गीत रामायणा वरील विवेचन - 50 - लीनते,चारुते, सीते Kalyani Deshpande द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गीत रामायणा वरील विवेचन - 50 - लीनते,चारुते, सीते

श्रीराम विभीषणाला रावणाचे अंत्यसंस्कार करण्यास सांगतात ते ऐकून विभीषण आश्चर्याने म्हणतो,


"प्रभू हे आपण सांगता आहात! ज्या रावणाने आपल्याला एवढा त्रास दिला त्याचा आपण अंत्यसंस्कार करण्यास सांगता आहात. धन्य आहात आपण!"


"विभीषणा वैर हे ती व्यक्ती जिवंत असेपर्यंतच असते. मृत्यूनंतर वैर संपते त्यामुळे धर्माप्रमाणे तू तुझ्या ज्येष्ठ बांधवाचे क्रियाकर्म करणे आवश्यक आहे ते तू कर.",श्रीराम


विभीषण रावणाचे अंत्यसंस्कार करतो. लंकेत शोककळा पसरली असते. श्रीराम रौद्ररूप त्यागून आता सौम्य रूप धारण करतात व हनुमानास देवी सीतेला आपली विजयची व कुशलतेची वार्ता देण्यास सांगतात. हनुमान जेव्हा सीता देवींना श्रीराम विजयी झालेत अशी वार्ता देतात तेव्हा जनकनंदिनीं च्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात त्या श्रीरामांना भेटण्याची इच्छा प्रकट करतात. हनुमान हा निरोप घेऊन श्रीरामांकडे जातात तेव्हा श्रीराम जानकीला आपल्या समीप आणण्याची आज्ञा करतात त्यानुसार हनुमान जानकी देवींना श्रीरामांच्या समक्ष घेऊन येतात. श्रीराम व सीता यांना एवढ्या काळानंतर एकमेकांचे दर्शन होते ते सद्गदित होतात. दोघांच्या डोळ्यातुन उत्कट आनंदाच्या अश्रुधारा वाहू लागतात.


श्रीराम सीता देवींना म्हणतात,

"हे सीते तुला बघण्यासाठी किती प्रयत्न करून, पराक्रमाची पराकाष्ठा करून मी इथवर आलो आहे. आज पुन्हा तुझी नम्रतेने पवित्र्याने भारलेली मूर्ती बघून मला परम समाधान लाभले आहे.


तुला प्राप्त करण्यासाठी जे भयंकर युद्ध आरंभिले होते ते आता संपले आहे. पाप्यांना त्यांच्या कर्माची पुरेपूर शिक्षा मिळाली आहे. आता माझा क्रोध शांत झाला आहे. जे राजाचे कर्तव्य आहे त्याप्रमाणेच मी वागलो आहे.


रणांगणात मी शत्रूला यमसदनी पाठवून आपल्या अपमानाचा बदला घेतला आहे. जानकी ला मुक्त करण्याची जी शपथ मी घेतली होती ती मी पूर्ण केली आहे. माझ्या शौर्याने मी दैवाला सुद्धा वाकविले असून तुला आज पुन्हा सुखरूप पाहून माझ्यावर स्व स्त्रीचे रक्षण करू शकलो नाही हा जो अपराधी भावाचा कलंक होता तो ही धुवून निघाला आहे. वानर सेनेच्या मदतीने हे साध्य झाले आहे आज त्यांची मान अभिमानाने उंच झाली आहे.


हे सगळं साध्य करण्यासाठी तुझ्यापर्यंत येण्यासाठी मला समुद्र ओलांडावा लागला. मला साहाय्य करण्यासाठी सुग्रीवाने वानरसेनेने जीवाचे रान केले त्यांच्या कष्टाचे आज चीज झाले आहे. आज सर्वत्र सगळी जनता देव अप्सरा मंगल गीत गात आहेत.",एवढं म्हणून श्रीराम पुढे म्हणतात,


"सीते हे सगळं दिव्य तुझ्यामुळे मी जरी केलं असलं तरी तुझ्यासाठी केलेलं नाहीये. रावणाने रामाची भार्या बलपूर्वक नेल्यामुळे जो रघुवंशाला कलंक लागला होता तो धुण्यासाठी मी हे सगळं केलं आहे. आज रघुवंशाला पुन्हा त्याचं नावलौकिक प्राप्त झालं आहे.


जो आजारी आहे त्याला दीपोत्सवाचा आनंद कसा काय उपभोगता येणार? त्याप्रमाणे आज पुन्हा तू जरी मला प्राप्त झाली असली तरी मला माझ्या मनातील भावना हा आनंद उपभोगू देत नाही. आज आपण चार वर्षांनी पुन्हा समीप आलो आहोत पण ह्या चार वर्षात तू त्या काम लंपट रावणाच्या सान्निध्यात होती. जरी तू प्रामाणिक राहिली असशील असं जरी मी मानलं पण तरीही रितीनुसार चालायचं झालं तर त्याला पुरावा काय? मी कसा काय तुझ्यावर विश्वास ठेवू? मला काय म्हणायचंय ते तुला समजलं असेलच. ह्यापेक्षा जास्त मी उलगडून सांगू शकत नाही. पती म्हणून मी तुझं संरक्षण करू शकलो नाही त्याची जी मला सल होती ती मी तुला रावणापासून मुक्त करून काढून टाकली पण आता तुझ्यासाठी दाही दिशा मोकळ्या आहेत तू कुठेही जाऊ शकते. आता मला आज्ञा मागण्याची गरज नाही कारण आपल्या मधील पती पत्नीचे नाते आता संपले आहे.


(पुढचा भाग उद्या तोपर्यंत जय श्रीराम🙏🚩)



ग.दि. माडगूळकर रचित हे पन्नासावे गीत:-



किती यत्‍ने मी पुन्हा पाहिली तूते

लीनते, चारुते, सीते


संपलें भयानक युद्ध

दंडिला पुरा अपराध

मावळला आतां क्रोध

मी केलें जें, उचित नृपातें होतें


घेतले रणीं मी प्राण

नाशिला रिपू, अवमान

उंचावे फिरुनी मान

तव भाग्यानें वानर ठरले जेते


शब्दांची झाली पूर्ती

निष्कलंक झाली कीर्ति

पाहिली प्रियेची मूर्ति

मी शौर्यानें वांकविलें दैवातें


तुजसाठीं सागर तरला

तो कृतार्थ वानर झाला

सुग्रीव यशःश्री ल्याला

सुरललनाही गाती मंगल गीतें


हें तुझ्यामुळें गे झालें

तुजसाठी नाहीं केलें

मी कलंक माझे धुतले

गतलौकिक गे लाभे रघुवंशातें


जो रुग्णाइत नेत्रांचा

दीपोत्सव त्यातें कैचा?

मनि संशय अपघाताचा

मी विश्वासूं केवि तुझ्यावर कांते?


तो रावण कामी कपटी

तूं वसलिस त्याच्या निकटीं

नयनांसह पापी भृकुटी

मज वदवेना स्पष्ट याहुनी भलतें


मी केलें निजकार्यासी

दशदिशा मोकळ्या तुजसी

नच माग अनुज्ञा मजसी

सखि, सरले ते दोघांमधले नाते

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★