गीत रामायणा वरील विवेचन - 17 - जेथे राघव तेथे सीता Kalyani Deshpande द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गीत रामायणा वरील विवेचन - 17 - जेथे राघव तेथे सीता

माता सुमित्रेचा आशीर्वाद घेण्यास श्रीराम व लक्ष्मण जातात.

"माते आम्हाला आशीर्वाद दे की आम्ही लवकरात लवकर चौदा वर्षे वनवास पूर्ण करून येऊ.",श्रीराम व लक्ष्मण

माता सुमित्रा सुद्धा सद् गदीत होतात. त्यांना गहिवरून येते. त्यावर श्रीराम म्हणतात,
"माता कौसल्या व आपली मनःस्थिती, चिंता मला समजतेय. कुठल्या आईचे हृदय पुत्रवियोगाने द्रवणार नाही! परंतु काही कर्तव्ये पार पाडावीच लागतात. आपण अश्या धीर खचवला तर माता कौसल्ये कडे कोण लक्ष देणार? ",श्रीराम

श्रीरामांचे बोलणे ऐकून थोड्यावेळाने त्या स्वतःला सावरून दोघांनाही आशीर्वाद देतात.

"लक्ष्मणा मला आज तुझा अभिमान वाटतो आपल्या ज्येष्ठ भ्राता सोबत जाऊन तू कनिष्ठ बंधूचे कर्तव्यच पालन करतो आहेस. माझा तुम्हा दोघांना आशीर्वाद आहे. सुखी राहा. श्रीरामा! तिकडे जसा लक्ष्मण तुझी काळजी घेईल तशीच इथे मी कौसल्या देवींची काळजी घेईन. तू निश्चिन्त राहा.",सुमित्रा देवी

सुमित्रा देवींचा आशीर्वाद घेतल्यावर श्रीराम देवी सीतेच्या कक्षात येतात.

"हे जानकी आत्तापर्यंत तुझ्यापर्यंत बातमी पोचली असेलच. पितृवचनाचे पालन करावयास मला वनवासात जाणे आवश्यक आहे. लक्ष्मण सुद्धा माझ्या सोबत येणार आहे. इथे तुझा निरोप घेण्यास मी आलो आहे.
चौदा वर्षे बघता बघता निघून जातील. तेव्हा माझी काळजी करू नकोस.",श्रीराम

"अहो नाथ! हे काय बोलता आहात आपण? निरोप काय घेता माझा! अहो जिथे तुम्ही जाल तिथे मी येणार नाही का?", देवी सीता

"सीते भलता हट्ट करू नको माझ्यासोबत वनवासात कशी काय येणार तू? वनवासातील कष्ट तुला कसे सहन होतील? त्यापेक्षा तू प्रासादात राहा. माता कौसल्या माता सुमित्रा ह्यांची सेवा कर.",श्रीराम

"माता कौसल्या व माता सुमित्रा ह्यांची सेवा करायला मला नक्कीच आवडेल पण तुम्ही तिथे वनवासात कुटीत राहत असताना मला इथे प्रासादात राहून सुखोपभोग करता येईल का? आज जर ठरल्याप्रमाणे तुम्ही राज्यपदी बसले असतात तर मी आपल्या बाजूला बसून राज्ञीपद भोगले असतेच न! मग आता तुमच्यावर वनवासाची वेळ आल्यावर तिथे सुद्धा मी तुमची सोबत करायला नको का?",देवी सीता

"वनवासात उन्हातान्हात अनवाणी पायाने चालावे लागतील पायात काटे टोचतील. कंदमुळे खावे लागतील. भयंकर प्राण्यांचा वनात वावर असतो ह्याची तुला कल्पना आहे का?",श्रीराम

"एका आर्य स्त्रीचे कर्तव्य काय असते, जिथे तिचा पती तिथेच तिचे स्थान असते. तुम्ही माझे भाग्यविधाता सोबत असताना मला कशाला कोणाची भीती वाटेल? तुम्ही सोबत असताना ते अरण्य मला राजवड्यापेक्षाही प्रिय वाटेल. ज्याही शिळेवर तुम्ही बसाल ती शिळा सिंहासन बनून जाईल. आणि श्वापदांबद्दल म्हणत असाल तर तुम्ही व भ्राता लक्ष्मण असे धनुर्धारी असताना मला कशाची भीती वाटेल?",देवी सीता असे म्हणूनही जेव्हा श्रीराम मुग्ध राहतात काहीच बोलत नाहीत ते बघून देवी सीता त्यांच्या चरणाला हात लावून म्हणतात,

"ह्याच चरणांची सेवा करता यावी म्हणून धरणीतुन मी बाहेर आली आणि ह्याच चरणांचा विरह सहन कर असं कसं आपण म्हणता? ह्या प्रासादात राहून करू काय? तुमच्या विरह अग्नीत जळत राहू की भरताला राज्याभिषेक झालेला पाहू, विनाकारण दासी प्रमाणे राहू का? का देवी कैकयी ने मला दासी करण्याचा तिसरा वर मागितला आहे? की आपल्या मनात मंथरेप्रमाणे त्रास देण्याचा हेतू आहे? मला आपल्या सवे न नेऊन का आपण मला पीडा देत आहात? भ्राता लक्ष्मण तर आपल्या सोबत येत आहेत मग माझ्या एकटीचाच का त्याग करीत आहात?

वनवास माझ्या नशिबी आहे हे मला लहानपणीच कळले होते. (कदाचित ज्योतिष्याने सांगितले असावे)
मानवाचा जन्म म्हणजे सुखदुःखा चा लपंडावच असतो. सुखामागून दुःख, दुःखा मागून सुख येतच राहते. प्रिय व्यक्ती सोबत असताना दुःख ही सुखावते. शत जन्मीचे आपले नाते आहे ते कसे तुटेल? पती आणि पत्नी हे दोन वेगवेगळे तुम्ही का मानता? पती आणि पत्नी एकच आहेत.

पतीची छाया बनून राहणे, पतीलाच भूषण मानणे, पती चरणांची पूजा करणे हेच आर्य नारी चे कर्तव्य आहे त्यात खंड का पाडता?",एवढं बोलल्यावरही जेव्हा श्रीराम काहीही बोलत नाही हे बघून देवी सीता म्हणतात,

"आपण का काही बोलत नाही? मला आपल्या सवे येण्याची अनुज्ञा का देत नाही? किती वेळा मी आपल्या चरणी माथा ठेवू? माझ्या कडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा पण मला आपल्या सोबत येण्यास रोकू नका.",देवी सीता कळवळून श्रीरामांना विनंती करतात.

(रामायणात पुढे काय होईल ते पाहू पुढच्या भागात.
जय सुमित्रा देवी🙏 जय श्रीराम🙏 जय सीता माई🙏)

*******************************************
ग. दि. माडगूळकर लिखित गीतरामायण मधील सतरावे गीत:-

निरोप माझा कसला घेता
जेथे राघव तेथे सीता

ज्या मार्गी हे चरण चालती
त्या मार्गी मी त्यांच्या पुढती
वनवासाची मला न भीति
संगे आपण भाग्यविधाता!

संगे असता नाथा, आपण
प्रासादाहुन प्रसन्‍न कानन
शिळेस म्हणतिल जन सिंहासन
रघुकुलशेखर वरी बैसता

वनी श्वापदे, क्रूर निशाचर
भय न तयांचे मजसी तिळभर
पुढती मागे दोन धनुर्धर
चाप त्या करी, पाठिस भाता

ज्या चरणांच्या लाभासाठी
दडले होते धरणीपोटी
त्या चरणांचा विरह शेवटी
काय दिव्य हे मला सांगता?

कोणासाठी सदनी राहू?
का विरहाच्या उन्हांत न्हाऊ?
का भरतावर छत्रे पाहू?
दास्य करू का कारण नसता?

का कैकयि वर मिळवी तिसरा?
का अपुल्याही मनी मंथरा?
का छळिता मग वृथा अंतरा?
एकटीस मज कां हो त्यजिता?

विजनवास या आहे दैवी
ठाउक होतें मला शैशवी
सुखदुःखांकित जन्म मानवी
दुःख सुखावे प्रीति लाभता

तोडा आपण, मी न तोडिते
शत जन्मांचे अपुले नाते
वनवासासी मीही येते
जाया-पति का दोन मानिता?

पतीच छाया, पतीच भूषण
पतिचरणांचे अखंड पूजन
हें आर्यांचे नारीजीवन
अंतराय का त्यांत आणिता?

मूक राहता का हो आता?
कितिदा ठेवू चरणी माथा?
असेन चुकले कुठे बोलता
क्षमा करावी जानकिनाथा
★★★★★★★★★★★★★★★