अस्मानची चाँदनी श्रीराम विनायक काळे द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अस्मानची चाँदनी

अस्मानची चान्नी
पाणखोलातल्या मुसलमान वाडीतला पिराचा उरुस झाल्यावर तिसऱ्या दिवशी फातुची पात (मच्छिमार होडी) खाडीत लोटून मच्छिमारी करायला विजयदुर्गात रवाना झाली. हमज्या नी फातु ह्यानी खुप शिकस्तीचे प्रयत्न केले पण सगळ काम पुरं व्हायला जानेवारी महिना उजाडलाच. उरुसाच्या आधी दोन दिवस सुतारानी यच्चयावत् सगळं काम पुरं केलेनी. मग़ लगोलग करंजेलाचं चोपडाण काढून पात दर्यात लोटायला तयार झाली. फातु नी तिचा दादला इद्रूस यानी त्या वर्षि उरसाला बोलावलेल्या कव्वाल पार्टीच्या सुपारीची निम्मी रक्कम जमातीला बक्षिस केली. जवळ जवळ सव्वा वर्ष पात बांधायचं काम सुरू होतं. इद्रूस फक्त कुकवाचा धनी! खरी जिकीर केली ती फातूने आणि आपला धंदा उद्योग सोडून पडोसी हमज्या वर्षभर अक्षरश: पोटावारी राबला.
इद्रूसच्या एका डोळ्यात फुल पडलेलं, लंगडा, बुटका नी कुरडा.... छलकाटी अंगलट.एक पाय जरा आखूड नी बारीक म्हणून पाय ओढीत चालायचा. चाळीशी उलटली तरी नवेद्रात कोणी त्याला पोरगी द्यायला तयार होईना. त्याचा बापूस मुसा अट्टल मच्छिमार. लहान डुकमं (छोटी होडी) घेवून तो खाडीतच पाग धरी. त्याच्या बहिणी नी आई शेरिफा खाडी पलिकडे तिर्लोट, पडेल पर्यंत डोकीवर फाटी घेवून मासे विकीत नी बक्कळ पैसे कमवीत.शेरिफा ला हारोहार नऊ चेडी झाल्या. पिराला नवस बोलून चादरी चढवून पिर काय पावला नाही. मुसाने बाबू कुंभाराकडून बानघाटीजवळ सडावळीला पाच एकर जमिन घेतलेली. त्यात कलमं लावली. मोठी चारही चेडवं तिकडे जावून विरडभर कलमांच शिपणं करीत. शेरिफा मासे विकायला पडेलात जाई. ती चवाठ्यावर बसे तिथून जवळच वडचाईचं उघडं देवस्थान नी समोर कौल प्रासाद घ्यायची शीळा होती. बाळु घाडी, नागु घाडी नायतर भिकू तिथे कौल प्रसाद लावीत. वडचाईचा कौल वाया जात नाय ही ख्याती ऐकल्यावर एकदा शेरिफाने वीत दीड वीत लांबीच्या दोन तांबोशा नागु घाड्याला देवून आपल्याला झील व्हावा म्हणून कौल घ्यायची गळ घातली. पन त्या दिवशी काय कौल लागला नाय. त्यानंतरही दोन तीन वेळा प्रयत्न करून झाले पण दरखेपी तीन तीन तास तिष्टंती करूनही कौल काय मिळेना. शेरिफाने मग झिलु घाड्याला गळ घातली. त्याने अमावस्येला कोंबडा द्यायचा उपाय सुचवला. शेरिफाने वीस रुपये काढून दिले. अमावास्येला कोंबडा मानवून झाला. दोन दिवसानी शेरिफा चेडवाला घेवून मासे विकायला आली तेंव्हा तिच्या सामनी झिलुने कौल लावला. दुपार उलटून गेली चेडू मासे विकून आलं तरी कौल होईन. झिलूने उलटसुलट जाबसाली घातल्यावर एकदाचा पाषाण धरलान् नी देवीने कौल दिलान.वडचाईचे सत्व खरे. त्याच महिन्यात शेरिफा पोटुशी ऱ्हायली. लंगडा कुरडा कां होईना मुलगा झाला.
पावसाळी चतुर्थी नंतर पाऊस कमी होई. तो सरत्या पावसाचा काळ. तेव्हा कुंभवडे, नाणार, चिवारी, उपळे ह्या गावानी भादव्यात सिलिपाटवाले सागवान, आईन, किंदळ अशी इमारती लाकडाची जोरदार तोड करून लाकडाचे ओंडके सोलून धुपायला व्हाळात डाळून त्यावर मोठमोठे दगड परतून ठेवीत. काही वेळा अवचित पणे जोराचा पाऊस सुरू होई चार चार दिवस संतत धार पाऊस कोसळत राही. व्हाळाना जोरकस पूर येई नी व्हाळात डाळलेले लाकडाचे ओंडके उपेवून व्हावणीला लागत नी खाडीच्या प्रवाहात व्हावून जात. तिथे पाण्याला एवढा वेग नी व्हावटी की वहात जाणारे ओंडके क्षणार्धात नपश्चात होत. खाडी पुढे वहात जावून विजयदुर्गात अरबी समुद्राला जावून मिळायची. चिवारी च्या अलिकडे आंबेरकर वाडी पासून खाडीचे पात्र रुंदावत गेलेले. त्यामुळे तिथे व्हावटीचा जोर बराच कमी होई. तसेच भरती च्या पाण्याचा उलट बाजूने रेटा वाढला की पाण्याला फुग पडे नी खळालीही कमी होई. पाणी एवढे चढायचे की चार पाच दिवस अलिकडे पलिकडे होडी वाहतुक बंद असे. तशा भीषण परिस्थितीतही मुसलमान वाडीतले काही उलट्या काळजाचे पोर नी बापये होडकी घालीत नी व्हावटीत आलेल्या लाकडाच्या गंडोऱ्या आडावून किनाऱ्यावर आणीत.
इद्रूसचा बापूस मुसा तर जब्बर पोहोणारा तो बीन उंडलीची होडी जोरगतीच्या व्हावटीच्या पाण्यात लोटून पुरात वाहून आलेला बराच सिलिपाट जमवीत असे. अलीच्या सहा नंबरच्या बहिणीचं लग्न झालं ती चिवारीतच वाडीतल्या वाडीत दिलेली. त्या वर्षी तुफान पाऊस पडला. चार दिवस संततधार पावसात पाण्याला फुग पडली व्हावटीच्या पाण्यात बरंच लाकूड सामान व्हावून आलेलं दिसायला लागलं. काळवं पडायला जेमतेम अर्धा घंटा राहिला असेल नसेल नी मुसाने डुकमं खाडीत लोटलं. या खेपी नवा जावई हसन ही बरोबर होता. दोघानी सिकस्त करून पाच सहा टवण्या पलिकडच्या थडीला दौलतराव राण्याच्या मळ्याखाली पाज्यात लोटल्या नी वर ओढून ठेवल्या. पाउस थांबून सगळ स्थिरस्थावर झाल्यावर कधीही त्या नेता येणार होत्या. अगदी झुंजरूक पडलेलं बघून "आता वापीस जावया ' असं जावई म्हणाला म्हणून मुसा नी तो परत निघाले मधली धार कापुन पुढे जात असताना व्हावटीत आलेली मोठी टवणी दिसली. मुसाने लगेच रशीचा फास टाकला नी जावई सासरा नेटाने वल्ही मारून तीराकडे जायची शिकस्त करू लागले. त्याच दरम्याने ओहोटीचा जोर सुरु झाला. धरलेली लाकडाची टवणी आहारा बाहेर जड ओहोटीच्या जोराबरोबर होडकं डगडगायला लागलं किनारा गाठणं दूरच , होडीखालच्या दिशेने वहायला लागली.
सोसाट्याची वाऱ्याची कावटी आली नी त्याबरोबर होडी उलटली. त्या गडबडीत हातातलं वल्हंही सुटलं. घाबरलेला हसन म्हणाला, " आग लागो त्या टवणीक्, रशी सोरून घे आनी तड गाटुया...." सासऱ्याची वाट न बघता तो छलांग मारीत काठाच्या दिशेने पोहत निघाला. मुसाची हाव मात्र सुटेना. उलटलेली होडी पोटाखाली घेवून हाताने पाणी कापीत काठाच्या दिशेने पाणी कापीत पुढे जायची शिकस्त केली. काळोखात आपण कुठे चाललो याचा अंदाज आला नाही. काठ गाठण्या ऐवजी टवणी मधल्या धारेत गावली नी सुकतीच्या ओढीमुळे वेगाने व्हावणीला लागली. जावई जीव वाचवून कसाबसा मुसलमान वाड्यापासून तीनेक मैल खाली नावळे वाडीच्या तडीला लागला. किनारा गाठून जरा दम खाल्ल्यावर आपण नावळ्यात कुंभार वाडीत आलो हे त्याने ओळखलं. कळोखात चाचपडत कसंबसं परम्या कुंभाराचं घर गाठलं. झाला प्रकार त्याला सांगून सासऱ्याला शोधायला खाडीवर जायची गळ घातली . पण त्या अंधारात कोण कसं शोधणार? " हंय तू बगतहस... परसाच्या उजेडात आमी बसलव.... आत होवऱ्यालागी येक टुको (बाटलीला पत्र्याची पुंगळी बसवून केलेला रॉकेलचा ढणढणा दिवा) वाडीत एकाकडेय मसाल्याची (सेलची) बेट्री नाय की फानस दुकु (कंदील)मिळनार नाय. माडाच्या झावळेची चूड पावसात विझोन जायत्.... ह्या टायमाक वाडीतलो एकव झिलगो भार् पडाक मागनार नाय..... तू दोन खुटके भाकरी खा नी हंयच परशाच्या सामनी टकली टेक...... मुसाची काळजी नुको करू. तो कशी नाय कशी तड गाटीत. उद्या उजवाडलां काय मगे सोदूया तेका."
दुसरे दिवशी भिणभिणताना हसन बाहेर पडला. पाऊस खळलेला नव्हताच, त्याच्या सोबत नावळ्यातले चार पोर गेले. त्यानी खाडीच्या कडेने बराच शोध घेतला. कुकारे मारले पण मुसाचा काय ठीकाणा लागला. कदाचित तड गाटून तो मुसलमान वाड्यात गेलेला असण्याचीही शक्यता होती. म्हणून शेरिफ घराकडे निघाला. वाडीत जावून शोध चौकशी केल्यावर मुसा आलेला नाही हे समजलं. वाडीतल्या लोकाना विषय कळल्यावर पंचवीस तीस मुसलमान झिलगे पाच होड्या काढून मुसाचा शोध घ्यायला बाहेर पडले. शेरिफने दिलेल्या माहिती वरून ते मधली धार ओलांडून अलिकडे आल्यावर होडी उलटली म्हणजे मुसा खात्रीने ह्याच थडीला कुठेतरी लागलेला असणार असा अंदाज करून शोधकरी निघाले. संध्याकाळी उशिराने एकेक होडी यायला लागली. शोधकरानी नावळ्याचाही खाली घोडेपोई नी त्यापुढे सागव्याच्या नस्ता पर्यंत चा किनारा पिंजून काढला होता पण मुसा किंवा त्याचं डुकमं कशाचाच मागमूस लागला नाही.
पाऊस कमी झाला पूर ओसरला नी दोन दिवसानी मुटाटच्या जेटी जवळ कोणाचा तरी मुडदा लागल्याची आवई आली. वाडीतले पोर घेवून हसन बघायला गेला. मुडदा फुगलेला, माशानी लचके तोडलेले. पण कमरेच्या लुंगी वरून तो मुसा असल्याची ओळख़ पटली. आणखी पंधरा दिवसानी विजयदुर्गाच्या नस्ताच्या अलिकडे अणपूरात मुसाचं होडकूल नी रशीचा फास टाकून बांधलेली लाकडाची टवणी कांदळाच्या गचकटीत अडकलेली उमगली. शेरिफा डगमगणारी नव्हती. घोव मेल्यावर हप्ताभरात ती डोक्यावर फाटी घेवून म्हावरं विकायला बाहेर पडली. त्याच वर्षी दोन आणि तीन नंबर दोन्ही चेडवांची लग्नं लावून दिली. चेडवाना घेवून नावळ्यातल्या रोपटी बागेतला माल काढून तीस पेट्या मुंबईत गावडे दलालाला पाठवल्या. पोरी सग़ळ्या शेरिफाच्या धाकात. पण इद्रूस मात्र आळसा नी उनाड. पण तो शेरिफाचा भलताच लाडका. आयशीची सगळी ठेवरेव इद्रूसच्या ताब्यात. दिसायला बकध्यान असला तरी तो डोक्यान भलताच हुषार. हप्त्याला एक आणा व्याजाने तो कोणा कोणाला व्याजी रकमा देई. नावं नी आकडे लिहिण्याएवढी त्याची लिखापढी झालेली. राजापुरातल्या काजीच्या दुकानातून चमड्याचा कव्हराची डायरी त्याने आणलेली. व्याजी दिलेल्या रकमांची बिनचूक नोंद तो ठेवी नी हयगय न करता वसूली करी. त्यासाठी शेजारचा हमज्या नी फकीर हे दांडगे पोर हप्त्याने रोज ठरवून त्याने सांभाळलेले होते. हमज्या तर बारा तास त्याच्या लोट्यावरच पडलेला असे. सुरवातीला व्याजाचा हप्तादेण्यावरून वाडीतल्या एका दोघानी इद्रूसला धमक्या देवून कर्ज बुडवण्याची खेळी केली. इद्रूसने झाली गोष्ट जामातीपुढे ठेवली. जमात भक्कमपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली नी त्याचा धंदा बिनघोर सुरू राहिला.
सागव्या-जंबारी कडचे पाती वाले मुसलमानही इद्रूस कडून व्याजाने पैसे नेत. व्याज बट्ट्याच्या धंद्यात त्याचा एवढा कम बसला की हप्त्यातले दोन दिवस तो सागवे, जंबारी, घोडेपोई या भागात वसूली साठी फिरे. सोबत हमज्या नी फकीर असायचे. त्यांच्या नादाने तो हातभट्टी मारायला लागला. शेरिफाच्या हे लक्षात आल्यावर तिने त्याला बजावले," तुका घेवचीच तर हातभट्टी नुको घेव. इंग्लीस घे. एक पावट् अर्दो पाईंट च्या वर घेव नुको..... मी तुका राजापुरात्सून चांग्ली इंग्लीस दारू हारून द्येन नी हंय घरात कपाडात ठेईन. पन गावली म्हनून अत्ति घेव नुको... येसन अंगाभायर् जाता नये. तुजो बापूस पन घेय.... पन तो कदी झिंगॉन पडलेलो मी बगतलेलो नाय्य....." अंदरकी बात अशी होती की शेरिफा पण चोरून पिणारी होती. ती हागनदारी कडे गडग्यात बाटली दडवून ठेवी नी काळवं पडल्यावर गुपचूप जावून पिवून येई. तिच्या मोठ्या चेडवाना ही गोष्ट माहिती होती. आता इद्रूसच्या नावाखाली तिला घरातच स्टॉक ठेवता येणार होता. इद्रूसने आयेचा शब्द कायम पाळला. फक्त संध्याकाळी रम, व्हिस्की स्टॉक मध्ये असेल ती , अर्धी क्वार्टर तो मारी नी रेटून जेवे. बरेच वेळा वसूलीहून यायला उशिर झाला तर फकीर नी हमज्या जेवायला इद्रूसकडे असत. इद्रूसचा एक पाय जरा आखूड नी बारीक होता. जास्त चाल पडली की त्याच्या पायाला कळा फूट लागायची. मग दोघाना थांबवून इंग्लीस दारू नी झिंग्याचं कालवण नायतर तळलेली माशाची बोटी, कधि कोंबड्याचा रस्सा याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पायाला मालिश करून घेई.
इद्रूसच्या नऊही बहिणींची लग्न झाली. त्यानंतर दोन तीन वर्षानी शेरिफ़ा खटारली. इद्रूसच्या डोईवर भोवऱ्यासभोवती केस गळून हाताच्या चपक्या एवढं खरड पडलं पण त्याचं लग्न काय होईना. खरं तर व्याज बट्ट्यावर तो गबरगंड पैसेवाला झालेला. दोनशे कलमांची बाग, दुमजली स्लॅबचं घर.... पण कशाचा उपयोग झाला नाही. वाडीत चार पाच चेडवं असलेल्या बापयाना दारू पाजून. आतून वीस - पंचवीस हजार देण्याची लालूच दाखवूनही कोण बधला नाही. दारूच्या तारेत एखदा होय म्हणे, हजारभर ईसारा (आगावू रक्कम) घेई नी दुसरे दिवशी उतरली की मग इद्रूस ला चुकवीत राही. दरम्याने हमज्याने दोन बिब्या केल्या. त्याची मोठी बिबी इद्रूसला दुवक्त रांधून घाली. धादूसपणे अन्न रांधी नी उरलेलं राजरोस घेवून जाई. वाडीतल्या काही लोकानी यावरून त्याचे कान भरायचे प्रयत्न केले पण इद्रूस बधला नाही. "आयेशा येतां ते मुळां माका दोन टायम सोन्याचो घास मेळता. मी काय तेका ठरीव पैसो द्येत नाय.... जेवाण थोडा जास्त कमी व्हवूचाच: तां ढोराक घालन्यापरास तेची पोराटारा खातत... नी मी म्हनशात तर दोपाराचा जेवान, मग तां सोना असाने, संद्याकाली खात नाय..... माकां दोन टायम् ताजा गरम आन्न आयेशा करून घालतां..... तेच्यावर शक घितलो तर अल्ला पन माला मापी करनार नाय." इद्रूस सांगे; ते खरं होतं नी दुसरी अंदरकी बात अशी की हमज्या फुल्ल टाईट होवून पडलेला असला की शे-दोनशे घेवून आयेशा इद्रूसची तहान भागवीत असे. या गोष्टीचा या कानाचा त्या कानालाही पत्ता लागणे शक्य नव्हते.
हमज्या नी आयेषा दोघानीही इद्रूसच्या लग्नासाठी त्यांच्या सग्या सोयऱ्याना सांगून कोणा कोणाला आगावू पैसे देवून शिकस्त केली. दहा रुपये भारी वाटत असा तो काळ! लग्नाला आतुर झालेल्या इद्रूसने दोन तीन हजारांची माती केली. पण अल्लातालाने रहम केली नी अवचितपणे इद्रूसला जशी लॉटरी लागली. जुम्म्याच्या दिवशी वसूलीसाठी तो नी हमज्या जंबारीत गेलेले होते. तिथे मुसलमानांची मोठी जमात. बरेच मच्छिवाले इद्रूसकडून व्याजी पैसे घेत. तिथे वसूली करीपर्यंत दुपार टळून जाई. तेव्हा इद्रूसच्या खालाकडे ते जेवायला थांबत. नेहमीप्रमाणे ते जेवायला खालाकडे गेले असता तिच्या बाजूलाच मफतलालच्या घरात वीस पंचवीस माणसे जमलेली नी कडाक्याचे भांडण सुरु होते. दारू खावून तर्र झालेला मफतलाल त्याची पोरगी फातू, तिला शिव्यागाळी घालीत लाथा बुक्क्यानी मारीत होता. त्या मागची भानगड खालाने थोडक्यात सांगितली.
जंबारीत ठकसेन जुवाटकर म्हणजे बडे प्रस्थ. त्याचा मुलगा गजा पंचायत समितीत क्लार्क होता. त्याच्या बायकोला जुवळ झाले. सासू दमेकरीण, दोन पोरांची उस्तवार गजाच्या बायकोला, सुमाला झेपेना.म्हणताना पोराना सांभाळायला म्हणून त्यानी मफतलालाची पोरगी फातु हेला कामावर ठेवली. फातु चार यत्ता शिकलेली, गोरी,नक्षत्रासारखी नी रहाणं सवरणंही स्वच्छ. पोरं सांभाळून ती सुमा जुवाटकरणीला कपडे,भांडी धुण्यापासून ते वाटप करून देई पर्यंत मदत करी. तिेलाही चांगलं चुंगलं खायला मिळे. सुरुवातीला रोज काळवं पडताना ती घरी जाई. पण नंतर घसण वाढल्यावर ती वसतीला जुवाटकरांकडेच थांबे. गजा दर शनिवारी जंबारीत येई नी सोमवारी देवगडात परत जाई. त्याने हळू हळू फातुला घोळात घ्यायला सुरवात केली. पंधरा सोळा वर्षाची पोर....घरात , वाडीत प्रच्छन्न स्त्री - पुरुष संबंध तिने बघितलेले होते. त्यामुळे गजाच्या भुलावणीला ती बळी पडली. निसर्गाने आपले काम चोख बजावले. फातु पोटुशी राहिली. ही गोष्ट तिने गजाला सांगितली तेंव्हा," मी तुकां लग्नाच्या बायलेसारी सांबाळीन तू भिया नुको,नी आदी कोणाकव कायव सांगा नुको, जां काय प्वॉर होवचा तां होवने.... मग्ये तुजो बापूस नी जमात कायव करूक शकणार नाय."
गजाने सांगितले ते फातुला मान्य झाले, नी दोन तीन महिने तीने कोणालाच या गोष्टीची दाद लागू दिली नाही. एक दिवस तिला कोरड्या वांत्या व्हायला लागल्या नी पोटही दिसायला लागले तेंव्हा मात्र सुमा चरकली. हे नसती बिलामत नको म्हणून सासू-सुनेने खलबत करून पुरा पगार देवून तिला कामावरून काढून टाकले. घरात ही गोष्ट निदर्शनाला आली. फातु निगरगट्ट.... मरीमर मार खावूनही ती कोणाचे नाव सांगेना तेंव्हा जमातीपुढे प्रश्न गेला. त्यावेळी मात्र फातुने गजा जुवाटकराचे नाव फोडले. जुवाटकराला घोळात घेवून पाच पंचवीस हजार उकळता येतील अशी मसलत ठरवून दहा बारा मुसलमान झिलगे जुवाटकराला भेटायला गेले. झाली गोष्ट सांगितल्यावर त्यांची दमदाटी ऐकून सुमा त्याना म्हणाली," आदी माजो घोव येवने.... तेच्या सामनी फातू सांगाने.... नी माज्या घोवान कबूल केल्यान तर फातु माजी सवत म्हनान नांदवून घेवक् मी तयार आंसय.....तुमच्या लोकात दो-दोन बायले करतत ना? आयतवारी माजो घोव हंय असात. तवा तुमची पोर हंय घेवन् येवा. मी म्हटल्या शब्दाक मागे येनार नाय. ह्यां तुमका मान्य नसात तर फुडे जावा नी चार गावानी तुमची अब्रू तुमीच घालवा "
बाजू आपल्यावरच उलटलेली म्हणताना घरी आल्यावर. मफतलालने फातुला मरीमर तुडवले नी, " आता तुज्या गल्यात मोटों दगड बांदतय हात पाय बांदून तुका दर्यात ढिकलून देतय्...'' म्हणत रशी घेवून तिचे हात मागच्या बाजूला बांधायला लागला.त्यावेळी इद्रूस पुढे झाला नी म्हणाला, " ह्येका दर्यात ढिकलून दिलस तर उद्या पोलिस तुका पकडून न्हेती..... आदीच तुजी गत काय..... तुजी पोरां उगड्यार पडती ते परीस ह्यां प्वॉर माकां दे.... तेका मी आरेखीन, तेका काय प्वॉर व्हयत् तां माजा म्ह्नून सांबाळीन... ह्ये तुज्ये पोरीक पंचवीस तोले सोनां मी घालीन.... तेची चुकी माका भक्षिस करा. मी जमातीक स हजार जुर्मानो भरीन नी सगल्या वाडीक बकऱ्याचा जेवान घालीन." जमातीला ही मसलत पटली. बसल्या बैठकीत कमरबंदातले रुपये मोजून दीड हजार जुर्माना जमातीच्या हवाली केला. टाकोटाक पंचाना सोबत घेवून पाणखोल गाठले. जुर्माना पुरा करून देज म्हणून सासऱ्याला नकद पाच हजार रुपये दिले. सगळे अवाक् झाले. तीन रोजानी त्याचा नेव फातूचा निका झाला. बोलल्याप्रमाणे पंचवीस तोळ्याचा ऐवज घालून फातुला घरात आणले. जंबारीत जमात मोठी तिथे पाच बकरे तुटले, नी पाणखोलकराना दोन बकरे नी तीन गावठी दारवेचे फुगे वाटले.
वाडीतले कोण कोण बुजुर्ग त्याच्याच ओट्यावर बसून त्याची तोंडावर टिंगल करायला लागले. " ह्यां बरां झालां बाबा. इद्रूसा रे तुज्या परास हातभर उच नी तुजा चेडू सोबात असा दांडगा प्वॉर मिळवलंस.... तेका तू काय पुरो पडनार म्हनान आयतां प्वॉर पन मिळाला तुका." हे ऐकल्यावर फातू चवताळून बाहेर आली. " काय रे ऊंडग्यानो तुमी खंय खंय गू खाल्लास तो जरा आठवा. माज्या घोवान धा हज्जार जुर्मानो भरून ह्यो इषय मिटवलेलो हा. शादीचा मटान खाल्लास नी दारू खालास तवां ग्वॉड वाटला ना? मी जमातीकडे ह्यो प्रश्ण मांडीन नी टिंगल खोरांच्या टकल्येवर खाताचा मडका देवन् धिंड काडीन. हयसून उटा नी चालू पडा. पुन्नारुपी कोन ह्यो शब्द काढीत तो डुकराचे गू खायत...." टिंगलखोर माना खाली घालून चालते झाले. त्या नंतर पुढे कुणीही या गोष्टीचा उच्चारही करू धजवला नाही. फातूने जमातीकडे तक्रार केली असती तर जमातीने मिटवलेला हा विषय काढला म्हणून बोलणारांची खरेच धिंड निघाली असती.
इद्रूस फातूवर भलताच खूष असायचा. तो लाडाने तिला "आकाशची चान्नी" म्हणे. तिला फातू न म्हणता चांदु असा तिचा उल्लेख करी. फातु पोटूशी असल्यामुळे जेवण रांधायला नी इतर कामाला आयेषा नी ती नसेल तेव्हा तीची सवत येई. फातु सातोळी बाळंत झाली. पहाटे पोटात दुखायला लागले तेंव्हा इद्रूस, हमज्या नी आयेषा तिला सकाळच्या वस्तीच्या गाडीने राजापुरात घेवून गेले. त्यावेळी तिथे कुलकर्णी नावाजलेले डॉक्टर, त्यांच्या दवाखान्यात फातुला अ‍ॅडमिट केले. मूल पोटातच गेलेले होते. चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट होती म्हणूनच फातू वाचली. मोकळीक झाल्यावर तिच्या पोटात वायगोळा फिरे आणि भयानक वेदना होत. खण्यापिण्याचीही वासना होईना म्हणून आयेषाने हुकमी उपाय केला. ब्रॅण्डी आणून अर्धा कप पाजल्यावर चांगलाच आराम पडला आणि भूकही लागली. औषध फातूला एवढे मानवले की पुढे ती चांगली ठणठणीत झाली तरी रोज कपभर "इंग्लीस दवा" मारल्याशिवाय फातुला चैन पडेना.
फातु बरी होवून पाणखोलात परत आली. तरी रोजचे रांधप, कपडे- भांडी करायला आयेषा येतच राहिली. इद्रूस लाडात येवून म्हणे," चांदु, तू माजी आकाशची चान्नी. तू काय पण काम केरू नको. तू नुस्ता बसून खा नी माला सुक दे. माला पैसा मोप मिलतो. मी तुला शहजादी सारकी सुकात ठेईन....." गोष्ट खरीच होती. इद्रूसचा व्याज बट्ट्याचा धंदा जोसात सुरु होता. शिवाय बानघटीतली बागही चांगलं उत्पन्न द्यायला लागलेली. कलमाना माशाची कुटी घातल्यामुळे कलमं दृष्ट पडेल अशी डेरेदार झालेली. उताराची मरडी जमीन, 24 तास खारी हवा आणि सूर्य उगवल्या पासून मावळे पर्यंत उन त्यामुळे फळही बचक्यासारखं नी रंगीत. माल काढणी सॉर्टिंग हमज्या अगदी निगुतीने करी. त्यामुळे कलमांची मोठी रक्कम मिळायची.
आयेषाला असलेला उपराळा बघितल्यावर हळूहळू तिची सवत इज्माही फातूला चिकटली. घरची कामं उरकून दिवसातून दोन तीन वेळेला ती फातूशी गप्पा मारीत बसे. तिची वेणी घालून देई. तिला न्हायला घाली. संध्याकाळी दोघीही पत्त्यानी खेळत बसे. त्यावेळीही इज्मा योजून फातूची सरशी व्हायला द्यायची. मटण, बिर्याणी यात आता इज्माचाही वाटा निघत असे. दोन वर्षानी फातू पोटुशी राहिली. तिला ओकाऱ्या सुरू झाल्या नी इद्रूस भलताच हरखला. पडेलच्या वडचाईच्या नवसामुळे इद्रूसचा जन्म झाला असे शेरिफा सांगायची. ते आठवून तो मुद्दाम पडेलला वडचाईच्या दर्शनाला गेला. देवीला साडी-चोळी नी सव्वाशे रुपये झील होवंदे म्हणून सांगणं केलं. गावातल्या पीराला चादर चढवली नी झील झाला तर उरसाला कव्वाल पार्टीची पुरी बिदागी बक्षिस करीन असा नवस केला.
आता इज्मा फातूची निगुतीने वास्तपुस्त करू लागली. दर महिन्याला राजापुरात डॉकरांकडे तपासायला जाताना आता इज्मा सोबत असायची. तिला जुवळ होणार असे निदान कुलकर्णी डॉक्टरानी केले. आठ महिने भरल्यावर बाळंतपण होईतो फातुला राजापुरातच बिऱ्हाड करून रहायचा बेत तिने इद्रूसला सांगितला. तिला राजापुरात ठेवली की तो बिनघोर; म्हणताना हौसावलेल्या इद्रूसने होकार दिला. दोघीही डॉक्टरांच्या दवाखान्या नजिक गुजराळीत बिऱ्हाड करून राहिल्या. डॉक्टरानी दिलेल्या तारखे आधी दोन दिवस फातू बाळंत झाली. दोन्ही मुलगेच झालेले. बाळंतपण क्रिटीकल होते. पण त्या वेळी सरकारी दवाखान्यात डॉक्टर म्हापणकर हे गायनिक आलेले होते. कुलकर्णी डॉक्टर त्यांच्याशी चांगलं रिलेशन ठेवून होते. फातुच्या डिलीव्हरीला तेही कुलकर्णी डॉक्टरांसोबत हजर होते. मुलग़े दोन्ही सुदृढ होते.
बाळंतपणात झालेली हालत लक्षात घेता आपले फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन करून घ्यायचा निर्णय फातूने घेतला. इद्रूस भेटायला आल्यावर आपला बेत त्याला पटवून ऑपरेशन साठीच्या फॉर्मवर त्याला सही करायला लावली. सरकारी दवाखान्यात ऑपरेशन झाले. टाके सुकल्यावर कुलकर्णी डॉक्टरांच्या कारमधून फातू जुळे मुलगे घेवून पाणखोलात आली. इड्रूसने आख्ख्या वाडीला दारू नी मटणाचे जेवण दिले. आता आयेषा नी इज्मा दोघीही पुरा दिवस फातुच्या भोवती जरुंजी घालीत रहायच्या. त्यांच्या पोरी अहंमद - महंमदला खेळवायला यायच्या. पोरगे जुवळे असले तरी रंग रुपाने पूर्ण वेगळे दिसत. एक फातुसारखा गोरा घारा तर दुसरा काळासावळा होता.लोक माघारी टिंगलीने म्हणत, "येक इद्रूसाचो नी दुसरो हमज्याचो......"
दोन तीन वर्षानी वाडीतल्या मुजावरची पात सुरू झाली . त्याचा धंदा बरकतीला आलेला बघितल्यावर आपणही पात बांधायची असा बेत फातूने ठरवला. इद्रूस कमकुवत असला तरी आपण जातीनिशी पातीवर राहू असे वचन हमज्याने दिले; नी फातु पुढच्या तजविजीला लागली. लाकडाची जम करण्यासाठी ती हमज्याला घेवून मधल्या वाडीत बाबी आग्र्याच्या बेंडशावर गेली. बाबी बाकड्यावर पान खात बसलेला होता. फातु पुढे गेली नी बाबीला खेटून बाकद्यावर बसली. बाबी सुखावत म्हणाला, " काय ग्ये फातू आज माज्याहारी काय काम काडलंस... " अंदाजाने खडा टाकीत तो पुढे म्हणाला, " काय पात बित बांदूचो इचार हा की काय?" हसत बाबीच्या मांडीवर थाप मारीत फातू म्हणाली," इचार हा पन कितपत जम बसता बगूया." मग पातीसाठी लाकडाची जम कशी करायची ती बाबीने खोलून सांगितली.
कण्याला आणि सांग़ाड्याच्या आडण्याना साग/ आईन किंदळ पाच सहा तरी नग आणि फळीला जुनाट उंडली ची झाडे पैदा करायला हवी होती. गावातच शिवा बामणाच्या बांधाजवळ्च्या पडणात व्हाळा कडेला प्रचंड मोठ्या उंडली आहेत, पण मुजावर पात बांधताना विचारायला गेला तेंव्हा शिवा राजी झाला नव्हता. कण्यासाठी लागणारा सागवानी सोटही शिवाकडे मिळणारा होता. बाकी लाकडाची जम बाबी करणार होता. त्या दिवशी संध्याकाळी हमज्या बघून झाडं आला. पाच मोठ्या उंडली, वरच्या पडणात दोन मोठे आईन नी घराकडे दोन सागवान मिळणारे होते. या आधी गेलेली गिऱ्हाईक आठशे हजार या पुढे जायला मागत नव्हती. त्या झाडांची योग्य किंमत अडीच हजारापर्यंत झाली असती. सगळा विषय समजून घेवून दुसरे दिवशी दुपार नंतर दोन हजार रुपये कडोसरीला बांधून फातु बाहेर पडली. घरात हापूसचे आंबे पिकत घातलेले होते. त्यातले दोन दझन आंबे नी दोन मोठे बिस्किटाचे पुडे तिने सोबत घेतले. स्वच्छ न्हाऊन, कोरं कापड (नेसून) कानात वाळ्याच्या अत्तराचा बोळा घालून. डोळ्यात सुरमा घालून पान खावून ओठलाल करून फातू हमज्याला घेवून शिवा बामणाला भेटायला गेली.
शिवा चहा पिवून पान जमवीत ओसरीवर खांबाला टेकून बसलेला होता. फातू गेली नी शिवाला खेटून बसत त्याच्या मांडीवर थाप मारून हसत म्हणाली,"काय शिवादादा वलकलीव काय माला.... मी मुसलवाड्यातल्या इद्रूसाची बीबी." अर्ध्या वयाचा शिवा...पण फातूची लगट बघून तो ही चळला." न वळकूक काय झाला हाल्ली चार म्हयन्यात माजी खेप नाय तकडे पन तू लगीन न्हावन् इल्यार तुका बगलेला ह्य. तवा जरा कवळा प्वॉर हुतं , आता जुवाळ झाल्यार मागसून फुडसून चांगलां रुंद झालंस म्हनान काय माका वळकून येनार नाय. पन काय्व म्हणा.... डोक्याक् कुकू लावलस तर तुका कोन दालदीण म्हणनार नाय....'' मग फातुच्या कानातला अत्तराचा बोळा काढून दोन्ही हातांवर चोळून तो पुन्हा फातूच्या कानाच्या पाळीत खोवला. नी स्वयंपाक घराच्या दिशेने मोहरा वळवीत त्याने हाळी घातली." ग्ये आयकलंस काय ....लंगड्या इद्रूसाची बायल् नी हमजो इलोहा..... वंयच चाय पाटव. " शब्द कानात पडताच बामणी उठून बाहेर आली. तिला आयकून म्हायती होते की लंगड्या-कुरड्या इद्रूसाने अप्सरेसारखी पोर बायको करून घेतली. ती बाहेर आली. "ही होय इद्रूसाची बायको...काय गो माज्या घोवाच्या फकस मांडयेर् बसोचा ऱ्हवलस" त्यावर निगरगट्ट्पणे हसत फातू म्हणाली, "आवशी, तुका सोबता ह्या बोलणां.... शिवादादा क्येदे, मी त्येंचा प्वॉर सोबनारा, दादाक बगल्यावर माकां माज्या बापसाची सय इली....." शिवा म्हणाला, "तू मनार घेव् नुको, तां खचोंदे. पोराच्या मायेन बसलं ना तू? आता असले रंग करूचो माजो वय हा?"
जरा सरशी होत फातूने बिस्किटाचे पुडे नी आंबे टोपलीतून बाहेर काढले. लालबुंद रसरशीत कच्चे आंबे बघून दोघंही आवाक् झाली. बामणी भिंती लगतची परडी पुढे करीत म्हणाली, " ह्येतू आंबे भरून पायरी कागी ठ्येव, मग्ये पानी ओतून घेयन्....'' नी बिस्किटाचे पुडे उचलून ती चहा कारायला आत गेली.मग जादा फराळ न लावता फातूने थेट विषयच फोडला. " शिवादादा, माज्या घोवाचो व्याज बट्याचो धंदो काय खरो नाय. मी पात बांदूची म्हनतय. आता पात म्हटली तर तेका लाकूड किती व्हया तुमका म्हायत हा. माका चार-दोन सागनान, आयन् नी फळये साटना मळ्यात तुमच्यो उंडली हत ना त्यो व्हयो. मी पाडून घेनार नाय. भरयाभरी पैशे काय व्हती ते देयन." उंडलीची कुठची झाडे काय हा तपशील हमज्याने फोडून सांगितला. हे बोलण होईतो कुळवाड्यांसाठी ठेवलेल्या पितळी पेल्यातून चहा आला. चहा पिवून आपले नी हमज्याचे भांडे आणि शिवादादाचा कप फातूने उचलला. "अशीच मागच्या दारी जा थंय दोण भरलेली हा. भांडी धोवन् थंयच उपडी घाल" शिवा म्हणाला. फातू मागिलदारी गेली. बामणी दारात होती. दोणी जवळ दुपारच्या भांड्यांचा खटाळा तसाच टकलेला होता. फातूने काही न बोलता भांडी उचलून पाथरीवर ठेवली. " मी चोळून हंय उपडी घालून ठेवतंय , तू मग्ये पानी घालून भुतू न्ही." बामणीच्या होकाराची वाटही न बघता नेसण आवरून फातू कामाला लागली.
बामणी चाट झाली. हातात चार चार बांगड्या गोठ तोडे. गळ्यात बेंबीपर्यंत लोंबणारा चार पदरी लफ्फेदार हार घातलेली कोरी साडी नेसून आलेली फातू आपण होवून भांडी घासायला वाकली याचं मोठं अप्रूप तिला वाटलं. चुलीकर लाकडांच्या झळीने काळा मेचूट झालेवा तवा, कढई नळ्याच्या खापरीने घासून घासून सगळी झळ खरवडून काढली. रखेच्या डोणग्या जवळ दग्डीत ठेवलेली चिंचेची बोटकं घासून पितळी पातेल्या, ताटं चांगली चकचकीत उजळून काढली. बेताने पाणी वापरून भांडी धुवून उपडी घातली नी हुश्श करीत फातू उठली. तोंडावर पाण्याचा हबका मारून पदराने तोंड पुशीत ती पुढील दाराकडे निघाली. तेने इतक्या झटपट भांडी घासून दिली की, तिच्या कामाचा उरक नी नेटकेपणा बघून बामणी अक्षरश: अवाक् झाली. पूर्वीची तिची नाराजी कुठच्या कुठे नायशी झाली.
शिवाने पान पुढे केले नी स्वत: सुपारीचं अर्धं खांड कातरून फातूच्या हातवर घातलं. तंबाखूची चिमूट पुढे केली. पान खाता खाता शिवा बोलला, "चला आगरातली खयची झाडां म्हणतस ती बगूया." पडणातले दोन आईन, किंदळ नी गोठ्यामागचे दोन सागवान त्यानी पसंत केले. मग सगळे घरी येवून ओट्यावर बसले. "मळ्यात पाच मोट्यो उंडली हत त्यो तुमी बगलासच हास. माकाव त्यो बगूसाटी मुद्दम जावची गरज नाय. आता तेच्या सकट तुमचो काय आकडो हा तो सांगा. मग्ये माजा काय तां मी सांगान." अगोदर योजले होते त्यात एक किंदळीचा नग वाढलेलाच होता. म्हणून फातूने बावीसशेचा आकडा फोडला. या आधी आलेल्या गिऱ्हाईकांसारखी रड न लावता फातूने रीतीत किंमत केली हे ओळखून शिवा म्हणाला," तू रितीत मागलंस, पण सागवान मातब्बर हत, मी लय म्हणत नाय, अडीच हजार पुरे कर, तर मी टाळी मारीन." फातूने लगोलग कमरेच्या चंचीत बारीक बारीक घड्या करून चोंदून ठेवलेल्या नोटा बाहेर काढल्या, त्या नीट लावून मोजल्या नी म्हणाली," ह्ये दोन हजार आसत. पाचशे झाडां तोडूच्ये आदी हाडून द्येयन्......" बामणीने पुन्हा चहा आणला तो पिऊन पान खावून फातु उठली.
भादव्यात ताणावर झाडं तोडून टवण्या मारून झाल्या. टिपऱ्या पोर्णिमे नंतर साईजवार चिरकाम करून आणल्यावर मळईतले सहा सुतार आले नी पात बांधायचे काम सुरु झाले. त्यांच्या सोबत फकिर नी हमज्या पण काम करणार होते. खिळे-मोळे, चंद्रूस, नटबोल्ट नी काय काय सामान आणायला हमज्याला घेवून फातू दोन दोन दिवस कोल्हापूरला जावून यायची. कोण कोण आडून आडून इद्रूसाचे कान भरायचा प्रयत्न करीत. "ल्वॉक म्हंतत हमजो कायम तुज्या घरात रिगोन आसता. फातू तेका लागू हा..... तां हमज्यावांगडा खय खय फिरतां; आता तू काय तेच्यार पारो धरून हस " त्यावर चरचरीत शिवी हासडीत इद्रूस म्हणे, " मायझयांक ह्यां कळणां नाय, तेच्यो दोनव मागारणी दिवसाडी नी राती दुकू माज्या घरात आसतंत. आता पातीचा सामान हाडूक मी काय जान्यासारको नाय.... म्हणान तां हमज्या वांगडा जाता. नी दुसरा म्हनशा तर माका अशी आकाशकची चान्नी मिळाली तां लोकांक बगवत नाय. चांदू माजा माजो किती खयाल करता लोकांक काय दकल.... मी ह्यो असो..... मी काय तेका पुरो पडणार? माकां व्हया तां मिळाला ना मगे बास..... माजे नदरेआड तां कायव करीना....."
पावसापर्यंत तळ नी सांगाडा पुरा झाला. मिरगा पासून भाताची लावणी होईतो सुतार काम बंद करून घरी गेले. गोकुळाष्टमी झाल्यावर पुन्हा काम सुरु झाले. आता काम चांगलेच गतीला लागले. फातू हात सोडून खर्च करीत होती. हमज्या नी फकीर दोघेही सुतारांच्या बरोबरीने दिवसरात्र न म्हणता राबत होते, त्यामुळे कामाला पिरंग लागली नाही. मार्गशीर्षात पिराचा उरुस होण्या पूर्वी फातूची पात बांधून पुरी झाली. उरूस झाल्यावर तिसऱ्या दिवशी अख्ख्या गावातले पाउणशे गडी जमवून पात खाडीत लोटली. दिगू भटाने पातीची पूजा केली. मग हमज्या फकीरसकट आठ खलाशी, जेवणाखाण्याची भांडी, शिधा, पाण्याचे बॅरल, मासे ठेवायच्या फाट्या नी जाळी असा सगळा सरंजाम भरल्यावर फातू पातीवर चढली. आता गुरुवारी मध्यरात्रीला पात परत यायची होती तोपर्यंत फातु जातीनिशी पातीवरच राहणार होती.

※ ※ ※ ※ ※ ※ ※ ※