भाग्य दिले तू मला - भाग ९६ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ९६


पलभरमे बदल जाता है
सपनो की आशिया
कुछ ख्वाब हसाते है
कुछ दिखाते है आयना...

अन्वय सर्वाना शांत करून बाहेर गेला होता. तो जाताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता पण तो दुपारी येतो सांगून गेला आणि सायंकाळ झाली तरीही परतला नव्हता. अन्वयकडे मोबाइल नसल्याने त्याला कॉलही करता येणे शक्य नव्हते. तिने दिवस कसातरी काढला होता पण जसजशी सायंकाळ होऊ लागली तीच मन आणखीच घाबरू लागल होत. अन्वय वरून जरी शांत वाटत असला तरीही तो तुटल्यावर कसा वागू शकतो हे एका रात्री तिने बघितलं होत. तो वरून हसताना जाणवत होता तरीही आई वडिलांना दुखवल्याच गिल्ट त्याला नक्कीच वाटत असणार हे स्वराला जाणवत होतं म्हणून आणखीच जास्त भीती तिला वाटत होतीं. तरीही काही वेळ तिने आणखी वाट बघायचे ठरवले. ह्या पूर्ण वेळात तिच्या घरातल्या घरात किती चकरा झाल्या होत्या तिलाच माहिती नव्हतं तरीही ती क्षणभर देखील स्वस्थ बसली नव्हती. इकडे बाहेर अंधार पडत होता आणि स्वराच्या मनातही भीतीचे गोळे उठले होते. तिचे हात पाय गळू लागले होते आणि न राहवुन तिने सौरभला फोन केला. सौरभला फोन करून त्याला पुन्हा त्रास देणे तिला आवडले नसते पण आज तिच्याकडे पर्याय नव्हता म्हणून तिला फोन करावा लागला होता. काही वेळ रिंग गेली आणि कॉल कट होणारच तेव्हा कॉल उचलल्या गेला. स्वराने स्वतःला हवं तितक शांत ठेवून हळुवार आवाजात विचारले," सौरभ सर अन्वय सर आपके पास है क्या? अभि तक घर पर नही आये इसलीये आपको कॉल कर रही हु. वो है ना आपके साथ."

सौरभ जरा हळुवार आवाजातच उत्तरला," स्वरा वो ऍकसीडेंट हो गया था इसलीये."

तो घाईत जाणवत होता, त्याचे अर्धवट शब्द येताच स्वराच्या डोळ्यातून पटकन पाणी बाहेर आल. तिला काय बोलू कळतच नव्हतं जणू जिभेने साथ सोडली होती. ती बोलायला हिम्मत तर करत होती पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. तिचे अश्रू बोलत होते पण ते बघायला कुणी नव्हतं. काही सेकंदाचा गॅप झाला. समोरून अन्वयचा आवाज आला," सॉरी स्वरा तुला सांगायचं विसरलो. सौरभ आणि मी सोबतच होतो तेव्हा निहारिकाचा कॉल आला. आईने रात्री बहुतेक माझ्या बोलण्याच टेन्शन घेतलं त्यामुळे तिला भान राहील नाही. ती दुपारला गाडी चालवत होती तेव्हा गाडीचा कंट्रोल सुटला आणि ती घासतच गेली. ती बरी आहे पण एक बाजू तिची पूर्ण घासल्या गेली आहे म्हणून तिला त्रास होत आहे. सॉरी खरच मी तुला सांगायचं विसरलो. टेन्शनमध्ये लक्ष्यात आलं नाही. बर झालं तू कॉल केलास. तू ये पण टिफिन घेऊन ये. मी हॉस्पिटलचा पत्ता मॅसेज करतो तू ये लवकर."

स्वरा काही बोलणार त्याआधीच अन्वयने कॉल ठेवला. एक क्षण अन्वयचा अपघात ऐकून तिच्या काळजात धसकन झालं होतं. अन्वय कॉलवर बोलला नसता तर स्वराच हृदय फेल झालं असत हे पक्क. अन्वयचा अपघात झाला नसला तरीही आईचा झाला होता. आईला अस झालं म्हटल्यावर अन्वयने सर्व स्वतःवर घेतलं असेल ह्याची तिला कल्पना आली. ती त्याचा चेहरा आठवत तिथेच स्तब्ध राहिली. तिला काय करू सुचत नव्हतं तेवढ्यात तिच्या आईने तिला हात लावत विचारले," स्वरा कुठे हरवली आहेस? जावई बापू कुठे आहेत?"

स्वरा शून्यातून बाहेर आली. आईकडे ती वेंधळ्यासारखी बघत होती आणि आईने पुन्हा तिला हलविले. आई ओरडत होती आणि स्वराने हळुवार आवाजात म्हटले," आई चल आपल्याला लवकर स्वयंपाक बनवायचा आहे. अन्वयच्या आईचा अपघात झाला आहे सो त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये टिफिन घेऊन बोलावलं आहे. उशीर करून चालणार नाही."

आई काही विचारणार त्याआधी स्वरा सरळ किचनमध्ये पोहोचली. आईने तिच्याकडे नजर टाकली. आईला तिला तस खूप काही विचारायचं होत पण स्वराच्या चेहऱ्यावर गोंधळ माजलेला होता म्हणून आईने तिला काहीच विचारले नाही. स्वरा वेंधळटासारखी काम करत होती तर आई तिच्याकडे बघत पटापट तिला मदत करत होती.

जवळपास तासभर झाला होता. स्वराने घाबरत- घाबरतच स्वयंपाक आटोपला आणि डब्बा घेऊन तयार झाली एव्हाना आईने आजची रात्र निघावी म्हणून काही कपडे, ब्लॅंकेट पॅक करून ठेवल्या होत्या. खर तर स्वराच्या आईवडिलांची सुद्धा हॉस्पिटलमध्ये यायची इच्छा होती पण रात्रीची वेळ असल्याने स्वरानेच त्यांना यायला नकार दिला होता सोबतच त्यांना बघून अन्वयच्या आई कशा रिऍक्ट करतील स्वराला माहिती नव्हत म्हणून तिने आज त्यांना यायला नकार दिला होता. स्वराच म्हणणं त्यांनी समजून घेतलं आणि ते घरीच बसले. एव्हाना बाबांनी तिच्यासाठी टॅक्सी आणली होती. स्वरा पटापट सामान घेत टॅक्सीमध्ये बसली आणि जाऊ लागली. तेवढ्यात बाबांनी तिला म्हटले," स्वरा त्यांची तब्येत कशी आहे फोन करून कळव शिवाय काही लागलं तर सांग आम्ही येऊ आणि नीट जा बाळा."

स्वराला बोलायला आज शब्द मिळत नव्हते म्हणून तिने मान हलवूनच उत्तर दिले. त्यांचं बोलणं होताच टॅक्सी सुरू झाली आणि स्वरा पून्हा एकदा शून्यात हरवली. तिच्या डोक्यात पुन्हा एकदा प्रश्न सुरू झाले. मुळात ते प्रश्न नव्हते तर ते गिल्ट होत. स्वरा काल रात्री झालेल्या वादातून बाहेर पडली नव्हती तेव्हाच हे सर्व होऊन बसल. एका आई-मुलाला वेगळं करण्याचा आरोप तिच्यावर लागणार होता म्हणून आज तिला खूप जास्त भीती वाटत होती. स्वराने अन्वयसोबत आयुष्य घालविण्याचा निर्णय नक्कीच घेतला होता पण त्या दोघांना दूर करण्याचा विचार तिने कधीच केला नव्हता. वेळ पडल्यास ती स्वतःला अन्वय पासून दूर करायचा विचार करत होती पण इथे सर्व उलट घडलं होत. तिला निहारिका, अन्वय, अन्वयचे बाबा सर्वांचे चेहरे क्षणात आठवू लागले आणि स्वरा आणखिच घाबरू लागली. खूप दिवसाने ती अशी भीती अनुभवत होती. ती भीती जीवघेणी होती कारण कायम नाते जपणाऱ्या स्वराने नकळत एक नाते तोडले होते आणि ते तिलाच जास्त त्रास देत होते म्हणून हा अर्धा-पाऊण तास स्वराला स्वतःचच भान नव्हतं. डोळ्यात अश्रू तर नव्हते पण मनात मात्र भावनांचा कल्लोळ सुरू होता आणि एक प्रश्न सतावत होता," पुढे काय??"

रात्रीचे जवळपास ८ वाजले होते जेव्हा स्वरा घाबरत-घाबरतच हॉस्पिटलमध्ये पोहोचली. स्वरा रिसेप्शनवर आईबद्दल माहिती विचारणार तेव्हाच सौरभ तिला भेटला आणि ते दोघेही आईच्या रूमकडे जाऊ लागले. सौरभला बघताच स्वराने हळुवार विचारले," कैसे है ममी? बहोत ज्यादा तो नही लगा ना उन्हे?"

सौरभ जरा रिलॅक्स होत उत्तरला," घबराने की बात नही है पर लगा है उन्हे बहोत. शायद टेन्शन मे गाडी चला रही थि इसलीये स्लिप हो गयी. वक्त लगेगा उन्हे सुधरनेमे. एक साइडसे चेहरे पे बहोत रॅशेश आये है. बाकी बोलणेसे बेटर है की तुम देख लो. खुद समझ जाओगी."

स्वरा त्याच बोलणं ऐकून समोर जात तर होती पण तिच्या मनातून भीती काही कमी झाली नव्हती. ती हळूहळू समोर जात होती आणि दुरवरूनच आईच्या रूमसमोर तिला गर्दी जाणवू लागली. तिला आणखीच भीती वाटू लागली. तिची चालण्याची गतीही आता संथ झाली होती. ती घाबरली असल्यामुळे तिची नजर इकडे-तिकडे फिरत होती. हे समोर असलेल्या अन्वयला जाणवू लागले आणि तो धावतच तिच्याकडे आला आणि तिच्या हातातली पिशवी घेत म्हणाला," स्वरा आई ठीक आहे काळजी नको करुस. तिला काहीही झालं नाहीये. तू स्वतःला त्रास करून घेऊ नको."

स्वराने त्याच्या नजरेत बघितले, त्याची नजर शांत वाटत होती. त्याच्या हाताचा तो समधानाचा स्पर्श तिला झाला आणि काही प्रमाणात का होईना भीती नाहीशी झाली. अन्वय तिला शांत करायला काहीतरी बोलत होता पण स्वराची नजर अजूनही स्थिर झाली नव्हती. हृदयाचे ठोके अजूनही तसेच होते. ती समोर जात होती. तिच्याकडे कुणाच लक्ष नव्हतं आणि तिला निहारिकाच्या सासूबाईचे शब्द कानावर पडले. स्वरा ते शब्द ऐकताच तिथेच उभी राहिली. त्या बोलून गेल्या," निहारिका बघ कसा झालाय तुझ्या आईचा चेहरा? स्वरा आणि तुझ्या आईच्या चेहऱ्यात आता काहीच फरक नाही अस वाटत. बहुतेक एका बाजूने बऱ्याच दूर घासत गेल्या असाव्यात म्हणून एका बाजूने पूर्ण चामडी लाल-लाल झाली आहे. भीती वाटतेय बाबा मला त्यांना भेटायला आणि ऐक तुझ्या मुलीला नको नेऊस त्यांना बघायला. उगाच घाबरून जायची पोर. तिला काही झालं तर??"

स्वराला खर तर त्याक्षणी त्यांचा राग आला होता तरीही ती काहिच बोलू शकली नाही. निहारिकाने त्यांचं बोलणं ऐकलं आणि ती सरळ आईला भेटायला मध्ये गेली. स्वरा आता रूमच्या बाहेर उभी झाली आणि बाहेरच्या काचेमधून आतमधील दृश्य बघू लागली. स्वरा जवळ गेल्याने निहारिकाच्या सासूबाई तिच्यापासून दूर झाल्या होत्या त्यामुळे स्वरा एकटीच तिथून बघत होती. निहारिका आईशी मध्ये बोलत होती. स्वराला आवाज येत नव्हता पण त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या अश्रूतून त्यांच्या वेदना तिला जाणवत होत्या. एवढंच काय निहारिकाने ते घाव बघायला वरची बेडशीट बाजूला केली आणि ते लाल-लाल घाव स्वराला दिसले. स्वराला क्षणभर ते बघून फारच वाईट वाटलं होतं. एक तर ते थंडीचे दिवस त्यात आईला किती त्रास होत असेल ह्याच विचाराने स्वराला वाईट वाटत होतं. आईची जेवायची अजिबात इच्छा नव्हती पण निहारिकाने त्यांना कसेतरी जेवायला मनविले आणि आई हळुवार का होईना पण जेवण करू लागल्या. तर स्वरा त्यांना बघुम फक्त त्यांच्या वेदना अनुभवत होती. अशा वेदना ज्या कधीतरी तिनेही अनुभवल्या होत्या. कदाचित ह्यापेक्षाही जास्त. ती बेडवर पडून होती आणि लोकांच्या नजरा तिला नको नको ते प्रश्न विचारत होत्या. क्षणभर स्वराला स्वतःबद्दल सर्व आठवलं. एक एक गोष्ट डोळ्यासमोर येऊन उभी राहिली आणि तिच्या डोळ्यातुन अश्रू येऊ लागले कारण चेहरा खराब झाल्यावर आपलेच लोक आपल्याशी कसे वागतात हे स्वराला माहिती होते म्हणून तिला त्यांची जास्तच चिंता वाटत होती. स्वराने त्या प्रसंगी राजला किती सुनावले होते हे आठवलं आणि स्वराला आईची आणखीच भीती वाटू लागली कारण नकळत का होईना तीच त्यांच्या ह्या अपघातासाठी जबाबदार होती. स्वराने तिचा अपघात झाला होता तेव्हा एक प्रश्न सर्वाना विचारला होता तो असा की " माझी चूक नक्की काय?" आता तोच प्रश्न आई स्वराला विचारत आहेत अस क्षणभर वाटू लागलं आणि स्वरा हरवली त्यांच्या चेहऱ्यात. उत्तर सोपं नव्हतंच..

जवळपास एखादा तास झाला होता. निहारिका आईशी बोलत होती तेवढ्यात तिच्या सासूबाई मध्ये जात म्हणाल्या," निहारिका तुला माहिती आहे ना मला जास्त वेळ उभं राहवत नाही, तो सौरभ घरी जातोय चल पटकन आपणही जाऊ. तू राहिली असतीस पण तुझी मुलगी तुझ्याविना राहत नाही आणि तुझ्या मुलीला इथे ठेवण बर नाही. तशी ह्यांची सून आलीच आहे ती कधी कामात येईल. चल पटकन. आपण जाऊ नाही तर फार उशीर होईल. शरद पण नाहीये ना इथे नाही तर थांबलो असतो आणखी काही वेळ."

निहारिकाला त्यांच्या बोलण्याचा राग आला होता. ती काहीतरी बोलणार तेवढ्यातच अन्वयने नजरेने इशारा करून तिला थांबविले आणि निहारिका आईशी भेटून घराकडे जाऊ लागली. जातानाही सासूबाई म्हणाल्या," शी बाई किती भीती वाटते ह्यांना बघून, मी नसते आले तरच बर झालं असत उगाच इथे राहिले तर माझीही तब्येत खराब होईल. मी नाही येणार बाबा इथे पून्हा. मी माझी घरीच बरी आहे."

तिथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीने ते शब्द ऐकले होते अगदी अन्वयच्या आईनेही. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात चटकन पाणी आले. अन्वयला ते दिसले पण अन्वय काहिच करू शकला नाही. निहारिकालाही वाद नकोत म्हणून ती शांत बसली. काहीच क्षणात त्या निघाल्या. निहारिकाला स्वराशी बोलायच होत पण तिच्या सासूबाई तब्येत बिघडत असल्याचं नाटक करू लागल्या आणि निहारिकाला नाईलाजाने निघावं लागलं. त्यांनी फक्त एकमेकांना बघून स्माईल केली तेवढंच काय ते त्यांच्यात बोलणं.

अन्वयने आईला औषध दिले आणि तिला झोपायला सांगुन बाहेर आला. स्वरा आताही तिथेच उभी होती. खर तर आईला भेटायची तिची खूप इच्छा होती पण तिचा नाईलाज झाला होता. ती भेटायला जायला आणि त्यांना पुन्हा वेदना व्हायला एकच वेळ झाली असती म्हणून स्वराने स्वतःला अडवून ठेवले होते पण ती मात्र तशीच उभी राहिली होती. त्यांचा त्रास अनुभवत.

किती वेळ गेला माहिती नाही. हळूहळू रात्र वाढू लागली होती. अन्वय-स्वरा सोडून सर्वच घरी गेले होते. आई केव्हापासून झोपायचा प्रयत्न करत होत्या पण त्यांना वेदनेने झोप लागत नव्हती. त्यांना इकडे तिकडे वळायला सुद्धा त्रास होत होता म्हणून त्या सरळ झोपल्या होत्या तरीही वेदना चेहऱ्यावर तशाच दिसत होत्या. इकडे अन्वयची रात्री नीट झोप झाली नव्हती शिवाय आज दिवसभरही दगदग सुरू होती म्हणून तो थकून बाहेर बाकावर पडला होता. आता रात्रीचे जवळपास १ वाजले होते. आईना कशीतरी झोप लागली होती हे तिला जाणवलं पण आईनी नीट अंगावर घेतलं नसल्याने त्यांना थंडी वाजत होती. स्वराला ते दिसत होतं पण जाऊ की नको हा विचार करण्यातच बराच वेळ गेला होता. अन्वयला उठवायच तर तो आताच पडला होता म्हणून त्यालाही उठविणे बरे वाटले नाही. आईला थंडी जास्तच जाणवू लागली आणि स्वरा नाईलाजाने हळुवार दार उघडत मध्ये पोहोचली. ती आतापर्यंत बाहेर असल्याने आईला नीट बघू शकली नव्हती पण ती त्यांच्या जवळ आली आणि चादर नीट अंगावर घेतली नसल्याने स्वराला क्षणातच त्यांचे घाव दिसले. ते ताजे होते त्यामुळे त्यावर रक्ताचा मुलामा तसाच होता. ते बघताच स्वराच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्यातला एक अश्रू त्यांच्या घावावर जाऊन पडला. स्वराने हळुवार स्वतःचे अश्रू पुसून घेतले आणि त्यांच्या अंगावर चादर ओढली. पुढच्याच क्षणी त्यांच्या कपाळावरून हळुवार हात फेरत हलक्या स्वरात ती म्हणाली,"सॉरी आई माझ्यामुळे हे सर्व घडत आहे. मी तुमच्या आयुष्यात आले नसते तर कदाचित तुमची ही अवस्था झाली नसती. तुम्हाला हा त्रास फक्त माझ्यामुळे सहन करावा लागतोय त्यासाठी सॉरी. माहिती आहे आई की मी सर्व काही नीट करू शकत नाही पण समोरच सर्व मी नीट करणार आहे. नाही जाऊ देणार मी तुम्हाला अन्वय सरांपासून दूर. हे काही दिवस मी तुमच्यासोबत राहीन. कदाचित माझा पश्चाताप म्हणून. तुम्ही एकदा बरे झालात की मी तुम्हाला तुमचा अन्वय परत देऊन दूर कुठेतरी निघून जाईल. थॅंक्यु आई काही काळासाठी का असेना मला अन्वय सरांची साथ द्यायला. जगेन मी त्यांच्या आठवणीत कायम पण तुमच्यापासून त्यांना तोडून मी नक्कीच जगू शकणार नाही. एकदा त्यांच्यापासून दूर राहून त्यांच्या आठवणीत जगेन पण तुम्हाला दुखावून जर त्यांना सोबत घेऊन गेले तर आयुष्यभर गिल्टमुळे आनंदी राहू शकणार नाही त्यापेक्षा तुम्हाला तुमचा अन्वय परत करते आणि मी माझ्या आईबाबांसोबत दूर निघून जाते. माझ्या गेल्याने सर्व सुरळीत होईल की नाही माहिती नाही पण तुम्हाला त्रास होणार नाही मला ह्यातच आनंद मिळेल. आई फक्त काही दिवस मला सहन करा. तुम्ही बरे व्हा मग न सांगताच मी निघून जाईल तुमच्या आयुष्यातून."

आज स्वरा खूप भावुक झाली होती. तिच्या मनात जे दोन दिवस विचार येत होते तिने ते क्षणात मोकळे केले आणि तिथेच बसून राहिली. कितीतरी वेळ ती त्यांच्याकडे बघत होती पण स्वराच गिल्ट काही कमी झालं नव्हतं.

रात्रीचे २-३ वाजत आले होते. स्वराला झोप येत नव्हती त्यामुळे ती बाहेर आली. अन्वय बाहेर निवांत बाकावर पडला होता. त्यालाही थकल्यामुळे झोप लागली होती. स्वराने त्याच डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि प्रेमाने कुरवाळून घेतले होते. ती त्याच्यासोबत जणू अशी वागत होती की ती त्यांच्यासोबत फक्त शेवटचे दिवस जगत आहे तर अन्वय झोपेतही तिचा हात घट्ट पकडून झोपला होता. क्षणभर जर कुणी त्यांना बघितलं असत तर डोळ्यातून अश्रू आले असते. काय प्रेम होतं त्यांचं. अन्वय होता की तिच्यासाठी जिवलग आईशी भांडत होता तर स्वरा होती की त्याने आईपासून दूर जाऊ नये म्हणून स्वता त्याला सोडून जाणार होती. कितपत कठीण होती ही प्रेम कहाणी. अगदी विचार करणेही कठीण पण दोघेही अश्रुंचे घोट पिऊनही प्रेम निभावत होते. कसे असतात ना लोक प्रेमात थोडासा त्रास मिळाला तरीही प्रेमाला अपशब्द बोलायला मागे पूढे बघत नाहीत आणि इथे हजारो दुःख मिळत असतानाही स्वरा-अन्वयने प्रेमाला कधीच चुकीच समजले नाही. कदाचित प्रेम म्हणजे आनंद वाटणे नसतच, प्रेमाचा खरा अर्थ दुःख होत असतानाही एकमेकांना कायम मनात ठेवून त्यांच्याप्रती तेवढाच आदर व्यक्त करणे असत म्हणून " स्वरान्वय " ची प्रेम कहाणी जगापेक्षा वेगळी ठरणार होती. ते प्रेम करणार होते, सोबत आयुष्यभर राहू की नाही हे माहिती नसतानाही. किती सुंदर आहे ना हे प्रेम??

" कुछ ऐसें करेंगे हम प्यार की दुनिया याद रखे."

*********

ती सकाळची वेळ होती. स्वराला पहाटे-पहाटे जराशी झोप लागली होती पण लोकांच्या आवाजाने तिची झोप मोड झाली. तिने डोळे उघडून बघितले तर अन्वय बाजूला नव्हता. पुडच्याच क्षणी तिने समोर नजर टाकली. तिला जाणवलं की आई बेडवरून उठू पाहते आहे पण त्यांना उठता येत नाहीये. त्या कोणत्याही क्षणी बेडवरून पडणार तेवढ्यात स्वरा धावतच मध्ये गेली आणि तिने त्यांना पकडून घेतले. आई क्षणभर स्वराकडे बघत होती पण स्वराची नजर त्यांच्यावर नव्हती. ती तर त्यांना सांभाळण्यात व्यस्त होती. स्वराची नजर नसली तरीही तिने आईला म्हटले," आई वॉशरूमला जायचं आहे ना चला सोडते मी."

स्वराच्या आवाजात ना राग ना कसली चीड. ती शांतपणे त्यांना वॉशरूममध्ये घेऊन जाऊ लागली. एवढंच काय त्यांना चालता येत नसल्याने तिने त्यांना आतमध्ये सोडले व पकडून उभी राहिली होती. काहीच क्षणात आई वॉशरूममधून परत आल्या आणि स्वराने पुन्हा त्यांना। बेडवर झोपविले. आई निवांत पडल्या आणि स्वरा काहीही न बोलता बाहेर जाऊ लागली. ती बाहेर जाणारच की आईने हळुवार आवाजात विचारले," तुला घृणा नाही वाटत आहे माझा चेहरा, माझी अवस्था बघून? माझ्यासोबत वॉशरूममध्ये असताना पण काहीच वाटलं नाही?"

त्यांचा आवाज येताच स्वरा हळुवार मागे वळाली आणि चेहऱ्यावर गोड हसू आणत म्हणाली," आई घृणा विष्ठेची किंवा शरीराची नसते ती असते मनातल्या विचारांची. मी मनातली घृणा प्रत्येक सेकंदाला अनुभवत आले आहे तेव्हा ही घृणा त्यासमोर काहीच नाही. तस पण आपल्या लोकांबद्दल चेहरा, शरीर बघून घृणा करतो तो आपला असत नाही तेव्हा मी म्हणेन की मला आवडेल तुमचं सर्व करायला जर तुम्हाला आवडणार असेल तर. तुमची परवानगी न घेता मध्ये आले त्यासाठी सॉरी. आई म्हणतेय कारण नावाने आवाज देऊ शकत नाही तेव्हा इथे चालवून घ्या आणि काही लागलं तर मला सांगा मी बाहेरच आहे. आपलं म्हणवून घ्यायला आवडत नसेल तर परक समजून बोलवा पण अस स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी आहे बाहेर आई. येते मी."

स्वरा चेहऱ्यावर गोड हसू आणत बाहेर निघाली तर अन्वयच्या आई भरलेल्या डोळ्याने तिच्याकडे बघत होत्या. काय होती स्वरा हे त्यांनी कधी अनुभवलं नव्हतं पण तिचे दोन वाक्य ऐकले आणि त्यांच्याकडे द्यायला उत्तर उरल नाही. त्या एकटक तिच्याकडे बघत होत्या. का ते त्यांचं त्यांना माहिती.

एक लम्हां काफी है
गलती का एहसास होणे के लिये
सब कुछ बदल सकता है एहसास होणे के बाद
पर उससे क्या दिये हुये घाव कम हो जाते है??