मला स्पेस हवी पर्व२ भाग १२ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व२ भाग १२

मला स्पेस हवी पर्व २ भाग १२


मागील भागात आपण बघीतलं की सुधीर आणि ऋषी येणार आहेत त्यामुळे आता सुधीर आणि नेहा इतक्या महिन्यांनी कसे भेटतील? पुर्वी सारखे की अजूनही तो तणाव भेटीत असेल? बघू.


आज सुधीर आणि ऋषी येणार म्हणून नेहाच्या मनाचा गोंधळ उडाला होता. संमिश्र भावना मनाच्या कॅनव्हासवर फटकारे मारत होत्या. सहा महिन्यांचा विरह हा दोघांच्या आयुष्यात पुर्विचे रंग आणेल का? की काही अनोळखी रंग दोघांच्या भेटीत लुडबुड करतील?

गोंधळ, आनंद अशी काहीशी विचीत्र मनोवस्था नेहाची झाली होती. तिने भरभर सगळं आवरलं. ऋषीसाठी तिने आज त्याला आवडतात म्हणून आलू पराठे करायचं ठरवलं होतं. त्याच्या आवडीची जीमजॅम बिस्कीटं आणि बोर्नव्हिटा आणून ठेवलं होतं. जेवणात शेवयांची खीर करणार असते. ही सगळी तयारी करताना तिच्या देहबोलीमध्ये एक नाद निर्माण झालेला होता.काम करताना मनात छान गाण्याच्या ओळी गुणगुणत फिरत होत्या.



इकडे सुधीर बसमध्ये होता पण मनाने केव्हाच नेहाजवळ जाऊन पोहोचला होता. त्याच्याही नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं होतं.

“ बाबा ताय झालं? ता हतताय तुम्ही?”
काही न कळून ऋषीने निरागस प्रश्न केला. त्याचा प्रश्न ऐकून सुधीर दचकला.
“सांगा ना बाबा तुम्ही का हसता आहे?”

ऋषीने पुन्हा प्रश्न केला त्याचा प्रश्न ऐकून सुधीरला वाटलं इतका आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसतो आहे का ?आपण हसतो आहे हे या लहान्या ऋषीला कळतं आहे म्हणजे इतरांनाही दिसेल.
असं कसं होतंय ?माझं मन आज स्थिर नाही. केव्हाच नेहा जवळ जाऊन पोहोचलं आहे. सहा महिन्याचा प्रदीर्घकाळ विरहाचा वाटतो आहे. आता नेहा पुन्हा पूर्वीसारखी झाली असेल की बंगलोरला जाण्यापूर्वी तिची जी मनस्थिती होती तशीच अजूनही असेल. सुधीरच्या मनात असे वेगवेगळे विचार यायला लागले.

तो ऋषीला म्हणाला,

“ ऋषी उद्या आई तुला भेटणार .तुला कसं वाटतं आहे?”

त्यावर ऋषी म्हणाला,

“ मला थूप आनंद होतो आहे.”

“ हो ना !तसाच आनंद मला पण होतो आहे म्हणून माझ्या चेहऱ्यावर हसू आहे.”

यावर सुधीरकडे बघून ऋषी गोड हसला आणि पटकन एका कुशीवर वळून उठला आणि त्याने सुधीरची पापी घेतली तेव्हा सुधीरला हसू आलं. बस मध्ये झोपल्या झोपल्या सुधीरला बंगलोर पर्यंतचा रस्ता खूप मोठा वाटायला लागला. या रस्त्यावरच अंतर कधी कमी होईल हा प्रश्न तो स्वतःच्या अधीर मनाला विचारत होता.


सकाळी बंगलोरला गाडी पोहोचली सुधीर आणि ऋषी कॅबने नेहाने दिलेल्या पत्त्यावर पोचले.दाराची बेल वाजतात नेहा गडबडीने अधीर झालेल्या मनाने धावतच समोरच्या दाराशी पोहोचली. तिथे पोहोचताना तिला तिच्या वागण्यातला बदल जाणवला आणि ती स्वतःशीच हसली. तिने दार उघडलं दारात सुधीर आणि ऋषी उभे होते. ऋषीने लगेच नेहाच्या कमरेला मिठी मारली आणि म्हणाला,

“ आई मी आलो.”

त्याबरोबर नेहाने त्याची पापी घेतले आणि बाजूला होत म्हणाली
“ ये न.”

सुधीर बॅग घेऊन आत आला. सुधीर अधीर नजरेने नेहा कडे बघत होता. त्याच्या डोळ्यात नेहा बद्दल प्रेम ठळकपणे दिसत होतं. सहा महिन्यापूर्वीचा जो उदास रंग नेहाच्या डोळ्यात होता तो नाहीसा झालेला सुधीरला दिसला.

सुधीर सहा महिन्यापूर्वीही नेहा बद्दल जेवढा आर्जवी होता तेवढाच आजही होता. आज मात्र सुधीरला नेहा मधला बदल जाणवला आणि तो मनोमन शहारला.


नेहाला किती वेळ कळेना आपल्या मनातला आनंद कसा व्यक्त करावा कुठेतरी आनंद बरोबर एक अटका येत होता ऋषी अजूनही आईला सोडायला तयार नव्हता नेहा म्हणाली
“ऋषी पटकन आंघोळ कर मग तुझ्या आवडीचे आलू पराठे करणार आहे. जेवताना शेवयाची खीर करणार आहे. “
“ ये..”
ऋषी आनंदाने ओरडत उड्या मारायला लागला. त्याचा आनंदीत चेहरा बघून नेहाच्या मनात आलं किती महिन्यांनी मी हा आनंद बघतेय. आता दोन दिवस ऋषी बरोबर नुसतं हुंदडायचं.

सुधीर सोफ्यावर बसला होता आणि तो नेहाचा चेहरा न्याहाळत होता. त्याला नेहामध्ये पुर्विचे मातृत्वाचे रंग दिसले. नेहा अशीच शांत प्रेमळ चेहऱ्याने ऋषीची सगळी दंगामस्ती एन्जॉय करायची.

“ सुधीर दोघं आंघोळी आटोपून घ्या मी नाश्ता तयार करते.”
“ हो चालेल.”
सुधीर म्हणाला.
“ आई आज मला तू आंधोळं धालाची आहे.”
यावर नेहा हसत म्हणाली,
“ बरं. मी घालते आंघोळ.”

ऋषीची आंघोळ म्हणजे एक तासभराचा कार्यक्रम असायचा.
ऋषी एकटा आंघोळ करायचा नाही. त्याला जो आंघोळ घालत असे त्याला ऋषी पाणी उडवून ओलाचिंब करत असे. आंघोळ करता करता तोंडाने नवीन गाणी म्हणत असे तेही ॲक्शन सहित.

ऋषीची आंघोळ बघणा-याला हसून हसून पुरेवाट व्हायची. आजही हे सगळं साग्रसंगीत पार पडलं. शेवटी कसंबसं टाॅवेल गुंडाळून नेहाने त्याला पकडूनच बाथरूमच्या बाहेर काढलं.

नेहा आणि ऋषीची मस्ती बडबड सगळं काही सुधीर बघून तृप्त झाला.त्याला त्याची पूर्वीची नेहा सापडायला लागली आहे असं त्याला वाटलं.


ब-याच वेळ नेहा आणि ऋषीची गडबड चालू होती. सुधीर आपल्याला निरखून बघतोय हे नेहाच्या गावी नव्हतं.ती ऋषीच्या बाललीलांमध्ये रमून गेली होती. इतकी महिने आपण या आनंदापासून वंचीत राहिलो याचं तिला वाईट वाटलं.

नेहाने ऋषीला आवडतात तसेच आलू पराठे केले. त्या पराठ्यांबरोबर ऋषीला आवडतं म्हणून केचप घेऊन आली.

“ आई थूला थगलं माईतीय मला काय आवडतं ते?”

“ अरे बाळा तुला काय आवडतं हे मला कसं माहिती नसणार. मी आई आहे नं तुझी?”

“ हो.ए…”

तोंडात पराठ्याचा घास कोंबून ऋषी आनंदाने ओरडला. नेहाच्या डोळ्यात पाणी तरळलं. तेव्हाच तिच्या खांद्यावर सुधीरच्या हाताचा स्पर्श झाला.नेहाने चटकन मागे बघीतलं. तिच्या डोळ्यातील पाणी अलगद पुसत सुधीर फक्त हसला आणि म्हणाला.

“ तू सदैव त्याच्या आठवणीत असतेस. तू त्याला विसरणार नाहीस नं ही भीती त्याला वाटायची. तसं त्याने बोलून दाखवलं. “

हे ऐकताच नेहाला हुंदका फुटला. तो हुंदका कसाबसा दाबत नेहा आतल्या खोलीत गेली. ऋषीला हे काही कळलं नाही की आपली आई रडतेय कारण तो कार्टून बघत आवडता आलू पराठा खाण्यात मग्न होता.

सुधीर नेहाच्या पाठोपाठ आतल्या खोलीत गेला. नेहाला अजून हुंदके आवरत नव्हते.ती कपाळावर हात ठेवून मान खाली घालून पलंगावर बसली होती. सुधीर नेहाच्या जवळ जाऊन बसला. तिला जवळ घेऊन थोपटलं.
नेहाने रडत विचारलं,

“ सुधीर मी ऋषींचा खूप अक्षम्य अपराध केलाय का?”

“ नेहा तू स्वतःला अपराधी मानू नकोस. तू सहा महिन्यांपूर्वी जे वागलीस त्यात तुझा दोष नाही. ती एक वाईट फेज होती. त्यात तू पूर्णपणे घुसमटून गेली होतीस. त्यातून बाहेर येण्यासाठी तू स्वतःला स्पेस दिलीस आणि आम्ही तुझी ही अवस्था समजून घेतली. तुला स्पेस दिली ती चांगलीच गोष्ट झाली. आता तुला तेव्हा सारखा नात्यांचा ताण येणार नाही. सगळी नाती तुला सांभाळता येतील. “यावर नेहा म्हणाली,


“ खरच सुधीर मी जेव्हा बंगलोरला आले त्यावेळेला मी फार डिप्रेशन मध्येच आलेले होते. मला काहीच नकोस वाटत होतं. इथे आल्यावर मला माझा वेळ मिळाला. मला स्वतःला ओळखायला वेळ मिळाला आणि त्यातून मला हळूहळू परिस्थिती कळत गेली. मनावरचे तणावाचे जे पापूद्रे जमा झाले होते ते निघून गेले म्हणूनच आज तू आल्याचा मला आनंद होतो आहे. ऋषीला अंघोळ घालताना खूप आनंद झाला. पूर्वीची नेहा मला सापडते आहे याचा आनंद झाला.”


यावर तिला हळूच थोपटत सुधीर म्हणाला,

“ मी जेव्हा घरी आलो तेव्हाच तुझा चेहरा बघून मला समजलं की तू सहा महिन्यांपूर्वी नेहा नाहीस. आता तुझ्यात खूप बदल झाला आहे त्यामुळे तो मधला काळ तू विसर. आता हे दोन दिवस फक्त आपण आपले म्हणून घालवायचे. तिघांचे लक्षात आलं ?”

“हो माझ्या लक्षात आलं. ऋषीला घेऊन आपण खूप फिरायला जाऊया. आपल्याला जे जे करायचं ते करूया. सहा महिन्यात मी कुठेही गेली नाही .”


हे सांगताना नेहाने मुद्दामच रमणचा किस्सा लपवून ठेवला. कारण आत्ताच तिला तिचं प्रेम पुन्हा मिळत होतं अशा वेळेला तो रमणचा वाईट काळ मध्ये नको त्यामुळे पुन्हा दोघांमधलं नातं खराब होईल तिला वाटलं.


“नेहा आता कसलाही विचार करू नकोस. तुझी तब्येत आत्ताच बरी होते आहे. त्यामुळे स्वतःकडे आता लक्ष द्यायचं. या दोन दिवसात आनंदचा खजिना आपण तिघंही गोळा करू आणि पुढील काही दिवस आपण त्यावर आनंदाने जगू.”


“ सुधीर तुम्ही दोघ गेले की मला खरंच घर खायला उठेल.”

“ हे बघ आई बाबा येणार आहेत पण आत्ता आपल्या दोघांना आपला वेळ मिळावा असं आई-बाबांना वाटलं म्हणून ते माझ्याबरोबर आले नाहीत.”

“सुधीर खरच किती समजूतदार आहेत रे आपल्या आई बाबा.”

“ हो नेहा तू स्पेस घेऊन बंगलोरला गेल्यावर मला खूप एकट वाटायला लागलं तेव्हा आई-बाबांनी मला खूप सावरलं. तुला हवी ती स्पेस मी द्यायला हवी असं मला आई-बाबांनी सांगितलं तसंच निशांतनही सांगीतलं. त्यामुळेच खरंतर मी उभा राहू शकलो. पण या सहा महिन्यात एक दिवस तुझ्या आठवणीशिवाय उगवला नाही आणि मावळला नाही. “


“खरच रे सुधीर मी इथे आले ना तेव्हा मी इतकी त्यात नात्यांच्या ताणामध्ये होते की मला कोणीच नको वाटत होतं. मी तुझे कितीतरी फोन घेतले नाही .तुझ्याशी बोलले नाही. ऋषीची आठवण यायची पण वाटायचं ऋषीचं कारण काढून तू फोनवर बोलत बसशील. तू इथे येशील मला ते काही काही नको वाटत होतं म्हणून मी खूप टाळलं. या सहा महिन्यात मी पण खूप सहन केलं.”

तिचे हात हातात घेत सुधीर म्हणाला,

“म्हणूनच म्हणतो आहे की आता हे दोन दिवस आपण खूप आपल्यातच जगू या आणि खूप छान आनंदी राहूया. आता याच्यानंतर तुला पुण्याला कधी बदली मिळते का ते विचारून बघ. एक वर्षानंतर पुण्याला परत येता आलं तर बघ.नाही जमलं तर मधून तू पुण्याला यायचं मधून आम्ही बंगलोरला येऊ.आत्ता जसे सहा महिने आपण मनातच कुढत होतो तसं नको करायला.ऋषीचं आयुष्य आपल्या वर अवलंबून आहे.तो कोमेजायला नको.”

“ मला पटतंय सुधीर तुझं बोलणं.”
रमणबद्दल सांगीतलं तर सुधीर कसा प्रतिसाद देईल याचा नेहाला अंदाज येत नव्हता त्यामुळे तिने ओठांवर आलेला रमणचा किस्सा ओठांवरूनच मागे परतला.

नेहा कितीतरी वेळ सुधीरच्या आश्वासक खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. सुधीर ही तिला मायेनं थोपटत होता.
________________________________