'आ हो ह्यो
हो' भारत स्टील्स
मधील शोकेस मधल्या
कुकर ने मोठ्याने
आळस दिला आणि
आळस देत देता
त्याचा धक्का लागला
त्याच्या जवळच बसलेल्या
बारक्या कढईच्या कानाला.
कढई लगेच करवादली,
'काय हो कुकर
मामा जरा आवरता
आळस दया ना माझ्या कानाला
केवढा धक्का लागला'
'बरं बाई! तूच
तेवढी धिटूकली राहिली
होती मला शिकवणारी.
एकाच जागेवर बसून
बसून अंग अगदी
अकडून गेलं माझं,
तुला काय कळणार
मोठ्यांच्या व्यथा. तुझं
बरं आहे मालक
जेव्हा फडकं मारतो
रोज आपल्यावरची धूळ
झटकण्यासाठी तेव्हा तू
जागच्या जागेवर गोल
गोल फिरून तरी
घेते पण माझं काय! मला
बुड हलवायला सुद्धा
जागा नाहीये या
जागेत. डावीकडे तू
आहे, उजवीकडे तर
बघायलाच नको काचेच्या
नाजूक बाउल बाई
बसलेल्या आहेत. त्यांना
जरा जरी धक्का
लागला की तहलका
होईल. '
'बापरे एक वाक्य
मी म्हंटल त्यावर
केवढं मोठ्ठं प्रवचन
दिलं
हो कुकर मामा',
कढई वैतागुन म्हणाली.
तेवढ्यात दुकानात एक पस्तिशीच्या
दोन गृहिणी आल्या.
"बोला मॅडम काय
हवंय तुम्हाला?",दुकानदार
"मला एक कुकर
दाखवा पाच लिटर
चा",त्यातील चष्माधारी गृहिणीने
म्हंटल आणि तिचं
हे वाक्य।ऐकताच शोकेस
मधल्या कुकर ने कान टवकारले.
"आणि मला कढई
दाखवा", दुसरी गृहिणी.
तिने असं म्हणताच
इकडे शोकेस मधल्या
धिटूकल्या कढईने उगीच
फुशारल्यासारखं केलं.
"अशी छोटी हवी
का?",असं दुकानदाराने
म्हणून शोकेस मधल्या
त्या धिटूकल्या कढईचा
कान धरून तिला
त्या बाईसमोर ठेवली.
तशी ती बाई
म्हणाली,"फार लहान
नको आणि फार मोठी नको,
मध्यम आकाराची दाखवा.",
असं तिने म्हणताच
धिटूकल्या कढई चा
चेहरा बघण्यासारखा झाला.
तोपर्यंत चष्माधारी गृहिणीने तो
कुकर सिलेक्ट केला
होता.
'सुटलो बाबा एकदाचा
केव्हा मनमोकळे पणे
शिटी वाजवेल असं
झालं होतं मला.',
कुकर
"नाव टाकून हवंय
का?",दुकानदार
"हो हे घ्या
मी माझं नाव
लिहून दिलं हेच
कुकर वर टाका.",चष्माधारी गृहिणी
'एकदाचा तो नाव
टाकण्याचा घरघर आवाज
करण्याचा कार्यक्रम संपला आणि
मी ऑफिशिअली धर्माधिकारी
झालो.',कुकर
धर्माधिकारी मॅडमच्या पिशवीत जाण्याआधी
मी दुकानातील सगळ्या
भांड्यांना वाकून वाकून
वाकुल्या दाखवल्या. त्या धिटूकल्या
कढई ला तर जरा जास्तच
दाखवल्या.
धर्माधिकारी मॅडम च्या
स्कुटी वर मी ऐटीत बसून
रस्त्यावरची रहदारी बघू
लागलो. असंच इकडे
तिकडे बघता बघता
'लोहा लोखंडवाला' असं
ओरडत एक गाडी चालली होती
ती बघून मला
धक्काच बसला.
त्या गाडीत माझेच
जातभाई अत्यंत वाईट
अवस्थेत बसलेले होते,
कोणाचे हँडल तुटले
होते, कोणाला शिटीच
नव्हती, कोणाचं झाकणच
तुटलं होतं. काही
खराब झालेले नॉनस्टिक
जातीचे तवे एका कोपऱ्यात खितपत पडले
होते. अनेक कढईंचे
कान तुटले होते.
जास्त वेळ मी
बघू शकलो नाही
माझ्या छातीत धस्स
झालं. काय ही दुरावस्था! का झालं असेल असं?
माझं तर असं होणार नाही
ना? नको नको तो विचार
सुद्धा नको. लगेच
मी मान वर करून माझ्या
मालकीणीकडे बघितलं. त्यांच्याकडे बघून
मला नाही वाटत
की माझी अशी
अवस्था होईल म्हणून
फारच प्रेमळ दिसतात
ह्या.
मी मान वर
केल्यामुळे मालकिणीने "बाई कुकर
चं झाकण ढिलं
झालं की काय"
असं म्हणून करकचून
झाकण लावलं आणि
पिशवीत मला कोंबलं
त्यामुळे नंतर घर
येईपर्यंत मी बाहेर
बघू शकलो नाही.
घरी पोचताच,"आणला का सुनबाई कुकर",असं म्हणत
मालकिणीच्या सासूबाईंनी माझी मु दिखाई केली.
"व्वा मस्त आहे",असं म्हणत
वर माझी पाठ
थोपटली. त्या दिवशी
भरून पावलो होतो
मी. काय प्रेमळ
घरात पडलो होतो
मी, व्वा!
"सुनबाई
नवीन कुकर मध्ये
गोड झालं पाहिजे
बरं! छान गाजराचा
शिरा कर",असं
म्हणत सासूबाई आत्ताच
तोंडात गाजराचा शिरा
असल्यासारख्या तोंड हलवत
गोड हसल्या.
मालकिणीने उत्तम गाजराचा
शिरा बनवला सगळे
माझं कौतुक करत
करत गाजराचा शिरा
फस्त करत होते.
घरच्या सदस्यांनी पोटभर
खाल्ल्याने माझं पोट
आनंदाने आपोआपच भरून
गेलं.
दुसर्यादिवसापासून
मी जोमात कामाला
लागलो. वरण भात,
छोले,मटकी,कडधान्ये
भराभर खुशीने शीळ
घालत शिजवून देऊ
लागलो. मी नवीन असल्याने मालकीण बाई
स्वतः च माझी स्वच्छता करायच्या त्यामुळे
मी फारच खुश
होतो.
इतर माझ्या कम्युनिटी
मधले सदस्य जसे
तवे,काढाया, खलबत्ते
माझ्यावर खूप जळायचे.
जळोत बिचारे! मला
काय! मी माझं काम चोख
करत असे.
असं चोख काम
करता करता वर्ष
कसं सरलं हे मला कळलं
सुद्धा नाही.
वयोमानानुसार
मला नेमकी शिटी
वाजवायचा वेळेला घाम
फुटू लागला. जीव
घाबरा-घुबरा होऊ
लागला,डोळ्यातून अश्रू
धारा वाहू लागल्या.
अशा वेळेस मालकीण
बाई त्यांच्या हाताने
माझ्या दोन हातांना(हँडल ला)
काही क्षण घट्ट
धरून ठेवत असत
तेव्हा कुठे मला
कॉन्फिडन्स येऊन मी
शिटी वाजवू शके.
पुढे पुढे मालकिणीचा
पेशन्स आटला. मी
शिटी वाजवली नाही
की त्या त्यांच्या
मुलीला "दे बरं
एक दणका त्या
कुकरला" असं म्हंटलेलं
मी ह्या माझ्या
कानाने ऐकलं. हे
देवा हे ऐकण्याआधी
माझे कान का नाही फुटले.
मला फार वाईट
वाटलं. माझं मन अगदी बेचैन
बेचैन होऊन गेलं.
पुढे माझी तब्येत
एवढी बिघडली की
मालकिणीने गॅसकेट बदलो
की वाल्व बदलो
शिटी काही केल्या
मला वाजवता येईना.
अखेर तो दुर्दैवी
दिवस उजाडला माझ्या
मालकिणीने लोहा लोखंड
वाल्याला बोलावले.
मी मालकिणीला सांगून सांगून
थकलो की नाही झाली शिटी
तर काय होते
कमी फ्लेम वर
जरा वेळ का लागेना पण
मी शिजवू शकतो
अन्न पण त्यांना
पटत च नव्हतं
मग काय करणार!
"इस्के ज्यादा रुपये
नाहि अयेंगे ममसाब",लोहा लोखंडवाला
"अरे भाई जो
होगा वो दो नाहि तो
फ्री मे लेके जाओ, कुछ
काम का नाहि",प्रेमळ मालकीण
बाई चिडून म्हणाल्या.
त्यांचा संवाद ऐकून
मी हताशपणे एकदा
मागे घराकडे कटाक्ष
टाकला. माझे डोळे
भरून आले. केवढं
ह्या घरासाठी इथल्या
माणसांसाठी केलं, मी
स्वतः ला ह्या घराचा सदस्य
समजू लागलो होतो
कारण त्यांनी माझ्यावर
त्यांचं नाव टाकलं
होतं म्हणून. पण
अहो दुर्भाग्यम गरज
संपली की महत्व
संपते हाच ह्या
माणसांचा नियम आहे.
मी निमूटपणे लोहा लोखंडवाल्याच्या
गाडीत बसलो आणि
'चलोभाई! 'तेरी दुनियासे
होके मजबूर चला'
असं गाणं वगैरे
म्हणून त्याला चलायला
सांगितलं. आणि बाजूला
बघितलं तर अवाकच
झालो माझ्या बाजूला
तीच दुकानातल्या शोकेस
मधली माझी सवंगडी
धिटूकली कढई बसलेली
होती पण तिची अवस्था फार
बिकट होती. शोकेस
मध्ये असताना स्वतः
च्या उजळ वर्णाचा
गर्व करणारी ती
काळी ठिक्कर पडली
होती. एक कानही
तुटला होता. तिने
मला बघूनही मला
ओळखलं नव्हतं म्हणजे
ओळख न पटण्या
पर्यंत तिची स्मरणशक्ती
क्षीण झाली होती
की माझी अवस्था
दीन झाली होती
देव जाणे. आम्ही
व आमचे सगळे
बांधव बेचैन मनाची
व्यथा घेऊन शून्यात
आकाशाकडे बघत बसलो.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★