टूरिंग टॉकिज श्रीराम विनायक काळे द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

टूरिंग टॉकिज

टूरिंग टॉकिज



“चला चला चला ..... दादा , भाऊ, काका.....ताई , माई, काकू , मावशी.... ठीक साडेसहा वाजता खास लोकाग्रहास्तव पौराणिक सिनेमा सत्यवान सावित्री हा खेळ होणार आहे .... याल तर खुश व्हाल नाही याल तर फसाल .... प्रदिप टुरिंग टॉकिज मध्ये आपलं स्वागत आहे.... ” मॅनेजरचा आवाज घुमला नी पाठोपाठ रंगात रंगलं छंदामधी दंगलं हे त्यावेळी लोकप्रिय असलेलं गीत वाजायला लागल. तिकिटबारी उघडली नी लोकांची एकच झुंबड उडाली. खरंतर चित्रपट सुरु व्हायला अजून अर्धा पाऊण तास अवकाश होता. पण टुरिंग टॉकिज, सिनेमा हे लोकाना नवीनच होतं. महिनाभरापूर्वी नव्यानेच खेळ सुरु झाले तेंव्हा बायाबापड्या तंबूत गेल्यावर पडद्याच्या भोवती फिरून एकीमेकीना विचारित, “ह्यां काय... आजून स्टेज दुकु घालुचो हा... ” त्यानी नाटकं बघितलेली .... सिनेमा म्हणजे तसाच प्रकार असणार असा त्यांचा अंदाज. मग मुंबईत जावून आलेली सुमती काकी त्याना समजावायला लागली..... “ह्यां काय नाटाक वाटला तुका? गो खुळ्या ह्या पड्ड्यार ब्याटरिंगचो फोकस पडात नी तेच्यासून चित्रा दिसती..... ह्येतू नाटका सारका नसता..... गाडयो , ढोरां, पाकरा खरी खरी दाकवतत. ” ऐकणारीला नेमकं काय ते कळलं नाही , तिने आपलं उगाचच मान डोलावीत समजल्याचा आव आणून ,“ग्येबाय माज्ये.....असा हा होय .... ” असं म्हटलं . थोड्या वेळाने इंडियन न्यूज डॉक्युमेंट्री सुरु झाली, झुळझुळ वहाणारी नदी....अकाशात उडणारी पाखरं असं जीवंत विश्व समोरच्या पडद्यावर दिसायला लागलं तेंव्हा मगाशी सुमती काकीने जे सांगितल त्याचा अर्थबोध व्हायला लागला.
महाशिवरात्री पूर्वी महिनाभर बापू वेलणकरानी बेळगावातून टुरिंग टॉकिज,तंबू सगळा संच विकत घेतलेला. कोल्हापुरला कोणी शानु मेस्त्री टुरिंग टॉकिजची जोडणी करून देतो असं गुंडू वाडये म्हणाला. त्याने कोल्हापुरातून पिठाची चक्की आणली तेंव्हा त्याला ही माहिती कळली. म्हणून त्याला घेवून बापू कोल्हापुरला गेले. ते शानु ला भेटायला गेले त्या वेळी गडहिंग्लजचा एक माणूस आलेला. त्याच्या मेव्हण्याची जुनी पण चालू स्थितीतली टुरिंग टॉकिज विकायची होती. दारवेच्या व्यसनापायी कर्जबाजारी झाल्यामुळे त्याचा तंबूसकट सगळा संचच विकायचा होता. ही टुरिंग टॉकिज शानूनेच पाच वर्षापूर्वी बांधून दिलेली म्हणून तो माणूस त्याच्याकडे गिऱ्हाईक शोधायला आलेला. गुंडू ने शानूशी चर्चा करून बेत ठरवला. व्यवहार करून सगळा संच प्रोजेक्टर वगैरे घेवून यायचं , इथे शानू कडून तो सुरु करून घ्यायचा नी मग गाव गाठायचं. सगळं सामान बघून घ्यायला शानू कडे काम करणाऱ्या भीमरावाना घेवून बापू नी गुंडू निघाले. आलेला गडहिंग्लजचा पाटील नावाचा माणूस, त्याने प्रवासभर मेव्हण्याची कर्मकहाणी सांगितली.
टुरिंग टॉकिजची धंदा भारी बेष्ट बघा.पावसाचं एक चार म्हैनं सोडलं तर वरीसभर चांगला धंदा चालतोय बघा. तीस चाळिस रुप्पय रोजचा गल्ला हुईत व्हता बगा. नोकर कामगारांचा हप्ता नी शिनिमाच्या रिळावाल्याचं भाडं भागून म्हैन्याला बक्कळ पाचशे- साशे सुटायचं बगा म्हेवण्याला ... म्हणताना नको त्ये नाद कराय लागला भाड्या. दारू काय कोन पीत नाय का सांगा तुमी? ह्ये दिवसभर पिऊन फुल्ल टाईट , चार-चार दिवस टाकीकडं जायाचं नाव न्हाई बगा. त्यात आनी बायचा नाद लागला की.... यल्लमाला सोडल्याली पोरगी, तिच्या नादाला लागलय , कायम तिच्या घरीच पडून आसतय... तसं खात्यापित्या घरातलं हाय....पर बाईचा नाद लागला की कवा बारा वाजतील सांगाय येनार न्हाय. गेल्या वरसाला दोन म्हैने धंदा क्येला नी तवापून सामान पडूनच हाय बगा. ह्याचे रंग बग़ून भनीला तिच्या पोरासकट काडून आणलो मी .... नादापाय कुनाला पन सामान फुकून मोकळं व्हतय बगा ह्ये.... म्हणून आता चालु कंडिशनमदी चार पैसे येत्याले म्हंताना येवार करून पैसे मज्या ताब्यात घेनार मी....
बेळगाव पासून दीड दोन मैल अलिकडे मेव्हण्याच्या घरी पोचेतो संध्याकाळ झाली. घरा शेजारी पत्र्याचा मंडप काढून त्यात टॉकिजचा लोखंडी पत्र्याचा हौदा असलेला टेंपो नी तंबूचं सामान अस्ताव्यस्त टाकलेलं होतं. कनातीचे पडदे, खुंट, लोखंडी पाईपचे तुकडे, स्टुलं, बाकांच्या फळ्या, घडीच्या लोखंडी खुर्च्या आणि चारपाच मजबूत लोखंडी बॅगा सगळं धूळ खात पडलेलं. पाटील म्हणाले, “आजून येक वरीस गेल तर सगळ मातेरं व्हतय बगा. सगळं सामान मैदानातच पडून व्हतं बगा. पावूस काळ जवळ आल्यावर मी कामगार घेवून सगळं गुटाळून हानलो बघा... नशिब तरी गावतलं माणसं चांगले ,न्हायतर चोरापोरी ग्येल आसतं.” भिमराव हौद्यात चढला. प्रोजेक्टर, पेट्रोमॅक्स आणि बाकीची साधनसामुग्री शाबूत होती. बॅगांमध्ये सिनेमापूर्वी दाखवायच्या सरकारी डाक्युमेंटरीची रीळं, कार्बन कांड्या, रिकामी रीळं, मशिन दुरुस्तीला लागणारे पान्हे, सटरफटर हत्यारं भरलेली दिसली. हौद्यातली धूळ झटकून भिमरावाने पेट्रोमॅक्स लावली. मग इंजिन चेक करून प्रोजेक्टर सुरु करून बघितला.
बापू ब्राम्हण, मराठ्याकडे जेवण कसं घेणार? त्यानी स्टोव्ह पेटवून आपला आमटी-भात रांधला. ग़ुंडू नी भिमराव यांच्यासाठी कोंबड्याचा बेत केलेला होता. जेवणं होईतो बापू, ग़ुंडू नी भिमराव यांची चर्चा झाली. प्रोजेक्टर नी सगळा संच सुस्थितीत होताच, शिवाय तंबूचं सामान ही आयतं पदरात पडणार ....फक्त कुठच ते ठिकाण निवडून शो सुरु करायचा ..... सगळा विचार करून त्यानी एक आकडा ठरवला. त्यांच बोलून झाल्यावर पाटलाना हाक मारून त्यांची व्यवहाराची बोलणी सुरु झाली. भिमराव सोडले तर उभयपक्षी टूरिंग टॉकिज च्या किंमतीचा अंदाज कोणाला नव्हता. बापू भेटण्यापूर्वी बेळगाव परिसरातली दोनतीन गिऱ्हाईकं येवून आकडे फोडून गेलेली होती. त्याना पूर्वपिठिका माहिती असल्यामूळे विकणारा अडचणित आहे हे ओळखून त्यानी अल्प रकमाना मागणी केली होती, त्यातही निम्मे रोख नी निम्मे उधार असा मामला. बापूंचा व्यवहार रोख होणार, चांगलं ब्राह्मण गिऱ्हाईक हातचं जावू द्यायचं नाही असा पाटलानी पक्का विचार केला. फार आढेवेढे न घेता त्यानी आकडा फोडला. पाटलांचा आकडा ऐकल्यावर बापू, गुंडू नी भिमराव तिघेही एकमेकांकडे बघायला लागले कारण त्यानी ठरवल्यापेक्षा बाराशेनी कमीची मागणी होती.मिनिट दीड मिनिट कोणीच काही बोलेना. पाटलाना वाटलं की बहुतेक आपण अवाजवी रक्कम सांगितली म्हणून माणसं गप्प आहेत. त्यानी समजूतीच्या सुरात म्हटलं,“आसं बगा, मी आकडा सांगितलो म्हंजे तुमी दिला आसं थोडंच आसतय.... तुमाला काय परवडतय त्ये बिनघोर बोला..... भटा बामनाचं चांगलं गिऱ्हाईक मला हातचं सोडायच न्हाई. रोखीनी येव्हार करनार म्हनताना जुळवून देतो घ्या.... आनी आपला टरक हाये सवताचा.... तुमाला कोकनात घरापातूर पोच सामान देतो.... भाडं नी हमाली तांबडा पयसा बी देवू नगासा!”
बापूनी पाटलानी सांगितलेल्या रक्कमेत पाचशे रुपये कमी मागणी केली. निम्मे पैसे बसल्या बैठकीत आणि निम्मे सामान पोच केल्यावर अशी बोलवा फोडली. क्षणाचाही विलंब न करता पाटलानी टाळी दिली नी बापूना दक्षिणा म्हणून दिडशे रुपये सोडले. दुसऱ्या दिवशी सामान भरून कोल्हापूर मार्गे निघायचा बेत झाला. शानू मेस्त्रीना सांगून दोन दिवस भिमरावाना सोबत न्यायचे. इंजिन, प्रोजेक्टर सुरु करायची नीट माहिती करून घ्यायची असा बेत ठरला. सकाळी उठल्या उठल्या पाटलानी सहा कामगार आणले नी मंडळी कामाला लागली. तंबूचं छत नी कनातीची कापडं झटकून त्यांच्या शिस्तवार घड्या घालून आटोपशिर बोचकी बांधली. इतर सामानाचीही बेताची ओझी केली. कनाती उभ्या करायला वापरायचे लोखंडी पाईप न्यायच्या सामानात घेतले. बाकांसाठी वापरायच्या सहा फुटी फळ्या, बांबूचे, आणि काठ्यांचे तुकडे गावी पुरळला मिळणारे होते. म्हणून ते सोबत घेतले नाहीत . सामान भरून दहा वाजता ट्रक सुटला.
रत्नू ढमाले हा पोरगा हुन्नर म्हणताना बापूनी प्रोजेक्टर ऑपरेटर म्हणून त्याला मुक्रर केला. शिवाय वेळे गरजेला गुंडू होताच. गावी गेल्यावर बापूंच्या अंगणात प्रोजेक्शन केबिन उभी केल्यावर ओसरीवर स्क्रीन बांधून डॉक्युमेंटरीचं एक रीळ सगळ्यानी बघितलं. स्वत:ची चक्की असल्यामुळे इंजिन सुरु करण्यापासून तो दुरुस्ती पर्यंत सगळ्या कसबात गुंडू मुरलेलाच.... भिमरावाने एकदा दाखवल्यावर प्रोजेक्टर कसा हाताळायचा, आर्क लॅम्पच्या कार्बन कांड्या कशा सेट करायच्या, स्क्रीन कसा लावायचा, रिळं कशी बदलायची, तुटलेली फिल्म कशी जोडायची, जाहिरातीच्या स्लाईड कशा बनवायच्या ही त्या व्यवसायातली कसबं गुंडूने आत्मसात केली. तांत्रिक ज्ञान हे वाडयांच्या नसानसातून रक्तासारख़ं वहायचं. अभिमन्यू चक्रव्यूह भेद गर्भात शिकला तद्वत मशिन बघितलं की ते कसं खोलायचं ही विद्या वाडये मंडळी गर्भात शिकून आलेली. वाडये हे विश्वकर्म्याचे खरे वंशज असं बापू नेहेमी म्हणायचे. नी गुंडूच्या बाबतीत ते शब्दश: खरं होतं. त्याने दोन दिवसात रत्नूलाही या कसबांमध्ये तयार केला, नी बापूंच्या अंगणात टूरिंग टॉकिजचा श्रीगणेशा झाला. मग मळ्यात तंबू उभारण्याची, कनाती लावायची रंगीत तालिम झाली. कनाती उभ्या करायला आवती बेटातल्या पिकाव काठ्या तोडून त्याचे खुटे बनवण्यात आले. माळवदावरच्या फणशी फळ्या बाकांसाठी उजु करून झटकन जोडता येतील असे मजबूत लाकडी स्टॅंण्ड गुंडूने बनवून दिले. तिकिट विक्रीसाठी अतिशय रेखीव नी जोडता कोसळता येणारी लाकडी केबीन गुंडूने स्वत: डिझाईन करून बनवून दिली.
त्या वर्षी कुणकेश्वरची यात्रा पाच दिवसाची नी नंतर मोड जत्रेला एक दिवस असा आठवडाभराचा शुभारंभाचा दौरा नी नंतर आचरा पार, मसुरे, रामगड, कणकवली असा पूर्ण सिझनचा कार्यक्रम आख़ण्यात आला. बापू हे ओळखून होते की बाजार वस्तीच्या गावानी धंदा करायचा म्हणजे सगळ्या बाजूनी- प्रसंगी दोन देवून दोन घेवून रहाणारी तल्लख माणसं हवी. गावावरून ओवाळून टाकलेले पण त्यांच्या वगीतले जग्या परीट, पुर्षा भंडारी, सदू तेली ह्याना हाताशी घ्यायचे त्यांनी ठरवले. मी सातवीची व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा पास होवून घरीच होतो . माझ्या वडिलांचा नी बापूंचा घरोबा .... हिशोब आणि आर्थिक बाबी सांभाळायला मॅनेजर म्हणून महिना सोळा रुपये पगारावर मला घेतले. ऑपरेटर म्हणून रत्नू ढमाले नी त्याची आई एकटीच म्हणून सगळ्याना जेवण करून घालायला म्हणून तिलाही पगारी कामगार म्हणून घेतले. त्यावेळी सिनेमाची रिळं कोल्हापुरहून आणीत. दर आठवड्याला ते ठरीव कामच असायचे .म्हणून या कामासाठी आणि वेळे गरजेला रत्नूच्या हाताखाली असिस्टंट म्हणून गुंडूचा पुतण्या केशव अशी सातजणांची टीम सजली. या खेरीज गर्दीच्या वेळी कनातींकडे लक्ष ठेवायला म्हणून ज्या गावात मुक्काम असेल तिथले एक दोन रिकाम टेकडे लोक चार आठ आणे मजुरीवर घ्यायचे असा सगळा बेत योजून दिला. अधूनमधून वेळ मिळेल तेव्हा बापू स्वत: खेप करणार होते.
टुरिंग टॉकिज चा कारभार कसा चालतो हे पहायला बापू आम्हा सहाही जणाना चार दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर घेवून गेले. पन्हाळ्यात भीमराव पाटलांच्या पाव्हण्याची टुरिंग टॉकिज मुक्कामाला होती तिथे आम्ही चार दिवस मुक्कामी राहून आलो. या दौऱ्यात टॉकिजच्या व्यवसाची बारीकसारीक माहिती आम्हाला मिळाली. यात्रेपूर्वी दोन दिवस आम्ही कुणकेश्वर ला रवाना झालो. बापू सोबत होते पण ते फक्त बघ्याची भुमिका घेणार नी दौरा संपल्यावर काय चुकले तेवढेच सांगणार असं ठरलं.मॅनेजर म्हणून सगळ्या नोकरानी माझा शब्द पाळायचा अशी सक्त सुचनाही दिलेली होती. कुणकेश्वरला उतरल्यावर बापू लगेच त्यांच्या स्नेह्यांकडे गेले. सामान उतरून झाले. मी सगळ्याना एकच विनंती केली. “ज्याची त्याची कामं ठरवून दिलेली असली तरी आपण एक पथ्य पाळायचं की, ज्याला जे काम समोर अडलेलं दिसेल ते त्याने करायचं . रोज सकाळी नाष्ट्याच्या वेळी आदल्या दिवशी कोणी काय चूक केली ते सर्वांसमोर सांगायचं. मी सुद्धा कोणाला हुकुम सोडणार नाही.ज्याने त्याने समजून आपापलं काम करावं.” आमचं काम सुरु असताना चार-पाच रिकाम टेकडे बापये जमले. आतली काही कामं उरकायला थोडी मदत हवी होती.मी रत्नूशी चर्चा करून त्यातल्या दोघा तिघाना विचारलं. यात्रे पुरती जेवणासह सगळीच व्यवस्था तंबूत करायचं ठरलेलं. दोन पोल पुरुन तंबू उभा झाल्यावर बाजूच्या कनाती उभ्या केल्यावर आम्ही प्रातर्विधीसाठी चर खोदायचं काम आधी पूर्ण केलं. मदतीला तिघे कामगार घेतल्यामुळे काळोख पडेपर्यंत बरीच कामं मार्गी लागली.
कामं उरकून सगळेजण हायसे टेकलो. अजून जेवायला तासभर अवधि होता. पुर्षा माझ्या कानाशी लागत हळू आवाजात म्हणाला, म्यानेजर सायब .... “काम करून आंग निस्ता मोडॉन ईलाहा… आजचो दिवस मी जगो नी बाबू वायच नवटाक मारून येताव....अगदी अंगाबरोबर घेतव नी काय अतिरेक पन आमी करणार नाय ” मला बापूनी या गोष्टीची कल्पना दिलेली होती. “कोणाला संशय येणार नाही इतपत अगदी बेताने घ्या, आणि एकदम न जाता तिघानीही आळीपाळीने जावून या.” या अटीवर मी त्याना परवानगी दिली. जेवणं झाली. ज्याने त्याने आपापलं ताटवाटी घासून टाकायची असं ठरलेलं असल्यामुळे मी ताट घासायला घेण्यापूर्वी जगु आला नी माझ्या हातातलं ताट ओढून घेतलं. “ म्यानेजव (तो चोचरा बोले) सायबानी आपला ताट धोयाचा नाय... ” थोडा वेळ गप्पा मारल्यावर दोन दोन बाकडी जोडून आम्ही झोपलो. प्रवेश द्वारात जगू त्याच्या पुढे पुर्षा नी सदू आडवे झालेले असल्याने आम्ही बिनघोर झोपलो.
सकाळी उठल्यावर मी बाहेर चक्कर मारून आलो. पोह्यांचा नाष्टा करताना मी कालच्या कामाबद्दल बोललो.“ काल सर्वानी आपाआपल काम अगदी चोख केलं. त्यामुळे आज दुपारला सगळी व्यवस्था चोख पणे मार्गी लागेल. ” मग रत्नू म्हणाला,“कलची एक गोष्ट म्यानेजर सायबांच्या लक्षात इली नाय..... कल सांजचे जगो,पुरसो नी सदो दारु खावन् इले... ह्या आपल्याक बरोबर वाटणां नाय ” त्यावर मी म्हणालो, “ते सदीचे घेणारे आसत.... नी माका इचारूनच ते गेले हुते. जरा वास इलो असात पन ते एकेकटे जावन येळ न घालवता इले नी काय्येक अतिरेक केलेलो नाय. ही गोष्ट सोडॉन देवया... मातर तेनी झिंगान पडासर खायाची नाय....नी सांगल्याशिवाय भायर जायाचा नाय. ह्या बाबतीत आपून तेंका सूट देवया.” माझं बोलणं ऐकल्यावर सगळ्यानीच माना डोलावल्या. नाष्टा चालू असताना कालचे तिघे कामगार हजर झाले. नाष्टा करून सगळे कामाला लागले. प्रोजेक्टर नी स्क्रीन सेटिंग असल्यामुळे रत्नू नी केशव ला बिगारी कामातून वगळले. काल कनात तात्पुरती अडकवलेली होती. आज पक्की बंदस्ती सुरु होती. त्याचवेळी जत्रेला आलेले पाचसहा व्यापारी मला भेटायला आले. जत्रा सुरु झाल्यावर जो तो आपल्या धंद्यात अडकणार असता. म्हणून आज त्यांच्यासाठी संध्याकाळी एखादा खेळ दाखवावा असं त्यांचं म्हणणं होतं. नियोजना प्रमाणे उद्यापासून साडेतीन ते रात्री साडे बारापर्यंत तीन खेळ ठरलेले. तरीही मी रत्नूला बोलावून विचारलं. सगळी जुळणी होत आलेली असल्यामुळे काही अडचण नव्हती. संध्याकाळ पर्यंत जत्रेत दोन तीन ठिकाणी बोर्ड ठेवले की पब्लिक आलं असतं. आबे हयात, डाकू मानसिंग, सतीपरीक्षा हे हिंदी नी सत्यवान सावित्री,भक्त प्रल्हाद,सावता माळी, प्रपंच, बहिणाबाई या मराठी सिनेमांची रिळं आणलेली होती. त्यानी सत्यवान सावित्री निवडला.
अचानक पणे संध्याकाळचा शो ठरला नी सगळ्यानाच हुरुप आला. स्क्रीन सेट केल्यावर केशव बोर्ड रंगवायला बसला. तीन हात लांब नी दोन हात रुंद लाकडी पट्टीच्या फ्रेमवर मांजरपाट ताणून बसवलेला होता. त्यावर लाल गेरू, पिवडी, नीळ ह्या तीन रंगात बोर्ड असायचा. वाडयांचा गणपतीचा कारखाना असल्यामुळे ते मुंबईवरून वेगवेगळ्या रंगाच्या पावडरी आणायचे. त्यातले रंग नी ब्रश केशवने आणलेले. बोर्डावर प्रदीप टुरिंग टॉकिज प्रोप्रा. महादेवबापु वेलणकर, त्याखाली महान पौराणिक मराठी सिनेमा सत्यवान सावित्री नी त्या खाली तिकिट दर जमिन‌- आठ आणे, बाक- बारा आणे, स्टूल- एक रुपया, खुर्ची- दीड रुपया, 3ते12 वर्षापर्यंत मुलाना निम्मे तिकिट असा मजकूर लिहायचा असे. पेटी बरोबर चित्र दिलेलं असेल तर मग अक्षरं लहान काढून टॉकिजच्या नावा खाली चित्र डकवायचं असे. केशवने कसब पणाला लावून मस्तपैकी बोर्ड रंगवले. ह्या सिनेमाच्या पेटीसोबत तीन चित्रही मिळालेली होती. आमची गडबड सुरु असताना बापू आले. सगळी तयारी पुरी करून आम्ही एक दिवस अगोदर मुहूर्ताचा खेळ जाहीर केला याचा मोठाच आनंद त्याना झाला.
साडेसहाचा शो असला तरी चार वाजल्या पासूनच माणसं जमायला लागली.मग आम्ही गाण्याच्या बांगड्या (रेकॉर्ड) वाजवायला सुरुवात केली. खेळ साडेसहाला सुरु होणार असं दोन चार वेळा अनाउन्स करूनही लोकं सतवायला लागली. तुमी तिकटी द्येवा आमी भुतू जावन बसताव... मग पावणे पाचलाच तिकिट विक्री सुरु करून माणासाना आत सोडायला सुरुवात केली. मंदिराच्या उत्तरेला मोकळ्या मळ्यात भरपूर जागा मिळलेली . म्हणून पडद्याच्या मागे ऐसपैस जागा होती. लोकाना सिनेमा हा प्रकारच नवीन असल्यामुळे काही लोकं मागच्या बाजुला जागा अडवून बसली. हळुहळु गर्दी वाढायला लागली. जत्रेला दुकानं घेवून आलेले झाडून सगळे व्यापारी सिनेमाला आले नी पावणे सहालाच बाक आणि स्टुलाची तिकिटं संपली. पुढच्या पंधरा वीस मिनिटात खुर्च्यांचीही तिकिटं संपली. आत बसलेली माणसं कंटाळून ,ओ सिनेमावाले आता सुरु करा म्हणून बोंबलायला लागले .मग मुख्य खेळ सुरु करीपर्यंत दोन तीन डॉक्युमेंटरी दाखवूया असं ठरवलं.
साडेसहा पर्यंत तंबू तुडुंब भरला.पडद्यासमोरची जागा भरली तरी माणसांची रीघ कमी होईना. जगू,बाबू नी पुर्षा हातात दांडे घेवून “सरकून बसा .... ह्यो केवडो जागो आडवलास... जरा सरक, बाकीच्यांक जरा जागो द्येवा ..... ”असं धमाकावून- ओरडून दमले. पुढची जागा भरल्यावर माणसं समजुतदारपणे विरुध्द बाजुला पडद्याच्या मागिल बाजुला बसली. एकूण अंदाज घेवून खेळ सुरु झाल्यावर तिकिटबारी बंद केली.तरी लोकं आत सोडायला विनवण्या करीत राहिली. मी ग़ेटला आडवे दांडे बांधून पब्लिकला आवरण्यासाठी जगू बाबूना दांडे घेवून उभे केले. लोक सांगायला लागले , ह्यो सिनेमो कदी सोपणार? त्येनंतर आमका तिकिटी भेटती काय? मीठ मुंब्र्येपासना मुद्दम सिनेमो कसो आसता तां बगुक इलव ना आमी .... एकंदर रागरंग नी गर्दीचा अंदाज घेवून मी रत्नूशी बोललो नी साडे नऊला पहिला शो सुटल्यावर “सती परीक्षा ” सिनेमा दाखवायचा असं ठरवलं . बाबू, जगू ,पुर्षा यांचही तेच मत पडलं . अडचण फक्त आमच्या जेवणाचीच होणार होती ..पण आम्ही त्याची फिकीरच केली नाही. बेत नक्की ठरला. सिनेमा थांबवून मी कर्ण्यावरून तशी घोषणा केली तेंव्हा बाहेरच्या पब्लिकचा कालवा थंड झाला. केशवने दुपारी बारा बोर्ड तयार केलेले होते त्यातला पुढचा खेळ “ सतीपरीक्षा ” हा बोर्ड गेटात नेवून ठेवला. त्यावेळी बापू आले.
त्याना नी सोबतच्या माणसाना आत घेतल्यावर, ह्येंका कशे भुतू घितलास.... आमकाव घ्येवा म्हणून गिल्ला करायला लागल्यावर जग़ू चवताळला ......“ह्यो दांडो बगलस... आँ म्यानेजवला धमकी देते... तू काय समजलास....ह्ये टाकीच्ये मालक हायत ...” म्हणत दंडा परजित तक्रारदारांच्या अंगावर धावून गेला. बापूनी त्याला आवरलं नी बोलले “आम्ही सिनेमा बघायला आत जाणार नाही इथेच थांबणार आहोत.” पुढच्या खेळाला अजून अवकाश आहे म्हणताना लोक जरा पांगले. सलग दोन शो लागल्यामुळे जेवणाची पंचाईत होणार हे ओळखून पुढच्या सहा दिवसांकरिता गावातले चार गडी शोच्या वेळी ठेवा म्हणजे खेळ सुरु असताना आळीपाळीने जावून जेवून यायला मिळेल, असं बापूनी सुचवलं . तसच सगळ्यां साठी दोन दोन प्लेट भजी नी रवा लाडू मागवले. त्यावेळी प्लेट म्हणजे भली खाशी बचकभर भजी मिळायची. सोळा प्लेटींची मोठी ऑर्डर दिली म्हणताना हॉटेलवाल्याने अर्धी बुट्टी भरून भजी धाडली. भजी लाडू खावून पोटाला चांगलाच आधार लागला.
साडेनवाच्या शोला खुर्च्या नी स्टुलं यांची निम्मे-शिम्मे तिकिटं गेली नी पडद्याच्या मागच्या बाजूला लोकं जरा कमी होती इतकच .मुहूर्ताच्या दोन्ही खेळाना चांगला गल्ला झाला. ह्या खेळाला एकेक रीळ संपल्यावर ते उलट भरण्यात वेळ न दवडता पुढचं रीळ सुरु केल्या मुळे बारा वाजण्यापूर्वीच खेळ संपला. त्यानंतर आम्ही जेवलो. त्यावेळी सिनेमाची दाखवलेली रीळं परत उलटी गुंडाळून भरायचा मोठा ख़टाटोप असे. म्हणून एक रीळ संपल्यावर खेळ थांबवून ते उलट भरून घेतल्यावर पुढचं रीळ चढवीत. एका सिनेमाची चार रीळं असत. दुसऱ्या खेळाच्या वेळी रत्नूने चारही रीळ सलग दाखवून दुसरे दिवशी ती उलट भरून घेतली. गुंडूचा पुतण्या केशव हा हुन्नरबाज. त्याने कुणकेश्वरातल्या पाव्हण्याला गाठून संध्याकाळ पर्यंत लाकडी रिपांच्या फुल्या बनवून त्या स्टँड ला फिट करून अॅक्सल ला लोखंडी बादलीच्या कडीची शीग बसवली. या फुलीत फिल्मचं रीळ बसवायची सोय होती. अॅक्सल ला हँडल्सारखा शेप देवून लाकडी मूठ बसवली. हाताने हँडल फिरवून फिल्मचं रीळ भरायला या फुल्यांचा चांगला उपयोग व्हायला लागला . या कामाला मशिनपेक्षा थोडा जादा वेळ मोडे खरा पण एक जण शो दाखवीत असताना दुसऱ्या माणसाला दाखवलेलं रीळ उलट भरून ठेवता येण्याची सोय झाली. पुढे मार्चमध्ये टॉकिज कणकवलीला असताना केशवने दोन जुनी बॉल बेअरिंग पैदा करून ती अॅक्सल ला फिट केल्यावर फुल्या वेगाने फिरायला लागल्या नी मशिन इतक्या कमी वेळात रिळं भरता येवू लागली.
जत्रेत दोन दिवस आमच्या सगळ्याच खेळाना भाऊतोबा गर्दी व्हायची. पहिल्या दोन खेळाना तर लोकं आवरणं मुष्किल व्हायच. पुर्षा नी जगू ह्यानी दुपारी अडिचला जादा शो लावायची सुचना केली. आम्ही निवडलेल्या जागेभोवती झाडकळ असल्यामुळे मध्यान्ह झाल्यावर तंबूत काळोखी असे. आम्ही दीड वाजताच्या सुमाराला डॉक्युमेंटरी सुरु करुन बघितली. आर्कलॅम्पचा फोकस जरा प्रखर केल्यावर चित्र बरं दिसायला लागलं. पुर्षा जगू ह्यानी स्क्रीनच्या माथ्यावर कनातीचा उरलेला तुकडा ताणून बांधल्यावर तर चित्र चांगलच स्पष्ट दिसू लागलं. आम्ही लगेच अडीचचा स्पेशल शो जाहीर केला. अडीज ते पाच, पाच ते साडेसात, साडेसात ते साडेनऊ नी अर्धातास जेवणा साठी गॅप ठेवून दहाला शेवटचा शो असं नवीन वेळापत्रक बसवलं. एक शो झाल्यावर प्रोजेक्टर चांगला थंड झाल्याशिवाय रत्नू पुढचा खेळ सुरु करीत नसे. त्यामुळे शोच्या वेळेत पंधरा मिनिटं इकडे तिकडे व्हायची एवढंच. मी रत्नू, पुर्षा नी बाबू याना शोच्या दरम्याने दोन वेळा नवटाक मारायला एक एक आणा टॉकिजच्या खर्चातून देई. मोड जत्रेलाही दोन दिवस दुपारी नी संध्याकाळी दोनच खेळ ठेवले , जास्त गर्दी नसली तरी बरा गल्ला जमला.
कुणकेश्वर चा दौरा आटोपल्यावर बापूनी नोकरांना कोंबडं खायला पैसे दिले. शिवाय सातही जणाना पाच-पाच रुपये बक्षिसी दिली, कामात कोणाकडूनही कसूर झालेली नव्हतीच.“ टुरिंग टॉकिज ही माझी नी तुमची भाकरी भाकरी आहे..... हे समजून हा धंदा आपला म्हणून सांभळलात तर अजून पंचवीसेक वर्षं तरी ह्या धंद्याला मरण नाही ..... तो जगवणं - बुडवणं तुमच्या हातात....” बापूंचे बोल हृदयात साठवून टीमने खरोखरच पुढची पंचवीस वर्षं धंदा जगवला. मी खर्चाचा कागद नीकॅश बापूंकडे दिली. जगू, पुर्षा नी सदू त्रिकूटाला नवटाक मारायला दिलेल्या पैशांबद्दल त्यांचा काही आक्षेप आला नाही उलट “ त्याना अधूनमधून पैसे देत जा... म्हणजे ते बेतालपणा न करता मर्यादेत ऱ्हातील ” असा कानमंत्र बापूनी मला दिला. कुणकेश्वरनंतर आचऱ्याला सामान हालवल्यावर चार दिवस सुटी मिळाली. आचरा तिठ्याजवळ उजव्या बाजुला मळ्यात तंबूसाठी जागा निवडली.
आचऱ्याला रोज सहा ते नऊ नी साडेनऊ ते साडेबारा असे दोन खेळ आम्ही लावू. दर आठवड्याला नवीन सिनेमा ठेवीत असू. आठवडा बाजारच्या दिवशी दुपारी साडेबाराला स्पेशल खेळ ठेवीत असू. स्क्रीनच्या माथ्यावर पाच हात रुंद नी बारा हात लांब काळ्या कापडाचा पडदा आणि कनातीच्या माथ्यावर उजेडाच्या माऱ्याची जागा बघून तिथेही दोन हात रुंदीचा लांबलचक फाळा लावल्यामुळे स्क्रीनवरची चित्रं स्पष्ट दिसायची. लाखाची गोष्ट, महात्मा, देवघर, रानपाखरं, दोन घडीचा डाव अशा मराठी सिनेमांची रिळं बेताच्या भाड्याने मिळत . हिंदीतले ही कमी भाड्या चे सिनेमे आम्ही आणू. त्या काळी गाजत असलेले देवानंद, राजकपूर, दिलिपकुमार यांची नावही आमच्या भागात कोणाला माहिती असण्याचं कारणच नव्हतं नी त्यांची रिळं आम्हाला परवडणारीही नसत. रामायण महाभारतातले कथाभाग आणि बहुपरिचित राजे, ऋषि- मुनी यांची नावं असलेले पौराणिक नी साधू संतांची नावं असलेले धार्मिक सिनेमे लागले की तंबू माणसानी भरून वहात असे. लोकंही अशी समंजस की , जादा गर्दी झाली तर पडद्याच्या मागच्या बाजूला बिनतक्रार बसायला तयार असायची. जमिनीचं आठ आणे तिकिट ही न परवडणारे बाया -बापये तिकिट बारीवर न येता प्रवेशद्वाराजवळ उभ्या असणाऱ्या पुर्षा जगू यांच्याकडे चवली- पावली (दोन- चार आणे) पुढे करून, “एवडेच हत रे .... तुमी सांगशा थय बसान ...माका सोड भुतू..” असे गयावया करीत की ते, “ मॅनेजर सायबांक इचारतय् ” असं म्हणून मला गाठीत. त्याना आत सोडल्यावर घेतलेली चवली पावली माझ्याकडे आणून देत किंवा तिकिटबारीवर गल्ल्यात नेऊन टाकीत. ती माणसं व्यसनी असली तरी अप्रामाणिक नव्हती आणि दरवेळी मला विचारायला नका येऊ असं म्हटलं तर, “छ्या.... छ्या तो आमचो अधिका र नाय ”असं उत्तर देत. काही वेळा आमच्या जथ्यातल्या कोणाचे तरी पै-पाव्हणे आले तरी माझी परवानगी घेतल्याशिवाय कोणीही त्याना परस्पर आत सोडित नसत.
मी चार वर्षं मॅनेजरकी केली, पण कनाती वर करून घुसणं , गर्दीच्या वेळी हुल्लडबाजी करून घुसणं असले प्रकार ज्या देवगड,मालवण ,कणकवली भाग़ात आम्ही फिरलो तिथे कधिच अनुभवाला आले नाहीत. इंटर्व्हलनंतर कोणी चुकार.... तेही पोरबाळं घुसायचे नी आम्हीही त्याकडे लक्ष देत नसू. मुणगं पोयरं इकडची माणसं सुकतीचं ताण बघून खाडी पलिकडे यायची. काही वेळा अंदाज चुकायचा नी सिनेमाचं पाव रीळ संपत आलेलं असताना, तिकिट बारी बंद झाल्यावर माणसं यायची. मी प्राय: प्रवेशद्वारात खुर्ची टाकून बसत असे. उशिरा आलेली माणसं बहुसंख्येने असतील तर अशावेळी आम्ही कर्ण्यावर निवेदन करून खेळ थांबवून रिळ उलट गुंडाळून सिनेमा पुन्हा पहिल्यापासून दाखवीत असू. माणसं कमी असली तर अर्ध्या तिकिटात आत सोडित असू. ऐतिहासिक, धार्मिक सिनेमे आणू त्यावेळी शाळेतल्या मुलांसाठी निम्मेदरात स्पेशल खेळ लावीत असू . अशावेळी चिंदर, त्रिंबक, वायंगणी, पिरावाड या गावानी शाळांमध्ये माणसं पाठवून आगावू कळवित असू नी अशा खेळाना तुफान गर्दी व्हायची. काही वेळा विशेषत: पौराणिक/ धार्मिक सिनेमांना बाहेरगावच्या माणसांची भयानक गर्दी व्हायची अशावेळी पडद्याच्या मागची जागाही भरल्यावर तिकिटबारी बंद होई. पण लांबून आलेल्या माणसातले जाणते भेटून , “तुम्ही लय थोडे पैशे घ्येवा पण आमका निरूस करू नुको” अशी गळ घालित. मग आम्ही सरळ कनाती गुंडाळून ठेवीत असू . आड संधीला अडीज तास बिनतक्रार उभं राहून माणसं सिनेमा बघित.
टुरिंग टॉकिज बेळण्याला असताना जुना हिंदी सिनेमा सती अनसूया चा साडेनऊचा खेळ सुरु झाला. सिनेमाला तुफान गर्दी झालेली. खेळ सुरु होवून वीसेक मिनिटानी तिकिट बारी बंद होता होता दोघेजण धावत आले. त्याना खुर्चीची आठ तिकिटं हवी होती, पण तिकिटं संपलेली होती. जमिनीचीसुद्धा पडद्याच्या मागच्या बाजूला बसून बघायची तयारी असेल तरच तिकिटं काढा आणि खेळ सुरु होवून वीस मिनिटं झालेली आहेत याची स्पष्ट कल्पना केशवने त्याना दिली. त्यानी मग जमिनीची तिकिटं घेतली. चारपाच मिनिटानी त्यांचे सोबती आल्यावर सगळे आत गेले. पुर्षाने त्याना पडद्याच्या मागच्या बाजुला जायची खूण केली. त्यांच्यापैकी एकजण छाती पुढे काढीत धमकावणीच्या सुरात म्हणाला, “अरे गांडो.... साला तू काय समजला रे मला ...... आम्ही काय च्युत्ये हाय काय ..? टाकी फुल झाल्यावर तिकिटा कशाला दिली?” त्यावर त्याच्या सोबत असलेला माणूस म्हणाला,“ गजादादा तेंची काय चुकी नाय... बारयेरच्या माणसान सांगल्यान आमका, लय गर्दी हा म्हणान ... तो तिकिट द्येयत नवतो पण मीच चलात म्हणान सांगान तिकिटी घितलय...!”
आतून बाचाबाचीचा आवाज ऐकला म्हणून जगुला घेवून मी आत गेलो. मला बघून पुर्षा म्हणाला, “म्यानेजर सायब ह्यो कोन झिंगो ईलो हा नी काय वार्ता करताहा बगा... ” हे ऐकल्यावर त्या माणसाने खिशातून रामपुरी चाकू काढला नी पुर्षाच्या छातीवर टेकवून म्हणाला, “साला झिंग्या कोनाला बोलतोस? मी तुझ्या बापाच्या पैशाची पिलो काय? मी मुंबईतून तडिपार झालेला मवाली हाय....साला लय आवाज करशील तर तुजी टॉकीज पेटवून द्येल आपून.” हे शब्द ऐकल्यावर मात्र पुर्षाची कवटी सरकली. पुर्षा अंगाबरोबर लावून होता नी तो जातीचा भंडारी....जीवाला भिवून शेपूट घालणारा पुळचट तो थोडाच होता? ‘टॉकीज पेटवून देईन ’ हे त्याचे शब्द पुर्षाच्या जिव्हारी लागले.... काय होतय हे कळण्यापूर्वी त्याने चाकूवाल्याच मनगट पकडून त्याला रेटीत बाहेर ढकलित नेला नी मोकळ्या जागेवर जाता क्षणिच त्याचं मनगट धरून मागे जात त्याचा डावा हात मागे खेचून त्याला तोंडावर उपडा पाडला. त्याच्या हातातला चाकू आता पुर्षाच्या हातात होता. त्याच वेळी झटक्या सरशीपुढे होत जग़ूने त्याला जमिनीवरच दाबून धरला.
आतल्या प्रवेश द्वाराशेजारी सिनेमा बघित असलेले चार पाच पोरगे पुढे आले. मी आवाज चढवून त्यांच्यावर ओरडलो, “तुमी मागे होवा बगू....कायय झालेला नाय उगाच हुल्लड क्येलास तर खेळ बंद पडात....चला भुतूर नी शिनेमा बगा.... ” माझ्या ओरडण्याचा परिणाम झाला. ते पोरगे ‘काय... नाय ...काय नाय ’ करीत बकिच्याना समजवायला लागले नी , वातावरण निवळले. चाकुवाल्याची मिजास आता पुरती जिरली होती... त्याचे सोबती रदबदली करायला पुढे येत जगूला म्हणाले,“ सोडा त्येका, जरा जादा लावल्यान काय अतिरेकपान करूची सवयच हा त्येका.... तो काय बोललो ता मनार नुको घेव तुमी. आमी चुकी मागताव तुमची ....आता जावने.... ” मग जग़ू बाजूला झाला नी चाकूवाला उठून बसला. त्याचे सोबती पुढे येत म्हणाले, “मायझया, ही मुंबय वाटली काय तुका? ह्ये टाकीवाले धा गावचा पानी खालेले हत... तुज्या रामपुरीक हय कोन भिनार नाय.... तेनी काय खोटेपान केल्याला नाय....बेळण्यातले प्वॉर इले ना तर तुका मोडून घालती.... आता गप पणान् शिनेमो बग चल... ” इंटर्व्हलला बेळण्यातल्या लोकांकडून आम्हाला कळलं की तो चाकूवाला खरोखरच मुंबईतून तडिपार झालेला आहे. लोक म्हणाले, “तुमी भिया नुको तेची दादागिरी तेच्या गावात... कोन हय येवन धक्को लावता बगूया ....आमी आसव तुमच्या मागे...! ”
टुरिंग टॉकिज कणकवलीला हलवली तेव्हा बापूना सांगून आम्ही तीसेक वाव नवी कनात बनवून घेवून तंबूचा आय वाढवला. आमचा अंदाज खरा ठरला इथे कायमच आचऱ्या पेक्षा पब्लिक थोडं जास्त असायचं आम्ही गेलो त्यापूर्वी दुसरी टुरिंग टॉकिज दोन महिने तिथे खेळ करीत होती. इथले लोक सिनेमाला सरावलेले आहेत हे ओळखून यावेळी रिळं आणायला मी समक्ष गेलो. माझी चुलत बहिण कोल्हापुरात होती. तिच्या नवऱ्याने मला जाणकार प्रेक्षकाना कोणते सिनेमे आवडतील याची माहिती दिली. या वेळेला मी दारासिंग, शेख़मुख्तार यांचे चंगीझखान, फौलाद आणि राजा गोसावी रमेश देव चे सौभाग्य, अखेर जमलं, सात जन्माचा सोबती, एक धागा सुखाचा या सिनेमांची रिळं नेली. इथेही रोजचे दोन खेळ चांगले चालायचे. रात्रीचा खेळ शक्यतो हिंदी ठेवावा लागे. चांगली पांढरपेशा समाजातली माणसं मला भेटून जात. त्यांच्या गप्पांमधूनही मला माहिती होत गेली. आमच्या वीस मे पर्यंतच्या मुक्कामात मंगू, जादुगर, भागमभाग, शेखचिल्ली , न्यू दिल्ली, दिल्ली का ठग या सिनेमानी बेफाट गल्ला मिळवून दिला. वीस तारखेला रात्री आडाळा पाऊस पडला नी आम्ही गाशा गुंडाळला.
पहिल्या मोसमातच बापूंनी धंद्यात घातलेले पैसे दुप्पटीने वसूल झाले. पुढच्या सिझन पासून दरवर्षी सर्वानाच चांगली पगारवाढ बापूनी द्यायचे . चार पाच वर्षात आमच्या जथ्यात कधिच कली शिरला नाही, की कधी कोणी कोणाचा उपमर्दही केला नाही. जगू,बाबू, पुर्षा हे व्यसनी आणि वाह्यात ठरवलेले ....त्याना जवळ केले तेंव्हा हे कसले टिकतात..... हे टॉकीज विकून खावून बापूला देशोधडीला लावतील असं भाकित लोकानी केलेलं ! काही लोकानी त्याना सावध करायचे प्रयत्नही केलेनी....! पण उलट झालं...त्यांच्या कर्तबगारीला वाव मिळल्यावर त्यांची व्यसनाधिनता मर्यादेत राहिली. मिळकतीचा शाश्वत आधार मिळाल्यामूळे त्यांची कुटुंब वर आली. साधारण दर दोन अडिच महिन्यानी टुरिंग टॉकिजचा मुक्काम हालायचा त्या वेळी हे तिघेही घरी जावून बायका मुलाना भेटून दोनतीन दिवस राहून येत. एरव्ही टुरिंग टॉकिज सोडून बाहेर रहायचा विषय आला की जगू म्हणे, “आमी कायच करणव नाय ह्या खरा .... पन बायल मानसाक कुकवाचो आदार तसो टाकीक आमचो आदार हा, नी टाकी ही आमची लक्सुमी.....!”
पाच वर्षानी अगदी अकल्पितपणे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.माझ्या मावशीच्या मिस्टरांची मुंबईत सिनेलॅब होती. त्यांच्या सोबत काम करणारा गुजराती मुलगा अपघातात गेला... त्यांचे बाहेरचे सगळे व्यवहार तो सांभळायचा. त्याच्या जाण्याचा त्यानी धसका घेतला...कसं कोण जाणे, पण त्यावेळी मावशीला माझी आठवण आली. ती पुरळला आली ....तो गोकुळाष्टमीचा समा होता नी पावसाळी टुरिंग टॉकिज बंदच असल्याने मी रिकामाच होतो. आई दादांशी तिचं काय बोलणं झालं न कळे... “उद्या तू निमा मावशीबरोबर मुंबईला जा....इथे घरात बसून रहायचा तो तिच्याकडे रहा.” दादानी एवढंच सांगितलं नी मी मुंबईला गेलो. मावशी गिरगावला कांदेवाडीत रहायची. आम्ही गेलो तेंव्हा तिचे मिस्टर अनंतकाका केसात बोटं खुपसून खुर्चीत मागे रेलून बसलेले होते.
मावशीची मुलगी छाया, तिने मला लॅबमधल्या मुलाची घटना सांगितली. “ तो गेल्यामूळे त्याना एकाकी वाटतय.... तू बाकी काही करू नकोस, फक्त त्यांच्या सोबत रहा. एकदा त्यांचं गाडं रुळावर येऊ दे... तुला रहावं वाटलं तर आम्हाला गरज आहेच. तू चार पाच वर्षं टूरिंग टॉकिज सांभाळतोहेस, तसे बाबांचे व्यवहार सांभाळ ... नाही वाटलं तर गावी जा. ” दुसऱ्या दिवशी मावशी नी छाया दोघीनी अनंतकाकाना अगदी सक्तीने बाहेर काढलं. त्यांच्या कार मध्ये बसून आम्ही लॅबवर गेलो. माझ्या पूर्वीच्या जगापेक्षा हे जग वेगळं होतं . इथे पंधरा जणं कामाला होती. काका नसल्यामूळे कामं तुंबलेली होती. आम्ही गेलो नी ऑफिसचं रूटिन सुरु झालं. तासाभरात काकांचा नूर बदलला. मी पूर्वी काय करीत होतो त्याची खड्यान खडा माहिती त्यानी विचारून घेतली.
चार महिन्यांच्या अवधित नवीन कामाचं रूटीन माझ्या अंगवळणी पडलं. त्यांची बाहेरची कामं मी सराईतपणे करायला लागलो. लॅबमध्ये फिल्म्सवर प्रोसेसिंग वगैरे कामं चालत तीही मला आवडायला लागली. महत्वाचं म्हणजे माझं फायनलनंतर बंद पडलेलं शिक्षण इथे सुरु झालं. अधूनमधून जुन्या आठवणी यायच्या... इकडे येणं एवढ्या अकल्पितपणे ठरलं की बापूना भेटून उपचार म्हणून तरी त्यांच्या कानावर घालायला हवं होतं ते ही मला जमलं नाही. अर्थात दादानी ते केलं असणार याची मला खात्री होती. मी रुजू झालो नी पहिल्या महिना अखेर चाळीस रुपये पगाराचं पाकिट माझ्या हातात पडलं. मी घरी गेल्यावर ते मावशीकडे दिलं.
रक्कम माझ्यासाठी खूपच मोठी होती. दहा रुपये खर्चाला माझ्याकडे देवून तीस रुपये तीने दादाना मनिऑर्डरने पाठवले. मला खर्च काहीच नव्हता . बाहेर फिरायला काकांची कार होती. जेवण घरचंच होतं. ट्यूशनला जाई तिथली नी नाईट स्कूल ची फी सुरुवातीलाच छायाने भरलेली होती. दोन-तीन महिन्यानी दादांच पत्र आलं . पाकिटात बापूनी मला लिहीलेलं पत्रही होतं. दादानी महिनेमाल पैसे पाठवण्याची गरज नाही , खर्च भागवून उरलेले पैसे मावशीकडे साठवून ठेवावे असं लिहिलं होतं. मग मी बापूंच पत्र वाचलं. माझं इकडे येणं अकल्पित असलं तरी अत्यावश्यक आहे हे बापूना पटलं होतं नी नवीन क्षेत्र माझं भविष्य उज्वल करणारं आहे, मी पुढे शिक्षण सुरु ठेवावं असा बहुमोल सल्लाही त्यानी दिला होता . .
जी परिस्थिती असेल त्यात झोकून देवून प्रामाणिकपणे काम करायची माणसाची तयारी असली की ते क्षेत्र कोणतही असो , माणसाला यश आणि उत्कर्ष सहज साध्य होतात. लॅबमधलं प्रोसेसिंगचं काम मी वर्षभरातच आत्मसात केलं. दोन वर्षात मॅट्रिक ही पूर्ण केलं. आज सिने इंडस्ट्रित पडद्यामाग़े जी मंडळी आहेत त्यात माझंही नाव घेतलं जातं. डायमण्ड सिनेलॅबची पंचवीस टक्के पार्टनरशिप माझ्या नावे आहे. अनंत काकांच्या केबिनला लागून माझीही केबिन आहे. टुरिंग टॉकिज मध्ये माझ्या सोबत काम केलेले माझे अल्पशिक्षीत सहकारी रत्नू आणि केशव ...... बापूंचे दोन्ही मुलगे अमेरिकेत स्थायिक झाले. बापूना झेपलं तोवर पंधरा वर्षं त्यानी व्यवसाय सांभाळला नी नंतर अत्यल्प रक्कमेत रत्नू आणि केशव याना भागिदारीत टॉकिजची मालकी देऊन टाकली. जगू, बाबू, पुर्षा अजूनही “बायल मानसाक कुकवाचो तसो टाकीक आमचो आदार हा ... आमी नाय म्हंज्ये काम चलणार नाय” असं अभिमानाने सांगतात. त्याही पुढची आश्चर्याची बाब म्हणजे टूरिंग टॉकिजच्या बोर्डावर अजून “प्रोपा. महादेवबापू वेलणकर” हेच नाव आहे.
※※※※※※※※