पॉवर ऑफ अटर्नी भाग ३
भाग २ वरुन पुढे वाचा
आठ दहा दिवस तसेच गेले. पोलीसांकडून काहीच बातमी आली नाही. एक दिवस लंच टाइम मध्ये किशोर ला काय वाटलं कुणास ठाऊक त्यांनी विभावरीला फोन लावला.
“हॅलो मी किशोर बोलतोय.”
“नंबर सेव केला आहे तुमचा. बोला. काही कळलं का ?” – विभावरी.
“नाही. कालच गेलो होतो. मला म्हणाले काही प्रगती झाली तर कळवू. सारखे सारखे येऊ नका. आदल्याच दिवशी तुम्ही पण आला होता असं म्हणाले.” – किशोर.
“हो मला पण तुमच्या सारखंच उत्तर मिळालं. काय करायचं ?” – विभावरी.
“आपण भेटूया का ? अर्थात तुम्हाला जर वेळ असेल तरच.” – किशोर.
“भेटून काय करणार ?” विभावरीने उलट विचारलं.
“चर्चा केल्यावर काही तरी मार्ग सुचू शकेल, असं मला वाटतं.” – किशोर.
“ठीक आहे. कुठे भेटायचं ?” – विभावरी.
“तुम्ही बावधन ला राहता न, मग आपण चांदणी चौकात भेटूया आणि ठरवू कुठे कॉफी प्यायची ते.” – किशोर.
“ओके. मी संध्याकाळी ७ वाजे पर्यन्त पोचते. चालेल ?” - विभावरी.
“चालेल. मी पण पोचतो.” किशोर म्हणाला आणि फोन ठेवला.
संध्याकाळी ७ वाजता किशोर चांदणी चौकात विभावरीची वाट पहात उभा होता. फोन वाजला म्हणून पाहीलं तर विभावरीचा होता.
“हॅलो मी विभावरी बोलतेय. मला यायला उशीर होईल. मग काय करायचं ?”
“किती उशीर होईल ?” – किशोर
“सांगता येत नाही एक मीटिंग सुरू आहे. तरी साधारण अजून अर्धा तास लागेल असं दिसतंय.” – विभावरी
“मी थांबू का ?” -किशोर
विभावरी विचारात पडली, मग म्हणाली
“नको कारण आज जर आपण भेटलो तर घरी जायला अजून उशीर होईल. मी सध्या काकांकडे राहते आहे न, त्यांना त्रास नको व्हायला. आपण उद्या भेटायचं का ? उद्या तसाही शनिवार आहे. तुम्हाला सुट्टी असेल न ? दूसरा शनिवार.”
“हो आम्हाला आहे. पण तुमचं काय ?” किशोर चा प्रश्न
“आम्हाला पण सुट्टी असते. मग उद्या सकाळी भेटायचं का ? अकरा च्या सुमारास चालेल ? जरा सोपं पडेल.” विभावरीने विचारलं.
किशोर जरा नाराज झाला पण म्हणाला की
“चालेल. तुम्ही सकाळी पक्की वेळ कळवा. मी येईन”
“कळवते. बाय” – विभावरी.
सकाळी विभावरीचा फोन आला. किशोर नी उचलला.
“हॅलो, मी विभा बोलतेय.”
“मी वाटच पहात होतो तुमच्या फोनची. बोला” – किशोर.
“आज सकाळी काकांचे कोणी मित्र सपरिवार जेवायला यायचे आहेत, मला काकूंना मदत करायला थांबावं लागेल.” विभावरीचा स्वर जरा चिडकाच होता.
“म्हणजे आजची सकाळ पण नाही.” किशोर म्हणाला. त्यांच्या स्वरातली नाराजी स्पष्ट कळून येत होती.
“हो. सॉरी, माझ्या मुळे तुमची चीड चीड होते आहे. कळतंय मला पण इलाज नाही. आपण आज संध्याकाळी नक्की भेटू.” – विभावरी.
“ओके.” किशोरला तिच्या स्वरातली कळकळ जाणवली. मग तो म्हणाला की “ओके, तुम्ही सांगा केंव्हा आणि कुठे भेटायचं ते.”
फोन करते.
संध्याकाळी ७ वाजता तिच्या सांगण्या प्रमाणे किशोर चांदणी चौकात तिची वाट पहात उभा होता. साडे सात झाले तरी विभावरी आली नव्हती. किशोरची सॉलिड चीड चीड होत होती. भेटायचं नव्हतं तर कशाला भेटायची तयारी दाखवली आणि हो म्हंटलं, आणि इथे बोलावलं. उगाच ताटकळत थांबावं लागतेय. आता पुन्हा फोन करायचा नाही आणि उचलायचा पण नाही. त्यांनी मनाशीच ठाम पणे ठरवलं. तो घरी जाण्या साठी वळला आणि समोरून त्याला विभावरी येतांना दिसली. तिला पाहिल्यावर त्याचा सगळा राग मावळला. काही तरी कारण असेल त्या शिवाय उशीर करणारी ती मुलगी नाहीये, इतकी बेजबाबदार नक्कीच नाहीये. असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला.
विभावरीनी स्कूटी स्टँड वर लावली आणि म्हणाली
“Sorry. खूप उशीर झाला. तुम्हाला ताटकळत थांबावं लागलं ना ! सॉरी. पुन्हा एकदा.”
“जाऊ द्या हो. होतं असं कधी कधी. Never mind.” किशोरनी सारवा सारव केली.
समोरच्या हॉटेल मध्ये गेल्यावर किशोर म्हणाला
“काय घेणार ? काही खाणार का ?” – किशोर.
“डोसा खाऊया का ?” – विभावरी.
किशोर नि डोसा मागवला.
“तीन दिवसांपासून प्रयत्न करतोय पण आज योग होता भेटीचा.” – किशोर.
“अहो तीन दिवस कुठले, कालच तर तुम्ही फोन केला होता, काल मी मीटिंग मधे अडकले होते, आणि आज सकाळी आमच्या कडे पाहुणे जेवायला येणार होते. आता आज संध्याकाळी आपण भेटतोच आहोत.” – विभावरी.
किशोर हसला. “कंप्लीट अकाऊंटच दिला की तुम्ही भेटीचा. पण मग आत्ता का उशीर केलात ? मी जवळ जवळ पाऊण तास वाट बघत होतो आणि आता जायलाच निघालो होतो पण तेवढ्यात तुम्ही दिसला म्हणून बरं झालं, थांबलो.”
“मी काकांकडे राहते आहे ना, मग त्यांना माझी जबाबदारी वाटते.” विभावरी सांगत होती. “तसं काकू बोलून पण दाखवतात. मला माझ्या प्रत्येक क्षणाचा हिशोब द्यावा लागतो. त्यामुळे कुठे जाते आहेस ? ते ही संध्याकाळच्या वेळेस, वगैरे बऱ्याच चौकशा करून झाल्यावर सुटका झाली. मग अश्या वेळेस काही तरी शेंडी लावावी लागते. आणि वर लक्षात पण ठेवावं लागतं, काय शेंडी लावली आहे ते. जाऊ द्या तुम्हाला नाही कळणार हे.”
“म्हणजे तुम्ही मला भेटायला येता आहात हे घरी सांगितलं नाही ?” – किशोर
विभावरीनी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली की -
“सांगितलं असतं तर येउच दिलं नसतं. म्हणाले असते की त्या फ्रॉड माणसाला भेटायची काही गरज नाही म्हणून.” – विभावरी.
“बापरे, मला तुमचे काका फ्रॉड समजतात की काय ? मग तर तुम्ही इथे येऊन भलतंच धाडस केलत. आता घरी कळलं तर ?” किशोर म्हणाला.
“बोलणी खावी लागतील, अजून काय ?” – विभावरी
तेवढ्यात डोसा आला. मग डोसा खाता खाता विभावरीनी विचारलं की
“तुम्हाला काही सांगायचं होतं ना. सांगा न.” – विभावारीने सुरवात केली.
“अहो या गोंधळा मध्ये, जीव फार चिरडीला आला आहे. आपण समदु:खी आहोत, आणि तुम्ही समजूतदार स्वभावाच्या असाव्यात असं वाटलं, म्हणून तुमच्याशी बोलावस वाटलं. बाकीच्या लोकांना यातली तीव्रता कळतच नाही. माझा तर खूपच मोठा प्रॉब्लेम झाला आहे.” – किशोर
“काय झालं आहे ?” – विभावरी
“मी मॅनेजर ला जेंव्हा सत्य परिस्थिती सांगितली. तेंव्हा त्याला चक्करच आली. तो म्हणाला की हे सगळं हेड ऑफिस ला कळवावं लागेल. ते मग जी काय अॅक्शन घेतील ते बघावं लागेल.” किशोर म्हणाला.
“तुमचा काय अंदाज आहे की काय होऊ शकतं ?” – विभावरी.
“मला माहीत नाही पण मॅनेजर म्हणाला की ताबडतोब एक रकमी २० लाख भरावे लागतील आणि मग नोकरीतून पण काढून टाकतील.” – किशोर म्हणाला.
“पण जर पैसे भरले तर नोकरीतून का काढतील ?” – विभावरी विचारलं.
“अहो एवढे २० लाख रुपये मी कुठून आणणार ? आणि वरतून तो म्हणाला की मी खोटे पेपर बँकेत दिले. आणि हा फ्रॉड आहे. ४२० ची केस आहे. म्हणजे पोलिस केस होईल. कदाचित शिक्षा पण होईल. आता मला काही समजतच नाहीये, काय करायचं ते. तुमच्या मैत्रिणीने तुमचा फ्लॅट फसवून विकला. पण जेंव्हा सानिकानी फ्रॉड केला आहे, हे सिद्ध होईल तेंव्हा तो तुम्हाला परत मिळेल पण माझं तर आयुष्यच उद्ध्वस्त होतांना मला दिसतंय. फ्रॉड असा शिक्का बसला तर मला कोणीही नोकरी देणार नाही.” हे बोलतांना किशोरचा आवाज भरून आला त्याला पुढे बोलता येईना.
किशोरचे डोळे भरून आले. त्यांनी आटोकाट प्रयत्न करून डोळ्यात अश्रु येऊ दिले नाहीत पण त्याला बोलणं अशक्य झालं. तो गप्प बसला.
विभावरीला त्याची ही अवस्था बघवली नाही. विभावरी खूप साधी आणि फार भावना प्रधान मुलगी होती. आई आणि वडीलांना गमावून बसली होती. फार हळव्या मनाची होती ती. किशोर तर नाही पण विभावरीच्या डोळ्यांना धारा लागल्या. किशोर नी तिला रडताना पाहीलं आणि तो चकीतच झाला. संकटाचं वादळ आपल्यावर घोंगावतंय, तलवार आपल्या मानेवर टांगली आहे आणि रडतेय ही मुलगी. त्याला काहीच सुचेना. बाजूच्या टेबलावरचे लोकं आता त्यांच्याच कडे बघत होते. तो हलक्या आवाजात बोलला
“विभावरी मॅडम लोकं आपल्याकडे बघताहेत, स्वत:ला सावरा.” विभावरीनी त्याच्याकडे पाहीलं. डोळे पाणावलेले आणि नाकाचा शेंडा लाल लाल झाला होता. तिने पर्स मधून रूमाल काढला आणि चेहरा पुसला. किशोर कडे बघून हसली. म्हणाली
“किशोर सर, तुम्ही नका काळजी करू तुम्ही काहीच गुन्हा केला नाहीये, उलट तुम्हीच फसवल्या गेले आहात. देव इतका निष्ठुर नाहीये. सगळं काही ठीक होईल. मला विश्वास आहे.”
क्रमश: ..........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.