Geet Ramayana Varil Vivechan - 48 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन - 48 - आज का निष्फळ होती बाण

कुंभकर्ण रणभूमित येताच एकच हाहाकार होतो. वानर सेनेतील वानरांचे समूह च्या समूह कुंभकर्ण गिळून टाकतो. सगळी सेना सैरभैर होते.

तेवढ्यात विभीषण कुंभकर्णाला समजवायला जातो पण कुंभकर्ण त्याला तू भाऊ असून भावाला साथ न देता शत्रू पक्षात गेला असे दूषण लावून पाठवून देतो.

त्यानंतर कुंभकरणाच्या हल्ल्याने सुग्रीव मूर्च्छित होतो. अंगद लक्ष्मण यांना सुद्धा तो आटोपल्या जात नाही. हनुमान त्याच्यावर प्रहार करतात तेव्हा कुंभकर्ण त्यांना गरगर फिरवून फेकून देतो ते मूर्च्छित होतात. तोपर्यंत सुग्रीव शुद्धीवर येतो तो श्रीरामांकडे जातो व म्हणतो,

"प्रभू तिकडे कुंभकर्णाने हाहा:कार माजवला आहे. तो वानरांचे जथे च्या जथे गिळून टाकतो आहे. जर असेच सुरू राहिले तर एकही वानर सेनेत शिल्लक राहणार नाही. आपण काहीतरी करा.",सुग्रीवाने असे म्हणताच श्रीराम कुंभकारणाकडे आपला मोर्चा वळवतात.

राम आणि कुंभकर्णात तुंबळ युद्ध होते कोणीच मागे हटायला तयार नसते पण अखेर काही काळाने श्रीराम कुंभकर्णाचे हात पाय शीर तोडून त्याला यमसदनी पाठवतात.

आता रावणाच्या सैन्यात सगळे महत्वाचे वीर मरण पावले असतात फक्त रावण व मेघनाद तेवढे शिल्लक राहिले असतात.

मेघनाद इकडे युद्धात विजय मिळण्यासाठी आपल्या इष्ट देवतेचा यज्ञ करण्यास बसलेला असतो. विभीषणाला हे त्याच्या हेरांकडून कळते. मेघनादाचा हा यज्ञ पूर्ण झाला तर आपण पराजित होऊ असे विभीषण रामाला सांगतो त्यानुसार राम हनुमानाला मेघनाद चा यज्ञभंग करण्यास पाठवतात.

हनुमान मेघनाद चा यज्ञभंग करतो त्यामुळे मेघनाद चिडतो. तेवढ्यात रावण त्याला कुंभकर्ण मरण पावला असल्याने युद्ध भूमीवर तुझी नितांत गरज आहे असा निरोप पाठवतो. मेघनाद युद्ध भूमीवर जायला निघतो तेवढ्यात त्याची पत्नी सुलोचना त्याला युद्ध भूमीवर जाण्यात धोका आहे आपण जाऊ नये असे सांगते पण मेघनाद पित्याच्या आज्ञेपुढे तिचे काही न ऐकता युद्धभूमीवर दाखल होतो. तिथे लक्ष्मण आणि मेघनाद मध्ये युद्ध सुरू होते. विभीषणाने लक्ष्मणाला आधीच सांगितले असते की जर मेघनाद चे शीर जमिनीवर पडले तर संपूर्ण पृथ्वी जळून जाईल त्यामुळे काहीही करून त्याचे शीर जमिनीवर पडता कामा नये हे लक्षात ठेवून लक्ष्मण बाणाने त्याचे शीर असे भेदतो की ते प्रासादाबाहेर असलेल्या सुलोचना च्या ओंजळीत पडते. ते पाहून सुलोचना अतीव दुःखाने विलाप करू लागते. मंदोदरी सुद्धा आक्रोश करू लागते.

आता श्रीराम व रावणाचे युद्ध सुरू होते. कुंभकर्ण व मेघनाद मरण पावल्यामुळे रावण आता इरेला पेटला असतो.
बराच काळ राम रावणाचे युद्ध सुरू असते. अनेक प्रकारचे शस्त्र अस्त्र यांचा प्रयोग ते एकमेकांवर करत असतात शेवटी एक बाण मारून श्रीराम रावणाचे शीर भेदतात पण काय आश्चर्य त्याजागी दुसरे शीर येते. अश्या पद्धतीने राम शंभर वेळा रावणाचे मुंडके उडवतात पण पुन्हा त्याजागी नवे मुंडके तयार होते ते पाहून राम हतबल होतात आणि त्यांचा सारथी मातली(जो इंद्राने त्यांना दिलेला असतो) ला म्हणतात,

"आज असे काय होतेय? माझं पुण्य कमी पडलं की माझ्या बाहूनमधील शक्ती कमी पडतेय. एवढे बाण मारून सुद्धा रावण मारत का नाहीये? हा कोणता चमत्कार आहे? एक शीर तोडता पुन्हा दुसरे शीर निर्माण होते आहे जणू रावण नसून शीर असलेली ही एक खाणच आहे. ह्याला तोडगा काय काढावा मला तर काही सुचत नाही. एवढा वेळ होऊनही रामसमोर त्याचा शत्रू सुखरूप उभा आहे हा माझा अपमान नसून माझ्या युद्ध विद्येचा अपमान आहे. मी खर दूषण,मारीच आदी अनेक दैत्य मारले आजच काय झालं माझ्या बाणांना काही कळत नाही. ज्याच्या धाका मुळे समुद्र घाबरला, ज्याचे शत्रूला भय आणि मित्राला आदर वाटतो तो असा मी श्रीराम त्याच्या भात्यात आज विजय मिळवून देणारा एकही बाण नसावा हा केवढा दैवदुर्विलास आहे.

माझ्या वर विसंबून असलेले मुनी देव अप्सरा जर हे बघत असतील तर किती निराशेने ग्रासून जातील. एवढा काळ त्यांना त्रास देणारा रावण आता मरणार ही त्यांची आशा आता खोटी ठरते की काय असे झाले आहे.

रक्ताने माखलेला तरीही सिंहासारखा गर्जना करत रावनरूपी अहंकार माझ्यासमोर उभा आहे पण माझे बाण त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही हे कुठले गूढ आहे? रावणाला असे कोणते वरदान आहे हे इंद्रसारथी मातली तुला ठाऊक असेल तर मला सांग",श्रीराम मातली ला म्हणतात.

(रामकथेत पुढे काय होईल ते जाऊन घेऊ उद्याच्या भागात तोपर्यंत जयश्रीराम🙏🚩)

महाकवी ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे अठ्ठेचाळीसावे गीत:-

आज का निष्फळ होती बाण?
पुण्य सरें कीं सरलें माझ्या बाहूंमधलें त्राण?

शरवर्षावामाजीं दारुण
पुन्हां तरारे तरूसा रावण
रामासन्मुख कसे वांचती रामरिपूचे प्राण?

चमत्कार हा मुळिं ना उमजे
शीर्ष तोडितां दुसरें उपजें
रावणांग कीं असे कुणी ही सजिव शिरांची खाण?

शत शिर्षे जरि अशीं तोडिलीं
नभीं उडविलीं, पदीं तुडविलीं
पुन्हां रथावर उभाच रावण, नवें पुन्हां अवसान

इंद्रसारथे, वीर मातली
सांग गूढता मला यांतली
माझ्याहुन मज असह्य झाला विद्येचा अपमान

वधिला खर मी, वधिला दूषण
वधिला मारिच, विराध भीषण
हेच बाण ते केला ज्यांनी वाली क्षणिं निष्प्राण

ज्यांच्या धाकें हटला सागर
भयादराचे केवळ आगर
त्या भात्यांतच विजयि शरांची आज पडे कां वाण?

सचैल रुधिरें न्हाला रावण
सिंहापरी तरि बोले गर्जुन
मलाहि ठरला अवध्य का तनुधारी अभिमान?

सचिंत असतिल देव, अप्सरा
सुचेल तप का कुणा मुनिवरा?
व्यर्थच झालें काय म्हणूं हें अवघें शरसंधान?
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★


इतर रसदार पर्याय