Geet Ramayana Varil Vivechan - 30 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन - 30 - याचका, थांबू नको दारात

जानकी देवींच्या हट्टामुळे श्रीराम चाप बाण घेऊन मृगाच्या शोधात कुटीबाहेर पडतात. लक्ष्मण अंगणात व सीता देवी घरात मुगाची वाट बघत उभ्या असतात. सीता देवी फार उत्साहित झाल्या असतात. आता ते सुवर्ण मृग नाथ आणतील. त्याच्या पायात मी घुंगरू बांधेन व ते हरीण कुटीमध्ये हिंडू बागडू लागेल तेव्हा किती अद्भुत दृश्य दिसेल ह्याची कल्पना करून सीता देवी रोमांचित होत होत्या परंतु बराच वेळ होऊनही

श्रीराम येण्याचे चिन्ह दिसेना तेव्हा त्या चिंतीत झाल्या व सारख्या कुटीच्या आत बाहेर येरझारा घालू लागल्या. इकडे लक्ष्मण सुद्धा अंगणात उभे राहून श्रीरामांची वाट बघू लागले.


तेवढ्यात त्यांना "सीते धाव! लक्ष्मणा धाव!" अशी आर्त हाक ऐकू आली. ती हाक ऐकून जानकी देवींचा थरकाप उडाला. त्या लक्ष्मणास म्हणाल्या,


"भ्राता लक्ष्मण नक्कीच नाथ कोणत्यातरी संकटात सापडले असून ते मदतीसाठी हाकारतायेत. आपण त्वरित जाऊन बघावे."


"देवी जानकी आपण निश्चिन्त राहावं! श्रीरामांना संकटात टाकणारं कोणीही ह्या पृथ्वीवर जन्माला आलेले नाही. हा नक्की मायावी राक्षसाचा आवाज आहे.",असे म्हणून लक्ष्मण आपले सरपण तयार करण्याचे काम करू लागले. परंतु पुन्हा तोच आवाज आला व आवाज हुबेहूब श्रीरामांच्या आवाजाप्रमाणे असल्याने सीता देवींनी वारंवार लक्ष्मणास आग्रह करकरून श्रीरामांचा शोध घेण्यास सांगितले. त्यावर लक्ष्मण जानकी देवींना म्हणाले,


"आपण फारच आग्रह करीत आहात म्हणून मला जावं लागतेय पण आपल्याला असे एकटे ठेवून कुटीबाहेर जाणे मला उचित वाटत नाही तसेच याबद्दल भ्राताश्री सुद्धा मला दोष देईल. तेव्हा आता फक्त एवढंच करा की मी किंवा भ्राता श्रीराम येईपर्यंत ही मी रेषा आखून देतोय त्याच्या बाहेर जाऊ नका. जोपर्यंत तुम्ही ह्या रेषेच्या मर्यादेत राहाल तोपर्यंत तुमच्या केसालाही कोणी हात लावू शकणार नाही. येतो मी.",असे म्हणून लक्ष्मणाने काही मंत्र म्हणून मर्यादेची रेषा आखून दिली. जी लक्ष्मण रेषा म्हणून पुढे प्रसिद्ध झाली. आणि लक्ष्मण श्रीरामांना शोधण्यास निघून गेले.


काही वेळानंतर सीतामाई काळजीत असताना त्यांना कुटीच्या अंगणाच्या प्रवेशद्वाराजवळून "भिक्षाम देई ! माई भिक्षाम देई!", असा आवाज ऐकू आला. सितामाईंनी कुटीच्या दारात येऊन बघितलं तर त्यांना एक यती वेशातील (मुनी वेशातील) याचक दिसला जो भिक्षा मागत होता. भगवे वस्त्र धारण केलेला, अंगावर भस्म असलेला, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा असलेला यती भिक्षा मागतो आहे हे बघितल्यावर सीता माई एका भांड्यात लगेच काही धान्य घेऊन येतात व त्या याचकास म्हणतात,


"हे यती महाराज! आपल्याला इथे कुटीच्या जवळ येऊन भिक्षा घ्यावी लागेल. मी बाहेर येऊ शकत नाही."


"कन्ये! मी संन्यासी आहे मी कोणाच्या घरात प्रवेश करत नाही. तुला भिक्षा द्यायची असेल तर इथे बाहेर मी जिथे उभा आहे तिथेच येऊन द्यावी लागेल.",यती वेशातील रावण


"मुनिवर क्षमा असावी! पण मला मर्यादा आहेत मी बाहेर येऊ शकत नाही. आपणाला ह्या उंबरठ्यापर्यंत तरी यावे लागेल.",सीता देवी


रावणाला दुरून ती धगधगती लक्ष्मण रेषा दिसत असते व जर आपण त्या रेषेजवळ गेलो तर आपण जळून खाक होऊ हे रावणाला कळलेलं असते त्यामुळे तो सीता देवींना त्या रेषेबाहेर येण्याचा आग्रह करतो.


"देवी हा आपण याचकाचा अपमान करत आहात! असा दाराशी आलेल्या याचकाचा परत पाठवणे ही चांगल्या कुळाचे लक्षण नव्हे! आपण बाहेर येऊ शकत नसाल तर घरी कोणी दुसरी व्यक्ती असेल तिच्या हातून पाठवा.",रावण दांभिकपणे म्हणाला.


"घरात दुसरी कोणीही व्यक्ती सध्या नाही. आणि त्यामुळेच मी ह्या रेषेच्या बाहेर जाऊ शकत नाही.",सीता माई


"देवी! घरी कोणी पुरुष नसताना मी संन्यासी आपल्या अंगणात प्रवेश करू शकत नाही. मला वाटते मला रिकाम्या हातानेच जावं लागेल.",असे म्हणून यतीवेषातील रावण जाण्याचा अभिनय करतो.


तेवढ्यात असा याचक रिकाम्या हाताने जाणे बरे वाटत नाही असा विचार करून सीता देवी ती भिक्षा असलेले पात्र घेऊन ती लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेरच्या द्वारापर्यंत जातात. आणि याचकाला भिक्षा देणार तेवढ्यात यती वेशातील रावण त्याच्या मूळ रुपात येतो व सीता देवींचा हात बळजबरीने धरतो.


तेव्हा सीता देवी रावणास म्हणतात,


"याचका क्षणभर ही तू इथे थांबू नको. तुला यती समजून मी भिक्षा देण्यास आली आणि आता मला कळतेय की तू कोणी यती नसून कोणी कपटी आहे. माझा हात धरून स्वतःचा विनाश ओढवू नको. मी घननील श्रीरामांची विद्युलते समान पत्नी आहे मला स्पर्श करण्यास जाशील तर जळून खाक होशील.


डोळ्यात दूषित भावना घेऊन इथे मुळीच थांबू नकोस. मी जनक राजाची कन्या आहे. माझे नखही तुला स्पर्शायला मिळणार नाही. मी एकटी असहाय आहे असे आमजू नको. माझ्या भोवती माझ्या स्वामींच्या शक्तीचे वलय आहे. माझ्या स्वामींना कळलं तर ते क्षणात तुला यमसदनी पाठवतील.",सीता देवींच्या अश्या बोलण्यावर रावण देवी जानकी कडे एकटक बघत धुर्तपणे हसतो ते पाहून क्रोधाने सीता देवी म्हणतात,


"असा कोल्ह्या प्रमाणे धुर्तपणे काय हसतो? आणि असे एकटक काय बघतोय मुढा! माझ्या डोळ्यात तुला माझ्या स्वामींच्या प्रतिमेशिवाय काहिहि दिसणार नाही. जसे विष घोटून अमृत मिळणे अशक्य आहे त्याचप्रमाणे माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेम निर्माण होणे हे केवळ अशक्य आहे. दुर्दैवी जिवा! जसे चंद्र सूर्य हातात पकडणे अशक्य आहे तसेच मी तुला प्राप्त होणे असंभव आहे.


तुला वाटत असेल की ह्या निर्जन स्थळी बलपूर्वक आपण ह्या स्त्रीला पळवून नेऊ शकतो पण लक्षात ठेव तू मला पळवून नेण्याचा विचार करत नसून वस्त्रामध्ये विस्तव नेण्याचा प्रयत्न करतोयस.",सीता देवींनी असे म्हणतात रावण त्यांना म्हणतो,


"हे सीते तू एक अमूल्य रत्न आहेस. तुझी खरी जागा लंकेत माझ्या बाजूला सिंहासनावर आहे. माझी नजर रत्न पारखी असल्याने मी तुला माझी पत्नी होण्यासाठी निवडलं आहे."


त्यावर सीता देवी म्हणतात, "स्वतःला तू रत्नपारखी म्हणतोस आणि मला बळजबरीने नेण्यासाठी तलवारीचा धाकही दाखवतो. तुझ्या बोलण्यात आणि कृतीत किती विरोधाभास आहे हे तुझं तुला तरी कळतेय का आंधळ्या! तू कुठे! आणि माझे नाथ कुठे! दोघांची तुलनाच होऊ शकत नाही. तू एक क्षुद्र व्यक्ती आहे तर माझे नाथ एक असामान्य व्यक्ती आहेत. पाण्याच्या ओहळाची कुठे समुद्राशी तुलना होईल का? विषाची कुठे अमृताशी तुलना होईल का? तू ओहळ आहेस तर ते अथांग सागर आहेत. तू विध्वंसक विष आहेस तर ते आल्हादक अमृत आहेत. तू कावळा आहेस तर ते गरुड आहेत. मला पळवण्याचा प्रयत्न करशील तर नाहक प्राणाला मुकशील. माझे नाथ इंद्राप्रमाणे आहेत तर मी इंद्राणी प्रमाणे आहे. जसा पृथ्वीवरचा मर्त्य माणूस इंद्राणीची अभिलाषा करीत नाही त्याप्रमाणे तू माझी अभिलाषा करू नको."


{ह्यात सीता देवी अनेकदा श्रीरामांची इंद्राशी तुलना करताना दिसतात तेव्हा आपल्याला वाटू शकते की श्रीराम तर विष्णूंचे अवतार असून ते इंद्रापेक्षाही श्रेष्ठ आहेत मग देवी सीता वारंवार का तुलना करतात?


तसेच इंद्र ह्याने सुद्धा काही काळापूर्वी गौतम ऋषींच्या अपरोक्ष त्यांची पत्नी देवी अहल्येची अभिलाषा केली होती आणि श्रीराम तर एकपत्नीव्रता आहेत ते परस्त्री कडे बघतही नाहीत मग इंद्र आणि श्रीराम यांची तुलना कशी काय होईल?

त्यावर मला असे वाटते की सीता देवी सध्या मानव रुपात असल्याने त्यांना देवांचा राजा इंद्र मोठा वाटू शकतो. आपल्याला माहिती आहे की देवी सीता लक्ष्मी देवींचा अवतार आहेत पण सध्या त्या एक सामान्य राजकुमारी आहेत. आणि सामान्य मानवासाठी देवेंद्र आणि इंद्राणी श्रेष्ठ असते. मग भलेही इंद्रासाठी श्रीविष्णू श्रेष्ठ असो.}


सीता देवींच्या ह्या बोलण्याचा रावणावर गर्वाने उन्मत्त झाल्याने काहीही परिणाम होत नाही तो बलपूर्वक सीता देवींना ओढून नेऊ लागतो.

त्यावर सीता देवी आक्रोश करत म्हणतात,"पाप्या पुढे पुढे येऊ नको बघ तुझे पाय सुद्धा अडखळतात पण तुझ्या बुद्धीवर काय पडदा पडला कोणास माहीत. हे रघुवरा! नाथा जिथेही असाल तिथून माझा शेवटचा आक्रोश ऐका! मला वाचवा! जसे एखादा मदमस्त हत्ती निर्दयपणे जलाशयातील कमळ खुडून नेतो त्याप्रमाणे हा दुष्ट उन्मत्त रावण तुमच्या सीतेला बलपूर्वक नेत आहे."


(पुढे रामायणात काय होईल ते पाहू उद्याच्या भागात तोपर्यंत जय श्रीराम🙏🚩)

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे तिसावे गीत:-


याचका, थांबु नको दारात

घननीळांची मूर्त वीज मी, नकोस जाळू हात


कामव्यथेची सुरा प्राशुनी

नकोस झिंगू वृथा अंगणी

जनकसुतेचा नखस्पर्शही अशक्य तुज स्वप्नात


मी न एकटी, माझ्याभवती

रामकीर्तिच्या दिव्य आकृती

दिसल्यावांचुन तुला धाडतील देहासह नरकात


जंबुकस्वरसे कसले हससी?

टक लावुन का ऐसा बघसी?

रामावाचुन अन्य न काही दिसेल या नयनात


या सीतेची प्रीत इच्छिसी

कालकुटातुन क्षेम वांच्छिसी

चंद्रसूर्य का धरू पाहसी हतभाग्या हातात?


वनी निर्जनी मला पाहुनी

नेउ पाहसी बले उचलुनी

प्रदीप्त ज्वाला बांधुन नेसी मूढा, का वसनात?


निकषोपल निज नयना गणसी

वर खड्गासी धार लाविसी

अंधपणासह यात आंधळ्या, वसे तुझ्या प्राणात


कुठे क्षुद्र तू, कोठे रघुवर

कोठे ओहळ, कोठे सागर

विषसदृश तू, रामचंद्र ते अमृत रे साक्षात


कुठे गरुड तो, कुठे कावळा

देवेंद्रच तो राम सावळा

इंद्राणीची अभिलाषा का धरिती मर्त्य मनात?


मज अबलेला दावुनिया बल

सरसाविसि कर जर हे दुर्बल

श्रीरामाचे बाण तुझ्यावर करितील वज्राघात


सरशि कशाला पुढती पुढती?

पाप्या, बघ तव चरणहि अडती

चरणाइतुकी सावधानता नाही तव माथ्यात


धावा धावा नाथ रघुवर!

गजशुंडा ये कमलकळीवर

असाल तेथुन ऐका माझा शेवटचा आकांत

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED