भगवद्गीता -
१८- मोक्षसंन्यास योग.
अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ! केशी राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, मला संन्यास व त्याग यांची तत्वे जाणून घ्यायची इच्छा आहे.
श्री भगवान म्हणाले , ज्ञानी लोक कर्म फलाच्या त्यागाला त्याग म्हणतात. फलाच्या आशेने केलेल्या कर्माचा त्याग म्हणजे संन्यास असे म्हणतात. कांहीं ज्ञानी लोक सर्व सकाम कर्माना त्याज्य मानतात.
पण कांहीं विद्वान यज्ञ, दान, तप अशी कर्मे करावीत असे म्हणतात. हे भरतश्रेष्ठा ! आता माझा निर्णय ऐक.
हे नरोत्तमा ! त्याग तीन प्रकारचा सांगितला आहे. यज्ञ, दान, तप ही तीन कर्मे केलीचं पाहिजेत. ज्ञानी लोक ही यज्ञ, तप, दान करून पवित्र होतात. माझे असे निश्चित मत आहे की यज्ञ, तप , दान या कर्मातुन फलाची आशा धरू नये. आसक्ति न धरता ही कर्मे कर्तव्य म्हणून केलीचं पाहिजेत.
स्वधर्माप्रमाणे नेमुन दिलेले जे कर्म आहे ते केलेचं पाहिजे, जर कोणी अज्ञानाने नियत कर्माचा त्याग करत असेल तर तो त्याग तामस समजला जातो. कर्म केल्याने शरीर कष्ट होतील, दु:खकारक होईल यासाठी नियत कर्माचा त्याग केला तर तो राजस त्याग समजला जातो व त्यागाचे फल मिळणार नाही.
जेव्हा कर्म हे कर्तव्य म्हणून केले जाते व आसक्ति आणि फलाशेचा त्याग करून केले जाते त्याला सात्त्विक त्याग मानावे.
शुभ अशुभ कर्माबाबत ज्यांना आसक्ति वा द्वेष नसतो अशा सत्वगुणी ज्ञानी माणसाचे सर्व संशय नि:शेष झालेले असतात.
देहधारी जीवांस ( कोणत्याही मनुष्याला ) कर्माचा त्याग करणे अशक्य आहे. जे कर्मफलाचा त्याग करतात त्यांनाच त्यागी समजले जाते.
जे आपली कर्मे करीत असतात त्यांना तीन प्रकारचे फल मरणानंतर मिळते ते म्हणजे इष्ट , अनिष्ट, व संमिश्र फल. पण जो फलाचा त्याग केलेला असा संन्यासी असतो तो कर्मफलाच्या सुख दु:खापासून मुक्त असतो.
हे महाबाहो ! कर्म सिद्धिसाठी पाच कारणे असतात ती मी तुला आता सांगतो. कर्म कर्ता, कर्माचे ठिकाण, इंद्रिये, विविध प्रयत्न व परमात्मा ही ती पाच कारणे होत.
मनुष्य योग्य अथवा अयोग्य असे जे कर्म वाचिक, कायिक, मानसिक रितीने करतो ते या पांच कारणांमुळे पुर्णत्वाकडे जाते. अज्ञानी व संस्कारहिन मनुष्याला वाटत असते की तोच कर्ता आहे कारण खरी परिस्थिती त्याला कळत नाही.
ज्याला अहंकार नाही, 'मी' पणाची भावना नाही व बुद्धि स्थिर असते त्याने जरी कुणाला मारले तरी तो त्या बंधनात अडकत नाही.
कर्माला प्रवृत्त करणारे घटक म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा विषय, (जाणण्याचा विषय ) व जाणणारा, आणि कर्माचे घटक म्हणजे साधने, कर्म व कर्ता. य तीन घटकांचा संयोग म्हणजेच कर्म. कर्म करण्यासाठी आधी प्रेरणा होते.
या तीन घटकांनी कर्म होते. सत्व, रज, तम या गुणभेदांने कर्ता, कर्म, ज्ञान यांचे पण तीन प्रकार आहेत ते मी तुला सांगतो.
जरी सर्व जीव वेगवेगळे असले व सर्व पदार्थ भिन्न भिन्न असले तरी एकचं आत्मतत्त्व आहे असे ज्या ज्ञानाने कळते ते सात्त्विक ज्ञान समजावे. ज्या ज्ञानामुळे भिन्न शरीरामध्ये भिन्न जीव दिसतात आणि शरीर म्हणजेच जीव असे समजले जाते ते राजस ज्ञान होय.
देह हेच काय ते सर्वस्व म्हणून देहांसाठिच्या एकाच कार्यात गुंतुन राहिलेले असते व एक प्रकारे अज्ञान असलेले (सत्यापासुन दुर असलेले व आत्मज्ञान नसलेले ) अल्प असे ज्ञान तामस होय.
आसक्ति नसलेले, फलाची अपेक्षा न करता कोणतीही द्वेषभावना न ठेवता शास्त्रात सांगितलेल्या कर्तव्यांनुसार जे कर्म केले जाते ते सात्त्विक समजावे. भरपुर क्लेश घेऊन, फलाची अपेक्षा धरून अहंकार भावनेने जे कर्म केले जाते ते तामस समजावे. स्वत:ची पात्रता (सामर्थ्य) न जाणता व होणाऱ्या परिणामांचा किंवा दुसऱ्यांना होणाऱ्या त्रासाचा विचार न करता मोहाने केले जाणारे ते तामस कर्म समजावे.
अहंकाराची बाधा नसलेला, आसक्ति नसलेला व उत्साहाने व धैर्याने, यश अपयश याबाबत निर्विकार राहून कर्म करतो तो सात्त्विक समजावा.
जो आसक्ति युक्त आहे, ज्याला सांसारिक सुखांचा लोभ आहे, कर्म फलाची इच्छा धरणारा, अपवित्र व ज्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो व आनंद व दु:ख या भावनांमध्ये गुंतुन राहणारा असा जो कर्ता असतो तो राजस समजावा. शास्त्राप्रमाणे नियत कर्मे न करता अयोग्य कर्मे करणारा, चेंगट, अज्ञानी, हट्टी, कपटी, दुसऱ्यांना त्रास देणारा, आळशी, सदैव दु:खी राहणारा असा जो कर्ता असतो तो तामस समजावा.