गीत रामायणा वरील विवेचन - 31 - कोठे सीता जनकनंदीनी Kalyani Deshpande द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गीत रामायणा वरील विवेचन - 31 - कोठे सीता जनकनंदीनी

तिकडे श्रीराम सुवर्णमृगाच्या रूपातील मारीचाचा वध करून परतत असताना त्यांना वाटेत लक्ष्मण येताना दिसतात. त्यांना बघताच त्यांच्या छातीत चर्रर्रर्र होते. त्यांचा डावा डोळा फडफडू लागतो ते लक्ष्मणास घाईघाईने म्हणतात,


"लक्ष्मणा! तू इथे कसा? तिथे जानकी ला एकटं असुरक्षित ठेवून तू इथे का आला? त्या मायावी राक्षसाने माझा हुबेहूब काढलेला आवाज ऐकून तू इथे आला आहेस का?"


"हो! सीता देवींनी मला आग्रह करकरून पाठवलं. मी त्यांना समजावलं की भ्राताश्रींना काहीही होणार नाही पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. त्यांनी मला नाही नाही ते दूषणं दिले म्हणून मला नाईलाजाने यावं लागलं. "

(इथे उगीच वाटून जाते की जर लक्ष्मणांनी सीता देवीचं ऐकून कुटीबाहेर पडून थोडं कुटीच्या जवळच थांबून राहिले असते तर किती बरं झालं असतं म्हणजे रावण आलेला लक्ष्मणास दिसला असता व पुढचा अनर्थ टळला असता. पण पुन्हा तेच उत्तर आहे विधिलिखित कोणी टाळू शकत नाही.)


"अरे! स्त्री रागात काही बोलली तर ते क्षणिक असते. ते एवढं मनाला का लावून घ्यायचं असते? चल आता त्वरा कर आपल्याला शीघ्र कुटीत पोचलं पाहिजे. माझा डावा डोळा फडफडतोय काहीतरी विपरित घडलेलं नसावं!",श्रीराम

(आपल्याकडे पुरुषांचा डावा डोळा फडफडला की अशुभ आणि उजवा फडफडला की शुभ मानतात याउलट स्त्रियांचा डावा डोळा फडफडल्यास शुभ आणि उजवा फडफडल्यास अशुभ मानतात.)


"परंतु मी एक मर्यादेची रेघ आखून दिली आहे आणि त्यांना त्याच्या आतच राहण्यास सांगितले आहे त्यामुळे त्या सुरक्षितच असतील असे मला वाटते.",लक्ष्मण


श्रीराम व लक्ष्मण घाईघाईत कुटीत येतात पण तिथे सीता देवींच्या अस्तित्वाच्या खुणा नसतात. संपूर्ण आश्रमात श्रीराम व लक्ष्मण बघतात पण सीता देवी कुठेच नसतात ते पाहून श्रीराम नैराश्याने ग्रासून जातात. निराश स्वरात ते म्हणतात आणि निसर्गाशी संवाद साधतात,


"ह्या अरण्यात आपला हा आश्रम सीता नसल्याने उजाड झाला आहे. कुठे असेल ती जनक नंदिनी सीता?


हे कदंब वृक्षा तू उंच असल्याने तुला ती नक्कीच दिसेल जरा बघ बरं सीता नदी तीरावर दिसतेय का? एखादी हळुवारपणे चालणारी सिंहासम कटी असलेली हातात कमंडलू घेतलेली , कलश कटीवर घेतलेली स्त्री तुला दिसतेय का?


हे अशोक वृक्षा! तू तर शोकनिवारक आहेस. तू तरी माझी शुभांगी (पवित्र देह असलेली)क्षमा(पृथ्वी) कन्या सीता पाहिलीस का? तुझे पाने फांद्या का थार्थरतायेत? काही अशुभ होताना तू पाहिलेस का?


हे चंदन वृक्षा! माझी तुझ्यासारखी गौर वर्णीय सीता तू पाहिलीस का? हे कुंद फुलांच्या वेलींनो तुमच्या सम दंत पंक्ती असलेली माझी सीता तुम्ही कुठे पाहिलीय का?


हे आम्र वृक्षांनो तुम्ही जसे फळ भारांनी वाकलेले आहात, नम्र झाले आहात त्याप्रमाणे माझी सर्वगुणसंपन्न आणि तरीही विनयशील नम्र सीता तुम्ही कुठे पाहिली आहे का? वारा वाहत नसताना तुम्ही असे का शहारत आहात? काही भीतीदायक घटना तर तुम्ही पाहिली नाही ना?


( ह्या गीतातून श्रीराम सतत दहा वर्षे निसर्गाच्या सानिध्यात राहत असल्याने किती निसर्गाशी एकरूप झाले होते हे स्पष्ट होते. त्यांनी आप्तांना प्रश्न विचारावे तसे कदंब,अशोक,आम्र, चंदन वृक्ष इत्यादींना मोठ्या आशेने प्रश्न विचारले.)


सगळीकडे सीता देवींचा शोधाशोध करूनही जेव्हा सीता देवी सापडल्या नाहीत तेव्हा श्रीराम हताश होऊन म्हणतात,

"पुन्हा एकदा घात झाला आहे! पुन्हा दैवाने माझ्यावर मात केली आहे. सीतेss मैथिली ss जानकी ss तू कुठे आहेस? तुला माझी हाक ऐकू येत नाही का? त्वरित ये मी तुझी इथे वाट बघतोय. आपण पुन्हा एकदा शिळे च्या आसनावर बसून वार्तालाप करू. ",एवढ्यात त्यांच्या समोरून एक हरणाचा कळप जाताना दिसतो त्यात एक हरणाचे पिल्लू असते त्याला बघून श्रीराम लक्ष्मणास म्हणतात,


"ते पहा लक्ष्मण ! ते हरणाचे पाडस! त्याचे डोळे माझ्या सीतेच्या डोळ्यासम विशाल आणि भोळे आहेत. हे हरणाचे पाडस का बरे रडत आहे? हे सतत किलबिलाट करणारे सगळे पक्षी आज एवढे शांत का आहेत? ह्या सगळ्यांनी कुठलीतरी दुर्घटना पाहिलेली दिसते. एखादया दुष्टाने माझ्या कमळासारख्या नेत्र असलेल्या सीतेला पळवून तर नेलं नसेल? किंवा एखाद्या राक्षसाने जन्मोजन्मीचे वैर काढून तिला खाऊन टाकलं तर नसेल?


आघातावर आघात सतत होत आहेत. आधी राज्यपदी बसताना हा वनवास पत्करावा लागला त्यामुळे माता पित्याचा वियोग सहन करावा लागला. आता माझ्या प्राणप्रिय भार्येचा वियोग झाला. आता माझ्या आयुष्याला काय अर्थ उरला आहे? एवढी माझी युद्ध कुशलता पराक्रम काय कामी आला? मी अनेक राक्षसांना यमसदनी पाठवलं. अनेक ऋषींना मदत केली पण स्वतःच्या पत्नीचं मी रक्षण करू शकलो नाही ही किती दुर्दैवाची बाब आहे. लक्ष्मणा आता मला एकटं सोडून तू आयोध्येस परतून जा. माझ्या सोबत तुझे आयुष्य वाया घालवू नको. आता सीतेच्या विरहाग्नीत मला जळून जायचे आहे. ह्या दुःखाच्या सागरात मला वाहून जाऊ दे. माझ्या आयुष्यात आता काहीही करण्यासारखे राहिले नाही."


लक्ष्मण श्रीरामांना धीर देण्याचा प्रयत्न करतात पण ह्या परिस्थितीत ते ही हतबल असतात.


{ह्या गीतात ग.दि.माडगूळकरांनी श्रीरामांना एका सामान्य पुरुषाप्रमाणे कल्पून त्याचे दुःख अत्यंत प्रभावी शब्दात व्यक्त केले आहे. ह्यात माडगूळकरांनी श्रीरामांच्या दृष्टिकोनातून देवी जानकी ह्यांचे वर्णन करणारे अनेक विशेषणे वापरले आहेत.

आपल्या अलौकिक सुंदर पत्नीच्या विरहाचे दुःख, आपण एवढे शूर असून तिचे रक्षण करू शकलो नाही त्याचे दुःख, तसेच तिला कोणी हानी तर पोचवली नसेल त्याची अतीव काळजी ह्या गीतातील प्रत्येक शब्दातून स्पष्ट होतेय.}

(रामकथेत काय होईल ते जाणून घेऊ उद्याच्या भागात तोपर्यंत जयश्रीराम🙏🚩)

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★


ग.दि.माडगूळकर रचित गीत रामायणातील हे एकतीसावे गीत:-



उजाड आश्रम उरे काननी

कोठे सीता जनकनंदिनी?


सांग कदंबा बघुनी सत्वर

दिसते का ती नदीतटावर?

करी कमंडलु, कलश कटिवर

हरिमध्या ती मंदगामिनी


सांग अशोका शोकनाशका!

कुठे शुभांगी क्षमा-कन्यका?

कंपित का तव पल्लव-शाखा?

अशुभ कांहिं का तुझिया स्वप्नी?


कुठे चंदना, गौरांगी ती?

कुंदलते, ती कोठे सुदती?

कोठे आम्रा, विनयवती ती?

शहारता का वाऱ्यावाचुनि?


घात-घटी का पुन्हा पातली?

सीते, सीते, सखे मैथिली!

हाक काय तू नाहि ऐकिली?

येइ, शिळेच्या बसू आसनी


पहा लक्ष्मणा, दिसती डोळे

प्रियेचेच ते विशाल भोळे

मृगशावक हे तिचे कोवळे

का याच्याही नीर लोचनी?


अबोल झाले वारे पक्षी

हरिली का कुणि मम कमलाक्षी?

का राक्षस तिज कोणि भक्षी

शतजन्माचे वैर साधुनी?


पुनश्च विजयी दैव एकदा

घातांवर आघात, आपदा

निष्प्रभ अवघी शौर्यसंपदा

जाइ बांधवा, पुरा परतुनी


काय भोगणे आता उरले?

चार दिसांचे चरित्र सरले

हे दुःखांचे सागर भरले

यात जाउ दे राम वाहुनी

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★