सर्कस विश्वातली मुशाफिरी श्रीराम विनायक काळे द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सर्कस विश्वातली मुशाफिरी

सर्कस विश्वातली मुशाफिरी
प्रा. श्रीराम काळे
दि ग्रेट रॉयल सर्कस

सर्कस ही माझ्या माझ्या मर्मबंधातली ठेव. व्यवसाय पेशा निवडण्याची स्वायत्तता आणि संधी दैवाने मला दिली असती तर मी सर्कसमध्ये ट्रपीझ अ‍ॅक्टॅर होणे पसंत केले असते. 1971 ते 1975 दरम्याने रत्नागिरीला कॉलेज शिक्षण सुरु असताना रत्नागिरीला ग्रेट एशियन सर्कस दौऱ्यावर आलेली. मी त्यावेळी काकांकडे आगाशे वाड्यात बिनभाड्याच्या छोटेखानी खोलीत रहायचो . घुडे वठारात काँग्रेस भुवनच्या पिछाडीला सर्कसचा तंबू ठोकायाचे काम सुरु झाल्याचे वृत्त कळल्यापासून मी आणि माझा चुलतभाऊमुकुंदा, त्याचा मित्र गजा घुडे, आमच्याच वाड्यात नाटेकर भटजींकडे राहणारा आमचा सवंगडी (राजापुर भू चा) बाळा पाध्ये अशी आमची फाटावळ सकाळ संध्याकाळ मोकळ्या वेळी सर्कस तंबूकडे चकरा मारून तासन् तास तिथे चाललेले काम मोठ्या एकाग्रतेने डोळ्यात साठवायचो. आमच्या या फेऱ्या बघून काकू गमतीने म्हणायची, “असे रिकामटेकडेपणी बघित राहता त्यापेक्षा काहीतरी जोडमोड करायची , सामान दे .. घे करायची मदत केलीत तर सर्कसवाले फुकट सर्कस बघायचे पास देतात का प्रयत्न तरी करून बघा .... ” कदाचित तसा चान्स मिळाला असता तर पासांची अपेक्षाही न करता आम्ही मदत कार्य केले असते म्हणा . आठा दहा दिवसातच तम्बू उभा राहिला आणि पहिला शो जाहीर झाला. काकाना नाटक सिनेमा चे वावडे... पण सर्कस सुरु झाल्यावर चार सहा दिवसानी एका शनिवारी घरातल्या सर्वांसाठी सर्कसची तिकिटे काढूनआणली आणि आयुष्यात पहिली सर्कस मी बघितली.
काकूची बहिण विमल मावशी रत्नागिरीला मुरलीधराच्या देवळाजवळ रहायची .तिचे मिस्टर साठे काका भलतेच सर्कस वेडे. ते सर्कस बघून आले आणि एवढे खूश झाले की , सर्कसमधल्या कलाकाराना एका रविवारी चहा फराळाला यायचे पत्रद्वारे निमंत्रण त्यानी पाठविले, पत्र पोचले नी दुसऱ्या दिवशी सर्कसचे व्यवस्थापक त्यांच्या बिऱ्हाडी भेटायला आल्रे. निवडक 50/60 सर्कस कलाकारांचा ताफा यायचा बेत ठरला. मंदिराच्या प्रशस्त परिसरात तात्पुरते छत ताणून मंगल कार्यालयातुन भाड्याने खुर्च्या आणुन चोख व्यवस्था करण्यात आली. फराळासाठी बटाटे पोहे, भजी ,स्वीट डिश बेसन लाडु नी कैरीचे पन्हे असा फक्कड मेन्यू ठरला. सर्कसवाले यायच्या वेळी फराळ वगैरे द्यायला मदती साठी मी ‌‌- मुकुंदा गेलेलो शिवाय साठे काकांचे काही मित्र सपत्निक हजर झालेले. ठरल्या वेळी सर्कस कलाकारांचा ताफा आला. अत्तर देऊन गुलाब पाणी शिंपडून आगत स्वागत झाले. सगळ्यानी आपापला परिचाय करून दिला. सर्वानी तारीफ करकरून फराळाचा आस्वाद घेतला. साठे काकांच्या अनोख्या प्रतिसादाने सर्व कलाकाराना अगदी गहिवरून आलं. निघण्यापूर्वी व्यवस्थापकानी 50 फ्री पासेस काका नको नको म्हणत होते तरीही बळेच घ्यायला लावले. कुटुम्बियआणि मदतीला आलेल्या माणसांची मोजदाद करून नेमके 22 पास ठेऊन उरलेले पासेस साठे काकानी परत केले. मला नी मुकुंदाला व्हीआयपी बॉक्स मध्ये बसून पुन्हा अगदी जवळून सर्कस बघायचा चान्स मिळाला.
1986 मध्ये मी देवगड बी.एड. कॉलेजमध्ये प्राध्यापक पदावर असताना लायब्ररीत रत्नगिरी टाईम्स मध्ये दि ग्रेट रॉयल सर्कस चिपळूण ला आल्याची बातमी वाचली . मी त्या सर्कसबद्दल खूप ऐकून होतो . जाहिरात दाखवित माझे सहाध्यायी डॉ . गणेश पांग्रडकर ना म्हणालो, ही सर्कस असेतो जमले तर मी चिपळुणला मुद्दाम खेप करून सर्कस बघणार ! खूप मोठा परदेश दौरा करून आलेली आहे ही सर्कस. त्यावर डॉ. पांग्रडकर म्हणाले, “दिवस ठरवा, आपण दोघानीही जाऊया. तुम्ही एस्टी चा तिकिट खर्च करा ,मी तुमची राहण्या जेवण्या सह व्हिआयपी बॉक्स मध्ये बसून शो बघायची सोय करतो. सर्कस मालक प्रताप वालावलकर हा माझ्या मिसेसचा चुलत भाऊ लागतो. सर्कस मधले स्टाफ आर्टिस्ट अनंतकाका, अर्जुन मामा हे पण आमच्या सासऱ्यांकडून पाव्हणे नी मामा पेंडुरकर हे मिसेसचे सख्खे मामा.” आम्ही पहाटेच निघून दुपारी दीड पावणेदोनच्या सुमारास चिपळूण स्टँडवर उतरून बाहेर पडुन रिक्षा शोधीत असतानाच सर्कसची गाडी बाजाराच्या दिशेने येताना दिसली. सरानी हात दाखवताच गाडी थांबली. गाडीत मामा पेंडुरकर होते. तम्बूत गेल्या गेल्या जेवण झाले. केवळ सर्कस वेडापायी मी चिपळूणला गेलो याचे सगळ्याना कोण अप्रूप वाटले. अर्जुन मामा म्हणाले , “आज 3 शो आसत , तुमका येदी हऊस असा तर आज तीनव शो व्हीआयपी शीटवर बसान बगा. चाय तुमका थंयच पाठौन देवया. तीनव शोत एक पन अ‍ॅटम रिपिट होवचो नाय. नवचो शो सम्पलो काय पट्कन येवन जेवन जाया . नी लास्ट चो शो झालो की लॉजवर जावन झोपा. आमका तुमच्या सारके हौशी प्रेक्षक मिळाले ह्या भाग्यच म्हणाचा .”
मी खरोखरच त्या दिवशी सलग तिन्ही शो सलग बघितले. मामा आम्हाला व्ही आय पी बॉक्स मध्ये बसवून गेले. अधून मधून काका , अर्जुनमामा, मामा पेंडुरकर येऊन चहा,नाष्टा ,थंडा अशी सरबराई करून जायचे. सर्कसमधले विक्रेते फिरतच असायचे. त्याना जवळ बोलावुन हे “आमचे पाव्हणे आसत , काय मागतीत ता देवा नी बील घेव नुको. ” अशी ताकिद द्यायचे. डॉ. पांग्रडकर अधे मधे आत जाऊन यायचे पण मी मात्र नेट देऊन तीन्ही शो पूर्ण पाहिले. मी सोबत लेटर पॅड न्हेलेल , त्यावर समोर चाललेल्या आयटम्स च्या नोंदी केल्या. मामा ,काका भेटायला येत तेंव्हा कुतुहलाने माझ्या टिप्पणांवर नजर करीत . मी मला न कळलेल्या काही गोष्टी , सादर करणारांची नावे वगैरे विचारून घेई. 9 वाजता जेवायला बसलो असता मामा काका यानी पांग्रडकर सराना बोलून दाखवले की, काळे सरांसारखे हौशी सर्कसप्रेमी लोक क्वचितच भेटतात, ते काय काय नोंदी करताहेत ,बहुतेक काही तरी वेगळा बेत आहे सरांचा. सर म्हणाले, त्यांची भाषा शैली चांगली आहे. तुमचा नशिब आसात तर येकादो लेख बिख मिळता काय बगया.
12 चा शो सुटल्यावर आम्ही लॉजवर झोपायला गेलो. सर पडल्या पडल्या घोरायला लागले . मी मात्र 5 वाजे पर्यंत जागून रॉयल सर्कसच्या वैशिष्ट्यांचा आढावा घेणारा एक सुंदर लेख तयार केला. मी तयारी निशीच गेलो होतो. हातोहात लेख पाकिटात भरून सकाळी चिपळूण स्टँड वर पोस्त बॉक्स मध्ये रत्नागिरी टाईम्स च्या नावे टाकुन दिला. 4 दिवसानी काही काटछाट न होता पूर्ण पान भर छापूनही आला. पेपरवाल्यानी सर्कसमधून घेऊन चार फोटो ही टाकले होते. आठवडा भराने सर्कस मालक प्रताप रावांचे सर्कसच्या लेटरहेडवर टंक लिखीत पत्र आले. लेख सर्वानाच फार फार आवडला. सर्कस नवीन मुक्कामी जाते तेव्हा जहिरातीसाठी म्हणून तो नेहेमी वापरण्या जोगा संग्राह्य वाटला त्याना. त्याच बरोबर जमेल तेव्हा सर्कस जिथे कुठे मुक्कामी असेल तिथे यायच आमंत्रणही दिलेले होते.
दोन तीन महिन्यानी अनंत काका, मामा पेंडुरकर, प्रतापराव पांग्रडकर सराना कुठे तरी लग्न समारंभात भेटले. तेंव्हा सरांमार्फत मला ऑफर दिली. सर्कसचे दिवंगत मालक प्रतापरावांचे वडिल कै. नारायणराव यांची अतीव इच्छा होती कि , रॉयल सर्कस कारकिर्दीवर एखादे पुस्तक प्रसिद्ध करावे. त्यानी दोघातिघा नामवंत लेखकाना तशी ऑफरही दिली होती . अ‍ॅडव्हान्सहि दिला होता पण त्यांच्या हयातीत ती इच्छा पुरी झाली नाही. हे काम मी करू शकेन असा तिघानाही विश्वास वाटला म्हणून मला विचारुन पहायची त्यानी गळच घातली. मला फार फार आनंद झाला . आपल्या कोकणातल्या या सर्कस वर आधारित लेखन करायला मी होकार दिला. सरानी यथावकाश माझा हो कार प्रतापरावाना कळविला. त्या नंतर सुमारे चार महिन्यानी सर्कस गोव्यात दौऱ्या वर असताना प्रतापरावानी सर्कसमधिल 3 हत्ती वालावल येथे लक्ष्मी नारायणाच्या मंदिरा पर्यंत आणायचा बेत ठरविला. एकदा तरी कुडाळला सर्कसआणून खेळ करायची कै. नारायणरावांची इच्छा होती, पण सर्कसचा बारदाना एव्हढा मोठा कि , ही गोष्ट अशक्यच होती, म्हणून दौरा नाही तर निदान हत्ती तरी लक्ष्मी नारायणाच्या मंदिरा पर्यंत नेऊ असे आप्पा नी ठरविले. त्या निमित्ताने सगळे वालावलकर कुटुंबीय लक्ष्मी नारायणाच्या मंदिराजवळच्या घरात जमायचे होते.
या सोहोळ्यात पुस्तक लेखनाचा संकल्प नक्की करायचेही योजण्यात आले. या कार्यक्रमाला येणाऱ्यां मध्ये नारायण रावांच्या समग्र सर्कस कारकिर्दीचे साक्षिदार एस.जी. वालावलकर नावाचे वयोवृध्द गृहस्थ पुस्तक लेखनासंदर्भात माझ्याशी चर्चा करू इच्छित असल्याने मला आग्रहपूर्वक निमंत्रण देण्यासाठी प्रतापराव रविवार साधून पडेलला आले. अधूनमधून निरवड्याला प्लॉट वर त्यांची खेप व्हायची. त्यांचे एक स्नेही कुरतडकर यांचा मोंड तिठ्यावर प्लॉट होता त्याना सोबत घेऊन पडेल पर्यंत यायचा घाट घातला. तरळ्याला पेट्रोल पंपावर पोकळेंकडे त्यानी माझी चौकशी केली त्या वेळी आमच्या गावातलाच माझा शाला सोबती दिलिप ठाकुरदेसाई पेट्रोल भरायला पंपावर होता. तो पोकळेंच्या परिचयाचा... योग्य लिंक जुळली नी भर दुपारी दीडच्या सुमाराला आप्पा अगदी अनपेक्षितपणे आमच्या घरी आले. माझं जेवण नुक्तच उरकलेलं. कुर्मा पुरी नी श्रीखंड अ‍सा फक्कड बेत. मी विचारता क्षणीच कसलेहीआढेवेढे न घेता आप्पा जेवायला बसले. खर तर तरळ्याला जेवण करून मग निघायचा बेत होता पण दिलिपची घरापर्यंत सोबत अनायासे मिळल्यामुळे तो बेत त्यानी रद्द केला . वालावलच्या कार्यक्रमाचा हेतू सांगुन ते मार्गस्थ झाले. त्यानंतरही 5/6 वेळा आप्पांच्या पडेलला खेपा झाल्या.
एस् . जी. वालावलकरांशी झालेल्या भेटीत सुमारे दोन तीन तास नारायणरावांच्या कारकिर्दीचा , त्यांच्या सर्कस जीवनाचा पट माझ्या अंत: चक्षुसमोर उलगडत गेला. ते कथन करीत असता मी झर झर नोंदी करीत गेलो. एस. जी.नी सर्कसच्या यशातले पाच मुख्य शिलेदार अनंत काका, दिगम्बर नी अर्जुन वलावलकर, मनोहर पेंडुरकर नी पाचवे सुरेश म्हापणकर यांची मुलाखात घेवून पुस्तकात त्यांचा उचित उल्लेख करा अशी सुचना केली होती. तसेच कही अंत्यस्थ कटु बाबी सुद्धा त्यावर भाष्य किंवाशेरेबाजी न करता जशी तुम्हाला उमजेल तशी जरूर नमूद करा असा सल्ला देताना महाभारतात सुद्धा अशा कटु बाबी गैर कृत्ये वाचायला मिळतात असा दाखला देऊन आप्पा वालावलकराना माझ्या लेखनात काही बदल न करता ते छाप अशी सक्त ताकिद दिली होती.
त्या नंतर सर्कस पुणे दौऱ्यावर असताना मी आठवडाभर सवड काढून मुक्काम ठोकला. माझी खूप इच्छा असूनही काका मामा प्रभ्रृतीनी मला माझ्या सुरक्षेच्या काळजी पोटी तसेच तंबुमध्ये आंघोळ ‌ - टॉयलेट सुविधा गचाळ असते म्हणून कधिही सर्कस तम्बूत वसतीला राहू दिले नाही. माझ्यासाठी नजिकच्या एखाद्या दर्जेदार लॉजवर खोली बुक करून दिली जायची त्याचे भाडे अर्थात सर्कस व्यवस्थापना कडून परस्पर दिले जायचे. मी सकाळी उठून चहा स्नान आवरीपर्यंत सर्कसची गाडी न्यायला आलेली असायची . लॉज मॅनेजर ना सर्कस कडून तशा सुचना दिलेल्या असत आणि उजाडल्यावर सर्कस मधून फोन करून विचारणा व्हायची. पुणे मुक्कामी अनंत काका, मनोहर मामा पेंडूरकर ,अर्जुन मामा एकेकाशी मुक्त गप्पा व्हायच्या अन मी त्यावर आधारीत टिपणे करून ठेवायचो. मनोहर मामा , अनंत काका मला काय महिती द्यायची त्या बद्दल चे मुद्दे टिपून ठेवत नी चर्चेच्या वेळी त्या नियोजनाप्रमाणे बोलत. सकाळी साडेसात ते दहा पर्यंत कसरत पटू , प्राणी यांचा रिंगणात सराव चाले . त्यावेळी त्या त्या ट्रुपचे व्यवस्थापक , ट्रेनर वेताची लवचीक छडी घेऊन असायचे नी अर्टिस्ट चुकला तर सप्पकन त्याचा प्रसाद संबंधिताला मिळायचा. लहान , मोठा, स्त्री ,पुरुष असा भेदभाव शिक्षा देणारा करत नसे . काही वेळा ते बघणंही नको वाटायच.
सरावाच्या वेळी आर्टिस्टला शिक्षा झाल्यावर माझा कसनुसा चेहरा बघून काका म्हणायचे , “तुमची म्हण असा ना ..... छडी वाजे छम छम ...... शो करताना चूक झाली तर बघणारे आमची गय करनार नाय ..... शो फ्लॉप जातले... एकदा नाव खराब झाला काय झाला... आमचा नी तेंचाव प्वॉट अवलंबून हा ..... ” प्राण्याना मात्र शिक्षा फक्त खोडसाळपणा केला तरच अगदी क्वचीत करीत. त्याना आंजारून गोंजारून सराव दिला जाई , अर्थात काळीज चिरीत जाणाऱ्या चाबकाच्या फाड् फाड् आवाजांचा धाक असायचा. प्रतापराव एका दोन दिवसानी फेरी करीत तेंव्हा अगदी जुजबी चौकशी करायचे.
अनंत काका, मामा पेंडुरकर,अर्जुनवालावलकर या त्रयीचा बरोबरीने सर्कस डोलारा सांभाळणारा चौथा किंगपोल सुरेश म्हापणकर. छोटेखानी सर्कसचा डोलारा दोन मुख्य खांबांवर उभा असतो, त्याना किंगपोल म्हणतात. नारायणरावांच्या “ दि ग्रेट रॉयल” सारख्या भव्य सर्कस तंबूना चार किंग पोल असतात. अनंत काका, अर्जुनवालावलकर ही माणसं अल्पशिक्षित. मामा पेंडुरकर सुविद्य असले तरी जुजबी शिक्षण झालेले. ही माणसं कसरतकलेत तरबेज,प्रामाणिक आणि समर्पण भावाने काम करणारी होती. तरी प्रशासन, व्यवस्थापन ,किचकट अकौटिंग यात तरबेज नव्हती आणि त्यांच्यावर असलेली जबाबदारी सांभाळून या गोष्टींकडे काटेकोर लक्ष देण्यासाठी त्याना फुसरत नव्हती. काका - मामा - अर्जुनमामा ट्रॅपीझ , मृत्युगोलात सायकल चालविणे, रिंग मास्टर म्हणुन काम करणे , नवीन उमेदवाराना कसरतींच प्रशिक्षण देणे व अडल्यावेळी क्लाऊनिंग सुध्दा करायचे. सर्कस परदेश दौऱ्यावर असताना सर्कसचा जनसम्पर्क, अकौंटस आणि प्रशासकीय विभाग सांभाळण्यासाठी नारायणरावांनी आपल्या नाते संबंधातल्या सुरेश म्हापणकर या उच्च विद्या विभूषित तरुणाला सर्कसमधे घेतला.
मी सर्कसवाल्यांच्या संपर्कात येण्यापूर्वी सुरेश म्हापणकर सर्कसमधिल जॉब सोडुन बाहेर पडले . खूप इच्छा असूनही माझी त्यांची प्रत्यक्ष गाठभेट झाली नाही . त्यांच्या कार्याची आणि कार्यशैलीची थोडिशी माहिती काका, मामा पेंडुरकर व अर्जुनरावानी सांगितली ती मी स्वतंत्र लेखात नमूद करून पुस्तकात समाविष्ट केली. मात्र सुरेशजींचे कार्य विश्व आणि अनुभव हा रॉयल सर्कसच्या कारकिर्दितला एक वेगळाच पैलू होता. तसेच एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा घेताना अन्य तिघांच्या कथनातून सुटलेल्या कही दुव्यांची उकल, तपशिलात अचुकता किंवा योग्य बदल करता आला असता. माझे लेखन सुरु असल्या मुदतीत सर्कस रत्नगिरी दौऱ्या वर आणि नंतर कुडाळ लाही खेळ करून गेली. त्या दरम्याने तर माझ्या सर्कसमुक्कमी असंख्य खेपा झाल्या आणि माहिती संकलन जवळ जवळ पूर्ण होत आले. रत्नगिरी मुक्कामी माझ्या काकाना शिकारखाना पहायला नेले होते.तसेच कांकाचे कुटुम्बीय. माझ्या दोन्ही बहिणींचे कुटुंबीय आणि माझे मित्र याना मी कॉलर ताठ करून व्हिआयपी पास वाटले. पुढे सर्कस कुडाळ दौऱ्यावर आलेली. तेंव्हा मी माझ्या कुटुंबीयांसह सर्कसच्या गाडीतून जाऊन सर्कस बघून सर्कस तंबूत भोजनाचा ही आस्वाद घेतला. शरू ,आदिश या माझ्या मुलानी ढिगभर स्टीकरआणुन भिंती, आरसे ,कपाटं मढवून काढली.
1987 मध्ये सुरु झालेला हा सिलसिला 1994 मध्ये संपत आला. मी पुस्तकाची 250 पृष्टांची हस्तलिखित फाईल , सुमारे सव्वाशे फोटोची फाईल सजवली. पुस्तकातला शेवटचा लेख पूर्ण करून पहाटे मी लिहित होतो त्याच जागी आडवा होऊन निद्राधिन झालो. एक विलक्षण स्वप्न पडले. कोणीतरी मला हलवून हलवून जागे करीत होते. कष्टाने च डोळे उघडले. तर साक्षात नारायणराव वालावलाकर समोर उभे. मे चरण स्पर्शकरूनयुआना बसायला सांगितले. ते लेखनाच्या टेबल वरच बसले. नी बोलु लागले. “ मी मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो. तुमच्याकडे पुस्तक लेखन सुपुर्द केल्याच एस. जी .बोलले मला. मी फिरतीवर होतो म्हणून भेटायला विलम्ब झाला. आलो तर तुम्ही झोपलेले. मी धावती नजर टाकली. तुम्ही खरच माझं स्वप्न साकार केलेत. पण.... ” नी बोलण थांबवून नारायणराव ढसढसा रडू लागले. मी दिङमूढ होऊन पहातच राहिलो. मिनीट भरात कोटाच्या खिशातला रुमाल काढून डोळे टिपीत नारायणराव म्हणाले ,“ वाईट एवढ्याचसाठी वाटल की, तुमचे कष्ट वाया गेले. तुमच्या या कामाची कदर आप्पा करीलसं वाटत नाही. हे पुस्तक त्याच्या कडून छापून होणं अशक्य. तो अत्यंत गलथान नी बेमुर्वतखोर आहे. तुम्ही इतक्या खेपा घातल्यात ते तुम्हाला एक पैसा तरी दिला का त्याने? मी, अनंत, मन्या त्याला सांगून सांगून हरलो. मला तुमच्या कष्टाची कदर आहे. हा चेक घ्या .... योग्य मेहनतान्याचा आकडा तुम्ही टाका . तुमचे कष्ट मी फुकट घेणारा नाही. ” नी खिशातुन कोरा चेक काढुन त्यानी माझ्या हातात दिला. मी सद्गदितहोऊन म्हणालो , “आप्पानी मला या पूर्वी चार पाच वेळा रक्कम देऊ केली. पण मी आर्थिक कमाई साठी हे काम केलेलं नाही. तुम्ही कोकणातले आहात याचा मला अभिमानआहे. सर्कस हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय त्या प्रेमापोटी मी हे काम केल... हा चेक मी कधिच वटवणार नाही ” नारायणराव विस्फारित नेत्रानी माझ्याकडे पहात असता मी जागा झालो. पहाटेचे पाच वाजले होते.
स्वप्न दृष्टांता नंतर मला या विषयात स्वारस्यच उरल नाही. लेखन प्रत तयार आहे , तुम्ही निरवड्याला याल तेव्हा कळवा म्हणजे फाईल दे ईन अशा आशयाच पत्र मी आप्पाना लिहिलं. महिना भराने आप्पांच पत्र आल. ते बेळगावहून निरवड्याला यायचे होते. पत्रात त्यानी कळवलेल्या दिवशी ( नोवेंबर 1996 मध्ये ) दुपारी मी बाईक वरून निरवड्याला त्यांच्या प्लॉट वर गेलो. आप्पा दुपारी 1 पर्यंत यायचे होते . मी वाट पहात मुक्कामाला थांबलो.प्लॉट वर देखरेखीला जोडप असायचं नी त्याना माझे नी आप्पांचे संबंध माहिती असल्याने त्यानी बंगला उघडून दिला नी मी हॉल मध्ये वाट पहात थांबलो. आप्पा 4 वाजता आले, सोबत त्यांचा मित्र उदयन होता. चहा झाला नी मी फाईल काढली. पूर्वी लिहिलेले लेख त्यानी वाचलेले होते. नव्याने टाकलेले दोन तीन लेख त्यानी नजरे खाली घातले. फोटोंची फाईल पाहिली.फोटोंची संख्या जास्त होती पण सर्वच फोटो महत्वाचे असल्याने पृष्ट संख्या वाढली तरी सगळेच फोटो पुस्तकात समाविष्ट करायचे ठरले. त्यावेळी पुस्तकाची हस्तलिखित प्रत असलेली फाईल, फोटोंची फाईल नी सर्कसच्या दप्तरी असलेल्या रेकॉर्ड मधून मला संदर्भासाठी दिलेली जुनी वृत्तपत्रांची कात्रणं , हॅण्डबीलं . कच्ची टिपणं असलेली संदर्भाची फाईल अशा तिन्हीफाईल्स मी अप्पंकडे दिल्या. अप्पा सद्गदित होऊन बोलले, “ तुम्ही हे खूप महान कार्य केलात. मी या पूर्वी आग्रह केला तरीही तुम्ही आजवर एक रुपया पण घेतला नाही. आता काम पूर्ण झालं मानधनाचा आकडा तुम्ही सांगितलात तर मला आनंद होईल. मी तुमच्या कष्टांच मोल करू शकत नाही , तुम्ही आकडा सांगाल तेवढी रक्क्म मी देतो.” मी या पूर्वी वेळो वेळी सांगत असे तेच उत्तर पुन्हा सांगून रक्कम घ्यायला नकार दिला. उदयननेही खूप आग्रह केला पण मी बधलो नाही. शेवटी उदयन बोलला की पुस्तकाचं प्रकाशन होईल तेंव्हा सर्कसतर्फे तुम्हाला काहीतरी भेट देऊ ती मात्र तुम्हाला घ्यावीच लागेल.
त्या नंतर आप्पा एकदा देवगडला डॉ. पांग्रडकर सरांकडे आलेले असताना भेट झाली तेंव्हा दोन चार महिन्यात पुस्तकाची रफ प्रिंट झाली की कळवतो बोलले. पण अप्रिल 2001 पर्यंत काहीच प्रगती झाली नव्हती , अन मी ही पुस्तकहा विषय डोक्यातून काढूनच टाकला होता. अप्रिल 2001मध्ये मी आणि डॉ. पांग्रडकर बी.एड. चे पेपर तपासणी साठी कालिन्याला जात असता सकाळी गाडीतून उतरल्या उतरल्या आधी सौ . पांग्रडकर वहिनींच्या बंधूंकडे बांद्र्याला गेलो. आंघोळ वगैरे उरकून नाष्टा करताना गप्पांच्या ओघात पुस्ताकाचा विषय निघाला. दादा वालावलकरानीच पुस्तकाचं पुढे काय झालं म्हणून विचारलं . सर म्हणाले की , “ काय सांगणार....काळे सरानी एक रुपयो न घेता लेखन करून दिला पन गेली 5/6 वर्साआप्पाकडे फायली पडान आसत... आपा नायव् म्हनत नाय नी फुडे काय करितव् नाय..... ” हे ऐकल्यावर दादा वालावलकर जाम भडकले. “ हे शोभलं नाही प्रतापला ... तुम्ही पाच पन्नास हजार रुपये घेतले असतेत ना की किंमत समजली असती. मोफत की मुर्गी दाल बराबर.... मला आता भेटू देतच तो .... चांगले कान उपटतो त्याचे. ”
ऑक्टोबर 2002 मध्ये अकस्मात सर्कस मधून पत्र आलं.... पुस्तक छपाईला दिरंगाई झाल्याबद्दल माफी मागून येत्या महिन्याभरात काम सुरु करतो. माझं मॅजेस्टिक प्रकाशन शी बोलणं झालं आहे. मुद्रित प्रत तयार झाली की पाठवतो असं आप्पानी लिहिलं होतं. बहुतेक दादा वालावलकरानी कान टोचलेले असावेत, असं मला वाटलं. पण दोन महिन्यानी 22 डिसेंबरला महाराष्ट्र टाईम्स मध्ये फ्रंट पेजवर फोटो सह बातमी प्रसिद्ध झाली . दि ग्रेट रॉयल सर्कस चे मालक प्रतापराव वालावलकर यांचा आकस्मिक मृत्यू ...... मी सुन्नच झालो....... मी पुस्तकाची हस्तलिखित प्रत बनवली तेंव्हा 1993 मध्ये झेरॉक्स ची सुविधा दुर्लभ आणि फार खर्चिकही होती. माझ्याकडे मुळ हस्तलिखिताची कार्बनप्रत होती . ती घरात माडीवर कापडी भरून ठेवलेली होती. पण दुर्दैवाने पावसाळ्यात नेमकं त्या पिशवीवरच पाणी गळलं नी सगळे कागद भिजून चोथा झाला. नाही म्हणायला दोन वर्षापूर्वी मला फेसबुक वर सौ. निशी वालावलकर यांचा मेसेज आला. त्याना मी सर्कस्वर लिहिलेल्या पुस्तकाच्या काही प्रती हव्या होत्या. मी त्याच रात्री त्यानी दिलेल्या नंबरवर कॉल केला. अहो आश्चर्यम्.... सर्कसमधले अ‍ॅनिमल ट्रेनर अर्जुनमामांच्या स्नुषा. आप्पाच्या सर्कसवर काळे सरानी पुस्तक लिहिल्याचं अर्जुनमामांच्या तोंडून त्यानी ऐकलेलं...... मामांच देहावसान झाल्यावर दोन तीन वर्षानी मामांच कपाट आवरताना अकस्मात मी मामांवर लिहिलेला “दोस्ती चिपांझीशी” या लेखाची कार्बन कॉपी त्याना मिळाली.
लेखावर माझं नाव होतं. मी देवगड कॉलेजमध्ये प्रोफेसर असल्याच अर्जुनमामा त्याना बोलले होते. पण माझ्याशी संपर्क साधायचा दुवा त्याना मिळाला नव्हता. एके दिवशी अकस्मात फेसबूकवर त्याना माझ नाव मिळालं. प्रोफाईल उघडल्यावर त्याना हवा असलेला प्रा. श्रीराम काळे सापडला नी त्यानी मेसेज दिला. मी पुस्तकाची चित्तरकथा सांगितली. सर्कसचे काही संदर्भ स्मरणात असतील तर त्याच पुनर्लेखन मी कराव अशी विनंती त्यानी केली. अर्थात ब-याच घटना/ प्रसंग अद्यापही आठवत असले तरी स्थलकालाचे अचूक संदर्भ मिळाल्याशिवाय ते यथातथ्य स्वरूपात मांडण अशक्य आहे. तशी माहिती देवू शकणा-यांपैकी फक्त एकच व्यक्ती हयातआहे. पण ती जराजर्जर अवस्थेतआहे. तो प्रयत्न आता अशक्य. अर्जुनमामांवरचा मूळ लेख मात्र मला मिळाला. त्याचं फेर लेखन करून काही फोटो मिळवून तो यथाकाल किरातमधून प्रसिद्ध करीन. “आम्ही सर्कसवाले ” हे माझं पुस्तक लेखन ही एक निरर्थक उचापत ठरली. पण लेखनाच्या निमित्ताने केलेली मुशाफिरी मात्र माझ्या अंत:करणात कायमच घर करून राहिली .