Sadara of a happy man books and stories free download online pdf in Marathi

सुखी माणसाचा सदरा

एका गावात संतु शेतकरी, गणू पहेलवान, राजू न्हावी, नामु धोबी असे चार मित्र नेहमी नाराज आणि उदास असतात. त्यांना वाटत असते की आपल्याला खूप दुःख आहे, काहीच आपल्या मनासारखे होतच नाही म्हणून ते सगळे चेहरा पाडून दिवसभर सुस्कारे सोडत बसलेले असतात.

एकदा चौघेजण वडाच्या झाडाखाली गप्पा मारत असतात.

संतु शेतकरी म्हणतो,"काय करावं मला काही कळतच नाही"

"का, काय झालं?",गणू पेहेलवान त्याला विचारतो.."

संतू दिवसभर घरी बसतो आणि म्हणतो,"अरे माझं शेतच पिकत नाही", असं म्हणत दुःखी राहतो.

गणू पहेलवान सदैव घरी बसतो आणि मला बरंच वाटत नाही, मी आजारीच आहे म्हणून उदास राहतो.

"अरे माझंही तसच होते आहे",गणू पेहेलवन म्हणतो.

"तुला काय झालं?",राजू न्हावी विचारतो.

"अरे मला सदैव थकल्यासारखे आणि आजारी वाटते त्यामुळे मी तालमीला ही जात नाही"

"अरे माझंही तसेच होते आहे",राजू न्हावी म्हणाला.

"तुला काय झालं?", नामु धोबी त्याला विचारतो.

राजू न्हावी म्हणतो," काय माझ्याकडे कोणी दाढी-कटिंग ला येतच नाही. माझा व्यवसाय पुरा बसला राजेही",असे म्हणून तो सदैव घरी कुढत राहतो.

"माझेही असेच होते आहे", नामू धोबी म्हणतो.

"का?तुला काय झालं?",संतू शेतकरी विचारतो.

नामु धोबी म्हणतो," माझा व्यवसाय ठप्प झाला आहे. जवळच्या नदीला पाणी येत नाही. कपडे कसे धुणार?", असं म्हणून, ह्या विचाराने तो सदैव घरी बसून राहतो.

एकदा त्या गावात एक व्यापारी येतो त्याच्याजवळ कपडे विकायला असतात. तो मोठया मोठ्याने ओरडत "कुणाला सुखी माणसाचा सदरा हवा का हो!", असं म्हणत गाव गोळा करतो.

सगळे लोकं कुतूहलाने त्याच्या भोवती गोळा होतात,त्यात संतु,गणू,राजू आणि नामु हे सुद्धा असतात. सुखी माणसाचा सदरा म्हंटल्यावर त्यांना फार नवल वाटते.

"काय रे संतू घ्यायचा का रे तो सुखी माणसाचा सदरा?",गणू पेहेलवान विचारतो.

"मला ही वाटते घ्यावा म्हणून",संतू शेतकरी म्हणतो.

"तसंही आपण दुःखी आहोत. आपल्याला गरज आहे अश्या सद्र्याची", नामु धोबी म्हणतो.

"काय रे राजू तुला काय वाटते?",संतू शेतकरी विचारतो.

"घेऊनच टाकावा एकेक सदरा",राजू न्हावी म्हणतो.

असा विचार करून ते लगेच एकेक सदरा विकत घेतात, पण सदरा विकत घेताना, व्यापारी त्यांना सांगतो की ह्या सदऱ्याची एकच अट आहे, हा सदरा घातल्यावर जेवढा तुम्हाला घाम येईल तेवढा हा सदरा तुम्हाला सुखी ठेवण्याचं काम करेल. चौघेही उत्साहात तो सदरा घालतात.

सुखी माणसाचा सदरा आपण घातला आहे ह्या जाणिवेनेच त्यांना आनंद वाटू लागतो. दिवसभर ते आनंदात राहतात पण दुसऱ्यादिवशी पुन्हा नेहमीप्रमाणे तोंड पाडून बसतात. थोड्यावेळाने जास्तीतजास्त घाम आला पाहिजे हे व्यापाऱ्याचं वाक्य त्यांना आठवते आणि संतु लगेच उठतो, शेतात चक्कर टाकतो,तिथे घाम येईपर्यंत कष्ट घेतो आणि रात्री थकून निवांत झोपतो.

मेहनत घेतल्यामुळे त्याला आंतरिक समाधान मिळालेलं असते. इकडे गणू पहेलवान घाम गाळायचा म्हणून तालमीत जातो, तिथे कुस्तीचा घाम गळेपर्यंत सराव करतो आणि घरी येतो, मेहनत घेतल्यामुळे त्याला खूप भूक लागते तो पोटभर जेवतो, शान्त झोपतो. असे नियमित केल्याने त्याची तब्येत सुधारते आणि त्याला उत्साहित वाटायला लागते.

तिकडे राजू न्हावी घाम गाळायचा म्हणून एका जागी दुकान न मांडता ठिकठिकाणी अजून दाढ्या-कटिंग करायला लागतो त्यामुळे त्याचा व्यवसाय वाढतो आणि तो आनंदात राहायला लागतो. नामु धोबी सुद्धा घाम गाळला पाहिजे म्हणून लांबच्या नदीवर जाऊन कपडे धुतो त्यामुळे त्याच्याही व्यवसायात भरभराट होते, अनेक मोठमोठे लोकं त्याच्याकडे कपडे धुण्याचे काम देतात,तो ही सुखी होतो.

अश्या प्रकारे चौघेही सुखी माणसाचा सदरा घालून सुखी आयुष्य जगायला लागतात. वरील गोष्टींमधून आपल्याला हे कळून येईल की सुखी माणसाचा सदरा हे फक्त एक निमित्त होतं, वास्तविकतः मेहनत घेतल्यामुळे ते सगळे सुखी झाले होते.
◆◆◆


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED