Power of Attorney - 4 books and stories free download online pdf in Marathi

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 4

पॉवर ऑफ अटर्नी 

भाग  ४

भाग ३ वरुन पुढे  वाचा

“विभावरी मॅडम लोकं आपल्याकडे बघताहेत, स्वत:ला सावरा.” विभावरीनी त्याच्याकडे पाहीलं. डोळे पाणावलेले आणि नाकाचा शेंडा लाल लाल झाला होता. तिने पर्स मधून रूमाल काढला आणि चेहरा पुसला. किशोर कडे बघून हसली. म्हणाली

“किशोर सर, तुम्ही नका काळजी करू तुम्ही काहीच गुन्हा केला नाहीये, उलट तुम्हीच फसवल्या गेले आहात. देव इतका निष्ठुर नाहीये. सगळं काही ठीक होईल. मला विश्वास आहे.”

किशोर हसला. म्हणाला “जेंव्हा कोणी तुमच्याबद्दल आपलेपणाने बोलतो तेंव्हा इतकं बरं वाटतं. विभावरी मॅडम थॅंक यू.”

“किशोर सर, मला जे जाणवलं तेच मी बोलले. माझं तर फक्त आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही म्हणता त्या प्रमाणे ती temporary phase आहे. तुम्ही तर काळजावर दगड ठेवून वावरता आहात. सर तुमची कमाल आहे. तुम्हाला समजण्यात त्या दिवशी मी मोठी चूक केली. तुम्हाला वाट्टेल तसं बोलले. त्या बद्दल मी तुमची माफी मागते. माफ करा मला किशोर सर.” विभावरीचा स्वर आता जरा हळवा झाला होता.

“अहो मॅडम, त्या दिवशीची परिस्थितीच इतकी विचित्र होती की तुमच्या जागी कोणीही असतं, तरी त्याचा संयम सुटला असता, इतकं मनाला लावून घेऊ नका. खरं तर तुमच्याशी बोलल्यावर माझं मन एकदम हलकं झालं बघा. मीच उलट तुम्हाला थॅंक्स द्यायला पाहिजेत. तुम्ही मला भेटायचं नाकारू शकला असता, कारण तुमच्या या परिस्थितीला, एक प्रकारे मी पण कारणीभूत आहेच, पण तुम्ही वेगळा विचार केलात आणि इथे आलात. मला फार बरं वाटलं. थॅंक्स.” किशोरनी समजूतदारपणा दाखवला. पुढे म्हणाला. “पण एक विचारू का ?”

“काय ?” – विभावरी.

“सानिका तुमच्याच बरोबर राहत होती, म्हणजे ती तुमची जिवलग मैत्रीण होती मग एवढी फसवणूक कशी केली तिने ?” किशोरचा प्रश्न

“काहीच समजत नाहीये हो, म्हणजे सानिका असं काही करेल यावर अजूनही माझा विश्वासच बसत नाहीये.” विभावारी उत्तरली.

किती वर्षं ओळखता तुम्ही तिला ? – किशोर

“लहानपणा पासून. अहो अकोल्याची आहे ती. जवळच राहायची. शाळेत आम्ही बरोबरच होतो. पण मग मी पुण्याला आले आणि संपर्क तुटला. मग एक दिवस अचानक मला ती बाजारात दिसली. ती इथल्याच एका कंपनीत जॉब करत होती. मग आमच्या भेटी होत राहिल्या. एक दिवस मी तिच्या रूम वर गेले होते, आणि तिची रूम आणि तिथलं वातावरण पाहून मला तिची कीव आली. माझी बालपणीची मैत्रीण होती ती. म्हणून मग मी तिला माझ्या फ्लॅट वर घेऊन आले. तिची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. वरतून तिला अकोल्याला, आईला पैसे पाठवावे लागायचे. माझ्या बरोबर राहत असल्याने तिचं घरभाडं आणि खाण्या पिण्याचा खर्च वाचला आणि ती आईला जास्त पैसे पाठवू शकली. चांगलं चाललं होतं आमचं.” विभावरीने तपशीलवार सांगितलं.  

“एवढं सगळं तुम्ही तिच्या साठी करत होता तरीही तिने तुमचा असा विश्वासघात केला ? माणसं अशी का वागतात हे कळत नाही. कठीणच आहे सर्व.” – किशोर

“तिला पैशांची जरूर असती आणि तिने मला मागितले असते तर मी दिले असते. पण तिने हा मार्ग का घेतला हे मलाही कळत नाहीये. ती जेंव्हा भेटेल तेंव्हाच खरं काय ते कळेल.” विभावारी म्हणाली.

“हूं” – किशोर

डोसा खाऊन झाला होता आणि कॉफी टेबल वर आली होती.

“कॉफी पिऊन निघूया, घरी वाट बघत असतील. उशीर झाला तर प्रश्नांच्या फैरी, नकोच ते.” विभावरीने सुचवलं.

किशोरनी संमती दर्शक मान हलवली. म्हणाला

“यस. उशीर नको व्हायला.” किशोर म्हणाला. “कॉफी संपली की निघूच आपण. विभावरी मॅडम अजून एक विचारू का ?”

विभावरीनी प्रश्नार्थक मुद्रा केली, हसली आणि म्हणाली

“विचारा की.”

“तुम्ही मघाशी मला सर म्हणालात, हे “सर” प्रकरण काय आहे ?” – किशोर.

“तुम्ही मला सारखं मॅडम, मॅडम म्हणता, मग मला, तुम्हाला सर म्हणावच लागेल ना, नाहीतर वाईट दिसेल.” विभावरीचं उत्तर.

“अहो मी काही ऑफिसर नाहीये आणि मला बँकेत सुद्धा कोणीच सर म्हणत नाहीत. माझ्या कानाला सवयच नाही  त्याची. तुम्ही पण नका म्हणू.” – किशोर.  

“मग तुम्ही पण मला मॅडम म्हणू नका.” – विभावरी.

“अहो मान घेण्याचा स्त्रियांचा जन्म सिद्ध अधिकार आहे.” किशोर म्हणाला. “त्यामुळे तो मान मी तुम्हाला द्यायलाच पाहिजे. त्यामुळे विभावरी मॅडम हेच संबोधन बरोबर आहे.”

कॉफी संपली. किशोर बिल देत होता पण विभावरीनी त्याला अडवलं म्हणाली

“दोन दिवस तुम्हाला ताटकळत ठेवलं म्हणून आज मी बिल देणार.”

बाहेर पडल्यावर किशोरनी तिला शुभेच्छा दिल्या.

“शुभेच्छा कशा साठी ?” विभावरीनी विचारलं.

“घरी पोचल्यावर तुम्हाला प्रश्नांच्या फैरी ला सामोरं जावं लागू नये म्हणून.” – किशोर.

विभावरी दिलखुलास हसली. म्हणाली

“गुड नाइट, बाय. भेटू लवकरच.”

“My pleasure” किशोरनी म्हंटलं आणि हात हलवून बाय केल.

घरी जातांना किशोर चं मन हलकं झालं होतं. विभावरी ज्या आत्मीयतेने बोलत होती, ते पाहून त्याला खूप रिलीफ वाटला. अगोदर त्याला जरा धाकधुकच होती की ती कशी वागेल ? कशी बोलेल, कारण पहिल्या दिवशीचा अनुभव तितकासा चांगला नव्हता. पण विभावरीनी सर्व शंका खोट्या ठरवल्या.

घरी गेल्यावर आईला त्यानी, पूर्ण वृत्तान्त दिला. तो अगदी भरभरून विभावरी बद्दल बोलत होता आणि आई त्याच्याकडे आश्चर्याने पहात होती, विचार करत होती की गाडी वेगळ्याच वळणावर जाते आहे बहुधा. पण ती काही बोलली नाही.

विभावरीशी भेट झाल्या मुळे किशोर पण आता सावरला होता. पूर्वीसारखाच कामात लक्ष घालत होता. मधेच केंव्हा तरी मॅनेजर म्हणाला की

“रीजनल ऑफिस मधून फोन आला होता. या सगळ्या घटनेवर चौकशी समिती बसवली आहे. पुढे काय अॅक्शन  घ्यायची ते ही समिती ठरवेल.”

“मग आपली पण चौकशी होईल का ?” किशोर नी विचारलं.

“हो यात जे, जे लोकं निर्णय प्रक्रियेत आहेत, त्या सगळ्यांची चौकशी होणार. तू लाग कामाला. आता जे होईल त्याला तोंड द्यावच लागणार आहे. खूप मोठा घोळ घालून ठेवला आहेस तू.” – मॅनेजर.   

पण किशोरला आता भीती नाही वाटली. विभावरी म्हणाली होती की सगळं ठीक होईल म्हणून. त्याचं मन त्याला सांगत होतं की विभावरीचा तुझ्यावर विश्वास आहे मग जगाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. किशोर च्या चेहऱ्यावर काहीच बदल दिसला नाही म्हणून मॅनेजरला पण आश्चर्य वाटलं. म्हणाला

“किशोर, मला वाटलं होतं, की ही बातमी दिल्यावर तू जरा डिस्टर्ब होशील, पण तसं काही दिसत नाहीये.” – मॅनेजर.

“काय कारण आहे साहेब डिस्टर्ब होण्याचं ? कर नाही त्याला डर कशाची.” आणि असं म्हणून किशोर आपल्या जागेवर गेला. मॅनेजर ने खांदे उडवले आणि तो पण कामाला लागला.

शनिवारी दुपारी विभावरीचा फोन आला पण त्या दिवशी किशोर कॅश वर होता, आणि क्लोजिंग करायचं असल्यामुळे त्याला बोलायला अजिबात वेळ नव्हता. त्याला वाईट वाटलं पण इलाज नव्हता. त्यांनी फोन घेतलाच नाही. थोड्या वेळाने पुन्हा फोन आला पण त्या वेळेला सुद्धा तो अनुत्तरित गेला. विभावरीला कळत नव्हतं की किशोर असं का वागतो आहे ते. पण असेल काही कारण, असा विचार केला आणि मग तिने नंतर पुन्हा फोन केला नाही.

त्या दिवशी किशोर साडे सात वाजता किशोर मोकळा झाला, आणि मग त्यानी विभावरीचा नंबर फिरवला.

“हॅलो, विभावरी मॅडम, मी किशोर बोलतो आहे.”

“हॅलो सर, मी केंव्हा पासून तुम्हाला फोन करते आहे पण तुम्ही उत्तरच देत नाहीये. काय झालंय ? माझा राग आला आहे का ?” – विभावरी.

“नाही, नाही, आज मी कॅश वर होतो. कॅश वर असतांना इकडे तिकडे लक्ष्य द्यायला जराही फुरसत नसते, म्हणून फोन उचलायला जमलं नाही इतकंच. तुम्ही बोला काय विशेष ?” किशोर म्हणाला.

“अहो विशेष काही नाही. म्हंटलं की आज शनिवार आहे, आम्हाला सुट्टी असते तर विचार आला की तुम्हाला भेटावं म्हणून, पण आता फार उशीर झाला आहे आणि तुम्ही अजून बँकेतच आहात का ?” – विभावरी

“हो मी आता निघतोच आहे. फार दमणूक झाली आहे आज. पण आपण उद्या नक्कीच भेटू शकतो. रविवार आहे. दोघांनाही सुट्टी”. – किशोर

“आपण उद्या लंच करू कुठे तरी, चालेल ?” विभावरीनी विचारलं.

किशोर विचारात पडला लंच आणि ते ही एका मुली बरोबर म्हणजे चांगल्या हॉटेलात जावं लागणार याचा अर्थ हजाराच्या आसपास खर्च आरामात येणार. आत्ताच्या परिस्थितीत आपल्याला हा खर्च झेपणार आहे का ? या प्रश्नाला त्याच्या जवळ उत्तर नव्हतं. त्याला गप्प बसलेलं बघून विभावरी म्हणाली की

“काय हो काय झालं ?”

“नाही, कुठे काय ? चालेल ना.” किशोरचं उत्तर.

“मग एवढा विचार कसला करत होता ?” – विभावरी.

“अहो आई घरी एकटी असेल ना म्हणून.” किशोर नी वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला.

“अहो रोज तुम्ही ऑफिस ला जाता तेंव्हा आई एकटीच घरात असते न, मग ?” आता विभावरी ऐकायला तयार नव्हती.

“अहो तसं नाही. निदान आठवड्यातून एकदा तरी बरोबर जेवायला पाहिजे ना, तिला तेवढंच बरं वाटतं.” किशोर नी आपल्या म्हणण्याची पुष्टि केली. समर्पक कारण मिळालं म्हणून तो स्वत:वरच खुश झाला. पण विभावरी पिच्छा सोडायला तयार नव्हती. ती म्हणाली

“मग आपण तिघंही जाऊ, तसंही मला तुमच्या आईची, माझ्या त्या दिवसांच्या वागण्याबद्दल, क्षमा मागायचीच आहे. मग तर हरकत नाही ?”

आता किशोर जवळ काहीच कारण उरलं नव्हतं. तरी शेवटचा प्रयत्न म्हणून तो म्हणाला

“आईला विचारून बघतो. ती कधी कुठे बाहेर जात नाही. तिला जर हरकत नसेल तर जाऊ.”

“ठीक आहे मग कळवा तसं. मी वाट पाहते तुमच्या फोनची.’ – विभावरी.

“कळवतो बाय.”- किशोर.

“बाय.” – विभावरी.  

 

क्रमश: ..........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर जरूर लाइक करा.

धन्यवाद. 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED