भाग्य दिले तू मला - भाग ४ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ४


स्वयमच्या निस्वार्थी वागण्याने स्वराच्या मनात त्याच्याविषयी एक कोपरा निर्माण झाला होता. ती पूजाच्या बोलण्यावर गालातल्या गालात हसत होती तर पूजा तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून हसत होती. स्वराला हे आपल्यासोबत नक्की काय होतंय ते माहिती नव्हत पण तिला ते सर्व आवडून गेलं होतं.

दुसऱ्या दिवसापासून अगदी सर्व काही बदललं होत. स्वराला तयार व्हायला फार वेळ लागत नसे पण ती आज स्वतःला वारंवार आरशात पाहत होती. पहिल्या प्रेमाचे ते निरागस भाव सहज तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. पूजाला तिच्या अशा वागण्याचा राग यायचा पण तिला इतकं आनंदी बघून पूजा फारच खुश होती. तयारी करून झाल्यावर दोघेही कॉलेजला पोहोचल्या. गेटपासून दोघींच्याही गप्पा सुरु झाल्या होत्या. स्वराला इतकं आनंदी आणि जास्त बोलताना तिने कधी पाहिलंच नव्हतं. तीच बोलणं बंद कस करता येईल याबद्दल पूजा मनातल्या मनात विचार करू लागली होती आणि तिच्या चेहऱ्यावर अचानक हसू आलं. स्वरा बोलण्यात व्यस्त असताना पूजा मोठ्याने ओरडली, " स्वयम आप यहा?? "

स्वयमच नाव घेताच स्वराच त्याच्याकडे लक्ष गेलं आणि त्याला जवळ येताना पाहताच ती एकदम शांत झाली. पूजाने आपल्या तोंडावर रुमाल धरून कसतरी हसू आवरलं. स्वराने तो येईपर्यंत आपला अवतार ठीक केला. ती आता थोडी वेगळीच जाणवत होती. तो जवळ येत म्हणाला, " क्या हुआ पूजा? आपने मुझे बुलाया कुछ काम था क्या? "

पूजा आजही मस्तीच्या मूडमध्ये होती. स्वरा स्वयमला बघूनच शांत झाली होती तर पूजा स्वराकडे इशारा करत म्हणाली, " ये स्वरा तुमसे कुछ केहना चाहती है इसलीये बुलाया है. "

पूजाचे शब्द ऐकताच स्वराच्या तोंडाचं पाणी पळाल. तिने डोळे मोठे करून पूजाकडे पाहिलं पण ती आज स्वराला घाबरणार नव्हती. स्वयम समोर असल्याने ती तिला काहीच बोलणार नाही हे पूजाला माहिती होत म्हणून जाणूनच तिने संधीचा फायदा घेतला होता. आपण जाळ्यात फसलो आहे हे लक्षात येताच स्वरा अडखळत म्हणाली, " अरे वो कल के स्प्रे के लिये थँक्स बोलना था बस इसलीये. "

ती कसतरी पूर्ण वाक्य बोलून गेली. स्वरा बोलून गेली आणि तिला जाणवलं की आपण ह्याला हे बोलायला नको होतं कारण त्याने पूजाला हे सांगायला नकार दिला होता पण आता पर्याय नव्हता म्हणून बॅग मधला स्प्रे काढत ती त्याच्या हातात देऊ लागली. स्वयम अजूनही शांतच उभा होता कारण पूजाला सांगू नको म्हटलं असतानाही ती पचकून गेली होती. इकडे स्वरा ऑकवर्ड झाली होती तर दुसरीकडे स्वयम आता स्वरा पुन्हा ओरडेल म्हणून मान खाली टाकून गप्प बसला होता. दोघांना बघून पूजाला हसू आवरत नव्हतं. तीच अजून मन भरलं नव्हतं म्हणून आणखी खेचायला ती म्हणाली, " स्वयम रेहनेदो ना आपकी याद दिलाता रहेगा इसे ये स्प्रे. आय मिन टू से के ये बहोत बार गिरती रेहती है सो तुम्हारे स्प्रेे की उसे हमेशा जरूरत पडती रहेगी. "

पूजाने अगदी बॉम्ब टाकावा अशी तिथे शांतता झाली. दोघेही फारच ऑकवॉर्ड फील करत होते. कुणीच कुणाशी बोलत नव्हते. पूजा त्यांची खेचण्याची ही संधी सोडणार नव्हती. तिला आणखी त्यांची खेचायची होती पण नेमका त्याच वेळी स्वयमला कुणीतरी आवाज दिला आणि तो लगेच पळाला. पूजाने संधी गमावली होती. तो तर पळाला पण पूजा आता स्वराच्या तावडीत सापडली. पूजाला माहिती होत की आपली काही खैर नाही म्हणून मान खाली टाकत शांत बसलीच होती की स्वरा म्हणाली, " शहाणे काय म्हणत होतीस तेरी याद वगैरे. तुला माझी खेचण्याची संधीच पाहिजे फक्त. "

स्वरा पुढच्याच क्षणी तिला धपाटे घालू लागली पण स्वराच्या चेहऱ्यावरचा तो आनंद त्यापेक्षा कितीतरी मोठा होता. पूजाला कळून चुकलं होत की स्वरा स्वयमच्या प्रेमात पडली आहे. त्यामुळे ती तिच्यासाठी फार खुश होती. स्वयम एक शांत, काळजी घेणारा, कायम मदत करणारा मुलगा होता त्यामुळे त्याचे तिच्यासोबत सूर जुळणे म्हणजे स्वराच भाग्यच होत म्हणूनच पूजाला आणखीच आनंद झाला होता.

त्या दिवसापासून त्या सर्वांच आयुष्य बदललं. क्लासमध्ये असल्यावर स्वयम तिला लपून लपून पाहत होता आणि तो आपल्याला खरच पाहत आहे की नाही हे पाहायला ती त्याला लपून छपून पाहत होती. दोघांची नजरा नजर झाली की मग मात्र त्यांना त्यांचं सुधारायच नाही. कॉलेजच्या आवारात देखील असच व्हायचं. तसे आपल्या मित्रांमध्ये दोघेही फारच बोलके पण एकदा ते एकमेकांच्या समोर आले की मग मात्र त्यांच्या तोंडुन एक शब्दही निघायचा नाही. ते दोघे एकमेकांकडे लाजून बघत दिसले की त्यांची खेचण्याची संधी पूजा कधीच सोडत नसे.

त्या पहिल्या वहिल्या प्रेमाची नशा काहीतरी वेगळीच होती. ते दोघे एकमेकांत हरवले असायचे तर पूजा त्यांना बघण्यात व्यस्त असायची. कधी कधी वातावरण जास्तच शांत झाल की पूजा स्वयमला धारेवर धरायची आणि पूजाच बोलणं ऐकून स्वयम लाजून शांत बसायचा. तो लाजला की स्वरासुद्धा आपोआप लाजायची आणि बाकी सर्व त्यांची मज्जा बघायचे. हळूहळू स्वयमच्या मित्रांना देखील ह्याबद्दल अंदाज येऊ लागला होता. ही झाली क्लासच्या बाहेरची मज्जा. तर रसायनशास्त्राच्या प्रॅक्टिकलला देखील अशीच मज्जा असायची. स्वयम स्वरा इतकं लाजायचे की बऱ्याचदा एका रसायनाच्या जागी दुसरंच रसायन वापरल्या जायचं आणि त्यातून वेगळच रसायन बाहेर यायचं. जिथे बाकी सर्व मूल आपल्या पार्टनरला इंप्रेस करण्यासाठी बोलण्याचा बहाणा शोधायचे तिथे हे दोघे संपूर्ण तासभर फक्त लाजण्यात घालवायचे. पूजा त्यांच्या अगदीच समोर असायची आणि त्यांच अस वागणं बघून कधीकधी डोक्याला हात मारून घ्यायची. हा क्लास असा असायचा जिथे पूजा सर्वात जास्त खुश असायची. कारण त्यांच्यासारख एंटरटेनमेंट तिला टीव्ही पाहून सुद्धा मिळत नव्हत.

कॉलेज सुरू होऊन काही दिवस झाले होते. पहिल्याच क्लासला इंग्लिशब्दल न्यूनगंड बाळगणारी स्वरा आपल्या तुटक्या फुटक्या इंग्लिशमध्ये उत्तर देऊ लागली होती. प्रेमात ती नक्कीच हरवली असे पण आपले स्वप्न ती नक्कीच विसरली नव्हती. अभ्यास देखील तिचा जोरदार चालला होता. हळूहळू का होईना ती शिक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करू लागली होती. तिला एखादी गोष्ट समजली नाही की सरळ शिक्षकाना भेटून ती विचारायला मागे पुढे पाहत नसे त्यामुळे शिक्षक देखील तिच्यावर खुश होते. स्वरा स्वयम सोबत असली की ती फार आनंदात असे आणि तोच आनंद तिला आणखी अभ्यासात उत्तेजना द्यायचा. एकदा अभ्यास झाला की ती त्याच्या विचारात पून्हा हरवली जायची. क्लासच्या बाहेर कितीही धम्माल केली तरीही हॉस्टेलला आल्यावर अभ्यास झालाच पाहिजे असा दोघींचा कटाक्ष होता त्यामुळे अभ्यासही नियमित सुरू झाला होता. स्वयमने पूजा, स्वराला आपल्या मित्रांशी भेटवून दिल होत आणि ते आता त्यांच्या ग्रुपचा भाग झाले. स्वराच्या बाकी दोन्हीही पार्टनर ह्या स्वयमच्या खूप छान फ्रेंड्स असल्याने आता त्याही फारच फ्रेंडली वागू लागल्या होत्या त्यामुळे रविवार असला की त्यांच्या रूममध्ये धिंगाणा असायचा. त्यातल्या त्यात मुलांबद्दलच्या गॉसिप ऐकताना तर एक वेगळीच मज्जा यायची. हॉस्टेलची पण एक वेगळीच मज्जा. एखाद फंक्शन असलं की सर्व मुली मिळून वॉर्डनला त्रास द्यायच्या. कधी अंघोळीसाठी सकाळी सकाळी दरवाजे ठोकले जायचे तर कधी छोट्या छोट्या कारणावरून मुलींचे धिंगाने आणि उत्कृष्ट दर्जाच्या शिव्या. तर कधी कधी वॉर्डन पासून लपून आपल्या बॉयफ्रेंड सोबत फिरायला जाण्याची मज्जाच वेगळी होती. या सर्वात मुलीच्या गॉसिप अगदी भारी असायच्या. क्लास, कॉलेजमध्ये कोणकोणते मूल हॉट दिसतात ह्यावर सतत चर्चा सुरू असायच्या. हा असा एक विषय होता जेव्हा कुणीच बोर होत नसे. गॉसिप करता - करता जेव्हा स्वराच्या रूम पार्टनर तिच्याच समोर स्वयम क्या हॉट दीखता है म्हणायच्या त्यावेळी स्वराचा चेहरा पाहण्यासारखा असायचा. इर्षेचे हे भाव तिच्या मनात नकळत रोवले जात होते हे तिला सुद्धा कळत नव्हतं. तिच्या अल्लड मनात त्याच प्रेम फुलू लागलं होतं.

स्वरा इकडे आपल्या अभ्यासात मग्न होती तर तिकडे तिचे आईबाबा घरी चिंतीत असायचे. दररोज दिल्लीबद्दल एखादी बातमी पेपरला आली की त्यांचं मन घाबरायचं आणि त्या रात्री ते तिला नक्कीच फोन करायचे. तिलाही त्यांची काळजी कळायची म्हणून ती त्यांना अगदी प्रेमाने समजवून सांगत असे. तिच्या तोंडून एकदा की कॉलेज लाइफबद्दल भरभरून ऐकायला मिळालं की मग तिचे आईबाबा निश्चित व्हायचें आणि पुन्हा एकदा आपल्या मुलीच्या आनंदात रममाण व्हायचे.

एकीकडे स्वरा आपल्या सुंदर क्षणाची स्वयमसोबत कहाणी रचू लागली होती तर काही दूर अंतरावर तिच्याही नकळत एक व्यक्ती तिच्यासोबत आपली कहाणी रचत होता. त्याने जेव्हापासून तिला पाहिलं होतं तेव्हापासून त्याला तीच वेड लागलं होतं. हा तोच मुलगा होता ज्याला नकळत स्वराची धडक लागली होती. तिची ती धडक नकळत लागली होती तरीही त्याने तिला आपलं आयुष्य बनवून घेतले होते. जेव्हापासून त्याने तिला पाहिले होते तेव्हापासून तो फक्त तिचाच विचार करत होता. तिची ती स्माईल, तिचा तो गोड आवाज ह्या पलीकडे त्याला काहीच सुचत नव्हतं. तो तिच्यासाठी पुरता वेडा झाला होता.

त्याच नाव राज सलूजा. कॉलेजचा स्टुडन्ट रिप्रेझेन्टेटीव्ह. तस त्याला मागून पाठबळ होत त्याच्या वडिलांच. त्याचे वडील पॉलिटिक्स मध्ये होते. त्याचा फायदा त्यांने स्वतःच्या करिअरसाठी करून घेतला होता. तो कॉलेजला असला की आठ - दहा मूल त्याच्या आजूबाजूला असत. कॉलेजमधले कुठलेही प्रॉब्लेम असले की मुलांच्या त्याच्या मागे चकरा असायच्या. तसा तो दिसायला देखणा पण स्वभावाने अगदी गर्विष्ठ. तो इतरांना मदत करायचा पण स्वतःच्या स्वार्थासाठी. बाकी त्याला कुणाचही काहीच घेणं नव्हतं. असा हा राज. नावातच राज असल्याने सर्वांवर राज करायला आलेला. घरून एवढ्या सोयी सुविधा मिळाल्या होत्या की तो त्याच्या मनाला हवं ते करू शकत होता. राग तर नाकावरच असायचा. त्याला एखादी गोष्ट मिळाली नाही की बस त्याने तांडव केलाच समजा. असा हा राज स्वराच्या आयुष्यात नकळत आला होता. तिला त्याच्या येण्याची चाहूलसुद्धा लागली नव्हती पण त्याच्या आयुष्यात येण्याने तिचं पूर्ण आयुष्य बदलणार होत. आजपर्यंत त्यालाही कधीच कुणावर प्रेम झालं नव्हतं पण स्वराला पाहताच ती आवडणे म्हणजे ती त्याची जिद्द झाली होती. प्रेमात जेव्हा मिळवायची जिद्द असते तेव्हा काय होत ह्याची कल्पना न केलेली बरी.

क्रमशा ....