Power of Attorney - 10 books and stories free download online pdf in Marathi

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 10

पॉवर ऑफ अटर्नी

भाग  १०

भाग ९  वरुन पुढे  वाचा

“नाही. तुझ्या या अश्या अवस्थेत तुला मी एकटं सोडायला तयार नाही. तुला हवं तर तू काकांकडे जा , किंवा किशोर येईल तुझ्या बरोबर, हॉस्टेल वर जाऊन तू कपडे घेऊन ये. काय करतेस ?” माई म्हणाल्या.

विभावरीनी दोन मिनिटं विचार केला मग म्हणाली की “काकांकडे नको, ते अजून मलाच बोलतील. पण माई, मी इथे राहणं बरोबर दिसेल का ? शेजारी, पाजारी काय विचार करतील ? लोकं काय म्हणतील ?”

“तू स्वत:चा विचार कर, लोकांचा नको. लोकं काय दोन्ही बाजूंनी बोलतात. तू जा किशोर बरोबर आणि सामान घेऊन ये. आता जास्त विचार करू नकोस.” माईंनी निक्षून सांगितलं. 

त्या दिवशी रात्री विभावरी किशोर कडेच राहिली. तिला झोप लागे पर्यन्त माई तिथेच तिच्या जवळच बसून तिच्याशी बोलत होत्या. तिला शांत करत होत्या.  दुसऱ्या दिवशी, किशोर बँकेत गेला आणि हाफ डे घेऊन घरी आला. विभावरी सुट्टी घेऊन घरीच थांबली होती. दुपारी किशोर आल्यावर दोघेही कामिशनर ऑफिस मधे गेले. जातांना माईंनी आशीर्वाद दिला. म्हणाल्या

“जा आणि फत्ते करून या.”

ऑफिस मध्ये गेल्यावर शिपायाने विचारले

“कोणाला भेटायचं आहे ?”

किशोर म्हणाला  की “साहेब कोणाला भेटायचं हे आम्हाला कळत नाहीये, पण आम्ही फार अडचणीत आहोत. तुम्हीच सांगा.”

मग किशोर विभावरीला म्हणाला की “विभावरी, तूच सांगतेस का ? तुला व्यवस्थित बोलता येतं. माझा जरा गोंधळ उडतो.”

शिपाई म्हणाला की “कोणीही सांगा. तुमची अडचण काय आहे ते कळल्यावर सांगू शकेन की नेमकं कोणाला भेटायचं ते.”

विभावरी सुरवात करणार इतक्यात .. तिचं नाव कोणी तरी पुकारत होतं

“विभावरी तू इकडे कुठे ? काय प्रॉब्लेम झाला आहे ?”

कोणी तरी तिला आवाज देत होतं, कमिशनर ऑफिस मधे तिच्या नावाने तिला कोण हाक मारत होतं ? तिला कळेना.

“काय झालं ? विभावरी, इथे कमिशनर ऑफिस मधे कशी तू ?”

विभावरी बघत होती. तिला काही केल्या त्या माणसाची ओळख लागत नव्हती. त्या अधिकार्‍याच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी डोक्यावरची कॅप काढली. आता विभावरीला ओळख पटली, तिला एकदम हायसं वाटलं. आता नक्की काम होईल असा विश्वास वाटला. ते उत्तम राव निंबाळकर, असिस्टंट  कमिश्नर होते. अकोल्याला विभावरीच्या शेजारीच त्यांच घर होतं. विभावरीचे वडील गेल्यावर त्यांची फार मदत झाली होती.

“उत्तम काका! तुम्ही इथे कसे ?” विभावरी चा प्रश्न

“अग माझी ट्रान्सफर झाली. चार महीने झालेत. बरं ते जाऊ दे. तू कशाला आली होतीस, काय कारण झालंय ?” उत्तम रावांनी विचारलं.

मग विभावरीने मुळापासून सर्व कथा सांगितली. बँकेच्या मीटिंग मधे काय झालं ते ही सांगितलं.

“ओके. विभावरी तू आता निश्चिंत घरी जा. मी स्वत: यात लक्ष घालतो आणि बघतो की लवकरात लवकर सानिकाचा शोध कसा लागेल ते.  ठीक आहे ?” उत्तम रावांनी दिलासा दिला.

विभावरीने मान हलवली.

“पण विभावरी, ज्याला सानिकानी घर विकलं त्याचं काय म्हणण आहे ? तुला त्याच्या बद्दल काही संशय आहे का ? तो सानिकाला सामील असू शकतो का ?” उत्तम रावांचा सहज प्रश्न

“नाही काका, यांची ओळख करून देते. हे किशोर, यांनीच सानिका कडून ३५ लाखांना माझा फ्लॅट घेतला त्या साठी त्यांनी बँकेतून २० लाखाच लोन घेतलं. त्यांनी बँकेतून जे लोन घेतलं, आता त्या बद्दल चौकशी समिती बँकेने बसवली आहे.” आणि मग म्हणाली “माझ्या बरोबर त्यांची पण फसवणूक झाली आहे. म्हणून तक्रार सुद्धा आम्ही दोघांनी मिळून फाइल केली आहे” विभावरीने डीटेल मधे सांगितलं.

“ठीक आहे. तू आता मुळीच काळजी करू नकोस आणि सगळं माझ्यावर सोड` निश्चिंत मनाने घरी जा. तुझा फोन नंबर मला दे. काही अपडेट असेल तर ते मी तुला देईन. पण याच बरोबर तुम्ही एक काम करा एखादा वकील करा. तो बरोबर ही केस handle करेल. जितक्या लवकर तुम्ही हे कराल तेवढं बरं. मी इथे नवीन आहे त्यामुळे मी कोणाचं नाव सुचवू शकणार नाही. कुणी ओळखीचं असेल तर बघा. ठीक आहे ?” उत्तम राव म्हणाले. त्यामुळे विभावरी आणि किशोरला धीर आला.

“हो काका करतो आम्ही तुम्ही म्हणता तसं.” – विभावरी.

विभावरीच्या मनावर जे ओझं आलं होतं ते आता उतरलं. आणि दोघंही मग शांत मनाने घरी परतली.

घरी आल्यावर दोघांनी आईला सर्व अपडेट दिलं. आईचं पण समाधान झालं. ती विभावरीला म्हणाली

“देवालाच सगळी काळजी. त्यानीच तुझ्या मदती साठी उत्तम काकांची इथे बदली केली. आता काळजी मिटली. आता सर्व काही सुरळीत होईल. चिंता करू नका. काय गोड करू ? विभावरी, तुला शिरा  आवडतो का ? की खीर करू ?”

“शिराच करा माई, छान सत्य नारायणाच्या प्रसादा सारखा. मला खूप आवडतो.” विभावरीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. 

“आई ही मुलगी डेंजर आहे हं. लगेच आवडी निवडी सांगायला लागली. मी काय  म्हणतो माणसानी जे समोर येईल ते खावं. लोकांच्या कडे जाऊन आवडी निवडी सांगणं बरं नव्हे.” किशोरनी चिडवलं.

“माई मी कोणी लोक आहे का हो  ?” विभावरी कृतक कोपानी म्हणाली 

माईंनी तिला जवळ घेतलं म्हणाल्या

“तू त्याच्या कडे लक्ष देऊ नकोस. तू घरचीच आहेस आणि तुझा हट्ट पुरवायला मी खमकी, उभी आहे ना इथे. किशोर चा काय संबंध आहे ? किशोर, आमच्या मध्ये तुला लुडबूड करायची असेल तर बाहेर जा.”

माईंनी असं म्हणल्यावर विभावरीने त्याला अंगठा दाखवला आणि भुंवया उडवून हसली.

“आई, तू पार्टी बदलते आहेस. हे बरोबर नाहीये.” किशोर बोलला.

“मी मुळीच पार्टी बदलत नाहीये. आम्ही एकाच पार्टीत आहोत आणि आमची पार्टी तुझ्याच बाजूने आहे. काय विभावरी बरोबर बोलते आहे ना ?” माई हसून बोलल्या

“हो माई एकदम बरोबर.” आणि किशोर कडे बघून म्हणाली

“आमची दोघींचीही एकच पार्टी आहे समजलं का ?” आणि पुन्हा मस्त हसली.

तिचं ते निर्मळ निरागस हास्य बघून किशोर पार विरघळला.  

त्या दिवशी पण माईंनी विभावरीला ठेऊन घेतलं. दुसऱ्या दिवशी ऑफिस ला जातांना विभावरी एकदम फ्रेश होती. उत्तम काका भेटल्या मुळे, चिंतेचं, जे सावट मनावर आलं होतं ते दूर झालं होतं. तिचा चमकता चेहरा पाहून माईंनी म्हंटलं की

“थांब जरा. इतकी सुंदर दिसते आहेस, तुझी दृष्ट काढते. थांब. आलेच मी.”

किशोर तिथेच होता, विभावरीचं त्याच्या कडे लक्ष गेलं तो तिच्याच कडे कौतुकानी अनिमिश नेत्रानी बघत होता, आणि हे बघून विभावरी लाजलीच एकदम. माईंनी अचानक तिच्या गालावर काजळाचं  बोट लावलं. विभावरीला आता तिथे थांबणं अशक्य झालं आणि ती पळालीच तिथून. किशोर मोठ्याने हसला. त्याचं हसणं तिचं पाठलाग करत राहीलं ते थेट तिच्या ऑफिस पर्यन्त. त्या दिवशी विभावरीने समितीच्या एका सदस्याला फोन करून भेटीची वेळ मागीतली. संध्याकाळी पांच वाजता ती बाहेर पडली बँकेच्या रीजनल ऑफिस मधे जायला.

विभावरी चौकशी समितीच्या समोर बसली होती.

“विभावरी मॅडम असं काय सांगायचं आहे तुम्हाला की आम्हाला तुमच्या साठी विशेष मीटिंग बोलवावी लागली.” समितीच्या एका सदस्यांनी विचारलं.

“अगदी थोडक्यात सांगते. किशोर सांगत होता की लोन च्या रकमेचा ताबडतोब भरणा करावा लागणार आहे म्हणून. त्याच संदर्भात बोलायचं आहे.” विभावरीने कारण सांगितलं. 

“तो तर करावाच लागणार आहे कारण जे घर तारण म्हणून ठेवलं आहे ते आता त्याचं राहिलं नाहीये.” – सदस्य

“पण साहेब, एक रकमी एवढी रक्कम कुठून आणणार  तो. ?” – विभावरी

“हे बघा कर्ज तारणावर दिल्या जातं, आता तारण नाही म्हंटल्यावर कर्ज तर वापस करावंच  लागणार.” सदस्यांनी समजावलं. 

विभावरीने मान हलवली आणि म्हणाली

“बरोबर आहे तुमचं म्हणण सर, पण तो फ्लॅट माझा आहे आणि त्याची सर्व valid कागद पत्रे माझ्या जवळ आहेत. तुम्ही म्हणता, की आता ती प्रॉपर्टी किशोरची नाहीये, पण त्याची जर नाहीये, तर माझी तर आहेच. मग मी जर ती प्रॉपर्टी बँके कडे तारण म्हणून ठेवली तर कर्ज जसं ठरलं आहे त्या प्रमाणे हप्त्या हप्त्या ने भरता येईल का ?”

“पण अहो, असं कोणीच करत नाही. मग तुम्ही असं का कराल ?” सदस्य आश्चर्याने म्हणाला. या अगोदर असं कोणी म्हंटल्याचं उदाहरण नव्हतं.

“माझी तयारी आहे. किशोर पण माझ्या सारखाच फसवल्या गेला आहे. या सर्व प्रकरणात तो उगाचच पोळल्या जातो आहे, ते ही त्याची काही चूक नसतांना, म्हणून.” विभावरीने आपला मुद्दा समोर केला.

“पण तुमचं यात नुकसान आहे. पुढे मागे जर तुम्हाला फ्लॅट विकायचा असेल तर बँकेच्या फ्लॅट वर असलेल्या चार्ज मुळे  तो तुम्हाला विकता येणार नाही.” – सदस्य 

“चालेल मला. तसंही मला तो विकायचा नाहीये.” विभावरीने मोहोर उठवली. 

“तुमची तयारी असेल तर बँक lenient view घेऊ शकते. पण खात्रीपूर्वक असं काही आत्ताच सांगू शकत नाही. तो फ्लॅट तुमचाच आहे हे पण सिद्ध व्हायला पाहिजे.” सदस्य अजून ऐकायला तयार नव्हता.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद. 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED