गूढ रम्य Balkrishna Rane द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गूढ रम्य

गूढ-रम्य 1
तळहातावरच्या पितळीच्या बाळकृष्णाच्या मूर्तीकडे मी भान हरपून एकटक बघत होतो. माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. माझी मतीच गुंग झाली होती. त्या मूर्तीच्या स्पर्शाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. तो लडिवाळ बाळकृष्ण माझ्याकडे बघून खट्याळपणे हासत असल्याचा भास होत होता. सुमारे पन्नास वर्षापूर्वी माझे बाबा ज्या मूर्तीला घरी ठेवून घर सोडून गेले होते. तीच- होय! तीच मूर्ती माझ्या तळहातावर होती. मी किरणपाणी खाडीच्या पाण्यात उभा होतो. सायंकाळच्या सोनेरी किरणांनी खाडीच पाणी चमचमत होतं. खाडीच्या मधोमध असलेल हिरवेगार बेट....त्या पलिकडचा गोव्याचा परिसर... छोटे...छोटे हिरवे डोंगर या साऱ्यांना सोनेरी सूर्यकिरणे न्हाऊ घालत होती. सारा आसमंत प्रसन्नपणे हसत होता. पण मी गेल्या पंचवीस दिवसांत घडलेल्या आश्चर्यकारक घटनांचा विचार करत होतो. आयुष्य कधी कुणाला कुठच्या वळणावर उभ करेल ते कुणीच सांगू शकणार नाही. हो... नाहीतर आयुष्याची सव्वीस वर्षे धारवाड (कर्नाटक)मध्ये घालवलेला मी ज्या गावाचे नावही कधी ऐकल नव्हत अशा आरोंदा-किरणपाणी इथे मी खाडीच्या पाण्यात उभा होतो.
ज्या मूर्तीबद्दल मला दहा दिवसांपूर्वी काहीही माहित नव्हते व ती मूर्ती आज अस्तित्वात असेल किंवा मला ती मिळेल

अस स्वप्नातही वाटल नव्हत तीच रांगणाऱ्या बाळकृष्णची मनमोहक मूर्ती माझ्या तळहातावर होती. बरोबर पंचवीस दिवसांपूर्वी माझ्या बाबांचा म्हणजेच सूर्यकांत सदाशिव नाईक यांचा ह्दयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. बाबांच अचानक जाण माझ्यासाठी धक्कादायक होतं. घरातला कर्ता पुरुष म्हणून माझ्यासमोर असंख्य आव्हान उभी टाकली होती. परंपरागत विधी आटोपल्यानंतर चौदाव्या दिवशी आईने मला बाबांची व्यवसायाची कागदपत्रे नजरेखालून घालायला सांगितली. बाबांचा बिल्डींग मटेरिअल सप्लायर्स चा व्यवसाय होता. प्रामाणिकपणा... शब्दाला जागण व वक्तशीरपणा यामुळे त्यांच नाव परिसरात नावाजलेलं होतं. आजपर्यंत मी बाबांच्या व्यवसायात लक्ष घातलं नव्हतं व त्यात रसही नव्हता. मी बीए- स्सी अॅग्रीकल्चर झाल्यानंतर शेतीवरच्या विविध संशोधनात मग्न होतो. माझ्या पेक्षा दोन वर्षांनी लहान बहीण रचना बाबांबरोबर त्यांच्या ऑफि समध्ये जायची. फायली चाळता चाळता एका जुन्या फायलीत व्यवस्थित दुमडून ठेवलेला एक कागद सापडला. कागद उघडताच तारिख दिसली. १२/१२/१९७९ ची (३६ वर्षापूर्वीची) कुतूहलाने मी वाचण्यास सुरुवात केली. बाबांनी लिहिलेल होतं....

'तो दिवस मी कधीच विसरणार नाही. याच तारखेला पंधरा


वर्षापूर्वी मी घर सोडून बाहेर पडलो होतो. चोरीचा कलंक घेवून ! जे मी कधीच केल नव्हतं तोच डाग घेवून वडिलांच्या अकाली निधनानंतर खचलेल्या आईनेही अवघ्या दिड वर्षातच जगाचा निरोप घेतला. अखेरच्या क्षणी माझ्या हाती पितळीचा बाळकृष्ण ठेवून म्हणाली- जप याला तुझ्यासारखाच आहे... बरं का! आई गेली... दहा वर्षाचा मी, पोरका झालो. माझं बालपण तिथंच संपल. माझा सांभाळ काका करु लागले. आमच घर एकच होतं. काका माझ्याशी बर वागायचे पण काकी मात्र घालून पाडून बोलायची... वेळी... अवेळी काम सांगायची. काकी अशी का वागत होती ते त्यावेळी माझ्या लक्षात आल नाही. पण आज कळतय.... घरदार शेतीवाडीत तीला भागदार नको होता. विरंगुळ्याचे क्षण एवढेच होते की मी, चंद्रकांत
(माझ्यापेक्षा एक वर्षानी मोठा चुलत भाऊ) व कुंदा (लहान चुलत बहिण) यांच्या सोबत खेळण... किरणपाणी खाडीत पोहण. वेळ मिळाला की मी खोरणातल्या (भिंतीत कोरलेली पोकळ जागा) बाळकृष्णाच्या मूर्तीबरोबर खेळायचो. त्याच्याशी खेळताना मला सतत आईची आठवण यायची. माझ शाळेत जाणंही अनियमित झालं. पण एके दिवशी कहरच झाला. शेजारी कसलातरी कार्यक्रम असल्याने काकीने आपले दागिने... साड्या... बाहेर काढून ठेवल्या. कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होता. दुपारी तयारी करताना काकी मोठ्याने ओरडू लागली व रडू लागली. घरातले सारे गोळा झाले. मी विहीरीवर पाणी भरत होतो. काकांनी मला हाक मारली. मी धावतच आत गेलो. काका मला बघताच ओरडले...
सदा ... हिचा हार कुठे आहे?
हार! कसला हार... मला माहित नाहि.
पण तेवढ्यातच काकी हातात हाराचा रिकामा बॉक्स नाचवित म्हणाली मग हे काय आहे? तुझ्या अंथरुणाच्या वळकटीत सापडला.त्यावेळी काकीने मला काठीने सपासप मारल... जेवणही दिल नाही.
त्या रात्री मी व्हर्यांडात तळमळत पडलो होतो. मारापेक्षा चोरीचा आरोप मला संतापाने बेभान करत होता. मनाशी निश्चय करुन मी उठलो... घरातून बाहेर पडलो. डोक्यात अंगार होता.. ह्रदयात लाख इंगळ्या डसल्यागत होत होते. घनघोर अंधकारात... आकाशीच्या तारकांच्या सोबतीने मी चालत होतो. रातकिड्यांचे ओरडणे... शेतातली कोल्हेकुई कशाचीही मला त्या वेळी भीती वाटली नाही. त्या रात्री मी कितीवेळ चाललो होतो कुणास ठाऊक.. पाऊले दुखायला लागली... डोळ्यावर झोप तरंगायला लागली... मला वाटल मी वाटेतच कोसळणार पण तेवढ्यातच एक ट्रक माझ्या बाजूला थांबला. ड्रायव्हरने माझी विचारपूस केली.माझी कथा ऐकून त्याला वाईट वाटले. त्याने मला ट्रकमध्ये घेतले... थेट बेळगावला नेल. एका ओळखीच्या हॉटेलात वेटरच काम दिलं. इथेच भेट धारवाडच्या चंद्रशेखर गौडांशी

झाली. त्यांनी माझ्यात काय पाहिल कुणास ठावूक? पण मी एका प्रसिद्ध बिल्डरचा उजवा हात बनलो. पुढे माझी भेट त्यांचीच मुलगी चैतालीशी झाली. व आजच त्यांनी मला चैतालशी लग्नासंदर्भात विचारलं. घर सोडून बाहेर पडल्यानंतरचा माझा हा प्रवास. आता सार माग पडलय... मनात शल्य आहे ते चोरीच्या कलंकाचे व मागे राहिलेली ती आईने दिलेली कृष्णाची मूर्ती... जी जागेपणी व स्वप्नीही मला सारखी खुणावत असते.'

---------*----------*------------*----------*------

बाबांनी लिहिलेली ती घटना वाचल्यावर मी सुन्न झालो. बाबांनी मला किंवा आईलाही आपल्या गत आयुष्याबद्दल काहीही सांगितल नव्हत. पण आज हे वाचल्यावर माझ्या डोक्यात संतापाची लाट उसळली. बाबांच्या न पाहिलेल्या काकीबद्दल मनात घृणा निर्माण झाली. आज ते काका-काकी हयात सुमारे असण्याची शक्यता कमी होती. पण त्यांची चुलतभावंड (चंद्रकांत आणि कुंदा) आज हयात असतील तर ती कुठ असतील? कदाचि त्यांना बाबा आठवत असतील का? बाबांबद्दल अजुनही त्यांच्या मनात गैरसमज असतील का? बाबांच मूळ गाव कोणतं? ते नेमकं कुठ आहे? असे असंख्य प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले. किरणपाणी या नावावरुन मी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण माझ्या हाती फारस काही लागल नाही. मी बेचैन झालो. सारे विसरण्यासाठी कामात मग्न झालो. पण स्वप्नात मला ती न पाहिलेली मूर्ती दिसायला लागली. मनाचे खेळ समजून मी त्याकडे दुर्लक्ष केले. मी शेती व आधुनिक तंत्रज्ञान या संशोधनावर माझ लक्ष केंद्रित केल. यापूर्वी मी कमी पाण्यावर वाढणाऱ्या व बदलणाऱ्या तापमानाला यशस्वीरित्या तोंड देण्याऱ्या भाताच्या दोन नव्या जाती विकसित केल्या होत्या. या संशोधनामुळे माझ भारतातच नव्हे परदेशातही नाव झाल होतं.

पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. बाबांच पत्र वाचल्यानंतर अवघ्या आठव्या दिवशी मला भारतसरकारच्या कृषी खात्याकडून एक ई-मेल आला की महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी इथे शेतीविषयक सेमीनार मध्ये जायचे आहे. तिथे मला माझ्या नव्या संशोधनाविषयी माहिती द्यायची होती. सेमीनारची तारीख तीन दिवसानंतरची होती. दुसऱ्या दिवशी मी ट्रेनने बेळगावला गेलो. रेल्वे स्टेशनवरुन बाहेर येत असतानाच भगव्या वस्त्रातील एक संन्यासी मला धडकला. क्षणभर तो माझ्याकडे बघत राहिला व म्हणाला ...अपने घर जा रहे हो? कान्हा से मिलने ? ...जाओ...जाओ! व तो हसत हसत निघून गेला. क्षणभर मला काहीच कळलं नाही. त्या क्षणी तरी माझ्या डोक्यात बाबांच घर किंवा पितळीचा कृष्ण वैगेर गोष्टीही नव्हत्या. बेळगाववरुन मला सावंतवाडीला नेण्यासाठी कर्नाटक कृषीविभागाची गाडी होती. संध्याकाळी आम्ही सावंतवाडीला पोहोचलो. सावंतवाडीच्या तारा लॉजमध्ये राहण्याची व्यवस्था होती. फ्रेश झाल्यावर मी बेडवर विश्रांतीसाठी पहुडलो.
------*--------*-------*---------*--------
भाग२
माझ्या डोळ्यासमोरून प्रवासात
पाहिलेला आंबोलीचा नयनरम्य परिसर तरळत होता. तेवढ्यात रुमबॉय कॉफी घेवून आला. मी उठून बसलो. कॉफिचे घुटके घेत मी समोरचे वर्तमानपत्र उचलले. बेळगांव वरुन प्रसिद्ध होणारे मराठी तरुण भारत वर्तमानपत्र होते ते. मला मराठी खुप चांगल येत नसल तरी थोडफार वाचता व बोलता येत होत. वर्तमानपत्रा- वरुन नजर फिरवताना एका बातमीन माझ लक्ष वेधुन घेतलं. आरोंदा किरणपाणीच्या जेटीसंदर्भात काहीतरी बातमी होती. तो किरणपाणी शब्द वाचताच क्षणार्धात माझ्या अंगातून वीज सळसळत गेली. बाबांच्या पत्रांतील किरणपाणी व हे किरणपाणी एकच असेल का? हाच विचार माझ्या डोक्यात आला. मी त्या रुमबॉयला किरणपाण्याबद्दल विचारलं. तो म्हणाला हे खाडीचं नाव आहे व ती गोवा महाराष्ट्र सीमेवर आहे व सावंतवाडीपासून सुमारे पंचवीस किलोमीरवर आहे. त्याच क्षणी मी ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत किरणपाणी परिसराला भेट द्यायचीच. कदाचित इथंच बाबांच बालपण गेलं असावं. अजूनही तिथं
चंद्रकांत नाईक व त्यांचे कुटुंबिय असतील का?... माझ ते सावंतवाडीला सेमीनार असणं... स्टेशनवर भेटलेला साधू ... तरुण भारतमधील बातमी ही नियतीची खेळी होती का? एका पाठोपाठ घडलेल्या या घटना मला हेतूपूर्वक किरणपाणीच्या दिशेने नेत होत्या.
दुसऱ्या दिवशी मी सिंधुदुर्गातील कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. इथला पाऊस, तापमान... शेतीची पद्धत या विषयी वर माहिती घेतली. सेमीनारची जागा बॅ. नाथ पै व्यासपीठाला भेट व दिली. तिथे तयारी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या दरम्यान आरोंदा परिसराबद्दल बरीच माहिती गोळा केली. आरोंदा किरणपाणी इथे बरेच नाईक कुटुंबिय राहतात हे मला
कळलं. सायंकाळी सावंतवाडी परिसरात फेरफटका मारला. मला हे शहर खूप आवडल. याच पूर्वीच नाव सुंदरवाडी होत हे कळलं व ते सार्थ होत. मोती तलाव...नरेंद्र डोंगर... तळ्याकाठचे आर. पी. डी. हायस्कुल... तिथले उडणारे बगळे... तळ्यातला कारंजा... इथली शांत व खुल्या दिलाने बोलणारी माणस... मला हे सारं आवडलं. दुसऱ्या दिवशी सेमीनार सायंकाळी सहावाजेपर्यंत चालल. इथल्या शेतकऱ्यांना मी माझ्या संशोधनाबद्दल व शेतीच्या नव्या पद्धतीविषयी माहिती दिली. यात स्लाईड शो... व्याख्यान...नवी साधने व त्यांची प्रात्यक्षिके यांचा समावेश केला. सेमीनार यशस्वी झाल. आधी मी ठरवलेल की सेमीनार संपल्यावर त्वरीत बेळगाव गाठायच . पण मी माझा कार्यक्रम बदलला. माझ्यासाठी असलेली गाडी मी... पाठवून दिली. आरोंदा किरणपाणी इथे जावून मला भूतकाळात डोकवायचं होतं... घडलेल्या घटनांचा मागोवा घ्यायचा होता तिथे जाऊन मला काही सापडेल की नाही मला माहीत नव्हत.
दुसऱ्या दिवशी सावंतवाडीवरुन किरणपाणी एस. टी. बस


पकडली. गाडी असंख्य वळण घेत... रेंगणाऱ्या सापासारखी गाडी वाट कापत होती... उंच झाडे...रस्त्याच्या दुतर्फा. पसरलेली झाडी व छान टुमदार घरे... मध्ये मध्ये पानथळ जागेत... केलेली भातशेती... हा परिसर विविध रंगांनी नटलेला होता. मनी आंतरिक ओढ होती किरणपाण्याला पोहचण्याची. माझ्या आयुष्यात अचानक हा झंझावात निर्माण झाला होता. त्यातून काय साध्य होणार होते कुणास ठावूक. गाडी अखेर किरणपाणी खाडीजवळ पोहचली. गाडीतून उतरता उतरता शरीराला व मनालाही पहिला स्पर्श झाला तो भन्नाट खाऱ्या वाऱ्याचा. समोर स्वच्छ निळसर पाणी सकाळच्या पिवळसर उन्हात चमचमत होत... पाण्यावर छान लाटा उसळत होत्या. दूर गोव्याच्या दिशेला... दोन होड्या संथपणे पाण्यातून चालल्या होत्या. माझ्या डावीकडून दोघेजण मासे पकडण्यासाठी पाण्यात जाळी फेकत होते तर उजव्या बाजूला गोवा महाराष्ट्राला जोडणारा भला मोठा किरणपाणी पूल हे दृश्य मी एकटक बघत राहिलो.
कुठ जायचयं? कुणी तरी मला विचारल. कुणी म्हातारा पडलेली झावळ गोळा करुन नेत होता. मला एकाच जागी खुळ्यासारखं उभा असलेला बघून त्यान मला हटकल असाव. चंद्रकांत नाईक.... कुठं राहतात ते ?
तो क्षणभर विचारात पडला.
' त्यांच्या बहिणचं नाव कुंदा आहे" मी आशेने आणखी माहिती दिली.
"चंदू नाईक... !हा... थोड पुढे जा... उजव्या बाजूला माडातून पायवाट जाते. तिथेच स्लॅबच घर दिसेल.... तेच चंदूच घर."
मी त्याचे आभार मानून पुढे गेलो. माझ्या छाती धडधडत होतं. अनामिक हुरहुर मनात दाटली होती. मला पाहिजे असलेले चंद्रकांत नाईक ते हेच का?... मी माझी ओळख सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असेल? ते मला आपला समजतील की प्रॉपर्टीला नवा भागीदार निर्माण झाल्याचे समजून झिडकारतील... असा विचार करत मी मांडाच्या बनातून त्या घराच्या अंगणात पोहोचलो. अंगणात पाच सहा वर्षाचा मुलगा खेळत होता. मला बघून तो उभा राहिला व कुतूहलाने मला न्याहळू लागला.
"चंद्रकांत नाईक आहेत का घरात ?" मी विचारले.
पण तो मुलगा माझ्याकडे तसाच बघत राहिला.
"शरद... कोण आलय बाहेर? " कुणा प्रौढ व्यक्तिचा आवाज
आला.
मी थोडा पुढे सरकलो. झोपाळ्यावर साठ एक वर्षाची व्यक्ति बसली होती. हाफ पॅन्ट, बनियन व खांद्यावर टॉवेल असा पेहराव होता. मला बघताच तो म्हणाला.
या बसा... त्याने समोरच्या खूर्चीकडे बोट दाखविले. सीमा...पाणी घेवून ये. क्षणभरात हातात पाण्याचा तांब्या घेवून एक तरुणी स्त्री आली. कदाचित ती बाहेरच्या मुलाची आई

असावी. पाण्याचे एक दोन घोट होताच माझा घसा मोकळा
झाला.
"बोला ..कुठून आलात...इकडचे दिसत नाही म्हणून विचारल. "
"तुम्ही... तुम्ही सुर्यकांत नाईक...ना ओळखता?" मी विचारले.
बाबांच नाव ऐकल्याक्षणी तो इसम अंगात वीज चमकल्या सारखा उभा राहिला. डोळे विस्कारुन माझ्याकडे बघत राहिला. कुठे आहे तो? तू.... कोण ?
मी त्यांचा मुलगा!
तो का नाही आला! गेली पन्नास वर्षे मनावर ओझ घेवून जगतोय... सतत वाटायच तो यावा म्हणून... कुठ आहे तो?
"बाबा!... बाबा आता नाहित... काही दिवसांपूर्वी त्यांच निधन झाल. मी इथपर्यंत योगा-योगानेच पोहचलोय... आणि काका... मला काही पाहिजे म्हणून आलो नाहीय...तर बाबांबद्दलचा गैरसमज..."
त्यांनी मला मध्येच थांबवल मला काखेत घेवून ते ढसाढसा रडू लागले. खर म्हणजे मला हे अपेक्षित नव्हतं.
खरच तो आला पाहिजे होता...बोलायच होत "त्याच्याशी...माफी मागायची होती त्याची पण... आता ते शक्य नाही."
"काका... !बाबांनी हार चोरला नव्हता." मी म्हणालो.
"होय... माहित आहे सार. पण त्या दिवशी मी व कुंदा ने पण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्याचच त्याला जास्त वाईट
वाटल असणार."

"पण काका तुम्हाला कस कळलं बाबांनी हार घेतला नव्हता ते ?"
"कांता घरातून गेल्यावर सगळीकडे शोधाशोध झाली... पाहुण्यांची घर...गावातल्या विहीरी खाडीचा परिसर...सार सार धुंडाळल...पोलीसांतही तक्रार दिली...त्याकाळी फोटो वगैरे नसल्याने... काहीच माग लागला नाही."
"मग?...."मी उत्सुकतेने विचारले.
"त्यानंतर माझे वडिल कातांची सतत वाट बघायचे. म्हणायचे तो कधी ना कधी येणार...मला म्हणायचे चंदू त्याच्या वाट्याच जे जे आहे ते त्याला द्यायचं. "
त्यानंतर दोनच महिन्यांनी त्यांनी आईकडे तो हार बघितला....त्यांनी तिला काहीही विचारले नाही... पण ते आईशी त्यानंतर खूप कमी बोलायचे...गावातही जायचे नाहीत ते फारसे...कधी रात्री मध्येच उठायचे...म्हणायचे उठा कांता आला... दार उघडा."
काकांनी सांगितलेली गोष्ट ऐकून मी स्तब्ध झालो. बाबा निर्दोष आहेत हे सर्वाना कळलेल होत हे ऐकून मी सुखावलो. काका पुढे म्हणाले... देवाचा न्याय अजब असतो. त्यातून कुणीही सुटत नाही... बरं का! माझ्या आईनेही तिने केलेल्या पापाची शिक्षा भोगली... शेवटची दोन वर्षे ती खूपच सैरभेर झाली... कुठेतरी एकटक बघायची...बडबडायची...कधीतरी हार समोर ठेवून रडत बसायची... स्वत:तच हरवून बसली होती... कदाचित तिच मन तिला टोचत असाव....काका डोळे मिटून क्षणभर गप्प


राहिले.
त्या क्षणी मला वाटल हे असच घडायच होत. पन्नास वर्षापूर्वी घडलेल्या त्या घटनेचे प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम झाले होते. दैवाने सर्वानाच... नाचविले होते. त्यावेळी नसणारा मी ही त्या घटनेच्या परिणामाचा भागीदार होतो. आज पन्नाय वर्षानंतर -. हे वर्तुळ पूर्ण झाले होते. एका गूढ पद्धतीने... आम्ही समोरा समोर
आलो होतो.
काका... बाबांकडची पितळी बाळकृष्णाची मूर्ती अजून आहे
का?
काका क्षणभर विचारात पडले... व म्हणाले...नाही... कदाचित पंधरा वर्षापूर्वी मातीच घर पाडून हे नव घर बांधल... त्या मातीतून ती मूर्तीही गेली असेल? हे ऐकून मी निराश झालो. बाबांची इच्छा मी पूर्ण करु शकत नव्हतो म्हणून वाईट वाटले. पण मनाला शांतता वाटत होती. मळभ दूर झाल होत. मी काकांकडे जाण्याची परवानगी मागितली. पण घरातले सगळेच म्हणाले. आज राहून जा... ग्रामदेवता भद्रकालीला नारळ देवून जा...व पुन्हा येताना आईलाही घेवून ये...कांताच जे जे काही आहे ते सर्व राखून ठेवलयं.
मला काहीच नको होतं. धारवाडला आमच स्वतःच घर व फार्म हाऊस होत. पण हे गाव इथला परिसर व बाबांचे इथे लहानपणाचे दिवस गेले. म्हणून वर्षातून किमान एकवेळ तरी इथ येण्याच मी ठरवल. दुपारी काकांसोबत मी देवळात गेलो. साऱ्यांनाच माझ येणं आश्चर्यकारक वाटत होतं. सायंकाळी मी शरद (माझा पुतण्या)ला घेवून खाडीवर गेलो. ते स्वच्छ.. सुंदर खळाळत पाणी सतत मला खुणावत... बोलावतय कुणीतरी मला हाका मारतय अस मला वाटू लागलं. मी अंगावरचे कपडे उतरवले व पाण्यात झेप घेतली. दिर्घ श्वास घेत... पाण्यात बुडी मारली कुठच्या तरी चमकणाऱ्या हिरवट पिवळ्या वस्तूने माझे लक्ष वेधून घेतलं. मी ती वस्तू उचलून पाण्याच्या पृष्ठभागावर आलो. आणि एखादी अनमोल गोष्ट सापडल्याचा आनंद मला झाला. ती पितळीची रांगणाऱ्या बाळकृष्णाची... कान्हाची मूर्ती होती. व गूढ रम्य पद्धतीने मला ती मिळाली होती. ती इथे खाडीच्या पाण्यात कशी आली व मलाच का मिळाली हे मात्र मला सांगता येणार नाही.

बाळकृष्ण सखाराम राणे