गव्हाच्या कुरवड्या Dr.Swati More द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

गव्हाच्या कुरवड्या




काल आमच्या साहेबांनी एका प्रदर्शनाला भेट दिली.
तिथं महाराष्ट्रातील विविध प्रांतातील खाण्याचे खास पदार्थ यांची विक्री केंद्रे होती.
त्यांनी जसा घरात पाय ठेवला," मग एकटे एकटे जाऊन आलात. हादडले असेल पोटभर , आमची आठवण तरी आली का?"

"हे बघ तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे."

"तुम्हीच खा. मला नको. मी काहीशा घुश्यातचं पुटपुटले.

"बघ तरी.."

न राहवून माझी नजर तिकडे गेलीच.

कुरवड्या !!

त्यांच्या हातातून चक्क ते पाकीट हिसकावून घेत मी अनिमिष नजरेने तिच्याकडे बघू लागले.

"लगेच तळते."

कुरवड्यांचे पाकीट फोडताना गव्हाच्या कुरवड्यांचा विशिष्ट वास असतो तो नाकात शिरला आणि अस्सल चीज आणली म्हणून मी ह्यांना (मनातल्या मनात बर का 😁) हुश्शार आहेत ही पावती दिली. गव्हाच्या कुरवड्यांचे वैशिष्ट म्हणजे त्यांचा वास, हलका तांबूस रंग ,चव आणि खाताना त्या दाताला चिकटतात. तांदळाच्या किंवा रव्याच्या कुरवड्या लगेच ओळखून येतात.

पाकीट फोडल्यावर आलेला तो वास मला मात्र माझ्या बालपणात घेऊन गेला.

"अग आई, कसला वास येतोय ग?" मी अंघोळीला जाता जाता मोरीच्या ( आमच्या लहानपणी बाथरूम हा शब्द नव्हता मोरी किंवा न्हाणी ) बाहेर थबकले.

"कुरवड्या करायच्या आहेत ना. त्यासाठी गहू भिजत घातले आहेत."

मी जरा जवळ जाऊन बघितले. स्वच्छ घासलेल्या स्टीलच्या बादलीत गहू भिजत ठेवले होते आणि त्याचा आंबट थोडा उग्र वास मला अस्वस्थ करत होता. पहिल्या दिवशी काही त्या वासाची आणि माझी गट्टी जमली नाही.मात्र सतत तीन दिवस दिवसेंदिवस उग्र आणि आंबट होत चाललेल्या त्या वासाची मला सवय झाली आणि नकळत आवडूही लागला .

चौथ्या दिवशी संध्याकाळी मी शाळेतून घरी आले तर आई आणि आज्जी त्या गव्हाला बादलीतून काढून दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेत होत्या. मी तिथेच जाऊन त्यांची ही लगबग बघत बसले.

आईने एका मोठ्या जेरमलच्या ( अल्युमिनियम) पातेल्याला पातळ स्वच्छ फडके गुंडाळले आणि हातात थोडे थोडे गहू घेऊन मुठीत त्याला जमेल तेवढं घट्ट दाबत, कुस्करत त्यातला चीक पिळून काढायला सुरवात केली. तो चीक त्या पातळ फडक्यातून खाली पातेल्यात जमा होत होता. ( हल्ली यासाठी मिक्सर वापरतात )

आज्जी मध्ये मध्ये त्यात वरून थोडे पाणी सोडत होती त्यामुळे तो चीक फडक्यात अडकत नव्हता. तेवढ्या सगळ्या गव्हाचा चीक काढण्यासाठी आईला बराच वेळ लागला.

मी मात्र काही काम नसताना उगाच तिथं लुडबुड करत होते.

"आता लगेच करायच्या का कुरवड्या आपण??"

"नाही ग बाई,आज रात्री हा चिक असाच ठेवायचा आणि उद्या सकाळी करायच्या कुरवड्या."

दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने मी मनात खुश!

रात्रभर नुसती कुरवड्याची स्वप्न.😅😅

सकाळी सकाळी भांड्यांच्या आवाजाने जाग आली. आपल्याला उठायला उशीर झाला की काय. आई आणि आज्जीने कुरवड्या घातल्या असणार या विचाराने अंथरूण तशीच टाकून मी पळत मागच्या दाराला आले.

आई आणि आज्जी तयारीच करत होत्या.

मग काय पारोशा तोंडानं तिथंच बसले.

आईने चिकाचे पातेले मागच्या अंगणात आणले. तोपर्यंत आज्जीने बाहेरून मातीने लेपलेल्या दुसऱ्या जेरमलच्या पातेल्याला चुलीवर चढवले.

माझे लक्ष चिकाच्या पातेल्याकडे गेलं तर त्या चिकाचे रूपच बदलले होते. वरती पाण्यासारखा पातळ चीक ह्याला निवळी म्हणतात आणि खाली घट्ट चीक जमा झाला होता.

आज्जीने सांगितल्यावर आईने हलक्या हाताने ती निवळी बाजूला करून चुलीवरच्या पातेल्यात ओतली आणि त्यात गरजेपुरते मीठ घातले. आज्जी चुलीचा जाळ मध्यम ठेवत निवळी उकळण्याची वाट बघू लागली. निवळी हळू हळू उकळू लागल्यावर आज्जीने आईला खाली राहिलेला घट्ट चीक त्यात हळू हळू ओतायला सांगितला आणि स्वतः लाकडी डाव ( पळी) हातात घेऊन ते मिश्रण सतत ढवळत राहिली . मध्येच एकदा आईने त्यात वरुन थोडे गरम पाणी ओतले.

"आज्जी सारखं सारखं का ढवळते आहेस त्याला."

"अगं असं नाही केलं तर गाठी होतील त्यात आणि पीठ खराब होईल. मग कशा खाशील कुरवड्या.."

तोपर्यंत आईने अंगणात असलेल्या लोखंडी खाटेवर एक लांबलचक प्लॅस्टिकचा कागद पसरून त्याला तेल लावायला सुरवात केली.
मी ही तिला मदत करु लागले. तेवढाच आपला खारीचा वाटा.

"आत जावून भांड्याच्या फळीवर दोन पितळेचे शेवगे आहेत ते आण आणि त्यालाही तेल लाव."
मी धावत जाऊन शेवगे आणले. आईने त्यात आधीच कुरवड्याच्या चकत्या भरून ठेवल्या होत्या.

आईची इकडे सर्व तयारी झाली आणि तिकडे चुलीवरचे पीठही शिजले.

दोघींनी दोन शेवगे पटापट भरले आणि प्लॅस्टिकच्या कागदावर कुरवड्या घालायला सुरवता केली. हे गरम गरम असतानाच याच्या कुरवड्या पाडतात. पीठ थंड झाले की त्या पडत नाहीत. आईने माझ्या बाळबोध ज्ञानात भर घातली.

"आई मला पण एकदा दे . "

"शेवटचा शेवगा देते तुला. तू तोपर्यंत त्यातलं थोड पीठ घे हातात आणि छोटे छोटे सांडगे घाल त्याचे "

मी हौसेने पीठ घेतलं पण हाताला गरम पिठाचा चटका लागला आणि माझी हौस तिथंच संपली.😁

"स्वाती, आता दिवसभर या वाळवणाची राखण तू करायचीस.. " आज्जी मला फर्मान सोडून पुढच्या कामाला गेली.

मग काय , कशीबशी अंघोळ उरकून सकाळच्या चहापासून ते दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा चहाही तिथंच मागच्या दाराच्या उंबऱ्यात बसुन.
संध्याकाळी आईने हलक्या हाताने त्या कुरवड्या उचलून घमेल्यात ठेवल्या.मी ही होतेच मदतीला. मी मात्र हळूच साळसूदपणे एक कुरवडी तशीच तोंडात टाकली. अर्धी सुकलेली अर्धी ओली कुरवाडीही भारी लागते. आज्जीने पाठून येऊन हळूच एक धपाटा दिला.

"दम धीर आहे की नाही."
धपाटा खावूनही अजुन एक कुरवडी हातात घेऊन मी तिथून पळ काढला.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कुरवड्या उलट्या करुन सुकत घातल्या. सुकल्यावर या थोड्या लालसर दिसतात. दोन कडक उन्ह दिली की पुर्ण सुकतात आणि मग ही वर्षभराची बेगमी पत्राच्या डब्यात तळाशी पानाची पत्रावळी ठेवून त्यात भरून घरातील उंच फळीवर विराजमान होते.
आणि दर सणाला कुरवड्या,भातवड्या, सालपापड्या पापड हे सारे तळणीचे पदार्थ पंगतीची शोभा वाढवत.

पोळ्याची शेक ( कटाची आमटी) ती शिळी असेल तर अजून अती उत्तम आणि भात त्यात कुरवडी चुरा करून टाकायची आणि खायची .. कसली भारी लागते काय सांगू😋😋

**********

"अग, स्वाती!! किती हाका मारतोय.. तळतेस ना कुरवड्या.
कुठं हरवली आहेस "

"हो हो.. तळते तळते "