलं. आता बरं वाटतेय का?",त्याचा मित्र
"हो आता थोडं बरं वाटतेय पण खांदा पाय घासल्यामुळे खूप ठणकतोय.",तो
"महिनाभर प्लास्टर लावावं लागेल मग बरं वाटेल असं डॉक्टरांनी सांगितलंय.",त्याचा मित्र
"पण असं कसं काय झालं असेल मला माझी बाईक कोणीतरी ढकलली असं वाटलं. मी वेगात गाडी चालवत असल्याने तर झालं नसेल!",तो
"अजूनही तुझा विश्वास बसत नाही! संध्याकाळी मी ह्याचा पुरावा देतो तुला. आता आराम कर.",त्याचा मित्र
काही वेळाने त्याचे नातेवाईक आले त्यामुळे मित्र निघून गेला.
ह्याच्या डोक्यात तेच विचार घोळत होते. खरंच असेल मित्र सांगतोय ते की असेल अफवा? विचारातच त्याला झोप लागून गेली. त्याचा मित्र संध्याकाळी आला. सोबत त्याने बरेच वर्तमानपत्रे आणले होते.
"हे काय आहे? अरे माझ्याशी गप्पा करण्याऐवजी तू काय आता पेपर वाचत बसणार आहेस का?",तो मित्राला म्हणाला.
"अरे तुला सकाळी म्हंटल नव्हतं मी पुरावा आणतो म्हणून! हे सगळे पुरावे आहेत त्या शापित वळणाचे",असं म्हणून त्याच्या मित्राने त्याला एकेक पेपर मधली अधोरेखित केलेली बातमी दाखवली.
'शापित वळण: लग्नाला निघालेल्या वऱ्हाडी मंडळी ची गाडी उलटली. त्याच वळणावर. ड्रायव्हर शुद्धीत होता त्याला कोणीतरी ढकलल्या सारखं वाटलं. '
'शापित वळण:- मालवाहू ट्रक उलटला. तेच शापित वळण. ड्रायव्हर शुद्धीत होता अगदी हळू ट्रक चालवत होता. सकाळची वेळ होती. त्याला सुद्धा मागून ट्रक कोणीतरी ढकलल्या सारखा वाटला.'
'शापित वळण:- प्रवाशांनी भरलेली बस उलटली. तेच वळण. ड्रायव्हर शुद्धीत. त्याला कोणीतरी मागून ढकलल्या सारखं वाटलं.'
'शापित वळण:- दोन प्रेमी युगुलांच्या जोड्या आपापल्या बाईक वरून जात असता चालकाला मागून जोरात कोणीतरी ढकलल्या सारखं वाटलं. त्याच वळणावर. बाईक्स उलट्या होऊन फर्लांग भर घासत गेल्या. प्रेमी युगुल जब्बर जखमी. उपचार सुरू.'
"सांग आणखी किती पुरावे हवेत तुला?",त्याचा मित्र
त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. त्याच्या मित्राने त्याच्या खांद्यावर थोपटून त्याला धीर दिला. समोर देवाच्या फोटोला त्याने नमस्कार केला आणि पुन्हा शॉर्टकट न घेण्याचा पण केला.
★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★
(वरील कथा जरी काल्पनिक असली तरी असे शापित वळणं नक्कीच काही ठिकाणी अस्तित्वात असतात.
परंतु सर्वत्र नाही, बऱ्याचदा जे अपघात होतात ते चालकाच्या हलगर्जीपणामुळे व मद्य प्राशन केल्यामुळेच घडतात हे नक्की.)