मला स्पेस हवी पर्व २ भाग २४
मागील भागात आपण बघीतलं की रमण कुठेतरी घाईने गेला? कुठे गेला असेल या भागात बघू.
रमण घाईने नेहाच्या ऑफिसमध्ये गेला. नेहा नुकतीच ऑफिसमध्ये आलेली होती. ऑफिसमध्ये आल्या आल्या ती जरा स्थिरावते आहे तेवढ्यात अपर्णा तिच्या केबिनमध्ये आली आणि नेहाला विचारू लागली,
“ मॅडम त्या नवीन लेखिकेला बोलवायचं का?”
“ हो बोलव तिला.”
अपर्णा आणि नेहा बोलत असतानाच तिथे रमण येतो.
नेहा दचकते. अपर्णा मागे वळून बघते तर तिला रमण दिसतो. अपर्णाच्या कपाळावर आठ्या येतात. रमण म्हणाला ,
“मॅडमशी मला बोलायचंय.”
अपर्णाकडे बघत म्हणाला. अपर्णा रमणकडे बघत बसली तेव्हा रमण पुन्हा म्हणाला ,
“ अपर्णा मॅडम तुम्ही जरा बाहेर जाता का मला नेहा मॅडम सोबत बोलायचं आहे .”
तेव्हा अपर्णा भानावर येते आणि ती उठून बाहेर जाते. रमण समोर खुर्चीत बसतो. नेहाच्या कपाळावर अजूनही आठ्या असतात पण तिने या वेळा ठरवलेलं असतं की रोखठोक रमणला सांगायचं. त्या आधीच रमण बोलायला सुरुवात करतो,
“ नेहा मला माफ कर मी तुला फार त्रास दिला. मी तुझ्यात इतका कधी गुंतलो मला कळलच नाही.पण मी तुझ्यात गुंतलो म्हणून तू ही माझ्यात गुंतलच पाहिजे असं मी तुला जबरदस्ती करू शकत नाही हे गोष्ट माझ्या बायकोमुळे मला कळली. तिने मला बरंच समजावलं. मला आत्तापर्यंत अशी सवय होती ती माझ्या देखण्या रूपावर स्त्रिया भाळून मला सर्वस्व अर्पण करायच्या पण मी कधी त्यांच्या गुंतलो नाही कारण त्या सगळ्या उथळ होत्या. तुझ्यात मात्र एक काहीतरी आकर्षण आहे.तुझ्यात एक ठहराव आहे जो मला आकर्षित करून गेला. त्यामुळे मी तुझ्याशी वारंवार बोलायची संधी शोधू लागलो आणि तुझ्यात अधिकाधिक गुंतत गेलो. त्यामुळे तू माझ्याशी बोलणार नाहीस हे लक्षात आल्यावर मी खचलो आणि माझी तब्येत बिघडली. हे सगळं चुकीचं घडत गेलं हे मला माझ्या बायकोमुळे लक्षात आलं म्हणून मी आज तुझी माफी मागायला आलो आहे . माझ्या वागण्यामुळे तुला आत्तापर्यंत जो काही मनस्ताप झाला असेल त्याबद्दल मला क्षमा कर. मी क्षमा मागण्याच्या लायकीचा कदाचित नसेलही पण तरी मला तू क्षमा कर.”
हात सोडून नेहा कडे बघू लागला. त्यावर नेहा म्हणाली,
“रमण सर तुम्ही माफी मागायला आला यात सगळं आलं. पुष्कळदा माणूस चुकतो. चुकतो म्हणूनच तो माणूस आहे पण तो चुकतो आहे हे कोणी लक्षात आणून दिल्यानंतर जर त्याने स्वतःची चूक सुधरवली तर त्याला खरोखरं पश्चाताप झाला आहे असं समजता येत. तुम्ही माफी मागताय मी तुम्हाला माफ केलंय. तुम्ही आता पुन्हा ही चूक इतर स्त्रीच्या बाबतीत करू नये एवढीच मी तुम्हाला विनंती करेन.”
नेहाच बोलणं ऐकून रमण म्हणाला,
“ खूप खूप थँक्यू. मला कालपासून चैन पडत नाहीय. कधी एकदा तुझी माफी मागतो असं झालं होतं. माझ्या बायकोने ही या दरम्यान खूप सहन केलं. सुरुवातीला तिलाही गोष्ट कळली नाही. जेव्हा कळली तेव्हा ती तुला येऊन भेटली. तुला भेटल्यानंतर मात्र तिने मला स्वच्छ शब्दात सांगितलं की मी तुझा नाद सोडावा कारण तिने मला त्याच्या मागचं सगळं कारण समजून सांगितलं. पहिले मला मान्य करणार जड केलं पण नंतर मी ते स्वीकारलाय आणि म्हणून मी आज माफी मागायला हिंमत करून आलोय. जे काय झालं ते विसरून जा.”
यावर नेहा म्हणाली,
“मी आता तुमच्या ऑफिसमध्ये येणार नाही. जाहिरातीचं काय काम असेल ते बघायला माझी असिस्टंट अपर्णा येईल .”
त्यावर रमण लगेच म्हणाला,
“काही हरकत नाही अपर्णा मॅडमना माझ्या ऑफिसमध्ये पाठवण्याऐवजी मी माझा असिस्टंट तुमच्या ऑफिसमध्ये पाठवीन तेव्हा तुम्ही त्यांच्याशी मीटिंग करून सगळं फायनल करा. माझ्या ग्रुपचे जे लेखक आहेत त्यांना पण मी तुमच्या ऑफिसमध्ये पाठवीन यानंतर तू आमच्या ऑफिसमध्ये यायची गरज नाही. जिथे कुठे शूट असेल तिथे तुला यायचं असेल आणि तुझ्या कल्पने प्रमाणे सगळं शूट होतय का हे बघायचं असेल तर तू ये मला आधी असिस्टंट कळवेल. मी तिथे येणार नाही. मी तुला आता कधीही त्रास देणार नाही. मला खूप अपराधी वाटतं आहे.”
एवढं बोलून रमण थांबला. क्षणभरातच रमणच्या डोळ्यात अश्रू आले. त्याचा चेहरा कळवळलेला दिसला. हात जोडत तो पुन्हा पुन्हा माफी मागू लागला. नेहा त्याला म्हणाली,
“ मी बंगलोरला आले ते मला दोन डिपार्टमेंटचं हेड म्हणून प्रमोशन मिळालं या आनंदात होते आणि त्यामध्ये तुम्ही हा वेगळ्या प्रकार सुरू केला त्यात मला प्रचंड मानसिक त्रास झालाय. हे मी का सांगते आहे कारण मी हा त्रास सहन करू शकत नव्हते. मी घरी फोनवर सांगू शकत नव्हते पण माझा जोडीदार इतका चांगला आहे की त्याला माझ्या फोनवरच्या बोलण्यावर कळत होतं की मी अडचणीत आहे. मी आजारी पडल्यावर तो येणार होता पण त्याला सुट्टी न मिळाल्यामुळे तो येऊ नाही शकला पण आता मात्र तो येऊन गेला आणि जेव्हा मी त्याला तुमच्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी मला खूप छान समजावून सांगितलं. त्याच्या आधारामुळे मी आज एवढी ठामपणे उभी आहे. आपल्या जोडीदाराबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ राहिला हवं. तुमच्या मिसेसने तुम्हाला सगळं नीट छान समजावून तुम्हाला मार्ग दाखवला तसाच ह्या सगळ्या संकटातून बाहेर कसं पडायचं आणि स्वतःला कसं सावरायचं हे माझ्या नवऱ्याने मला शिकवलं. त्यामुळे तुम्ही तुमच्या बायकोप्रती कृतज्ञ रहा आणि मी माझ्या नवऱ्याला नेहमीच रिस्पेक्ट करत राहीन. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला आकर्षण वाटतं, बोलावसं वाटतं, त्यांचे विचार ऐकावेसे वाटतात हे चूक आहे हे मी कधीच म्हणणार नाही. असं प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतं पण त्याला तुम्ही जे रूप दिलं ते चुकीचं होतं. “
यावर रमण म्हणाला,
“ आपण मैत्रीपूर्ण नातं ठेऊ शकतो का? “
नेहा म्हणाली,
“ नाही. ज्या पद्धतीने तुम्ही वागलात त्या पद्धतीने मी तुम्ही मित्र म्हणून चांगले वागाल याची खात्री बाळगू शकत नाही त्यामुळे मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत आपला संपर्क न आलेला चांगलं. तुमच्या कंपनीशीच स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं जाहिरातीसाठी टायअप असल्यामुळे तुमच्याकडेच आम्हाला जाहिराती कराव्या लागतात. त्यामुळे मला पर्याय नाही पण तुम्ही मात्र आता या कारणांनिमित्ताने मला भेटायला येऊ नका हे मी तुम्हाला हात सोडून विनंती करते.”
याबरोबर रमण म्हणाला,
“ नको नको हात जोडू नकोस. यात तुझी काहीच चूक नाही चूक माझीच आहे. मी तुला पुन्हा भेटणार नाही किंवा त्रास देणार नाही.”
“तुम्हाला एक सांगायचंय की कोणासाठी स्वतःचं आयुष्य खराब करू नका आणि दुस-यांच्या आयुष्यात वादळ निर्माण करू नका.”
“ मी हे लक्षात ठेवीन “
रमण असं म्हणाला आणि उठून निघून गेला. त्याला जाताना बघून अपर्णा नेहाच्या केबिनमध्ये आली. तिने विचारलं,
“ कशाकरता हा इथे आला होता?”
अपर्णाच्या आवाजात चीड होती. त्यावर नेहा म्हणाली,
“तो माझे माफी मागायला आला होता.”
यावर अपर्णाला आश्चर्य वाटलं.
“ माफी? कशी का या? ही ऊपरती रमण शहाला कशी सुचली.?”
तेव्हा नेहा म्हणाली,
“त्याला त्याची चूक कळली आणि त्याला पश्चात्ताप झालाय हे लक्षात आलं माझ्या. म्हणून तो माफी मागायला आला.”
“मग तुम्ही केली का माफ?”
यावर नेहा म्हणाली,
“ जेव्हा एखाद्याला आपली चूक कळली आणि तो माफी मागायला आला तर त्याला माफ करावं. शरणागताला क्षमा करावी हेच आपल्या पूर्वजांनी सांगीतलं आहे. तेच मी केलं.”
“मॅडम जाहीराती संबंधी त्यांच्याशीच बोलावं लागणार?”
“ रमण त्याचा असिस्टंट आपल्या ऑफिसमध्ये पाठवणार आहे. लेखक सुद्धा येतील. आता रमण शहा नावाची व्यक्ती आपल्याला भेटणार नाही.”
बोलताना नेहाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं.
“ हे खरं होईल का?”
अपर्णाने शंका व्यक्त केली.
“ हो प्रत्यक्षात घडेल असं. रमण शहांना पश्चात्ताप झालाय.तू काळजी नको करू.”
“ माणूस इतक्या चटकन बदलेल यावर विश्वास बसत नाही.”
“ होतं असं कधी कधी.”
“बघूया कळेलच.
तेवढ्यात नेहाचा फोन वाजला.
“ अपर्णा फोन येतोय.”
‘ हो घ्या.मी निघते.”
अपर्णा गेली. नेहा स्तबधपणे फोन न्याहाळत होती.चेहे-यावर संमिश्र भाव होते.
_________________________
क्रमशः. नेहाला कोणाचा फोन आला असेल?