मला स्पेस हवी पर्व २ भाग २२ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व २ भाग २२

मला स्पेस हवी पर्व २ भाग २२

मागील भागात आपण रमण आणि छकूचं संभाषण वाचलं. आता बघू.

नेहा ऑफिसमध्ये येते. येतानाच अपर्णा भेटते.दोघी बोलत बोलत नेहाच्या केबीनपाशी येऊन बोलत उभ्या राहतात.

“ गुड मॉर्निंग मॅडम.”

“गुड मॉर्निंग.”

“कसे गेले दोन दिवस?”
अपर्णाने विचारलं.

“छान गेले. ऋषी खूपच खूष होता.”

“असणारच. तुम्ही पण खूप खूष दिसताय. तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो सांगतोय.”

यावर नेहा हसली आणि जरा लाजली. तिच्या मनात सुधीरबरोबर घालवलेले मोहक क्षण रूंजी घालत होते.


“त्यादिवशी मॅडम तुम्ही जरा कमी बोलत होता त्यामुळे माझ्या मिस्टरांना वाटलं की तुम्हाला आवडलं नाही आमच्या कडे?”

“अगं नाही असं काही नाही. सुधीर तर खूप छान मिक्स झाला होता. तुझ्या मिस्टरांशी किती बोलत होता.”

“या दोघांचं ट्युनिंग खूप छान जुळलं होतं आणि आमच्या अभीचं तुमच्या ऋषीशी छान जमलं म्हणून मजा आली पण तुम्ही कमी बोलत होता ?”

“हं”

“काय झालं?”

“ अगं त्याच्या आदल्या दिवशी आमच्या घरी रमण शहा आला होता. हे मी तुला सांगीतलं होतं. त्यामुळे माझा पूर्ण दिवस मूड नव्हता.”

“ तुम्ही बोलला होता. तुमच्या मिस्टरांना कळलं का?”

“कळलं म्हणजे त्याने घरी आल्यावर मला स्पष्ट विचारलंं की तुझा मूड का नाही?”

“मग ?”

“मी सांगायचं टाळत होते पण सुधीरने मला सांगायला भाग पाडलं.”

“ तुम्ही सगळं सांगितलं?”

“हो कारण मी लपवून ठेवलं असतं तर कदाचित मलाच त्रास झाला असता. शिवाय सुधीर अत्यंत प्रेमाने आणि काळजीने विचारत होता मग मीही सगळं सांगितलं.”

“काय प्रतिक्रिया झाली तुमच्या मिस्टरांची?”

“हे सगळं ऐकल्यावर सुधीर मला लगेच पुण्याला चल म्हणायला लागला.”

“बरोबर आहे.”

“मी प्रमोशन वर आले असल्याने मला लगेच इथून निघता येणार नाही हे समजावून सांगितलं सुधीरला. तेव्हा कुठे तो तयार झाला.”

“तयार झाले असले तरी मनात चिंता वाटणारच. “

“हो म्हणून कबूल करून घेतलंय की रोज रात्री मी फोन करायचा. ऋषीशी बोलून मनावरचा ताण घालवायचा.”

“अगदी खरंय. लहान मुलं आपला ताण घालवतात. तुम्ही इथे एकट्या असता त्यामुळे हा उपाय नक्की करा. मला माहित आहे की मी जेव्हा ऑफीसच्या कामाने खूप थकले तरी जेव्हा अभि माझ्या गळ्यात आपले हात टाकून माझी पापी घेऊन म्हणतो नं आई बघ मी तुझी पापी घेतली आता तुझा थकवा भूर्र् उडून जाईल तेव्हा खरंच माझा थकवा कापरासारखा उडून जातो.“

यावर दोघी हसतात.

“मी जसं अभीला म्हणते नं तसच तो बोलतो. अगदी आजोबा टाईप.”

यावर अपर्णा पुन्हा हसते.

“खरच ग ऋषी सुद्धा असेच माझे लाड करतो आणि बोबडं बोलतो तेव्हा हसायला येतं आणि त्या हसण्यामधे खरच सगळं टेन्शन दूर होतं.”

“मग करणार नं रोज घरी फोन?”

“हो. अपर्णा मी पुण्याहून आले तेव्हा खूप वेगळ्या मनस्थितीत होते. कोणालाच फोन करायची माझी इच्छा नसायची. इथे आल्यावर स्वतःला वेळ देत मी जरा स्थिरावतेय तोच हा रमण शहा आला. नुसता आला नाही तर वादळ घेउन माझ्या आयुष्यात आला. त्याने मी गोंधळले. हे सगळं कसं निस्तरायचं मला कळत नव्हतं. सुधीरला हे कसं सांगायचं कळत नव्हतं म्हणून मग मी त्याचे फोन घेणं कमी केलं. पण सुधीरचा आवाज ऐकला की छान वाटतं हे मात्र मी मनात कबूल केलं.”

“मॅडम आपल्या जोडीदाराशिवाय आपलं दुःख इतक्या हळुवारपणे कोणीच समजून घेऊ शकत नाही. “

“खरय. आत्ता जेव्हा मी सुधीरला सगळं सांगितलं तेव्हा थोडीशी भीती मनात होती पण सुधीरने इतक्या समजूतदारपणे माझ्या मनावर असलेला रमण नावाचा ताण समजून घेतला. नव-याचं हे असं समजून घेणं ज्या स्त्रीला मिळतं ती खूप भाग्यवान असते. नाही तर त्या स्त्रीने काय करायचं?””

“हं. असं ज्या स्त्रीच्या बाबतीत घडत नाही तिची खूप कुचंबणा होते. ज्याच्यासाठी सगळी जवळची नाती सोडून नवीन नाती आपलसं करायला आलेल्या स्त्रीला जर समजूनच घेतलं नाही तर तिने कोणाला आपलं दुःख सांगायचं?”

“पण अपर्णा खूप जणींच्या बाबतीत हेच घडतं. रमणच्या वागण्यामुळे माझ्या आयुष्यात प्रश्न निर्माण झाला पण त्याच वेळी रमणच्या बायकोच्या आयुष्यात सुद्धा प्रश्न निर्माण झालाच असेल नं?”

“नक्कीच झाला असेल.”

“रमणसाठी ती सुद्धा स्वतःची जवळची नाती सोडून आलेली स्त्रीच आहे. तिला तिच्या प्रेमाचा अपमान झाल्यासारखं नसेल का वाटलं? इतक्या वर्षांच्या सहजीवनानंतरही ही रमणसारखे पुरूष हा विचार का करत नाही?”

“मॅडम हा विचार केला असता तर रमण असा वागलाच नसता. मॅडम आज तुम्ही जश्या वागल्या तशा ब-याच बायका वागत नाही. एक स्त्री असूनही दुसऱ्या स्त्रीवर आपण अन्याय करतोय हे लक्षात घेत नाही.”

“अपर्णा हे तेव्हाच लक्षात येतं जेव्हा तुमच्या सहजीवनात एकमेकांवरच्या प्रेमाची बीजं घट्ट रूजलेली असतात. जिथे ही बीजं रूजलेली असतात त्या स्त्री किंवा पुरुषाचं बाहेर लक्षच जात नाही.”

“हे मात्र शंभर टक्के खरय.”

“ रमणची बायको त्या दिवशी मला भेटायला आली तेव्हा रमणचा राग आला आणि त्याच्या बायकोबद्दल सहानुभूती वाटली. आता हा प्रश्न ती कशी सोडवेल काय माहित?”

“ मला ती तशी खंबीर आणि शांत वाटली. एखादी असती तर तिने आकाश पाताळ एक केलं असतं.”

“ मला आता ऑफिसमध्ये येताना मनात धडकी भरते. कधी हा रमण अचानक ऑफिसमध्ये येईल सांगता येत नाही.”

“ हो असा येऊ शकतो पण तुम्ही घाबरू नका. मला फोन करा मी लगेच येईन.”

“ अगं फोन करायला सुचलं‌ तर पाहिजे.”

‘“ हो तेही आहे. पण घाबरू नका कारण तो स्वतःची प्रतिमा खराब होईल असं काही इथं ऑफिसमध्ये वागणार नाही असा माझा अंदाज आहे.”

“ मला पण असंच वाटतं. याचं डोकं कधी ताळ्यावर येईल असं मला झालं आहे.”

नेहाने बोलताना एक सुस्कारा सोडला.

“ मॅडम तुम्ही खूप विचार करू नका.त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तो ऑफिसमध्ये आला तरी त्याला फार किंमत देऊ नका. कामास काम ठेवा.”

“ तसंच करावं लागणार आहे. कामात सुद्धा मला जबरदस्ती लक्षं द्यावं लागणार आहे. कितीही या रमणला टाळायचं म्हटलं तरी टाळता येणार नाही. स्वस्तिक टूर्सच्या जाहिराती याच्याच एजन्सीकडे जातात हे माझं दुर्दैव.”

“ स्वस्तिक टूर्सला आपण हे कारण सांगून जाहीरात एजन्सी बदला म्हणून सांगू शकत नाही.”

“ छे: अपर्णा काहीतरी काय? हे कारण कसं सांगणार? मलाच त्याच्याशी आता रोखठोक बोलायला लागणार आहे.आधी जशी घाबरायचे, समजवायला जायचे तसं आता करणार नाही.त्याला कळलंच पाहिजे की मला त्याच्या मधे काडीचा इंटरेस्ट नाही.”

“ तसंच करायला हवं. तरच तो ताळ्यावर येईल.”


“ हं ठीक आहे. आपण आपल्या कामाकडे लक्ष देऊ. हे सध्या रमणपुराण बाजूला ठेवू. अपर्णा जरा वेळाने माझ्या केबिन मध्ये ये.’

“ हो.” अपर्णा म्हणाली.”

दोघंही हसतच आपापल्या टेबल कडे गेल्या.


***

अक्षयने प्रणालीला जेव्हा रमणचा किस्सा सांगितला तेव्हा ती अवाक झाली.

“ अक्षय हे काय सांगतोय तू?”

“जे मला सुधीरने सांगीतलं तेच सांगतोय.”

“कमाल आहे. कामाशी काम ठेवता येत नाही का पुरूषांना?”

“प्रणाली तुझ्या ऑफीस मधे आहे नं असा किस्सा?”

“हो पण तिथे उलटं आहे तो करमरकर अगदी वैतागला आहे त्या सुजाता तांबोळी मुळे.”

“यातून काही कळलं का तुला?”

“काय कळायचय?”

“अगं प्रत्येक वेळी पुरूषच मागे लागत नाही. काही बायकापण मागे लागतात.”

“हो कळलं मला. त्या करमरकरकडे पाहून मला नेहाची परिस्थिती किती अवघड झाली असेल ते कळतंय. याला काय उपाय शोधला आहे नेहाने?”

‘मला माहित नाही. तू नेहाशी बोल या विषयावर.
कदाचित तुला सांगेल असं मला वाटतं.”

“ हं. बघते बोलून. आईबाबांना सांगीतलं का?”

“ नाही. सुधीरने आईबाबांना सांगायचं नाही अशी सक्त ताकीद दिली आहे.”

“ का?”

“त्याचं म्हणणं आहे की माझी आई तिला समजून घेण्याऐवजी तिलाच कानपिचक्या देईल त्या पेक्षा नको सांगू. न सांगितल्याने काही फरक पडत नाही.”

“ सुधीरचं बरोबर आहे. आई असं वागू शकतात. एकवेळ बाबा समजून घेतील पण आईंची खात्री नाही देता येत.”

“म्हणूनच नाही सांगायचं.”

“बाबांना सांगू शकतो पण बाबांना काही लपवता येत नाही. आई बाबांचा चेहरा बघून लगेच ओळखतील आणि मग त्यांच्या मागे लागून सगळी गोष्ट काढून घेतील.”

“नको आईबाबांना सांगू नाही. त्यांच्या समोर या गोष्टी बद्दल काहीही बोलायचं नाही.”

“ठीक आहे. चल झोपूया.ऊद्या लवकर ऑफीसला जायचंय. अक्षय परवा मला शुभमच्या शाळेत जायचय”

“ कशासाठी?”

“ अरे गॅदरिंग जवळ आलंय. शुभम सांगत होता की त्याला डान्स मध्ये घेतलंय. त्यासाठी मॅडमने शाळेत बोलावलं आहे.”

“ अरे व्वा ! मस्त जाऊन ये. यावेळी पण शाळा ड्रेस देणार आहे नं? हे विचारून घे.”

“हो विचारीन. मला वाटतं याही वर्षी शाळाच शिवून घेईल ड्रेस. मागच्या वर्षीसारखं पैसे घेतील आपल्याकडून असं वाटतं. ऐनवेळी शाळेची काही पाॅलीसी बदलली तर माहिती नाही.”

“ तेच पक्क विचारून घे आणि जमलं तर या एकदोन दिवसांत नेहाशी बोलून घे.”

अक्षय म्हणाला.

“ हो. शाळेची मिटींग झाली की स्वस्थ चित्ते बोलेन.”

प्रणाली म्हणाली आणि ऊद्या सकाळी उठायच्या गडबडीने लवकर झोपली.

प्रणाली आणि नेहाचं ट्युनिंग चांगलं असल्याने आपल्याला सविस्तर सगळं कळेल याची खात्री असल्याने अक्षयपण निश्चींत मनाने झोपला.
________________________________

क्रमशः