इंग्रजीची गजाल श्रीराम विनायक काळे द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इंग्रजीची गजाल

इंग्रजीची गजाल

सोशालॉजीच्या चव्हाण सरांच लेक्चर सुरु झाल्यावर पंधरा मिनीटानी प्यून शिंदे लेक्चर हॉल बाहेर आला. “यसकुज मी, सर ” म्हणून आत आल्यावर “मिश्टर बापट श्टुडंट, युवर रजिष्टर कमिंग. पोश्ट्म्यान वेटिंग, डुइंग शिग्नेचर टेक लेटर अर्जंट.” आमच्या कॉलेजचे प्राचार्य ख्रिश्चन असल्यामुळे सगळा व्यवहार इंग्रजीतून चालायचा. शिंदे प्युन जेमतेम सही करण्यापुरतं शिकलेला, पण सरावाने तोही उभं आडवं कसही इंग्रजी फाडायचा. प्रत्येक क्रियापदाला आयएन्जी लावून बोलायचं ही त्याची खास लकब होती. पोस्टमन दुपारी बाराच्या दरम्याने कॉलेजचं टपाल आणायचा. प्रशिक्षणार्थींची साधी पत्रं प्यून लोक ऑफिसच्या नोटिस बोर्डवर लावीत. क्वचित कोणाची मनिऑर्डर किंवा रजिस्टर आलं तर कॉलेजचा प्यून संबंधिताला बोलवायला येत असे. आमच्या गावापासून 10/12 मैल दूर खाडी पलिकडे राजापुर तालुक्यातल्या जुवाटी गावच्या माध्यमिक शाळेचा शिक्का असलेलं ते पत्र बघून मला आश्चर्यच वाटलं. मी उत्सुकतेने लिफाफा फोडला.
हायस्कूलच्या मुख्याध्यापकानी नवीन वर्षी त्यांच्या शाळेत इंग्रजी शिक्षक म्हणून मला ऑफर दिली होती. बावीस शिक्षक असलेल्या त्यांच्या स्टाफवर इंग्रजी चा पदवीधर नव्हता. त्यावेळी इंग्लिश आणि मॅथ्स विषयाची माणसं दुर्मिळ असायची. मी इंग्लिश प्रिंसिपल घेवून बी.ए. झालोय ही माहिती त्याना कुठून कशी समजली देव जाणे. पत्रात आणखीही एक ऑफर त्यानी दिलेली. संस्था मला परतफेडीच्या बोलीने लागेल तितकी आर्थिक मदत करायला तयार होती. पत्र आलं ती तारीख होती सतरा डिसेंबर. मी बी.एड.ला येण्यापूर्वी दहा महिने देवगड तालुक्यात मुणगे हायस्कूलला होतो. त्या वेळी अत्यंत काटकसरीत माझा दरमहाचा खर्च भागवून सोळाशे रुपये शिलकीला होते. मला मुंबईत सरकारी कॉलेजला ऍडमिशन मिळाल्यामुळे फी माफ होती. मात्र होस्टेल, मेस आणि इतर खर्च वर्षभर भागवण्याइतकीही पुरेशी पुंजी माझ्याकडे नव्हती.वडिल सेवा निवृत्त शिक्षक, त्याना एकशे नव्वद रुपये तुटपुंजी पेन्शन मिळायची. पण माझे काका आणि लग्न झालेली मोठी बहीण पुष्पा ताई यानी पाठबळ दिल्यामुळे मी निर्धास्त होतो. आज मितीला पुढच्या महिन्याची मेस जेमेतेम भागेल इतकी एकशे अठरा रुपये रक्कम शिलकी असताना देवासारखे जुवाटीचे हेडमास्तर माझ्या सहाय्याला आले. मी नाताळ सुटीत भेट घेतो, आर्थिक मदतीची गरज आहे, समक्ष भेटीत बोलेन, असं मी उलट टपाली कळवलं.
तेवीस डिसेंबरला शनिवारी अर्धवेळ कॉलेज करून संध्याकाळच्या गाडीने मी घरी गेलो. जुवाटीच्या हेडमास्तरांचे घरच्या पत्त्यावर पोस्ट कार्‍ड पत्र आलेले होते. त्यानी अठ्ठावीस तारखेला मला भेटायला बोलावले होते . आई अण्णाना खूपच आनंद झालेला. कोणापुढे हात न पसरता माझ्या पतीवर नोकरीची हमी आणि अर्थ सहाय्य..... साक्षात देवाचीच कृपा! ठरल्या दिवशी सकाळच्या गाडीने मी आणि अण्णा निघालो. विजयदुर्ग हून तरळा, कणकवली , कोल्हापुर आणि रत्नागिरी जाणाऱ्या कोणत्याही गाडीने वाघोटणला उतरून होडीने खाडी पलिकडे गेल्यावर जेमेतेम दहा मिनिटांत हायस्कूल गाठता येई. आम्ही साडेआठला हेडमास्तर पुजारी सरांच्या बिऱ्हाडी पोहोचलो. सरांच्या मिसेस पुष्पाताईच्या बी. एड. क्लासमेट. त्याही हायस्कूलला नोकरी करायच्या. त्यानी माहेरच्या माणसांसारखे आमचे स्वागत केले. चहा नाष्टा करून दहा वाजता मी सरांबरोबर हायस्कूलला गेलो.संस्थेचे चेअरमन भाऊ देसाई आल्यावर सरानी त्यांच्याशी परिचय करून दिल्यावर मला किती रक्कम पाहिजे ? अशी सरानी विचारणा केली. पुढच्या तीन महिन्यांसाठी मला पाचशे रुपये हवे होते. सरानी विनाव्याज उसनवार अशा आशयाची सहाशे रुपयाची पावती घेवून सहाशे रुपये मला दिले.
माझी इच्छा असेल तर दहावी एस. एस. सी. च्या वर्गांवर पत्र लेखना संदर्भात तास दोन तास मार्गदर्शन करण्याची विनंती सरानी केली. मी आनंदाने होकार दिला. प्रार्थनेच्या वेळी येत्या जून पासून हायस्कूलला मिळालेले स्पेशल इंग्रजीचे शिक्षक असा माझा परिचय करून दिला. दहावीच्या दोन्ही तुकड्यांची मुले कॉमन हॉल मध्ये बसवून मी लेटर रायटिंग वर लेसन सुरु केला. स्वत: हेडमास्तर , चेअरमन आणि स्टाफ वरचे दोन तीन शिक्षक तास बघायला निघालेले बघून पुजारी मॅडम म्हणाल्या, “ इतकी सगळी फौज बघून सराना अवघडायला होईल. तेंव्हा सगळ्यानी वर्ग़ात न बसता बाहेरून ऐका.” त्यावर मी म्हणालो कि, “मला सवय आहे, लेसनच्या वेळी निरिक्षक प्राध्यापक, सराव शाळेतले स्टाफ मेंबर आणि आमचे सहाध्यायी अशी दहा बारा निरिक्षकांची फौज असते. माझ्यावर दडपण येणार नाही . सर्वाना खुशालपणी बसू देत.”
इंग्रजी आणि मराठी संमिश्र वापर करीत मी इन्फॉर्मल लेटर लिहिण्याचे तंत्र हळू हळू उलगडित गेलो. सलग दोन पिरियड झाल्यावर मधली सुट्टी झाली. निरिक्षण करायला बसलेली बुजुर्ग मंडळी जाम खुश झालेली. सर्वानी मुक्तकंठाने स्तुती सुमनांचा वर्षाव केला. इतक्या सर्व लोकांसमोर कसलेही दडपण न घेता मी मोकळेपणी शिकवले याचे भलतेच अप्रूप वाटले सर्वाना. मी अत्यंत कौशल्याने पत्र लेखनाचे अवघड तंत्र मुलाना समजावून दिले ही गोष्ट सगळ्यानी एकमुखाने मान्य केली. या कौतुकाच्या माऱ्याने मी अगदी अवघडून गेलो. चहा झाल्यावर मी पुन्हा वर्गावर जावून मुलांकडून दोन तीन विषयांवर पत्र लेखनाचा सराव करून घेतला. मी तास पूर्ण करून स्टाफरूम मध्ये परत आल्यावर माझी हरकत नसेल तर पुढचे दोन तीन दिवस थांबून प्रश्नपत्रिकेतल्या ट्रान्स्फॉर्मेशनच्या भागाची थोडी तयारी करून घ्यायची हेड मास्तर आणि संबंधित विषयाचे शिक्षक यानीही गळ घातली. मी रहाण्याच्या तयारीने गेलेलो नव्हतो. दुसरे दिवशी परत यायचं कबूल करून संध्याकाळी मी आणि अण्णा घरी गेलो.
दुसरे दिवशी दोन तीन दिवस रहायच्या तयारीने मी पुन्हा जुवाटीला गेलो. त्या दिवशी सलग आठ पिरियड मी जुन्या प्रश्न पत्रिकांमधल्या ट्रान्स्फॉर्मेशनच्या वाक्यांचा सराव करून घेतला. नंतरचे दोन दिवस डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच हा प्रश्नपत्रिकेत सहा मार्कांसाठी असलेला भाग, त्यातले स्टेटमेंट आणि प्रश्नार्थक वाक्ये हे दोन प्रकार घटवून घेतले. सत्तर मुलांपैकी पंधरासोळा मुलाना बिनचूक जमायला लागले. तीन दिवस कसे गेले कळलंच नाही. हेडसर तर भलतेच खूष झाले. मी तीन दिवस घेतलेल्या कष्टांचा भरभक्कम मोबदला शंभर रुपये मी नको नको म्हणत असतानाही सरानी मला घ्यायला लावला. एप्रिल मध्ये विद्यापीठाची परीक्षा देवून गावी आल्यावर नववीतुन दहावीत जाणाऱ्या मुलांसाठी मे महिन्यात जादा वर्ग घ्यायला यायची गळ सरानी घातली. “त्या साठी योग्य मोबदला संस्था देईल” असं ते बोलले. केवळ इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचा दहावीचा निकाल कमी लागायचा. किंबहूना इंग्रजी आणि गणित या विषयांचा जेवढा निकाल तेवढा शाळेचा निकाल असे समिकरण असल्याची खंत त्यानी व्यक्त केली. माझी आर्थिक चिंता मिटली आणि नोकरी पक्की झाली या आनंदावर तरंगतच मी नाताळ सुटी संपवून मुंबईत कॉलेजमध्ये रुजु झालो. साधारण पंधरा दिवसानी पुजारी सरांचे पत्र यायचे. दर पत्रात दहावीची मुले तुमची आठवण काढतात , आर्थिक मदत पाहिजे असेल तर नि:संकोच कळवा ही वाक्ये हुकमी असायची.
अप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आमची वार्षिक परीक्षा झाली आणि बी. एड . पूर्ण करून चंबू गबाळं आवरून मी घर गाठले. दहा बारा दिवस आराम केल्यावर जुवाटीला जावून पुजारी सरांची भेट घेतली. माझ्यासाठी सरांच्या बिऱ्हाडापासून जवळच दाजी सोनारांच्या घराला लागून त्यांच्या गणपतीच्या शाळेत दोन ऐसपैस खोल्या ठरवलेल्या होत्या. मागच्या बाजूला पडवीत आंघोळीसाठी बंदिस्त बाथरूम बनवून घेतलेले होते. दाजी आणि त्यांचे दोन भाऊ यांची चार शाळकरी मुलं मुली असल्यामुळे त्यानी मुद्दाम आपल्या घरात माझी व्यवस्था बिना मोबदला करून दिली. त्यांच्या शाळकरी मुलांकडे मी लक्ष द्यावे अशी अपेक्षा दाजीनी बोलून दाखवली. “ हे बघा बापट सर, आम्हांस भाड्याच्या पैशाची काय्येक गरज नाय. आम्ही तिन्ही भाऊ सोनार काम करून मिळवतो ते खायस सुद्धा फावत नाय इतके काम असते आमच्याकडे. जरा मुलांवर तुमचे लक्ष राहिले नी पोरें दहावी उद्धरली तर तुमचे मोठे उपकार होतील.... आम्ही शिकलो नाय पण तुमच्या सावलीत मुले शिकून मोठी व्हावी एवढीच आमची अपेक्षा. तुम्ही ब्राह्मण..... आमच्याकडचे जेवण खाण तुम्हास पटेल न पटेल ... पण कधि काहीही लागलें सवरलें तर हक्काने सांगा... !” सोनारांकडच्या आतिथ्याने मी अक्षरश: भारावून गेलो. एक मे रोजी वार्षिक परीक्षेचे रिझल्ट लागल्यावर दोन दिवसानी दहावी चे जादा तास सुरु करायचे ठरले. मी तीन तारखेला बिऱ्हाडाचे सामान घेवून जुवाटीला यायचा वायदा केला.
तीन मे च्या दिवशी जेवणाची भांडी, स्टोव्ह आणि अंथरूण पांघरूण असे चार बोजे घेवून अण्णा , आई , मी आणि आमच्या घसणीतला गडी भानु पुजारी सकाळच्या रत्नागिरी टपाल गाडीने वाघोटणला उतरलो. होडीवाल्याला बहुतेक पूर्वसुचना दिलेली असावी. भानूने सामानाचे बोजे ठेवल्यावर होडीवाल्याने पलिकडच्या दिशेने तोंड करून , “होय्यतSSS होय्यत .... सर इले हत ...” असे कुकारे घातले. होडी पलिकडच्या काठावर पोहोचली तेंव्हा दाजी सोनार नी त्यांचे दोन्ही भाऊ दोन गडी घेवून हजर होते. शिवाय शाळेचे दोन शिपाई सुद्धा हजर होते. आमच्या हात पिशव्यासुद्धा माणसानी आम्हाला घेवू दिल्या नाहीत. आम्ही दाजींच्या घरी गेलो. खोलीची जमिन लक्ख सारवून चुन्याची सुंदर रांगोळी काढलेली होती. मला झोपण्यासाठी दाजीनी आपल्या कडची लोखंडी कॉट आणि गादी, उशी, नवीन बेडशीट आणि सोलापुरी चादर ठेवलेली. लाकडी टेबल, दोन खुर्च्या आणि एक चटई दादा देसाईनी कालच आणून ठेवल्या आहेत असं दाजी बोलले. सगळ्यांसाठी चहा आणि बिस्किट पुडे आले. आमचा चहा होईतो दादा देसाई आणि देसाईN काकू दोघही आले. दुपारी जेवायला देसाईंकडेच जायचे होते. दरम्याने आम्ही पुजारी सरांकडे गेलो.
दुपारी जेवून बिऱ्हाडी आल्यावर आईने आणलेले बोजे सोडून सामान लावले. मदतीला तीन्ही सोनारीण काकू - मोठ्या माई. मधल्या सरिता काकी आणि धाकट्या राधा काकी होत्या. आम्ही रात्री जेवायला पुजारी सरांकडे गेलो. आम्ही सकाळी उठल्यावर तोंड धुवून होईस्तोवर माई चहा घेवून आल्या. चहा घेत असता माई म्हणाल्या, “तुम्हाला आमचे सोनारांकडचे खाणे चालत असेल तर फोडणीचे फोवे नाष्ट्याला आणते ” त्यावर आई बोलली, “आम्ही जातीभेद मानीत नाही. तुम्ही तर दैवज्ञ ब्राह्मण, आमची काहीही हरकत नाही.” आमच्या आंघोळी उरकल्यावर नाष्टा करून आई अण्णा घरी जायला बाहेर पडले. माईनी आईला आपल्या घरात नेवून तिची ओटी भरली. दाजींसह घरातल्या सर्वानी आई अण्णाना नमस्कार केला. दाजी समक्ष त्याना तरी पलिकडे जावून विजयदुर्ग गाडीत बसवून आले.
मला दोन्ही वेळचा डबा दादा देसाईंच्या घरून आणि सकाळचा चहा. नाष्टा, शाळेतून आल्यावर चहा खाणं दाजींच्या घरातून देत. माई किंवा त्यांच्या दोन्ही जावांपैकी कुणीतरी समक्ष येवून मला चहा खाणं आणून देत. सकाळी दहा ते संध्याकाळी चार दहावीच्या बॅचचे जादा वर्ग सुरु झाले. दुपारी एक ते दोन जेवणाची सुटी असे. मुलं डबे घेवून येत. देसाईंचं घर जवळच असल्यामुळे मी त्यांच्या घरीच जेवायला जाई. क्लास सुरू झाले आणि दोन दिवसानी सर आणि मॅडम गावी गेले. क्लास सुटल्यावर घरी गेलो की मी बिऱ्हाडी न जाता दाजी नी त्यांचे दोन्ही भाऊ ओटीवर सोनार काम करीत तिथेच बसत असे. चहा खाणं झाल्यावर रात्री जेवण वेळे पर्यंत मी ओटीवर रेडिओ लावून ऐकत बसे. कधी तरी बंदरावर किंवा गावात , देवळात चक्कर मारीत असे त्या वेळी सुरुवातीला दाजी, बापू किंवा भाईं पैकी कुणीतरी सोबत येत. थोड्या दिवसानंतर मी त्यांचे मुलगे राजू - प्रसाद याना घेवून जायला लागलो. रविवारी क्लास बंद ठेवून मी घरी जावून येत असे.
सात जूनला शाळा सुरु व्हायची होती, तीन जूनला क्लास बंद करून सरानी मला घरी जावून यायला सांगितले. मी महिनाभर केलेल्या कामाचे मानधन म्हणून 400 रुपये पुजारीसरनी मला दिले. मी संस्थेकडून उचल घेतली होती त्याची परतफेड म्हणून सगळी रक्कम मी परत केली. पण सर म्हणाले की, तुमचे ॲप्रूव्हल होवून रितसर पगार सुरू झाला की नंतर सावकाशपणे मासिक हप्तेबंदिने परतफेड करा. पहिली कमाई खिशात टाकून मी आनंदात बाहेर पडलो. दादांच्या घरी जावून मी सहा तारीख पर्यंत घरी जात असल्याचे सांगून महिनाभरची खानावळ घेण्याची पृच्छा केली. त्यावर दादा म्हणाले, “तुम्ही आमच्या मुलांसाठी महिनाभर कष्ट घेतलात. आम्ही तुमच्यासाठी वेगळं काहीच केलेलं नाही. आम्ही पाच जणं जेवलो त्यात सहावे तुम्ही....आज आधी तुम्ही घरी जा. शाळा सुरु झाली की महिनाभरानंतर तुमची मान्यता आली, नियमित पगार सुरु झाले की नंतर हिशोब करुया.”
सात जूनला शाळा सुरु झाली. माझ्याकडे दहावीच्या दोन आणि नववीच्या दोन तुकड्यांचे इंग्रजी आणि 9 अ ची क्लास टिचरशिप आली. शाळा सुरु झाल्यावर आठवडाभरातच रत्नागिरीला दहावीच्या इंग्रजी शिक्षकांसाठी दहा दिवसांच्या वर्कशॉपचं परिपत्रक आलं. मी कृतीसत्रासाठी रत्नागिरीला दाखल झालो. मंडणगड ते बांदा सगळ्या हायस्कूल मधले सुमारे सत्तर लोक आलेले होते. आरंभी परिचय सत्रात एक गोष्ट लक्षात आली की, एवढ्या लोकांमध्ये इंग्रजीचे पदवीधर फक्त आठच होते. अर्थात बहुसंख्य शिक्षक इंग्रजीचे पदवीधर नसले तरी त्यांच्याकडे वीस- बावीस वर्षं अध्यापनाचा अनुभव होता. संयोजकानी आमचे दहा गट पाडले. माझ्या गटात देवरुखचे भागवत, दापोलीचे नरवणे, पालीचे बोरकर आणि बांद्याचे नाडकर्णी ही वयोवृध्द मंडळी होती. बाकी आजीवलीचे मलुष्टे, वैभववाडीचे रावराणे हे पाच सहा वर्ष सेवा झालेले अन मी पूर्ण अननुभवी. मला जरा दडपण आलं पण सिनियर मंडळी मनमिळावू असल्यामुळे आमचा ग्रूप चांगला जमला. बुजुर्ग मंडळींकडून मला अध्यापनातली खूप तंत्र नी मख्ख्या आकळल्या. मुलांकडून नेमेका सराव कसा करून घ्यायचा ही दृष्टी गटातल्या बुजुर्गानी मला दिली. गटातर्फे सादरीकरण असे तेंव्हा सगळे जण मलाच पुढे करीत असत त्यामुळे माझा आत्मविश्वास अधिकच वाढला.
वर्कशॉप उरकून मी शाळेत हजर झालो नी दुसऱ्याच दिवशी दहावीचा बोर्डाचा निकाल जाहीर झाला. इंग्रजीत 68 पैकी 13 मुलं पास झाली, तेवढाच 19% शाळेचाही निकाल ठरला. 7 मुलं ज्याना इंग्रजीत 20 ते 25 गुण मिळाले त्याना आणखी5ते 7 गुण वाढीव मिळाले असते तर मॉडरेशन मध्ये त्याना28 ते 30 गुणांचे 35 गुण देवून पास करण्यात आले असते आणि शाळेचा निकालही 30% लागला असता. 20% पेक्षा कमी निकाल असलेल्या शाळाना शिक्षण विभागाकडून सतत टोचणी सहन करावी लागे. अनुत्तीर्ण मुलांमध्ये दाजी सोनारांची मुलगी सुशिला होती. तिचे गुणपत्रक घरी नेवून द्यायची कटू कामगिरी नाईलाजाने मला पार पडावी लागली. घरी जावून दाजींकडे मार्कलिस्ट देण्यापूर्वीच सुशा 'नपास' झाल्याचे वृत्त कळल्यामुळे रडारड सुरु होती. तिला 25 गुण मिळाले..... नशिबाने आणखी चार -पाच मार्क मिळते असते तर 30 चे 35 करून ती पास होणार असती. तसेही तिला 56% म्हणजे चांगले मार्क आहेत.अशी सारवा सारवी मी केली. दाजी उद्वेगाने म्हणाले, “सर, आपलांच नाणां बद्द.... भंडाऱ्याचा चंपू, गाबताचा रेखा पास झालाच ना?”
विषय थांबवण्यासाठी मी म्हणालो, “दाजी , हा सगळा नशिबाचा भाग आहे. तुम्ही नावं घेतलात त्या दोघीना फक्त 35 गुण मिळालेत नी त्यांना टक्केवारीत बेचाळीस त्रेचाळीस टक्के मार्कच आहेत. ते जावूदे ...... उद्यापासून मी सुशाची शिकवणी सुरु करतो. ऑक्टोबर मध्ये ती 50% गुण मिळवून ती सगळ्याना पेढे वाटील . हे माझे शब्द आज लिहून ठेवा. आता हा विषय इथेच बंद!” मग तो विषय तिथेच थांबला. दहा मिनिटानी माई चहा घेवून आल्या. “उद्यापासून सकाळी आठ ते नऊ सुशाची ट्युशन सुरु..... ” मी बोलल्यावर माई म्हणाल्या, “तुमी माज्या मनातलाच बोल्लात....पुढचे सा म्हयने पोरगी तुमच्या स्वाधीन..... देव करो नी तुमच्या कृपेन पोरगी माझी येसेस्सी होवूने.....” सुशाची ट्युशन सुरु झाली आणि आठवडाभरात आणखी सहा रिपिटर्स यात चार मुलगे आणि दोन मुली होत्या यायला लागले. मी पुस्तकातले निम्मी धडे आणि निम्मे कविता एवढाच पोर्शन घेतला. धडे कविता यांची सोप्या शब्दात नी मर्यादित ओळींमध्ये समरी लिहून काढली.
रोज एका पाठाची उजळणी त्यावरच्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा सराव मी देई. प्रश्न वाचून त्याची विधान रुपात मांडणी करायची नी त्यात उत्तराचा नेमका शब्द म्हणजे आन्सरवर्ड घालून बिनचूक उत्तर लिहिण्याचा सराव घेतला. ट्रान्सफॉर्मेशन आणि सिंथेसीस मधले सोपे प्रकार, पत्र लेखन यांची उजळणी करून घेतली. कॉम्प्रिहेन्शन ला दिलेला उतारा न वाचताच त्यावरच्या प्रश्नांचे विधानात रुपांतर करून मग उतारा वाचायचा नी त्यातून आन्सरवर्ड शोधून उत्तरे कशी पूर्ण करायची ही युक्ति शिकवली. दोनेक महिने हा सराव झाल्यावर पुढे ऑक्टोबर मध्ये पेपरला जाई पर्यंत रोज जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या. त्यावेळी इंग्रजीची पाच पानांची प्रश्न पत्रिका हातात आल्यावरच मुलं गर्भगळित व्हायची. पण प्रश्नपत्रिका सोडवायचा सराव झाल्यावर मुलांच्या मनातली भिती दूर झाली. मी माझ्या मुलांसाठी जो मर्यादित पोर्शन करून घेतला होता त्यावर आधारित दहा प्रश्नपत्रिका मी सेट केल्या. याकामी त्यांच्या सायक्लोस्टाईल प्रती सरानी शाळेच्या मार्फत काढून दिल्या. मी प्रत्येकाला वेगेवेगळी प्रश्नपत्रिका देत असे त्यामुळे एकमेकांशी चर्चा वगैरे प्रकार आपसूकच बंद झाले.
माझी सात मुलं ऑक्टोबर मध्ये पेपर देवून हसतमुखाने मला भेटायला आली. या परीक्षासत्रात रिपिटर्स असल्यामुळे पर्यवेक्षण लुज असे. कुणीही गैरप्रकार करायचा नाही, तुम्ही आपल्या प्रयत्नाने पास होणार अहात. पर्यवेक्षकानी सांगितले तरी आपल्याला त्यांचे न ऐकता आपल्याला बरोबर वाटते तेच उत्तर लिहायचे.असे मी बजावून ठेवले होते. माझ्या सांगण्याचे प्रत्यंतर मुलाना आले. प्रश्नपत्रिका वाचल्यावर आपल्याला यातला बराचसा भाग येतो आहे असा कॉन्फ़िडन्स माझ्या मुलाना वाटला. त्यानी शांतचित्ताने उत्तरे लिहिली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निकाल आला. माझे सातही विद्यार्थी पास झाले. सगळ्याना 44 ते 52 या रेंजमध्ये गुण मिळाले. सुशा 54 गुण मिळवून पहिली आली. माईनी रातोरात पेढे बनविले. दुसऱ्या दिवशी सकाळी लौकर आंघोळी उरकून सगळी मंडळी ओट्यावर जमल्यावर माईनी मला हाक मारली.
मी ओट्यावर माझ्या नेहमीच्या खुर्चीत बसल्यावर माई म्हणाल्या, “ मागच्या खेपी सुशाच्या मार्काचा कागद सरानी आणलेनी तेव्हा सर बोलले होते, की ऑक्टोबर मध्ये सुशा 50 मार्कानी पास होवून सगळ्याना पेढे वाटील. सरांचा शब्द खरा झाला.सुशाला 54 मार्क मिळाले ते सरांच्या आशिर्वादाने....सुशा सराना पहिला पेढा दे. ” सुशाने मुठ भरून पेढे दिले आणि मला नमस्कार करताना तिला आनंदाश्रू आवरले नाहीत.मी नको नको म्हणत असतानाही घरातली सगळी जणं माझ्या पाया पडली. दाजीनी 500 रुपयाचे पाकिट देवू केले ते मात्र मी निग्रह पूर्वक परत केले.“ मी इथे तुमच्या कुटुंबातलाच एक म्हणून रहातो. सगळ्याना माझ्याबद्दल जी आपुलकी आहे ती तशीच राहूदे. पैसे घेतले तर ती माझ्या कामाची ती किंमत झाली. त्या पेक्षा आपण बटाटे वड्याची पार्टी करुया.....”सगळ्यानी माझी सुचना उचलून धरली. ऑक्टोबर सत्रात सात रिपिटर्स पास झाल्यामुळे शाळेचा निकाल 29%झाला. आता शिक्षण विभागाचा ससेमिरा टळणार होता. प्रार्थनेच्या वेळी माझा पुष्पगुच्छ देवून सत्कार झाला.त्या नंतर सरानी शाळेच्या नोटिस बोर्डवर ठळक अक्षरात 1979 च्या एस.एस.सी.बॅचचा निकाल 29.41% अशी नोंद करून घेतली.
इंग्रजीचा शिक्षक म्हणून गावातल्या लोकाना माझ्याबद्दल भारी कौतुक होतं.आजूबाजुच्या गावातली कोर्ट कज्जे खेळणारी कोण कोण जमिनदार माणसं कोर्टाच्या तीस तीस चाळीस चाळीस पानी जजमेंट मराठी तर्जुमा करायला घेवून यायची. त्यात शेवटच्या पृष्टावर न्यायाधिशानी निवाडा लिहिलेला असे तेवढा भाग महत्वाचा असतो बाकी सगळा फापट पसारा असतो. हे संबंधिताला पटवून देताना माझी पुरेवाट व्हायची.एवढ्या सगळ्या पानांचा अनुवाद केलाही तरी तो वाचून सामान्य माणासाला काहीच उलगडा झाला नसता. संपूर्ण निकालपत्राचा तर्जुमा हे किती जिकिरीचे काम आहे याची कल्पना काम आणणाराला नसे. मग मी त्याला हेडसरांकडे नेत असे. ते सुज्ञ भाषेत त्याला वाटेला लावीत. मुंबईत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करुन माणसं निवृत्ती नंतर गावी आली की कंपनी कडून आलेली पत्रे घेवून येत. त्याना मात्र मी पत्राचा आशय अनुवाद करून देई, माहिती मागवलेली असेल तर ते फॉर्म मी भरून देई. कोणी कोणी या कामाबद्दल दहा पाच रुपये पुढे करीत ते मात्र मी घेत नसे. मग काही जण भाजी पाला, आंबे, फणस, काय काय भेटी आणून देत.
त्या दिवशी शाळा सुटायच्या वेळेला मी आणि धुमाळ शिपाई शाळे बाहेर कलमाच्या मुळात बसून पान खात असताना चाळिशीच्या उमरीचा लेंगा टी शर्ट घातलेला टीपटॉप गृहस्थ ऑफिस समोर उभे असलेल्या स्टाफशी काहीतरी बोलू लागल्यावर सगळे हसू लागले. आम्ही दूर असल्यामुळे त्यांचे संभाषण आम्हाला ऐकू येत नव्हते. तेवढ्यात कोणीतरी सर .... सर करून मला हाक मारल्यावर धुमाळ शिपायाचे तिकडे लक्ष गेले. फिस्सकन हसून धुमाळ म्हणाला, ” चला सर... तुमका बोलावत ते .... ” “कोण रे तो ? ”असं विचारल्यावर धुमाळ म्हणाला , “तो सर्कट झालेलो परसो मयेकार..... पुर्वी हुंबैत नोकरीक हुतो.... कोन भेटात तेका तो इंग्लीस झाडून दाकवता. तेका इंग्लीस बोलनारो मयेकार म्हंतत..... ” कधितरी दाजी त्याच्याबद्दल मला बोललेले.... त्याच्या डोक्यावर परिणाम झाला नी तो मुंबई सोडून गावी आला, तो सगळ्यांशी फाड फाड इंग्लिश बोलतो. मी ऑफिस जवळ पोचताच माझ्याकडे निर्देश करीत किनरे सर म्हणाले, “हे आमच्या शाळेत इलेले इंग्लीसचे नवे सर हत .... तेंच्याफुडे तुजी इंग्लीस झाडून दाकवलस तर तू खरो ” दरम्याने आठ टोल झाले नी शाळा सुटली.
माझ्या समोर इंग्लीश बोलणारा मयेकर उभा राहिलेला बघितल्यावर वर्गाबाहेर आलेले सर, मुले यानी आमच्या भोवती कोंढाळे केले. बघ्यांमध्ये हेडसर आणि मॅडमही होते. “गुड एवनिंग बापटसर, आय व्हेरि हॅपी मिटिंग यू ” माझ्याशी शेक हॅण्ड करीत मयेकर बोलला. त्यावर “गुड एव्हिनिंग मिस्टर मयेकर, आ एम आल्सो व्हेरी हॅपी टू मीट यू , आय हॅव हर्ड मच रुमर्स अबौट यू. माय कलिग्स अ‍ॅज वेल अ‍ॅज मेनी व्हिलेजर्स नेमली दाजी देवरुखकर, आबा वालम, सखाजी तांबे ऑफन टॉक अबॉउट यू . दे से दॅट यू स्पीक फाड् फाड् इंग्लिश. विथ फिअर ऑफ़ युवर स्पीच सम ऑबव्हिएट देम सेल्वज फ्रॉम यु.... सम ट्राय टू फर्फ़ेंड ..... यू आर रियली ग्रेट..... सो आय वाज वेटिंग इगर्ली टू मीट यू ” मी एका दमात अशी सरबत्ती केल्यावर मयेकर चांगलाच वरमला. ओशाळं हसत तो म्हणाला, “सर, आय नॉट अंड्स्टॅंड सम युवर टॉक. सम वर्डस रुमर्स, फर्फेंड, ऑबव्हिएट आय नॉट नो मिनिंग़. ” खो खो हसत पुजारी सर म्हणाले, “ सरानी रुमर्स, फर्फेंड, ऑबव्हिएट हे शब्द वापरले ना त्यांचा अर्थ मयेकराना कळला नाही . अरे वसंता माझ्या टेबलावरची डिक्शनरी आणून दे रे त्याना ” मी हसत म्हणालो, “ डोण्ट बॉदर मिस्टर मयेकर.... रुमर्स मिन्स इंटरेस्टींग इन्फर्मेशन, फर्फेंड मिन्स प्रोटेक्ट ऑर सेक्युअर, ऑबव्हिएट मिन्स हाइंडर . अ‍ॅकच्युअली मोस्ट ऑफ द पिपल कांट अंडस्टॅंड इंग्लिश. इन युवर लॅंगवेज पीपल डोंट कम इंग्लीश सो दे फियर यु मिस्टर मयेकर. अ‍ॅंड सो दे गो अवे फ्रॉम यु.... ”
मयेकराच्या इंग्रजीची लेव्हल आता मी अचूक ओळखली होती. त्याला पुरता उघडा पाडीत मी म्हणालो, “यु कम इंग्लिश बट पिपल नॉट कम इंग्लिश. ” त्यावर मान डोलावीत मयेकर म्हणाला, “ओके ओके ”आता मी योजुन गुगली टाकीत म्हणालो “व्हेन यु बर्स्ट इन इंग्लिश, लिसनर गेट्स बॅफल्ड ” आता मराठीत उतरत मयेकर बोलला, “तुम्ही काय म्हणता ते समजलं नाही मला ” तो चीतपट झालेला बघून मी हसत हसत बोललो “म्हंजे तुमी इंग्लीस झाडूक लागलास ना , काय ल्वॉक भियातत कारण दे नॉट कम इंग्लिश ” आता माझ्या बोलण्यातली खोच हेडसराना आणि थोडफार इंग्रजी जाणणारानाही कळली . खिक्क खिक्क हसत किनरे सर म्हणाले, “ ओ फाड फाड वाले ...आदीच तुमी भंडारी, भंडार बढाई कोणाक जमणार नाय. तुमी आमच्या सारक्यांकाच शायनिंग मारून दाकवूचा, बापट सरांच्या सामनी तुमचा पिताळ उगडा पडला. पयल्या दोन वाक्यातच सरानी तुजी कशी फाडून टाकल्यानी, ” शिपाई वसंत गुरव फिस्स फिस्स हसत म्हणाला, “शेवटी तुजा विमान मराटीवर उतारला .... ” हेडसरही आगीत तेल ओतीत बोलले, “ यांच्या इंग्रजीला घाबरून आम्ही पण साईड काढित असू.... यांचा नेमका विक पॉइंट आज सरानी दाखवलेनी..... आय कम इंग्लीश यू नॉट कम इंग्लीश..... वाघाचं कातडं पांघरून घाबरवणाऱ्या गाढवा सारखी गत झाली ” मयेकर बापडा ओशाळं हसला.त्याच्या खांद्यावर थोपटीत मी बोललो , “ डोंट गेट अपसेट मिस्टर मयेकर. लिव्ह दिस हंबग... हे लोक जरा गंमत करताहेत. पण मी तुमचं मनापासून कौतुक करतो. जे शब्द माहिती आहेत ते उभे आडवे कसेही वापरून कां होईना तुम्ही इंग्लिश झाडून समोरच्याला गार करता एवढं तर नक्की. मी मानलं तुम्हाला. ” मयेकर मान डोलावीत बोलला, “मी फ्रेंच कांसुलेट मदे होतो. तिते इंग्रजीत सगळी वार्ता चालायची म्हणून मला पण तशी आदत पडली. पन सर तुमची इंग्लीश मात्र एकदम पावरफुल हां , एवढी आपली पन हिम्मत नाय ” बघ्यानी टाळ्या वाजवल्या.
त्यानंतरही अधून मधून मयेकर भेटायचे. मी त्याना इंग्रजीत बोलायला प्रोत्साहित करण्यासाठी काही वाक्यं त्यांच्या स्टाईल मध्ये फेकित असे. अवघड शब्द न वापरता कॉमन, सोपे शब्द वापरायचो. ते मला काजुगर, चारोळी, काप्या फणसाचे गरे काहीना काही घेवून येत नी मी सक्तीने त्यांच्या खिशात पाच दहा रुपयाची नोट कोंबित असे. एकदा एका माणसाला ते घेवून आले. तो माणूस अमेरिकन कॉन्सुलेट मध्ये माळी म्हणून जॉब करायचा. जुवाटी नी आसपासच्या दत्तवाडी, हसोळ, हरचली, प्रिंदावण या भागातली बरीच माणसं मुंबईला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये माळी आणि सिक्युरिटी म्हणून काम करायची. मयेकरांसोबतचा माणूस झिलू भोवतळी याने मुंड्याच्या खिशातून एक लिफाफा काढला. ते अमेरिकन कॉन्सुलेटने पाठवलेलं पत्र होतं. मयेकर इंग्रजी झाडी म्हणून झिलूने त्याला गाठला. पण पत्र वाचण्या एवढं इंग्रजी त्याला कुठलं यायला म्हणून तो माझ्याकडेआला.
झिलु चार वर्षामागे रिटायर झाला तेंव्हा 17/12/1975 ला त्याला फंडा पैकी अकरा हजार रुपये रक्कमेचा क्रॉस चेक दिलेला होता. त्यानंतर ऑफिसच्या ऑडिट मध्ये असे निदर्शनाला आले की हा हिशोब चुकीचा केलेला असून बाविसशे कमी दिले गेले. सबब सोबतच्या नमुन्यात पोचपावती सादर केल्यावर सदरील बाविसशे रकमेचा चेक रजिस्टर पोस्टाने पाठवण्यात येईल. प्रथम मी काय सांगतो ही झिलुची समजच पडेना. तो म्हणाला, “कायतरी चुकताहा.... अकराशे नी वर वीस रुपाये फंड दिलानी. तवा आबा खोत ना तेका मी पत्र दाकवलय. आता तेका तरी विंग्रजी खैसना समाजनार? तेना राजापुरात वकिलाकडे जावन म्हायती काडलान. कायतरी कागद लिवलेले तेच्यार माजो आंगटो घितलान. मगे उतारात थय ब्यांक हा ना तेतू माजा बुक काडलान. मग्ये दीड म्हयन्यान तेनाच बेंकेसून पैसं हानलान नी अकराशे नी वर इस रुपाये माका दिलान. तेना एवडी दलामालकी केलान म्हनू मी तेका इस रुपाये खर्ची म्हनू देय हुतय पन बापड्यान ते दुकु घितलान नाय. आबा देव मानुस तो काय ख़ोटा बोलनार हा ?” आता या प्रकराणातली मेख मी ओळखली. या भावरथी कुळवाड्याचा आबा खोतावर नितांत विश्वास आहे , मी कितीही कंठशोष केला तरी हा माझ्यावर विश्वास ठेवणार नाही हे ओळखून मी त्याला बॅंक बुक आणायाला सांगितल्यावर तो बोलला, “ तां आबाकडेनच हा, तो सांगलीत गेलो हा... आता कदवा येयत काय दकल....म्हणून मी मयेकाराक हटकलय..... ”
मी हा सगळा विषय पुजारीसरांच्या कानी घातला. “आता आबा खोत आला तरी आधी ही गोष्ट त्याच्या कानी घालू नको, तू परभारे आम्हाला भेटलास हे त्याना आवडणार नाही. नी ते मुंबईत उलट सुलट कायतरी कळवून तुझी रक्कम अडकवून ठेवतील.तसंच मुदत टळली तर ऑफिसवाले तुला पैसे देणार नाय, तेव्हा ह्या गोष्टीचा लगेच फैसला करून आम्ही तुझी रक्कम मिळवून देतो. ” सर त्याला बोलले. ही मात्रा लागू पडली. “व्हय व्हय तुमका इचारला ना.... ता तेका आवडणार नाय.... नी तो खयतरी गोटो फिरवून माज्ये पैशे लटकावून ठेयीत....मी नाय बोलणार तेका. तो आता हय नाय... तो येय सर मुदत टळली तर हुंबयचो सायब पैशे देवचो नाय.... माका तेना काय तुमी काय काम केल्याशी मतलब. ” सरानी दुसरे दिवशी त्याला राजापुरला नेवून स्टेट बॅंकेत अर्जकरून नवीन पास बूक काढले. त्यात जुन्या एंट्री भरून घेतल्यावर जानेवारी 76 मध्ये 11000 रुपये चेकने जमा झाल्याची आणि 100 रुपये शिल्लक ठेवून 10900 रुपये काढल्याची अशा दोन्ही नोंदी मिळाल्या.
नवीन चेक येईतो ही गोष्ट झिलूला सांगितली नाही. पत्राप्रमाणे कॉन्सुलेटकडे रसिट पाठवल्यावर बारा दिवसानी बाविसशे रुपयाचा चेक आल्यावर तो जमा करून ती रक्कम काढून आणल्यावर दादा देसाई , दाजी सोनार , मी यांच्या समोर सरानी सगळा घोळ स्पष्ट करून सांगितला. “तरीच .... फंड इल्यार मी म्हणय की पैसे कमी कशे केल्यानी..... कारण मी लिटायर झालय ना तवा सायबा वांगडा किरिस्ताव पोरगी आस्ता ना ती माका बोललेली की, तुमका कमीच तरी धायेक हजार रुपाये तरी फंड भेटात.... ” चितागती होत झिलू म्हणाला. त्याला समजावीत दादा देसाई म्हणाले, “तु काय भिया नुको.... ही काय मोगलाय लागोन गेली हा? बारा पाचाचो मेळ बसवून आबाक जाब विचारू आमी. सगळो पुरावो आमच्या हातीत आसा... ह्या बूकात फंडाचे अकरा हजार जमा झालेले आणि तेतूसून धा हजार नवशे रुपाये काडलेल्याची नोंद हा.... बाकीच्ये पैशे खाय ग्येले तां गाव इचारीत ना आबा बामणाक... ” आता झिलू पुरा हादरला. “ह्यां तुमी म्हंतास तां बरोबर पन आबा इल्यार अशान असो इशय मी तेच्या कानार घालतय, तो काय म्हंता बगुया”
आठवडाभरानंतर आबा खोत आले. झिलु त्याला भेटला आणि त्याने सगळा विषय इत्थंभूत आबाना सांगितला. आता हा विषय गुपाचुपीत मिटवल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्यानी ओळखलं. तरीही अडाणी झिलुला त्यानी पध्दतशीर गुंडाळला. “फंड मिळाल्यावर तुका शक इलो म्हटल्यार मी हे गोष्ट वकिलांच्या कानार घतली. तेनी तुज्या सायबावर केस केलानी. दोन तीन पावट् वकिलांनी हुंबयच्या कोर्टात खेपा घतलानी . म्हणून ती केस तुज्या बाजून झाली नी तुजो सगळो फंड भरपाय करून मिळालो. तुका आदी सांगोन आशेर ठेवायचो नी केस हरली तर तू निरूस होनार म्हनान मी आदी ह्यो इषय तुका बोललय नाय. मी सांगलीत जाताना वकिलांका भेटलय तवा केस तुज्यासारी झाली ह्यां बोलले ते माका....मी तिकडे गेलय नी इकडे तुका कंपनीचा पत्र इला. म्हणान बेंकेन तुका नया बुक दिला. ह्यां तुजा पयला बुक.....ह्येतु पयले पैसे जमा झालले आसती. दोन दिवसान आपुन राजापुराक जावन पैशे काडून हानुया. तुजो मज्यार इस्वास नाय? तु काष्टी वालो कुळवाडी माज्या वादी दुस्मनांच्या नादाक लागोन माका बारा पाचा सामनी हटकणार? मी गोटो फिरवलय ना तर तुजा हगणां मुतणां बंद करीन...”
आबा खोतांच्या देवस्कीची त्या अडाणी गावातल्या कुळवाड माळवाडात भलतीच दहशत असायची .गर्भ गळीत होत आबांच्या पायावर डोकं टेकित आपल्या मुस्काटीत मारून घेत झिलू म्हणाला , “आबानु अशे रागा जाव नुको.... बारापाचाची वार्ता दादा देसायानी केल्यानी आता तुमी इलास, ह्येचो फैसलो तुमी करशा तो माका मान्य. मी गुवात बुडवलेली काडी तोंडात धरून गप ऱ्हवनार ” आबा दोन दिवसानी झिलुला घेवून राजापुरात गेले. त्याला वकिलाच्या ऑफिस बाहेर बसवून आत गेले. इकडच्या तिकडच्या गपा करुन बाहेर आल्यावर त्यानी पिशवीतुन स्टॅंप पॅड काढून दोन कागदांवर त्याचे आंगठे घेतलेनी आणि त्याला म्हणाले, “तुका रक्कम पोच केल्याच्यो ह्यो पावत्यो, तेच्यार तुजो आंगटो घितलो हा. तर मी तुका ह्येच्या आदी अकराशे आणि वीस रुपाये दिले. नंतर बाविसशे पुजारी सरानी बेंकेसून काडून तुका दिलानी म्हंजे तीन हजार आनी दोनशे आनी वर वीस एवडे तुका पोच झाले बरोबर? ” त्यावर झिलु म्हणाला, “आता मी येडझवो मानुस ... माका काय समजता हा .. तुमी म्हनतास मगे तां बरोबरच आसनार.”
आपली मात्रा बरोबर लागू पडली हे आबानी ओळखलं. “ तर अकरा हजारातले एवडे तुका पोच. तुजी केस चलवलानी तेची फी पाच हजार मागत हुते पण मी हजार कमी करून चार हजारावर तोड केली. म्हंजे आता मुदलात तुजे तीन हजार आनी वर आटशे शिल्लक ऱ्हवती..... बरोबर हा ना? काय चुक माक आसात तर आताच सांग नायतर उद्या परत दादाक नायतर पुजारी सराक भेटशी आनी माका बारा पाचात घेवचो भाय दाकवशी.... ” रंजीस होत खाड् खाड् थोबाड फोडून घेत झिलू म्हणाला, “ ह्या आदी काय नुको ता बोलतास तुमी... आता ह्या इषयात कोनाचा काय्येक माका आयकोचा नाय... मी गांगेश्वराची आण घेवन् सांगतय.... ह्येतू बदल झालो तर तुमची व्हाण नी माजा त्वाण्ड ” आबा खुशीत येवून म्हणाले, “ माजी खात्री हुती की तू माज्या शब्दाभायर जावसच नाय. बरां तां असो . तुजे तीन हजार आनी आटशे देवचे. ह्या दलामालकीत माजो फायदो काय? ” त्यावर झिलू म्हणाला , “छा छा....असा कसा व्हयत... तुमका काय दीड दोन हजार काय ते घेवा” आबानी खिशात हात घालीत नोटा काढल्या. झिलु बोलल्या प्रमाणे आपले दोन हजार कापून घेवून अठराशे म्हणजे एक हजार नी वर आठशे झिलूच्या हातावर टेकवून हिशोब पुरा केला.

हजार कापून घेवून अठराशे म्हणजे एक हजार नी वर आठशे झिलूच्या हातावर टेकवून हिशोब पुरा केला. हजार कापून घेवून अठराशे म्हणजे एक हजार नी वर आठशे झिलूच्या हातावर टेकवून हिशोब पुरा केला.
※※※※※※※※