भगवद्गीता - अध्याय १५ , १६ गिरीश द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भगवद्गीता - अध्याय १५ , १६

भगवद्गीता अध्याय १५
पुरूषोत्तमयोग
मूळ वर व फांद्या खाली असलेला व ज्याची पाने म्हणजे वेद आहेत असा एक अश्वथ्थ वृक्ष आहे या वृक्षाला जो जाणतो तो वेदज्ञ जाणावा.
या संसार रूपी वृक्षाचे पोषण त्रिगुण करतात. विषयांचे अंकुर फुटलेले असतात याच्या मुळ्यांचा विस्तार खाली ही होत असतो आणि या मुळ्या मनुष्याला कर्मानुसार बांधतात.
या वृक्षाचे यथार्थ स्वरूप कळत नाही.
याचा आदि, अंत, व आधार समजत नाही. परंतु माणसाने अनासक्ती रूपी शस्त्राने तोडले पाहिजे
जिथुन परत येता येत नाही असे स्थान शोधावे व मनुष्याने या जगाचा उद्भव त्यापासून झाला त्या आदि पूरुषास शरण जावे.
अभिमान व मोह यापासून मुक्त, जो अध्यात्मात स्थिर आहे, सर्व कामनांमधून सुटलेला व सुख दु:खाच्या द्वंद्वातून मुक्त होऊन भगवंताला शरण जातो, तो ज्ञानी अविनाशी स्थान प्राप्त करतो.
त्या परमधामाला सुर्य, चंद्र, अग्नी प्रकाश देत नाहीत.
त्या परमधामाला जे जातात ते परत या जगात येत नाहीत. या जीवलोकांतील जीव माझे अंश आहेत पण ते प्रकृतीत असणाऱ्या मनासह पंचेद्रियावर असणाऱ्या भौतिक आवरणाने बद्ध असलेने त्यांना कठीण संघर्ष करावा लागतो.
देहाचा स्वामी असलेल्या जीवाला वारा जसे सुगंध बरोबर घेऊन येतो तसे शरीर प्राप्त होते व जीव शरीरातुन जातो तेव्हा मनासह इंद्रियांना पण बरोबर नेतो.
जीव शरीर धारण करून कान, डोळे, नाक, जीभ, त्वचा तसेच मनाच्या सहाय्याने इंद्रिय विषयांचा भोग घेतो. जीव शरीरात कसा राहतो, तो त्रिगुणांनी बद्ध राहून कसे जीवन जगतो किंवा जीव कसा देह सोडतो हे अज्ञानी लोकांना कळत नाही, पण ज्ञान चक्षुंनी पाहणाऱ्या लोकांना ते समजु शकते. आत्मज्ञानी योगी प्रयत्नाने आत्म्यास ओळखतात.
ज्यांची चित्तशुद्धी झालेली नाही असे अज्ञानी लोक प्रयत्नाने पण ते जाणु शकत नाहीत.
योग म्हणजे फक्त शरीर सुदृढ करणे नसुन भक्तियोगाची जोड त्यासाठी आवश्यक असते. सुर्यामध्ये जे तेज आहे ते सर्व जगाला प्रकाश देते व जे तेज चंद्रामध्ये, अग्नीमध्ये आहे ते तेज माझेचं आहे.
मी पृथ्वी वर प्रवेश करून सर्व जीवांना धारण करतो व कक्षेत ठेवतो तसेच मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवनरस देऊन त्यांचे पोषण करतो.
सर्व प्राण्यांच्या शरीरातील जठराग्नी मीच आहे व प्राण अपान यांच्या संयोगाने चार प्रकारचे अन्न पचन करवतो.
मी सर्व प्राण्यांच्या हृदयात राहतो व स्मृति, विस्मृति, ज्ञान हे माझ्यामुळे होतात.
वेदांनी जाणण्यासारखा मीच वेदांचा कर्ता मी आहे व मीच वेद जाणतो.
या जगात जीव दोन प्रकारचे असतात एक विनाशी व दुसरे अविनाशी म्हणजेच क्षर व अक्षर.
भौतिक जगतातील प्राणी क्षर व आध्यात्मिक जगातील अक्षर.
या दोघांपेक्षा वेगळा असा एक उत्तम पुरुष आहे तोच अविनाशी परमात्मा व जो सर्व त्रिलोकाचे पालनपोषण करीत आहे. विनाशी आणि अविनाशी यांच्या ही पलीकडे असणारा मी दिव्य पुरूष आहे.
आणि म्हणूनच मी "पुरूषोत्तम " म्हणून प्रसिद्ध आहे.
जो कोणताही संदेह न ठेवता मला पुरूषोत्तम म्हणून जाणतो तो ज्ञानी असतो व तो माझीच भक्तिभावाने पुजा करतो.
हे पाप रहित असणाऱ्या अर्जुना, मी तुला हे अंत्यंत गुप्त असे शास्त्र सांगितले आहे, व हे जो जाणेल तो बुद्धिमान व कृतकृत्य होतो. मनुष्याला पापरहित व दोषमुक्त झाल्यावर भगवंताची प्राप्ती होते.
अध्याय पंधरावा समाप्त.
अध्याय १६
दैवासुरसंपदविभाग योग( इथे दैवी संपत्तीत जन्म झालेल्या पुरूषाचे गुण सांगितले आहेत.) श्री भगवान म्हणाले,
निर्भयता, सात्त्विक वृत्ति, ज्ञान व योग यांमध्ये योग्य समन्वय, संयम, तप, सौजन्य, दान‌ करणे, यज्ञ करणे, शास्त्रांचे अध्ययन करणे, रागावर नियंत्रण, अहिंसा, सत्य बोलणे, त्याग, शांती, उदार दृष्टी (गुणदर्शी ) , सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी दया, हावरेपणा नसणे,
मृदू पणा, लज्जा, स्थिर वृत्ति, उत्साह,
क्षमावृत्ति, पवित्रता, अपेक्षा नसणे, द्रोहवृत्ति नसणे, धैर्य, हे गुण दैवी प्रवृत्तीच्या माणसाची लक्षणे आहेत.
हे अर्जुना ! ढोंगीपणा, अहंकार, क्रोध, उद्धटपणा, गर्विष्ठपणा, अज्ञान, ही आसुरी प्रवृत्तीच्या माणसाची लक्षणे आहेत.
दैवी गुणांमुळे मोक्ष प्राप्त होतो तर आसुरी गुण बंधनास कारण असतात.
हे पांडवा ! तूं दैवी गुणांसह जन्मलेला आहेस त्यामुळे तूं शोक करू नकोस. जीवांचे दोन प्रकार असतात, एक दैवी व दुसरा आसुरी.
मी तुला दैवी गुणांबद्दल विस्ताराने सांगितले आहे.
आता आसुरी गुणांबाबत सांगतो.
आसुरी स्वभावाच्या लोकांना कोणती गोष्ट करावी व कोणती करूं नये याचे ज्ञान नसते, पुण्य काय व पाप काय हे त्यांना कळत नाही. पवित्रता, चांगली वागणूक, व सत्य बोलणे हे गुण त्यांच्यात नसतात.
ते या जगाला इश्व़राचा आधार आहे असे मानत नाहीत. या जगात इश्व़र नाही, हे जग कामभावनेतून निर्माण झाले व या जगाच्या उत्पत्तीला तेच कारण आहे.
आत्म्याचे अस्तित्व न मानणारे हे लोक आपल्या अल्पबुद्धीनुसार आपल्या या मताला चिकटून राहून अशी कृत्ये करतात जी जगाच्या नाशास कारणीभूत होतात.
हे असे दांभिक, अहंकारी व विषयोपभोगात रमलेले लोक आपल्या दुराग्रही वृत्तीने पापी कृत्ये करण्यात मग्न असतात.
हे अशा रीतीने अनेक इच्छा आकांक्षा च्या पाशात अडकलेले असतात व आपल्या तृप्ती साठी अन्यायाने धनसंचय करू पाहतात.
मी आज हे मिळवले आणि मी अधिक मिळवणार आहे , आज मी या शत्रुला मारले, उद्या इतर शत्रुना पण मारेन.
मीच ईश्व़र आहे , सर्व गोष्टींचा उपभोग घेणारा सिद्ध आणि बलवान आहे.
मी धनवान आहे, श्रेष्ठ कुलातील आहे, माझ्या सारखे दुसरे कोणी नाही.
मी यज्ञ करीन, दान करीन व मजेत राहीन अशा अज्ञानी कल्पनेत वावरत असतात.
चुकीच्या कल्पना मनात बाळगून मोहजालात अडकतात व विषयभोगात राहून शेवटी नरकात जातात. ते उद्धट, अहंकारी व गर्विष्ठ असतात. दांभिकपणे विधी युक्त नसलेला यज्ञ करतात. काम, क्रोध व ताकदीच्या गर्वाने हे असुर त्यांच्या देहामध्ये असलेल्या माझी निंदा करतात, द्वेष करतात.
माझा द्वेष करणाऱ्या अशा मानवांना मी आसुरी जन्म योनीत टाकतो. हे अर्जुना ! ते आसुरी योनीत पुनः पुन्हा जन्म घेतात व अधम गतीला जातात व मला प्राप्त करू शकत नाहीत.
आत्म्याच्या विनाशासाठी व नरक प्राप्त होण्यासाठी तीन दारे आहेत.
ती म्हणजे काम, क्रोध, लोभ.
या तिन्हींचा त्याग केला पाहिजे.
अंधःकाराकडे नेणाऱ्या या तीन दारातून जो सुटतो तो आत्मकल्याण साधतो व परमगती प्राप्त करतो. शास्त्र संमंत नसलेल्या मार्गाने जाऊन व स्वैरपणे वागणाऱ्याना सिद्धी तर मिळत नाहींच पण सुख व चांगली गती लाभत नाही. म्हणून कर्तव्य कोणते व अकर्तव्य कोणते हे शास्त्राचा अभ्यास करून जाणणे आवश्यक आहे. सर्व कर्मे शास्त्रानुसार करणे हे तुझे कर्तव्य आहे.
सोळावा अध्याय पूर्ण.