समुद्रातील बेट Kalyani Deshpande द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

समुद्रातील बेट

महाराष्ट्रात रंजनपूर नावाचं एक लाखभर वस्ती असलेलं गाव होतं, तिथे गोविंदाचार्य नावाच्या ऋषींचा आश्रम होता,गावाच्या मध्यभागी हा आश्रम वसलेला होता. त्यात गोविंदाचार्य त्यांच्या दहा शिष्यांसंवेत राहत असत. आश्रमात एक गणपतीचे मोठ्ठे मंदिर होते,तिथे दर चतुर्थीला भजन कीर्तन चालत असे. दर चतुर्थीला आचार्य स्वतः मोदक बनवून गणपतीला नैवेद्य दाखवत असत. आणि मग सगळ्या लोकांमध्ये तो प्रसाद वाटून टाकत. तेथील लोकं मोठया भक्तिभावानं गणपतीचं,संताचं दर्शन घ्यायला येत असत. रोज संध्याकाळी लोकं आचार्यांकडे संसारातील काही न काही गाऱ्हाणी घेऊन येत असत. कोणाला मूल होत नाही म्हणून तर कोणाला दर वर्षाला मूल होते म्हणून, कोणाचा नवरा दारू पिऊन मारायचा म्हणून तर कोणाचा नवरा घराकडे लक्षच देत नाही म्हणून, कोणाची शेती पिकत नाही म्हणून,कोणाला नोकरी लागत नाही म्हणून, कोणाचं लग्न होत नाही म्हणून तर कोणाचं लग्न टिकत नाही म्हणून, कोणी सतत आजारी राहते म्हणून तर कोणाला भानामती झाली म्हणून अशा अनेक समस्या घेऊन लोकं आचार्यांकडे कडे येत असत.

आचार्य सुद्धा त्यांना योग्य उपाय सांगून त्यांचे समाधान करत असत. आचार्यांना औषधी शास्त्र, मानस शास्त्र, संमोहन शास्त्र ,तंत्रविद्या या सगळ्यांचे ज्ञान असल्यामुळे ते कुठल्याही समस्येचे समाधान करू शकायचे. त्यांची वाणी सुद्धा खूप प्रभावी होती, ऐकत राहणारा मंत्रमुग्ध होऊन जायचा,त्यांच्या वाणीत अशी जादू होती की समोरच्याला त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे त्यानुसार वागलं पाहिजे असं वाटायचं. ज्याला मूल होत नाही त्याला ते औषध देत,ज्याला दरवर्षी मुलं होतात त्यांना वेगळं औषध देत,जो सतत आजारी असे त्याला प्रतिकारशक्ती वाढवण्याचं औषध देत,तर जो दारू पिऊन मारे त्यासाठी दारू सुटण्याचं औषध देऊन ते त्याचं त्यांच्या ओघवत्या वाणीने समुपदेशन करत असत. ज्याला भानामती झाल्याचा भ्रम झाला,त्याला समुपदेशन करून ते तो भ्रम दूर करायचे आणि ज्याला खरंच भानामती झालीय तिथे तंत्रविद्येचा उपयोग करून ते ती भानामती उतरवून टाकायचे. लग्न व्हावं म्हणून किंवा झालेलं लग्न टिकावे म्हणून ते काही चपखल तोडगे सांगायचे जे शंभरटक्के यशस्वी व्हायचे. सामान्य नागरिकांप्रमाणेच त्यांच्याकडे राजकारणी लोकं सुद्धा यायचे त्यांनाही योग्य सल्ला देऊन आचार्यांनी प्रभावित केलं होतं, आणि त्यांच्याच कडून त्यांनी गावातला दारूचा गुत्ता ही बंद करवून घेतला होता. आचार्यांचे गावात जसे भक्त होते तसे त्यांच्या वाईटावर काही लोकं होते त्यांनीं आचार्यांना मारण्यासाठी काही गुंड पाठवले.

आचार्यांची झोप सावध असल्यामुळे आणि त्यांना रात्री गुंड आल्याची चाहूल लागल्यामुळे ते तय्यार होते. त्यांनी आलेल्या त्या चार गुंडांवर संमोहन शास्त्राचा प्रयोग केला आणि त्यांचं असं समुपदेशन केलं की ते चारही गुंड आचार्यांचे परमभक्त बनून गेले.

अशा रीतीने प्रत्येक समस्येचे समाधान शोधण्याचे कसब त्यांच्या ठायी होतं.

एकदा आचार्य शिष्यांच्या कुटी जवळून जात असताना त्यांना दोन शिष्यांचे बोलणे ऐकू आले.

त्यातील पहिला शिष्य दुसऱ्याला म्हणत होता,"आपले आचार्य किती सामर्थ्यवान आहेत. प्रत्येक प्रश्नाचे त्यांच्याकडे उत्तर आहे. ते गृहस्थाश्रमात असते तर किती उत्तम संसार करू शकले असते नाही!?"

त्यावर दुसरा शिष्य म्हणाला,"अरे!आपले आचार्य हे एका समुद्रातील बेटासारखे आहेत. समुद्रात राहूनही समुद्रापासून एका उंचीवर राहून बेट जसे अलिप्त राहते तसे आपले आचार्य या संसार रुपी भवसागरात एका उंचीवर पोचले आहेत म्हणून अलिप्त आहेत.

ते अलिप्त आहेत म्हणूनच ते सामर्थ्यवान आहेत. ते जर संसारात असते तर ते सुध्धा भवसागराचा एक भाग झाले असते आणि त्यांना बेटा सारखी उंची गाठता आली नसती. मग भव सागरात जे त्रासलेले,गांचलेले लोकं आहेत त्यांचं समाधान आचार्यांनी कसं केलं असतं? त्यामुळे आपले आचार्य हे जिथे आहेत तिथेच चांगले आहेत आणि आपण त्यांचे शिष्य असून आपल्याला त्यांची सेवा करता येतेय हे आपलं परम भाग्य आहे."

"बरोबर आहे तुझं",पाहिला शिष्य म्हणतो.

हा संवाद सुरू असताना आचार्य समाधानाने स्वतःशीच हसतात आणि आपल्या कुटी कडे प्रस्थान करतात.