भगवद्गीता - अध्याय १३ गिरीश द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भगवद्गीता - अध्याय १३

अध्याय १३
महाभूते (५), अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृति, दहा इंद्रिये, मन, इंद्रियांचे पाच विषय, इच्छा, द्वेष, सुख, दु:ख, देह व इंद्रियांचा संयोग, चेतना, धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसह क्षेत्र असे म्हणतात.
( इंद्रिये- ज्ञानेंद्रिये - डोळे, कान, नाक, जिभ, त्वचा. २- कर्मैंद्रिय - वाणी, हात, पाय, उपस्थ, गुदद्वार . मन हे अतरिंद्रिय.
पाच इंद्रिय विषय - शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. )
विनम्रता, दंभ नसणे, अहिंसा, क्षमाशीलता, सरळपणा, चित्त शुद्धि, गुरूची सेवा करणे, संयम, स्थिरता, इंद्रियांचे ठिकाणी अनासक्ती, अहंकार नसणे,
तसेच जन्म, मृत्यू, म्हातारपण, रोग, यांमधील दोष ध्यानात ठेवणे, आसक्ति नसणे, पत्नी, पुत्र, घर इ. कशातही गुरफटून न राहणे, समतोल वृत्ति, इष्ट, अनिष्ट परिस्थिती मध्ये समतोल वृत्ति, माझ्या ठायी अनन्य व न ढळणारी भक्ति, एकांत स्थानी राहणे, बाष्कळ बडबड करीत चारचौघात न बसणे, अध्यात्मावर विश्वास, अध्यात्माचे प्रयोजन काय आहे याचा अभ्यास, तत्त्वज्ञानातील सिद्धांतांचे मनःपूर्वक अध्ययन करणे हे ज्ञान आहे तर याहून जे विपरीत किंवा वेगळे आहे ते अज्ञान आहे.
जे जाणण्यास योग्य असे आहे ते मी तुला सांगतो त्यामुळे मोक्ष प्राप्ति होईल.
हे अनादि ब्रह्मतत्व आहे व माझ्या अधिन आहे. हे जीवात्मा व परब्रम्ह तत्व भौतिक जगाच्या कारण व परिणाम या संकल्पनेच्या पलीकडे आहे.
जीवात्मा व परमात्मा यांचे ज्ञान म्हणजे जीवन. (ब्रह्म हे असणे नसणे या संकल्पनेच्या पलीकडे आहे. त्याला सुरूवात शेवट नाही. )
परमात्मा हा सर्व व्यापी आहे. त्याचे हात, पाय, डोळे, मस्तके, चेहरे सर्वत्र असून त्याचे कान हे सर्व विश्व़ाला व्यापून राहिले आहेत. परमात्मा हा सर्वश्रेष्ठ असून तो‌ जसा सर्व व्यापक आहे तसा जीवात्मा नाही. परमात्मा सर्व इंद्रियांच्या गुणांचा स्त्रोत असला तरी त्याला प्राकृत इंद्रिये नाहीत म्हणजेच ती शुद्ध असून ती मायेने व प्रकृती ने दुषित झालेली नाहीत.
तो सर्व जीवांना धारण व पालन करणारा असूनही अनासक्त आहे. परमतत्व हे सर्व जीवांमध्ये आहे, आत बाहेर, चर अचर या सर्वात आहे. ते सुक्ष्म असलेने ते जवळ आहे कां दूर ते कळत नाही. अविभक्त असूनही तो सर्व भूतात विभागलेला आहे असे दिसते तो नित्य व विभाग रहित आहे.
तो सर्व प्राणिमात्रांचे धारण पोषण करणारा, निर्माण व विनाश करणारा आहे. परमेश्व़र हे तेज असून अंधाराच्या पलीकडे आहे, व जाणून घेण्यासारखा व ज्ञानानेच तो कळणारा आहे. तो सर्वांच्या हृदयात आहे. तोच जीवांचा आश्रय आहे. जीवांना असणारे हात पाय हे त्या जीवापुरते असतात. भगवान श्रीकृष्णांचे हात पाय सर्व व्यापक आहेत.
याप्रमाणे मी तुला क्षेत्र (देह) ज्ञान आणि ज्ञेय (जाणण्यास योग्य तत्वे) हे संक्षेपाने सांगितले. हे फक्त माझ्या भक्तांनाच समजू शकते व हे समजणारे मला प्राप्त होतात. प्रकृति आणि जीव हे दोन्ही अनादि आहेत. त्यांचे विकार व तीन गुण हे प्रकृती पासून उत्पन्न होतात. प्रकृति ही कार्य व कारण यांच्या कर्तुत्वाला कारण असते, तर जीवात्मा हा सुखदुःख भोगण्यास कारण असतो. जीवात्मा हा प्रकृति मध्ये स्थित झाल्यावर प्रकृती ने उत्पन्न केलेल्या त्रिगुणांचा उपभोग घेतो. हा गुणांचा संगचं जीवात्म्यांच्या बऱ्या वाईट योनीत जन्म घेण्यास कारण असतो.
या देहात प्रकृती च्या गुणांना पाहणारा, भोक्ता व अनुमती देणारा असा महेश्वर आहे तोच परमात्मा आहे. जो या गुणांनी युक्त प्रकृती ला जो जाणतो तो जरी वर्तमान कर्मे करीत असला तरी परत जन्म घेत नाही.
आपल्या मध्ये असलेल्या परमात्म्याला कांहीं लोक ध्यान मार्गाने, कांहीं सांख्य योगाने व कांहीं निष्काम कर्मयोगाने पहातात.
अजाणता गुरूकडून परमेश्वरा बद्दल ऐकुन श्रद्धेने त्याची उपासना करतात, त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागतात ते ही जन्म मृत्यु च्या पलीकडे जातात.
हे अर्जुना ! चर अचर अशा कोणत्याही वस्तूची उत्पत्ति ही क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने होते. सर्व प्राण्यांमध्ये राहणाऱ्या परमात्म्याला जो जाणतो तोच खरा डोळस तत्वज्ञ होय. जो परमात्मा सर्वत्र आहे असे समजून , तो सर्वत्र समभावाने आहे असे जाणतो तो आपली अधोगती होउ देत नाही व परमगतीला प्राप्त होतो. सर्व कर्मे ही प्रकृती कडून होत असतात. आत्मा हा अकर्ता असतो हे जो जाणतो तो ज्ञानी होय.
विचारी मनुष्य निरनिराळ्या देहामुळे असणाऱ्या विविधते मध्ये एकत्व पहातो व एकापासून विस्तार झाला आहे म्हणजेच विविधतेतील एकता व एकापासून विस्तार याची जेव्हा जाणीव होते तेव्हा ब्रह्म प्राप्ती होते.
ज्याला हे समजते की आत्मा शरीरात असूनही तो शाश्व़त आहे.
अनादि निर्गुण आहे व तो कांहीं करत नाही व कर्माचा दोष त्याला लागत नाही. जसे आकाश हे सर्व व्यापी असते पण अलिप्त असते, आत्मा शरीरात असला तरी तो अलिप्त असतो व शरीराला बांधलेला नसतो. सूर्य जसा जगाला प्रकाश देत असतो तसेच आत्मा त्याच्या चैतन्याने शरीराला उजळवतो.
जीवात्म्यामधील चेतना व परमचेतना या मध्ये फरक आहे. शरीराची चेतना त्याच शरीरात असते तर परमात्मा सर्व शरीरात असतो.
अशा प्रकारे जे ज्ञानरूपी डोळ्यांनी क्षेत्र व क्षेत्रज्ञ भेद जाणतात व जे भौतिक आत्मा व परमात्मा यांच्यातील भेद जाणून देह बुद्धी पासून मुक्त होण्याचे साधन जाणतो तो मोक्ष मिळवतो.
१३ वा अध्याय पूर्ण.
माहिती करिता
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये स्वामी महाराज म्हणतात ' तुझ्यात असलेला तू जीव आहेस व तुझ्यात असलेला मी परमात्मा आहे. तुझ्यात कर्तुत्व भावना असेपर्यंत "तू" "मी" होउ शकत नाही. तुझ्यात कर्तृत्व भावना असेतोपर्यंत सुखदुःख, पाप पुण्य अशा द्वंद्वातून तुझी सुटका नाही. तुझ्यातला "तू" नष्ट होऊन तुझ्यातील "मी" उच्च दशेत असेन तेव्हा तू माझ्या निकट असशील. जसे जसे तू माझ्या निकट येशील तसा तसा तू या द्वंद्वातून मुक्त होशील.