दोन लघुकथा Balkrishna Rane द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दोन लघुकथा

कथा पहिली
कथा मधमाश्यांची

परीक्षा संपली.मुल ओरडतच घरी आली. चक्क, दफ्तरे कोपर्यात फेकत नाचू लागली.
" चला, आता काही खर नाही. दिवसभर धिंगाणा घालतील मुल." आई वैतागली.
एवड्यात बाबा बाहेरून आले.
" बाबा, आज सायंकाळी मोरडोंगरी वर
जायच..." मधु म्हणाली.
" होय, जायच म्हणजे जायचच..." अजय बाबांचा हात पकडत म्हणाला.
" ठिक आहे , उन्ह कमी झाल्यावर जाऊया." बाबा म्हणाले.
" हुर्रे....हुर्रे...." मधु व अजय बाबांभोवती फेर धरून नाचू लागले.
संध्याकाळी साडेचार वाजता ..बाबा, मधु व अजय मोरडोंगरीवर जाण्यासाठी बाहेर पडले.मधु व अजयने डोक्यावर टोप्या घातल्या होत्या.पाण्याच्या बाटल्या...दुर्बीण...काठी या वस्तू त्यांनी सोबत घेतल्या होत्या. टेकडीवर सायंकाळी अनेक पक्षी येतात. मोर तर हटकून दिसतात.शिवाय टेकडीवरून सभोवतालचा परीसर छान दिसतो.टैकडीचा वळणावळणाचा मातीचा रस्ता सुरू झाला. मुल खुपच उत्साहीत होती. दुतर्फा झाडी होती. एक दोन काटेसावरीची झाडे होती.झाडांवर लाल शेंदरी फुल फुलली होती.झाडावर पान नव्हती पण फुल खुप दिसत होती. थोड पुढे गेल्यावर एक पांगारा भडक नारिंगी रंगाचे तुरे फांद्यावर मिरवत लक्ष वेधून घेत होता.
" बाबा, किती छान दिसतात ही फुल..कसल झाड आहे हे." मधुने विचारल.
" पांगारा ..म्हणतात याला. लाकडी खेळणी..विहिरीची चौकट बनवण्यासाठी वापरतात. सध्या ही झाड खुप दुर्मीळ झालीत."
" बाबा मी याची फुल काढू." .. अजयने विचारले.

" नको फुल झाडावरच बरी दिसतात. त्यापेक्षा त्यांचा एक फोटो काढ...किंवा घरी जाऊन छान चित्र काढ."
एवड्यात मधुला ऐनाच्या झाडावर मधमाश्याच एक भल मोठ पोळ लटकताना दिसल.
" बाबा, ते बघा पोळ....इथ थांबने धोक्याच आहे."
" पण बाबा मधमाशी ..उपयोगी की उपद्रवी किटक ..?आजच आम्हाला परीक्षेत प्रश्न होता." अजयने विचारले.
" सोप्प आहे.मधमाशी डंख मारते.खूप त्रास होतो. ...म्हणून मधमाशी त्रासदायक किटक. हो की नाही पप्पा?" मधू म्हणाली.
" मधमाश्या डंख मारतात.पण उगाच कुणाच्या वाट्याला जात नाही तर त्यांना कुणी त्रास दिला की त्या डंख मारतात.पण त्यांचा मानवाला व पर्यावरणाला खूप फायदा आहे. "
" त्यांच पोळ किती सुंदर असते.षटकोन जोडून तयार झालेल." अजय दुर्बिणीतून बघत म्हणाला.
" पप्पां आम्हाला मधमाश्यांची माहिती सांगा." मधु म्हणाली.
" मधमाश्यामुळे मध मिळतो, मेण मिळते...परागीभवन होत...सूर्यफुलांच्या शेतीसाठी तर मधमाश्यांची फार मोठी गरज असते."

पोळ्यावर व पोळ्याभोवती अनेक मधमाश्यां घोंगावत होत्या.

" पप्पां पोळ्यात किती मधमाश्या असतील?" अजयने विचारले.
" अरे पोळ्यात कामकरी माश्यांची संख्या साधारणपणे पंधराहजारावर असते."
" म्हणजे, मधमाश्यांमध्ये प्रकार असतात का?" मधूने विचारले.
" हो, कामकारी माश्या, काही नरमाश्या व एक राणी माशी. कामकरी माश्यांमध्ये टेहळणी करणार्या माश्या....मकरंद गोळा करणार्या माश्या...पोळ्याचे रक्षण करणार्या माश्या..."
"पण त्या एकमेकांशी संपर्क कसा साधतात?" अजयने विचारले.
" प्रत्येकजण आपल काम चोख व न चुकता करतो.
पहिल्यांदा टेहळणी करणार्या माश्या मकरंद कुठे आहे त्याचा शोध घेतात.इतर कामकरी माशा व राणीमाशीला ह्या जागेची माहिती देताना या माश्या विशिष्ट नृत्य करून अंतर , मधाचा दर्जा व दिशा यांची माहिती देतात."
" नाच करून? पण हे इतरांना कळत कस?" मधूने विचारले.
" टेहळणी करणार्या माश्या इतरांना माहिती देताना दोन प्रकारचे नृत्य करतात. वर्तुळाकार नृत्य व इंग्रजी 8 या आकड्याप्रमाणे नृत्य.
वर्तुळाकार नृत्यात प्रथम माशी गोलगोल फिरतेदोन प्रदक्षिणा एकाच दिशेने घालते नंतर थबकून तोंड फिरवून पुन्हा उलट्या दिशेने प्रदक्षिणा घालते व मग जलद गतीने उलट सुलट प्रदक्षिणा घालते.या दिशा बलदताना सूर्याशी होणारा कोन मोठा असेल तर अन्न वस्तीपासून दूर आहे व कोन कमी असेल तर अन्न जवळ आहे असा त्याचा अर्थ होतो."
" व्वा , म्हणजे मधमाश्यांना भूमीती कळते तर." अजय आश्चर्याने म्हणाला.
" तूला मात्र ती कठीण जाते." मधू त्याला चिडवत म्हणाली.
" कोन शून्य असेल तर?" अजयने विचारले.
" याचा अर्थ अन्न जवळ आहे व सूर्याच्या सरळ रेषेत आहे. अंतर खूप असेल तर वर्तुळार नृत्य हे दोन वर्तुळात म्हणजे आठ प्रमाणे होते.मधल्या मार्गावरून सरळ रेषेत जाताना माशी शरीराला हिसके देते व त्या कंपनांवरूनही इतरांना वस्ती व अन्न यातील अंतर कळते. कंपने जास्त व जलद असतील तर अन्न जवळ आहे असा अर्थ होतो. प्रदक्षिणा जेवड्या जास्त तेवड मकरंद उत्तम प्रतीचा." पप्पा म्हणाले.
" अरे बापरे, किती आश्चर्यकारक!" अजय ओरडला.
" ते काहीच नाही...अन्न सूर्याच्या डाव्या बाजूला असेल तर माशी नृत्य करताना डाव्या बाजूला तेवडाच कोन करते व उजव्या बाजूला असेल तर त्या प्रमाणे कोन करतात. नृत्य करणार्या माश्या टेहळणी करून येताना मकरंदाचे काही कण घेवून येतात व ते कामकरी माश्यांना देतात.त्यामुळे या मकरंदाच्या गंधामुळे अन्न सहज व जलद शोधले जाते. पाण्याच्या साठा सापडला की विशिष्ट संदेशप्रेरके फवारून इतराना कळवल जात."
" किती छान व शिस्तीत काम चालत." मधू टाळ्या पिटत म्हणाली.
" गंमत तर पुढे आहे ऐका... पोळ्याच्या आत तापमान 33अंश सेल्सियसच्या आसपास लागत.जर बाहेरच्या तापमानामुळे आतले तापमान वाढले तर मधमाश्यां पोळ्यावर पाणी शिंपडतात व पंखानी वारा घालतात व तापमान कमी करतात. याउलट थंडीत पोळ्यावर आवरण तयार करतात .पण थंडी अचानक खूपच वाढली तर नासानाॅव्ह संप्रेरक फवारून सर्वाना एकत्र येण्याचा संदेश दिला जातो व एकत्र राहून थंडीच निवारण केल जात."
" पप्पां राणी माशी काय करते?" मधूने विचारले.
" राणी माशी वसाहतीची प्रमुख असते.सगळ्यांवर ती नियंत्रण ठेवते.वसाहतीत अंडी घालणारी ती एकमेव माशी असते. वसाहतीतील सर्वांची सुरक्षा करण्याचे ती काम करते. यासाठी तिच्या शरीरात एक खास संप्रेरक असत.या गंध संप्रेरकामुळे कामकरी माश्यांना राणी माशीचे आस्तिव जाणवत व त्यांना आपण सुरक्षित असल्याचे जाणवत."
" पप्पा मधमाश्यांच जीवन किती कष्टप्रद असते नाही. " अजय म्हणाला.
"होय... म्हणूनच मध मिळवताना. पोळी जाळणे...धूर करणे टाळावे...तसेच किटक व तणनाशके वापरणे टाळले पाहीजे. त्यामुळे मधमाश्या मरतात किंवा त्याना विषबाधा पण होते."
" त्यापेक्षा मधपेट्यांमधून मधुमक्षिकापालन करून मध मिळवणे चांगले." अजय म्हणाला.
तेवड्यात दोन मोर उडत उडत समोरच्या उंचवट्यावर उतरले.त्यांच्या पंखाचा व भल्यामोठ्या पिसर्याचा उडताना झप-झप असा आवाज होत होता.
" ते बघा मोर किती सुंदर पिसारा आहे.दुर्बीणतून किती छान दिसतात.दादा बघ ..बघ." मधु म्हणाली.
" पशू -पक्षी- किटक व मानव ही सारी निसर्गाची लेकरे. निसर्ग सुंदर आहे.एकमेकांच्या उपयोगी पडत जगण हेच खर जीवन." पप्पांनी सांगितले.
------*------*------*--------*-------*---------*_
कथा दुसरी
साद
मी रोज सायंकाळी चालायला जातो.व्यायामासाठी नाही तर जाता येता वाटेत दिसणारी माणसं, मोकळे व रंग बदलते आकाश, उंचावर घिरट्या घालणारे पक्षी बघणे मला आवडत म्हणून!मी अगदी रमत -गमत चालतो.वाटेत भेटणारी माणसं बघत व त्यांचे चेहरे वाचत जातो.पण गेले काही महिने मला एक दृश्य अस्वस्थ करत होत.माझ्या फिरण्याच्या वाटेवर एक चाळ आहे.यात एकूण तीन खोल्या होत्या. मधल्या खोलीत गेले काही महिने एक नव कुटुंब राहायला आल होत.रोज सायंकाळी अगदी बाहेरच्या छोट्या रूममध्ये एक एकोणीस-विस वर्षाचा तरूण ह्विलचेअरवर बसलेला दिसायचा. पांढरा सदरा ---कमरेला पांढरी लुंगी व पायावर पांघरलेली शाल अश्या वेषात तो दिसायचा.किरकोळ शरीरयष्टी,लांबसडक बोट ,गंभीर चेहरा व विलक्षण बोलके डोळे असलेला हा तरूण---सतत काही ना काही वाचताना दिसायचा.पहिल्या दिवशी मी त्याला बघितल तेव्हा मी अस्वस्थ झालो.मनात त्याच्याबद्दल कणव निर्माण झाली.धावण्या पळण्याच्या वयात त्याच्या नशिबी ह्विलचेअर आली होती.कदाचित पोलीयो किंवा एखाद्या अपघातात त्याचे पाय निकामी झाले असावेत. त्या दिवसापासून मी रोज सायंकाळी त्याला असाच बसलेला बघायचो. त्याच्याकडे लक्ष गेले की ह्रदयात एक कळ उठायची. तिथ गेलो की मी कितिही विचारात असलो तरी माझ लक्ष त्याच्याकडे जायचंच.त्याच्याबद्दल माझ्या मनात एक भावनिक बंध निर्माण झाला होता. तो स्वतःमध्ये एवढा गुंग झालेला असायचा की त्याच जराही बाहेर लक्ष नसायच.एक तर त्याला बाहेरच्या चालत्या फिरत्या जगाविषयी चिड असावी किंवा त्याला त्याची फिकीर नसावी. कधितरी त्यानं माझ्याकडं पाहव ---ओळखीच स्मित हास्य कराव या अपेक्षेने मी रोज त्याच्याकडे पहायचो.पण त्याने कधिही माझ्याकडे मान वर करून बघितल नाही.जणू ह्विलचेअर हेच त्याच विश्व होत.त्याच्या खोलीसमोरून जातानाची ती दोन मिनिटे माझ्या साठी विषेश होती.असच एकदा घरी आल्यावर मी त्याचे स्केच रेखाटले. पुस्तक वाचण्यात दंग असलेल्या त्याच ते चित्र आजही माझ्यापाशी आहे. पण त्या दिवशी थोड वेगळ घडल.त्या दिवशी त्याच्या हातात नेहमीप्रमाणे पुस्तक नव्हते तर हातात छोटी टेप होती. त्यावर गाण चालू होत
कही दूर जब दिन ढल जाये
सांझसी दुल्हन बदन चुराये
चुपकेसे आये-
हे गाणं ऐकताना त्याची भावसमाधी लागली होती. त्याचे निळसर बोलके डोळे ओलावले होते.त्या दिवशी पहिल्यांदा च त्याने माझ्याकडे बघितले व ते भावुक डोळे रूंदावत तो हलकेच हसला मी सुध्दा हसलो.कुणाच कुणाशी कधी भावनिक नात जुळेल सांगता येत नाही. त्या एका क्षणानं मी त्याच्या अधिक जवळ गेलो.

पण त्याच्या दूसर्या दिवशीच मी मित्रांसोबत आठवड्याभरासाठी सहलीला गेलो .प्रवासात असताना सुध्दा सायंकाळ झाल्यावर त्याच चित्र माझ्या डोळ्यांसमोर यायच.ते बोलके डोळे खुणावत असल्यासारखे वाटायच.आल्यावर फिरायला जाताना मला त्या दिवशी ती खोली बंद दिसली. त्याच त्या दिवशी नसणं मला हूरहूर लावून गेल. त्यानंतर सलग आठवडाभर तो मला दिसला नाही. खोलीला कुलूप होत.माझ्या मनात अशुभाची पाल चुकचुकली .न राहवून मी बाजूच्यांकडे चौकशी केली-
"अहो,हा बाजूचा तरूण कुठे गेला?"
तो काही क्षण गप्प राहिला व म्हणाला-
"खूप वाईट झाल, आठवड्यापूर्वी त्याच्या भावाचे डोळे केमिकल फॅक्टरीतील एका अपघातात गेले. त्याला अंधत्व आल.या मुलाने भावाच कुटुंब उघड्यावर पडेल म्हणून स्वतःच बलिदान दिल.आत्महत्या करण्यापूर्वी आपली अंतिम ईच्छा म्हणून आपले डोळे भावाला द्यावेत अस त्याने लिहून ठेवलं.त्याप्रमाणे त्याचे डोळे भावाला बसविले."
हे ऐकून माझ्या डोळ्यांच्या कडा ओल्यावल्या. या पुढे तो दिसणार नव्हता. मला गलबलून आल. ढसाढसा रडावंस वाटल.ते विलक्षण बोलके डोळे माझ्या समोर फेर धरून नाचू लागले.त्याच गहिर्या डोळ्यांनी तो भावाच्या नजरेतून बाहेरच जग पाहणार होता. मी त्याच्या भावाला कधी पाहिलं नव्हते पण यापुढे तो माझ्यासमोर आला तर त्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी ओळखीच स्मित तरळेल काय? मला ते भावुक डोळे ओळखता येतील का?असे प्रश्न मला पडले.--- कुणी सांगावं ते डोळे मला ओळखीची साद देतीलही!

बाळकृष्ण सखाराम राणे
8605678026
----------×---------×----------×--- समाप्त-------