Bhagy Dile tu Mala - 39 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ३९

क्यू आये हो तुम
फिरसे एक तुफान लेकर
क्या मुझे हक नही है
कुछ पल मुस्कुराने का ?


स्वराच आयुष्य दिवसेंदिवस कोड होत चालल होत. देवाने तिच्या आयुष्यात सुखाच्या रेषा लिहिल्या होत्या की नाही काहीच कल्पना नव्हती. ती जेव्हा जेव्हा आनंदी राहू लागायची तेव्हा तेव्हा दुःख तिने दार उघडायची वाट बघत होत. एवढ्याशा वयात देव तिला इतक्या यातना का देत होत्या? त्याला मन नव्हतं का की त्याने चांगल्या माणसांना जगायचे अधिकार दिलेच नव्हते. स्वराच्या आयुष्यातून दुःख कधी जाणारच नव्हते का? कधी कधी तिला असे हजारो प्रश्न पडायचे तरीही ती त्यातून बाहेर पडायची पण अलीकडे तिला असा एक प्रश्न पडला होता ज्याच उत्तर शोधता-शोधता ती एका भूतकाळात पोहीचली. ७ वर्षाचा भूतकाळ होता तो. असाच तर राज तिच्या आयुष्यात नकळत आला आणि तिला नकळतपणे आनंद देऊ लागला पण अचानक त्याने तिच्याकडून सर्व हिरावून घेतलं. फक्त प्रेमच नाही, लोकच नाही तर तीच सुख-चैन सुद्धा हिरावून घेतलं. तिला त्या क्षणांची पुन्हा एकदा आठवण झाली आणि स्वतःला सावरून उभी झालेली स्वरा पुन्हा एकदा कोसळली. आज रात्री तिला झोप लागली नव्हती. पुन्हा एकदा तिच्यावर कुणी तरी हसताना दिसत होत. रात्री काळोख झाला होता आणि त्या अंधारात कुणीतरी तिच्याकडे येताना दिसत होतं आणि अचानक ती अंथरुणावर उठून बसायची. पुन्हा एकदा तिचे जखम ताजे झाले होते फक्त ह्यावेळी डोळ्यात अश्रू नव्हते तर पूर्ण शरीरच भीतीने घाबरून निघाल होत. अंग तापाने फनफनत होत, हातपाय थरथर कापत होते आणि डोक्यात एकच प्रश्न," काय फरक आहे राजच्या आणि अन्वयच्या वागण्यात? त्यानेही तर आधी खूप दिलं होतं आणि मग दिलं त्यापेक्षा हिरावून घेतलं!! आता अन्वय माझ्याकडून काय हिरावून घ्यायला आला आहे?"

हा असा एक प्रश्न होता ज्याच उत्तर तिला कुणिच देऊ शकत नव्हत. जसा राज आधी तिच्यासाठी पहेली होता तसाच अन्वय देखील झाला होता पण खरंच कसा होता अन्वय? तो कशासाठी आला होता? तो कशासाठी तिला मुक्त करत होता? तिला मिळवायला तर करत नव्हता ना??प्रश्न हजार होते पण उत्तर एकही नाही. स्वरा त्या रात्री लाईट लावून एकटीच अंधारात बसून होती. तिच्यात आज डोळे बंद करण्याची हिंमत नव्हती की सकारात्मक विचार करण्याची. आयुष्यात इतके वाईट अनुभव आल्यावर सकारात्मक विचार करणे तिच्याकडून अपेक्षित होते का? तिने आयुष्यात प्रेमामुळे इतकं सफर केलं होतं की तिने कितीही प्रयत्न केले असते तरीही तिला आज सकारात्मक विचार करणे सोपे नव्हते.

दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली होती. पहाटे पहाटे कसेतरी तिचे डोळे बंद झाले आणि उघडले तेव्हा फारच उशीर झाला होता. अंगात ताप असल्याने चालायची हिंमत तिच्यात उरली नव्हती. विचाराने डोकं जड झालं होतं तरीही तिला आज अन्वयला एक प्रश्न विचारायचा असल्याने ती ऑफिसला जाणार होती. त्याच्या ह्या उत्तराने तीच आयुष्य बदलू शकत होत, इतका महत्त्वाचा प्रश्न तो होता त्यामुळे ती आज पुन्हा ऑफिसला निघाली होती. आज उठायला उशीर झाल्याने ती फारच उशिरा स्टेशनवर पोहोचली होती. खर तर तिला आज माधुरीची गरज होती पण तिलाच उशीर झाल्याने माधुरी लवकर जॉबवर गेली होती. ती माधुरीला शोधतच होती की समोरून लोकल आली आणि ती ट्रेनमध्ये चढून निवांत बसली. आज कशीतरी तिला बसायला जागा मिळाल्याने तिला बर वाटल होत. नाही तर तिच्या अंगात आज एवढं त्राण नव्हतं की ती उभी राहू शकेल. आज तीच पूर्ण शरीर थकल होत, चेहऱ्यावर गंभीर भाव, डोळे लाल झालेले, डोकं दुखायला आलेलं. इतकं सर्व असतानाही तिच्या मेंदूने विचार करणं सोडलं नव्हतं. असा कोणता प्रश्न होता ज्याने तिला खूप त्रास दिला होता? ती त्याला सरळ हे विचारू शकत नव्हती की तू हे सर्व का केलंस कारण बॉसला हे सर्व विचारण योग्य नव्हतं आणि जोपर्यंत तिला ह्याच उत्तर मिळणार नव्हतं तोपर्यंत तिला समाधान मिळणार नव्हतं. ती आज बसून खिडकीतून बाहेरचा नजारा बघण्यात स्वतःला व्यस्त करत होती पण तीच मन एका गोष्टीत अडकून होत म्हणून आज बाहेरच जग देखील तिला नकोस झालं होतं.

११.३० झाले होते जेव्हा ती ऑफिसला पोहोचली. आज तिला फार उशीर झाला होता त्यामुळे आधी तर तिने केबिनमध्ये डोकावून पाहिलं. अन्वय आज ऑफिसला आला होता म्हणून तिला आणखीच भीती वाटत होती. तिला आज त्याला खूप काही विचारायचं होत पण आजच उशीर झाल्याने तो ओरडणार तर नाही ना ह्याचा विचार करत ती आतमध्ये पोहोचली. आज सर्व आपल्या कामात व्यस्त होते त्यामुळे कुणीच तिला गुड मॉर्निंग विश केलं नव्हतं. ती बसायला गेली आणि दीपिकाने तिला हसून विश केलं. तिची आज कुणाशीच काहीच बोलायची इच्छा नव्हती तरीही नकळत खोट हसू चेहऱ्यावर आणत तिने तिच विश स्वीकारलं. ती टेबलवर बसली आणि कामात लक्ष घालू लागली. आज स्वराला बर नसल्यामुळे ती नाश्ता सुद्धा करून आली नव्हती त्यामुळे काम करतानाच ती टेबलवर डुलक्या देत होती. तीच आज कामात मन लागत नव्हत. ती कधीतरी लॅपटॉप मध्ये लक्ष घालायची तर कधीतरी त्याच्यावर नकळत नजर फिरवायची. तो आज कामात इतका व्यस्त होता की क्षणभर त्याने तिच्याकडे वळून बघितले नव्हते. कितीतरी वेळ स्वराचा मनाशीच गोंधळ सुरू होता. ती लॅपटॉप वर काम करत बसली होती पण तिला चक्कर मारत होती त्यामुळे ती वॉशरूमला जाऊन चेहऱ्यावर पाणी घेऊन आली. तिने एक कॉफी घेतली आणि पर्स मधून पॅरासिटेमॉल काढत तिने लगेच खाल्ली. काही क्षण गेले. गोळीने असर करायला सुरुवात केली आणि तिला थोडं बर वाटू लागलं. आज सकाळपासून ती कामात मन लावत होती पण तिला ते जमत नव्हतं आणि शेवटी तिने उठून केबिनला जायचा निर्णय घेतला. त्या प्रश्नासमोर तिला काहीच सुचत नव्हतं म्हणून तिच्या चेहऱ्यावर दुःख-आनंदाचे संमिश्र भाव होते. खर तर ती निघाली तर होती पण मनात तिच्या खूप भीती होती त्यामुळे केबिनच्या दारावर पोहोचत तिने दीर्घ श्वास घेतला आणि हिम्मत करून मोठ्या आवाजात म्हणाली," मे आय कम इन सर?"

तो आज कामात व्यस्त होता म्हणून तिच्याकडे न बघताच म्हणाला," या मिस टॉपर!!"

ती घाबरत घाबरतच आतमध्ये पोहोचली आणि त्याच्याकडे बघत राहिली. त्याने अजूनही मान वर करून तिच्याकडे लक्ष दिले नव्हते की तिला काहीच विचारले नव्हते. ती वेड्यासारखी त्याला बघत होती आणि तो होता की शांतपणे तसाच काम करत होता. आता २ मिनिट निघून गेले होते आणि अन्वय जरा त्रासिक स्वरात म्हणाला," मिस टॉपर तुम्ही काही बोलत नाही आहात म्हणजे तुम्ही कामानिमित्त आल्या नाहीत हे पक्क आणि शांत उभ्या आहात म्हणजे बोलायची हिम्मत नाहीये. माझे तर्क म्हणतात की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, मलाही वेळ वाया घालवलेला आवडत नाही. आधी खुर्चीवर बसा आणि प्रश्न विचारा. अटलिस्ट माझ्याकडे अस वेड्यासारखं बघणार तर नाहीत ना तुम्ही?"

ती आताही उभीच होती आणि त्याने फक्त नजर वर करून तिला बघितले. त्याच्या नजरेत आज तिला कसली तरी भीती जाणवत होती आणि त्याने तिच्याकडे बघताच ती पटकन खुर्चीवर बसली. हातातल्या रुमालाने तिने पूर्ण घाम पुसून काढला. थरथरनाऱ्या एका हाताला दुसऱ्या हाताला दाबून धरले. तर अन्वय पून्हा कामात व्यस्त झाला होता. तिला बोलायच खूप होत पण तिच्या गळ्याला कोरड पडली होती. त्यामुळे तिने इच्छा नसतानाही तो थंड पाण्याचा ग्लास पोटात ओतला आणि हळूच म्हणाली," सर आज मला एक प्रश्न पडला आहे आणि मला वाटत त्याच उत्तर तुम्हीच देऊ शकता!!"

अन्वयने आता तिच्याकडे लक्ष दिले. हातातली पेन टेबलवर ठेवली आणि तिच्याकडे बघत म्हणाला," जर मीच उत्तर देऊ शकत असेल तर मग मला नक्कीच ऐकायला हवं. सो प्लिज!!"

त्याच्या आवाजात आज नेहमीप्रमाणे उत्साह नव्हता. तो हसणारा स्वभाव आज कुठेतरी गायब होता म्हणून केबिनमधील वातावरण पूर्णता शांत झाल होत. ती थोडी घाबरली होती. तरीही तिने बोलायचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी धक्का लागून त्याच्या हातून काहीतरी खाली पडल. त्या आवाजाने स्वरा पुन्हाच घाबरली. तिच्या चेहऱ्यावर ते भीतीचे भाव साफ दिसत होते. त्याने हळूच ती वस्तू उचलली आणि पुन्हा नम्र स्वरात उत्तरला," सॉरी!! तुम्ही बोला कसला प्रश्न?"

तिने तोंडावर हात घेतला. डोळ्यांची उघडझाप केली आणि अडखळत बोलून गेली," सर तुम्हाला एखादी वस्तू मिळवायची असेल आणि ती मिळणार नसेल तर ती वस्तू मिळवायला तुम्ही काय करू शकता?"

अन्वय आतापर्यंत शांत होता पण तिचा प्रश्न ऐकताच तो क्षणभर हसला. आधी तो निरागसपणे हसत होता पण आता त्याचा आवाज मोठा झाला. तो खुर्चीवरून उठत बाजूला गेला. केबिनमध्ये आता त्याच्या बुटांचा टपटप आवाज येऊ लागला आणि तो जाईल त्या दिशेने तिची नजर फिरू लागली. त्याने काही क्षण हसून आपले हसन बंद केलं आणि आपल्या जागेवर बसत म्हणाला," मिस टॉपर आयुष्यात दोन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे हातावरच्या रेषांनाच नशीब मानून जगणारे, हे लोक ९९ % असतात तर दुसऱ्या प्रकारचे जे आपल्या मेहनतीने आपल नशीब बदलतात. ते १ % जरी असले तरी त्याना सहसा कुणी हरवू शकत नाही. आता तुमचं उत्तर. मी दुसऱ्या प्रकारातील आहे. जोपर्यंत मला माझ्या आवडीची वस्तू मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करून ती वस्तू मिळविणारच. मग मला त्यासाठी काहीही करावं लागलं तरीही चालेल. मिस टॉपर जिंकण्याची नशा आणखी कशातच नसते. मी सतत जिंकत आलोय ना म्हणून मला ह्याचा अनुभव आहे."

त्याच उत्तर ऐकून स्वराच्या हाता-पायांनी पुन्हा थरथरायला सुरवात केली. चेहरा घामाघूम झाला होता. हेच शब्द तिने कधीतरी राजबद्दल ऐकले होते म्हणून तिला काही सुचत नव्हतं. पुन्हा एकदा आपला भूतकाळ तिला दिसायला लागला होता. क्षणभर तर तिला त्याच्यात राजच दिसत होता. तेच हसू, तोच कॉन्फिडन्स आणि तोच रुबाबदार स्वभाव!! आजपर्यंत ती त्याला बघायची तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू यायचं पण आज त्याचा प्रत्येक शब्द तिला त्रास देत होता. ती काही क्षण विचार करत म्हणाली, " सर माणसांबद्दल पण …!!! "

ती बोलतच होती की तो केबिनमधून तोंडावर हात ठेवून बाहेर पडला. त्याच्या वागण्यावरून त्याला उलटी होत असावी अस जाणवत होतं आणि ती त्याच्याकडे बघू लागली. ती काही क्षण त्याच्याकडे बघतच होती आणि तो परत आला. आता तो आला तेव्हा त्याचा चेहरा घामाघूम झाला होता. पहिल्यांदा तिची नजर स्वतावरून त्याच्या चेहऱ्यावर गेली आणि तिला जाणवलं की त्याची तब्येत बरी नव्हती आणि त्यात आपण हे काय घेऊन बसलो. ती विचार करतच होती की तो पाणी पीत म्हणाला," सॉरी मिस टॉपर!! तब्येत बरी नाहीये. मला वाटलं होतं की ऑफिसला आलो तर बरं वाटेल पण इथेही सेम प्रॉब्लेम . सॉरी आता मी बोलू शकत नाही. आधी हॉस्पिटलमध्ये जाईल मग आराम करेन. आपण उद्या बोलू सॉरी पुन्हा एकदा."

ती बसूनच होती की तो बॅग घेऊन बाहेर पडला. त्याने जाताना एकदाही तिच्याकडे बघितलं नव्हत. तो तर गेला पण स्वराच टेन्शन वाढवून. स्वरा रात्रभर हाच विचार करत होती. तिच्या मनात आशा होती की अन्वयने ह्यापेक्षा काहीतरी वेगळं उत्तर द्यावं पण त्याने शब्द नि शब्द तेच उत्तर दिल्याने तिची पूर्ण हिम्मत तुटली होती. काल रात्री नाही पण आज त्याच्या विचाराने तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. ती कितीतरी वेळ केबिनमध्येच बसून होती पण आता ती केबिनही तिला अशांत करू लागली होती. त्याचे शब्द त्या केबिनमध्ये दरवळत होते आणि ती घाबरूनच केबिनबाहेर पळाली.

आज आधीच तिची तब्येत बरी नव्हती त्यात अन्वयच्या उत्तराने पुन्हा एकदा ती शांत झाली. आज पूर्ण दिवसभर ती टेबल वर बसली होती पण कामाला हात सुद्धा लावला नव्हता. तिला एक एक क्षण ऑफिसमध्ये त्रास देत होता आणि वेळ होती की जात नव्हती. एक क्षण आधी त्याने तिला मुक्त करून सर्वात जास्त आनंद दिला होता तर आता त्याच अन्वयने तिला पुन्हा एकदा अशा आठवणीत ढकलल होत ज्याचा त्यालाही पत्ता नव्हता. स्वराने विचार करत करत कसातरी दिवस काढला आणि सुट्टी होताच ऑफिसच्या बाहेर पडली. आज तिला इतका अशक्तपणा जाणवत होता की नीट चालनही होत नव्हत. ती पायऱ्या उतरत होती की अशक्तपणामुळे तिचा तोल गेला आणि ती खाली पडणार होती तेव्हाच कुणीतरी तिचा हात पकडला. तिचा हात पकडताच स्वराच लक्ष वर गेलं आणि तिला बघून क्षणभर का असेना स्वराच्या चेहऱ्यावर हसू परतल होत. माधुरी ओरडतच म्हणाली," ताई अशीं कशी ग तू? मला वाटलंच तू स्वतःची काळजी घेणार नाहीस म्हणून मी स्वतःच आले इकडे? किती ताप भरलाय तुला? चल डॉक्टरकडे जाऊ."

स्वरा त्रासदायक स्वरात उत्तरली," मधू प्लिज मला घरी घेऊन चल. मला झोपायचं आहे. आता नकोच काही."

माधुरी चिडतच म्हणाली," जाऊ घरी पण आता नाही. आधी हॉस्पिटल जाऊया."

स्वरा नाही नाही म्हणतच होती तर माधुरीने कॅब बोलावली आणि दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा तिथे बरीच गर्दी होती. स्वराला उभं राहण्याची हिम्मत नव्हती म्हणून ती हॉस्पिटलमध्येच माधुरीच्या मांडीवर झोपली. काही क्षण तसेच गेले. बर्याच उशिरा तिचा नंबर लागला आणि रात्री ९ च्या आसपास ते हॉस्पिटलमधून निघाले. स्वराला अजूनही होश नव्हता. ती तापाने शांत झाली होती तर माधुरी तिला कॅब करूनच स्टेंशनवर घेऊन गेली. काहीच क्षणात लोकल आली आणि तिला सावरत सावरत माधुरीने चढवल. आज ट्रेनमध्ये गर्दी होती पण स्वराची तब्येत बिघडलेली बघून तिला लोकांनी पूर्ण सिट खाली करून दिली आणि स्वरा माधुरीच्या कुशीत पडून राहिली. तिला फार थंडी जाणवत होती म्हणून माधुरीने आपला स्कार्फ तिच्या अंगावर दिला आणि माधुरी तिची काळजी घेऊ लागली. हा एक तास माधुरीला खूप त्रास देत होता कारण स्वरा सतत काहीतरी बडबड करत होती पण माधुरीला स्पष्ट आवाज येत नव्हता. ती तिला शांत करायचा प्रयत्न करत होती पण स्वराच मन काही शांत झाल नव्हतं. तिच्या तोंडात एकच शब्द होता " अन्वय!!"

रात्रीचे ११ वाजले होते. माधुरीने स्वराला खिचडी बनवून दिली आणि स्वरा औषध घेऊन झोपी गेली. स्वराला बर नसल्याने माधुरीने तिच्या घरी आज तिच्याकडे राहत असल्याचं कळविल होत. माधुरीची आई ओरडली होती पण स्वराला एकट अशा स्थितीत सोडून जाण योग्य वाटलं नव्हतं म्हणून ती आज तिच्याच घरी थांबली होती. माधुरी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती तेव्हा तिला बराच ताप होता पण आता औषधं घेतल्यावर तिचा ताप हळूहळू कमी होत होता. माधुरी, स्वरा निवांत झोपत नाही तोपर्यंत तिची काळजी घेत होती. तिने कितीतरी वेळ तिच्या अंगाला हात लावून ताप नसल्याची खात्री केली. आता रात्रीचे १ वाजले होते. माधुरीलाही दिवसभर थकल्याने झोप येत होती आणि ती गादीवर पडली. ती तिच्या अगदी बाजूलाच पडली होती आणि स्वरा काहीतरी बोलत असल्याचं तिला लक्षात आलं. तिने क्षणभर स्वतःचा कान तिच्याजवळ नेला आणि तिला स्पष्ट ऐकू आल. स्वरा झोपेत बडबडत होती" अन्वय कशाला आला आहेस तू? का माझ्या आयुष्यात इतके बदल करतो आहेस? अजून माझ्याकडून काही हिरावून घ्यायच बाकी आहे का? नाहीये रे माझ्याकडे काही द्यायला! माझं जीवन सोड प्लिज आई बाबा मरतील नाही तर!! प्लिज मला जिवंत सोड!! "

माधुरीने तीच बोलणं ऐकलं. क्षणभर तिच्या डोळ्यातून अश्रू आले. तिने स्वराला पटकन स्वतःच्या मिठीत खेचले आणि अश्रू ढाळत राहिली. स्वराने तिला घट्ट मिठी मारली पण ते वाक्य अजूनही रूममध्ये फिरत होत " अन्वय तू का आला आहेस? प्लिज मला नको तो त्रास पुन्हा!!मला जिवंत सोड!!"

कितनी कसरत है
यहा जिंदगी जिने के लिये
देख लो दुनियवालो भीक मांग रही हु
एक पल मुस्कुराने के लिये

क्रमशा ....

( हॅलो फ्रेंड्स. कसे आहात मजेत ना? मी ही कथा लिहितोय पण मला तेवढं समाधान मिळत नाहीये कारण अस वाटत आहे की मी एकटाच कथा लिहितोय. कुणी उघड मनाने कमेंट करत नाही की नाही. इतका संवेदशील विषय हाताळताना मलाच कितीतरी विचार येतो. तुम्हाला नाही येत का? कदाचित तुमच्या कमेंट्स माझ्यात नवीन ऊर्जा भरतील आणि सोबतच हा विषय अगदी माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे तेव्हा कदाचित तुमच्या कमेंट्समुळे मला लिहायला मदत होऊ शकते. थोड्या डिटेल कमेंट्स दिल्या तर लिहिण्याच समाधान मिळेल. आता तुम्हाला कथा नसेल आवडत तर नका देऊ. मी एकटा लिहीत बसेन पुढचे भाग. आतापर्यँत कथा वाचण्यासाठी आणि एकही रोमँटिक सिन नसलेल्या कथेला भरभरून प्रतिसाद द्यायला खूप खूप धन्यवाद..)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED