रामांनी असे म्हंटल्यावर सीता देवींना धक्का बसतो,अतीव दुःख होते त्या लक्ष्मणास अग्नी पेटवण्यास सांगतात. श्रीरामच जर मला स्वीकारणार नसतील तर माझं जीवन व्यर्थ आहे माझा जगून उपयोग नाही त्यामुळे मी अग्नीत देहसमर्पण करते असे म्हणून सीतादेवी अग्निप्रवेश करतात. लक्ष्मण,सुग्रीव,हनुमान सगळ्यांना अत्यंत दुःख होते. श्रीरामांना ही अतीव दुःख होते पण ते नियमबद्ध असतात त्यामुळे मनातल्या मनात अश्रू ढाळून स्तब्ध असतात. थोड्याचवेळात आश्चर्य होते. स्वतः अग्निदेव सीता देवींना सुखरुप घेऊन येतात आणि श्रीरामांना सांगतात,
"प्रभू आपली जानकी शुद्ध,निष्कलंक आहे. तिचा स्वीकार करा."
तेव्हा श्रीरामांच्या डोळ्यातून आणि तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात. श्रीराम म्हणतात,
"सगळ्यांच्या साक्षीने जानकी शुद्ध आहे हे सिद्ध झालं आहे आता मला तिचा स्वीकार करण्यास काहीच हरकत नाही. मला ती शुद्ध आहे हे आधीच माहीत होतं पण लोकांना ते पटलं नसतं त्यामुळे मला असं वागावं लागलं. अयोध्येत जर मी असंच जानकी ला नेलं असतं तर प्रजेने आपला राजा स्त्रयीण विषयलुब्ध आहे असं समजलं असतं. आणि त्यामुळे माझ्या प्रजेच्या नजरेतून मी उतरून गेलो असतो. एक राजा म्हणून मला तसं करणं योग्य ठरलं नसतं. एक आदर्श राजा तोच असतो जो नेहमी प्रजेचा विचार करतो. प्रजा ही राजासाठी ईश्वराचे रूप असते. प्रजेच्या सुखासाठी वेळप्रसंगी राजाची प्राणही देण्याची तयारी असायला हवी अशी माझी दृढ श्रद्धा आहे आणि हाच राजधर्म आहे त्यामुळेच मी मैथिलीचा मोह माझ्या मनातून काढून टाकला.
माझे कठोर शब्द ऐकून सीतेच्या डोळ्यात जेव्हा अश्रू वाहू लागले तेव्हा मला धीर धरवत नव्हता पण आजूबाजूला सगळी सेना उभी होती त्यांच्यासमोर रडणे मला योग्य वाटले नाही त्यामुळे महत्प्रयासाने मी माझे अश्रू डोळ्यातच गोठवून ठेवले.",एवढं बोलून श्रीराम अग्निदेवाला म्हणतात,
"जानकीच्या हृदयात रामाशिवाय कोणीच नाही आणि राघवाच्या आयुष्यात जानकी शिवाय दुसरी कुठलीच स्त्री नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे हे मी अग्निदेवा तुझ्या साक्षीने पुन्हा एकदा सांगतो. रावण जरी कामांध असला तरी सीता इतकी पवित्र आहे की तो तिच्या सावलीला सुद्धा स्पर्शू शकला नाही ह्याची मला खात्री आहे तेव्हा अग्निदेव आपली आज्ञा मी मान्य करतो आणि जानकी ला स्वीकारतो. आज जानकी ला माझ्या गृहस्वामीनीला प्राप्त करून मी धन्य झालो आहे. आता वनवासाची चौदा वर्षे सुद्धा पूर्ण झालेली असल्याने मी आयोध्येस प्रस्थान करतो.",रामांनी असे म्हणताच अग्निदेव उभयतांना आशीर्वाद देऊन अंतर्धान पावतात. जानकी देवी सकट सगळ्यांना आनंद होतो.
विभीषणाचा यथावकाश राज्याभिषेक करून श्रीराम पुष्पक विमानात बसून अयोद्धेकडे प्रयाण करतात.
{आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्याने आणि स्त्री पुरुषावर अवलंबून असल्याने आणि सगळ्यात महत्वाचे स्त्री गर्भधारणा करत असल्याने स्त्रीला शुद्ध असणे महत्त्वाचे आहे. वास्तविकतः पुरुषाने सुद्धा तितकेच शुद्ध असणे आवश्यक आहेच पण बळी तो कान पिळी या न्यायाने पुरुषाला कोणीही शुद्धी ची परीक्षा मागत नाही स्त्रीलाच मागतात म्हणून अयोध्येतील जनता फक्त स्त्रीलाच शुद्ध असण्याची परीक्षा वारंवार द्यायला लावते. ह्या परिस्थितीत आपल्याला तर माहीत आहेच की सीता देवी जेवढ्या पवित्र होत्या तेवढेच श्रीराम सुद्धा पवित्र होते त्याबद्दल दुमत नाही आणि त्यांच्याबद्दल बोलण्याची आपली पात्रता सुद्धा नाही. आणि वरील प्रसंगी राजा आदर्श हवा तसेच प्रजेला त्याच्याबद्दल आदरभाव वाटावा असेच त्याचे आचरण हवे ह्या उदात्त हेतूने प्रेरित श्रीरामांचे वागणे असल्याने सामान्य जनतेशी त्यांची तुलना होऊ शकत नाही.
परंतु सामान्य लोकांचे उदाहरण घ्यायचे झाले तर आजच्या काळातही अनेक ठिकाणी लग्न झाल्यावर सर्वप्रथम पती-पत्नीचे वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्याआधी स्त्रीचे ऋतुस्नान होणे आवश्यक मानले जाते. म्हणजेच पुढे तिच्या गर्भात जे मूल निर्माण होईल ते आपलंच आहे ही पुरुषाची खात्री पटावी म्हणूनच ही करण्याची पद्धत आहे पण पुरुष शुद्ध आहे का नाही हे जाणण्यासाठी निसर्गाने अशी कोणतीच तजवीज केलेली नाही. तरीसुद्धा पुरुषांनी सुद्धा तेवढंच शुद्ध राहणं आवश्यक आहे असे मला वाटते.असो.}
(रामकथेतील पुढील भाग उद्या तोपर्यंत जय श्रीराम🙏🚩जय सीता माई🙏🚩)
ग.दि. माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे एक्कावन्नावे गीत:-
लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची
स्वामिनी निरंतर माझी, सुता ही क्षमेची
ज्ञात काय नव्हतें मजसी हिचें शुद्ध शील?
लोककोप उपजवितो का परि लोकपाल?
लोकमान्यता ही शक्ती लोकनायकांची
अयोध्येत जर मी नेतों अशी जानकीतें
विषयलुब्ध मजसी म्हणते लोक, लोकनेते
गमावून बसतो माझ्या प्रीत मी प्रजेची
प्रजा रंजवीतों सौख्यें तोच एक राजा
हेंच तत्त्व मजसी सांगे राजधर्म माझा
प्रजा हीच कोटी रूपें मला ईश्वराचीं
प्राणही प्रसंगी देणे प्रजासुखासाठी
हीच ठाम श्रद्धा माझ्या वसे नित्य पोटीं
मिठी सोडवूं मी धजलों म्हणुन मैथिलीची
वियोगिनी सीता रडतां धीर आवरेना
कसे ओलवूं मी डोळे? उभी सर्व सेना
पापण्यांत गोठविली मी नदी आसवांची
राम एक हृदयीं आहे सखी जानकीच्या
जानकीविना ना नारी मनीं राघवाच्या
शपथ पुन्हां घेतों देवा, तुझ्या पाऊलांची
विषयलोभ होता जरि त्या वीर रावणातें
अनुल्लंघ्य सीमा असती क्षुब्ध सागरातें
स्पर्शिलीं तयें ना गात्रें हिच्या साउलीचीं
अग्निदेव, आज्ञा अपुली सर्वथैव मान्य
गृहस्वामिनीच्या दिव्यें राम आज धन्य
लोकमाय लाधे फिरुनी प्रजा अयोध्येची
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★