पॉवर ऑफ अटर्नी - भाग 5 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 5

पॉवर ऑफ अटर्नी 

 भाग  ५

भाग ४  वरुन पुढे  वाचा

किशोर घरी गेल्यावर चहा पिता पिता आईशी बोलत होता. रोज दिवसभराचं अपडेट देण्याची त्याची सवय होती. विभावरीनी सांगीतलेली  सानिकांची कथा सांगून झाली. हे सगळं पुराण ऐकल्यावर आई खूपच हळहळली. म्हणाली

“एवढं सगळं तिने सानिकासाठी केलं म्हणजे एक प्रकारे धाकट्या बहि‍णीसारखी सांभाळतच होती तिला. पण तिने अशी परतफेड का केली असावी हे काही समजत नाही. कृतघ्न पणाचा कळसच गाठला. काय म्हणावं या पोरीला ? विभावरीला केवढा धक्का बसला असेल यांची कल्पनाच करवत नाही. बिचारी विभावरी!” आईने संवेदना प्रकट केली. 

“धक्का बसला आहेच. पण आता सावरली आहे. म्हणत होती की, आपण सगळे उद्या जेवायला बाहेर जाऊ, म्हणजे आग्रहच धरला होता तिने.” – किशोर. 

“मी कशाला ? तुम्ही दोघं जा की.” आईची प्रतिक्रिया.

“अग मीच म्हंटलं तिला की जमणार नाही. रविवार हा एकच दिवस मिळतो मला आणि आईला एकत्र जेवणा साठी.” – किशोरनी सांगितलं. 

"मग ?” आईने विचारलं.

“ती म्हणाली की आपण तिघं जाऊ. आईंना पण आउटिंग होईल. मग मी सांगितलं की आईला विचारून सांगतो. आता तिला  फोन करायचा आहे.” – किशोर.

“अडचण काय आहे ? माझं नाव समोर करून काय साधायचं आहे तुला ? ती एवढं म्हणते आहे तर जा. त्या दिवशी उद्धट वाटली होती पण परवा आणि आज तू जे सांगतो आहेस,  त्यावरुन तरी पोरगी मनानी चांगली दिसते आहे.” – आई.

“अग ती चांगलीच आहे. पण हॉटेल मधे जेवायला जायचं म्हणजे हजार रुपयांचा तरी खर्च होईल. आपल्या आत्ताच्या परिस्थित असा वायफळ खर्च करणं बरोबर होईल असं मला वाटत नाहीये.” किशोर म्हणाला.

“तू म्हणतो आहेस ते ठीकच आहे. तू असं कर तिला म्हण की घरीच ये. मी तिच्या आवडीचं सगळं करते. विचार तिला.” – आई.  

“घरी बोलवायचं ? आपली फारशी ओळख नाहीये, येईल का ती ?” – किशोर.

“विचारून पहा. नाही तर असं कर तू फोन लाव, मी बोलते तिच्याशी.” – आई.  

किशोर विचारात पडला. काय करावं ? पण मग लावला त्यांनी फोन. पण विभावरीनी फोन उचलला नाही. तिचा मेसेज आला की मीच करते फोन थोड्या वेळाने. किशोरनी आईला तसं सांगितलं. आणि दोघंही तिच्या फोनची वाट बघत बसले.

“कसल्या तरी कामात असेल.” आई म्हणाली.

“नाही, मला वाटतं की तिथे काका काकू असतील म्हणून उचलला नसेल.” – किशोर

“का ? काका काकू असले तर काय होतं. ?” -आई

“त्यांच माझ्या विषयी चांगलं मत नाहीये. सानिका बरोबर मी संगनमत करून फ्लॅट बळकावला आहे असा त्यांचा समज आहे,  असं विभावरीच सांगत होती.” – किशोर.

“अग बाई, मग ती तुला भेटायला आली तरी कशी ?” आईचा प्रश्न

“त्यांना कल्पना न देता.” किशोर चं उत्तर.

फोन वाजला. विभावरीचाच होता. किशोरनी लगेच उचलला.

“हॅलो.” – किशोर.  

“हॅलो, काय ठरतंय मग ?” विभावरीनी विचारलं.

“आईशी बोलता का जरा. तुम्ही दोघी ठरवा, मला चालेल.” किशोर म्हणाला. आणि आईला फोन दिला.

“हॅलो कोण विभावरी का ?” आई एकदम एकेरीवरच आली.

“हो, मीच बोलते आहे. तुम्ही कशा आहात ?” – विभावरी.

“मी ठीक आहे. मी काय म्हणत होते तू घरीच ये ना. तुला काय आवडतं ते सांग, तुझ्या आवडीचं करते.” – आई.  

“अहो तुम्ही कशाला एवढा त्रास घेता ? आपण बाहेर गेलो तर तुम्हाला पण थोडंसं आउटिंग होईल. असं मला वाटतं.” – विभावरी.  

“अग नाही, माझ्या हातचं खाऊन पहा, हॉटेल चं नाव विसरशील. नाही आवडलं तर पुढच्या वेळी आपण बाहेर जाऊ. बघ विचार कर. तू शाकाहारी आहेस की ...” – आई.

“अहो काही प्रॉब्लेम नाहीये. मला सगळं चालतं आणि करता पण येतं. पण तुम्ही फारसा घाट घालू नका. अगदी साधा बेत करा. उगाच त्रास करून घेऊ नका.”  विभावरी विनंती वजा बोलली.

“मग ठरलं तर. उद्या सकाळी तू आमच्याकडे जेवायला येते आहेस.” – आई

“आई, असं करू, मी थोडी लवकर येते अकरा वाजायच्या सुमारास, म्हणजे तुमच्या वरच सगळा भार पडणार नाही” – विभावरी.

“अग तू कशाला ? तू पाहुणी म्हणून येणार आहेस, काम करायला काकांचं घर आहेच की. तुझ्या.” – आई.  

पण विभावरी ऐकायला तयार नव्हती. ती म्हणाली

“नको नको, तूमच्या एकटीच्या वर सगळा भार नको पडायला. मी थोडी लवकर येण्याचा प्रयत्न करते  तुम्ही नका काळजी करू.” – विभावरी.  

“बरं, माझं बोलून झालं आहे आता किशोरला देते.” – आई.  

“हॅलो काय भलतंच प्रॉमिस करून ठेवलं आहे तुम्ही ?” – किशोर.

“आता याच्यात भलतंच म्हणण्या सारखं, असं काय आहे ?” – विभावरी.

“ऐन वेळेवर निघतांना काका काकूं चा तोफ खाना चालू झाला तर ?” – किशोर.

“तुम्ही चिंता करू नका मी करेन मॅनेज.” – विभावरी.  

“ओके. भेटूया उद्या.” किशोरनी संभाषण संपलं असं समजून म्हंटलं.

“आता शेंडी लावण्यात मी एक्स्पर्ट झाली आहे.” विभावरी म्हणाली आणि छान हसली. किशोरला ते हसणं आवडून गेलं.

“ओके बाय” – विभावरी. 

फोन स्पीकर वर होता त्यामुळे आईने पण तिचं हसणं ऐकलं.

“कीती छान हसते रे विभावरी.” आईनी अभिप्राय दिला. आणि किशोरच लाजला. आई ते बघत होती आणि काही खूणगांठ बांधत होती. पण ती काही पुढे बोलली नाही.

दुसऱ्या दिवशी अकरा वाजून गेले तरी विभावरी आली नाही. आईला धास्ती पडली की ही पोरगी येते की नाही तसं तिने किशोरला बोलून पण दाखवलं.

येईल ती. काका काकूंनी काही ड्रामा केला असेल. अजून काही नाही. विभावरीला यायला १२ वाजले. तो पर्यन्त आईचा सर्व स्वयंपाक झाला होता. आणि दोघंही वाट पहात बसले होते. विभावरी आली आणि हुश्श करून सोफ्यावर बसली.

किशोरनी तिला पाणी दिलं.

“काय झालं ? एवढी दमलीस कशानी ?” आईनी विचारलं.

“काय सांगू ? नेहमीचाच ड्रामा. काका काकू उगाच आडवी तिडवी चौकशी करत होते. कंटाळा आला आहे मला आता त्या सगळ्या गोष्टीचा.” विभावरीचा सुर चिडका होता.

“अग काळजी वाटत असेल त्यांना. तू एवढं नको मनावर घेऊ.” आईनी  सारवा सारव करायचा प्रयत्न केला.

“अहो नाही, माणूस काळजी पोटी  बोलतो तेंव्हा कळतं ना. सुर वेगळा असतो. आणि माझी चुलत भावंडं, एक नंबरची वाह्यात आहेत. ती पण फार चोंबडे पणा करतात. त्रास होतो हो मला. कायम आपली डिटेक्टीव गीरी. छी.” विभावरी वैतागलेल्या स्वरात बोलली.

“अहो विभावरी मॅडम, जाऊ द्या. तुमचा मूड का खराब करता आहात. Forget it and enjoy. आईनी केवढी मेहनत घेतली आहे तुम्ही येणार म्हणून.” किशोर नी सांगून टाकलं.

“आई, I am sorry, मी म्हंटलं होतं की लवकर येईन म्हणून पण नाही जमलं हो, काय करू ?” -विभावरी.

“अग ठीक आहे. इतकं काही झालं नाहीये. पण मी एक विचारू का ? तुला खरंच एवढा त्रास होतो आहे का? नाही तर कुटुंबा मधे राहण्यात आनंद असतो. थोडी अॅडजस्टमेंट करावी लागते पण फायदे बरेच असतात.” आई नी आपलं मत दिलं.

“मी तुम्हाला माई म्हणू का ?” विभावरीनी अचानक विचारलं.

“म्हण की. चालेल मला, पण हे अचानक काय नवीनच ?” – आई.

“माई, अहो नवीन काही नाही. माई म्हणण सोप वाटतं म्हणून.” -विभावरी.

माई हसल्या. “चालेल मला. काही तरी संबोधन तर हवच आणि हे छानच आहे.”

“माई, माझा काय प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला माहीत नाही. अहो सगळंच अवघड आहे. आता काय सांगू तुम्हाला, काकांचा २ BHK flat आहे. मी गेल्या मुळे माझ्या दोघा भावंडांची जरा अडचण होते आहे. मी हॉल मधेच झोपते, पण कपडे वगैरे बदलताना मला खोलीची जरूर पडते, पण ते ही त्या दोघांना आवडत नाही. त्या बद्दल सारखी तक्रार करत असतात. काका, काकू काही बोलत नाहीत, पण ते त्यांच्या करवी बोलतात असं मला जाणवतेय. मी तिथे राहावं असं काकाच म्हणाले होते, पण ते वर वरचं होतं असं मला जाणवायला लागलं आहे. किंबहुना मला ती जाणीव व्हावी असंच ते लोकं वागतात.” विभावरी नी आपली व्यथा मांडली.

“हूं, असं असेल तर तू एखाद्या हॉस्टेल मध्ये का शिफ्ट होत नाहीयेस ? स्वतंत्र राहशील आणि संबंध पण राहतील.” – माई.  

“हो माई, मी एका हॉस्टेल मधे बूकिंग केलं आहे. २-४ दिवसांत जाईन मी तिथे.” विभावरी बोलली.

“चला. छान, शिफ्ट करतांना जर काही मदत लागली तर सांगा. मी येईन. आधी सांगितलं तर सुट्टी मागता येईल.” किशोर नी मदत देऊ केली.

“खरंच याल तुम्ही ? पण माझी एक अडचण आहे, माझं सामान खूप आहे. तुम्ही पाहीलच त्या दिवशी, ३-४ मोठमोठ्या बॅगा आहेत. हॉस्टेल वर एवढी जागा मिळणार नाही, तुमच्या कडे ठेवलं तर चालेल का ? काकांच्या कडे जवळ जवळ रोज जागा किती अडते, अशी कुरकुर चाललेली असते. विभावरीनी तिची अडचण सांगितली.

किशोर काही बोलायच्या आतच आईंनी सांगून टाकलं.

क्रमश: ..........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर जरूर लाइक करा.

धन्यवाद.