गीत रामायणा वरील विवेचन - 34 - धन्य मी शबरी श्रीरामा Kalyani Deshpande द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गीत रामायणा वरील विवेचन - 34 - धन्य मी शबरी श्रीरामा

जटायूचे दहन करून श्रीराम व लक्ष्मण पुढे निघाले.

वाटेत त्यांना डोके नसलेला कबंध राक्षस भेटला.


त्याने श्रीरामांनी सांगितले,

"हे श्रीराम आपल्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. इंद्राने दिलेल्या शापामुळे माझी ही अवस्था आहे. माझ्या दोन्ही भुजा तुम्ही जर तोडल्या आणि मला मारून माझे दहन केले तर मी ह्या राक्षस जन्मातून मुक्त होईल.",त्यावर श्रीराम त्याला म्हणतात,

"मी माझ्या भार्येच्या शोधात आहे. त्याबद्दल तू मला काही माहिती देऊ शकतो का?",त्यावर कबंध म्हणतो,

"त्यासाठी आपणाला माझे दहन करावे लागेल. त्यानंतर च मी काही सांगू शकेन"


श्रीराम त्याची इच्छा पूर्ण करतात. जेव्हा त्याचे दहन होते तेव्हा त्या अग्नितून दिव्य शरीर धारण करून तो कबंध राक्षस प्रकट होतो व सांगतो,

"किष्किंधा नगरीत सुग्रीव नामक वानर राज राहतात ते तुम्हाला सीता देवी पर्यंत पोचण्यास मदत करू शकतात.",असे म्हणून किष्किंधा नगरीत जाण्याचा तो मार्ग सांगतो.


त्याने सांगितलेल्या मार्गाने श्रीराम व लक्ष्मण चालू लागतात.


वाटेत पंपा सरोवर लागते. त्या सरोवराच्या पश्चिम तटावर श्रीरामांना एक आश्रम दिसतो. प्रवासाने श्रमल्यामुळे ते त्या आश्रमात थोडा वेळ विसावा घेण्यास जातात. आश्रमाची पाऊल वाट त्यांना रांगोळ्यांनी, फुलांनी सुशोभित केलेली दिसते.


पाऊल वाटेवरून आत जाताच त्यांना एक वृद्धा दिसते.


"कोण आहे?",वृद्ध स्त्री विचारते त्यावर श्रीराम आपली ओळख सांगतात.

ते ऐकून त्या वृद्ध स्त्रीच्या आनंदाला पारावारच राहत नाही.

"श्रीराम! खरंच आपण श्रीराम आहात! एवढे वर्ष मी शबरी जिने ज्यांची वाट बघितली ते श्रीराम माझ्या आश्रमात आले ह्यावर माझा विश्वासच बसत नाही. आपण कधीतरी यालच म्हणून रोज मी आश्रम आपल्या स्वागता करिता सुशोभित करून ठेवते. आज आपल्या दर्शनाने मी धन्य झाली. चित्रकुटावर आपलं वास्तव्य होतं तेव्हा अनेक ऋषींना राक्षसांच्या तावडीतून आपण वाचवलं व त्यांचे आयुष्य सुरक्षित केले. आपलं आदरातिथ्य कसं करावं हे मला आनंदातिरेकाने कळत नाही.


आपण ह्या वृक्षाखाली जरा वेळ विश्राम करावा. मी तोपर्यंत आपल्या फलाहाराची व्यवस्था करते. ह्या उत्साहाच्या भरात काही चुका जर आपल्या ह्या वेड्या भक्ताकडून झाल्या तर क्षमा असावी.",असे म्हणून शबरी तिथल्या तिथे लगबगीने फिरू लागली. तिने श्रीरामांचे पाय धुण्यासाठी सुगंधी जल आणले. त्यांच्या पायाला लावण्यासाठी चंदनाचा लेप आणला.


शबरीने मोठ्या भक्तिभावाने श्रीरामांचे पाय धुतले पण तिचे अष्टसात्विक भाव जागृत झाल्यामुळे तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. पाण्यापेक्षा तिच्या अश्रूंनीच श्रीरामांचे पाय धुतल्या गेले. त्यांच्या पायावर चंदनाचा लेप लावत असताना ती बोलू लागली,


"माझे आयुष्य चंदनाप्रमाणे माझे गुरू मातंग मुनी यांची भक्ती करण्यात व्यतीत झाले. आजवर आपल्या दर्शनासाठी मी थांबून राहिले. आपल्या दर्शनाने माझ्या वृद्ध गलीत गात्र शरीरावर रोमांच फुलले आहेत.

जी काही तपस्या मी केली, माझ्या गुरूंच्या सान्निध्यात राहून जे काही ज्ञान मी मिळविले ते माझ्या तोंडून ऐकण्यासाठी साक्षात निलवर्णीय परमेश्वर च इथे आज अवतरला आहे त्यामुळे माझे जीवन कृतार्थ झाले आहे. "


शबरीची ही निर्व्याज भक्ती बघून श्रीरामांचे हृदय भरून येते. एखादी आई जशी आपल्या बाळाकडे कौतुक मिश्रित वात्सल्याने पाहते त्या दृष्टीने श्रीराम शबरीकडे पाहू लागले.


पाय धुणे झाल्यावर शबरी लगबगीने म्हणाली,

"आपण बराच प्रवास करून आला आहात. आपणाला निश्चितच भूक लागली असेल. पण ह्या वनात मी आपल्या क्षुधा शांती साठी काय करू? आज माझ्यासारख्या चकोरा कडे श्रीराम रुपी पूर्ण चंद्राची पौर्णिमा अवतरली आहे. जी प्रवासाने भुकेजली आहे.


मी माझ्या शक्तीने शक्य तेवढे वेगवेगळे मधुर कंद मुळे, फळे आपल्यासाठी आणून ठेवले आहेत. ते मी आपल्याला देते. ",असे म्हणून शबरी श्रीराम व लक्ष्मणासमोर फळांनी व कंदमुळांनी भरलेली परडी ठेवते.


पुढे शबरी श्रीरामांना म्हणते,"आपल्या सारख्या कल्पवृक्षासमोर माझ्या सारखी वृक्षवेली आणखी काय सादर करू शकेल? मी आणलेली ही मधुर बद्रीफळे(बोरे) आपण भक्षण करावी ही विनंती"


श्रीराम ते बोरे खाण्यास हातात घेतात पण प्रत्येक बोरावर पक्ष्यांनी खाल्ल्याच्या खुणा पाहून ते विचारतात,

"माते हे बोरं पक्षांनी भक्षण केलेले दिसतात.",त्यावर शबरी त्यांना म्हणते,

"पक्ष्यांनी नव्हे ते मीच भक्षण करून फक्त गोड गोड बोरेच निवडून तुम्हाला दिलेले आहेत. माझ्या श्रीरामांना आंबट बोरे मी कशी बरे खायला देऊ शकेल? म्हणून मी लाल आणि मधुर फळेच निवडून ह्या परडीत ठेवली आहे."


शबरीची तो निरागस भाव बघून श्रीराम प्रभावित होतात आणि ते बोरे खाऊ लागतात.(ह्यातून श्रीरामांचा निगर्वी,प्रेमळ आणि आपल्या भक्तप्रति असलेला आस्था भाव स्पष्ट होतो.)


राम फळे खात असतात पण लक्ष्मण मात्र फळांना हात लावत नाहीत. उष्टे बोरे कसे खायचे असा प्रश्न त्यांना पडतो ते बघून शबरी लक्ष्मणास म्हणते,


"सौमित्रा!(सुमित्रेचा मुलगा असल्याने लक्ष्मणास सौमित्र म्हणतात)

आपण शंकीत न होता निःशंक मनाने फळे भक्षण करावी. माझे मुख हे अखंड वेदोच्चारण केल्यामुळे पवित्र झाले आहे. त्यामुळे हे बोरे उष्टे नसून भक्तीने अभिमंत्रित झालेली आहेत.", शबरीने असे म्हणताच लक्ष्मण श्रीरामांकडे पाहतात. श्रीराम त्यांना फळे खाण्यास अनुमोदन(परवानगी) देतात तेव्हा कुठे लक्ष्मण फळे भक्षण करण्यास सुरुवात करतात.


अश्या तर्हेने भक्त आणि देव ह्यांच्यातील हृदय स्पर्शी नाते ह्या काव्यात वर्णिले आहे.

(राम कथेत पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात तोपर्यंत जय श्रीराम🙏)


ग.दि. माडगूळकर रचित गीत रामायण मधील हे चौतीसावे गीत:-


धन्य मी शबरी श्रीरामा!

लागली श्रीचरणे आश्रमा


चित्रकुटा हे चरण लागता

किती पावले मुनी मुक्तता

वृक्षतळि या थांबा क्षणभर, करा खुळीला क्षमा


या चरणांच्या पूजेकरिता

नयनि प्रगटल्या माझ्या सरिता

पदप्रक्षालन करा, विस्मरा प्रवासांतल्या श्रमा


गुरुसेवेतच झिजले जीवन

विलेपनार्थे त्याचे चंदन

रोमांचाची फुले लहडली, वठल्या देहद्रुमा


निजज्ञानाचे दीप चेतवुन

करितेंअर्चन, आत्मनिवेदन

अनंत माझ्या समोर आले, लेवुनिया नीलिमा


नैवेद्या पण काय देउ मी?

प्रसाद म्हणुनी काय घेउ मी?

आज चकोरा-घरी पातली, भुकेजली पौर्णिमा


सेवा देवा, कंदमुळे ही

पक्व मधुरशी बदरिफळे ही

वनवेलींनी काय वाहणे, याविन कल्पद्रुमा?


क्षते खगांची नव्हेत देवा,

मीच चाखिला स्वये गोडवा

गोड तेवढी पुढे ठेविली, फसवा नच रक्तिमा


का सौमित्री, शंकित दृष्टी?

अभिमंत्रित ती, नव्हेत उष्टीं

या वदनी तर नित्य नांदतो, वेदांचा मधुरिमा

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★