मला स्पेस हवी पर्व २ भाग १८ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व २ भाग १८

मला स्पेस हवी पर्व २ भाग १८

मागील भागात आपण बघितलं की नेहाच्या घरी आला त्यामुळे गेला होता. सुधीरने ओळखलं होतं म्हणून तो नेहाला समजून घेता आता काय झालं


“नेहा तू आज दिवसभर अस्वस्थ होतीस. काय झालं?”

“काही नाही. एवढं फिरायची सवय नाही त्यामुळे मी थकले.”

“तू आत्ता थकली असशील पण मी सकाळी घरातून निघाल्यापासून तुला बघतोय तू अस्वस्थ आहेस? काय कारण आहे ते खरं सांग?”

“नाही रे काही झालं नाही.”

नेहाने विषय टाळण्याचा प्रयत्न केला पण सुधीरने हा विषय लावून धरला.

“सकाळी तो माणूस आपल्या घरी येऊन गेल्यानंतर तू अशी अस्वस्थ झालीस. त्याआधी तू खूप आनंदात होतीस. या माणसामुळे तू का अस्वस्थ झालीस? मला त्या माणसाच्या हालचाली पण अस्वस्थ आणि संशयास्पद वाटल्या.”

सुधीरचं हे बोलणं ऐकून नेहाने काय करावं न कळल्याने आपले डोळे मिटून घेतले. सुधीर हळूच तिच्या जवळ बसला आणि तिचा हात हातात घेऊन थोपटत म्हणाला,

“नेहा न घाबरता बोल. नेमकं काय कारण आहे? हा माणूस तुला त्रास देतोय का? की ऑफिसमध्ये काही त्रास आहे?”

“सुधीर ऑफिसमध्ये मला काही त्रास नाही. हा रमण माझ्या प्रेमात पडला आहे.”

“काय? कोण प्रेमात पडलंय तुझ्या?”

“ तोच जो सकाळी आपल्या घरी आला होता.रमण शहा.”



“अगं तो तुझ्या पेक्षा जवळपास दहा वर्षांनी तरी मोठा असेल!”


“हो. मी त्याला म्हटलं की हा शुद्ध वेडेपणा आहे पण तो ऐकायला तयारच नाही.”

“ऐकायला तयार नाही म्हणजे.? मनमानी आहे का त्याची?”

“मी त्याला स्पष्ट सांगितलं की माझ्या मनात असं काही नाही. त्यानंतर रमण आजारी झाला. आज तो इतका आजारी दिसतो पण मी इथे जाॅईन झाले तेव्हा तो अतिशय देखणा आणि रूबाबदार दिसत होता.”

“तुझ्या कडून काही सिग्नल गेला का?”

“सुधीर तुला माझ्या वर संशय येतोय?”
नेहाने दुःखी स्वरात विचारलं.

“नाही ग. मी सहज विचारलं.कधी कधी बोलताना आपल्या तोंडून काहीतरी बोलल्या जातं त्यातून आपल्याही नकळत समोरच्याला सिग्नल जातो. तसा सिग्नल देण्याचा आपला उद्देश नसतो. असं काही झालं का हे विचारतोय.”

“नाही रे.मी पहिल्यांदा भेटले ते आमच्या ताम्हाणे सरांच्या केबिनमध्ये.तेव्हा माझ्या फार लक्षात आली नाही त्याची नजर किंवा बोलण्याचा हेतू. नंतर जाहिरातीच्या शूटच्या लोकेशनवर त्याच्या बोलण्यावरून मला जाणवलं की तो खूप जास्त माझ्या वागण्या बोलण्याकडे लक्ष ठेवून आहे. त्यानंतर मी कधीच एकटी त्यांच्याशी जाहीरातीबद्दल बोलले नाही.माझी असिस्टंट अपर्णा कायम माझ्या बरोबर असते.”

“हं”

सुधीरने हुंकार दिला.

“नेहा तू त्याला एकदा स्पष्ट सांग”

“सांगीतलं तरी तो समजून घेत नाही.काय करावं ते कळत नाही.”

“तुला फार त्रास होत असेल तर चल पुण्याला परत.”

“अरे असं एकदम कसं जाता येईल? मी प्रमोशन घेऊन आले आहे.”

“कळतंय मला. पण आता तुला त्रास होत असेल तर सोड हे प्रमोशन आणि चल पुण्याला. आज मी असताना तो आला. तू एकटी असतेस म्हणुन पुन्हा हिम्मत करेल.

“मी सांभाळून घेईन. अरे त्यादिवशी त्याची बायको मला ऑफिस मध्ये भेटायला आली होती.”

“त्याची बायको आली होती?”

सुधीरने आश्चर्याने विचारल.

“‘हो “

“तिला माहिती आहे?”

“तिला माहिती नव्हतं.तिला आश्चर्य वाटलं होतं की एवढं काय याला झालंय की हा बरा होत नाही.त्यादिवशी तो बेशुद्ध झाला होता. त्याची बायको घाबरली . डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिले .तो अर्धवट शुद्धीवर आल्यावर माझं नाव घेऊन बडबडला तेव्हा तिला कळलं. ती मला भेटायला मुद्दाम आली होती. मला बघितल्यावर, माझ्याशी बोलल्यावर तिने माझी माफी मागितली.”


“मला वाटतं की एकदा तू ऑफिस मध्ये बोलून बघ. तुला परत पुण्याला येता येईल का? आता फक्त सहा महिने झाले असले तरी विचारून बघ.”


“सुधीर मला तुझी काळजी कळतेय पण मी पुण्याला परत जाण्याचं काय कारण सांगू?”

बराच वेळ दोघंही शांत बसले. शेवटी सुधीर म्हणाला,
ऋषीचं कारण सांग

“ऋषीचं काय कारण सांगणार?”

“सांग माझे सासू सासरे म्हातारे झालेत त्यांना ऋषीचं करणं जमत नाही म्हणून मला पुण्याला परत जायचंय.”

“हं “

नेहा हसली.

“हसायला काय झालं?”

“आधीच सगळे पुरष ओरडतात बायकांना काही येत नाही.त्यांना कामं करायची नसतात म्हणून त्या प्रत्येक कामात सांसारिक अडचणींचा पाढा वाचून आपली जबाबदारी झटकतात. "

“नेहा अगं असं सगळेच पुरूष म्हणत नाही. मी पुरूष आहे त्यामुळे मला माहिती आहे की नव्वद टक्के पुरूष स्त्री कडे कोणत्या नजरेने बघतात. काही रमणसारखी पुढची पायरी गाठतात. पुढच्या कटकटी टाळायच्या असतील तर पुण्याला‌ परत चल. नाही तर त्या रमणला ठणकावून प्रतिउत्तर दे.”

“सुधीर हा दुसरा ऑप्शन मला पटतंय.”

सुधीरने नेहाचा हात हलकेच दाबला.

“नेहा तू एकटी नाहीस.या विचित्र परिस्थितीमध्ये मी तुझ्यबरोबर आहे.तू आता काहीही मनात ठेऊ नको. मनात ठेवून नैराश्य येतं असं होऊ देऊ नको कारण आम्ही सगळे तिथे असलो तरी आमचं मन इथे तुझ्यापाशी घुटमळत असतं.”

“मला माहिती आहे. असा समजूतदार नवरा आणि सासर फार कमी जणांना मिळतं. सकाळी तुझ्या समोर रमण आला म्हणुन मी तू काय म्हणशील या भीतीने अस्वस्थ नाही झाले. आज सकाळी मी खूप आनंदात होते. सहा महिन्यानंतर मला पूर्वीची नेहा सापडली होती. पूर्वी सुधीरला बघितल्यावर जिच्या अंगावर रोमांच उठायचा तो मधल्या काळात कुठेतरी हरवला होता. तो रोमांच तुला काल बघितलं तेव्हा पुन्हा मला जाणवला. त्या सुंदर अनुभवाला मी पूर्णपणे अनुभवण्यापूर्विच तो रमण आला म्हणून माझा विरस झाला.”

“नेहा तू अजिबात घाबरु नको. त्याला समजत नाही तर त्याच्या बायकोला समजावं”

“ती बिचारी खूप साधी वाटली मला. “

“बरेचदा रमणसारख्या पुरुषांच्या वागणुकीमळे त्यांच्या बायकांना त्रास सहन करावा लागतो.त्याला आपला काही इलाज नाही.”

“हां खरंय तू म्हणतोस ते. मी त्याच्या बायकोला सांगून बघीन.”

“चल आता झोपुया आज खुप थकलो. तुझ्या मनावरचं दडपण दूर करण्यात माझा थोडासा सहभाग आहे यामुळे मलापण बर वाटतं आहे.”

सुधीरने खूप प्रेमाने नेहाला जवळ घेतलं.नेहाने खूप विश्वासाने सुधीरच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि हळूच डोळे मिटले.

सुधीरच्या मनात नेहाबद्दल खूप माया दाटून आली. एक नवरा म्हणून नाही तर एक जवळच्या मित्राच्या नात्याने तो आपल्या स्पर्शातून नेहाला आधार देत होता.

नेहाच्या मनात विचार चक्र सुरू होतं.

‘मी किती नशीबवान आहे. मला सुधीर सारखा समजून घेणारा जीवन साथी मिळाला. आज माझ्या सारखी परिस्थिती एखाद्या स्त्री वर आली तर तिचा नवरा सुधीर सारखा समजून घेणारा असेल का? असला तर तिला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आधार मिळेल.जर असं नाही झालं तर त्या स्त्रीची किती मानसिक घुसमट होईल? बहुतेक नवरे बायकोवर विश्वास ठेवताना दिसत नाही.

देवा तू माझ्या वर खूप कृपा केली आहेस. मी तुझी खूप ऋणी आहे. सुधीर येण्याअगोदर मी खरंच धास्तावले होते की हे रमण प्रकरण सुधीर समजून घेईल का? पण माझ्या मनातील भीतीला सुधीरच्या वागण्याने खोटं ठरवलं. आता मला या रमण शहाचा सोक्षमोक्ष लावायचाच आहे.माझ्या संसारात याचे पडसाद उमटू देणार नाही. परमेश्वरा मला साथ दे.’

नेहाच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू सुधीरच्या शर्टाला भिजवून गेले. काही तरी ओलं लागलं म्हणून सुधीर ने नेहाचं डोकं वर उचललं तर त्याला नेहा रडताना दिसली.

“अरे नेहा रडतेस का?”

“ हे आनंदाश्रू आहेत.”
नेहा डोळे पुसत म्हणाली.

“ तुझ्या डोळ्यात मला दुःखाश्रू बघायला आवडणार नाही. आनंदाश्रू आलेत तर येऊ दे.”
सुधीरने आनंदाने नेहाच्या गालावर टिचकी मारली.

कितीतरी वेळ दोघं एकमेकांच्या सहवासातील क्षणांमधून अमृतकण वेचत होते. खूप महिन्यांनी त्यांच्या संसाराला लागलेलं ग्रहण सुटलं होतं.
__________________________________
क्रमशः