गीत रामायणा वरील विवेचन - 16 - रामाविण राज्यपदी कोण बैसतो? Kalyani Deshpande द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गीत रामायणा वरील विवेचन - 16 - रामाविण राज्यपदी कोण बैसतो?

पाहता पाहता कैकयी ने भरतास राज्यपदी बसवण्याचा व श्रीरामास वनवासात पाठवण्याचा वर मागितला ही बातमी लक्ष्मणपर्यंत ही पोचते. ती वार्ता ऐकताच लक्ष्मणाची तळपायाची आग मस्तकात जाते. तो त्वेषाने देवी कौसल्येच्या कक्षात येतो जिथे श्रीराम आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत असतात.

लक्ष्मण म्हणतात
" हे रामा तुझ्याविना राज्यपदी बसण्याचा कोणालाही अधिकार नाही. जो कोणी त्यात अडथळा आणेल त्याच्याशी दोन हात करायला मी तयार आहे."

"लक्ष्मणा शांत हो! क्रोधाने फक्त नुकसानच होते.",श्रीराम

"श्रीरामा तू तर सर्वज्ञ आहे मग तू उगीच का त्या पापिनी कैकयी चे ऐकतोय? कैकयी ला सत्ता हवी आहे. वर,वचन हे फक्त बहाणे आहेत. आणि स्त्रीलंपट तो दशरथ राजा तो तिचेच ऐकणार. तिने काहीही म्हंटले तरी तो तिला विरोध न करता तिचेच ऐकत आला आहे.",लक्ष्मण क्रोधाने धगधगत म्हणतात.

"लक्ष्मणा अरे हे तू काय विपरीत बोलतो आहेस? अतिक्रोधामुळे तुला कळत नाही की तू कोणाबद्दल बोलतोय? ज्यांच्याबद्दल तू बोलतोय ते आपले माता पिता आहेत. माता कैकयी सावत्र जरी असली तरी आपली माताच आहे.",श्रीराम

"असे आईवडील काय कामाचे ज्यांच्या मनात पुत्राचे हित करणे नसून घात करणे आहे. जी माता पुत्राला वनवासात पाठवते ती माता कसली?",लक्ष्मण

"अरे आपल्या पिताश्रींनी माता कैकयीला वर दिले होते",श्रीराम

"आजच बरे आठवले राजाला कैकयी ला दिलेले वर, याआधी तर कधी त्याचा उल्लेख ऐकलेला नाही. कैकयी ने बरोब्बर वेळ साधून वर मागण्याचे नाटक केलेले आहे.

तो राजा(दशरथ) विषय वासनेने लडबडलेला आहे, एक नंबरचा लंपट, कैकयी च्या मोहाने आंधळा झालेला आहे. पुत्राला दिलेलं वचन तो मोडतो आणि कैकयी चा हट्ट मात्र निमूटपणे मान्य करतो!

ते काही नाही आता कोणीही आडवा येऊ दे त्याला मारल्याशिवाय मी राहणार नाही. तूच राज्यपदी बसणे अटळ आहे मग त्रैलोक्याशी जरी मला लढावं लागलं तरी मी लढेन. हे श्रीरामा तू निश्चितपणे राज्य कर तुझ्या पाठीशी मी सदैव तुझ्या रक्षणासाठी खंबिर उभा आहे.",लक्ष्मण

"लक्ष्मणा! माझे थोर भाग्य की मला तुझ्यासारखा अनुज(लहान भाऊ) मिळाला. पण मला राज्यपदी बसता येणार नाही. पितृवचनाचे पालन करायला मला वनवासात जाणे क्रमप्राप्त आहे.",श्रीराम

"ठीक आहे श्रीरामा आता जर तू ठरवलेलं च आहे तर माझा नाईलाज आहे.
पण तू एकटा जाऊ नको तुला मलाही सोबत न्यावे लागेल.
मी बंधू नसून तुझा दास आहे असे समज. जो तुझ्या वाईटावर असेल त्याला मी शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. माता कौसल्याची शपथ घेऊन सांगतो की मी सदैव तुझ्या सोबत आहे व राहीन.",लक्ष्मण

श्रीरामांना लक्ष्मणाचे ऐकावे लागते व ते दोघे माता कौसल्येचा आशीर्वाद घेऊन माता सुमित्रेच्या कक्षात त्यांचा आशीर्वाद घेण्यास जातात.
(रामायणात पुढे काय होईल पाहू उद्याच्या भागात. तोपर्यंत जय श्रीराम🙏 जय कौसल्या देवी🙏 जय श्रीलक्ष्मण🙏)

***************************************
रामाविण राज्यपदी कोण बैसतो?
घेउनिया खड्ग करी, मीच पाहतो

श्रीरामा, तू समर्थ
मोहजालि फससि व्यर्थ
पाप्याचे पाप तुला उघड सांगतो

वरहि नव्हे, वचन नव्हे
कैकयिला राज्य हवे
विषयधुंद राजा तर तिजसि मानतो

वांच्छिति जे पुत्रघात
ते कसले मायतात?
तुज दिधला शब्द कसा नृपति मोडतो

लंपट तो विषयि दंग
तुजसि करी वचनभंग
भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळितो

वर दिधले कैकयीस
आठवले या मितीस
आजवरी नृपति कधी बोलला न तो

मत्त मतंगजापरी
दैव तुझे चाल करी
श्रीरामा, मीच त्यास दोर लावितो

बैस तूच राज्यपदी
आड कोण येइ मधी?येउ देत,
कंठस्नान त्यास घालितो

येउ देत तिन्ही लोक
घालिन मी त्यास धाक
पाहू देच वृद्ध पिता काय योजितो

शत शतके पाळ धरा
श्रीरामा, चापधरा
रक्षणासि पाठी मी सिद्ध राहतो

येइल त्या करिन सजा
बंधू नच, दास तुझा
मातु:श्री कौसल्येशपथ सांगतो
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★