पॉवर ऑफ अटर्नी
भाग ७
भाग ६ वरुन पुढे वाचा
रीजनल ऑफिस च्या समोर विभावरीला पाहून किशोर चकीतच झाला. म्हणाला “तुम्ही इथे काय करता आहात ?”
“मी इथे काय करते आहेss, केवढा गहन प्रश्न विचारला तुम्ही. काय उत्तर देऊ मी तुम्हाला ?” -विभावरी.
“सॉरी, पण.....” – किशोर.
“ते मॅच मध्ये असतं ना, लोकं cheer up करतात. तसंच. तुमचं मनोधैर्य वाढवायला आले आहे. निर्धास्त पणे चौकशीला सामोरे जा. तुमची काहीच चूक नाहीये. त्यामुळे तुमच्या वर कसलाच ब्लॉट येणार नाही. काय ते खरं खरं सांगून टाका. मुळीच घाबरू नका. मी थांबते आहे इथे. चौकशी संपल्यावर आपण बरोबरच घरी जाऊ. ऑल द बेस्ट .”
किशोरचा चेहरा फुलला. म्हणाला “तुम्ही किती सपोर्ट करता आहात हो मला. खरंच धीर आला मला. आता मला चिंता नाही.”
विभावरीनी हसून थम्ब्स अप ची खूण केली आणि मग किशोर आत शिरला.
पहिलाच राऊंड होता चौकशीचा. फारशी काही विचारपूस झाली नाही. त्याच्या आज पर्यंतच्या नोकरीचा आढावा घेतल्या गेला. नोकरीच्या संदर्भात उगाच चार दोन किरकोळ प्रश्न विचारले आणि किशोरनी त्यांची समर्पक उत्तरं दिलीत. आता किशोरच्या मनावरचं सुरवातीला आलेलं दडपण निघून गेलं होतं. मग महत्त्वाचा प्रश्न समोर आला.
“मिस्टर किशोर, तुमचा इतका चांगला ट्रॅक रेकॉर्ड असतांना खोटे पेपर देण्याचा विचार कसा काय तुमच्या डोक्यात आला ? आपल्या नोकरीचा आणि प्रतिष्ठेचा विचार पण तुम्ही केला नाही का ?” एक सदस्य.
“सर जेंव्हा मी पेपर बँकेत सबमिट केले तेंव्हा ते खरे आहेत या बद्दल माझी खात्री होती. ते खोटे आहेत, अशी थोडी जरी शंका आली असती तरी मी पुढे गेलोच नसतो. पण प्रथम दर्शनी सर्व पेपर खरेच वाटले आणि बँक संपूर्ण पडताळा करते हे माहीत असल्याने मला काळजी वाटण्या सारखं काहीच कारण नव्हतं. त्या प्रमाणे बँकेने सुद्धा पडताळा केलाच, आपल्या लीगल adviser कडे फाइल गेली होती, त्यांनी निर्वाळा दिल्यावरच माझं कर्ज मंजूर झालं.” किशोरने खुलासा केला.
“हे पेपर खोटे आहेत हे तुम्हाला केंव्हा कळलं ?”
“फ्लॅट ची मूळ मालकीण जेंव्हा अमेरिकेतून वापस आली आणि थेट आमच्या घरीच सामाना सकट आली तेंव्हा.” – किशोर.
“मग तुम्ही काय केलं ?” – दूसरा सदस्य.
“त्या मुलीचे काका आले होते. बरीच वादावादी झाल्यावर त्यांनी मला पेपर पाहायला मागितले.” किशोरनी सविस्तर घटना सांगायला सुरवात केली. “ते पाहिल्यावर विभावरी मॅडमच्या लक्षात आलं की अधिकार पत्रावर नाव विभावरी मॅडमचंच आहे, पण फोटो भलत्याच मुलीचा आहे. मग विभावरी मॅडम म्हणाल्या की ज्या तारखेचं अधिकार पत्र आहे त्या दिवशी त्या अमेरिकेतच होत्या. आणि मग लक्षात आलं की अधिकार पत्र अमेरिकेत केलेलं असायला हवं होतं. पण ते तर नंदुरबार ला केलं आहे. मग आम्हा सगळ्यांच्याच लक्षात आलं की विभावरी मॅडमच्या मैत्रिणीनीच हा सगळा घोळ केला आहे. आणि आम्ही दोघंही फसवल्या गेलो आहोत. हे लक्षात आल्यावर आम्ही पोलिस स्टेशन ला गेलो आणि jointly तक्रार नोंदवली. दुसऱ्याच दिवशी बँकेत आल्यावर साहेबांना घडलेल्या प्रकाराची पूर्ण कल्पना दिली. तक्रारीची कॉपी सुद्धा साहेबांना दिली. ती तुमच्या कडे असेलच.”
“हो. आहे आमच्या कडे. पण आम्हाला सांगा की तुमच्या घराची मूळ मालकीण आता अमेरिकेतून नेहमी साठी भारतात आली आहे का ?” पहिला सदस्य.
“हो.” – किशोर.
“आम्हाला त्यांच्याशी सुद्धा बोलायचं आहे. त्यांचा फोन नंबर, पत्ता काही आहे का तुमच्याकडे ?” पहिला सदस्य.
“फोन नंबर आहे.” – किशोर.
“द्या.” पहिला सदस्य. “तुम्ही ज्या मुली बद्दल तक्रार नोंदवली होती त्या तपासाची काय प्रगती आहे ?”
“सर, आम्हाला तर पोलिस फक्त “तपास सुरू आहे” एवढंच सांगतात, तुम्ही विचारले तर कदाचित खरं काय ते सांगतील.” – किशोर.
“ठीक आहे. आत्ता साठी एवढंच पुरे. जरूर पडली तर पुन्हा यावं लागेल.” मुख्य सदस्य.
“येईन साहेब.” – किशोर.
“ठीक आहे. या. तुम्ही.” - दूसरा सदस्य.
“सर,” किशोर म्हणाला. “या सर्व प्रकारात माझा काहीच हात नाहीये. मग मला का शिक्षा होणार आहे ?”
“हे बघा, आम्ही चौकशी करतो आहोत. हा फ्रॉड तुम्ही केला असं आम्ही अजून, म्हंटलं नाहीये. पण तुम्ही बँक कर्मचारी आहात, आणि एक गोष्ट तुम्हीही मान्य कराल की सिक्युरिटी म्हणून तुम्ही ज्या प्रॉपर्टी चे पेपर बँकेला दिले आहेत, त्याचा आता काही उपयोग नाहीये, त्यामुळे कर्जाची परतफेड कशी व्हायला पाहिजे या बद्दल चा निर्णय हा घ्यावाच लागणार आहे. आम्ही आता वकिलांशी बोलून पुढे काय करायचं ते ठरवू. या तुम्ही.” – मुख्य सदस्यांनी समारोप केला.
बाहेर आल्यावर त्याला स्कूटीवर बसून चहा पित असलेली विभावरी दिसली. तिच्या कडे बघून तो हसला. म्हणाला
“अहो तासभर तुम्ही इथे बसला आहात ? कमाल आहे.” – किशोर.
“आमचे शूर सैनिक रणांगणावर लढत असतांना आम्ही कसे स्वस्थ बसू शकतो ?” – विभावरी म्हणाली. “काय घडलं ते सांगा ना. चेहऱ्यावर उदासी दिसत नाहीये त्या अर्थी फारसं grilling झालेलं दिसत नाहीये.”
“नाही. कदाचित पहिलाच राऊंड होता त्यामुळे फारसं काही गंभीर वातावरण नव्हतं. बरं. चलायचं का घरी.” – किशोर.
“चला.” – विभावरी.
घरी गेल्यावर किशोरनी, आईला काय काय झालं ते सविस्तर सांगितलं.
“अरे पण ही कुठे भेटली तुला ?” – आई.
“अग हिची पण कमाल आहे. मी रीजनल ऑफिस ला पोचलो, तर ही तिथे आधीच येऊन पोचली होती. मला म्हणाली की बेस्ट लक द्यायला आली आहे म्हणून. आणि मी बाहेर येई पर्यन्त थांबली होती. टपरीवर चहा पीत. किती कप चहा प्यायला देव जाणे. कमाल आहे की नाही हिची.” किशोर म्हणाला.
विभावरी त्यांचं बोलणं ऐकत होती. तिला खळखळून हसायला आलं.
किशोरला नवल वाटलं आणि तो म्हणाला
“आता हिला काय झालं हसायला ? मी कौतुकानी सांगत होतो तर हिला तो विनोद वाटला का ?” – किशोर गोंधळून म्हणाला.
माईंना पण समजेना, त्या पण म्हणाल्या
“काय ग, काय झालं एवढं हसायला ?”
“काही नाही उशिरा का होईना, ट्रेन ट्रॅक वर आली. म्हणून.” – विभावरी.
“म्हणजे काय ? नीट सांग बाई, काही कळलं नाही.” -माई
“इतके दिवस ह्यांनी मला, मॅडम मॅडम, असं म्हणून वैताग आणला होता. मी याच्या आधी एकदा म्हंटलं सुद्धा होतं की मला मॅडम म्हणू नका, तर म्हणे स्त्रियांना आदर द्यायचा असतो. आज आपसूकच ते आदराचं कवच गळून पडलं म्हणून हसायला आलं.” – विभावरी अजून हसतच होती.
आता माईंच्या आणि किशोरच्या लक्षात आलं आणि त्यांना पण हसायला आलं. तिघांचेही मोकळेपणाचं हसणं एकमेकांशी अधिकच जवळीक निर्माण करून गेली.
मग माई म्हणाल्या की “मी चहा करते, का काही खायलाच करू का ? छान वाटेल.”
“चालेल. चालेल, तुमच्या हाताचं खायला मी संधीच शोधत असते. आणि मग आपण बाहेरच जेवायला जाऊ. किशोर सर, कशी आहे आयडिया ?” – विभावरी
“आयडिया चांगली आहे पण हे “सर” ड्रॉप केलं तर.” किशोर नी अट टाकली.
“माई, पुरुषांना अहो च म्हणायचं असतं ना ? आदराची भावना असते त्यात.” – विभावरी.
“मला तुमच्या वादात ओढू नका. काय ते तुम्हीच दोघं बघून घ्या.” – माई.
“माझी अट पक्की आहे.” किशोरचं फायनल उत्तर.
“तुम्हाला अरे तुरे करायला मजा येत नाही. किशोर सरच ठीक आहे.” – विभावरी.
“आई, नाश्ता कॅन्सल. आपणं घरीच जेवू. ही मुलगी खुपच हट्टी दिसते आहे.”– किशोर.
“ओके. नाही म्हणणार तुला सर. मग तर झालं.” विभावरीनी तह केला.
नाश्ता करतांना विभावरी म्हणाली,
“माई हा तुमचा लेक खूप चिडका आहे. एवढ्याशा कारणावरून किती चिडला ! नाश्ता कॅन्सल करायला निघाला होता.” आणि किशोर कडे बघून नाक उडवलं.
विभावरीच्या या उद्गारावर जबरदस्त रणकंदन माजलं. पण मग दोघांनीही, काही निष्पन्न निघत नाही असं म्हणून, तह केला. माई हे सगळं पहात होत्या आणि त्यांना मनातल्या मनात आनंद पण होत होता.
पोहे खातांना विभावरी म्हणाली.
“ऊं, वा. किती मस्त झाले आहेत पोहे. माई, एकदम वऱ्हाडी स्टाइल झाले आहेत. मला खूपच आवडले. किती दिवसांनी अशी चव मिळाली.” विभावरीचा चेहराच सांगत होता की तिला पोहे किती आवडले आहेत ते.
“मला तर भीतीच वाटत होती की तुला आवडतील की नाही म्हणून. जरा तेल जास्तच आहे न, म्हणून.” माई म्हणाल्या.
“अहो मला असेच आवडतात. अकोल्याची आहे ना मी.” – विभावरी.
“तू अकोल्याची आहेस ?” माईंना आश्चर्य वाटलं.
“होss. का हो असं का विचारलं ?” – विभावरी.
“अग आम्ही पण अकोल्याचेच. तुम्ही कुठे राहत होता ?” – माई.
“जठारपेठेत मुकुंद मंदिर आहे न, त्याच्या मागच्या गल्लीत.” – विभावरी.
“आमचं घर पण जवळच आहे. बघ. पृथ्वी गोल आहे. अकोल्यातली माणसं पुण्याला भेटली.” माईनी बोलून दाखवलं.
“अहो म्हणूनच आपल्या तारा जुळल्या.” आपोआप विभावरीचं अनुमोदन.
क्रमश: ..........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.