संजय म्हणाला, करुणसागरात बुडालेला, डोळे अश्रुनी भरलेले व दु:खी अशा अर्जुनाला बघुन श्री भगवान म्हणाले हे असे विचार (कश्मल-पापाचे) यावेळी तुला कसे सुचले. हे नरवरा हे तुला शोभत नाहीत. याने तुला किर्ती किंवा स्वर्ग मिळणार नाही. पार्था हे अयोग्य आहे. ही षंढता नको. मनाची दुर्बलता सोडुन लढण्यासाठी ऊठ.
अर्जुन म्हणाला, भीष्म,द्रोण हे वंदनीय व पुजेच्या योग्यतेचे आहेत. हे मधुसुदना मी त्यांच्याशी कशासाठी लढू हे मला सांग.महात्मा, गुरुंना मारण्यापेक्षा मी भीकेला लागेन. असे रक्ताने भिजलेले भोग काय कामाचे?. त्याना मारुन मी कोणती ईच्छा करू. आम्ही जिंकु किंवा नाही हे कोणास ठाऊक. मी श्रेष्ठत्व जाणत नाही. लढाईला तयार असलेल्या ध्रुतराष्ट्र पुत्राना मी मारु इच्छीत नाही. मला धर्म, नीतीचा अर्थ माहीत नाही. माझ्या स्वभावाला हे पटत नाही. मी तुझा शिष्य आहे. मी तुला शरण आलो आहे. तू मला नीट मार्ग सांग. मी जरी भुमी,स्वर्ग जिंकले, ईंद्रपद लाभले तरी मला हे जे दु:ख होत आहे त्यावर उत्तर सापडत नाही. संजय म्हणाला, अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगीतले की मी युध्द करणार नाही.
दोन्ही सैन्यांमधे शोकमग्न होऊन बसलेल्या अर्जुनाला भगवान म्हणाले, तू शहाणा आहेस तरी ज्यांचा शोक करु नये त्याचा शोक करीत आहेस. जन्म मृत्युचा विचार तू का करीत आहेस. तू आणि मी कधी नव्हतो असा काळ नव्हता आपण पुढेही होणार नाही असे नाही हेच सत्य आहे.शरीर एक असते पण वयाप्रमाणे त्यात फरक होत जातो. या सर्वांची प्रथम कुमार अवस्था असते मग तारुण्य येते मग म्हातारपण येते.मृत्युनंतर दुसरा देह धारण करतात. थोर लोक या स्थितीने भ्रमीत होत नाहीत. मन ईंद्रियाधीन असते. ते विषयांचा विचार करते आणि त्यामुळेच सुख दु:ख, थंड गरम असे वाटत असते. हेच अज्ञानाचे कारण आहे.हे अर्जुना, सुख दुःखे ही माणसाने सहन करणे शिकले पाहिजे. जे उत्पन्न होते ते नष्ट होते. जो माणुस या विचारानी दु:खी होत नाही तो खरा. सुख दु:ख एकच मानुन मोक्ष मिळवतो. असणे आणि नसणे भ्रांती आहे. तू हे जाणुन घे की आत्मा अविनाशी आहे त्याचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. शरीराचा नाश होतो,म्हणुन हे अर्जुना तू लढ. आत्मा चिरंतन आहे. देह जरी मारला तरी तो (आत्मा) मरत नाही.आत्मा आजन्म,शाश्वत, पुरातन आणि कधीही मृत्यू न पावणारा आहे. हे जाणणारा पुरुष कोणाला मारेल अथवा मारवेल. माणुस जसा जुने वस्त्र टाकुन नविन वस्त्र घालतो. तसेच आत्मा हा जुने शरीर सोडुन नविन शरीरात प्रवेश करतो. याला शस्त्र जखमी करु शकत नाही, अग्नी दहन करु शकत नाही, तो पाण्यात भिजतही नाही आणि वारा त्याला सुकवु शकत नाही. आत्मा जळत नाही, जखमी होत नाही,भिजत नाही वाळत नाही. तो स्थिर आहे. हे तु लक्षात घेतलेस तर तुझे शोक करणे व्यर्थ आहे हे तुला कळेल. जो जन्माला आला त्याला मरण येणारच, तरी अर्जुना तु शोक करु नकोस. जसे जन्माला आलेल्या प्रत्येकास मृत्यु येणारच तसेच सर्व मृत झालेल्याना जन्म मिळणारच. या गोष्टी अटळ आहेत. त्यासाठी शोक करणे योग्य नाही. या जगात समस्त प्राणी अव्यक्त असतात, ते जन्माला आले की व्यक्त नंतर परत जातात, परत येतात आणि जन्म मरणाची फेरी चालुच राहते. येतात जातात त्यांचा शोक कशाला?. आत्म्याकडे काही आश्चर्याने पहातात. कोणी त्याला आश्चर्य म्हणतात.हे आश्चर्य आहे असे कोणी ऐकतात. पण यास कोणी ओळखत नाही. या देहात राहणाऱ्या आत्म्याला कोणी मारु शकत नाही. म्हणुन तुझे शोक करणे योग्य नाही. कर्तव्य करण्याच्या वेळी व्याकुळ होऊ नकोस. क्षत्रियाना धर्मयुद्ध करणे श्रेयस्कर आहे. क्षत्रियांसाठी रणांगणातुनच स्वर्गाचा उंबरठा मिळतो. जर तू हे धर्म युद्ध केले नाहीस तर स्वत:ची कीर्ती घालवशील व पापाचा धनी होशील. अपकीर्ती होईल. एकवेळ मरण चांगले पण अपकीर्ती होऊ नये. तुझी दुष्किर्ती होईल. तुला महान समजणारे पण तु जर रणांगणातुन गेलास तर तू घाबरुन गेलास असे म्हणुन तुला तुच्छ लेखले जाईल. तुझी निंदा करतील. तुझ्या सामर्थ्या विषयी शंका घेतील. याहुन मोठे दु:ख कोणते. जरी पृथ्वी नाही मिळाली तर स्वर्ग तरी मिळेल. सर्व हेतु सोडुन निष्काम होऊन लढाई कर. सुख दु:ख, लाभ,हानी, जय,पराजय, समान मान. समबुद्धिने लढण्यात पाप कसले. भविष्यात काय घडेल याचा विचार न करता अर्जुना युद्ध कर.
तुला मी ज्ञान मार्ग सांगीतला. आता कर्मयोग ऐक. निष्काम कर्म केले असता मोक्ष प्राप्ती होते.असे करण्यात नुकसान नाही आणि या मार्गात थोडे जरी साध्य झाले तरी सर्व भया पासून माणसाचे रक्षण होते. स्वधर्माचे आचरण करुन निष्काम कर्म केले तर कर्मबंधन घडत नाही. निश्चयी बुद्धिने राहणे. विवेक सुटला की विचाराना फाटे फुटतात. जे अल्पज्ञानी असतात ते वेदांच्या आधारे सांगतात की जन्माने दिलेली कर्मे करावीत, म्हणजे ऐश्वर्य व सुखे मिळतात. फळाची आसक्ती ठेवुन कर्म करणाऱ्याना भुल पडलेली असते. त्याना ईश भक्तिची बुद्धि होत नाही. वेदानी सांगीतलेल्या त्रिगुणातुन मुक्त हो. तू सर्व लाभ, संरक्षण, योगक्षेमाच्या काळजीतुन मुक्त हो. विहिरीतुन जी कार्ये होतात तीच सरोवराकडून जलद होतात त्याप्रमाणे ज्ञानी माणसाला ज्याला हेतू माहीत आहे त्याला वेद विषयक कार्यं प्राप्त होतात. सरोवरात पाणी असते पण आपण गरजेप्रमाणे घेतो तसेच जे ज्ञानी असतात ते वेदांचे सार काढुन शाश्वत ते स्वीकारतात. फळाची ईच्छा न ठेवता कर्म करावे. आसक्ती सोडुन तु कर्म कर. एखादे कर्म सिद्धीस गेले तरी त्यात सुख मानु नये व सिद्धीस नाही गेले तरी दु:ख मानु नये, फळ मिळो न मिळो दोन्ही स्थितीमध्ये शांत रहावे. सुखदु:खाचा विचार न करता कर्म करावे. जे ज्ञानी असतात ते असेच कर्म करतात. बुद्धियोगाचे आचरण करून कर्म करावे. कर्म फळाची ईच्छा न करणारे भवचक्रातुन सुटतात. जन्म मरणाच्या फेरीतुन सुटुन मोक्ष मिळवतात. मोह सोडुन जर तू योग युक्त होऊन समत्व साधशील तर तुला आत्म ज्ञान होईल. तुझी बुद्धी स्थिर होईल तेव्हाच योग घडेल. अर्जुन म्हणाला मी तुझे बोलणे ऐकले मला तुला शंका विचारायची आहे. कृष्ण म्हणाला तुला जे विचारायचे आहे ते निर्धास्तपणे विचार अर्जुन म्हणाला स्थितप्रज्ञ(आत्मज्ञानी) कसे ओळखावे त्याची लक्षणे काय त्याच्यात कोणते गुण असतात. भगवान म्हणाले सर्व इच्छांचा त्याग करून समाधानी राहणारा म्हणजे स्थितप्रज्ञ. दु:खाने निराश न होणारा, सुखाच्या मोहात पडत नाही. प्रेम, भय, क्रोध यांच्यावर विजय मिळवणारा व स्थिर मनाचा असा असतो व त्याला मुनी म्हणतात. शुभ अशुभ, आनंद द्वेष या भावना नसलेला स्थिर बुद्धिचा असतो. ईंद्रिये मनाला ओढत असतात. (ईच्छा, मोह निर्माण करत असतात). पण तरीही कासव ज्याप्रमाणे आपले शरीर केव्हाही आत घेते व पसरते त्याप्रमाणे विषयांतून मनाला बाहेर काढले पाहिजे. जो विषयासक्त असतो त्याच्या मनात आसक्ती ऊत्पन्न होते त्यातुन काम क्रोधाची निर्मिती होते. त्याने बुद्धिचा नाश होऊन माणसाचे पतन होते. प्रेम द्वेष या भावनांतुन स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करुन पंचेद्रिंयावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.जर ह्रदय प्रसन्न असेल तर सर्व दुःखे निघुन जातात व बुद्धि स्थिर होते. स्थिर बुद्धि नसलेल्याला ईश्वराची आठवण होत नाही.चंचल वृत्तीच्या लोकाना शांती व सुख मिळू शकत नाही. जसे नावेला वारा ओढत असतो तसेच मन ईंद्रिय भोगांच्या मागे धावत असते. जो आपल्या ईंद्रियावर नियंत्रण करु शकतो त्याची बुद्धि स्थिर होते. समुद्राला अनेक नद्या मिळतात तरी समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. तसेच ईंद्रिय भोगांचा विचार जे करत नाहीत, विकार ज्यांचे मनात ऊत्पन्न होत नाहीत त्यांनाच शांतता लाभते. इच्छा अहंकाराचा त्याग करून मोहमायेत न अडकता ब्रह्म स्थिती मिळवतात. आध्यात्मिक जीवनाचा हाच मार्ग आहे. अशा अवस्थेतील मनुष्य मरणाच्या वेळी देवाच्या राज्यात प्रवेश करु शकतो. द्वितीय अध्याय