मुश्किलमे हो जिंदगी
उसको आसान बनाना है
तकलीफे तो होगीही लढते हुये
चलो मिलकर उन्हे हराना है
स्वराने निर्णय तर घेतला होता पण दिल्लीला निघायला तिला ६-७ दिवस लागणार होते त्यामुळे तिने निर्णय घेतल्यापासूनच अभ्यासाला सुरुवात केली होती. फक्त पंधरा दिवस अभ्यासासाठी अपूर्ण होते पण आज तिने हार मानली असती तर पूर्ण वर्ष वाया गेल असत म्हणून जोमाने ती अभ्यासाला लागली. सुदैवाने तिने बुक्स सोबत आणले होते त्यामुळे ते शोधण्यात वेळ गेला नव्हता. काय दिवस, काय रात्र स्वरा फक्त अभ्यासच करत होती. तिला आता जगाची चिंता नव्हती. तिने यशस्वी होण्याच्या दिशेने आज पुन्हा पहिले पाऊल टाकले होते. तिच्यासाठी ते सोपं नव्हतं तरीही तिने पुढाकार घेतला होता. तिला जिंकन हारण आता गौण होत. तिच्यासमोर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचं आव्हान होत आणि ह्यावेळी ती काहीही केल्या हार मानणार नव्हती. मग असे समाजातले कितीही राज तिच्यासमोर आले असते तरीही तिला फरक पडणार नव्हता. ती मनातून पेटून उठली होती. तिला माहिती होत की आता आपल्याकडे गमवायला काहीच उरल नाही म्हणून ती फक्त मिळवायला लढू लागली. आता तीच नशीब तिला किती साथ देत ह्यावर सर्व अवलंबून होत.
फायनली तो दिवस आला. वडिलांनी पुन्हा एकदा तिला पैसे जमवून दिले आणि स्वरा हिम्मत करून पुन्हा त्याच वाटेवर निघाली. वाट ह्यावेळी खडतर होती पण तिला रस्ता सर करायचा होता. ती गावातून निघाली तेव्हा लोक आजही तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत होते. काही लोकांच्या नजरेत तिला हजारो प्रश्न दिसत होते तर काहींच्या डोळ्यात काळजी. स्वरा तो अपघात झाल्यावर जेव्हा गावात आली होती तेव्हा सर्व लोक तिच्याकडे असच बघत होते. तेव्हा तिने त्यांच्या नजरेला उत्तर देणे टाळले होते पण आज स्वरा सर्वांच्या नजरेला नजर मिळवित चालली होती. तिला माहीत होतं की ही शेवटची संधी आहे. जर ह्यावेळी आपण स्वतःला सिद्ध करू शकलो नाही तर कदाचित दुसरी संधी मिळणार नाही आणि ह्यावेळी हरलो तर कदाचित आपण परत गावात येऊ शंकणार नाही त्यामुळे जिंकण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हताच. तिने अशी एक वाट निवडली होती ज्यावर फक्त काटे होते. जेव्हा आयुष्यात आपल्याकडे काहीच पर्याय नसतात तेव्हाच आपण तन, मन लावून काम करत असतो आणि जिथे तन, मन येऊन एकत्र काम करत असतील तिथे हारही मिळणं अशक्यच असते. तिथे असतो फक्त तो विजय.
किस बातसे डर है तुझे
कौन है जो तुझसे जलता है
बन खुदके जिंदगी की मसिहा
रुलानेको तो पुरा जहा खडा है
स्वराच्या वडिलांनी पुन्हा एकदा तिला दुःखी मनाने विदा केले होते. खर तर पुन्हा एकदा त्यांची तिला दिल्लीला सोडायची इच्छा होती पण आज स्वराने त्यांना सोबत यायला नकार दिला आणि त्यांनाही तो ऐकावा लागला. तिला आता सर्व काही एकट्यानेच सफर करायचं होतं म्हणून ही सुरुवात तिने इथून केली होती. ह्या काही दिवसात स्वराला समजलं होत की आता पुढे तिला एकट्यालाच सर्व सहन कराव लागणार आहे म्हणूनच तिने बाबांना सुद्धा सोबत यायला नकार दिला होता. स्वराने पुन्हा एकदा भरलेल्या मनाने बाबांना मिठी मारली आणि नवीन प्रवासास निघाली. असा प्रवास ज्यात तिला पुन्हा काय काय मिळणार आहे माहिती नव्हतं. तरीही ती निघाली अंधारात यशाची मशाल घेऊन. सोबतीला कुणीच नव्हते आणि मार्गही अशक्य होता. कुणीही तिला पाहिलं असत तर अगदी वेड ठरवून मोकळे झाले असते पण स्वरा त्यातली नव्हतीच जे हार मानून गुपचूप घरात बसतील. ती जगाशी भांडून स्वतःचे हक्क मिळवणार्यातली होती आणि तिने तो प्रवास स्वतःच स्वीकारला. आता ती एकतर इतिहास बनविणार होती नाही तर इतिहास जमा होणार होती.
ती पुन्हा एकदा ट्रेनमध्ये बसली. बाबांनी तिला भरलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. बाबांना पुन्हा मागे सोडताना तिला त्रास होत होता पण आयुष्यात समोर जायचं असेल तर असे कितीतरी त्रास मागे सोडावे लागतील हे तिला माहिती होत त्यामुळे काहिच क्षणात तिने आपले अश्रू पिऊन घेतले. ट्रेन सुरू होताच ती एकटी पडली. विचारांनी नकळत धावत घेतली आणि पुन्हा एकदा ती आठवणीत शिरली. अशा आठवणी ज्या तिला कधीच विसरता येणार नव्हत्या. आयुष्यात सर्वात त्रासदायक असत आपल्याच जुन्या कटू आठवणीत डोकावून पाहन. जुन्या आठवणी जर स्वरासारख्या असतील तर मग त्या आठवण करतानाही अंगावर काटा येतो. इथे फक्त ते आठवायचं नव्हतं तर ते पुन्हा एकदा अनुभवायचं होत म्हणून स्वरा जरा घाबरली होती. ती सीटवर पुस्तक वाचत बसलीच होती की भीतीने तिच्या हातच पुस्तक देखील खाली पडलं होतं आणि ते पुस्तक उचलायची तिची काही हिम्मत झाली नाही. बाहेर अंधार पडला होता. हळूहळू लोक झोपी जाऊ लागले पण स्वराला मात्र झोप येत नव्हती. आज एक एक स्टेशन मागे जात होतं आणि स्वरा पुन्हा आठवणीत हरवू लागली. त्यात तीच अल्लड प्रेम होतं, पूजा सोबत केलेली मस्ती होती आणि संपूर्ण दिल्लीसमोर आपला चेहरा लपवत असणारी स्वरा होती. तो क्षण पुन्हा एकदा तिच्या डोळ्यासमोर येऊन उभा राहिला आणि तिने अंगावरची चादर घट्ट गुंडाळून घेतली. ती झोपायचा प्रयत्न तर करत होती पण राहून राहून कुणीतरी तिच्या बाजूला येऊन उभा असल्याचे तिला भास व्हायचे आणि ती पटकन डोळे उघडायची. हा अंधार देखील तिला आता नकोसा झाला होता. अंधारात कुणीतरी सतत तिच्याकडे येत असल्याच दिसत होतं आणि तिने घाबरतच आपल्या तोंडावर चादर ओढून घेतली. कितीतरी वेळ असच सुरू होत. एखादा आवाज झाला तरी ती पटकन डोळे उघडायची आणि इकडे-तिकडे बघायची. आज तिला सुखाची झोप लागली नव्हती. तो क्षणच असा होता की कुणालाही झोप लागणे शक्य नव्हते. विचार करायला हवा की तो क्षण किती घट्ट तिच्या डोळ्यात बसला असेल की तिला ते सर्व आजही जसच्या तस दिसत होतं. स्वराने दिल्लीला परत जायचा निर्णय तर घेतला होता पण दिल्लीने दिलेले हे घाव तिला खरच स्वस्थ बसू देणार होते का?
***********
पुन्हा एकदा आय.आय.टी. दिल्ली प्रवेशद्वार. तिने मान वर करून बघितली . कॉलेजच्या पहिल्या दिवशी आली तेव्हा तिचा चेहरा कॉन्फिडन्सने भरला होता पण आज ती आतून कमजोर पडली होती. तिला तेच ते सर्व जून आठवू लागल आणि तिचे पाय जागीच थांबले. हात थरथर कापतच होते की कुणीतरी तिचा हात घट्ट धरला आणि तिचे थरथरने थांबले. तिने हिम्मत करून बाजूला पाहिले तर ती पूजा होती. पूजाला बाजूला बघून तिच्या चेंहऱ्यावर हसू पसरल होत. पूजाला स्वराची स्थिती तिच्या डोळ्यात पाहताच समजली होती म्हणून तिने स्वराला काहीच विचारले नाही. तिने स्वराची बॅग एका हातात घेतली आणि दुसर्या हाताने तिचा हात घट्ट पकडत ती समोर चालू लागली. दोघीही शांतपणे चालू लागल्या. स्वरा आज पुन्हा एकदा कॉलेजवर नजर फिरवू लागली. कॉलेज अगदी तसच होत. तेच सर्व वातावरण, तीच शांतता. फक्त सायंकाळची वेळ असल्याने तिथे मूल नव्हते. स्वरा सर्व नजरेखालून काढत समोर चालू लागली. तिला हे सर्व बघून पुन्हा एकदा पहिल्या दिवशी कॉलेजला आलेली स्वरा दिसू लागली. हळूहळू करत ती हॉस्टेलला पोहोचली.
पूजाने आधीच वॉर्डन कडून परमिशन घेऊन ठेवली होती त्यामुळे स्वराला फॉर्मलिटी पूर्ण करण्याचा त्रास घ्यावा लागला नव्हता. ती रूमच्या आतमध्ये पोहोचली आणि पहिल्यांदा चेहऱ्यावरून स्कार्फ काढला. स्कार्फ काढतानाही तिची नजर पूजावर होती. पूजाला आपल्या अशा दिसन्याने काही फरक पडत नाही ह्याची खात्री होताच तिच्या मनाला समाधान मिळालं होतं. तिने बॅग बाजूला ठेवली आणि फ्रेश होऊन बेडवर पडली.
स्वरा रूमवर आल्याची बातमी मिळताच कियारा, शोभना धावतच तिला भेटायला आल्या होत्या. त्या रूम मध्ये आल्याने स्वरामध्ये पॉसिटीव्ह वाईब्स निर्माण झाले होते. त्या आतमध्ये येताच पुन्हा एकदा रूम मध्ये गोंधळ सुरू झाला. त्या बोलत होत्या आणि स्वरा फक्त त्यांच्याकडे लक्ष देत होती. तिला सहज जाणवलं की सर्व मानसे सारखी नसतात. कदाचित कठीण प्रसंगाच्या वेळीच आपले कोण कळतात त्यामुळे त्यांना भेटून स्वरा पुन्हा एकदा सकारात्मक झाली. त्या बऱ्याच वेळ तिथे गोंधळ घालत होत्या तर स्वरा आपले काही सुंदर दिवस त्यात बघू लागली. अलीकडे पेपर असल्याने त्या जास्त वेळ थांबल्या नव्हत्या पण हे पक्क की स्वराचा मूड त्या बनवून गेल्या. तिचे काही मित्रच होते जे तिला ह्या संपूर्ण प्रवासात तिला सकारात्मक करणार होते बाकी वेळ तर लोक तिला फक्त बोलायला टपलेले असायचे.
रात्रीची वेळ होती. स्वरा बेडवर पळूनच होती की पूजा गमतीत म्हणाली," काय मग मज्जा केलीस की नाही घरी?"
स्वराने तिच्याकडे बघत घडलेला प्रत्येक प्रसंग तिला सांगितला आणि पूजा तिला बघतच राहिली. पूजाला स्वराबद्दल खूप आदर होता पण इतका त्रास होऊनही ती फक्त आई-वडिलांसाठी इथे आली आहे हा विचार करून तिच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला होता. स्वरा पटापट बोलून मोकळी झाली आणि शांत बसली तर पूजा अडखळतच बोलून गेली," स्वरा एक विचारू जर रागावणार नसशील तर? "
स्वरा पुढच्याच क्षणी हसत उत्तरली, " बापरे!! पूजा मॅडम तू परमिशन पण घेतेस का? म्हणजे मी इथे नव्हते तर बरेच बदल झालेत वाटत तुझ्यात. तू नम्र झाली आहेस खूप. चल विचार नाही रागावणार!! "
पूजा मिश्किल हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली," स्वरा तुला वाटत का की तू राजला मारून चूक केलीस?"
स्वरा तिचा प्रश्न ऐकून शांत होती. हसन देखील बंद झालं होतं. पूजाला वाटलं की हिला वाईट वाटलं असावं म्हणून सॉरी बोलणार त्याआधीच स्वरा म्हणाली," पूजा मी उत्तर देईन पण मला आधी तुझ्याकडून हेच उत्तर हवं. तू सांग मी चुकले का?"
पूजा आता थोड्या विचारात पडली होती. तिला काय बोलू ते कळत नव्हतं आणि काही क्षणाने म्हणाली," कधी कधी वाटत तू बरोबर आहेस तर कधी कधी वाटत नसत केलंस तर तुझं आयुष्य छान राहील असत. गोंधळ उडतोय माझा म्हणून तर तुला विचारतेय. नाही माहिती मला तूच सांग!!"
स्वराच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं होतं आणि ती हळूच म्हणाली," पूजा कधी कधी विचार करते की त्याला मी मारल नसत तर ?? तर कदाचित आज मी छान दिवस जगले असते हे मान्य पण कधी ना कधी तर मला त्याला नकार द्यायचा होताच. सो तो नकार ऐकून तेव्हाही तसाच वागला असता ह्यात मला शंका वाटत नाही. त्याला त्रास माझ्या मारण्याचा झाला नाही. त्याला त्रास झाला तो त्याचा इगो दुखावण्याचा. त्याला आयुष्यात पहिल्यांदा कुणाकडून तरी नकार मिळविण्याचा. ज्याला आयुष्यात सर्व मिळत आणि अचानक कळत की ही गोष्ट आपल्याला मिळणार नाही तर तो तोडफोड करायला लागतो, रागवायला लागतो. ह्यात दोष असेल तर त्याच्या संस्काराचा आहे!! त्याला वेळीच सांगितलं असत ना की काय योग्य काय अयोग्य तर तो असा वागला नसता आणि राहील हे सर्व घडण्याचं तर मला वाटत की त्याला असच करायचं असेल तर त्याने भविष्यातही माझ्यासोबत असच केलं असत. माझ्या नशिबात ते लिहिलं असणार तर त्याला कोण काय करणार? मी म्हणेन मी योग्यच केलं. ज्या मुलाला स्त्रीच्या इज्जतीचा अर्थ माहिती नाही त्याला एक काय हजार माराव्या फक्त सुरुवात त्याच्या आईने करावी. त्याच्या आईने जर त्याला स्त्रियांचा आदर करायला शिकविले असते तर आज अशी वेळ नसती आली. नकार तर मलाही मिळाला पूजा प्रेमात म्हणून मी कुणाच वाईट करेन हे कितपत योग्य??"
स्वराच उत्तर ऐकून पूजाच्या चेहऱ्यावर समाधान आलं होतं तरीही स्वरा पुन्हा उत्तरली," खर सांगू स्वरा मला ना एक प्रश्न कायम पडतो की त्याला माझा चेहरा खराब करून नक्की काय मिळालं. जर त्याने प्रेम केलं तर त्याला प्रेमाचा अर्थ नक्की माहीत होता का? आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यासाठी काहीही करू शकतो. तो आनंदी असला की आपण आनंदी असतो पण हे कुठलं प्रेम? समोरच्याचा चेहरा खराब करून त्याच प्रेम त्याला मिळालं का? बरं मी त्याला मारलं आणि त्याने माझा चेहरा खराब केला म्हणून मिळालं असेल त्याला समाधान पण ह्याचा फायदा नक्की काय झाला. शेवटी जेलमध्येच जावं लागलं ना? मला ना त्रास होतोय पूजा पण राजच्या वागण्याचा नाही तर आपल्याच लोकांच्या वागण्याचा. ह्या काही महिन्यात मला समजलं की आपले लोक कोण आहेत आणि परके कोण आहेत. माझा चेहरा खराब होणे माझं नशीब होत पण कदाचीत माणस ओळखायला मिळणं हे माझं भाग्य होत. जर माझं भाग्य म्हणत असेल की मी कायम अशीच राहावं तर तेही मंजूर आहे मला!! भाग्याच्या वर कुणाला मिळालं आहे जे मला मिळणार आहे. "
पूजाने तीच सर्व ऐकलं आणि हळूच म्हणाली," आणि तुझ्या भाग्यात प्रेमाला काय महत्त्व आहे?"
स्वरा क्षणभर हसली आणि उत्तर देत म्हणाली," आयुष्यात इतकं सर्व घडल्यावर हेच सांगेन की प्रेम हा शब्द माझ्यासाठी कायमचा संपला. नको हे मला प्रेम!! असलं प्रेमही नको ज्याला कुणाचा तरी चेहरा खराब करून समाधान मिळत आणि असलंही प्रेम नको जो आपल्या आवडत्या व्यक्तीवर वाईट वेळ आल्यावर सर्वात आधी साथ सोडून जातो. असलं प्रेम कुणाच्याच कामाच नाही माझ्यासाठी मीच काफी आहे. मीच माझ्यावर एवढं प्रेम करेन की मला कुणाच्याच प्रेमाची गरज पडणार नाही. तसही माझ्यावर प्रेम करण्यासारखं आता काहीच उरल नाही समझी. आता मीच माझ्या भाग्याची सारथी आहे . कुणाच्याही साथीविना, प्रेमविना जगणे आता हीच माझी भाग्यगाथा!! "
स्वराच्या शब्दात राग नव्हता पण घृणा होती. तिला अगदी लहान वयात दुनियादारी ह्या शब्दाचा अर्थ सापडला होता. स्वराच भाग्य तिने ठरवलं होतं पण तिचं भाग्य हे कधीच तिच्या हातात नव्हतं आणि कधी असणारही नव्हतं हे तिला माहिती नव्हत कारण भाग्याचे खेळ कुणालाच कळले नाही आणि कळणार पण नाही. ती ज्या प्रेम शब्दापासून घृणा करत होती एक दिवस असा येणार होता जो नकळत तिला तिच्याच प्रेमात आणि नंतर तिच्याही मनाची बंधने तोडून त्याच्या प्रेमात पाडणार होता. ती आज हसत होती तिच्यावर कोण प्रेम करणार म्हणून पण भ्याग्याचे खेळ तिला माहिती नव्हते. ती त्यापासून अनाभिज्ञ होती. कदाचित कुणीतरी असा होता जो तिला पुन्हा जगायला शिकविणार होता आणि ती मंत्रमुग्ध होऊन जगणार होती.
क्रमशा