मला स्पेस हवी पर्व २ भाग २० Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व २ भाग २०

मला स्पेस हवी पर्व २ भाग २०

मागील भागात आपण बघीतलं की छकू रमणला समजावते आता या भागात बघू काय होईल?


सुधीर नेहाला भेटून बंगलोरहून पुण्याला परत आला. पुण्याला आला तरी अजूनही त्याच्या मनावर नेहाच्या प्रेमाची ,स्पर्शाचे मोहिनी होती. सुधीर खूप खुश होता त्याला बघितल्यावरच त्याच्या आई-वडिलांना त्याच्या मनातला आनंद कळला. सुधीर आणि ऋषी घरात शिरताच सुधीरची आई म्हणाली,

“ अरे वा सुधीर तुझा आणि ऋषीचा चेहरा सगळ सांगून जातोय. तुम्ही खूप आनंदात आहात. बंगलोर ट्रिप यशस्वी झाली ना ?”

यावर सुधीर हसतच म्हणाला ,

“होय खूप छान झाली ट्रिप. नेहा पूर्वीसारखीच भेटली मला. आणि…”
सुधीर बोलता बोलता मधेच ‌ थांबला.

“काय रे सुधीर बोल नं मध्येच थांबलास का?”


सुधीरला आई म्हणाली ,

“काही नाही.”

सुधीरने रमणचा विषय सांगण्याचा टाळलं. त्याला असं वाटलं उगाचच यांच्या डोक्याला टेन्शन नको. सकाळचा चहा पाणी नाश्ता सगळं आटोपल्यावर सुधीर म्हणाला,

“आई मी जरा निशांतला भेटू येतो. आज सुट्टी आहे. उद्यापासून आहेच ऑफिस.”

“ अरे मग ऑफिसमध्ये भेटा की आता कशाला जातोय तातडीने एवढ्या उन्हात?”

आई म्हणाली.

“ आग काही नाही. दोन दिवस झाले त्याला भेटलो नाही.”

“ अरे बापरे ! दोनच दिवस झाले नं !”

“ठीक आहे संध्याकाळी जाईन.”
सुधीर म्हणाला.

त्यानंतर संध्याकाळी सुधीर निशांतला भेटायला गेला. अक्षयलापण त्याने फोन करून बोलावलं होतं. हाय हॅलो सगळं झाल्यानंतर निशांत म्हणाला,

“ आज चेहरा खुशीत दिसतोय. बंगलोर ट्रीप छान झालेली दिसते.”

यावर सुधीर म्हणाला,

“ हो मी यावेळी गेलो हे फार बरं झालं. नेहा इथून ज्या कारणासाठी बंगलोरला गेली त्या कारण व्यतिरिक्त तिच्या आयुष्यात जरा एक वादळ आलं.”

“ वादळ आलं! कोणतं ?”

निशांतने जरा काळजीपोटी विचारलं. सुधीरने त्याला रमण शहाबद्दल सांगितलं. हे ऐकून निशांत आश्चर्यचकित झाला.

“ अरे हा काय वेडेपणा आहे?कोण आहे हा माणूस ? पंचेचाळीस वर्षाचा आहे म्हणतोस. त्याने दोघांच्या वयातील अंतर तरी लक्षात घ्यायचं होतं. त्याला या गोष्टींची अक्कल नसावी का की कसं वागायला हवं ते?”


“ नेहा ने पहिल्यापासूनच मर्यादेत वागणूक ठेवली पण हा माणूस काही समजूनच घेत नाही. आता काय करायचं ते नेहाला कळत नव्हतं.”

“ मग?”

निशांत ने विचारलं.तेवढ्यात अक्षय तिथे येऊन पोचला.

“ हाय”

“ ये तुझीच वाट बघत होतो.”

“ कायरे ! एवढा सस्पेन्स काय क्रिएट केलास?”

सुधीरने रमण शहाबद्दल सांगितलं ते ऐकल्यावर अक्षय चकीत झाला.

“ नेहा ओळखत होती का?”

“ छे: ! नेहा कशी ओळखणार आहे?”

“ नेहा स्पेस हवी म्हणत बंगलोरला गेली ती या रमणसाठी गेली?”

“ अक्षय हे काय विचारतोय? अरे नेहा तुझी बहीण आहे.”

“ हो. कबूल आहे मला पण नेहा लहानपणापासून आपल्या मनातलं सगळं सांगत नाही. म्हणून विचारलं.”

“ मी लग्न झाल्यापासून नेहाला जेवढं ओळखलं आहे त्यात नेहा इतकी उथळ नाही. नसेल सगळ्या गोष्टी ती आपल्याला सांगत पण हे एवढं मोठं खोटं ती बोलणार नाही. अक्षय तुझ्या मनात अशी शंका का आली?”

सुधीरने विचारलं.

“ तिच्या स्वभावामुळे.”

“ ती तुला सगळं का सांगायची नाही या मागचं कारण मला माहिती आहे.”

“ कोणतं कारण?

“तुझ्यात आणि नेहामध्ये तुझी आई भेदभाव करायची. हे नेहाने मला सांगीतलं आहे.”

“ भेदभाव! छे: काहीतरी मनात घेऊन बसली आहे. असं काही नाही.”

अक्षयने तातडीने ही गोष्ट नाकारली.

“ हे बघ अक्षय मला वाटतं या विषयावर आपण नंतर बोलू. आत्ता सुधीरला जे सांगायचे आहे ते सांगू दे.”
निशांत म्हणाला.

“ओके ठीक आहे. सांग कोण आहे हा रमण?”

“नेहा ज्या स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये काम करते त्यांच्या जाहिराती सत्यम ॲडव्हर्टायझिंग एजन्सी तयार करते.”

“बरं पुढे?”

अक्षय म्हणाला.

“या सत्यम ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचा रमण शहा क्रिएटिव्ह हेड आहे. कंपनी त्याचीच आहे. त्याच्याशी कामानिमित्त नेहाची ओळख झाली. सुरवातीला नेहाच्या लक्षात आलं नाही. नंतर जेव्हा तिला शंका आली तेव्हा ती तिची असिस्टंट अपर्णा बरोबरच रमणला कामानिमित्त भेटायची. जेणेकरून त्याला कोणतीही संधी मिळू नये.”

“एवढी नेहाने काळजी घेतल्यावर रमणला कळलंच असेल की नेहाकडून काही सिग्नल नाही.मग नेहा का इतकी घाबरली?”

निशांत ने विचारलं.

“नाही ना ! तसं झालं नाही. एकदा नेहा आजारी पडली. ती जवळपास पंधरा दिवस सुट्टीवर होती. त्यावेळेस हा रमण सरळ तिच्या घरी आला आणि तिला त्यानी स्पष्ट शब्दात सांगितलं की त्याचं तिच्यावर प्रेम आहे आणि तिच्याही मनात त्याच्याबद्दल प्रेम असावं ही अपेक्षा त्याने व्यक्त केली.”

“ अरे यार याला काय वेड लागलंय का ?”


अक्षय एकदम ओरडून बोलला.

“ अरे तेच कळत नाही ना. एक बरं झालं नेहा तेव्हा एकटी नव्हती.”

“ मग कोण होतं तिच्याबरोबर ?”


निशांतने विचारलं.

“ अरे तिच्या ऑफिसमधल्या दोन कलीग अपर्णा आणि अनुराधा या दोघीजणी आलटून पालटून पंधरा दिवस नेहाजवळ होत्या. जेव्हा रमण तिच्या घरी आला होता तेव्हा अपर्णाच नेहा जवळ होती. यानंतर मात्र नेहाला जास्त भीती वाटायला लागली आणि पंधरा दिवसानंतर ती आत्ताच ऑफिसला जॉईन झाली तेव्हा तो रमण सरळ ऑफिसमध्ये आला आणि तिला म्हणायला लागला, कळकळीने विनंती करायला लागला की नेहाने त्याचं प्रेम स्वीकारावं.”


“ अरे असं कसं तो म्हणू शकतो?”

अक्षय जरा चिडीला आला.


“ अक्षय, निशांत तो माणूस इतका वेडा झालाय. नेहाच्या ध्यासापायी की त्याची तब्येत खराब झाली आहे. हे नेहाचं मला म्हणाली. मी प्रत्यक्ष बघीतलं त्या रमणला खूप खराब दिसत होता.”

सुधीरने त्या दोघांना सांगीतलं.

“कमाल आहे नेहा जर त्याला सिग्नल देत नाहीये हे कळत असून त्यानी का नेहाच्या मागे लागावं?”


“तेच ना जेव्हा ते रमणच्या बायकोला कळलं की हा नेहाच्या मागे आहे तेव्हा तिने ऑफिसमध्ये येऊन नेहाची माफी मागितली.”

“ अरे बापरे असंही झालं का?”

“ हो ना त्यामुळे नेहाला आणखीन काळजी वाटली की त्या बाईचं कसं होईल ?तेव्हा त्या बाईने कबूल केलं.”

“कोण बाई ?”

अक्षयने विचारलं.

“अरे त्या रमणची बायको. दुसरी कोण असणार आहे? तिने नेहाला कबूल केलं की पुन्हा रमण तिला त्रास देणार नाही पण ज्या दिवशी मी बंगलोरला गेलो होतो त्याच दिवशी तो रमण तिला भेटायला आला होता. आणि त्याला कल्पना नव्हती की मी तिथे आलोय. नेहाने त्याला ओळख करून दिले की हा माझा नवरा आहे म्हणून त्यावर तो एकदम सटपटला. त्याला काय बोलावं कळलं नाही आणि काहीतरी थातूर मातूर बोलून तो निघून गेला. मला त्याची बॉडी लँग्वेज बघूनच लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. तो अतिशय अस्वस्थ हालचाल करत होता. नेहाकडे बघताना मधूनच माझ्याकडे त्याचं सारखं लक्ष जात होतं. नेहाने स्पष्ट शब्दातच त्याला सांगितलं की आम्हाला आता बाहेर फिरायला जायचंय. आपण ऑफिसमध्ये बोलूया. तेव्हा तो निघून गेला पण त्यानंतर पूर्ण दिवस नेहाचा अजिबात मूड नव्हता.”

“ साहजिकच नेहाचा मूड जाणार. आता तू इकडे आल्यानंतर तो पुन्हा घरी आला म्हणजे?”

निशांत ने शंका व्यक्त केली.

“ नेहाचा मूड परत आला का?”

अक्षयने अधीरपणे विचारलं.

“नाही. मी तिला वारंवार विचारत होतो पण ती काही सांगायलाच तयार नव्हती. मला तिचा मूड नसण्यामागे या रमणचा वेडेपणा आहे हे माहीत नव्हतं.”


“ मग हे कधी सांगितलं तुला नेहाने?”


अक्षय ने विचारलं.

“ आम्ही घरी आल्यानंतर ऋषी झोपल्यावर मग मी तिला विचारलं. तेव्हा तिने मला हे सगळं सांगितलं. तेव्हा मी तिला सरळ म्हटलं तुला जर इथे फार त्रास होत असेल तर तू पुण्याला परत चल.”

“अगदी बरोबर. माझ्या सुद्धा मनात हेच आलं”

अक्षय म्हणाला.

“अरे पण ती प्रमोशन घेऊन गेली आहे ना तिथे ! तिला एकदम कसं येता येईल ?”

निशांत ने शंका व्यक्त केली.

“ हो रे निशांत नेहासुद्धा हेच म्हणाली की ते प्रमोशन वर गेली असल्यामुळे तिला निदान एक दीड वर्ष तरी बंगलोरहून हलता येणार नाही. आत्ताकुठे सहा महिने झाले आहेत.”


“ तू इकडे आल्यानंतर त्या माणसाने पुन्हा तिला त्रास दिला तर काय करायचं ?”

अक्षयला आता मात्र ते राहवत नव्हतं. तो म्हणाला,

“ आपण जाऊया का पुन्हा बंगलोरला ?”

“आपण जाऊन काय करणार ?तिला थोडाफार आता स्वतःला कणखर केलंच पाहिजे.”


सुधीर पुढे म्हणाला.


“मी तिला हिम्मत देऊन आलोय. तसंही मधल्या शनिवार रविवारला तिला पुण्याला यायला सांगितले आहे आणि मधून मी जाईन. जेव्हा ऋषीची शाळा बंद होईल उन्हाळ्याची सुट्टी लागेल तेव्हा आई-बाबा त्याला घेऊन जाणार आहेत म्हणजे तिला एकटे पण जाणवणार नाही.”


“सुधीर नेहा गेली कशासाठी आणि काय हे झाले कळत नाही .”

अक्षयने एक सुस्कारा सोडला. निशांत ने सुधीरच्या खांद्यावर थोपटल़.

“ सुधीर हे रमण प्रकरण तू आईबाबांना सांगितलं आहे?”

“ नाही. सांगेन ऊद्या परवा. अक्षय तू मात्र तुझ्या आईबाबांना सांगू नकोस फक्त प्रणालीला सांग.”

“ का?”

अक्षयला सुधीरने असं का म्हणावं ते कळेना.

“ अरे तुझी आई नेहाला समजून घेण्याऐवजी तिचीच शाळा घेईल. नेहाने ही भीती माझ्या जवळ बोलून दाखवली.”

“ नेहा उगीचच आई बद्दल गैरसमज करून बसलीय.”
अक्षयच्या आवाजात चीड होती.

“ अक्षय हे बघ सध्या तू तुझ्या आईबाबांना नाही सांगीतलं तर काय हरकत आहे? नेहा तिकडे एकटी आहे. ती स्वतःला कणखर बनवून रमण नावाच्या संकटाला तोंड देण्याचा प्रयत्न करतेय. यावेळी नेहाला माॅरल सपोर्ट हवाय. त्या ऐवजी तुझ्या आईने सुधीर म्हणतो तशी शाळा घेतली तर नेहा अजून निराश होईल. तुला पटेल हे असं घडलं तर?”

निशांत ने अक्षयला थेट विचारलं.

बराच वेळ अक्षय काही बोलला नाही.

“ अक्षय तुला माझं म्हणणं पटतंय का? काही शंका असेल तर विचार.”

निशांत म्हणाला.

“ नाही. पटलय तुझं म्हणणं.”

“ सुधीर नेहाची काळजी घे. टेंन्शन घेऊ नकोस. रोज तिला फोन करत जा. अवांतर बोल. सारखा रमणचा विषय काढू नकोस. ऊपदेश करू नकोस. एका चांगल्या मित्राप्रमाणे तिच्याशी बोल आणि तिचा ताण हलका कर. तिला ऋषीशी बोलू दे.”

“ हं. निशांत तू सांगीतलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवीन.”

“ गुड. चला चर्च झाली असेल तर निघूया.”
निशांत म्हणाला.

“ हो. तुम्हाला दोघांना ही गोष्ट सांगून मला माझा ताण हलका करायचा होता म्हणून दोघांना एकाच वेळी बोलावलं. आईचं चालू होतं की ऊद्या सोमवार आहे ऊद्या निशांत ऑफिसमध्ये भेटलेच. मग एवढ्या घाईने का भेटायला चालला?”

यावर तिघही हसले.

“ सुधीर काकूंना पडलेला प्रश्न खरच महत्वाचा आहे.”
चल निघूया ऊद्या भेटू ऑफिस मध्ये.”

निशांतने सुधीरच्या हातावर टाळी देत म्हटलं. अक्षयनेही असंच केलं.

तिघही आपल्या घराच्या दिशेने गेले. सुधीरचा चेहरा मनातील तणावपूर्ण गोष्ट दोघांना सांगितल्यामुळे जरा हसरा झाला होता.
_________________________________
क्रमशः