नाटकाचं वेड श्रीराम विनायक काळे द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नाटकाचं वेड

नाटकाचं वेड


त्या वर्षी दसरा झाल्यावर नकुल गावडे मुंबईतली खोली विकून कुटुंब कबिल्यासह खामडोशीत वापस आला. गिरणीतून मिळालेला फंड आणि खोलीचे पैसे; मोठी रक्कम बाळगणारी असामी म्हणून गावातले लोक त्याला मान द्यायचे. त्याचा मुलगा शकुनी मुंबईत वाढलेला..... भटासारखा शुद्ध बोलायचा. तसा तो मॅट्रिकच्या उंबऱ्यापर्यंत जावून आलेला. मॅट्रिकला असताना गिरणगावातल्या नाटकवाल्यांच्या संगतीने नाटकात कामं करायच्या नादात परीक्षेत तीनदा आपटी खाल्लीन. झालंच तर कधी मधी घोट ही मारायचा. पण बापूस ठासबंद पिणारा त्यामुळे शकुनीच्या पिण्याची घरात कोणीच फिकीर केली नव्हती. पण गेले पाच सहा महिने नाटकात कामं करणाऱ्या अर्ध्या वयाच्या नटीच्या नादाला लागल्याची कुणकुण बापसाला लागली. त्याच दरम्याने त्याची नोकरी संपली. पोरगा साफ वाया जाण्यापेक्षा मुंबई कायमची सोडून मुलखात जाऊया असा धोशा बायकोने लावला. जाणत्यानीही तोच सल्ला दिला नी खोली विकून तारकर मंडळी खामडोशीत रहायला आली.
गावातली पूर्वाई देवी खामडोशीतली ग्रामदेवता. गावात बहुसंख्य गाबीत, गावडे आणि भंडारी समाज. गावाच्या मावळत अरबी समुद्र नी दक्षिणेकडे विजयदुर्ग खारेपाटण खाडीचे फासूक खामडोशीच्या कुशीला भिडलेले. दर्याचे नस्त नी खाडी यांच्या दरम्याने नजर फाटेल एवढा धनांतर मळा. सड्यावर पूर्वाईच्या मंदिरा जवळ रांबोळाची बारमास व्हाळी उगम पावून अर्ध्या मळ्यातून वहात खाडीला जावून मिळायची. त्या नस्तावर पाषाणी वळिवांचा पक्का बंधारा घालून उंडलीचा भक्कम दरवाजा बसवून खाडीच्या खाऱ्या पाण्याचा बंदोबस्त केलेला. पाऊस काळ संपला की अर्ध्या मळ्यात आणि दरवाज्याच्या अलिकडे दोन ठिकाणी आडवस करून गावकरी व्हाळीचं पाणी तुंबवीत. ऐन मे महिन्यात सुद्धा ढोराना पिण्याजोग ढोपरभर पाणी साठलेलं असायचं.
पावसाळी भातशेती नी उन्हाळी भाजीपाला पिकवणारा मळा लाभलेला. तो परखड रेशनचा काळ, जग दुनिया डुकरी (म्हणजे लाल रंगाचा अमेरिकेत डुकराना घालीत तो मिलो, कॉंग्रेस सरकारच्या कृपेने रेशनवर मिळायचा)खायची. पण खामडोसकर मोठ्या अभिमानाने सांगत, आमची ढोरांदुकू डुकरी खायनत नाय. आमी म्हनशात तर कमेटीत्सून (रेशन दुकान) साकरे शिवाय काय्येक घेयत् नाय.तांव कशाक आमच्या गावात हजामती करून पडपावनी वर (वर्षभरच्या हजामतीच्या मोबदल्यात दिलेले धान्य)जगनारे न्हावी, तेंचा कुटूंब पोसतत." बहुसंख्य लोक स्वत:च्या होड्या नी मोठे पडाव सांभाळणारे. सराईनंतर मासेमारी सुरु झाल्यावर आजूबाजूच्या साताठ गावातले अडिज- तीनशे कामगार खामडोशीत होड्यांवर खलाशी म्हणून तर काहीजण मोठ्या सधन कुटुंबात माडांचं शिपणं, भाजीपाला जित्रब करणं अशी सिझनभर कमाई करीत. इतर गावांपेक्षा खामडोशीत चढ्यादराने मजुरी तीही जेवून खावून मिळायची. मच्छिमार कामगाराना भेस्तरवारी (गुरुवार) हप्त्याला पगार नी शुक्रवारी दिवसभर सुटी मिळायची. मोठे पडाव नी बलाव दर्यात रापणीने मासेमारी करीत. छोट्या होड्यांवाले खाडीत म्हावरं पकडीत.सगळा सधन , तालेवार समाज. गावातली जवळ जवळ सगळीच घरं मागेपुढे ओसरी पडवी असलेली चौसोपी.
पौषात द्वादशी पासून ते पौर्णिमे पर्यंत पूर्वाईची जत्रा भरायची. चतुर्दशीला आजूबाजूच्या बारा गावातले देव देवीला भेटायला यायचे नी पौर्णिमेला समुद्रस्नान करून समराधनेचा प्रसाद घेवून परत जायचे. शेती वाडी ताठ नी मच्छिमारी करणारे सधन खामडोसकर उत्सवावर अमाप पैसा खर्च करीत. जत्रासुद्धा खूप मोठी; मालवण, खारेपाटण फोंडा, तरळा इकडचे कापडाचे, भांड्याचे नी मिठाईचे व्यापारी दुकाने लावायचे. एकादशीच्या संध्याकाळ पासून तो पौर्णिमेच्या दुसरे दिवसापर्यंत येणाऱ्या सर्व भाविकांसाठी देवस्थानातून दुवक्त अन्न वाढले जाई. रोज रात्री स्थानिक भजने, एखादे दिवशी घाड्या - गाबतांचा तमाशा असे. रोज देवीची पालखी बाहेर पडली की खामडोसकरांचे लाठी, बनाटी,बोथाटी,चौरंगी नी दांडपट्ट्याचे खेळ होत ते तर आसमंतात प्रसिद्ध.
देवीची पालखी बाहेर पडून मंदिरा भोवती प्रदक्षिणा घालायची त्याला भोवती म्हणत. अशी तीन भोवत्या घालताना सूर,सनई, ताशा घडशी, ढोल टिमकीचे कांडर वाडकरांचे वाजप असे. पालखी मंदिराच्या मागे गेली की तिथे दोन दरडींच्या मध्ये विस्तीर्ण त्रिकोणी मैदान होते. त्याला तिर्कोण म्हणत. त्यात लाठी, बनाटी, बोथाटी, चौरंगी नी दांड पट्ट्याचे खेळ होत. त्यावेळी सूर सनई बंद करून भिकू, बनाजी, अनाजी नी झिलू कांडर हलग्या वाजवीत नी त्या तालावर खेळ होत. हातभर लांब लाकडी रिफांच्या फुलीला चार टोकाना चार हाती लोखंडी साखळ्या गुंफवून त्यांच्या टोकाला कापडी बोळ्यांवर करंजेल ओतून ते पेटवून कसबी खेळकरी चौरंगी फिरवीत असे. तसेच लाठीच्या एका टोकाला नी बनाटीच्या दुशा तोंडाना कापडी बोथे बांधून ते पेटवून खेळ होई. चार हात लांब कापशी दोरीच्या दोन टोकाना अर्धा पौंडी लोखंडी गोळे ओवलेली बोथाटी हिरोजी खवळे, दुर्योधन गावडे, पर्ल्या नी नथू भंडारी असेपाच सहा नेमस्त लोकच अशी फिरवीत की तिने गती घेतल्यावर ती जणू काठीच आहे असे वाटे. ती डोक्यावर, पुढे,मागे फिरवून मध्येच जमिनीवर उताणे पडून पायाच्या आंगठ्यात पकडून गरगरा फिरवीत.फिरती बोथाटी हवेत उंच फेकून ती खाली आल्यावर पुन्हा झेलीत, एकमेकाकडे फेकित असत. ते कसब तर भलतेच वाखाणण्या जोगे. खामडोसकरांच्या काही पोरीसुद्धा लाठी-बनाटी च्या कसबात पारंगत असायच्या. अकवार पोरी घट्ट कासोटा मारून पालखीपुढे लाठी बनाटीचे हात करून दाखवीत. गावातल्या झाडून सगळ्या बापयाना लाठीचा एखाद दुसरा तरी हात अवगत असायचाच. बाबग्या भंडारी छातीवर दाण्ण दाण्ण मुटके मारीत बढाईने म्हणायचा,"खामडोशीतला प्वॉर चलोक लागला काय पैल्यान लाटी फिरवूक शिकता.” अधून मधून घासलेटाचे हिलाल म्हणजे रॉकेलची चूळ भरून ती थुंकून पेटता बोळा धरला की भक्कन दोन तीन हात लांब अगीची ज्वाळ पेटायची. काही कसलेले खेळकरी पायाना दोन- दोन तीन- तीन हात लांब लाकडी खुटे बांधून त्यावर उभे राहून तोल सांभाळीत लाठी बनाटीचे हात खेळून दाखवीत ते कसब बघून प्रेक्षक थक्का व्हायचे. पालखीच्या वेळी उखळीबारही काढले जात. जवळ जवळ घरठेप एक बापया उखळ घेवून असायचा. एकावेळी 7/8 खेळगडी लाठ्या बनाट्या बोथाट्या नी दांडपट्टा फिरवीत मैदानात उतरले की प्रेक्षक डोळ्यात प्राण आणून बघित रहायचे. विजयदुर्गा पासून ते फोंडा- कणकवली पर्यंत पैसेवाले लोक लग्नकार्यात वरातीच्या पुढे खेळायला त्या स्वस्ताईच्या काळातही दहा वीस रुपये अशी जबर सुपारी देवून खामडोशीतला लाठी दांडपट्टा बोलावीत असत.
नकूळ गावात आला त्या वर्षी जत्रेच्या कार्यक्रमा साठी मेळ बसल्यावर शकुनी तारकराने गावड्याना हाताशी धरून तमाशा ऐवजी ग्रामस्थांचे नाटक करायचा बूट काढला. त्याला सगळ्यानीच होकार भरला नी ती सगळी जबाबदारी त्याच्यावरच सोपवली. जात्रेला महिनाभर अवकाश होता पण नाटक हा विषय तसा नवींनच असल्यामुळे दुसरे दिवशा पासून तयारीला सुरुवात झाली. शकुनींकडे असलेल्या पुस्तकातून सत्यवान सावित्री पौराणिक नाटक निवडले. सत्यवानाच्या मुख्य पार्ट्यासाठी संपाती गावडे, सावित्री म्हणून दुष्यंत गावडे, यम कण्व गावडे, नारद धौम्य गावडे, तसेच इतर पात्रांसाठी माल्यवान, अंगद, मारीच, बभ्रुवाहन,दुर्योधन,जाम्बवान, द्रोण, सात्यकी अशी गावडे वाडीतली मंडळी निवडली. यात एक गम्मत अशी होती की गावडे वाडीत पौराणीक नावे ठेवायचा दांडगा रिवाज होता. जयद्रथ, माल्य, शल्य, चित्रसेन अशी रामायण महाभारतातलीच नव्हे तर नामकरणा पूर्वी पोथ्या पुराणे शोधून शोधून नावे निवडली जात.
शकुनी गावडे दिग्दर्शन करणारा शिवाय नाटक हा विषयच मुळात नवीन असल्यामुळे बाकीची सगळीच जोखीम त्याच्यावर म्हणून नाटकात कसलाही पार्ट करणार नव्हता. पार्टी निवडल्यावर प्रत्येक पात्रासाठी त्याच्या त्याच्या संभाषणाची लेखी प्रत करून द्यायचे ठरले. अर्थात दोन पार्टी सोडले तर झाडून सगळे अक्षरशत्रू. बरे ते इतर कोणाची मदत घेतील म्हणावे तर गावात सुद्धा एका हाताच्या बोटावर मोजावे इतकेही साक्षर मिळणे शक्य नव्हते. तेंव्हा रोज नेमाने संपूर्ण नाटकाची तालिम घ्यायची यावर सर्वांचेच एकमत झाले. रोज ऐकून ऐकून प्रत्येकाला हळू हळू आपापले भाषण आपोआप पाठ होईल असे अंगद नी कण्व गावड्यानेही छातीठोक सांगितले. सगळ्याच पार्ट्यांच्या घरी किमान तीन चार कायम गडी ठेवलेले असल्यामुळे रोज नेमाने तालमीना हजर राहणे शक्य होते.
दुसरे दिवसापासून गावडे वाडीत जालंधर गावड्याच्या घरी तालीम सुरु झाली. त्याच्या घरातले दोन्ही बाप्ये कुटूंब कबिल्यासह मुंबईत रहायचे. घरी त्यांची विधवा बहिण , म्हातारे आई बाप नी दोन घरगडी एवढीच माणसे नी ते घरही एकवशी म्हणून निवडलेले. दुपारी जेवण वगैरे आटोपल्यावर दोन च्या सुमाराला नट मंडळी जमू लागली. तालिम सुरु झाल्यावर शकुनीच्या एक अडचण लक्षात आली की, शुद्ध छापील भाषेत बोलणे कोणालाही जमणे महाकर्म कठिण. पहिल्या दिवशी दिवेलगणी पावेतो जेमतेम दोन प्रवेश उरकले. कंटाळलेले पार्टी एकेक करून गूल व्यायला लागले. द्युमत्सेनाचे काम करणारा सात्यकी गावडा तर ठासबंद बेवडा. तो तालमीला येताना दारवेची बाटली सोबत घेवूनच यायचा. जालंधर गावड्याच्या घराशेजारी गवताची उटी (गंजी) डाळलेली होती. तिथे बाटली दडवून ठेवी नी मध्ये मध्ये लघवीच्या निमित्ताने बाहेर जावून घोट मारून येई. काही वेळा शेवटचा प्रवेश सुरू झाला कि सात्यकीला तोंडावर पाण्याचे हाबके मारून हालवून हालवून जाग़ा करावा लागे.
नित्यनेमाने वेळ उशिर करून कां होईना पण सगळे पार्टी हमखास येत मात्र. पण शुद्ध उच्चार होण्यासाठी एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायला लागले की कंटाळून काही ना काही मोडी मारून न सांगताच तालिमीतून मध्येच निघून जात. शकुनीने दुसरे दिवशी त्याबद्दल संबंधिताला हटकलेच तर तो बाजूलाच ; तिसराच पार्टी त्याची कड घेवून शकुनीशी हुज्जत घाली. "आता भटाची शुद्द भाशा आमका नाय उलटत तेका काय करनार? सगळाच एकाम कसा जमनार?" हा प्रकार फारच वाढायला लागला नी एकदा प्रकरण हातघाईवर आले. तेंव्हा ज्याच्या घरी तालीम होई त्या जालंधर गावड्याचा म्हातारा सात्यकी गावडा म्हणाला, " रे शकुन्या, द्येवान अक्कल वाटल्यान तवां तू हगोक गेलं हुतंस काय रे? सुद्ध बोलोक तां काय किर्तान हां की पुरान (पुराण/प्रवचन) सोडूचा हा? नी बघूक येनाऱ्यात धा ईस भट -बामनांची लोकां सोडली तर सुद्ध बोलणां समाजणार कोनाक? बगनारे सगळे ल्वॉक अडानी...... नी गावड्या- गाबताची जात म्हंजे माशे खावन् खावन् येकेकाची जीब म्हनशी तर भोळसावलेली, तू कितीव शिकस्त क्येलस तरी काय उपेग नाय....जां काय चल्लां हा ना तां तसाच चलाने..... जेका जसा जमात तसा तो बोलॉने, ल्वॉक कायपन म्हननार नाय..... "
म्हातारा बोलला त्याची प्रचिती हळू हळू शकुनीला आली. कितीही घटवून घेतलं तरी दरवेळी तीच चूक आणि दर वेळी नवीन चूक. शेवटी कंटाळून पार्टी जसं बोलेल तसं रेटून नेत शकुनीने तालमी रेटून न्यायला सुरवात केली. गावडे मंडळी नाटक बसवताहेत ही वार्ता षटकर्णी झाल्यावर एकदिवशी मराठी शाळेतले गोडवे गुरुजी शकुनीला भेटायला आले. कुठचं नाटक, काय याची चौकशी केल्यावर गुरुजी म्हणाले, " काय हो , शकुनीभाऊ, नाटकात पदें आहेत की नाय? आता नाटक म्हटल्यावर मुख्य मुख्य पात्राना तरी थोडीफार पदें ही हवीच. तुम्हाला गाण्याचे कितपत अंग आहे? म्हणजे गरज पडली तर पदें बसवायला थोडीफार मदत करीन मी पण." असे बोलून त्यानी "जा भय न मम मना " हे पद आळवून आळवून गाऊन दाखवले.
दुसरे दिवशी गोडवे मास्तर हातपेटी घेवून पदें बसवायला हजर झाले. नाटकातले सावित्री ला असलेले एक गाणे " नच मी निर्बला मी तर सबला" या पदाला चाल लावून त्यानी ते गावून दाखवले आणि सावित्रीचा पार्टी दुष्यंत गावडे, त्याला शिकवणे सुरु केले, त्या बापड्याला निर्बला हा शब्द काय धड उलगडेना निभरला - निबदला- निबुदला करता करता काळवं पडलं; बोंबलून बोंबलून बापड्याचा घसा बसला. दोन तीन दिवस हा प्रकार बघितल्यावर मग दुष्यंत गावड्याला येणारं घाड्यांच्या तमाशातलं 'सखा सजना हो मनहरना' हे पद घ्यायची मुभा मिळाली. सत्यवानाच्या पार्ट्याला पण असच मूळ पदा ऐवजी 'देवातुज्या दरबारी रे' हा भजनातला अभंग आणि नारदाला 'देवा पांडुरंगा माज्या माईबापा' अभंग देवून मास्तरानी प्रश्न सोडवला. यमाचा पार्टी कण्व गावडे तमाशात बतावणी करणारा त्याला गौळणी तोंड पाठ. पण नाटकात बापड्याला एकही पद नव्हतं. त्याने खूप हांजी हांजी केली पण डायरेक्टर नी, "यम गाणं म्हणायला लागला तर लोक टर उडवतील" अस बोलून नकार दिला. गोडवे मास्तरानी पण सक्त नकार दिला.
नाटक दहा दिवसांवर आलं आणि दोन सोबती घेवून शकुनी पडदे आणायला मुंबईला रवाना झाला. कापड घेवून नवे पडदे शिवून घ्यायला अवधीच नव्हता. नशिबाने मुगभाटला एका डबघाईला आलेल्या कंपनी कडे ड्रॉपच्या मखमली पडद्यासह महालाचा सेट आणि एक प्रवेश पडदा मिळाला. रोखीचे गिऱ्हाईक मिळाले म्हणताना अल्प स्वल्पात सौदा पटला. मग दादरला मेकपचे सामान खरेदी करून मंडळी चौथ्या दिवशी गावात हजर झाली. त्रयोदशीला नाटक करायचे ठरले. गावकरी हौशीने मदतीला सरसावले. ऐस पैस स्टेज घालून झाला. मागच्या बाजूला घोंगड्यांचा आडवसा करून रंगपट करण्यात आला. ड्रॉपचा पडदा मखमली. त्यावर कडेनी नक्षीकाम केलेलं आणि शिरोभागी चम् चम् करणारी सोनेरी झालर लावलेली. दोन बाजूना कमळात उभ्या राहून किंचीत् पुढे झुकून दोन्ही हातांची ओंजळ करून फुलं उधळणाऱ्या कंचुकीधारी देखण्या अप्सरा काढलेल्या विंगा.बत्त्यांच्या (पेट्रोमॅक्स) लखलखाटात दिसणारा रंगमंचाचा नजारा पाहणाऱ्याला खिळवून ठेवणारा होता. मुळात बत्ती हेच मोठ्ठं अप्रूप. जत्रेला आलेली मंडळी कुतुहलाने समोरचा ड्रॉप बाजुला करून घोळक्याने आत काय आहे ते बघायला बिन दिक्कत स्टेजवर चढत. असं करता करता गर्दी वाढली नी एकच झुंबड उडाली. ओढाखेचीत ड्रॉपच्या बाजूला बांधलेली कनात सुटून खाली लोंबायला लागली. मग मात्र जाणते गावकरी धावले. पाचसहा दांडग्या बापयानी अंगावर मारायला धावून जात बघ्याना पिटाळून लावले नी दहा बारा बापये हातात दांडे घेवून आळीपाळीने राखणीला थांबले तेंव्हा मात्र लोकांची उपल्वट कमी झाली.
शकुनीने शोध चौकशी केल्यावर वाड्याचे वामनराव तावडे मेकप करतात असे कळले. नाटका दिवशी संध्याकाळी वामनराव हजर झाले. पेटीसाठी गिर्यातल्या बाबा देवधराना पाच रुपये मेहेनताना आगावू देवून त्यांच्या पायपेटीसह बोलावले. तबलजी गावातलाच हरी नळेकर असा सगळा संच सजला. जत्रेच्या आधी दोन दिवस तालीम झाली होती. पण त्यानंतर सगळ्या गावातच तयारीची गडबड उडालेली. एकही पार्टी शकुनीला भेटला नव्हता. नाटकाच्या संध्याकाळी शकुनी रंगपटात आला. मेकपवाले तावडे , पेटीवाले बाबा देवधर वेळेवारी हजर झाले पण एकाही पार्ट्याचा पत्ता नव्हता. गावातली समंजस तरणी पोरं मात्र हात जोडून मदतीला उभी होती. एकेकाला एकेका पार्ट्याच्या घरी बोलावायला पिटाळून शकुनी सचिंत मुद्रेने वाट पहात राहिला. घंटाभरात एकेक पार्टी उगवायला लागला, वामनरावानी मेकपचे सामान मांडले. आधी मुख्य पार्टी आणा. त्यानी फर्मान सोडले. सावित्री आणि सत्यवानाची म्हातारी आई या स्त्री पार्ट्यांची उस्तवारी जास्त म्हणून पार्टी बभ्रूवाहन आणि दुष्यंत गावडे याना आधी रंगवायचे असे ठरले. त्यांचे अवतार बघितल्यावर वामनरावानी कपाळावर हात मारून घेतलेनी. त्यानी दोन दिवस गडबडीत दाढीच केलेली नव्हती . 'अरे न्हाव्याला बोलवा आधी ' त्यानी फर्मान सोडले.
गावात तेली, कुणबी, म्हार, चांभार, परीट, सुतार, सोनार, भट, भंडारी, सगळ्या जातीचे लोक होते . फक्त धनगर, न्हावी आणि मुसलमान गावात औषधालाही मिळाला नसता. पण गावात सुपिक मळा, विपूल भात शेती व्हायची नी लोकही सढळ हस्ते पडपावणी द्यायचे. त्याखेरिज लग्नात रेग़ धरणे, लेकरांचे जायवळ या विधीना पैशाने गबरगंड झालेले गाबीत, भंडारी हात सोडून पैसे देत. म्हणताना बाजुच्या गावतले तीन न्हावी घरं वाड्या आपापसात वाटून घेवून आठवडाभर कोणा ना कोणाच्या ओसरीवर पडशी टाकून मुक्कामी रहात. ते जिथे पडशी टाकीत त्या घरची होवरेकरीण त्यांना मजबूत ठाय वाढून द्यायची. न्हावी आठव्ड्यातून एकदा रविवारी आपल्या गावी जात. ते पुन्हा मंगळवारी भिणभिणताना हजर होत. स्टेजची राखण करणारांपैकी कुणीतरी गेले नी दहा मिनिटात धोकटी घेवून दोन न्हावी हजर झाले.
दुष्यंताची दाढी होत आली तशी तो बाजूला सरकला. त्यावर तावडे म्हणाले," रे येडझव्या बाजूक काय व्हतं , आदी मिशी काडून घी......" त्यावर जोरात मुंडी हालवीत दुष्यंत म्हणाला, " माज्ये आवस् बापूस जिते आसत् आजून...... मी मिशी नाय भादरणार..... काय तां व्हवने....!" शकुनी, वामनराव तावडे नी गंग्या बाबल्या न्हावी चोघेही परोपरीने समजूत काढून दमले पण दुष्यंत कसाच ऐकायला तयार होईना. स्टेज राख़ायला थांबलेल्यातला धृतराष्ट्र गावडे पोक्ता पुरवता त्याने शक्कल लढवीत म्हटले," वंयच् दम धरा..... ह्येचो तोडगो मी सोदून येतय्....." नी तो चालू पडला. त्याने सरळ दुष्यंत गावड्याचे घर गाठले. अंगणातूनच दुश्श्याच्या आयशीला हाकारीत तो ओरडला, ''ग्ये गंगाय... आदी भायर् ये." मागिलदारी भांडी घाशीत बसलेली गंगाय घाबरून राखभरल्या हातानी तशीच पुढीलदारी आली. तीला पहाताच धृतराष्ट्र गावडा म्हणाला, " आता तूच सांग....ते प्वॉर नाटाक करतंहत तां देवीच्या वार्षिकाचा काम हां ना? धा गावची मान्सा इली हत तेंच्या सामनी तुजो झील गावाचा नाक कापुक निगालोहा ह्यां बरोबर हा काय? तूच सांग?" त्यावर फडा फडा थोबाडित मारून घेत गंगाय म्हणाली, " दाजीनुं, झालां काय ? काय केल्यान माज्या झिलान?"
आवाज चढवीत धृतराष्ट्र बोलला, " काय केल्यान्....? तुजो झील साईत्रेचा काम करतांहा ना नाटकात? ही साइत्री म्हंजे गावदेवी पूर्वाई सारकी मूळ मायाच ना? तीचा रूप जर सारक्या दिसला नाय तर पूर्वाय नी मूळमाया ह्येंचो कोप ह्वयत् की नाय सांग तू? " बिचारी गंगाय गर्भगळित होवून थरथर कापायलाच लागली. हात जोदीत ती म्हणाली, 'दाजीनुं ..... तुमी काय म्हनतास तां माका काय उलगडय ना..... नीट समज पाडून सांगा." मग आवाज नरम करीत धृतराष्ट्र बोलला, " तर ती साईत्री मिशी सकट उबी ऱ्हाली तर कसां दिसात आदी सांग तू.....बायल मानसाचो पार्टी म्हटल्यार मिशी काडून सोंग करूक व्हया की नको.....?" आता दुष्यंताचा बापूस विदुर तोंड उघडता झाला. " व्हय तर , आता घाडयांचे प्वॉर तमासो करतत तवां गवळणीचा स्वांग घितलेले बापये मिशी काड्डत ना?" त्याला थांबवीत धृतराष्ट्र म्हणाला, " ह्यां जरा तुमच्या येडझया दुष्यंताक सांगा..... तो मिशी काडून घेवक् तयार व्हयना नाय..... म्हंता माजे आवस् बापूस जिते हत, मी मिशी न काडताच साईत्रीचो पार्ट करणार....किती सांगला तरी कसोच आयकत नाय हा...."
धृतराष्ट्र गावड्याचे बोलणे ऐकल्यावर ओसरी वरच्या गडव्यातले पाणी हातावर ओतून पदराला हात पुशीत गंगाय म्हणाली, "चला भावजीनुं, दुस्यन कसो आयकत नाय बगतंय मी...." जाता जाता आंगणात पेळेवर टाकलेल्या तुरीच्या भाऱ्यातले दोन हात लांबीचे ठोंबस ढाक खेचून घेत ती तरा तरा निघाली. गंगाय रंगपटात शिरली तेव्हा दुष्यंत फुरंगटून बाजूला बसलेला होता. काय होते आहे हे कळण्या आधीच गंगायने हातातल्या ढाकाचा असा वादाडा ओढला की, "आयायग्ये ..... म्येलय " ओरडत दुष्यंत कूळकूळला.. " म्येल्या मिशी न काड्ट्टा साईत्रीचो पार्टी करणार तू...... ल्वॉक तोंडात श्यान घालतीत ना...चला रे पोरानो ह्येका आडवो घालून मिशी खरडवा ह्येची..... कसो आयकनां नाय बगतंय् मी...." त्यावर हात जोडीत दुष्यंत म्हणाला, " मी घेतय् मिशी काडून.... तू घरा जा आये." बाबल्याने वस्तरा पाजळून घेत चिमटीने गालफड ताणून धरीत अल्लाद मिशी उतरली. तेवढ्यात सत्यवानाच्या बापाचे द्युमत्सेनाचे काम करणारा पार्टी सात्यकी आला तोच तलमत तलमत... त्याला आणणारानी आत आणून शकुनी समोर बसवल्याबरोबर तो तिथेच आडवा झाला. सत्यवानाचा पार्टी संपाती गावडे , त्याला शोधायला गेलेला जनमेजय खवळे हात हालवीत म्हणाला, "शकुनी भाऊ. संपाती घरी नाय .... कल राती घोव बायलेचा भांडान झाला नी फाटपटी संपात्याची बायल् पळॉन ग्येली..... दोपारसर ती इलीली नाय म्हंताना होडी घेवन् बायलेक् सोदूक संपाती सासरवाडीक, मीट्मुंबरीत ग्येलो...आता काय तो येयत् नाय नी तुमचां नाटाक काय उब्या ऱ्हवत नाय आज..... "
देवीच्या पालखीच्या भोवत्या आटोपल्या नी लोक समोर येवून बसले. दरम्याने गावातल्या पुढारी माणसानी विचार विनिमय करून लोकाना वस्तुस्थिती काय आहे ते सांगून हात जोडून माफी मागायची असे ठरवलेले होते. स्टेज समोर गर्दी जमलेली पहाताच जाणत्यानी पडदा वर करायला सांगितला. पोलिस पाटील, पुर्षा भंडारी, तातू पुजारी, भलुकाका लळित आणि वामनराव तावडे अशी दशक्रोशीत प्रसिद्ध मंडळी स्टेजवर हात जोडून उभी असलेली दिसली. त्यानी हात उंचावीत लोकाना शांत रहायची खूण करताच कालवा थांबला, भलुकाका म्हणाले, " लोकहो, तुम्ही ज्या नाटकाची डोळ्यात प्राण आणून वाट पहात अहात, ते नाटक आज काही अडचणीमुळे होवू शकत नाही." आता पुढे सरसावत पुर्षा खड्या आवाजात बोलला, " आता काय अडचण म्हंशात तर सत्यवानाचो पार्टी संपाती गावडो, तेची बायल् घोवाच्या रागान् पळान् ग्येली; त्येचा म्हायार मीट मुंबरीत आसा... तां थंयच गेल्ला आसनार म्हनान संपाती तेका सोदूक तकडेच गेल्लो.... तो काय अजून इलेलो नाय.... दुसरा म्हनशा तर सत्तेवानाच्या बापसाचा काम करनारो झिंगो सात्यकी गावडो, तेका म्हनशात तर नाटकात घितलानी ह्यांच चुकला. तो झिंग़ॉन पडलोहा तो काय उजवाडासर उटात असा वाटत नाय. म्हंताना मंडलीनुं आजचा नाटाक रद्...." पोलिसपाटील भीमराव खवळे म्हणाले," तर मंडळीनुं संपातीक आमी उद्या परत हाडतलंव नी उद्या राती नाटाक करतलंव.....तुमी निरूस व्होवचा नाय. आमचे दांडपट्टेवाले नी बोथाटीवाले पालक्ये सामनी खेळले तेच्यापक्षी वेगळे प्वॉर खास नवे ख्याळ करून दाकवतले हत ते बगा.... नी आमका मापी करा. "
सकाळी सुकू पडण्या आधीच गावातली बुजुर्ग मंडळी होडी काढून संपातीच्या मागावर रवाना झाली. सूर्य मध्यान्हीला आला नी संपाती, त्याची बायल् याना घेवून मंडळी गावात आली. सात्यकी झिंगून पडू नये म्हणून दोन पोरगे दिवसभर त्याच्यावर पहारा धरून राहिले. रात्री पालखीच्या भोवत्या संपल्यावर माणसानी स्टेज समोर गर्दी केली. दोन घंटा झाल्या. पेटीवाले, तबलजी स्टेज समोर जावून बसले. बाबा देवधरानी पट्टी धरली. हरी नळेकराने तबला लावला. थोड्या वेळात तिसरी घंटा झाली. अशी मध्ये मध्ये घंटा कां वाजली ते लोकाना खरंतर कळलंच नव्हतं. नाटक सुरू होण्याआधी तीन वेळा घंटा होतात हा संकेत लोकाना कुठे माहिती होता? स्टेजवर पडद्याआड बत्तीच्या उजेडात बरीच मंडळी जमल्याचा अंदाज तलम पडद्यातून दिसणाऱ्या धूसर छटांमुळे येत होता. आता आतली लोकं गाणं बोलायला लागली. पेटीचे सूर ऐकू आले नी तबला कडकडू लागला. लोक गप्पकन् शांत झाले नी आवाक् होवून गीत ऐकू लागले. ती नांदी होती. नांदी संपली, पडदा वर गेला आणि "नारायन नारायन " म्हणत नारदाचा पार्टी तंबोरा वाजवीत ' देवा पांडुरंगा माज्ये माईबापा " हा अभंग़ घोळवून म्हणत राहिला."ग्ये बाय माज्ये ह्यो नारद," म्हणत बाया बापड्या पुढे धावल्या नी स्टेज समोर जावून डोकं टेकून पाया पडून कडोसरीचा पैसा नारदाकडे भिरकावून हात जोडीत त्या परत फिरल्या. आता स्टेज समोर पाया पडाणारांची एकच झुंबड उडाली.
लोक पाया पडताना बघून पार्टी धौम्य गावडे भलताच चेवाला आला.अभंग म्हणून झाला तरी अजून गर्दी आरेखत नव्हती. मग तारतम्य राखून त्याने दुसरा अभंग सुरु केला. साधारण पंधरा मिनिटानी पाया पडणी संपली नी पुढचा भाग सुरु झाला. भाषण कोणाचेच धड पाठ नव्हते. प्रॉम्प्टर बंडू मास्तर लळित नी गोडवे गुरुजी दोन विंगात उभे राहून संवाद वाचीत होते. गोंधळात त्यांचेच वाचणे मागेपुढे होत असल्याने पार्टी अधिकच बावचळत. पण एक अंक होईतो हळू हळू सगळ्यांचा धीर चेपला. दरम्याने प्रॉम्पटरांची गल्लत शकुनीच्या ध्यानात आल्यावर गोडवे गुरुजीना थांबवून नव्याने कुठून सुरु करायचे ते दाखवले. प्रेक्षकांमध्ये काही जाणकारही होते, दीनानाथ, बालगंधर्व यांची नाटके पाहिलेले सुद्धा नाटकाचे पडदे बघून चाट झाले. बालगंधर्वांच्या रंगमंचाच्या तोडीस तोड असा तो भव्य दिव्य सेट बघून मध्यंतरात शकूनीची भेट घेवून जाणत्यानी त्याची पाठ थोपटली.
तिसरा अंक सुरु होवून यमाची एंट्री झाली नी भाविकानी पुन्हा स्टेज समोर पाया पडणीला झुंबड केली. लोक भक्तिभावाने पैसे फेकू लागले. एवढा गदारोळ झाला की सावित्री नी यमाला संवाद म्हणणे अशक्य झाले. मग तारतम्य राखून यमाने मागचा पुढचा विचार न करता गौळण म्हणायला सुरवात केली. शकुनीने कपाळावर हात मारून घेतला. पण प्रेक्षक मात्र खुष होवून टाळ्यांचा कडकडाट करू लागले. त्याना यात काहीच गैर वाटले नाही. तो प्रवेश संपला नी शेवटचा प्रवेश सुरू झाला. सत्यवानाचे म्हातारे आईवडिल स्टेजवर आले. दोन मिनिटे झाली तरी कोणच काय बोलेना. बंडू मास्तराने बाईला हाक मारून इशारा केल्यावर ती एक वाक्य कसेबसे बोलली पण सत्यावानाचा म्हातारा द्युमत्सेन काहीच बोलेना.... प्रेक्षकात समोर बसलेले कोणतरी चाबरट पोर मोठ्याने ओरडले, अरे कायतरी बोल म्हाताऱ्या .... त्यासरशी कातावत विंगेतल्या प्रॉम्प्टरकडे तोंड वळवीत पार्टी ओरडला, ' अरे जरा मोट्यान वाच रे गोडये मास्तरा.... तु काय वाचतंस तां माका झ्यॉट पन आयकोक् येयना नाय रे......" गोडवे मास्तरानी मोठ्याने वाचून दाखवल्यावर पार्ट्याने गोळाबेरीज करीत वाक्य म्हटले. मग म्हातारी बोलली. सत्यवान सावित्रीने प्रवेश केला. यावेळी परत म्हाताऱ्याची गाडी अडकली. सत्यवान हळूच बोल बोल म्हणून खुणा करू लागल्यावर पार्टी ओरडला, " गोडये मास्तर येकाम लांबडा लांबडा वाचून दाकवू नुको , तां माका काय उलटत नाय . तुकडे पाडून दिवा ." आता बंडू मास्तर गोडवेंच्या जागी गेले नी त्यानी म्हाताऱ्याचे संवाद तुकड्या तुकड्याने द्यायला सुरुवात केली. शेवटी कसेबसे नाटक संपले नी पडदा पडला.
झालेल्या प्रकारामुळे शकुनी फारच नाराज झालेला. पण प्रेक्षक मात्र भलतेच खुष झालेले. रंगपटाबाहेर आल्यावर लोकानी शकुनीच्या भोवती कडे केले, नी त्याच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला. खामडोसकरानी नाटकाचा नवीन पायंडा पाडल्याबद्दल लोकानी मुक्तकंठाने तारीफ केली. जत्रा उरकली नी पंच मंडळी हिशोबाला एकत्र बसली. नारद, यम यांच्या पाया पडणीचा बराच गल्ला साठलेला. शकुनीला रंगपटाचा भाडेखर्चासुद्धा हिशोब देवून पंचानी त्या बाहेर सवाशे रुपये बक्षिसी केली. गावडे मंडळींचे नाटक झाले नी पुढच्या मोसमापासून आजुबाजूच्या गावानी नाटकांचे जसे पेवच फुटले. पहिली जत्रा देवदिवाळीला चौंडेश्रीला भरायची. तिथल्या लोकानी शकुनीला पाचारण करून गिर्यातल्या लोकांचे नाटक बसवून द्यायची त्याला गळ घातली. त्यानी महाभारतातल्या कथानकावर कुठलेसे नाटक बसवले. आता कुठेही नाटक़ असले तर पडदे शकुनी कडून भाड्याने नेत. काही गाव तर त्याला दिग्दर्शन करायलाही बोलावीत.
त्या नंतर पुरळ गावात 'एकच प्याला' हे नाटक झालेलं. ह्यात काम करणारी सगळी पांढरपेशी मंडळी. त्यानी शिस्तीत तालमी घेतलेल्या. सगळ्या पार्ट्यांचे संवाद तोंडपाठ. सगळी संग़ित प्रेमी नी गाण्याचा व्यासंग जोपासलेली मंडळी. नाटकाला आजुबाजूच्या गावावतली झाडून सगळी मंडळी जमलेली. बरोब्बर नऊ वाजता तिसरी घंटा झाली नी नांदी सुरु झाली.नाटक बहारदार झालं. पहिला अंक संपल्या पासून बक्षिसांची खैरात सुरु झाली. बक्षिसाच्या रकमेतून नाटकाला केलेला सगळा खर्च वसूल होवून दीड दोनशे रुपये शिल्लक राहिले. सिंधू -गीता अशी स्त्री पात्रं पुरुषानीच सादर केलेली. पण ती इतकी हुबेहूब वठवलेनी की जुणे जाणते म्हणाले,अगदी बालगंधर्वाच्या तोडीचे नाटक केलेनी हो पुरळकरानी. नाटकात सिंधूचे हाल बघून बाया बापड्या हमसाहुमशी रडल्या. पुढे त्याच नाटकाचा प्रयोग खामडोसकरानी खर्चवेत देऊन पूर्वाईच्या जत्रेवेळी केलेनी. पुर्वाईच्या देवळामागे तिर्कोणात पुढची बाजू जुनी रापणीची जाळी लावून आडवस केला की बंदस्ती होत असे. खामडोसकर झिलगे स्टेज घालणे, नी आडवस करणे ही कामे हौशीने करीत. शकुनीचा रंगपट मोफत मिळे.
पुरळकरांचे नाटक गाजले म्हणताना वाडे गावातल्या नी आमच्या पडेल गावातल्यांचीही कुय चाळवली. या तीनही गावातल्या ग्रामस्थांमध्ये अंतर्गत एक सुप्त स्पर्धाच होती म्हणाना. वाड्यातल्या जाणकारानी पुण्यप्रभाव नाटक बसवलं. त्यावेळपर्यंत वामनराव तावडे हे रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध झालेले. शिवाय त्यानी नेपथ्याचाही स्वत:चा संच उभारलेला. वाडेकरांचं नाटकही चांगलंच वठलं. त्यांच्या नाटकाचे मोंडात नी त्या नंतर कट्ट्यावर तिकिट लावून प्रयोग झाले. दोन्ही ठिकाणी भाऊतोबा गर्दी झालेली. वाडेकरांच्या मागोमाग आमच्या गावातल्या मुंबईकरानी 'दर्या सारंग सावळ्या तांडेल' हे नाटक बसवलं. वारीक वाडीत दरवर्षी थोरल्या दिवाळीनंतर त्यांच्या कुळाव्याची समाराधना होई. तो मोका साधून त्यानी नाटकाचा बेत योजला. नाटकाच्या तालमी मुंबईत घेतलेल्या होत्या. वाडीतले लोक फक्त स्टेज घालून देणार होते. बाकी सगळा सरंजाम मुंबईतून यायचा होता. आजूबाजूच्या गावात लोकाना समजण्यासाठी मुंबईत पेंटर कडून ड्रॉईंग पेपरवर मोठ्या अक्षरात वीस बोर्ड बनवून घेतले. नाटका पूर्वी आठवडाभर खास माणसं रवाना करून आजूबाजूच्या गावांमध्ये चवाठ्यावर बोर्ड लागले.
या नाटकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात इंदू काणकोणकर, सुमन नाईक, या दोन नट्या काम करणार होत्या. नाटकाच्या दोन दिवस अगोदर मुंबईकर मंडळी नट्यांसह यायची होती. ही बातमी गावभर पसरलेली. त्याकाळी मुंबईवरून बोटीने लोक यायचे . तसेच मुंबई विजयदूर्ग एस्टीही सुरू झालेली. स्टॉपवर नट्या बघण्यासाठी दोनशे माणसं जमलेली. गाडी थांबली नी नाटकवाले खाली उतरले. आलेल्या माणसांत बिन काष्ट्याच्या (पाचवारी गोल साडी) साडीतल्या दोन वेण्या घातलेल्या त्या नट्या असणार हे लोकानी अचूक ओळख़लेनी. नाटकाला चार दिवस अवकाश होता. पण नट्या बघायला त्या दिवशी संध्याकाळ पासून ते नाटकाच्या दिवसा पर्यंत सकाळ संध्याकाळ आजूबाजूच्या गावची माणसं पडेलात खेटे घालीत. रस्त्याने येणाऱ्या पाचसहा परकी गावातल्या लोकाना कोणी विचारलं, “ खंय चल्लास रे? तर ते बिनदिक्कत सांगत,” पडेलात नाटकात काम करूक हुंबयच्यो नट्यो इल्योहत ना, त्यो बगूक जाताव.” माणसं शोध चौकशी करीत वाडीत ज्या घरी नट्या उतरलेल्या होत्या तिथे गेल्यावर बाहेर अंगणात वावरणाऱ्याला विचारित “हय ऊंबयच्यो नट्यो इल्योहत ना? आमी बगूक इलाव.” त्यावेळी नट्या ओसरीवर वगैरे असल्या तर तो माणूस त्यांच्या दिशेने अंगुली निर्देश करीत ‘ती जांबळा कापाड न्हेसलेली नी दुसरी हिरव्या कापाड न्हेसलेली ” पण जर त्यावेळी नट्या आत असतील तर तो माणूस आत जाऊन सांगे, “भायर् कलंबयवाडकरी बापये नटयो बगूक इले हत......” मग कोणतरी जाणता नट्याना सांगे जावा ग्ये बाय, जरा भायर् उब्यो ऱ्हावन् येवा.” नी दोन्ही नट्या बाहेर जाऊन उभ्या रहात.
नाटकाच्या दिवशी संध्याकाळ पासून झाडून सगळे पावणे रावळे जमायला लागले. गावात प्रत्येक घरात पंधरा-पंधरा; वीस- वीस पाहुणे जमलेले. नाटक हायस्कूलच्या पटांगणात व्हायचं होतं. दुपार नंतर पडदे बांधायला सुरुवात झाली. सहा तासानंतरच्या सुटीत सगळ्या पोरानी स्टेज भोवती नुसता गिल्ला केला. त्यांच्या कालव्यात काम करणाऱ्याना काम करायलाही सुधरेना. त्या गोंधळात सुट्र्र संपल्याचा गजर ऐकू आला नाही नी पोरे तिथेच रेंगाळत राहिलेली. पाच मिनीटानी गोविंद प्यूनच्या लक्षात ही गोष्ट लक्षात आल्यावर त्याने सराना सांगितलं नी पी.टी च्या सरानी बाहेर येवून जोरात व्हिसल वाजवल्यावर पोरं भानावर आली. गोंगाट बंद झाला नी पोरं धूम पळत सुटली. त्यानंतर ज्या वर्गांचे खेळाचे तास होते त्यानाही सरानी वर्गातच डांबून ठेवलेनी. शाळा सुटल्यावर कर्ण्यावर गाणी वाजायला लागली. लाउडस्पिकर त्यावेळी आम्ही पहिल्यानेच बघितला. राजकुमार, संगम अशा त्यावेळच्या पिक्चरांमधली हिंदी गाणी आम्ही प्रथमच ऐकत होतो. बाहेर गावची पोरं निघून गेली पण गावातली यच्चयावत् सगळी पोरं खूप उशिरापर्यंत गाणी ऐकत तिथेच रेंगाळत थांबलेली.
रात्री बरीच गर्दी झालेली. त्यावेळी प्रथमच बाहेर गावानी बोर्ड लावलेले होते, शिवाय हायस्कूलला तीन चार गावची मुलं येत असल्यामुळे बातमी सगळीकडे पसरलेली. त्याहीपेक्षा मुंबय वाल्यानी नट्या आणलेनी ह्याचं लोकाना भारी अप्रूप..... खेचाखेच गर्दी लोटली ती नट्यांमुळे. तालमी वगैरे घेवून नीत बसवलेलं नाटक, शिवाय आदल्या रात्री स्टेजवर रंगीत तालिमही झालेली. तरी नशिब रंगित तालमीची गंधवार्ताही नाटकातल्या पार्ट्यांच्या घरच्या माणसानासुद्धा लागू दिलेली नव्हती. नाटक अगदी झोकात झालं. गेला दिलवर कुणीकडे/ माझ्या जाल्यात घावलाय् मासा / मेरे दिलपे छुरी चलाके या नाटकातल्या गाण्याना दोन दोन वन्समोअर मिळाले. पहिला अंक झाल्यावर कुणीतरी सुमन नाईक नटीला दहा रुपये बक्षिस जाहीर केलं. ते घ्यायला नटी स्वत: बाहेर स्टेजवर आली. निवेदकाने स्पीकरवर सांगितलं, पडेलचे प्रसिद्ध आंबा व्यापारी गुणाजी माळगवे यांच्यातर्फे सुमन नाईक याना दहा रुपये बक्षिस, नी वाकून सलाम करीत माळगवे शेठच्या हस्ते तिने नोट घेतली. झालं.... चार पैसे बाळगणाऱ्या आंबा व्यापाऱ्यानी एकामेकाच्या इर्ष्येने बक्षिसांचा नुस्ता पाऊस पाडला. मध्यंतरात संयोजकानी "रसिकाना नम्र विनंती आहे की त्यानी नट नट्यांना वैयक्तिक बक्षिसं न देता सर्व नटवर्गाला मिळून सामुहिक बक्षिसं द्यावी " अशी सूचनाही दिली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तिसरा अंक संपल्यावर तर स्टेज समोर सत्तर ऐंशी लोकांची हातात दोन -दोन तीन - तीन नोटा झळकवीत रांगच लागली. तेंव्हा मात्र संयोजकानी नावांची घोषणा करण बंद केलं. दोन्ही नट्या उभ्या राहिलेल्या नी ज्याला बक्षिस द्यायचं तो संबंधित नटीसमोर जावून नोट देई. त्या नाटकात नट्यानी जबर कामाई केली. ह्या नाटकाचाही महिनाभराने खामडोशीत तिकिट लावून खेळ झाला. तिथेही पैसेवाल्या भंडारी नी गाबीत रापणकारानी नट्यांवर पैशाचा पाऊस पाडला.
1960 ते 1970 च्या दशकात तर गावोगाव मराठी शाळांमध्ये सरस्वती पुजनाला, हायस्कुलांमध्ये गॅदरिंगला अगदी निरपवादपणे मुलांचे विविध गुण दर्शन कार्यक्रम, नाटके,एकांकिका सादर होत. मराठी शाळांच्या कार्यक्रमाला त्या गावातले नी हायस्कुलांच्या कार्यक्रमाना दोन तीन गावांच पब्लिक जमत असे. त्या काळात पुरळकरांचे वासुदेव बळवंत खूप गाजलं. धर्मवीर संभाजी नाटकातले 'बघून नवलाचा थाट मर्दाचा जाईल गगनांतरी खरच हो भुलेल माझ्यावरी॥ मी हापुस तू पायरी मी भवरा तू भिंगरी' हे गाणं त्यावेळी पोरासोरांच्या तोंडावर असायच. पडेलातले 'अंमलदार','दुरितांचे तिमीर जावो,' 'माझी जमिन' 'कवडी चुंबक' ही नाटकं लोकानी अक्षरश डोक्यावर उचललेनी! 'माझी जमिन' नाटकात भगवान तानवड्याने साखरचंद मारवाड्याचे काम केलेले. तो अक्षरशत्रू. पण आयकून आयकून त्याने संवाद तोंडपाट केलेले. "तुझ्या शेतात विहीर खणायला लागणारा सगळा पैशा मी तुला देते, आला ध्यानात?' या संवादात अस्सल मारवाडी लेहजा पकडीत शे'ता'त मध्ये ता चा 'टा' करून आणि आला ध्येनात चे ढेणात करून त्याने धमाल उडवून दिली. सोबतचा नटही खमक्या; साखरचंद मारवाड्याने दर वाक्यात 'आला ढेणात' म्हटले की समोरचा पार्टी 'हां हां इला माज्या ढेंगात' असा इरसाल प्रतिसाद देई. भगवानाने त्याच्या संवादात अध्ये मध्ये द्वर्थी शब्द प्रयोग घुसडून टाळ्यावर टाळ्या घेतल्या.
पुढच्या सीझनला कवडीचुंबक नाटकातले सावकाराचे काम ही भग्या वाण्याने केले. या वेळीही त्याचे काम भलतेच गाजले. मध्यंतरीच्या काळात कुणीतरी आठवले नाट्यमंडळ , प्रतिभा नाटक कंपनी, वसुदेव संगीत नाट्यमंडळ अशा कुणी कुणी कंपन्या एखादी जत्रा धरून येत. आटःअवल्ये कंपनीत म्हातारे बापू आठवले नी त्यांची बायको, तीन मुलगे सुना नी दोन लेकी जावई असा घरच्या पार्ट्यांचा भरणा. गरजेला कुणी मुली सुना फेटे पटके बांधून घोगरा आवाज काढून असे काम करीत की दर्दी प्रेक्षकालाही ही बाई पुरुषाचा रोल करतेय् हे उमगू येत नसे. नाटकात ऑर्गन आठवल्यांचा जावई नी त्याचा रोल असे तेंव्हा म्हातारी आठईवली वाजवी. तबल्याची साथही मुलगे जावई आलटून पालटून करीत. हा लोकांच्या कौतुकाचा विषय होता. ऐतिहासिक नाटकांमध्ये गावतल्या होशी कलाकाराना नाटक कंपन्या लहान मोठे रोल देत. एकच प्याला, सौभद्र या नाटकांचा खेळ होई तेव्हा पुरळचे आप्पा गोडसे हमखास थराविक पार्ट करीत. जत्रेत मोफ़त प्रयोग करीत. अर्थात देवस्थानतर्फे काहीना काही रक्कम मिळे. शिवाय जत्रेतल्या नाटकात कुणी ना कुणी देव स्टेजवर हटकून आणला जात असे. त्याच्या पाया पडायला बायाबापड्या जात नी रुपया आठ आणे फेकीत. तसेच गावातल्या एखाद्या धनिकाची पन्नास रुपयाची नोट घ्यायला देव पुढे येई नी मग पैसेवाले हिरिरीने पन्नास शंभर रुपये देत. जनाबाईसोबत दळण दळणारा विठोबा चांगली कमाई करून जाई. जत्रेतला खेळ झाल्यावर मग कंपनी आणखी पाच सहा गावात दौरे करी. थोडी दुर्गम एकवशी असलेली गावं जिथे एस्टी जात नसे अशा गावानी नाटकवाल्यांचा जबरदस्त धंदा होई. या कंपन्यांचा तर खामडोशीत पंधरा दिवस, पाउण महिना मुक्काम पडे. गावकरी देवीच्या फंडातून त्याना मोफत शिधा देत, ताजी मासळीही मोफत मिळे. कंपन्या तिथे दहा बारा नाटकांचे खेळ करीत, नी जबर गल्ला ओढीत. कोणत्याही नाटक कंपनीचा मुटाट दौरा असला की त्यांच्या तीन चार दिवसांच्या मुक्कामात दुवक्त सुग्रास भोजनाची मोफत व्यवस्था जयराम भाऊ घाटे करीत. खामडोशीतही गाबीत समाजाच्या बायका नाटकवाल्यांचा मुक्काम असेतो आळीपाळीने पावणाईच्या धर्मशाळेत नी मासे असतील तेंव्हा तिरकोणात चुली पेटवून चमचमीत जेवण रांधून घालीत. नाटक मंडळींचे दौरे बंद हो ईतो या प्रथेत खंड पडला नाही.
आता गावागानी जसे नाटकांचे पीकच यायला लागले. इतर करमणूकीचे रेडिओ शिवाय काहीच साधन नसल्यामुळे मैलोनगणती तंगडतोड करीत लोकं नाटक बघायला भाऊगर्दी करीत. मुटाटातले गारंबीचा बापू, वाड्यातले घराबाहेर, फ़णशातले कठोर माया , तिर्लोटकरांचे देव्हारा, 'करीन ती पूर्व' ही काही नाटके जुने जाणते आजही नावाजतात. कोळोशीतले 'आयुष्याचा खेळ" हे नाटक वेगळ्या संदर्भात लोकांच्या लक्षात राहिले. या नाटकात भालु घाट्याने हिरोचे काम केलेले. स्टेज समोर उसळलेली प्रेक्षकांची गर्दी विंगेतून बघून त्याच्या टिरी कापल्या. तो सोबतच्या पार्ट्याना म्हणाला, 'माका कापरी भरली, माजा भाषानच इसारलय.' मग त्याला धीर यावा, दडस दूर व्हावी म्हणून त्याला दोन घोट गावठी हातभट्टीची दारू पाजलेनी. मग मात्र त्याची दडस गेली. तिसऱ्या अंका पूर्वी त्याने पुन्हा दोन घोट मारले. नाटक चांगले झाले. पण भालुला दारूचे व्यसन लागले. तो ठासबंद बेवडा झाला. घरदार उध्वस्त झाले. तीन पोराना घेवून बायकोमाहेरी गेली. सगळे विकून भालु कफल्लक झाला. शेवटी काहीच नाही तर घरातल्या देव्हाऱ्यातले पितळेचे देव भांडीवाल्याकडे मोडीत घालायला घेवून गेला. अर्थात भांडीवाले देव मोडीत घ्यायला तयार होईनात म्हणताना एस्टी कॅन्टीन समोर टाकलेन ते बरेच दिवस तिथेच होते. पुढे कोणीतरी ते उचलून गावात रवळनाथाच्या देवळात नेवून ठेवले. भालु भिक मागून जगायचा. एक दिवस असाच चव्हाठ्यावर टेकला तिथेच थंड झाला. आयुष्याचा खेळ नाटकामुळे भालु घाट्याचे आयुष्य उश्वस्त झाले म्हणून ते नाटक लोकांच्या लक्षात राहिले.
चौसष्ट सालानंतर टूरिंग टॉकिज यायला लागल्या नी सार्वजनिक नाटकांचं लोण बरचसं थंडावलं. बापू वेलणकरांची प्रदीप टूरिंग टॉकिज गिर्ये, पुरळ, पडेल, वाडा, देवगड, कट्टा या गावानी दोन - तीन मुक्काम करीत शिवरात्रीचा मोका धरून कुणकेश्वर नी तिथून पुढे सिझनभर कणकवली, फोंडा दौरा करी. आता नाटकांचा भर बराच कमी झालेला. तरीही त्या पडत्या काळात बळीघाडी गुरुजींच्या "कलीचा संचार" नाटकाला मोठी गर्दी जमलेली. त्या नाटकाला आमच्या वर्गातले कृष्णा सुतार नी नववीतला श्रीकांत वारीक ह्यानी स्त्री पार्ट केलेला. नाटक झाल्यावर काही लोक नाक मुरडीत म्हणाले,"नाटाक हेरी चांगला, पन त्या शिरकानाचो स्त्री पार्ट ; लगीन न झालेला प्वार पन दिसा चार पोराच्या आवशी एवडा..." गावातल्या वाड्या- वाड्यांमधून होणाऱ्या सार्वजनिक पूजाना आणि गावातल्या देवस्थानात उत्सवाला भजनानी जोर धरला. दोन बुवांचा भजनी सामना ऐकायला अफाट गर्दी लोटायची. त्याच दरम्याने देवगडला अधून मधून कंपनीची नाटकं यायला लागली. आता गावात क्वचित कोणी हौशी तरुणानी नाटक बसवलंच नी त्यात नटी आणलेली असली तरच नाटकाला बऱ्यापैकी गर्दी होई. दोन अंकांच्या दरम्याने नटीचा रेकॉर्ड डान्स ठेवायचा हा जणु अलिखित नियमच होता म्हणाना. नटींने जरा मादक हावभाव करीत डान्स केला तर मग गुलहौशी पोर नोटा फेकित. मात्र सामसुमार नाटकाना लोकं गर्दी करीनाशी झालेली. शाळांमधल्या कार्यक्रमांमध्येही नाटक, एकांकिकांचं प्रस्थ कमी झालेलं. त्याऐवजी प्रसिद्ध हिंदी मराठी चित्रपटातल्या गाण्यांच्या रेकॉर्ड वाजवून पोरं पोरी नाच करून दाखवीत. हा प्रकार पुढे रेकॉर्ड डान्स नावाने भलताच बोकाळला. पण जवळ जवळ दोन दशकं पछाडणारं नाटकांच वेड सर्वर्थाने मोडीत निघालं ते एकोणसत्तर साली. त्यावर्षी आमच्या तानवडे वाडीत होणाऱ्या मांडावरच्या सार्वजनिक पूजेला वाणी मंडळीनी प्रथमच पडद्यावरचा पिक्चर आणला. त्यावेळी लाईटही आलेले नव्हते. पण पेट्रोलवर चालणारे जनरेटर आणलेले होते. पूजेच्या आदल्या रात्री फक्त गाववाल्यांसाठी नरवीर तानाजी हा चित्रपट मोठ्याना आठ आणे नी मुलाना चार आणे तिकीटावर लावलेनी. दुसरे दिवशी पूजेला "थांब लक्ष्मी कुंकू लावते" हा चित्रपट पडद्यावर लावण्यात आला. या खेळाला मात्र आजूबाजूच्या गावातून एवढं पब्लिक जमलं की एकंदर रागरंग पाहता मांडावर जागा पुरणार नाही म्हणून आयत्या वेळी वाडी बाहेर मोकळ्या शेत मळ्यांमध्ये पडदा लावावा लागला.
पिक्चर लोकाना भलताच आवडला. तरीही आड खेड्यातली हौशी लोकं काहीतरी मोका साधून नाटकं बसवीत. ऐंशी सालच्या दरम्याने 'माझा कुणा म्हणू मी' नाटकात त्याकाळी एक्स्ट्रा म्हणून गाजलेली आशू नटी जबर मेहेनताना देवून आणलेली. त्या नाटकाला आशू नावामुळे अफाट गर्दी झालेली. नाटकात दोन हिरो, एकाचा रोल बाळू इनामदाराने केलेला. त्याने भावाच्या नकळत परस्पर कलमे गःहाण टाकून उचल घेऊन आशूची जबर फी भागवली. नाटक झाल्यावर आठवडाभराने व्यापारी कलमांवर फवारणी करायला आला तेंव्हा बाळ्याचे बिंग फुटले. नाटकाचा पहिला अंक झाल्यावर खान मास्तर धीर करून मागे रंगपटात गेला. आशूची तारीफ करून त्याने 500रुपये बक्षिस दिले. नोटा घेवून त्या इरसाल नटीने खानमास्तराशी शेक हॅण्ड केला नी त्याला जवळ बसवून घेतले. त्याने बाहेर गेल्यावर ही गोष्ट प्रसृत केली.
दुसऱ्या तिसऱ्या अंकानंतर आणि ज्याना उशिरा कळले त्यानी नाटक संपल्यावरही आशूला भेटून 500 रुपये देवून शेक हॅण्ड करायचा चान्स मारला. नोट नाचवीत गेलेल्या माणसाला गोड हसून ' या शेठ' म्हणून ती शेकहॅण्ड करीत जवळ बसवून घेई.आशूला तिच्या फीच्या दसपट रक्कम बक्षिसा दाखल किंबहूना शेकहॅण्ड केल्याच्या मोबदल्यात मिळाली. त्या नाटकात दुसऱ्या हिरोचे काम करणारा दिप्या मिठबावकरअगदीच सो सो.....त्याचा आवाज आधीच चिरका.....त्यात आशूच्या धडाकेबाज अभिनयामुळे तो एवढा गर्भगळित झालेला की संवाद विसरे नी प्रॉम्प्टिंग ऐकायला स्टेजवर मागे मागे जाई. आशू प्रेमभरे संवाद म्हणत जवळ येवून 'प्राणनाथा' म्हणून तिने गळ्यात हात टाकल्यावर तर दिप्या लटलटायला लागला. लोकानी टाळ्यांचा नुसता कडकडाट केला. दिप्याची भंबेरी उडाली तरी सोबतचे इतर पार्टी आणि आशू ह्यानी कसेबसे नाटक रेटून नेले. त्यानंतर मात्र नाटकांची प्रथा पूर्णच मोडीत निघाली आणि पडद्यावरच्या चित्रपटांचा नवा जमाना सुरू झाला.

※ ※ ※ ※ ※