एकदा जंगलात सिंह महाराजांनी पक्ष्यांसाठी रंग माझा वेगळा ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यात सगळ्या पक्षांनी भाग घेतला होता.
कावळा,मैना,कोकिळा,बगळा,बदक,हंस,शहामृग, मोर,पोपट, कबुतर, चिमणी, सुतारपक्षी अगदी झाडून सगळ्या पक्षांनी भाग घेतला.
पहिल्या फेरीत सगळ्या पक्षांनी आपापल्या गुणांचं वर्णन केलं.
कावकाव करत कावळा आला,
कावळा:---
मी जरी असलो काळा,
तरी अंगी आहे नाना कळा,
काक स्पर्श करण्यासाठी जो तो
मला शोधत फिरतो आणि होतो बावळा.
उडत उडत मैना आली,
मैना:---
मी आहे बाई काळी
पण चोच माझी पिवळी
आणि माझ्या नावाचे बालगीत ऐकून
लहानग्यांची खुलते कळी.
रियाज सोडून कोकिळा आली,
कोकिळा:---
असेल जरी वर्ण माझा काळा
परी दिला देवाने गोड गोड गळा,
मी गायलेल्या गाण्याचा
सर्वांना भलताच लळा.
जपमाळ सोडून बगळा आला,
बगळा:---
माझं नाव बगळा,
पांढरा रंग माझा सगळा,
मासे पकडण्यासाठी शांत राहतो
ओढून सदैव जपमाळा.
स्विमिंग करून बदक आलं,
बदक:--- नाव माझे बदक,
चालतो मी फदक-फदक,
फेतके पिवळे पाय माझे, चोचीचा रंग पिवळा,
पाण्यात पोहतो मी अनेक वेळा.
ऐटीत चालत हंस आला,
हंस:---
राजहंस माझे नाम,
क्षीर निवडणे माझे काम,
चाल माझी डौलदार,
शुभ्र, देखणा, रुबाबदार.
जड पावलं टाकत शहामृग आला,
शहामृग:---
सगळ्यात अनोखा आहे मी पक्षी,
निसर्ग त्याला आहे साक्षी,
उडता जरी येत नसे मला,
सगळ्यात वजनदार पक्षी मी भला.
नाचत नाचत मोर आला,
मोर:---
रंगीत पक्षी आहे मी मोर,
माझे नृत्य बघे लहान थोर,
पिसारा जेव्हा मी फुलवतो,
प्रेक्षकांना मी भुलवतो.
बडबड करत पोपट आला,
पोपट:---
नाव माझे पोपट,
काम आपलं सरधोपट,
खातो मिरची आणि पेरू,
जेवण होताच लागतो घोरू,
सगळे म्हणती मला मिठू,
मग मी करतो विठू-विठू,
लाल चोच, रंग हिरवा,
सर्वांना भासे मी बरवा,
मानवा सारखा मी बोलतो,
आणि छोटे मंडळीचा रंग खुलतो.
घू-घू करत कबुतर आलं,
कबुतर:---
नाव माझे कबुतर,
अखंड करतो मी गुटर-गुटर,
रंग माझा राखाडी,
उंच जागी राहते आमची जोडी.
पिलांना दाणे देऊन चिमणी आली,
चिमणी:---
मी आहे चिमणी,
लहान माझी जिवणी,
चार दाण्यात पोट भरते,
भुर्रर्र कन क्षणात उडते,
बालगीतात असते नेहमी मी,
लहान मुलांची आवडती मी.
सुतार काम करून सुतारपक्षी आला,
सुतारपक्षी:---
चोच माझी अणकुचीदार,
लाकूड कोरणे आवडे फार,
टक-टक-टक-टक सदैव करतो,
म्हणती सगळे पक्षी सुतार.
"स्पर्धेचा पहिला राऊंड संपलाय,त्यात दुसऱ्या राउंड मध्ये कोण जाणार हे आपले जज श्रीयुत गजराज एलिफंटे जाहीर करतील.", सिंह राजे गरजले.
"दुसऱ्या राउंड मध्ये काळ्या रंगा पैकी कोकिळा ताई, पांढऱ्या रंगापैकी हंसराव, हिरव्या रंगाचा पोपट कुमार,निळ्या रंगाचा मोर जी आणि सरतेशेवटी वेगळेपणामुळे शहामृग पंत ह्यांना सिलेक्ट करण्यात येत आहे.
दुसऱ्या राऊंड मध्ये कोकिळा ताईंचं शास्त्रीय गायन झालं,मोर जींनी ब्रेक डान्स केला,हंस रावांनी रॅम्प वॉक केला,पोपट कुमारांनी घडाघडा श्लोक म्हणून दाखवले तर शहामृग पंतांनी कदम ताल करून दाखवला. कदम ताल झाल्या झाल्या शहामृग पंत हुश्श करून खुर्चीवर घाम पुसत बसले.
" वजन वाढलंच जरा यांचं या लॉक डाउन मुळे, सतत घरी बसावं लागते ना म्हणून", मिसेस शहामृग, मिसेस सुतार पक्षींना म्हणाल्या.
"तुमचे हे कमीतकमी दुसऱ्या राउंड पर्यंत गेले तरी, आमचे हे नाराज होऊन गेले झाडावर टक-टक करायला",मिसेस सुतारपक्षी म्हणाल्या.
"पाहिलं,या कोकिळा वंसं नि इथे पण टांग मारली आणि गेल्या पुढे आणि तुम्ही बघा,बसा आता त्यांच्या मुलांना खेळवत",कावळीण बाई रागावून म्हणाल्या.
"बरं झालं बाई,मी सेकंड राउंड मध्ये सिलेक्ट नाही झाली ते, चिमण राव येण्याची वेळही झाली आणि मुलंही भूक भूक करत असतील,निघते बाई मी,
बाय ss", असं कबूतरीण बाईंना म्हणून चिऊताई भुर्रर्र उडून गेल्या.
घु घु आवाज करून सगळ्यांकडे घुर्रावून बघत कबूतरही विथ फॅमिली उडून गेला.
"चिटिंग आहे, दुसरं काय!",असं म्हणून बदक, फदक फदक करत निघून गेले.
सावरत आपला सदरा ढगळा गेला निघून बगळा.
"मैं ना जा रही हुं",असं ठसक्यात म्हणून मैनाही निघून गेली.
गजराज एलिफंटे यांनी दुसऱ्या राउंड चा निकाल जाहीर केला,
"सगळ्यांनी दाखविलेल्या टॅलेंट बघून, पोपट कुमार,हंस राव आणि मोर जी हे तिघे त्यांचे वेगळे रंग असल्याने आणि लहान मुलांमध्ये ते लोकप्रिय असल्याने फायनल राऊंड मध्ये एन्ट्री घेतील. आणि मिस्टर एलिफंटे यांनी चष्म्यातून समोर प्रेक्षकांकडे टाळ्यांच्या अपेक्षेने नजर फिरवली आणि ते अवाक झाले कारण प्रेक्षकांमध्ये फक्त मिसेस पोपट, मिसेस हंस, मिसेस मोर एवढेच शिल्लक होते.
तिसऱ्या राउंड मध्ये पक्ष्यांची स्पर्धा असल्याने झाडावरून फळ कोण तोडून आणते? अशी स्पर्धा होती त्यात अर्थातच पोपट कुमार जिंकले. नंतर जगात लोकप्रिय पक्षी कोण? ही स्पर्धा होती यात इंटरनेट वर सर्वे केल्यावर पोपट कुमारांना जास्त मतं मिळाल्याने ते जिंकले. नंतर शेवटी तिन्ही पक्ष्यांना एक कोडं घालण्यात आलं
‘नाक ज्याचे बाकदार,
वेग त्याचा आहे फार,
सेवेत सदा हजर राही,
भगवंताचा वाहे भार’
"सांगा पाहू कोण आहे हा? ह्या प्रश्नाचे उत्तर जो देईल तो रंग माझा वेगळा स्पर्धेचा विजेता होईल.",गजराज म्हणाले.
हंसराव डौलदार पणे चालत चालत विचार करू लागले, मोर जी पिसारा फुलवून विचार करू लागले, पोपटकुमारांनी पटकन एक छोटी गिरकी घेतली आणि पंख झटकून म्हणाले,
"मला उत्तर माहितेय,सांगू"
"हो हो सांगा सांगा",गजराज
हंसराव आणि मोर जी सुद्धा उत्तराची वाट बघू लागले, मग पोपट कुमार म्हणाले,
"ओके! सांगूनच टाकतो,
"
‘नाक ज्याचे बाकदार,
वेग त्याचा आहे फार,
सेवेत सदा हजर राही,
भगवंताचा वाहे भार’
तो आहे पक्षीराज गरुड यार! म्हणजे गरुड म्हणायचंय मला, 'यार' आपलं असंच यमक जुळवलं मी",पोपट कुमार हसत म्हणाले.
आणि सगळ्या उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.
"व्वा! पोपटकुमार फारच छान!",गजराज आणि सिंह महाराज एकदमच म्हणाले.
आणि पोपटकुमारांना ‘रंग माझा वेगळा ‘ स्पर्धेत पहिला नंबरचे पारितोषिक मिळाले.
सगळ्यांनी पोपट कुमारांचे अभिनंदन केले.
पोपटीण बाईंना तर पोपटकुमारांचा एवढा अभिमान वाटला की बस्स!
■■■■■