मराठेसर देवो भव श्रीराम विनायक काळे द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मराठेसर देवो भव

मराठे सर देवो भव


आठवीच्या वर्गावर मराठेसरांचा संस्कृतचा तास सुरू झालेला ‘हस्तस्य भूषणं दानं सत्यं कंठस्य भुषणं।श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणै: किम् प्रयोजनम्’ फळ्यावर सुवाच्च्य सुंदर अक्षरात हे सुभाषित लिहिलेलं अन् सर तन्मय होऊन मधुरवाणीने ते म्हणून दाखवताहेत. मी आणि अशोक करंदीकर दोघेही बऱ्यापैकी हुषार.आम्ही चटकन सुभाषित लिहून घेतलं आणि गाण्याच्या भेंड्या सुरू केल्या, अर्थात हळु आवाजात! आमचं लक्ष नाही हे सरांना समजलं........“काळे ! तुला उचलून खिडकीतून बाहेर फेकून देईन आणि करंदीकर तुझी काय वळवळ सुरू आहे? बाहेर छपराच्या पाण्याचा झोत पडतो आहे ना... त्या झोताखाली उभा करीन तुला! रहा, दोघेही उभे रहा.” सरांचं शिकवणं पूर्ववत सुरू झालं. नवीन शब्दांचे अर्थ, सुभाषिताचा अन्वयार्थ स्पष्ट करून झाला,सुभाषिताची संथा सुरू झाली. त्यावेळी पुन्हा सरांचं आमच्याकडे लक्ष गेलं. तोपर्यंत मघाचचा प्रसंग सर विसरलेले, आम्ही काहीतरी चाळे करण्यासाठीच उभे राहिलेात असं वाटून सर ओरडले. ‘‘अे जोडगोळी उभे राहुन काय करता? लक्ष कुठे आहे तुमचं?’’ मी म्हणालो “सर ऽऽ मगाशी तुम्हीच आम्हाला उभं रहायला सांगितलत’त्यावर मिशीत हसत सर म्हणाले ‘मी तुम्हाला उठायला सांगितलं...... तुम्ही अचरटा सारखे तास संपेपर्यंत उभेच रहाल असं वाटलं नव्हतं मला......हं बसा खाली. ” सरांचा हा असा खाक्या. सरांची वृत्ती शांत -सोज्वळ... कधी कुणा वर रागवणं नाही, कुणाला मारणं नाही. मुलाने कोणतीही (कोणत्याही विषयातली) शंका कितीही वेळा विचारली तरी न चिडता शांतपणाने आणि संयमाने निरसन करणार.
त्यांच्या ओरडण्याला मुलीसुध्दा घाबरेनात . बेंचवर उभा रहा, वर्गात मागे जाऊन ओणवा रहा, कान धरून उठाबशा काढ, हा चुकलेला शब्द २००वेळा लिहून दाखव! या सरांनी दिलेल्या शिक्षा फक्त ऐकायच्या असतात. वर्गात काहीतरी चाळे करताना मुल दिसलं आणि सर जवळ आले तरी ते मारणार नाहीत याची खात्री पटली, अन सगळ्या वर्गाशी सरांची जवळीक निर्माण झाली. मुलं म्हणजो त्यांना जीव की प्राण... मुलं दंगा करणार नाहीत, ओरडणार नाहीत तर ती मुलं कसली? फारच गोंधळ झाला तर ‘‘एऽऽ गप्प बस नाहीतर हेडमास्तरांकडेपाठवीन” असा सज्जड दम सर द्यायचे. सरांचे हे विद्यार्थी प्रेम काही वेळा शिस्तीच्या निर्बंधात बसणारेही नसायचे. त्या वेळी दर शनिवारी आलटून पालटून एका विषयाची परीक्षा व्हायची, सोमवारी पेपर्स तपासून मिळायचे. तशीच संस्कृतची परीक्षा झाली. सरांनी पेपर तपासून झाल्यावर वर्गात वाटले. प्रत्येकजण आपला पेपर बघायला लागला. १/२ चाणाक्ष पोरांनी तपासलेल्या पेपरच्या शेवटच्या पानावर परीक्षेत न लिहीलेली दोन प्रश्नांची उत्तरे लिहीली आणि ते पेपर घेऊन सरांकडे गेले. ‘‘सर ऽऽ माझा हा प्रश्न तपासायचा राहिलाय् !” त्यावर “असं असं, बघू” असं म्हणत सरांनी पाहिलं, खिशातून पेन्सिल काढून मार्क लिहीले आणि बेरीज वाढवून दिली. मग एक -दोन प्रश्न तपासायचे राहिले असं सांगणाऱ्यांचं पेवचं फुटलं.कोणी अशी तक्रार केली की, “सरऽऽ माझं उत्तर चार ओळींचं आहे. त्याचं तीन ओळींचं आहे. पण मला एक मार्क कमी दिलात” सगळ्या तक्राखोरांना सरांनी मार्क वाढवून दिले. त्या दिवशी संपूर्ण तास तपासलेल्या पेपर्सच्या फेर तपासणीत गेला आणि वर्गातली सगळी मुलं संस्कृत मध्ये पास झाली. शेवटी फेरफाराप्रमाणे मार्कलिस्टमध्ये दुरुस्त्या करताना ही गोष्ट सरांच्या लक्षात आलीशी वाटली कारण सर म्हणाले ‘‘अरे हे काय? सगळे पास कसे झाले? तुम्ही मला फसवलंत की काय?”त्यावर सगळा वर्ग साळसूदपणे एक सुरात ‘नाही’ म्हणाला. सर म्हणाले ‘‘बघा हं, नाहीतर मी पुन्हा परीक्षा घेईन”
कधी कधी सातव्या आठव्या तासाला कंटाळा यायचा.अशा वेळी मराठे सरांचा तास असला की आम्ही हळूच ओरडायचो, “सर ऑफ द्या. सर आज गणिताचे दोन आणि इंग्रजीचे दोन तास झाले.कंटाळा आला.सर, खेळायला सोडा”अशा वेळी नेमका खविसाचा (हेडमास्तर) राऊंड सुरु असला तर नाईलाज व्हायचा. मग दोन सुभाषितं बिनचूक म्हणण्याच्या अटीवर उरलेला वेळ गाण्याच्या किंवा शब्दांच्या भेंड्या व्हायच्या. सर पंचतंत्रातली एखादी कथा सांगायचे,मध्येच कुणाचं लक्ष नाही असं दिसलं तर सर दम देत.“ए मी प्रश्न विचारीन हं गोष्टीवर.” चॅट पिरीयडला सर आले की आम्ही चक्क टाळ्या वाजावायचो कारण आता खविसाची भीती नसायची सरांनी जा! म्हणण्यापूर्वीच सगळा वर्ग ग्राऊंडवर धावायचा.
सर एस्. टी. सी. आणि हिंदी प्रवीण होऊन शिक्षक म्हणून रूजू झाले पुढे बी. ए. आणि बी. एड्. या पदव्या १२/१४ वर्ष नोकरी झाल्यावर त्यांनी मिळवल्या. सर संस्कृत, हिंदी, मराठी, इतिहास शिकवायचे. संस्कृतचे धडे, सुभाषितं सरांना मुखोद्गत... सहसा कधी पुस्तक उघडावं लागत नसे. त्यांची वाणी शुध्द, मधुर,आर्जवी... त्यांचं बोलणं ऐकत रहावं असं वाटायचं. त्यांच्या सात्विक,संयमी व्यक्तिमत्वामुळे सगळा वर्गच भारला जायचा. सर शिक्षा करीत नसले... रागवत नसले तरी त्यांच्या तासाला गडबड गोंधळ चाललाय असं कधी झालं नाही. अक्षरावर त्यांचा बारीक कटाक्ष. चुकीची वळणं ते स्वत: लिहून दाखवायचे. गृहपाठाच्या वहीत चुकलेले सगळे शब्द सर लिहून ठेवायचे. वह्यादेताना चुकलेले शब्द दोनशे वेळा लिहून दाखव अशी शिक्षा ठोठावायचे. कधी चुकून त्यांनी विचारलंच ‘‘काय रेऽऽ शब्द लिहून दाखवायला सांगितलं होतं ना?”तर म्हणायचं “सर मी मागच्या तासाला दाखवलं. तुम्ही हं म्हणालेत”मग सरांचं समाधान होई.
सहामाही वार्षिक परीक्षांच्या वेळी तर अक्षरश: कहर व्हायचा. मुलं नवस बोलायची,“देवा महाराजा इंग्रजी- गणिताच्या पेपरला मराठे सर सुपर व्हिजनला येऊ देत.” सर आले की एखद्या प्रश्नाचं उत्तर येत नसलं की उभ रहायचं. सर म्हणायचे ‘‘काय हवय?”मी एकाही प्रश्नाचं उत्तर सांगणार नाही. विद्यार्थि म्हणायचे ‘‘सर उत्तर नको, भाषांतरातला फक्त एकच शब्द अडलेला आहे तेवढाच सांगा.” पेपर संपत आला की हा प्रकार इतका वाढे की सराना अक्षरश: वर्गभर फिरावं लागे. पेपर संपल्याची घंटा झाली तरीही ४/५ मिनिट मुलं उत्तर पत्रिकाच द्यायचे नाहीत अन् हातातून पेपर काढून घेण्याचं धारिष्ट्य सराना व्हायचं नाही. मग पेपर जमवणं...... पुरवण्यांवर सह्या हे सगळे सोपस्कार होऊन सगळ्यात उशीरा मराठे सरांकडचा गठ्ठा जमा र्होई. मात्र पेपरला डायरेक्ट कॉपी करणं त्याना खपायचं नाही. एकदा सुरेश पडेलकर गाईडमधलं पान फाडून घेऊन पेपर लिहीत होता. सरांच लक्ष गेल्याचं दिसताच त्याने कॉपी दडवली.....‘‘पडेलकर कॉपीचा कागद दे” सरांनी दरडावलं. पण तो काही दाद देईना.मग झडती घेऊन सरानी त्याच्या पॅण्टच्या खिशामध्ये लपवलेली कॉपी बाहेर काढली आणि त्याच्या फाड्कन कानफटात दिली. सरानी मुलाला मारण्याचा हा एवढा एकच प्रसंग माझ्या आठवणीत आहे. एरवी सुपरव्हिजनला आलेले सर आम्हाला इंग्रजीच्या गोष्टीतले देवदूत वाटायचे. पुढे अकरावीला ‘चितळे मास्तर’ हा पु. ल. देशपांडे यांचा धडा बघितला आणि आम्ही उत्स्फूर्तपणे म्हणाले ‘‘अरे! हे तर आमचे मराठे सर!” वर्गातल्या भिंतीवर लावलेलं एक सुवचन ‘मातृदेवो भव पितृ देवो भव आचार्य देवो भव’ थोडसं बदलून आचार्य ऐवजी ‘मराठे सर देवो भव’ असं आम्ही वाचायचो.
पुढे मी शिक्षण क्षेत्रात शिरलो. शिक्षक झालो, मुख्याध्यापक झालो, प्राध्यापक झालो पण इच्छा असुनही मला काही ‘मराठे सर’ होता आलं नाही. माझी मुलगी ‘शरू’ ही मराठे सरांच्या हाताखालीच शिकली. घरी शाळेतल्या गमती जमती सांगताना ती मराठे सरांचा गुणगौरव करायची. काळ बदलला... संदर्भ बदलला मुलं बदलली पण आमचे मराठे सर बदलले नाहीत याचं प्रत्यंतर शरूच्या वर्णनातून मला यायचं. अेकदा काहीतरी कामाच्या निमित्ताने हायस्कूलमध्ये नारकरसरना भेटायला मी गेलो. त्यावेळी कसली तरी परीक्षाच होती. गजर झाला,सुपरवायझर पेपरचे गठ्ठे घेऊन आपल्याला वर्गाकडे रवाना झाले. त्यानंतर थोडासा वेळ गेला आणि अगदी अकल्पितपणे एका वर्गातून टाळ्यांचा कडकडाट झालेला ऐकला. बोलणं अर्धवट टाकून नारकरसर उठले ‘‘आता सत्यानास झाला. मराठेसर कुठल्यातरी वर्गावर सुपर व्हिजानला गेलेसे वाटतात. आता मला पेपर संपेपर्यंत त्या वर्गाजवळ उभं राहून लक्ष ठेवायला हवं. तुम्ही नंतर या... . मी जारा जाातो” असं म्हणून हेडमास्तर नारकर सर मराठे सरांच्या वर्गाकडे निघाले. धन्य ते नारकर सर आणि धन्य ते मराठे सर!
सरांचं हे वागणं खरोखरच अशैक्षणिक आहे का? हा मनष्य पॉलिसी म्हणून असा वागतो का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला ‘नाही’ अशीच द्यावी लागतात. सरांचं तत्वज्ञान सांगायचं तर मुल वर्षभरात जे शिकतं त्याचं खरखुरं मूल्यमापन १०० गुणांच्या पेपरमध्ये करता येतं का? तसं असलं तर९०/९५टक्के गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या कितीतरी मुलांचं पितळ उघडं पडेल! अशी कितीतरी मुलं प्रत्यक्ष जीवनात पराभूत झालेली दिसतात. उलट प्रभाकर राणे सारखा गडीकाम करणारा,आठवीत नापास होऊन शिक्षण सोडलेला माझा वर्गमित्र कलमाची चरी खणताना कुठल्या तरी संदर्भात दाखला देण्यासाठी ३0 वर्षापूर्वी मराठे सरानी शिकविलेलं ‘तक्षकस्य विषम् दन्ते मक्षिकाया मुखे विषम्’ हे संस्कृत सुभाषित स्पष्ट बिनचूक म्हणून दाखवतो एवढंच नव्हे त्या सुभाषिताचा अन्वयार्थही बिनचूक सांगतो आणि मला अंतर्मुख होऊन मराठे सरांचं तत्वज्ञान पचविण्याचा प्रयत्न करावा लागतो. मुलाने कितीही गंभीर चूक केली, त्रास दिला तरी आपला संयम न सोडता त्याच्यावर माया करणं हे सरांचं सेवा व्रत किती शिक्षकांना आचरणात आणता येईल? उदाहरण संग्रहात नमुन्यासाठी दिलेली गणितं सोडवून दाखवायची आणि परीक्षेत जास्तीत जास्त कठिण गणितं घालून मुलांची दांडी उडवणारे गणित शिक्षक, एकाच दिवशी रसायन शास्त्रातील ६५ मुलद्रव्यांच्या संज्ञा पाठ करुन यायला सांगणारे विज्ञान शिक्षक, चुकलेल्या एका शब्दाच्या स्पेलिंगसाठी एक छडी या हिशोबाने ४० छड्यांचा मुलाच्या हातावर पाऊस पाडणारे इंग्रजीचे शिक्षक, खुनशीपणाने मुलाच्या पोटाची चामडी पकडून ती पिरगळणारे, कान सुजेपर्यंत पिरगळणारे, एक कानफटीत मारुन कानातून नाहीतर दातातून रक्त फोडणारे नर व्याघ्र शिक्षक... मुलांची मनस्थिती, मानस शास्त्रातील थकवा आणि विश्राम हे तत्व, दोन्ही पायदळी तुडवून सलग तीन तास एकच विषय शिकवून अभ्यासक्रम पूर्ण करणारे पोर्शनवीर..... या गोष्टी शैक्षणिक आहेत का?
ओढघस्तीची आर्थिक परिस्थिती आणि शाळेत अक्षरश: जाच या दुहेरी त्रासाने मराठे सर पूर्णतः पिचून गेले. शिक्षकांना संहितेनुसार देय असणाऱ्या रजांचा लाभही मिळत नसे. कहर म्हणजे कुटूंबातली व्यक्ती निवर्तली ! तिला सरणावर पोचवून दुसऱ्याच दिवषी डोक्यावर टोपी घालून शाळेत जायची पाळी सरांवर आली. त्या मृतात्म्याच्या और्ध्वदेहिकासाठी मागितलेली रजाही नामंजूर झाली नी सरानां बिनपगारी रजा घेवून मृताचे पिण्डदान करावे लागले. गुणांचं कौतुक करणं सोडाच ,उपमर्द करुन ख्च्चीकरण करणारे वरीष्ठ या साऱ्या त्रासातही आपली शांत संयमी वृत्ती मराठे सरांनी ढळू दिली नाही की त्याचा ताव मुलांवर काढला नाही. सरांच्या मते शिक्षक हा मुलांचा वत्सल पिता आहे. परीक्षेसारख्या मोक्याच्या क्षणी चक्रव्युह भेदाचे रहस्य अर्धवट सांगून त्या मुलाचा कपाळ मोक्ष उघड्या डोळ्यानी पहाणं ही ‘अध्यापन वृत्ती’ आहे का? पस्तीस टक्के गुणांच्या निकषावर मुलाचे भविष्य ठरवायचे असेल तर अडलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याला शोधायची संधी तरी द्या किंवा तुम्ही तरी उत्तर सांगा हे सरांचे प्रांजळ मत !
आपल्या अध्यापन विषया व्यतिरिक्त इतर विषयातल्या प्रश्नांची बिनचूक उत्तरं सांगता येतील असे किती शिक्षक आज सापडतील?जे शिकवले ते मुलाच्या पूर्णपणे पचनी पडले असे सांगणारे (सत्य सांगणारे) किती शिक्षक आहेत? एखा विषयाची पायाशुध्द तयारी केली, प्रामाणिकपणे अभ्यास केला म्हणजे परीक्षेत नक्की उत्तम गुण मिळतील अशी खात्री देणारे किती महाभाग पुढे येतील? मराठे सरांचं तत्वज्ञान तुम्हाला नाही पचलं तर सोडून द्या, पण त्यांच्यावर अप्रामाणिकपणाचा आरोप कराल तर ‘या’ आणि ‘अशा’ कितीतरी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. गावठी भाषेत सांगायचं तर चंद्र सूर्य उगवतात, पाऊस पडतो तो तुमच्या आमच्या सारख्या शिक्षकांमुळे नक्कीच नाही... मराठे सरांसारखे शिक्षक आहेत म्हणून ! शिक्षण संस्थेचा बॅलन्स राहण्यासाठीही प्रत्येक शाळेत जसे काही इडी अमिन, दाऊद, रतन खत्री, विरप्पन आहेत तसे त्यांच्या बरोबरच निदान एक तरी ‘मराठे सर’ पाहिजेतच असं माझे प्रांजल मत आहे.
◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙